जवळपास चाळीस पन्नास वर्षांपूर्वी जो विषय ज्वलंत होता,ज्या विषयाचा चघळून चघळून चोथा झाला आहे तोच विषय आकर्षक स्वरुपात,कसलेल्या अभिनेत्रींना घेऊन, चुरचुरीत विनोदाची फोडणी देऊन, तिन्ही त्रिकाळ प्रसिद्धीचा, प्रमोशनचा मारा करुन महाराष्ट्रातील स्त्री प्रेक्षकांवर थोपवलेला सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'.थोडक्यात काय, चित्ताकर्षक वेष्टनात गुंडाळलेली जुनी पुराणी वस्तू.किंवा नव्या बाटलीत जुनी दारु म्हणजे ' बाईपण भारी देवा '.
बाई असल्यामुळे, सर्वसाधारणतः कौटुंबिक, भावनिक गुंत्यात अडकणं हा तिच्या जीवनातील अपरिहार्य भाग असतोच.त्यात नोकरी करुन घर सांभाळणाऱ्या बाईची तर तारेवरची कसरतच असते. अशाच सहा सख्ख्या बहिणींच्या आयुष्यातले गुंते ही सिनेमाची मुख्य कथा.आणि त्यातून सुटण्यासाठी या सहा बहिणी जो भन्नाट (अजिबातच न पटणारा, अवास्तव) मार्ग निवडतात , तो म्हणजे 'बाईपण भारी देवा'.
मुळात या बहिणीं समोरचे प्रश्न अगदी क्षुल्लक आहेत.फक्त सुचित्रा बांदेकरच्या घटस्फोटाचा प्रश्न सोडून. त्यातही शिल्पा नवलकर,वंदना गुप्ते आणि रोहिणी हट्टंगडी यांची घुसमट ( जी अतिशय वरवरची आहे) त्यांनी स्वतःच निर्माण केली आहे.खरंतर काहीही कारण नसतांना चोवीस तास चेहऱ्यावर बारा वाजलेल्या रोहिणी हट्टंगडीच्या नवऱ्याचीच घुसमट व्हायला हवी होती.त्याचं पुरुष पण भारी रे देवा! या बहिणींची दु:खं म्हणजे तूप साखरेत घोळवून, लाडावून कुरवाळून मोठी केलेली दु:खं आहेत.अशा दु:खांना फारसं महत्त्व न देता आजची बाई जगण्याचा आनंद घ्यायला शिकली आहे. अशी फालतू दुःखें आम्ही आणि आसपासच्या बायकांनी अनेकदा अनुभवली आहेत आणि त्यातून लीलया बाहेर पडलो आहोत. बाईपणाच्या वास्तव दुःखांच्या आणि कोंडमाऱ्याच्या जवळपासही हा सिनेमा पोचत नाही.नुकतंच बाईपणातून बाहेर निघून एक माणूस म्हणून जगण्याच्या आजच्या काळात बाईला या सिनेमाने परत बाईपणात ढकललं आहे. शिकलेल्या,नोकरी करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या या सहा बहिणी इतक्या दुबळ्या का असाव्यात की, मंगळागौर स्पर्धेचा त्यांना आधार घ्यावा लागावा आणि तो ही एकत्रितपणे? आज समाजात ,भयंकर संकटांना एकटीने सामोरं जाऊन जीवनाच्या लढ्यात यशस्वी झालेल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी बाईपण भारी आहे हे सिध्द केलं आहे.अशावेळी हा उथळ सिनेमा निव्वळ हास्यास्पद वाटतो.
मुलांचा वाढदिवसाचा सोहळा सुरु असताना कोणती आई प्रेग्नंसी टेस्ट करेल हो?आणि मेनोपॉज आला म्हणजे आभाळ कोसळलं की काय?(आम्हाला तर हायसं वाटलं बुवा) चिनूच्या ऑपरेशनच्या वेळेस तिचा नवरा आणि सासू कुठे होते? कडक अण्णा एकाएकी मऊ कसे झाले? स्टेशनवरचा नाच म्हणजे निव्वळ मूर्खपणाचा कळस.
असो.कलाकार सगळेच कसलेले आहेत.वंदना गुप्ते कितीही आवडत असली तरी तिला आता बघवत नाही. ती स्वतःच्याच प्रेमात आहे."मी- वंदना गुप्ते" याच ऍटिट्युड ने तिने काम करु नये. सुकन्या कुलकर्णी जबरदस्त .तिची बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरचे हावभाव अप्रतिम. पण नोकरी करणारी बाई इतकी बावळट?असो.
पण दिग्दर्शक केदार शिंदे खरंच हुशार.त्यांनी आजच्या मध्यमवर्गीय,मध्यमवयीन बायकांची मनोवृत्ती अचूक हेरली आहे. "मज्जा" आणि "एन्जॉय" हा प्राधान्य क्रम असणाऱ्या बायकांची नस त्यांनी बरोबर पकडली आहे. सिनेमातल्या वरवरच्या झगमटाला बाईपणाचं लेबल लावलं आणि त्याला नाव देतांना "भारी" या जरीची झालर लावली.झालं. तमाम महिला वर्ग खुळावलाच की हो. थिएटरला तीर्थयात्रेचं स्वरुप आलंय चक्क. बायका झुंडीने सिनेमाला ड्रेस कोड करुन जाताहेत,रील,फोटो काढताहेत. थिएटर मधून बाहेर निघताना आपण "कसल्या भारी" आहोत या आनंदात न्हाऊन निघताहेत. सगळ्याच बायकांचा आत्मविश्वास वाढलाय म्हणे हा सिनेमा बघून - अर्थातच... जमत नसेल, सोसत नसेल तरी सार्वजनिक ठिकाणी नाच करण्याचा हो. हा केदार शिंदे च्या यशाचा फॉर्म्युला.
खरंतर "बाईपण किती उथळ देवा"...असा समज या सिनेमामुळे होतोय.पण झापडं बांधूनच वावरायचं असेल तर देव त्यांना सद्बुद्धी देवो !! असो. डोकं न वापरता सिनेमा डोक्यावर घ्यायचा हे ठरवूनच टाकलं असेल तर प्रेक्षक स्त्रियांचंही "बाईपण भारीच भारी" हो देवा.
डॉ साधना आशुतोष कुलकर्णी
#बाईपणभारीदेवा

