Sunday, November 26, 2023

शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी


 

मध्यंतरी आमचा अंगणातला बगीचा साफसूफ करण्यासाठी एक माळी जोडपं आलं होतं.संपूर्ण बगीचा त्यांनी व्यवस्थित ,नीटनेटका केला पण इकडे तिकडे अनेक तुळशीची झाडं कशीही वाढली होती,ती त्यांनी तशीच ठेवली होती.त्याबद्दल मी त्यांना हटकलं तर ती बाई म्हणाली.

    'माऊली ला नाई तोडत आमी.देवी हाय  ती.तुमच्या दारी आली ना ती, मंग राहू द्या नं तिले.रायचं तितके दीस राहील ती.' असं म्हणून तुळशीला हात जोडून ती दोघं निघून गेली.

    का कुणास ठाऊक पण त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला.मला माझीच लाज वाटली.त्यांच्या प्रगाढ श्रद्धेचा मला हेवा वाटला. एक तुळशीवृंदावन पुरेसं आहे की रोज पाणी घालायला आणि दिवा लावायला.... इतपतच माझी भूमिका कम श्रद्धा होती. पण आत खोलवर मला खूप हलवून गेलं त्यांचं बोलणं.मी राहू दिली तशीच ती झाडं.

    आणि नुकतीच बातमी आली की महाराष्ट्रात प्रदूषणाचं प्रमाण कमालीचं वाढलंय आणि त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.मला एकदम तुळस आणि पर्यावरण रक्षण यांचा संबंध आठवला. तुळशीला नैसर्गिक हवा शुद्धीकारक समजलं जातं. दिवसातून बारा तास तुळस ऑक्सिजन सोडत असते.आणि वातावरणातील कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड हे घातक वायू शोषून घेत असते.तसंच तिच्यात असलेलं यूजेनॉल हे संयुग डास,कीटकांना दूर ठेवतं.आणि त्यामुळेच तुळस प्रत्येकाच्या घरासमोर असते.

    भारतीय संस्कृतीत तुळशीला पवित्र मानतात,त्याचं कारण पर्यावरणाशी संबंधित असावं का? कारण आपले पूर्वज अत्यंत खुबीने वैज्ञानिक गोष्टींवर धार्मिकतेचं पांघरूण घालून आपल्या कडून योग्य ते करवून घेण्यात तरबेज होते.

    पौराणिक कथा बघितल्यास, तुळशीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आढळतात. प्राधान्याने त्यात तुळशीच्या वाट्याला दुःखच आले आहे .कथा आणि कथानायक वेगवेगळे आहेत पण तुळशीची वेदना मात्र तशीच आहे. कसल्या ना कसल्या व्यथेपोटीच तुळशीची उत्पत्ती झाली आहे. पतीच्या आधी भोजन केले म्हणून एका ऋषी पत्नीला राक्षसी होण्याचा शाप भोगावा लागला. या राक्षसी अवतारात ती ऋषी पत्नी अनेक वर्ष जगत राहिली. सुटकेची वाट बघत आयुष्य कंठत राहिली. अखेर एका भक्ताने केलेल्या कृष्णाच्या नामस्मरणाला ऐकून तिला मृत्यू आला. पण तिचा देह तब्बल वर्षभर जळतच राहिला. शंकर-पार्वतीने  जेव्हा ही चितान बघितली तेव्हा ते स्तिमित झाले. मृतावस्थेतही ही इतकी शोभायमान आहे. 'मृता लसती- सा एव तुलसी' अशी ही तुलसी आहे. म्हणून त्यांनी तिला स्पर्श केला आणि भूतलावर कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रातःकाळी ती उगवली. भगवान विष्णू ने तिला वर दिला की तुळशी शिवाय माझी पूजा संपूर्ण होणार नाही. तुळशीला मिळालेल्या या मोठेपणामागे तिने सोसलेल्या दुःखाचा डोह जाणवल्याशिवाय राहत नाही. 

    दुसऱ्या कथेत तर या तुळशीचा देवांनी

 उपयोग करून घेतलेला आहे .वृंदा नावाच्या राजकन्येचा पती जालंधर हा प्रचंड शक्तिमान होता .त्याच्यापासून देवांना धोका निर्माण झाला होता. कपटाने देवांनी जालंधरच्या शरीराचे हुबेहूब दोन तुकडे करून वृंदेला दाखविले. वृंदा शोकसागरात बुडून गेली. मग देवांनीच साधू वेष घेऊन जालंधरला जिवंत करण्याचे नाटक केले. हा जालंधर म्हणजे भगवान विष्णूच होते. भोळी वृंदा आनंदली. प्रेमभराने तिने जालंधरला मिठी मारली. देवांचं कपट तिच्या लक्षात आलं नाही. आपल्या पतीशी पूर्ण एकनिष्ठ असलेली वृंदा परपुरुषाच्या स्पर्शामुळे भ्रष्ट तर झालीच पण खऱ्याखुऱ्या जालंधराने तिला हे कृत्य करताना बघितले. जालंधर क्रुद्ध झाला. भ्रष्ट झाल्यामुळे वृंदेची पुण्याई संपली आणि खरा जालंधर मरण पावला. संतापानं आणि दुःखानं वृंदेने विष्णूला शाप दिला. तिच्या शापामुळे भगवान विष्णू अस्वस्थ झाले. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंं साठी भूतलावर तुळस लावली. तिलाच वृंदा किंवा विष्णुप्रिया म्हणतात. 

           अशा अनेक कथा पुराणात सांगितलेल्या आहेत.स्त्रीरुपात भोगलेली अपरिमित दुःखे आणि परिणामी निर्माण झालेली तुळस.....हे सगळ्या कथांचं सार. म्हणूनच तुळशीचं आणि वेदनेचं  अतूट नातं आहे. 

           या कथा वाचताना आणि तुळशीची वेदना समजून घेताना मला प्रसिद्ध लेखिका श्रीमती दुर्गा भागवतांच्या  'निसर्गोत्सव' पुस्तकाची प्रकर्षाने आठवण आली. तुळशीबद्दल त्या लिहितात, 

           


'अगदी साधी ही तुळस. कधीच डोळ्यात न भरणारी. झाडाची नैसर्गिक शोभा एवढीच की ते नाजूक आहे. मंजिऱ्या तर विचारूच नका. निळी- जांभळी अशी ती अर्धी देठाच्या संपुटात लपलेली फुले  - त्यांचा गंधही वाऱ्यावर पारिजातकाप्रमाणे भिरभिरणारा नाही. झाडाची सळसळ नाही. काही नाही. ना या झाडावर भुंगे झेपावत की पाखरे घरकुल करीत. मग असे काय मनोवेधक या तुळशीच्या रोपट्यात आहे? हातात खुडून घेतले तरच त्याचा गंध येतो. आणि हा गंध मात्र जागच्या जागी बसणारा असला तरी ह्रुद्य असतो मादक नसतो. मंजिरीतले प्रत्येक फूल न्याहाळले तर ते थरथरलेले दिसते. लाजेने लपलेले वाटते. प्रत्येक उमललेले फुल अति नाजुक व निखोड रंगछटांनी नटलेले असते.  घरातल्या वृंदावनाचे सोडा पण रोपही एरवी कधी एकटे दुकटे नसते. त्याचे बी किती काळेभोर व सुंदर असते वाऱ्याच्या लहरी बरोबर ते सहज उडून जाते आणि पहिल्या सरी बरोबरच उगवते. आणि मग तुळशीचे बनच्या बनच उगवते. अनिवार साधेपणाचे तुळशीचे लहानखोरे रूप भारतीय मनात प्रांतोप्रांती वसलेले आहे. विष्णूच्या प्रणयिनीत ही नायिका  लाजाळू असते. ही तुळस हाडामासाची स्त्री नाही तर ते एक झाड आहे. हा  झाडरुपी देह असा आहे की त्याचा कायीक संपर्क कुणाही पुरुषाशी होणारच नाही. तिचे बारोमास फुलणारे पुष्पमय ह्रुदय मात्र प्रियकराचे अखंड सांनिध्य शोधत असते. तुळशीचे लग्नही बाळकृष्णाशी होते. ही सुद्धा तिच्या भोगरहित सौभाग्याची आणि अखंड कौमार्याचीच खूण आहे . लग्नाशिवाय स्त्रीने राहू नये. जी राहील ती पतिव्रता असायची नाही, असे मत पुराणात स्वच्छ दिलेले आढळते म्हणून तुळशीच्या लग्नाचा हा पसारा मांडण्यात आला आहे. तुळस ही उत्कंठित प्रेमला असली तरी ती चिरकुमारी आहे हेच या प्रथेचे अंतिम सार आहे. ही कल्पना महाराष्ट्रात पूर्वापार रुढ आहे. उदाहरणार्थ, कुमारिकेच्या चोळीवर तुळशी शिवाय दुसरा कोणताही कशिदा काढायचा नाही असा नियमच महाराष्ट्रात नागपूरच्या बाजूला अजून पर्यंत रूढ होता. तुळशीबद्दलच्या सर्व कथांचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की त्या भीषण कारुण्याने भरलेल्या कथा आहेत.'    तुळशीबद्दल दुर्गाबाई भागवतांचं हे भाष्य वाचल्यावर मला तुळशीची वेदना मुळापासून जाणवली. किती अवघड दिव्य पार केल्यावर तिला भारतीय संस्कृतीत मानाचं स्थान मिळालं आहे. मला लोकगीतातल्या दोन ओळी आठवल्या. 

तुळशी गं बाई, 

काय तुझं हे जीणं,   गोविंदाच्या संगे, 

वरसा वरसाला लगीन'   दुसऱ्या स्त्रियांची दुःखं ऐकून घेणारी ही तुळस स्वतःच वेदनांचं एक मूर्तिमंत रूप आहे. तुळशीचा विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमे पर्यंत केला जातो.ऊस हा मामा म्हणून तिच्या पाठी उभा असतो. तुळशी विवाहा नंतरच लग्नाचे मुहूर्त काढण्याची पद्धत आहे.

    आयुर्वेदात अनेक औषधात तुळशीचा वापर केला जातो. सर्दी, खोकला,ताप या औषधात तुळस असतेच.त्वचारोग व कृमींवर तुळस अतिशय परिणामकारक आहे. तिच्यात असणारं, 'थायमॉल' हे तत्व डास, कीटकांना दूर ठेवतं.

    अशी ही बहुगुणी तुळस.  तिच्या पानाशिवाय नैवेद्य परिपूर्ण होत नाही.मृत व्यक्तीच्या मुखातही तुलसी पत्र ठेवण्याची प्रथा आहे. धार्मिक, पौराणिक, पर्यावरणपूरक, आरोग्यदायी असणारी आणि स्त्री ची सखी असणारी ही तुळस सगळ्यांच्या घरी प्रवेशद्वारीच असते.

   पूजने कीर्तने ध्याने, 

रोपणे धारणे कलो। 

तुलसी दहते पापं, 

स्वर्गं मोक्षं ददातिच ।।

   अशा या तुळशीचे पूजन प्रत्येक घरात व्हावं असं शास्त्र सांगतं .

श्रीकृष्णासारख्या महानायकाच्या पत्नीचं पद तिला मिळालं आहे पण पूर्वायुष्यात चारित्र्यहीनतेच्या  आरोपातून गेल्यावरच. दरवर्षी विवाह वेदीवर चढून आपलं पत्नीत्व सिद्ध करण्याचं दिव्य तिला करावं लागतं तरीसुद्धा श्रीकृष्ण पत्नीचा पहिला मान रुक्मिणीचा असतो. अशा या तुळशीच्या व्यथा समजून घेऊन प्रत्येक भारतीय स्त्रीने तिला योग्य तो सन्मान देऊन जास्तीत जास्त रोपांचं संगोपन करावं हीच काळाची गरज आहे.

Sunday, November 5, 2023

चला चला, दिवाळी आली

 

चला चला,दिवाळी आली,

मोती साबणाची वेळ झाली"

मोती साबण आणि दिवाळी यांचा नेमका काय संबंध? हा मला नेहमीच छळणारा प्रश्न. बरं,आता हा कुळाचार असल्याप्रमाणे मोती साबणाची  दिवाळीच्या सुमुहूर्तावर बाथरूम मधे  जी प्रतिष्ठापना होते ती पार होळीपर्यंत. कारण दिवाळी संपली की मोती साबणातून हळूहळू आत्मा मुक्त होऊ लागतो आणि त्याचं एका रंगीत गोट्यात रुपांतर होतं.हा गोटा संपेपर्यंत आम्ही त्याने आंघोळ का करतो....हा दुसरा छळणारा प्रश्न. 

      असो.मोती साबणाने  वर्दी दिलीय, 'दिवाळी आली बरं का' .....

    लहानपणी निसर्ग हाळी द्यायचा... दिवाळी आली बरं का' .......

    दसऱ्यापासूनच दिवाळीचे वेध लागत. नुकताच पावसाळा आटोपला असायचा. तृप्त भूमीने अवघ्या सृष्टीला हिरवाईचं दान दिलं असायचं .  वर्षा ॠतूने शरदाला  ओंजळ भरभरून दिलेलं सुजलाम सुफलाम हे दान  स्वीकारून शरद ऋतू कसा टवटवीत आणि ऊर्जादायक झाला असायचा. शेता शेतांमध्ये गच्च भरलेली पिकं डोलताना बघून मन सुद्धा कसं गच्च भरून जायचं. सरलेला पावसाळा आणि येऊ घातलेला हिवाळा यांचा मिश्रण म्हणजे दिवाळी. शरदातली म्हणजेच अश्विन कार्तिकातली पंचमहाभूतं मुळातच विलक्षण जादुभरी असायची. आपलं नवीन समृद्ध रूप बघून ती पंचमहाभूतं हळूच कानात कुजबुजायची.... 'दिवाळी आली बरं का'...... 

         स्वच्छ  मोकळं आकाश. कुठेही मळभ नाही. निरभ्र चांदणं, हलकी गुलाबी थंडी, ओढाळ पहाट वारा,हलक्या धुक्याची चादर लपेटून उगवणारी सकाळ .आमची साखरझोप अलगद ओसरायची ती आजीच्या काकड आरतीच्या आवाजानं. तो वृद्ध, क्वचित बेसूर पण श्रद्धेनं ओतप्रोत भरलेला आवाज कमालीची उब द्यायचा. त्याच्या जोडीला घराघरातून अंगण झाडल्याचा आणि सडा शिंपण्याचा आवाज यायचा. देवघरातला उदबत्ती, कापराचा गंध, अंगणातल्या शेणाच्या सणाचा मृदगंध... हे सगळे नादगंध एकत्र होऊन थेट मस्तकात भिनायचे. ते पहाटेचं वातावरण इंद्रियांना खुळावायचं. आम्ही सगळी भावंडं अंथरुणात उठून बसायचो, खुदकन हसायचो आणि म्हणायचो, 'दिवाळी आली बरं का'.......   

  मग सारवलेल्या अंगणात रांगोळी काढण्याची लगीनघाई. सगळ्यांची अंगणं रांगोळीनं रेखलेली,आणि घरांवर झुलणारे आकाशकंदील बघून मन हरखून जायचं. 

  त्या वेळेची पहाट अशी नादावून टाकायची आणि मग जसा जसा दिवस वर चढायचा तसे तसे आणखी अनेक व्यावहारिक नादगंध त्यात येऊन मिसळायचे. सणासुदीचे जीभेला चाळवणारे, भाजण्याचे तळण्याचे गंध, घराच्या रंगरंगोटीचा उग्र गंध,  कोऱ्या वस्त्र प्रावरणाचे गंध एकत्रित होऊन मनाला वेडावून टाकायचे. एरवी सुस्त, एकलकोंडी, आत्ममग्न असणारी दुपार या काळात कशी जिवंत होऊन जायची. लहान मुलांचा धांगडधिंगा, मातीचा किल्ला करताना होणारी भांडणं, घराघरातून काही कुटण्याचे, ठोकण्याचे, भांडी घासण्याचे आवाज.. हे सगळे ध्वनी कर्कश असले तरी ते खूप भावायचे. त्यात एकच झपाटून टाकणारा विचार असायचा.....'दिवाळी आली बरं का'.......

 मग घराघरात, रस्त्या रस्त्यात, तनामनात  दिवाळी भिनू  लागायची.निसर्गाला,माणसाला चैतन्याचं वाण देत ती उंबरठ्यापाशी येऊन उभी राहायची. 

           नरक चतुर्दशीला तर नरकात पडू नये याची  धास्ती असल्याने झोपच यायची नाही. भल्या पहाटे उठणं, हवेतला किंचित गारवा, दूरवर दिसणारी दिसणाऱ्या पणत्यांची लवलव, आईने केलेलं औक्षण, सुगंधी तेल- शिकेकाई यांनी केलेलं अभ्यंग स्नान हे सगळं आठवलं की आजही अंगावर रोमांच उठतात. घर परिसराच्या स्वच्छतेबरोबर मनही स्वच्छ आणि नितळ होऊन जायचं .लक्ष्मीपूजनाचा दीपोत्सव तर प्रतीकात्मक आहे. कितीतरी सांस्कृतिक, धार्मिक कथा या पूजनाशी जोडल्या  आहेत.त्या आज कालबाह्य वाटू शकतात.पण कालसुसंगत विचार  केल्यास, अज्ञानाच्या अंधारावर विजय मिळवण्यासाठी हा दीपोत्सव आहे.माणसाच्या मनातल्या सगळ्या सद्प्रवृत्तींचा हा उत्सव आहे. जगातलं जे जे उत्तम आहे त्याचा हा उत्सव आहे .शब्द, स्पर्श, रूप,  रस,व गंध या पाच विषयांच्या उत्कटतेचा हा उत्सव आहे. लक्ष्मीपूजनासाठी सुसज्ज असलेले देवघर म्हणजे  समृद्धी व कलात्मकतेचा संगम.  चांदीची लखलखीत भांडी, सुवर्णाचे अलंकार, पिवळ्या केशरी झेंडूच्या फुलांची आरास, हिरव्याकंच  आंब्याच्या पानांचं तोरण, पंचपक्वान्नाचा प्रसाद, रंगाची उधळण करणारी रांगोळी, 

आणि या  कलात्मक दृश्याला तेजःपुंज करणारे दिवे. ते केवळ लक्ष्मीपूजन नसतं तर माणसा माणसातल्या ईश्वरी अंशाचं, सात्विकतेचं पूजन असतं. अशी ही दिवाळी.....

 मनाला तृप्त करणारी,  सगळ्या काळज्या, चिंता नैराश्य ,थोड्या काळासाठी तरी वळचणीला टाकणारी,  स॓पूर्ण घरावर तृप्तीची एक साय पांघरणारी..... 

     अशी ही दिवाळी दरवर्षीच येते. पण तो दिवाळीचा लहानपणीचा माहौल मला सापडतच नाही. हल्ली दिवाळी नुसतीच येते आणि जाते.  रीत  आणि परंपरा म्हणून ती उत्साहाने निभावली जाते तर रेटलीही जाते कधीमधी.  खरंच सणावारांनी आनंद मिळण्याचे दिवस राहिलेत कुठे आता? आता तर आनंदाचे, उत्साहाने निथळून जाण्याचे स्रोत इतके वेगळे आहेत की सण उत्सवांची अडचणच व्हायला लागली आहे.आजकाल दिवाळीत सहली काढण्याची फॅशनच झाली आहे. दिवाळीचा उद्देश, प्रयोजन यांच्याशी फारसं कुणाला सोयरसुतक नसतं. दिवाळीची चाहूल लागते ती बाजारात 'भव्य फेस्टिवल ऑफर ','उत्सव स्पेशल' , फटाके, अनंत भेटवस्तू, आकाश कंदीलांचा झगमगाट, खाद्यपदार्थांची रेलचेल, कपड्यांचे मनोहारी प्रकार, दागिने ,भांडीकुंडी यांनी ओसंडून जाणारी दुकानं यामुळेच. आणि हा आनंद विकत घेण्यासाठी  लोकांची उडालेली जीवघेणी झुंबड  बघून मन धास्तावतं.  मनावर ताण येतो. व्यक्तिगत आयुष्यातले समरसून जगण्याचे काही क्षण या दिवाळीमुळे आपल्या वाट्याला येतात त्यावरही बाजाराचं, धंद्याचं आक्रमण. दिवाळी कशी साजरी करावी याचा विचार करायलाही उसंत मिळत नाही. ही सगळी दिवाळी झगमगटात, पोषाखात,कृत्रिम आनंदात हरवलेली वाटते. ऋतू येऊन सादही घालतात, नाही असं नाही. पण त्यांना प्रतिसाद द्यायला आपल्या मनाची कवाडं उघडी कुठे असतात?     

           आज मी सुद्धा ती लहानपणची राहिलेली नाही. अवतीभवतीचं जगही तसंच राहिलेलं नाही. माझी लहानपणची दिवाळी आता तशीच असणार  नाही हेही मला माहित आहे .तरीसुद्धा पहाटेचा खुळवणारा वारा मी नक्कीच उर भरून घेऊ शकते. अश्विनात फुलणाऱ्या पिवळ्या जर्द झेंडूचा गंध आजही मला, 'दिवाळी आली बरं का' हे सांगायला पुरेसा आहे. कितीतरी हळवे ,उत्कट क्षण

 आजची दिवाळी सुद्धा मला देतेच पण त्यासाठी मनाचा कप्पा उघडा असावा लागतो. त्यातल्या आठवणी मोरपिसासारख्या गालाला लावून अनुभवायच्या असतात. बाकी दिवाळी दरवर्षी येतेच आणि साजरीही होतेच.पण आजच्या दिवाळीतही  चित्तवृत्ती फुलविण्याची शक्ती आहे हे खरंय.दिवाळीचा संचार अंगात हळूहळू होतोच.उत्साहाचं,सकारात्मकतेचं,

आनंदाचं रसायन शरीरातून वाहतं ठेवण्याची क्षमता दिवाळीच्या वातावरणात असतेच असते.

 दिवाळी कशी साजरी करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ही भौतिक दिवाळी आपण नेहमीच अनुभवतो.आता मनातली दिवाळी साजरी करू या.

 "अंतरंग  उजळणारे दिवे,

 सल,द्वेष नष्ट करणारं अभ्यंगस्नान,

 जीवन रंगीत करणारी रांगोळी,

 सदवृत्ति आणि विवेकाचं पूजन  

 आपुलकीनं 'या' म्हणणारा आकाशदिवा,

  स्नेह आणि नाती जपणारा फराळ,

विश्वास आणि मैत्रीची ओवाळणी,

हीच खरी दिवाळी........

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...