अंदरकी बात
रात्रीचे ११ वाजले. नेहमीप्रमाणे अंथरुणावर बसून मी हात जोडले आणि देवाला विनवणी केली की आजतरी सलग सात तास झोप मिळू दे. डिलीव्हरी च्या कळा मध्यरात्रीच का सुरू होतात? बरं. दिवसाढवळ्या कळा सुरु झाल्या तरी जास्तीतजास्त डिलिव्हरी मध्यरात्रीच का होतात?- हा माझा यक्षप्रश्न. आठवड्यातून चार वेळा हमखास झोपेचं खोबरं व्हायलाच हवं…. हा माझ्या पत्रिकेतच योग असावा. शिकत असताना गायनॅकॉलॉजिस्ट मॅडमचं येवढं आकर्षण वाटायचं. त्यांचा तो रुबाब, त्यांच्याभोवती असणारं वलय,काम करण्याची पद्धत, ऑपरेशन्स,यांचं मी बारकाईनं निरीक्षण करित असे. अर्थातच पुढे मी ' स्त्री रोग प्रसूती' हीच शाखा निवडली पण…. तो रुबाब, ते वलय आजपर्यंत तरी माझ्या आसपास फिरकलेलं नाहीय. किंवा, “बच्चा और मां इन दोनो मे एक ही बच सकता है” - असं परंपरागत, ‘बाॅलीवुड विरचितम् ब्रम्हवाक्य’ फेकायची तर कधीच वेळ आली नाही.
एकतर, चोवीस तास हाँस्पिटलच्या क्वार्टर मधे रहात असल्याने कोणतीही इमर्जन्सी आली की हातातील काम सोडून पळायचं हाच खाक्या.सण असो, ठरवलेला कार्यक्रम असो,नाटक सिनेमा असो की बीसी असो, आमच्या पेशंटला कोणती सिद्धी होती देवजाणे. माझ्या कार्यक्रमाच्या मुहूर्तावर ती कळा देत हजर होणार.म्हणजे ‘कळा’ तिच्या आणि माझ्या आनंदाची कायम ‘उतरती कळा’ ….’कळायोग’- हा सुद्धा पत्रिकेतलाच. कसला रुबाब आणि कुठली ऐट ? असो. मी झोपले..... आणि मध्यरात्री काॅलबेल वाजलीच. दोन वाजले होते.
' चला! आपला दिवस सुरू झाला' - असं म्हणत मी दार उघडलं.
‘मॅडम, पेशंट फुल डायलेटेशनमधेच आली आहे. ज्युनियर मॅडम नी तुम्हाला बोलावलंय कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे’
' आलीया भोगासी असावे सादर' - असं म्हणून मी वॉर्डमध्ये शिरले. लेबर रुममध्ये पेशंट विव्हळत होती.
‘मॅम, सेकंडपॅरा आहे. पहिली डिलीव्हरी नॉर्मल आहे. पेशंट फुल डायलेटेशन मधेच आली. घरीच मेम्ब्रेन गेलंय आणि ब्रीच प्रेझेंटेशन आहे.’
ती सांगत असतानाच पेशंटला एक जोरात कळ आली आणि बाळाची पावलं दिसू लागली.
इतक्या वेळेवर येणाऱ्या पेशंटची ‘आधी सुटका' आणि नंतर विचारपूस’ असा उलटा प्रवास करावा लागतो. सोनोग्राफी, हिमोग्लोबीन, शुगर, ब्लडप्रेशर, अंगावरची सूज हे सगळं बाजूला सारून आधी पेशंटला मोकळं करायचं. आणि बाळाला व आईला काही काॅम्प्लिकेशन झाले तर त्याचं खापर डॉक्टरवरच फुटणार…हा सुद्धा माझ्या पत्रिकेतील योग बरं. असो.
‘ब्रीच’ ऐकताक्षणी माझी छाती धडधडू लागली. आता' ब्रीच' म्हणजे पायाळू. अशी पेशंट जर नियमित तपासणीसाठी आली तर तिला सिझेरियनची कल्पना दिली जाते. कारण पायाळू बाळाचं डोकं वर असल्यामुळे आईचं पेल्व्हिस व बाळाचं डोकं यांचे परस्पर आकारमान जुळतं की नाही हे ठरवणं कठीण असतं .अशा वेळेस डोकं अडकण्याची शक्यता असते. डोकं अडकलं तर बाळ गुदमरतं.बाळाला ऑक्सीजन मिळाला नाही तर सेकंदागणिक धोका वाढू लागतो. एका क्षणात हे सगळे विचार मनात येऊन गेले.आता सध्या या केसमधे सगळ्या शास्त्रीय बाबी गुंडाळून लवकरात लवकर डिलिव्हरी करणं हाच पर्याय होता. मी गाऊन आणि ग्लोव्हज् चढवले.
अशा तणावपूर्ण परिस्थितीत नातेवाईकांना सगळी परिस्थिती समजावून त्यांची ‘हाय रिस्क कन्सेन्ट' घ्यायला सिस्टरला पाठवले. ओटी तयार ठेवण्यास सांगितली. ॲनस्थेटिस्ट, पेडियाट्रिशियन, आणि सीनियर मॅडम ला केसबद्दल कल्पना दिली आणि रणभूमीवर सज्ज झाले.
बाळाची पावलं हळूच दोन बोटांनी धरली. . तितक्यात पेशंट ने कळ दिली आणि बाळ कमरेपर्यंत बाहेर आलं. आता त्याचं डोकं सुस्थितीत बाहेर येणं, ही फार मोठी परीक्षा. कमी वजनाचं बाळ सहज बाहेर येतं. पण गुबगुबीत बाळाची मात्र पंचाईत. आणि पर्यायाने डॉक्टरांचीही पंचाईत.इकडे बाळाचं डोकं अडकलं तर डॉक्टरचाही श्वास अडकतो. मला ब्रीच डिलीव्हरीच्या तंत्राची पुस्तकातली आकृती डोळ्यासमोर आली.एक एक क्षण महत्वाचा होता. बाळाची कंबर धरुन हळूच पोटा पर्यंतचं शरीर बाहेर काढलं. दोन्ही हातांनी त्याला वरच्या दिशेने उभं धरलं आणि पेशंटच्या पोटाच्या दिशेने तिरपं केलं. याच पोझिशन मध्ये बाळाला धरून ठेवण्याची असिस्टंट ला सूचना दिली. माझे दोन्ही हात मोकळे झाले. डावा हात बाळाच्या खांद्यापाशी नेऊन हळूच त्याचा एक हात बाहेर काढला. दुसराही हात बाहेर काढून बाळाचे हात मोकळे केले. आता बाळाचं तोंड हाताने चाचपलं. उजव्या हाताची दोन बोटं त्याच्या तोंडात घातली व डाव्या हाताने त्याच्या मानेला आधार दिला. तोंडात घातलेल्या दोन बोटांनी त्याचा जबडा आणि पर्यायाने हनुवटी हलकेच समोर ओढली. डाव्या बोटांनी मान आणि उजव्या बोटांनी हनुवटीला धरून त्याच्या डोक्याला हळूच हलवणं आणि समोर ओढणं- ही क्रिया सुरू ठेवली आणि अलगदपणे बाळाला बाहेर काढण्यात मी यशस्वी झाले. बाहेर येता क्षणी बाळाने ठणाणा केला . ज्यामुळे ते गुदमरलं नाही याची खात्री पटली. बाळाला धरून सरळ बाहेर ओढलं तर कोणत्याही भागाचं फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळे तंत्रशुद्धता गरजेची असते. पण बरेचदा परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शास्त्र- तंत्र गुंडाळून ठेवावं लागतं. सुदैवाने हे बाळ ठणठणीत होतं. पुढचे सगळे सोपस्कार आटोपले आणि मी निवांतपणे डिलीव्हरी च्या नोट्स लिहू लागले.
‘ मॅडम नमस्कार. ओळखलं नाही का?’
असा आवाज येताक्षणी मी वर बघितलं. मला कसलाच संदर्भ लागत नव्हता. मी प्रश्नार्थक चेहे-याने समोरच्या व्यक्तीकडे बघू लागले.
‘हे बघा मॅडम ‘- असं म्हणून त्या व्यक्तिने मळकट पिशवीतून एक पिवळ्या रंगाचं जीर्ण कार्ड काढलं..
‘अरे, हे तर आमच्या हॉस्पिटलचं डिसचार्ज कार्ड दिसतंय.’
‘हो मॅडम. याच दवाखान्यात माझी पत्नी 2 वर्षापूर्वी डिलीव्हरीसाठी भरती झाली होती. त्यावेळी ती सीरियस झाली आणि दोन बाटल्या रक्त द्यावं लागलं होतं’.
डिसचार्ज कार्डवर माझंच अक्षर होतं. जसे माझे डोळे त्या अक्षरांवरून फिरत होते, माझ्या समोर सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलं.
वर्षानुवर्ष वैद्यकीय व्यवसाय करित असल्यानं प्रत्येक पेशंट ओळखणं शक्यच नसतं. नाव, चेहेरा लक्षात राहणं ही अशक्य कोटीतली बाब असते. मात्र ‘विशिष्ट केसेस’ या मेंदूतून कधीच डीलीट होत नाहीत. कारण त्यांना स्वतः हाताळून कधी यश, अपयश,चुका…. अनुभवल्या असतात. त्यामुळे अशा केसेस कायम मेमरी त असतात.
मी चटकन उठून पेशंट जवळ गेले. रुक्मिणीबाई श्रांत क्लांत अवस्थेत निपचित पडून होती. माझी चाहूल लागताच तिने डोळे उघडले आणि हात जोडून नमस्कार केला. '
‘ अगं, तू आहेस हे मला कळलंच नाही. तू सुद्धा ओळख दिली नाहीस’.
‘येळच कुठे भेटला मॅडम? माझ्याकडे बघाले तुमाले कोठे फुरसत होती? तुमी तुमच्या घोरात. आन मले तं काईच सुदरत नवतं’.
‘धन्य आहे तुझी रुक्मिणी बाई . तूच संकटात टाकतेस आणि त्यातून बाहेरही काढतेस.’
मी कोपरापासून हात जोडत म्हणाले.
ही रुक्मिणी बाई दोन वर्षापूर्वी आमच्या दवाखान्यात भरती झाली. पहिलटकरीण होती. बारिक कळा सुरु झाल्या होत्या. नऊ महिन्यात नियमित तपासणी, ब्लडप्रेशर, हिमोग्लोबीन, शुगर, सोनोग्राफी या भानगडीत न पडणारी , कळा सुरू झाल्यावरच डायरेक्ट दवाखान्यात येणारी एक अघोषित संघटना असते. रुक्मिणी त्यांचीच सदस्य.
तपासणी केल्यावर सगळं काही नॉर्मल असल्याने काळजीचं काहीही कारण नव्हतं. साधारणतः दहा बारा तासात तिची नॉर्मल डिलीव्हरी होणं अपेक्षित होतं . अर्थात, ‘होप फॉर द बेस्ट अँन्ड प्रिपेअर फॉर द वर्स्ट .’.... हा मंत्र नेहमी लक्षात ठेवायचा हे माझं तंत्र. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गोंधळ होत नाही. नॉर्मल पेशंटला ज्युनियर डॉक्टर्स व्यवस्थित सांभाळत असल्याने मला प्रत्येक पेशंटला अटेंड करण्याची गरज नसायची. रुक्मिणी बाईचीची रात्री एक वाजता नॉर्मल डिलिव्हरी होऊन मुलगी झाली. आता प्लॅसेंटा पडण्याची वाट होती. प्लॅॅसेंटा हा ठराविक वेळेत पडणं आवश्यक असतं. कधी कधी पोटावर हलकासा दाब देऊन त्याला बाहेर पडण्यास मदत करावी लागते. रुक्मिणी बाईच्या बाबतीतही असंच झालं.थोडा उशीर झाल्यामुळे पोटावर दाब देण्यात आला आणि भलतंच घडलं. प्लॅसेंटा बरोबर गर्भाशय ही बाहेर आलं. याला ‘इनव्हर्शन ऑफ युटेरस’ असं म्हणतात. यात गर्भाशयाची आतली बाजू बाहेर येते.एखादी पिशवी उलटी केल्याप्रमाणे. ही अत्यंत दुर्मिळ अशी अवस्था आहे. अनेक बाळंतपणं, अनेकदा गर्भपात, काही गंभीर आजार..... ज्यामुळे गर्भाशयाचे स्नायू कमकुवत होतात - अशा स्त्रियांमध्ये बाळंतपणाच्या वेळी गर्भाशया वर अतिरिक्त दाब दिला, तर असं चित्र दिसू शकतं. रुक्मिणी तर वयाने २४ वर्षाची व पहिलटकरीण होती. तिला कोणत्याही आजाराचा इतिहास नव्हता. पोटावर दिलेल्या दाबाबद्दल सिस्टर आणि ज्युनियरला खोदून खोदून विचारलं . पण ज्युनिअर अनुभवी असल्याने ती अशी चूक करणं शक्यच नव्हतं.
अशी केस कधीच बघितली नसल्याने ज्युनियर डॉक्टर आणि सिस्टर ला काहीच समजलं नाही. हे नक्की काय आहे, यावर त्यांचे आडाखे बांधणं सुरु होतं.. फायब्राॅइड ? ट्युमर?...वेगवेगळे तर्क करत त्यांनी मला कॉल पाठवला. मी सुद्धा अशी केस पहिल्यांदाच बघत होते. ‘इन्व्हर्शन ऑफ युटेरस’ असावं का, ही शंका माझ्या मनात डोकावताक्षणी हृदयाचा ठोका चुकला. कारण बाळंतपणानंतर गर्भाशय हे क्षतिग्रस्त असतं. प्लॅसेंटा गर्भाशयाला चिकटला असतो. हा चिकटून बसलेला प्लॅसेंटा सुटल्यावर त्या ठिकाणी आतून जखम झाली असते, जी भरून येण्यास सव्वा महिना लागतो. असं हे गर्भाशय शरीराबाहेर आलं आहे, त्यातून रक्तस्त्राव होतो आहे. म्हणजे पेशंट शॉक मध्ये जाऊ शकते. या विचारांनी मला धडकी भरली. मी ताबडतोब बीपी -पल्स चा रेकॉर्ड बघितला. बीपी कमी झालं होतं.पेशंट अर्धवट शुद्धीत होती. .ताबडतोब सलाईन, ऑक्सीजन लावलं. सीनियर मॅडम, ॲनस्थेटिस्ट
यांना अर्जंट कॉल केला. बाहेर आलेल्या गर्भाशयाचा रक्तस्त्राव व इन्फेक्शन नियंत्रणात राहण्यासाठी गर्भाशयाला तात्पुरतं पॅकिंग केलं.पेशंटला ओटीत हलवलं. हिमोग्लोबिन तपासल्यावर ते पाच ग्रॅम निघालं. नातेवाईकांना रक्ताची सोय करायला सांगितली. ' हाय रिस्क कन्सेन्ट ' घेतली. अशा या केसमध्ये लवकरात लवकर गर्भाशयाला जागच्या जागी बसवणं हे महत्त्वाचं. हाच एकमेव उपाय आहे . त्याचंही एक तंत्र आहे, ज्यासाठी पेशंटला भूल द्यावी लागते . नंतर ओटी मध्ये पद्धतशीर सगळ्या प्रक्रिया पार पडल्या. रक्ताच्या तीन बाटल्या लागल्या.४८ तास डोळ्यात तेल घालून पेशंटवर लक्ष ठेवलं. तिसऱ्या दिवशी सकाळी पेशंट धोक्याबाहेर आली. आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
पेशंट आमच्या दवाखान्यात ३ आठवडे राहिली. कारण संपूर्ण विश्रांती ही , तिचं गर्भाशय पूर्ववत होण्यासाठी आवश्यक होती. तिला, तिच्या आईला, सासूला, नवऱ्याला रोज आम्ही पुढची काळजी कशी घ्यायची हे समजावून सांगत होतो. तिच्या डिसचार्ज कार्ड वर मोठ्या अक्षरात सूचना पण लिहिल्या होत्या. ‘दुसऱ्या मुलाची घाई करू नये. चार ते पाच वर्षांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भधारणेचा विचार करावा. समजा गर्भधारणा झालीच तर प्रत्येक महिन्यात वैद्यकीय तपासणी करावी. दुसरे बाळंतपण हे सिझेरियनच होईल याची कल्पना आताच देण्यात येत आहेे.’
इतकं ठासून सांगण्याचा उद्देश हाच, की पेशंट ला त्याचं गांभिर्य उमजावं.
पण इतकं ‘ प्रबोधन ‘करुनही ही ‘महान माऊली’ जेमतेम दोन वर्षांनी आमच्याकडे दाखल झाली - ती सुद्धा अगदी वेळेवर. त्यातही आधीची हिस्ट्री सांगण्याच्या परिस्थितीत ' माता' नव्हती तर पिताश्रींना त्याची गरजच वाटली नाही. नशीब हे की आधीचं डिस्चार्ज कार्ड फाटकं का असेना पण शाबूत होतं ज्यामुळे तिची हिस्ट्री तरी कळली - अर्थात ती ही उशीराच .आणि माझ्या ‘प्रबोधनपर लिखाणाचा’ शून्य उपयोग होतो’- हा मला साक्षात्कारही झाला.
आता मात्र मी चिंतन (विचारांच्या वरची पातळी हो.) करु लागले. रुक्मिणीबाई आमच्या सल्ल्यानुसार वागली असती तर??? लगेच होणाऱ्या गर्भधारणेपासून आम्ही तिला परावृत्त केलं असतं. चार वर्षानंतर गरोदरावस्थेचे शेवटचे तीन महिने तिला भरती करून सक्तीची विश्रांती दिली असती. आणि एखादा योग्य दिवस ठरवून तिचं सिझेरियन केलं असतं.
पण वैद्यकीय सल्ला धुडकावूनही, तिचं सिझेरियन टळून नैसर्गिक प्रसूती झाली. बाळ गुटगुटीत निरोगी. बाळंतीण टुणटुणीत. याला काय म्हणायचं? म्हणजे आमच्या सल्ल्याला काही अर्थच नाही का? थोडक्यात काय,आमचं न ऐकल्यानं तिचा फायदाच झाला. पण मग आमचा सल्ला चुकीचा होता ???
रुक्मिणीचा राऊंड घेताना मी चिडून जाब विचारलाच.
‘ मॅडम, आमाले बाबूच पायजे होता तं पयली पोट्टीच झाली.पन घरचा बुढा, बाबू साठी आस लावून बशेल होता. तुम्ही म्हनत का चार वरीस गॅप ठेवतो. पन मले तं काईच तरास नवता.रोज वावरात दन काम करत जावो मी. बाकी बाया बी इमारत, का येका पोरीत डंगरी होत अस्ते का माय? आमाला तं चार पाच पोरं होऊनबी आमी टनटन हावो. आता घरचा बुढा ‘बाबू बाबू’ म्हनता मधीच गचकला तर मलेच बोल लागला अस्ता की नाय?’
आणि मग मला उत्तर मिळालं .मी रुक्मिणीबाईची दुसरी डिलिव्हरी करत असताना
मी तिला ओळखलंच नव्हतं .त्यामुळे तिची तिच्या हिस्ट्रीचंही विस्मरण झालं. फक्त हिस्ट्री अर्थातच विस्मरणात. मी‘ब्रीच’ वर लक्ष केंद्रित करूनतिची सुटका. केली. तिचं व्यवस्थित बाळंतपण केलं. तात्पर्य हे, की ‘विस्मरण’ अनेकदा फायदेशीर असतं ते असं.
“यद् पिंडी तद् ब्रम्हांडी” …. या न्यायाने प्रत्येक शरीरातही एक निसर्ग असतो - जो कधीही चुका करित नाही . उलट आपल्या चुकांवर पांघरूण घालून शरीराला सांभाळत असतो. प्रत्येकाची शरीररचना आणि शरीरक्रिया ही समान असली तरी स्वभाव आणि आतला निसर्ग वेगवेगळा असतो .
रुक्मिणीबाईचा जीवनस्तर बघता आरोग्य ही तिची प्राथमिकता कधीच नव्हती. म्हणून आमच्या सूचनांचं तिला आणि तिच्या कुटुंबियांना शून्य महत्व होतं. ती मोकळ्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून शारीरिक कष्ट करणारी.अशा लोकांची तब्येत नैसर्गिक वातावरणातच सुधारते. माझ्या पुस्तकी सल्ल्यापेक्षा ‘बुढ्याले नातू दाखवणं’, ‘इतर आयाबायांचे उपदेश’ … हे तिच्या साठी जास्त महत्वाचं होतं.नैसर्गिक, अभावग्रस्त परिस्थितीत जगणारे हे जास्त निरोगी असतात कारण बाह्य निसर्ग त्यांच्या शरीरातील निसर्गावर परिणाम करित असतो.
इथे रुक्मिणीबाई ऐवजी एखादी सुशिक्षित, संपन्न आर्थिक स्थितीतली स्त्री असती तर तिने अजून चार डॉक्टरांचे सल्ले घेतले असते. मग शरीरमनाला फुलासारखं जपत ती ‘ व्हीआयपी’ पेशंट झाली असती आणि स्वतः बरोबर आम्हालाही तिनं वाचवलं असतं.
शरीरावर उपचार आणि शरीरानुसारच सल्ले हे डॉक्टरचं काम. पण त्याहीपेक्षा प्रभावी शरीरातला ‘निसर्ग’ असतो जो शरीराच्या संरक्षक आणि उपचारात्मक प्रणालीचं काम करतो..पेशंटमधल्या या प्रणालीचा अंदाज नसल्याने शास्त्रीय वैद्यकीय आडाखे बरेचदा चुकतात. म्हणूनच ९९% ब्लॉक असणाऱे एखादे आजोबा बायपास सर्जरी नाकारतात आणि पुढची दहा वर्षे मजेत जगतात. त्याचवेळी चाळीशीचा तरुण छाती दुखते म्हणून ॲंजिओप्लास्टी करतो आणि तणावात राहून दोन वर्षांतच बायपासला सामोरा जातो.
आज वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही अद्ययावत झालं, कृत्रिम गर्भधारणेचं तंत्र कितीही विकसित झालं तरी गर्भधारणा, गर्भपात आणि प्रसूती हे हुकुमी एक्के शरीरातील निसर्गाने स्वतःच्या हातात ठेवले आहेत. विज्ञानाला शरीरातील हा निसर्ग आजही अगम्य आहे.कारण तो कोणत्याही प्रयोगशाळेत तपासता येत नाही. म्हणूनच पेशंटला (आणीबाणीची परिस्थिती नसेल तर) कधी कधी त्याच्या आतल्या निसर्गाच्या हवाली करावं…… हा निसर्ग डॉक्टरांपेक्षा तल्लख असतो. तो त्याचं काम चोख करतो.पण ही ‘अंदरकी बात’ आहे बरं का.पेशंटला याची अजिबात कल्पना नसावी.हे ही एक तंत्र आहे जे पेशंटला कळू न देता केव्हा आणि कसं वापरायचं ….हे मात्र मी का सांगू? “डॉक्टरांच्या हाताला गुण आहे हो”.... हे वाक्य ऐकून माझा आतला निसर्ग सुदृढ होतो की.मग? ये अंदरकी बात है!!!
