Monday, January 6, 2025

 ब्रेन रॉट की बुद्धीबळ??




जानेवारीने पहिला आठवडा ओलांडला आहे.... पण नववर्षाचा संकल्प काही ठरत नाहीय.त्यामुळे माझी लेक प्रचंड अस्वस्थ झालीय. अत्यंत फुटकळ, सामान्य संकल्प (उदा० पहाटे उठणे, रोज ५ ० ० ० पावलं चालणे, रोज पुस्तकाची पाच पानं वाचणे, प्राणायाम करणे, सोयीनुसार दीक्षीत - दिवेकर डाएट पाळणे ).. वगैरे, वगैरे तिच्या मते सोऽऽऽऽऽ मिडलक्लास आहेत. याशिवाय प्लॅस्टिकबंदी, वृक्षारोपण, कचरानिर्मूलन, ध्वनिप्रदूषण, पर्यावरणरक्षण या ज्वलंत सामाजिक समस्यांवर देखिल सामूहिक संकल्प यशस्वीपणे तिच्या गृपने राबवले आहेत अशी इतिहासात (तिच्या हो.) नोंद आहे.  कोणत्याही संकल्पाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून इतिहासाचा धांडोळा घेणं गरजेचं होतं. आता संकल्प नाही केला तर तिच्या व देशाच्या  इतिहासात पोकळी निर्माण होईल अशी आमच्या  सात पिढ्यातही शक्यता नाही- - असं माझं ठाम मत. त्यावरून संकल्प न करण्याचाच संकल्प करावा अशी अवसानघातकी सूचना करून मी तिच्या तळपायाची आग मस्तकात पोचवण्याचा घोर अपराध केला . शिवाय हा संकल्प सुरक्षित, निरुपद्रवी, सोयीस्कर आहे - अशी री ओढून पिताश्रींनी  त्यात पळीभर तडक्याची आहुती घातली .आता हे होमकुंड शांत करण्याची जबाबदारी माझीच.

        तिच्या वयाची असताना आम्हा मैत्रिणींना पण संकल्पाचे दरवर्षी डोहाळे लागायचे. एक गंमत असायची त्यात. आता नुकतंच ' मी पुन्हा येईन’ या संकल्प सिध्दीची कहाणी याची देही याची डोळा अनुभवली आहे. ‘केल्याने होत आहे रे - आधी केलेचि ( संकल्प ) पाहिजे.’ यातल्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे. नाही म्हटलं, तरी यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली की नाही? खोटं कशाला बोलायचं? शिवाय जो संकल्प करतो -त्याचं मन जिवंत असतं असं म्हणतात (कोण???) आणि सगळ्यात  महत्वाचं म्हणजे लेकीच्या पिढीसाठी तर ' शास्त्र असतं ते'.

     आजकाल  'शास्त्र पाळणं'  हा राष्ट्रीय  कुळाचार झाला आहे  . हे नवशास्त्र संगणकयुगातील माध्यम व तरुणलोकसंस्कृती वर आधारित आहे . या शास्त्राची परंपरा आजचा समाज कसोशीने पाळताना दिसतो. या परंपरेत कमालीचा आनंद तर आहेच पण अभ्यास, विचार तर्क, विवेकबुद्धी असल्या अंगभूत बाबींना यात थारा नसल्याने प्रत्येकाला त्यात उच्च स्थानी पोचण्याची सारखीच संधी असते . . त्यामुळे नवीन पिढी तर सोडूनच द्या पण जुनी पिढीही आपली व्रत वैकल्ये बासनात गुंडाळून , माळ्यावर टाकून , कोरी पाटी घेऊन या परंपरेत सहभागी झालेली दिसते.

        तर मूळ मुद्दा हा संकल्पाचा आहे. हल्लीच्या नवशास्त्रात केवळ संकल्प करित नाही. तो एक  समारंभ असतो. ३१ डिसेंबरला रात्री एकत्र जमायचं. आधी जाणाऱया वर्षाचा निरोप घ्यायचा. मग  येणा- या वर्षाचं स्वागत करायचं. नाच, गाणी, धिंगाणा करून केक कापायचा . विशेष म्हणजे समारंभ कोणताही असो केकशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही. वाढदिवस आणि केक- हे आपलं (माझ्या पिढीचं) समीकरण आता इतिहासात गेलंय. नंतर 'काँटिनेंटल' खादाडी करायची. आणि मग प्रत्येकाने आपला संकल्प जाहीर करायचा. या सोहळ्याचा व्हिडीओ करायचा. तो कमीत कमी पन्नास मित्रांना पाठवायचा. आणि लाईक्स मिळाले की त्यानंतरच ही कहाणी सुफळ संपूर्ण होते. असा वसा या नवशास्त्रात घ्यावाच लागतो. मग ट्रीप असो, वेगवेगळे ' डेज' असो, गॅदरींग  असो, बारसं, डोहाळजेवण लग्न, मुंज, वास्तू बीसी काहीही असो - केक, फोटो व्हीडिओ शिवाय समारंभ होऊच शकत नाही.  समाजमाध्यमावर पाठवून त्यांना लाईक्स आणि कॉमेंट्स मिळाले की त्यानंतरच पुण्य पदरात पडतं."जसे इतरांना लाईक्स मिळाले तसे तुम्हा आम्हाला मिळो. उतायचं नाही मातायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही " असा शांतीमंत्र शेवटी म्हणून प्रदक्षिणा घातली जाते. 

        त्यामुळे लेकीच्या मनावरचा ताण आणि मी समजू शकले. खरं तर संकल्प ठरविणं आणि ते सिद्ध करणं ही एक कठीण अशी मनोवैज्ञानिक प्रक्रिया असते. संकल्प हा मोठ्यानं म्हणून दाखविण्याचा आणि माध्यमावर जाहीर करण्याचा पोरकटपणा अजिबात नाही. संकल्प हा शरीर, मन, भावना आणि आत्मा या चारही स्तरांना स्पर्श करून,त्यांना उत्तेजित करित असेल तरच तो साध्य होऊ शकतो. पण मी हे काय सांगतेय? अशी भाषा आजकाल कुणालाच समजत नाही किंबहुना असलं अगम्य कुणी वाचण्याची तसदीही घेत नाही. . आजकाल इमोजी, फोटो, व्हीडिओचीच भाषा प्रमाण होऊ लागली आहे. गंमत म्हणजे, या माध्यमयुगाने सगळ्यांना एकाच पठडीत आणून बसवलं आहे. सगळे वागतात म्हणून आपणही तसंच करायचं ही चुकीची परंपरा रूढ होत चालली आहे. सायबर सायकॉलॉजी चे जनक जॉन सुलर म्हणतात, ,”आपण समाजमाध्यमांचा हुषारीने उपयोग केला नाही तर नक्कीच समाजमाध्यम आपला हुषारी ने उपयोग करून घेईल यात शंका नाही.” आणि म्हणूनच ‘शास्त्र असतं ते'- - हा जो प्रकार आहे, तो म्हणजे आपल्याला खेळवलं जात आहे. आणि दुर्दैव हे, की आम्हाला याचं काहीही सोयर सुतक नाही उलट प्रौढी वाटते. याला आम्ही जीवनातला आनंद समजून त्यात सुखैनेव डुंबतो आहोत.

   आणि......... एकाएकी ती धक्कादायक बातमी समोर आली. नेहमीप्रमाणे डिसेंबर महिन्यात ऑक्सफर्ड डिक्शनरीने २०२४ वर्षातील लोकप्रिय शब्द जाहीर केला आहे - तो म्हणजे ' बुद्धिमांद्य’.- Brain Rot.  १८५४ साली हा शब्द हेन्री थोरो याने एका पुस्तकात वापरला आहे.  जगातल्या एकूण वर्षभरातील वातावरणाचे, घडामोडींचे, समाजमनाचे प्रतिबिंब दृगोच्चर करणारा' बुद्धिमांद्य’ हा शब्द आमच्या ‘नसलेल्या’ बुद्धीवरही आघात करिता झाला.आता खुद्द ऑक्सफर्डने ( from horse’s  mouth) जाहीर केल्यावर  पण/परंतु/शंका/ कुशंका….संभवतच नाही.त्यामुळे बुद्धीमांद्याचं बिरुद मिरवून नववर्षाचं स्वागत करण्याचा अनवस्था प्रसंग ओढवला आहे. पण बरं झालं की सोनारानेच कान टोचले.

        ब्रेन रॉट च्या या सावटातून कसंबसं सावरत असताना भारतात एकाएकी लखलखीत सुवर्ण किरण उगवला आणि बघताबघता त्याने संपूर्ण जगाचे डोळे दिपवून टाकले. डी. गुकेश या १८ वर्षाच्या भारतीय मुलाने बुद्धीबळातील ग्रँडमास्टर हा सर्वोच्च किताब जिंकला .....  एकीकडे ब्रेनरॉट आणि दुसरीकडे बुद्धीबळ? खरे काय? १८ वर्षाचा गुकेश आपली तल्लख बुद्धी वापरून बुद्धीबळात अव्वल स्थानी येऊ शकतो? मोबाईलची, गुगलची मदत न घेता? असं खरंच घडू शकतं? म्हणजे आमच्या नवशास्त्र पंथाचे अनुयायी ज्या हुषारीच्या भरवशावर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होते, तो भ्रम आहे?? रेडीमेड बुद्धीवर अंगभूत बुध्दी मात करू शकते? 

      मला आठवलं. महिनाभरा पूर्वी मी भारतीय टपाल खात्याच्या ‘ ढाई आखर’ या पत्रलेखन स्पर्धेबद्दल वाचलं होतं. सध्या लोप पावलेल्या पत्रलेखन कलेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी गेल्या 3/ ४ वर्षापासून टपाल खाते प्रयत्न करित आहे. संपूर्ण भारतात' ‘ढाई आखर’ हे अभियान राबवले जाते. शाळांमधून विद्यार्थ्यांना पत्रलेखनास उद्युक्त केलं जातं.  डिजीटल माध्यमाच्या आहारी जाऊन इमोजी, हॅशटॅग शॉटफॉर्म - वापरतांना कसलं भारी वाटतं ना आम्हाला? आपण 'स्मार्ट' आहोत हे जाणवून गुदगुल्या होत असतात.- पण त्याचवेळी आपल्या विचारांची, शब्दसंपदेची , लिखाणातून व्यक्त होण्याची क्षमता, ही खालावत चालली आहे याची जाणीवही झाली नाही.

     मोबाईल येण्याआधी जुने फोन नंबर लक्षात रहात कारण मेंदूच्या स्मृती केन्द्राला चालना मिळत असे. दुकानात पैसे देताना चटकन तोंडी हिशोब करता येई कारण मेंदूला आकडेमोडीची सवय  होती. पत्र लिहितांना, विचार - भावना शब्दात मांडताना सर्जनशीलतेचा कस लागायचा. नवीन तंत्रज्ञान हे कितीही सोयीस्कर, वेळ वाचवणारं, प्रभावी आणि अचूक असलं तरी तो जगण्याचा भाग असू शकत नाही.मोबाईलमुळे जर अंगभूत कौशल्यं (सॉफ्ट स्किल्स)  नष्ट होत असतील तर ते अतिशय गंभीर आहे. विचार, भावना आणि कृती या मेंदूच्या प्राथमिक क्षमता आहेत. सध्या आज विचारांना फाटा देऊन केवळ भावनांवर स्वार होऊन त्यानुसार अविवेकी कृति करण्याचं प्रमाण वाढलंय. याचा अर्थ आपण उत्क्रांतीच्या उलट्या दिशेने प्रवास करित  आहोत. आदिम काळात केवळ भावनांच्या आधारे वागणार्या आदिमानवा च्या मेंदूत विचारकेंद्राचा विकास झाला नव्हता. त्यामुळे तो लिंबीक सिस्टीमचा उपयोग करित असे.आज मेंदू विकसित असूनही  त्याला जर चालनाच दिली नाही, त्याला  सक्रिय केलं नाही तर विकसित मेंदूचं रुपांतर आदिम मेंदूत व्हायला वेळ लागणार नाही. ब्रेन रॉट म्हणजे दुसरं काय? ऑक्सफर्ड प्रेसने हा लाल सिग्नल दिला हे फार चांगलं केलंय. 

    'ब्रेन रॉट' मुळे नाही पण 'डी गुकेश'मुळे मात्र जादूची कांडी फिरली कारण लेक नाचत म्हणाली, “ठरलं. बुद्धीबळ खेळण्याचा संकल्प केला”. तिला टाळी देत मी म्हटलं….”आणि मी पत्र लिहिण्याचा”.

#ब्रेनरॉट

#नववर्षसंकल्प



.

 









 

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...