"बाई रेखाटताना"
आजच्या लोकसत्तेतील,रविवार वृत्तांत मधील हा लेख.
लेखामधील आशय हा सकारात्मक,आशादायक आणि वास्तवाला धरुन असला तरी लेखकानं दाखवलेलं सुखचित्र हे अर्धसत्य आहे हे खेदानं म्हणावसं वाटतं.
कारण हल्ली मराठी /हिंदीत अत्यंत टुकार आणि अर्थहीन मालिकांचा धोधो रतीब सुरु असतो.त्यातली - सणासुदीच्या स्वयंपाकातल्या बासुंदीत मीठाचा पुडा ओतणारी.....,घरातल्या वाढदिवस समारंभात स्वतःच्या आईला कोंडून ठेवणारी......आयसीयू मधे अत्यवस्थ दिराच्या तोंडावरिल आॕक्सिजन मास्क काढून फेकणारी......मित्राच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला चार पायांवर फिरवणारी.....काळ्या रंगाच्या सुनेचा अनन्वित छळ करणारी.......ई.ई. स्त्रियांच्या रेखाटनाबद्दल लेखकानं मौन साधलं आहे.
मुळात घराघरांमधे अशा महाकारस्थानी,भडक,बटबटीत, हिंसक स्रिया असतात का??
मग अशा काल्पनिक,अतिरंजित ,दुष्ट खलनायिकांना प्रचंड फुटेज देऊन लेखक आणि निर्मात्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा असतो??
भरीस भर म्हणजे नायिका ही अत्यंत प्रेमळ आणि कमालीची सोशिक या दोनच गुणांची असते.याव्यतिरिक्त, बुद्धिमत्ता,व्यवहारज्ञान,
तर्कशुद्धता,धडाडी हे गुण तिच्या आसपासही फिरकत नाहीत .
महत्वाचं म्हणजे प्रथितयश कलावंतही या वास्तवापासून दूर जाणाऱ्या भूमिका रंगवतात आणि त्याचं समर्थन करतात.
यावर अनेकदा सुचवलेला उपाय म्हणजे - - - रिमोट तर आपल्या हातात असतो ना????
पण हा वरवरचा उपाय झाला.
आज समाजातला एक ठराविक स्तर नियमित आणि नाईलाजाने या मालिका बघतो.
केवळ करमणूक यापेक्षाही लॉकडाऊन,वृद्धत्व,अपंगत्व एकाकीपणा,उदासीनता,वेळ जात नाही,करमत नाही.....अशी परिस्थिती अनेक घरांमधे असते . यासाठी या मालिका नाईलाजाने सुद्धा बघितल्या जातात.अशावेळी या सामान्य प्रेक्षकांसाठी अभिरुचीपूर्ण,दर्जेदार सकारात्मक सामाजिक संदेश देणारी कलाकृती निर्माण होऊ नये?
निर्माते /लेखक /दिग्दर्शक यांचं वैचारिक , बौद्धिक ,सांस्कृतिक दारिद्रय तर यात दिसतंच पण त्या कल्पनाशून्यतेचा फटका स्त्री प्रतिमांना बसतोय याचा विचार जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं होईल का?