Showing posts with label व्यक्तिविशेष. Show all posts
Showing posts with label व्यक्तिविशेष. Show all posts

Monday, September 9, 2024

 *कहे कबीर सुनो भाई साधो*

प्रगत देशांचे आपल्याला विलक्षण आकर्षण असते.परदेशात गेल्यावर सतत भारताशी तुलना केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही.तिकडची समृद्धी बघून आपले डोळे दिपतात. पण तेव्हा विसर पडतो की एक समृद्ध संत परंपरा आपल्याला लाभली आहे. या संतांच्या लेखणीतून स्फुरलेले साहित्य - हा आपला वैचारिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवा आहे. जो अक्षय आहे. युगानुयुगे  हे संत साहित्य समाजाचे मानसिक आणि अध्यात्मिक पोषण करीत आले आहे. संतांनी आपल्या साहित्यातून अमूल्य आणि आजही कालसुसंगत असणारे जीवन तत्वज्ञान आपल्याला प्रदान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ज्ञान कोणीही विद्यापीठातून वा भरमसाठ पदव्या मिळवून घेतलेले नाही. संतांची अंगभूत शहाणीव व प्रज्ञा यांची आपल्यावर कायम कृपा असते हे भाग्यच आहे.

     ‌‌ ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीरदास यांची जयंती असते. कबीराचे दोहे अत्यंत लोकप्रिय आहेत. अनेकांना ते मुखोद्गत आहेत. शिक्षित, अशिक्षित, विचारवंत बुद्धिवंत समाजाला संत कबीरांचे  साहित्य अवगत आहे.पण विरोधाभास असा की कबीरदासांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल कमालीची संदिग्धता आहे. त्यामुळे अनेक खऱ्या खोट्या कथा त्यांच्या धर्माबद्दल, जन्माबद्दल, गुरुं बद्दल सांगितल्या जातात. संत कबीरांचा जन्म हा वाराणसी येथील एका गावात झाला. साधारणतः पंधराव्या शतकात, चौदाशे चाळीस साली त्यांचा जन्म झाला असावा. पण यातही मत मतांतरे आहेत.  निरू आणि निमा या मुसलमान जोडप्याने, एका तळ्यात कमळाच्या फुलावर बाल कबीरला तरंगताना बघितले. हे जोडपे निपुत्रिक असल्याने, त्यांनी या बाळाला घरी आणले. नामकरणाचे वेळी मौलवींना  पाचारण करण्यात आले. मौलवींनी त्यासाठी कुराण शरीफ उघडले. पण आश्चर्याची बाब अशी की त्यांनी ज्या ज्या नावावर बोट ठेवले, ते नाव कबीर होते.  कबीर याचा अर्थ ईश्वर असल्याने मौलवींनी नाईलाजानेच हे नाव ठेवले. 

       निरू आणि निमा यांच्या घरात  कबीर यांचे संगोपन झाले. ते दोघेही विणकर असल्यामुळे सहाजिकच कबीर देखील हेच काम करू लागले. त्यावेळी देशातली स्थिती अतिशय ढासळलेली होती. मोगलांचे वर्चस्व होते.अराजक, जुलमी राजवट, हिंसा ,अन्याय अत्याचार अशा परिस्थितीत समाज भरकटलेला होता. ही परिस्थिती अनुभवतच कबीरदास लहानाचे मोठे झाले . कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी ,परंपरा या विषयीही त्यांना नेहमीच प्रश्न पडत. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांच्या उपजत आध्यात्मिक प्रतिभेला धुमारे फुटू लागले. आणि शाली, चादरी विणता विणता दोहे व कवितांमधून ते परिस्थितीवर भाष्य करू लागले.त्यावर मार्गदर्शन करू लागले. 

      कबीरदासांच्या या अलौकिक, दैवी व्यक्तिमत्त्वाची जनमानसात प्रसिद्धी होऊ लागली. अनेकांना त्यांच्या प्रतिभेचे आकर्षण होते. पण ते हिंदू की मुसलमान हा प्रश्न समाजासाठी फार महत्त्वाचा ठरला. कबीरदासांचे विचार आणि तत्वे, त्यावेळच्या भरकटलेल्या, गोंधळलेल्या समाजाला पेलले नाहीत.कारण ते काळाच्या  कितीतरी पुढे होते.त्यावेळी सिकंदर लोधीचे राज्य होते. हिंदूंना राज्यातून बहिष्कृत कराण्याचे त्याचे धोरण होते. त्यामुळे कबीरदासांनाही धर्मद्रोही ठरवून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले. पण त्यामुळे विचलित न होता ,अहिंसा, प्रेम, मानवता, नैतिकता यांची शिकवण देऊन समाज परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकत हे कार्य कबीरदासांनी अविरत सुरू ठेवले. 

*जाती न पूछो साधो की,*    

*पूछ लिजिए ज्ञान,।* 

*मोल करो तरवार का*, *पडा रहने दो म्यान।।* 

धर्म ,जात,पंथ यापलीकडे पोचलेले, मानवतेचे पुजारी असलेले  कबीरदास हे बंडखोर व क्रांतिकारक विचारांचे होते. दोह्यांमध्ये सिद्धांत आणि उदाहरण शब्दबद्ध करणे, ही त्यांची विशिष्ट शैली होती. निर्गुण भक्ती यावर त्यांचा विश्वास होता. 

*हरी को ढूंढन मै चला,*  *जा पहुचा हरिद्वार।* 

*पग थके ना हरी मिले*, *क्यूं की हरी थे मेरे द्वार।।*        मूर्ती पूजेला त्यांनी नेहमीच विरोध केला. कर्मकांड, अंधश्रद्धा यापासून दूर राहण्यासाठी त्यांनी समाजाला शाब्दिक फटकारे दिले. त्यांचे दोहे समजून घेण्यासाठी शब्दार्थ भावार्थ  (तात्पर्य) व गूढार्थ  (प्रतिकात्मक) लक्षात घेणे गरजेचे आहे. 

*राम राम सब कोई कहे,*  *दशॠत कहे ना कोई ।*

*एकवार दशॠत कहे*, *कोटी यज्ञ फल होय।।* 

 यात अनेक ठिकाणी 'दशरथ' हे चुकीचे लिहिले जाते.कबीरदासांचे दैवत श्री राम आहे असा अनेकांचा समज आहे. परंतु निर्गुण राम म्हणजेच 'आत्माराम' हे त्यांचे दैवत आहे.  वरिल दोह्यात  दशरथ आणि राम हाच  अर्थ समजला जातो. 'दशॠत' म्हणजे दहा अपराधांपासून मुक्त होऊन  रामाचे नामस्मरण करावे. 

    सोप्या - साध्या भाषेत, कमीत कमी शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे व तेही व्यवहारातील उदाहरणे देऊन.... त्यामुळे संत कबीर तळागाळापर्यंत सहज पोचले आणि भक्तांच्या हृदयात विराजमान झाले. त्यांच्या उपासनेची पद्धत परंपरागत नसल्याने, त्यांनी धर्म आणि समाजाकडे बघण्याचा आपला स्वतःचा मार्ग विकसित केला. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. आणि भाषा तरी कोणती? अरबी, फारसी, पंजाबी, बुंदेलखंडी आणि खडीबोली यांचे मिश्रण. म्हणून कबीरांच्या भाषेला पंचमेल खिचडी म्हणतात 

    बीजक आणि साकी हे त्यांचे महत्त्वाचे दोन साहित्य प्रकार. याशिवायही अनेक   प्रकारांमधून त्यांचे शब्दधन समाजाला दिशा देत असते.   महत्त्वाचे म्हणजे कबीरदासांनी स्वतःबद्दल काहीही लिहिले नाही. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल, त्यांच्या गुरुंबद्दल संदिग्धता आहे. श्री रामानंद त्यांचे गुरु होते असे म्हटले जाते.संत कबीरांचे छायाचित्र सुद्धा काल्पनिक आहे.कुणी त्यांना टोपी घातली आहे तर कुणी त्यांना मोरपीस लावले आहे.स्वतःबद्दल ते म्हणतात, 

*मसी कागद छुओ नही,* *कलम गही  नहि हाथ।* 

*चारिक जूग को महातम*  *मुखही जनाई बात।।* 

 कबीरदास निरक्षर होते. त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी हे अक्षरधन त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवलेले आहे. आणि कबीर पंथाची स्थापना केली. बाबू शाम सुंदर दास यांनी संपादन करुन १९३० मध्ये कबीरांच्या पूर्ण रचना हिंदीत प्रथम प्रकाशित केल्या. तसेच 'वन हंड्रेड पोएम्स ऑफ कबीर' हे मॅकमिलन लंडन येथे १९१५ मध्ये प्रकाशित झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे .डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी कबीरदासांना आपले गुरु मानले होते. कबीरांच्या शिकवणीमुळे मला आत्मिक शक्ती मिळाली आहे असे आंबेडकर म्हणतात. 

कबीरांची सुखाची कल्पना म्हणजे ,

*चाह मिटी चिंता मिटी*, *मनवा  बेपरवाह।* 

*जिसको कुछ नहि चाहिये*, 

   *वह शहनशाह।।* 

संत कबीरांचा निर्गुणवाद हा स्वर्ग ,नरक, पुनर्जन्म, मोक्ष, अवतार, पूजा, तीर्थयात्रा आणि उपवास या संकल्पना नाकारणारा आहे. त्यांचा भर केवळ प्रेमावर आहे. प्रेमाशिवाय  समता, स्वातंत्र्य, बंधुत्व असूच शकत नाही असं ते म्हणतात. 

  *कबीर बादल प्रेम का,* *हमपर बरसा आई।* 

*अंतरी भिगी आतमा*,

  *हरीभरी वनराई।।* 

      कबीरांचे विचार काल, सांस्कृतिक व भौगोलिक सीमा ओलांडून विश्वभर प्रसारित झाले आहेत. त्यांचे पंढरपूरच्या विठ्ठलावर  पण अतिशय प्रेम होते. त्यांनी यावर अभंगही लिहिले आहेत. 

*छोड दिया वैकुंठ*, 

*हरि भाव भगतका भूका।* 

*कहत कबीर हरी से मीठा,* 

*लागत तुलसी का  बुक्का।।*. 

   त्याकाळी किंवा आजही अशी समजूत आहे की काशीला मृत्यू आला की मोक्ष मिळतो. ही अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी कबीरदास काशीतून मगहर या ठिकाणी आले आणि तिथेच त्यांचे महानिर्वाण 

 झाले. 

 *सकल जनम शिवपुरी गंवाया।*

*मरतो बार मगहर उठि आया।।*

अशी स्वतः उक्ती आणि कृती करणारे ते समाज सुधारक होते. 

   वास्तविक आज त्यांच्या विचारांची समाजाला खूप गरज आहे. आम्हाला दोहे पाठ आहेत.पण ते अंगीकारण्याचे, आत्मसात करण्याचे धाडस आजही नाही. आम्ही व्यक्तिपूजेतच समाधानी असतो. व्यक्तिगत, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे वागावे याचे नीतीपूर्ण ज्ञान संत कबीरांच्या साहित्यातून मिळते. त्यांच्या अनेक दोह्यांमधून  *कहे कबीर सुनो भाई साधो* .. असे म्हटले असते.. इथे या   'साधोचा' शब्दार्थ म्हणजे साधू. म्हणजेच शुद्ध मनाने ऐका. भावार्थ हा 'साधक'  आहे. आणि गूढार्थ असा आहे की  'साध्य करा.'कबीर वाणी ऐका आणि साध्य करा.

       माझी कणभरही पात्रता नसताना मी संत कबीर जयंती निमित्त लिखाण केले आहे. त्याबद्दल आधीच मी वाचकांची क्षमा मागते. कारण कबीर हा विषय सामान्यांच्या आवाक्यातला अजिबात नाही.  तूर्त त्यांचा, 

*बुरा जो देखन मै चला*,

 *बुरा न मिलिया कोय।*

*जो दिल खोजा आपणा,* 

*मुझसे बुरा ना कोय।।*

हा एक जरी दोहा आपण आत्मसात केला तरी सुद्धा आपले कल्याण होऊन जीवनाचे सार्थक होऊ शकते.


#कबीरदोहे

#संतकबीर


Sunday, April 14, 2024

मर्यादा पुरुषोत्तमाची जडणघडण

 


सध्या प्रभू श्रीरामाचे नवरात्र सुरू आहे. जो तो आपल्या परीने श्रीरामाची उपासना करीत आहे. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची पार्श्वभूमी यावर्षीच्या रामनवमीला लाभली आहे. त्यामुळे या रामजन्मोत्सवाला ऊर्जा, भक्ती, पूजन यांचा परमोच्च आविष्कार समाजात दिसून येईल यात शंका नाही.

 प्रभू श्रीरामाला भारतीय जनमानसात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची प्रचिती अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी आलेली आहेच.      रामायण या महाकाव्याची निर्मिती  त्रेतायुगात  झाली आहे. त्यानंतर द्वापार युग सुरू झाले आणि आता आपण कलियुगात आहोत. पण आजही रामायणाचे गारुड तसेच आहे किंबहुना ते वाढतानाच दिसते आहे. याचे काय कारण असावे?      

            प्रामुख्याने भारतीय संस्कृतीची मशागत होण्यामध्ये रामायणाचा सिंहाचा वाटा आहे. दुसरे असे की ही विजय गाथा आहे. धर्माचा अधर्मावर, सद्गुणाचा दुर्गुणावर, सन्नितीचा अनितीवर - विजय तर रामायणात आहेच पण तो केवळ  शस्त्र सामर्थ्याने नाही तर तो श्रेष्ठ सदाचरणाने प्राप्त झाला आहे.  त्यामुळे युगानुयुगे सदाचरणाची प्रेरणा रामायणातून मिळत आलेली आहे. तिसरे कारण म्हणजे रामायणातील पात्रांनी आदर्शांचे मापदंड प्रस्थापित  केलेले आहेत. हे आदर्श व सिद्धांत काळाच्या प्रत्येक लाटेच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. त्यामुळे रामकथा आजही काल सुसंगत आहे. चवथे कारण म्हणजे रामराज्य हे मूल्यांचे राज्य आहे. कर्तव्याच्या तुलनेत वैयक्तिक मोह, भावना, प्रेम यांना महत्त्व न देता, केवळ प्रजाहिताला या राज्या प्राधान्य दिले आहे. आजच्या काळात अशा रामराज्याच्या स्मरणानेही समाजाला आत्मिक समाधान लाभते. पाचवे कारण म्हणजे प्रभू श्रीराम ही एक व्यक्ती किंवा ईश्वर नाही. तर राम ही वृत्ती आहे, विचार आहे, आचरण आहे. एवढेच नाही तर राम हे तत्व आहे. असा हा राम प्रत्येकाच्या हृदयात असतो. रामकथेत तो 'आत्माराम' जागृत करण्याची शक्ती आहे. त्यामुळे रामायण हे भारतीयांच्या रक्त मांसपेशीत रुजले आहे. आणि पिढी दर पिढी ते त्याच उत्कटतेने झिरपते आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, 'माझा राम आधी विश्वनंदन आहे.आणि मागाहून तो दशरथनंदन आहे.

        रामायणातील सगळी पात्रे आपल्याला खूप जवळची वाटतात. यातील राजस्त्रियांच्या चरित्रात डोकावून बघितले तर स्त्रीशक्तीची असामान्य रूपे आपल्याला स्तिमित करतात. मातृशक्ती, त्याग, समर्पण, निष्ठा, संयम इत्यादी गुणांचा उत्तुंग आविष्कार म्हणजे रामायणातील स्त्रिया. रघुकुलातील राजांनी रणभूमीवर आपल्या शस्त्र सामर्थ्याने विजय मिळवला आहे. त्याचवेळी या राजस्त्रियांना देखिल अनेक लढ्यांना सामोरे जावे लागले आहे - तेही राजमहालाच्या चार भिंतीत आणि शस्त्रांशिवाय. कुणी वासनांध वृत्तीशी, कुणी विश्वासघाताशी, कुणी संशय पिशाच्चाशी , कुणी उपेक्षेशी तर कुणी नियतीच्या अगम्य खेळीशी लढा दिला आहे. ही लढाई त्यांना कधी आप्तस्वकीयांशी तर कधी स्वतःशीही करावी लागली आहे. आणि या युद्धात धैर्य, संयम, विवेक, मर्यादा, पातिव्रत्य ,श्रद्धा या शस्त्रांनी त्यांनी यश मिळवले आहे. या विजयाची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रामायणाची उत्तुंगता या राजस्त्रियांमुळे कमालीची उंचावली आहे. वास्तविक या प्रत्येक राजस्त्रियेच्या ललाटावर नियतीने एका अटळ व्यथेचा शिक्का मारून ठेवला आहे. प्रत्येकीच्या राजवैभवी जीवनाला वेदनेची किनार आहे. 

         राणी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रेला सुरुवातीला अपत्यहीनतेचे शल्य उरात बाळगून, जगण्याला सामोरे जावे लागले आहे .यात नियतीचा काय हेतू असावा? पुढे स्वतःच्या गुणांनी रमविणारा आणि योगी जिथे रमतात- असा राम, सुलक्षणांनी युक्त लक्ष्मण, विश्वाचे भरण पोषण करणारा भरत आणि आणि शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुघ्न- अशा चार अलौकिक आणि दिव्य पुत्रांची प्राप्ती तीनही राण्यांना झाली. हे चारही पुत्र यथावकाश राजनीती, युद्धनीती, प्रजा धर्म, कर्तव्यनिष्ठा यांचे धडे ऋषीवरांच्या मार्गदर्शनात गिरवीत होते. त्याचवेळी त्यांच्यातला ॠजू ,समंजस, सात्विक, प्रेमळ ,संयमी, निश्चयी- असा माणूस घडत होता तो  त्यांच्या तीनही मातांच्या संस्कारांमुळे. सद्गुणांनी परिपूर्ण अशा पुत्रांची जडणघडण - ज्यांना आज आपण भावनिक बुद्ध्यांक किंवा 'सॉफ्ट स्कील्स' म्हणतो त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे . बालवयात पुत्रांवर या उन्नत भावनांचे रोपण  करण्याचे श्रेय हे या तीनही मातांचे आहे. रामायणातला हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.वाल्मिकी रामायणात रामाचे ७२ गुण सांगितले आहेत.

     राणी कौसल्या ही मातृत्वाचे प्रतिक म्हणून नेहमीच गौरविली जाते. तिरुपती बालाजी मंदिरात देवाला जागे करताना 'कौसल्या सुप्रजा रामा, पूर्वा संध्या प्रवर्तते'- या भूपाळीत प्रथम उल्लेख कौसल्या मातेचा आला आहे. वनवासाला जाणाऱ्या रामाला बघून ती कोसळते, उन्मळून पडते पण रामानेच  तिची समजूत घालून तिला शांत केले आहे.राजधर्म आणि कुलधर्माचे भान ठेवून ती कमालीच्या धैर्याने या प्रसंगाला सामोरी गेली आहे.कैकेयीचा अपराध तिने शांतपणे पोटात घातला आहे.संतप्त झालेल्या भरताला तिने आत्मीयतेने,प्रेमाने त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.१४ वर्षे रामाला तिने आपल्या नजरेत साठवून ठेवले आहे. आणि वनवासातल्या रामाला तिच्या दिव्यदृष्टीतून प्रेम आणि बळ मिळाले आहे. म्हणूनच 'कौसल्येयो दृशो: पातुं'.. असे रामरक्षेत म्हटले जाते.

            राणी कैकेयी ही युद्धनिपूण, बुद्धिमान आणि निग्रही आहे.राजा दशरथाला तिने अनेकदा राज्यकारभारात योग्य सल्ला दिला आहे. .श्रीरामावर तिचे भरता पेक्षाही अधिक प्रेम आहे. रामाच्या राज्याभिषेकाच्या वार्तेने ती आनंदून गेली आहे. अशावेळी या असामान्य राजस्त्रीला मत्सराची बाधा कशी होऊ शकते? हा प्रश्न नेहमीच पडतो. पण याचे उत्तर कैकेयीच्या आई मध्ये तर दडले नसावे?? राजा अश्वपती व शुभलक्षणा यांची ही कन्या. राजा अश्वपतीला पक्षांची भाषा अवगत होती. पण या पक्षांचे संभाषण कोणालाही सांगण्याची त्याला अनुमती नव्हती. हे संभाषण सांगितले तर अश्वपतीचा मृत्यू अटळ होता. एकदा राणी शुभलक्षणाने हे संभाषण सांगण्याचा हट्ट राजाजवळ धरला. या हट्टापायी माझा मृत्यू होऊ शकतो - असे राजाने तिला समजावून सांगितले. तेव्हा राणीचे उत्तर होते -

' मग तुम्ही मरा, पण मला संभाषण सांगा '. अशा राणीचा अश्वपती राजाने त्याग केला आहे. त्यामुळे कैकेयीला  मातृसुख मिळाले नाही. पण कदाचित आईचा आततायी, अविवेकी स्वभाव तिच्यात उतरला असावा का? अर्थातच रामायण घडण्यासाठी कैकेयीचा मत्सरभाव जागृत होणे हे विधीलिखितच होते. पण नंतर काही काळाने आपल्या कृत्याचा तिला पश्चातापही झालेला आहे.महत्वाचे हे, की या प्रसंगामुळे भरताने कैकेयीची निर्भर्त्सना केली आहे .मात्र रामाच्या मनातील  तिचे स्थान अजिबात डळमळीत झालेले नाही.

      कायम सन्मार्गाने जाणारी- ती राणी सुमित्रा. सौमित्र तिचा पुत्र. पण त्याआधी तो रामाचा उजवा हात, रामाचा बहिश्चर प्राण आणि रामाची सावली आहे, हे ती जाणून आहे. त्यामुळे रामासोबत वनवासात जाण्याच्या निश्चयापासून ती लक्ष्मणाला परावृत्त करित नाही. रामाचे संरक्षण करण्याची क्षमता लक्ष्मणातच आहे हे तिला पक्के ठाऊक आहे‌. कर्तव्य आणि ममता यांच्यात निवड करायची झाल्यास, ममतेला मागे सारणे- हा सुमित्रेचा स्वभाव लक्ष्मणातही पूर्णतः उतरला आहे. विवेकी आणि खंबीर असलेली सुमित्रा राजमहालाच्या एका अभेद्य भिंतीप्रमाणे कुटुंबियांना आधार देत राहिली. पुत्र वियोगाने राजा दशरथाचे प्राण गेले पण तीनही राण्या मात्र पुत्रवियोग व पतीवियोग होऊनही चिवटपणे झुंज देत राहिल्या आहेत. श्रीरामांच्या अस्तित्वातून स्वतःची शक्ती एकवटत राहिल्या आहेत.

            लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही सीतेची लहान बहिण आहे. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यातील अद्वैत समजून घेणे आणि ते पचविणे हे उर्मिलेतील पत्नीला किती अवघड झाले असेल? सीतेप्रमाणे ती देखील वनवासात जाण्याचा हट्ट करू शकली असती पण तिने तसे केले नाही. वनवासात श्रीराम आणि सीतेचे रक्षण करण्याचे लक्ष्मणाचे कर्तव्य आहे, हे ती जाणून आहे. व त्या कर्तव्याच्या आड येण्याचे संस्कार तिच्यावर नाहीत. लक्ष्मणाला उर्मिलाच्या मूकसंमतीची खात्री असल्यामुळे  तिचा पाठिंबा हे त्याचे बळ आहे. लक्ष्मण आणि उर्मिले मधील अव्यक्त असे परस्पर सामंजस्य हे खरे त्यांच्या नात्याचे बलस्थान आहे .उर्मिलेने महालात राहून  वनवास भोगला आहे. शांत तेवणाऱ्या ज्योती प्रमाणे तिने १४ वर्षे अखंड जळून वनवासातल्या  स्वकीयांना आश्वस्त केले आहे.

             रामायणाची महानायिका म्हणजे सीता. 'सहचारिणी' हे नाते तिने सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले आहे.श्रीरामा बरोबर सीता ही काया,वाचा ,मन आणि आत्म्याच्या स्तरावर एकरुप झाली आहे.श्रीराम वनवासाला निघाले त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी सीतेला राजगादी वर बसण्याची सूचना केली होती - यावरुनच तिचे सामर्थ्य लक्षात येते. वनवासात सीता आणि श्रीरामाच्या अनेक तात्विक मुद्द्यांवर चर्चा झाल्या आहेत. अशोक वनात असलेल्या सीतेच्या जवळपासही रावण फिरकू शकला नाही याला कारण सीतेचे  प्रखर तेज.पती श्रीराम आणि राजा श्रीराम यात सीतेने कधीही गल्लत केलेली नाही.पती आणि राजा यातील सीमारेषेची तिला अचूक जाण आहे. 'प्रजेसाठी निर्णय घेताना राजा श्रीरामांनी माझ्यावर अन्याय केलाही असेल कदाचित.. पण पती श्रीरामांनी मला एक क्षणही अंतर दिले नाही '..असे म्हणणारी सीता ही कायम वंदनीय आहे.

      रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामांच्या जीवनात आलेल्या स्त्रियांचेही स्मरण करणे गरजेचे आहे कारण 'रामलल्ला' ते  'पुरुषोत्तम' या प्रवासात राजस्त्रियांच्या भूमिकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव - हा पुरुषोत्तमाच्या व्यक्तिमत्वासाठी नक्कीच साह्यभूत ठरला आहे. बालवयात रामाच्या जडणघडणीला तीन मातांनी आकार दिला तर पुढे श्रीरामांनी आपल्या आचरणातून या स्त्रियांना समृद्ध केले.परस्पर पूरक अशी ही नाती आहेत.

    या स्त्रियांच्या आयुष्यात अनेक संकटे, वादळे आलीत.पण त्यावर धैर्याने, निष्ठेने, श्रद्धेने मात करण्याची शक्ती ही पुरुषोत्तमाच्या प्रभावाने त्यांना प्राप्त झाली आहे.त्यांच्या अलौकिक चरित्राचा कालप्रवाहावर पडलेला अमीट ठसा आजही वंदनीय, चिंतनीय आणि मार्गदर्शक आहे.


#रामायण

#रामायणातीलस्त्रीपात्रे

Tuesday, October 11, 2022

आजच्या महानायकास ् ‌‌

 आजच्या महानायकास.......

प्रिय अमिताभ ‌........

  आज तुझा ८० वा वाढदिवस.काय बोलावं तुझ्याबद्दल? तसाही तुझा आणि 'वयाचा' काही संबंध आहे? 

आमची पिढी पंचविशीत असतांना पासूनच तू आमचा हीरो आहेस.

आज मी साठीत पदार्पण केलंय.

तुझे फोटो भिंतीवर लावणं,

तुझ्या सिनेमाच्या तिकीटासाठी तासनतास लाईनीत उभं राहणं,

तुझ्या सिनेमाची पारायणं (की आवर्तनं?) करणं,

तुझे डायलॉग्ज तोंडपाठ करणं,

तुझ्या अभिनयावर शंका घेणार्यांशी रक्त आटेपर्यंत वाद घालणं,

तुझ्या आजारपणात डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करणं.........हे सगळं आम्ही त्या वयात केलंय.

आता मात्र या कलाकारा पलिकडचा तू जास्त समजू लागला आहेस आणि अधिक भावू लागला आहेस.

केबीसी करताना समोरच्या स्पर्धकाचं बोलणं तू ज्या पद्धतीनं ऐकतोस ना, तिथेच तू जिंकतोस.हा अभिनय नाही हे सांगण्यासाठी तुझी नजर आणि तुझी देहबोली पुरेशी आहे.त्यावेळेस तुझ्या नजरेत काय नसतं? समोरच्या व्यक्तीबद्दल सन्मान, आत्मीयता, कौतुक, सुसंस्कृता, मिष्किलता आणि विलक्षण माणुसकी. तुझं आख्खं व्यक्तिमत्व तुझ्या डोळ्यात प्रतिबिंबित होत राहतं आणि आम्ही परत परत  अमिताभ नावाच्या,कमालीची उंची गाठलेल्या माणसाच्या प्रेमात पडत जातो.

तुझी ऊर्जा,तुझी सकारात्मकता, तुझं कामाप्रती समर्पण,तुझं सामाजिक भान हे सगळं अचंबित करणारं आहे आणि त्यामुळे तुझ्या अभिनयाला एक लखलखीत धार येऊ लागलीय.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व कोण? अर्थातच पुलं.

याच चालीवर भारताचे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे अमिताभ बच्चन- - -तुझंच नाव घ्यावंसं वाटतं.तुम्ही दोघंही असामान्य आणि एकमेवाद्वितीय कलाकार आहात , त्याबरोबरच "माणूस" म्हणून तुम्ही त्याहीपेक्षा अधिक मोठे आहात.सामान्य माणसाला पुलं अगदी जवळचे वाटतात तसा तू ही हल्ली जवळचा ,आपला माणूस वाटतो.आणि म्हणूनच हे लाडकेपण निर्माण होतं.

पुलंनी ज्या कलाकृती चं कौतुक केलं ती कलाकृती हमखास अमर होत असे.तुझंही तसंच आहे.मिडास राजासारखा हात लावशील त्याचं सोनं करित असतोस.

नायिकेवर प्रेम करावं ते तूच.

व्हिलनला चारीमुंड्या चीत करावं ते तूच.

केबीसी करावं ते तूच.

हरिवंशरायांच्या कविता  म्हणाव्या त्या तूच.

गुजरात ची जाहिरात करावी ती तूच.

पिकू मधला विक्षिप्त म्हातारा रंगवावा तो तूच.

शौचालयाची मिष्कील जाहिरात करावी ती तूच.

अलाहाबादी भाषा बोलावी ती तूच.

बिकाजी नमकीन ची जाहिरात करावी ती तूच.

आणखी काय आणि किती लिहावं?

अरे काय हे?

किती राज्य करशील आमच्या मनावर?

तुला पर्यायच नाही.

तुझा आवाज, तुझी देहबोली, तुझं बोलणं , तुझं प्रतिसाद देणं,तुझं काव्य वाचन,तुझं सगळंच मापदंडाच्या फुटपट्ट्या ठरलेल्या आहेत.

तू म्हटलेले पसायदान आणि ब्रम्हपुत्रेची आरती ऐकताना अक्षरशः कानात जीव गोळा होतो.

आमची पिढी भाग्यवान की आम्ही तुझ्या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार आहोत.

एक उच्च दर्जाचा आनंद देऊन तू आमचं सांस्कृतीक जीवन समृद्ध केलं आहेस.तुला उदंड, निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!


#अमिताभबच्चनवाढदिवस

#महानायकवाढदिवस

Saturday, November 28, 2020

 "आई एक नाव असतं.

घरातल्या घरात,एक गजबजलेलं गाव असतं."

फ.मु.शिंदेंच्या या दोन ओळीतच आख्खी "आई" सामावली आहे- 

तुमची ,माझी,सगळ्यांचीच.

आयुष्यभर अनेक निरर्थक गोष्टींच्या मागे पळताना आईप्रती साधी कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आम्हाला भासत नाही इतकं त्या माऊलीला गृहीत धरल्या जातं.

       मला मिळालीय संधी.....

      तिच्या वाढदिवसाची........

बघतेय,आभाळभर भावना चिमूटभर शब्दात  मांडता येतात  का????



 "अगं, लवकर इकडे ये"..... आईची भल्या सकाळी आलेली हाक ऐकून मी ताड्कन उठून बसले. क्षणभर  छातीत धस्स झालं. धावत जाऊन बघितलं तर आई खिडकीसमोर उभी. 

"अगं बघ. सूर्योदय किती छान दिसतोय. तो लालभडक गोळा हळूहळू वर येतोय ना,ते बघतांना माझी नजर हटतच नाहीये "- - तिचा उत्तेजित आणि आनंदित स्वर .

"आई काय हे? पहिल्यांदा बघतोय का आपण सूर्योदय ?" - - झोप मोडल्यामुळे माझा  चिडका आणि रागीट स्वर. आणि मी तणतणत परत पलंगावर.

 रोजचा सूर्योदय,सूर्यास्त, रोज झाडावर येणारे पक्षी, रोज फुलणारी फुलं- - ही नक्कीच ऊर्जा देणारी आणि सकारात्मकता जोपासणारी निसर्गाची रूपं असली तरी त्यांना बघून लहान मुलांसारखं उत्तेजित होणं आणि त्याहीपुढे जाऊन फोनवर त्याचं वर्णन दुसऱ्याला ऐकवणं - ही वृत्ती नेमकी कोणत्या वयात असावी? 

          विश्वास बसणार नाही पण नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माझ्या आईत हे एक लहान  आनंदी मूल कायम बागडत असतं.

 आणि तिच्यातल्या त्या लहान बालकाच्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी आम्ही तिघीही "पोक्त" वयाच्या तिच्या मुली अगदी सज्ज असतो.

पण तिनं असं कधीच केलं नाही.

 आमच्या लहानपणी सगळ्यात मौल्यवान असं तिनं आम्हाला  काही दिलं असेल तर ते म्हणजे मोकळे श्वास घेण्याचं स्वातंत्र्य.......

सूचनांचा भडिमार नाही किंवा शिस्तीचा बडगा नाही...

संस्कारांचा जाणीवपूर्वक अतिरेक नाही किंवा उपदेशाचे डोस नाहीत ...

एक बंधनमुक्त बालपण तिनं आम्हाला दिलं.

 आजही जगतांना तो मोकळेपणा आम्हाला बळ देतोय .

मी माझ्या मुलांना देऊ शकले असला मोकळा श्वास ???नाहीच बहुतेक .

हात धरून जाणीवपूर्वक तसं तिनं आम्हाला काहीच शिकवलं नाही.

 मात्र तिच्या जगण्यातून कितीतरी महत्त्वाचे धडे आम्हाला मिळाले आणि अजूनही मिळताहेत .पण नेहमीप्रमाणे "आई "जशी गृहीत धरली जाते तसे कितीतरी धडे हे गृहीतच धरले गेले.......

 काही धडे मनापासून अभ्यासले गेले ......

काही धडे रक्तात मुरले...... बरेचसे आचरणातही आले .....

"आई "नावाच्या पाठशाळेला कितीतरी काळ गंभीरपणे घेतलंच नाही कधी.

 हल्ली तर.........

" आई तुला कसं काहीच समजत नाही???"....

 असं म्हणून तिचीच शाळा आम्ही सगळेच घेत असतो. ती सुद्धा शहाण्या विद्यार्थ्याप्रमाणे आमचं ज्ञानामृत शांतपणे पचवते.

  १९३१चा तिचा  जन्म. छिंदवाडा गावातलं लहानपण, लग्नानंतरचं मॕट्रिक ते पीएचडी पर्यंत शिक्षण ,एकत्र कुटुंब , सोवळंओवळं,प्राध्यापिकेची नोकरी ,आम्हा तिघींची शिक्षणं, तिघींची लग्नं,बाबांचं दीर्घ आजारपण,नातवंडं, त्यांची लग्नं,नागपूरहून पुण्याला आणि पुण्याहून नाशिकला स्थलांतर आणि आताचं हे तंत्र युगातलं यांत्रिक जगणं..........ही सगळी स्थित्यंतरं, सुखदुःखाचे चढउतार अनुभवून,सोसून,पचवून तिच्यातलं ते आनंदाचं झाड अजूनही तेवढंच हिरवं आणि टवटवीत कसं आहे  हे मला अजूनही  उमगलेलं नाही.

अंगभूत शांतता ,आनंदी स्वभाव आणि स्थिरचित्त वृत्ती हे तिचे  "इनबिल्ट अॕप्स" मला डाऊनलोड करता आले असते तर????

आई- -आज तुझा एकोणनव्वदावा वाढदिवस .

तुला या वाढदिवसाला काही द्यावं असं माझ्याकडे तरी काहीच नाही.

उलट मीच तुला काहीतरी मागतेय.......

तुझं रक्त तर माझ्या नसानसात आहेच पण.....

तुझ्या शरीरातल्या रक्तासोबत वाहणारा तो निखळ आनंद .....

तो माझ्या  नावावर करुन दे ना एकदाचा.

तुझ्या कपाटात,तुझ्या सामानात मी खूप शोधली ती अक्षय आनंदाची कुपी........

सापडली नाही कधीच .

हल्ली मला खूप गरज भासतेय त्या आनंदाच्या कुपीची...

आजकालच्या आयांसारखा आटापिटा कर,काहीही कर पण माझी  मागणी  पूर्ण करच.

     आणि हो. हे करतांना तुझ्यातलं ते हिरवं आनंदाचं झाड असंच बहरलेलं राहू दे.

       नेहमीसाठीच.

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...