पालकांनी बालकांशी पालकांसम वागणे
शिर्षक वाचून मनात गोंधळ उडाला असणार. हरकत नाही. बालक आणि पालक यांचे एकमेकांशी कसे संबंध असावेत, हा विषय कायमच ज्वलंत रहाणार आहे. प्रामुख्याने हे संबंध तपासताना, आमचे पालक, आमचं लहानपण, आमचं पालक पण ... या फुटपट्ट्या लावल्या जातात आणि नेमका तिथेच गोंधळ होतो.
असो. निमित्त आहे - बालक दिनाचे आणि नुकताच केबीसी मध्ये इशित भट्ट हॉटसीट वर विराजमान झाल्यानंतरचा प्रसंग. या प्रसंगाच्या खोलात शिरण्याची गरज नाही कारण तो सगळ्यांना माहित आहे. या प्रसंगावर पालक,शिक्षक, समुपदेशक, बालमानसशास्त्रज्ञ, लाईफ कोच सगळ्यांनाच व्यक्त व्हावंसं वाटलं. त्यांनी लिखाणातून आपली मतं मांडली. सामान्य जनतेने गप्पांमधून, बडबड करून यथेच्छ तोंडसुख घेतलं. कुणी समाजमाध्यमाला, कुणी पालकत्वाला, कुणी शिक्षणपद्धतीला, कुणी संस्कारशून्य पिढीला तर कुणी विभक्त कुटुंब पद्धतीला जबाबदार ठरवलं. खरं तर, दुसऱ्याकडे बोट दाखवलं की उरलेल्या तीन बोटांची दिशा स्वतःकडे असते हा इतका साधा नियम आपण विसरून गेलोय. समोरच्याला दोषी ठरविण्यासाठी आम्ही इतके उतावीळ , उत्तेजित,आणि सर्वज्ञानी असतो की त्या भरात तारतम्य न ठेवता 'भाष्य' करण्याचीच आम्हाला प्रौढी वाटते. किंबहुना त्यासाठी हल्ली काही ना काही निमित्तच हवं असतं. आणि तसं नसेल तर ते निमित्त शोधून काढलं जातं. त्यावर चर्चेचा धुराळा उडतो. मतमतांतरांचं मंथन होतं. आणि काहीही निष्पन्न न होताच सगळं काही शांत होतं, विस्मरणात जातं.
इशीत भट्ट हा लहान मुलगा. जेमतेम दहा - बारा वर्षाचा मुलगा. या वयाची मुलं आपल्या स्वतःच्या घरात असली की 'हल्लीची पिढी काय हुषार आहे नाही?' हे वाक्यं आपण दिवसातून कमीत कमी तीनदा तरी आळवतो. पण हीच मुलं शेजारच्या घरात असली की लगेच आगाऊ आणि भोचक वाटू लागतात. इशीत भट्ट हा मुलगा नेमका केबीसीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोर आल्यामुळे या प्रसंगाची प्रसिद्धी कमालीची वाढली. अमिताभ बच्चन यांच्या बद्दल ज्या भावना, जी आदरयुक्त भिती, जे दडपण मोठ्यांना येतं, तसंच इशीत भट्ट ला वाटणं शक्यच नाही. अमिताभ बच्चनला प्रत्यक्ष समोर बघतांना अति उत्तेजित होऊन,’अजि म्या ब्रम्ह पाहिले’ या भावनेत भल्याभल्यांना सुचेनासं होतं, हे आपण अनेकदा बघितलं आहे. पण इशीतच्या पिढीने केवळ केबीसी मध्ये आणि जाहिरातीतच त्यांना बघितलं असण्याची शक्यता आहे व ते ही घरी नियमित केबीसी बघितल्या जात असेल तरच. पालकांनी अमिताभच्या व्यक्तिमत्वाचा आवाका इशीतला सांगितला असेलही. पण ती माहीती गांभिर्याने घेण्याचं त्याचं वय नाही व तेवढी त्याला समजही नाही. इशीत उद्धटपणे , आगाऊ पणे वागला असं भाष्य करणाऱ्यांनी लहान मुलांचे नृत्याचे आणि संगीताचे रिऍलिटी शो बघावेत. लहान मुलं जी कार्टून्स बघतात त्यातल्या पात्रांचा अभ्यास करावा. जाहिरातीतली लहान मुलं बघावीत. आणि रोजच्या हिंदी आणि मराठीतल्या ' संस्कारी' मालिका बघाव्यात.
जेमतेम अर्धा तास इशीत हॉट सीट वर होता आणि तेवढ्याच वेळात त्याच्या वागण्यावर गदारोळ उठला. ज्यावेळी याच वयाची मुलं रिऍलिटी शो मध्ये नृत्य करतात,गाणी गातात, त्यावेळी तर अनेकदा वयाला न साजेशा गाण्यांची निवड केली जाते. त्यावर नृत्य करतांना उत्तेजक हावभाव, विचित्र स्टेप्स बघणं असह्य होतं. या शो मधले परीक्षक ही डोकं गहाण ठेवून केवळ कौतुक करण्यासाठी आणि छचोरपणा करण्यासाठी बसले असतात. परफॉर्मन्सच्या मध्ये जी काही हुल्लडबाजी आणि वाह्यातपणा सुरू असतो, तो बघता संतापाशिवाय दुसरी कोणतीच भावना मनात येत नाही. स्पर्धकांच्या जोड्या जमवल्या जातात, त्यांना एकमेकांवरुन चिडवलं जातं. प्रपोज करणं, क्रश, ब्रेकअप, लव्ह ट्रँगल... ही भाषा सतत वापरली जाते. आणि या प्रकाराचं प्रचंड कौतुक केलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात ही असंच वागायचं असतं अशी समजूत स्पर्धकांची तर होतेच पण बघणा-या असंख्य लहान मुलांचीही खात्री होते. परफॉरमन्स वर टिप्स, चुका समजावणं, सुधारणा करणं या बाबी महत्वाच्या नसतातच. प्रत्येक परीक्षक कौतुकभरल्या नवीन शब्दांची शब्दकोषात मोलाची भर टाकण्याचं काम नेमाने करित असतो .फक्त कौतुक आणि तोंडी लावायला रडणं. 'रडणं' -- हे भावनिक बुद्ध्यांक दाखविणारं. त्याचं प्रदर्शन पण अत्यावश्यक. स्पर्धक, परीक्षक, प्रेक्षक यांनी टिपं गाळून आपल्या ‘संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणं’ ही अट पाळली की पुढच्या राऊंडच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. शास्त्र असतं ते. त्यामुळे टिपं गाळण्याचं हे संसर्गजन्य अस्त्र कायम सगळेच जण भात्यात ठेवून असतात.
अशा रिऍलिटी शो वर कुणीच काहीच कसं बोलत नाही? इशीत तर फक्त अर्धा तास पडद्यावर होता. बाकी शो मधील मुलं तर दर आठवड्याला पडद्यावर येतात आणि परीक्षक व स्पर्धकांचे निरर्थक संवाद,माकडचाळे बघावे लागतात. निषेध करायचा, टीका करायची किंवा गदारोळ करायचा तर केबीसीतल्या इशीतवरच का?
तसंच अनेकांच्या घरी टीव्हीवर मालिका बघितल्या जातात. वडीलधारी बघतातच पण त्याचा कळत नकळत परिणाम लहानांवरही होत असतो. शून्य अभिरूची आणि बुद्धीशी फटकून असलेल्या या मालिकांमध्ये नकारात्मक व्यक्तिरेखांचे उदात्तीकरण इतक्या जास्त प्रमाणात दाखवलं जातं की अशी पात्रं प्रत्यक्षातही असणारच यावर लहान मुलांचा नक्कीच विश्वास बसू लागतो. फरशीवर तेल सांडवणं, पदार्थात मीठ/ तिखट ओतणं, गॅसचा नाॅब उघडून ठेवणं, कपड्यांवर शाई सांडवणं....... बालबुद्धीलाही लाजवतील अशा अभिनव कल्पनांचा सुकाळ असणाऱ्या या मालिका लहान पिढीवर काय परिणाम करत असतील याचा विचारही करवत नाही. हीच बाब मुलांच्या कार्टून शो बद्दल. त्यातली पात्रं तर कमालीची आगाऊ , वात्रट आणि वाचाळ असतात. लहान मुलं तर या कार्टून्स च्या आकंठ प्रेमात बुडालेली असतात. अशावेळी त्यांचं अनुकरण मुलांनी नाही केलं तरच नवल.
हे सगळे टीव्हीच्या माध्यमातून होणारे संस्कार. पण घरातल्या पालकांकडून सुद्धा काय घडतं? लहान मुलांनी काढलेली चित्र, गायलेली गाणी, कविता, केलेला नाच, फॅन्सी ड्रेस या सगळ्यांचं शूटींग करून रील काढली जाते. ती पोस्ट केली जाते. मग त्यानंतर पडणारा कौतुकाचा आणि लाईक्स चा पाऊस. हे सगळे कुळाचार घरी यथास्थित पार पडत असल्याने लहान मुलांना ते नॉर्मल वाटू लागतं. कौतुक, प्रसिद्धी, रील, फोटो या दैनंदिन जगण्यातल्या आवश्यक बाबी आहेत असा त्यांचा समज होत असेल तर नेमका दोष कुणाचा? मुलांनी काहीही केलं तरी टाळ्या पडल्याच पाहिजेत हा पालकांचा अट्टाहास मुलांवरही परिणाम करतो. आपल्यावर टीका केलेली मुलांना अजिबात सहन होत नाही. कोणतीही कृती करण्याच्या आनंदापेक्षा त्याचं प्रदर्शन करणं हे मुलांना महत्वाचं वाटू लागतं. अगदी अतिरेक म्हणजे काही पालक मुलांच्या गुणपत्रिका सुद्धा समाज माध्यमावर टाकतात.
याशिवाय हल्लीच्या पालकत्वानुसार मुलांचे आणि आईवडिलांचे मैत्रीपूर्ण संबंध असावेत असं शास्त्र आहे. पण प्रसंगी मैत्रीची मर्यादा ओलांडून मुले दादागिरी कधी करू लागतात हे समजतही नाही. त्यामुळे आजच्या कुटुंबात सगळ्यात जास्त धाक कुणाचा असेल तर तो लहान मुलाचा. त्याची आवडनिवड, त्याचे हट्ट त्याच्या मागण्या, त्याचे लाड ही पालकांची प्राथमिकता झाली आहे. सहजपणे ही मुलं आई वडिलांशी, आजी आजोबांशी, पाहुण्यांशी उद्धटपणे बोलतात. अशा वेळी केबीसी मध्ये इशीत उद्धटपणे बोलला तर त्याच्यावरच दोषारोपण का?
आज समाजात संस्कारवर्गाची खरी आणि महत्वाची भूमिका बजावली जाते आहे ती तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांद्वारे. या वेगवान त्सुनामीमध्ये सगळेच भरडून निघताहेत. पण खरी फरपट होते आहे ती लहान मुलांची. त्यांना या माध्यमाचे आकर्षण वाटणं, त्यावर विश्वास बसणं, त्यांनी या आभासी दुनियेचं अनुकरण करणं - हे साहजिकच आहे कारण त्यांचा जन्मच मुळी हातात स्मार्ट फोन घेऊन झाला आहे. पण त्सुनामीच्या या लाटेत पालकही वहावत जायला लागले तर कसं होईल? आज गोकुळाष्टमी म्हणजे दहीहंडीचा उत्सव,गणेशोत्सव म्हणजे मिरवणूका आणि ढोल, नवरात्र म्हणजे नऊ रंगाचे कपडे आणि गरबा, दिवाळी म्हणजे रोषणाई, फटाके आणि भेटवस्तू …..असे लहान पिढीचे समज झाले आहेत. हे चुकीचे समज कुणामुळे? आपणच आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खरं तर अशा वेळी एका दीपस्तंभा प्रमाणे आज पालकांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मुलं कुठेही भरकटली तरी त्यांना त्यांचा दीपस्तंभ पालकांनी उपलब्ध करून दिला पाहिजे. मान्य आहे की दुर्दैवाने आजच्या वेगवान तंत्रयुगात पालकांच्या हाती मोजकेच पत्ते उरले आहेत.अनेक आगाऊ, अनावश्यक बाबींवर त्यांचा ताबा असूच शकत नाही. बाहेरच्या प्रत्येक प्रलोभनावर पालकांनी नियंत्रण ठेवणं केवळ अशक्य आहे. पण उरलेले हातातले पत्ते हे हुकुमाचे असणं ही आजच्या काळाची गरज आहे. मग पालकांनी नेमकं करावं तरी काय?पालकांनी इतरांना दोष न देता, आपलं लहानपण आठवावं. आई वडिलांची वागणूक आठवावी.आपल्या स्वतःच्या पालकांचाच आदर्श समोर ठेवून वागलं नाही तर भविष्य कठीण असणार आहे. म्हणूनच २०२५ च्या बालकदिनाच्या निमित्ताने
"हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे ।
पालकांनी बालकांशी पालकासम (म्हणजे आपल्या आईवडिलांसारखं) वागणे"॥





