Sunday, October 31, 2021

पोषणावर बोलू काही

आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने......



   दरवर्षी दिवाळी आपल्याला तिमिराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देत असते. नेहमीप्रमाणे आपणही दिवे, आकाशकंदील, पणत्या लावून प्रकाशाचा उत्सव साजरा करतो .वास्तविक मनातील अज्ञानाचा अंधःकार ज्ञानाच्या प्रकाशानं उजळणं... ही खरी दिवाळी. एरवीचं ठीक आहे पण यंदाच्या दिवाळीला कोरोना ची पार्श्वभूमी आहे. 'आरोग्य' हे गृहीत धरून बेभानपणे वागणाऱ्या समाजाला कोरोनाने  'जोर का झटका' दिला आहे. त्यामुळे या दिवाळीत मौजमजे  बरोबर चिंतनही करणं गरजेचं आहे.

      धनत्रयोदशीला भगवान  श्री धन्वंतरी जयंती असते. याच दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' साजरा केला जातो. यंदाचं हे सहावं वर्ष आहे. आणि या वर्षीची संकल्पना आहे- 'आयुर्वेद फॉर पोषण'. धन्वंतरी देवतेचं पूजन करतांना आयुर्वेदातील पोषण संकल्पना समजावून घेणं आणि ती आचरणात आणणं हा उद्देश प्रत्येकाच्या मनात असावा अशी अपेक्षा आहे.अत्यंत समर्पक आणि समयोचित अशी ही संकल्पना आहे.

       शरीराचं पोषण उत्तम असेल तर आजार होणार नाहीत. आणि झालेच तर ते लवकर बरे होतील, हा आधीच माहीत असलेला धडा- कोरोनानं  क्रूर पद्धतीनं आपल्याला शिकवलेला आहे. त्यामुळे योग्य पोषण ही काळाची गरज आहे. 'पोषण आणि आयुर्वेद'- या संकल्पनेला समजून घेताना, 'शरीर पोषण' म्हणजे देह, इंद्रिये ,मन आणि आत्मा यांचे पोषण हे स्पष्ट आहे. त्यामुळे फक्त देह पोषणाचा विचार हा आयुर्वेदानुसार मर्यादित विचार आहे.

     आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरांचा आणि आहाराचा पुरातन काळापासूनचा इतिहास बघितला तर त्यांचा पाया हा  आयुर्वेदावर आधारित आहे हे लक्षात येतं. आजवर आपल्या देह, इंद्रिय, मन, आत्म्याचं पोषण हे संस्कृती, परंपरा, कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, सणवार, प्रचलित आहार द्रव्ये, आणि भोजन व्यवस्था यामुळे झालेलं आहे. आजही आपल्या दैनंदिन जगण्याची प्रक्रिया बरीचशी आयुर्वेद शास्त्रानुसार आहे. पण ती जाणीवपूर्वक नाही तर अंगवळणी पडल्यामुळे आहे. पण आज   विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे , चंगळवाद, हॉटेल संस्कृती मुळे आयुर्वेद आधारित जीवनशैली मागे पडू लागली आहे. त्याचे परिणामही आपण भोगतो आहोतच. मधुमेह ,हृदयविकार, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, संधिवात,पीसीओएस.. इत्यादी आजार घरोघरी मुक्कामाला आले आहेत. त्यामुळे आयुर्वेदातील पोषण संकल्पना समजून घेणं अगत्याचं आहे.

         खरं तर हा विषय फार व्यापक आहे . आहारासंबंधी विस्तृत विवेचन शास्त्रामध्ये केलेलं आहे .दोन प्रकारचं आपल्याला यात मार्गदर्शन मिळतं. आहार द्रव्यांचे गुणधर्म  आणि आहार कशा पद्धतीने घ्यावा याचे नियम. आहार सेवनाचे नियम जरी आपण काटेकोरपणे पाळले तरी उत्तम पोषणाचा मार्ग सुकर होत असतो. त्यामुळे प्रथम नियमांचा विचार करू. 

    'यत् पिंडी तत् ब्रम्हांडी'- हा पहिला नियम. निसर्गाचं घड्याळ हे कायम अचूकपणे चालत असतं. त्यानुसार शरीरातलं जैविक घड्याळ ही फिरत असतं. या दोन्ही घड्याळांची लय सारखी ठेवली की आपोआप शरीरातील संप्रेरकं योग्य वेळी पाझरू लागतात. उत्सर्जन- विसर्जन क्रिया योग्य वेळी  होतात. सूर्योदयाच्या वेळी उठणं आणि सूर्यास्तानंतर लगेच भोजन करून लवकर झोपणं - ही खरी आदर्श पद्धत. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य याचं पालन करावं हल्ली असं वागणाऱ्यांची- 'बुरसटलेले' म्हणून  खिल्ली उडवली जाते.मात्र हेच अक्षय कुमारने सांगितलं की पटतं.

      दुसरा अत्यंत साधा पण तेवढाच कठीण नियम म्हणजे भूक लागली असतानाच खाणं. पशु पक्षी आणि लहान बाळं  हा नियम पाळतात पण आपलं काय?? केव्हाही आणि काहीही खाण्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही. पथ्य (हितकर) आणि अपथ्य (अहितकर) एकत्र करून खाणे म्हणजे - 'समशन'. भोजन झाल्यावरही  खाणे म्हणजे -'अध्यशन'. भोजनाची वेळ नसतानाही भोजन करणे म्हणजे - 'विषमाशन'. विरुद्ध  गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे- 

 'विरुद्धाशन'. समशन, अध्यशन, विषमाशन आणि विरुद्धाशन- ही अनेक व्याधींना निर्माण  करणारी कारणं आहेत. या चुका   अनेकदा कळत नकळत आपण करतोच. ही कारणं जर आपण विचारपूर्वक टाळली तर बऱ्याच आजारांना अटकाव होऊ शकतो.

     तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे पोटभरून ,तडस लागेपर्यंत जेवू नये. जेवणानंतर जर सुस्ती, जडपणा, दम लागणे- ही लक्षणं निर्माण होत असतील तर आपलं जेवण प्रमाणापेक्षा जास्त झालं आहे हे समजावं. प्रत्येकाला आपल्या पोटाचा अंदाज असतो. आपल्या पोटाचे आपण चार भाग करावे. दोन भाग- घन आहार, एक भाग- द्रवपदार्थ आणि एक भाग वायूच्या संचारासाठी मोकळा ठेवावा असं शास्त्र सांगतं. 'सावकाश जेवा'- असं म्हणण्याची आपली परंपरा आहे. 'सावकाश' म्हणजे स+अधिक अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी .सावकाश याचा अर्थ -पोकळी सह. म्हणजे पाहुणचार करतानाही आयुर्वेदाचा नियम पाळण्याची परंपरा आहे. पण आपण 'सावकाश' चा अर्थ आपल्या सोयीने घेतला आहे.

       चौथा अगदी साधा नियम म्हणजे- तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं. शरीराला गरज असेल त्यावेळी शरीर पाणी मागतं. हल्ली तासातासाला पाणी पिण्याचं प्रमाण फार वाढलं आहे, ज्यामुळे हे अतिरिक्त पाणी शरीराबाहेर काढताना अवयवांवर ताण वाढून ते कमकुवत होऊ लागतात.

    आतापर्यंत सांगितलेले चार नियम हे सामान्य नियम आहेत जे सगळ्यांनीच आचरणात आणणं आवश्यक आहे. पाचवा नियम हा व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे आजच्या भाषेत तो 'पर्सनल डायट प्लॅन' आहे. याला आहारविधि विशेषायतन  म्हणतात. हे आठ प्रकारचे आहेत. 'प्रकृती'- म्हणजे आहार द्रव्यांचे गुणधर्म . 'करण'- म्हणजे द्रव्यावर होणाऱ्या  प्रक्रिया.  'संयोग'- म्हणजे पदार्थात योग्य द्रव्यांचं मिश्रण. 'राशी'- म्हणजे भोजनातील प्रत्येक पदार्थांची मात्रा. 'देश'- म्हणजे आहारद्रव्यांचं उत्पत्ती स्थान. 'काल'- म्हणजे भोजनाचा योग्य काळ.'उपयोग संस्था'- म्हणजे भोजनाचा अपेक्षित परिणाम बघणे. 'उपयुक्तता'-

 म्हणजे भोजन घेणार्‍या व्यक्तीची प्रकृती. अत्यंत सूक्ष्म विचार करून हे अष्ट आहारविधी विशेषायतन ठरविले आहे. आहाराबद्दलचा पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तिचं आहार नियोजन केल्यास व्याधीप्रतिकारक क्षमतेचा स्तर निश्चितच  उंचावेल.

          आहार सेवनाचे महत्त्वाचे नियम बघितल्यावर, 'काय खायचं?' हा विषय ओघानेच येतो,जो शास्त्रात अत्यंत विस्तृतपणे मांडला आहे. आहार द्रव्यांचं 12 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. 'शुकधान्य', 'शिंबी धान्य', 'मांसवर्ग', 'शाकवर्ग', 'हरितवर्ग', 'मद्यवर्ग', 'अंबुवर्ग', 'फलवर्ग','दुग्धवर्ग, 'ईक्षुवर्ग', 'कृतान्नवर्ग आणि 'आहार योग्य वर्ग'- अशा स्वरूपात, प्रत्येक वर्गात असणाऱ्या समस्त द्रव्यांचे गुणधर्म शास्त्रात लिहून ठेवले आहेत. या प्रत्येक वर्गावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. उदाहरणादाखल शुकधान्य म्हणजे- गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राळ, निवार, वरई, शामाक....., इत्यादी. यापैकी बाजरी नंतरची शूकधान्ये ही अनेक व्याधीं मध्ये परिणामकारक आहेत.व्याधीनाशनासाठी त्यांचे अनेक उपयोग लिहून ठेवले आहेत. या अनेक धान्यांची नावं ही आपल्याला माहीत नाही. वापरणं तर दूरच. पण संशोधनाअंती हे स्पष्ट झालंय की, ही धान्ये 'मिलेट्स' या वर्गातली  असून त्यात भरपूर चोथा आहे. ती वर्षानुवर्ष साठवता येतात. आणि गहू तांदळा प्रमाणेच त्यात पोषणमूल्ये आहेत पण ती वजन वाढवत नाही व पचायला हलकी आहेत.ही धान्ये मधुमेह,लठ्ठपणा यावर वापरावीत असं आयुर्वेदानं हजारो वर्षापूर्वीच लिहून ठेवलंय आणि आजचं संशोधनही तेच सांगतं आहे.विस्मृतीत गेलेल्या  या शूकधान्यांची लागवड, उत्पादन करून ती बाजारात लोकप्रिय करणं - हा विचार करणं आज गरजेचं आहे.

     आज जग जवळ आल्यामुळे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ खाणं हे 'प्रतिष्ठेचं'मानलं जातं.वास्तविक  हे पदार्थ 'संयोगविरुद्ध,' आणि  'देशविरुद्ध' असतात.   आयुर्वेदातील आहार द्रव्यांच्या संपत्तीला आणि पूर्वी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लाह्या, सातू ,हळीव,राजगिरा,मुरमुरे फुटाणे,शिंगाडे... इत्यादी स्वस्त पण उच्च पोषणमूल्ये असणाऱ्या पदार्थांना आपण अडगळीत टाकलं आहे. त्याऐवजी ओट्स,केलॉग्ज,आॕलिव्ह आॕईल अशी बरीचशी पाहुणेमंडळी स्वयंपाकघरात विराजमान झाली आहेत.

     देहाच्या पोषणा बद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. मनाच्या पोषणासाठी योगसाधना अत्यंत परिणामकारक आहे. आयुर्वेदात देहाच्या रसायना बरोबर सुदृढ मनासाठी 'आचार रसायन'-  (कोड ऑफ कण्डक्ट) ही सांगितलं आहे. 'सत्वावजय चिकित्सा'- हा मनाच्या पोषणाचा एक उपचार असून त्यामध्ये रोग्याला त्याच्या व्याधि नुसार काय योग्य अयोग्य आहे  हे सांगितलं जातं.

    इंद्रियांच्या पोषणाचा आज विचार केला तर सध्या त्यांचं 'अतिपोषण' होतंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. बाह्य  जग आणि शरीर या मधला दुवा म्हणजे ज्ञानेन्द्रिये असतात .आपण ज्या काही चुका करतो, त्या चुका सर्वप्रथम आपल्या ज्ञानेंद्रियांना झेलाव्या लागतात. आज दहा महिन्याच्या बाळाला ही जेवू घालताना व्हिडिओ दाखविण्याची महाभयंकर चूक आम्ही सर्रास करतो आहे. इंद्रियांचं योग्य पोषण केलं पाहिजे- हा विचार ही आज पचणारा नाही इतके आम्ही भरकटलेले आहोत.

     मन आणि इंद्रिये यांचं योग्य पोषण करण्यास जर आम्ही असमर्थ असू तर आत्म्याच्या पोषणा बद्दल काय बोलावं? आत्मपोषणासाठी सगळ्या बाह्य प्रवृत्ती  आत खेचून घ्याव्या लागतात. निदान रोज दहा मिनिटे  शांत बसून आपल्या आत डोकावून बघावं आणि आपलाच आतला आवाज ऐकावा. कुणी सांगावं, एखाद्या दिवशी आपल्या 'या' आवाजाची ओढ आपल्याला लागेल आणि आत्म्याच्या पोषणाची ही सुरुवात होईल.

    धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने, आयुर्वेद दिनाच्या मुहूर्तावर आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर - आपण डोळसपणे आयुर्वेद आणि पोषणाचा विचार करूया आणि ते आचरणात आणू या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ साधना कुळकर्णी,अकोला.

#आयुर्वेदफॉरपोषण

#आयुर्वेददिन

#आहारविधीविशेषायतन

Sunday, October 3, 2021

नवरात्र आणि आत्मविकास


        हल्ली कळेनासं झालंय की आपल्या समाजाचा चेहरा नक्की कसा आहे?? सप्टेंबर महिन्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात बलात्कारांच्या घटनांनी उच्चांक गाठला. तक्रार न झालेल्या अशा घटना आणखी किती असतील देव जाणे. समाजाचा हा हिडीस, विकृत आणि माणुसकीला काळिमा फासणारा चेहरा डोळ्यासमोर असतानाच नवरात्र सुरू होतंय. आता हा समाज 360 अंश कोनातून गर्रकन फिरेल आणि नऊ दिवस देवीच्या भक्तीचा  उन्माद सुरू होईल. उपवास, नऊ दिवसाचे नऊ रंग,ओटी भरणे, सवाष्ण, कुमारीका पूजन, गरबा, अखंड दिवा.... इ. सारी कर्मकांडे समस्त  स्त्रिया यथास्थित आणि रीतसर करतील..... बलात्कार, स्त्रियांवर होणारा हिंसाचार, अन्याय - सगळं विसरून.... दृष्टीआड करून.....भक्तीच्या उन्मादात सगळ्या विकृत वृत्तिंचा सोयीस्कर विसर पडेल.

      नऊ दिवसांची देवीची  ही पुजा, आम्हा स्त्रियांना आत्मभान देत नसेल आणि आमच्या विचारात आणि कृतीत परिवर्तन घडवून आणत  नसेल तर काय अर्थ असल्या पूजेत? देवीमधल्य एखाद्या तरी गुणाचा थोडाफार अंश आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो का आम्ही?मुळात आमची पूजा ही श्रेयसासाठी की प्रेयसासाठी??

      आपल्या  नवरात्र पूजेमागे अनेक पौराणिक कथा आहेत. पण मी जेव्हा सखोल विचार केला, तेव्हा माझ्या बुद्धी आणि तर्कानुसार मला असं लक्षात आलं की स्त्रीचं आयुष्य हे नऊ टप्प्यात पूर्ण होतं. हे नऊ टप्पे आणि  नवरात्राच्या नऊ दिवसांचं देवीचं स्वरूप विलक्षण  मिळतंजुळतं आहे.ही नऊ दिवसाची पूजा म्हणजे आपल्याच जीवनातला एक एक टप्पा डोळस,समृद्ध,सक्षम आणि परिपूर्ण करणं होय.

   पहिली देवी  'शैलपुत्री' म्हणजेच पार्वती. पार्वतीचा  आदिशक्ती म्हणून गौरव केला आहे . आदी म्हणजे आरंभ. घटस्थापना करतांना आपण माती मध्ये धान्य पेरत असतो. म्हणजेच पहिल्या दिवशी स्त्री मधल्या 'सृजनशक्तीची','निर्मिती  क्षमतेची' पूजा असते. त्याच बरोबर गर्भाशयात रूजलेल्या इवलाश्या स्त्री गर्भाची पूजा असते. या दिवशी प्रत्येक स्रीनं देवीसमोर डोकं टेकवताना स्त्री भ्रूणहत्ये विरुद्ध लढण्याची शपथ घेणं गरजेचं आहे.गर्भनिर्मिती करणाऱ्या अवयवांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. शैलपुत्री देवीच्या डाव्या हातात कमळ तर उजव्या हातात त्रिशूळ आहे .या त्रिशूळाचा उपयोग केव्हा आणि कसा करायला हवा हे प्रत्येक स्त्रीनं समजून घेणं हे आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल........

       दुसऱ्या दिवशीची देवी म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चरणी म्हणजे तपस्या करणारी. ही देवी शुभ्र वस्त्रांकित असून तिच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात कमंडलू आहे. ही देवी पार्वती असून तिने शंकराच्या प्राप्तीसाठी तप केलं हे आपण जाणतोच. स्त्री जीवनातला पहिला टप्पा म्हणजे जन्मापासून बारा वर्षापर्यंत.दुसऱ्या दिवसाची पूजा ही 'ध्यासाची' आहे. स्त्रीने आपल्या घरातील, समाजातील बाल्यावस्थेतील मुलींचा विचार करायचा आहे. या मुलींना काही छंद, नाद, ध्यास असेल तर तो त्यांना जोपासू द्यावा, त्यांना पाठिंबा द्यावा. तरच मेरी कोम, पी व्ही सिंधू,मिताली राज घराघरात निर्माण होतील. फक्त या ध्यासामध्ये जपमाळेतील  सातत्य आणि शुभ्रवस्त्रातील सात्विकता जपण्याकडे लक्ष देणं हेच आत्मभानाच्या च्या दिशेने टाकलेलं दुसरं पाऊल......

      तिसऱ्या दिवसा ची देवी ही 'चंद्रघंटा'. हिची कांती सोनेरी असून ही देवी लावण्यवती आहे. तिच्या डोक्यावर चंद्राच्या आकाराची घंटा असून त्या घंटा नादानं असूर भयभीत झाले होते. स्त्री  जीवनातला दुसरा टप्पा म्हणजे तारूण्य. ही पूजा 'सौंदर्य' आणि 'शक्ती'ची असते. तारुण्यावस्थेत स्त्री शरीरातले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सक्रिय असल्याने तिचं सौंदर्य आणि कांती झळाळून उठतं आणि याच हॉर्मोनमुळेच  या वयात धाडसी वृत्ती असते.  देवीसमोर नतमस्तक होताना  मुलींचं खच्चीकरण न करता तिच्यातील स्फुल्लिंग जपणं,धिटाईला योग्य वळण देणं आणि सौंदर्यप्रदर्शनास विरोध करणं - हा संकल्प करणं -  हेच आत्मभानाच्या दिशेनं  टाकलेलं तिसरं  पाऊल........

     चौथ्या दिवसा ची देवी म्हणजे 'कुष्मांडा'. या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तिने आपल्या हास्यापासून ब्रम्हांडाची निर्मिती केली अशी कथा आहे.चौथी पूजा ही 'हास्याची' म्हणजेच आनंदाची आहे. स्त्री जीवनातला चौथा टप्पा म्हणजे विवाह. विवाहानंतर स्त्री  आपलं नवीन जग निर्माण करित असते. पण यासाठी तिच्या चेहऱ्यावर हास्य, आनंद आहे का, हे बघण्याची जबाबदारी कुटुंबातल्या प्रत्येकाची- नवरा, सासू, नणंद, दीर इत्यादींची आहे. अंतर्मनातून फुलणारंं हास्य,स्वातंत्र्य  आणि आनंद हे प्रत्येक सासुरवाशिणीला, माहेरवाशिणी ला मिळावं यासाठी देवीसमोर संकल्प  करणं- हेच आत्मभानाच्या दिशेने टाकलेले चौथं पाऊल.......

     पाचव्या दिवसाची देवी आहे 'स्कंदमाता'. ही देवी पार्वती असून हिच्या हातात कार्तिकेय आहे. या देवीचं वैशिष्ट्य हे, की तिला चार हात असून एकाही हातात शस्त्र नाही कारण ही पूजा ' वात्सल्याची ' आहे. विवाहानंतर चा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातृत्व. मातृत्वाच्या थोरवी बद्दल मी नव्याने काही सांगण्याची गरज नाही. पण या देवीसमोर नतमस्तक होताना आजच्या आयांनी काही संकल्प आवर्जून करावे. ते म्हणजे घरातील पुरुषांना (नवरा/मुलगा) स्त्रियांकडे एक 'माणूस' म्हणून बघायला,सन्मान करायला शिकवावं.घरातल्या सगळ्या कामांची- स्वयंपाकाची- सवय लावावी .अशी आई होणं म्हणजेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पाचवं पाऊल.........

      सहावी देवी आहे , 'कात्यायनी'. हिने महिषासुराला ठार मारले असून, हिच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातात कमळ आहे. हिच्या अचाट सामर्थ्याच्या अनेक कथा आहेत. या देवीचं पूजन म्हणजे 'असामान्य सामर्थ्याचं' पूजन आहे. स्त्री जीवनातला पाचवा टप्पा हा मुलांच्या संगोपनाचा,घरकामाचा,नोकरीचा- अत्यंत व्यस्त असा असतो. या काळात ती 'मल्टिटास्किंग' करत असते. या दिवशी देवीची   पूजा करताना, तिचं सामर्थ्य स्वतःसाठी मागायचं आहे. पण ही अफाट क्षमता, ऊर्जा - घरातील आणि समाजातील सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी मागायची आहे. आजच्या कृत्रिम आणि पोशाखी दिखाऊपणा साठी नाही किंवा 'सुपरवुमन' बनण्यासाठी नाही. हे आत्मभानाच्या दृष्टीनं   सहावं पाऊल............

           सातवी देवी म्हणजे 'कालरात्री'. स्त्री जीवनातला सहावा टप्पा म्हणजे चाळिशीनंतरचा. या काळात  मुलं मोठी झाल्यामुळे स्त्री  थोडी निवांत असते. ही कोशातून, चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ असते. तिने आता स्वतःला आणि समाजाला वेळ देणं गरजेचं आहे. कशासाठी?? तर- घरात, घराबाहेर, कुठेही अन्याय, अत्याचार होत असेल, तर प्रतिकार करण्यासाठी. कालरात्री  देवी चं स्वरूप बघितलं, तर ते भयावह आहे. काळा रंग, मोकळे केस, तिसरा डोळा- - हे कशाचं प्रतीक असावं? जर काहीही चुकीचं घडत असेल, तर रंगरूपाची पर्वा न करता 'तिसरा डोळा' उघडायचा. या देवीचं वाहन 'गाढव' आहे. का?कशासाठी?? दुष्टांचा संहार करण्यासाठी, जमेल त्या मार्गानं, सुचेल त्या आयुधानं, मिळेल त्या मदतीनं- - धावून जायचं असतं. मग ते वाहन गाढव का असेना. या वयात स्त्रीला परिपक्वता, चांगल्या वाईटाची जाण,अनुभव   असतो. म्हणून देवीला नमस्कार करतांना, समाजातील अपप्रवृत्तींचा नाश करण्याचा संकल्प करणं- हेच आत्मभानाच्या च्या दिशेनं टाकलेलं  सातवं पाऊल.......

     आठवी देवी आहे 'महागौरी'. ही श्वेत वस्त्रांकित आहे. या देवी मधील 'शांती व ज्ञानाची '  पूजा  केली जाते . स्त्री जीवनातला सातवा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीचा आणि सेवानिवृत्तीचा.  या काळात शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होतात त्यामुळे बरेचदा  मनात उदासीनता आणि नैराश्य निर्माण होतं. पण याच टप्प्यावर महागौरी देवीची पूजा करून मन स्थिर,शांत आणि समंजस  करणं गरजेचं आहे .देवीच्या हातातील डमरू हे सृष्टीतील उत्पत्ती आणि लय यांचं प्रतीक आहे .हे प्रतीक जीवनातलं अंतिम सत्य आहे हे समजून, सध्याच्या आभासी जगातले अशाश्वत मोह, सुख, मनातून बाहेर काढून, अंतर्मनाच्या शांतीचा व ज्ञानाचा संकल्प करणं- - हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं आठवं  पाऊल........

      नवव्या दिवसाची देवी 'सिद्धीदात्री'. ही कमळात विराजमान आहे आणि हिला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आहेत. या टप्प्यावरील स्त्री ही वार्धक्यावस्थेतली असते . साधारण सत्तर वर्षापासून पुढचा हा काळ आहे. या वयातल्या स्त्रीमध्ये समाधान, सामंजस्य, शांती, परिपक्वता, निर्लेपता, निर्मळता, प्रेम आणि आनंद या अष्टसिद्धी असणं अपेक्षित आहे. यासाठी तिनं स्वतः आणि कुटुंबीयांनी जागरूक असायला हवं.  या देवी समोर नमन करताना कुटुंबीयांनी तिला सन्मान देण्याचा आणि स्त्रीने स्वतःला षड्रिपु पासून दूर ठेवण्याचा संकल्प करणं हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं नववं पाऊल........

 अशा पद्धतीने नऊ दिवस देवीच्या मूर्तिपूजेबरोबर  देवीचे गुण स्वतःमध्ये आणि आपल्या समाजात रुजवले तर नवरात्राचे श्रेयस आपल्या पदरी पडेल. घराघरांमध्ये दुर्गादेवीचं अस्तित्व निर्माण होऊन स्त्री  ही खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सक्षम होईल. स्त्रीमधील हे आत्मभान जागृत झाल्यावर हा समाजही सुसंस्कृत आणि विवेकी होईल.

स्त्री ही संपूर्ण समाजाला योग्य वळण लावू शकते,त्याचवेळी त्याला वठणीवरही आणू शकते.फक्त स्वतःमधील वैशिष्ट्यांचा नेमका,अचूक आणि  योग्य वापर करण्याचं आत्मभान आलं तरच!!!



  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...