यावे देवा महाराजा.गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुझे हार्दिक स्वागत. आपल्या राज्यात तुझ्या आगमनाची रीतसर आणि जय्यत तयारी झाली आहे. शहराकडून गावाकडे जाणाऱ्या रेल्वे ,बस ,खाजगी गाड्यांचं आरक्षण कधीचंच 'फुल्ल' झालेलं आहे. खाजगी वाहनांचे दर नेहमीप्रमाणे प्रचंड वाढले आहेत. तुझ्या विविध मनमोहक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या भव्य, आकर्षक मूर्ती वाजत गाजत, विजेच्या, केबलच्या तारा तोडत आपापल्या मंडळात डेरेदाखल झाल्या आहेत. ढोल, ताशा लेझीमची प्रॅक्टिस टिपेला म्हणजेच कानाचे पडदे फाटेस्तोवर पोचली आहे. आधीच खड्डे असलेल्या जमिनीवर आणखी खड्डे खोदून बाप्पा तुमच्यासाठी ठिकठिकाणी भव्य व्यासपीठे उभारली आहेत. खंडणीच्या वसुलीप्रमाणे वर्गणीही सगळ्या मंडळांनी 'शिस्तीत' जमवली आहे. आपण यावे गणराया.... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.
बाप्पा तुझ्या उत्सवात बंदोबस्तासाठी पोलिसांची प्रचंड फौज तैनात केली आहे. आता दहा दिवस त्यांना पाणी प्यायला ही सवड नसणार.तुझ्यासारखे व्हीव्हीआयपी आले की सगळी कामं सोडून कायदा आणि सुव्यवस्था योग्य राखण्यात पोलिसांची काय अवस्था होते हे तुला सांगायची गरज आहे? सुरळीत वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद केलेले आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे.पण हरकत नाही. तुझ्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची योजना केली आहे. यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी झाला त्यामुळे पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे.शिवाय निर्माल्य पाण्यात शिरवण्याची आपली परंपरा.असो. आपण यावे गणराया..... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.
महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस पुरेसा नसल्याने पिके करपून चालली आहेत. शेतकरी हवालदिल झालाय.पण बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजली आहे. तिथे दुष्काळाचा मागमूसही नाही बरं बाप्पा. तुझे दागिने ,तुझी रेशमी वस्त्र, तुझं मखर, तुझी आरास, तुझ्यासाठी फुले, हार, दुर्वा, नारळ, फळफळावळ यांनी बाजार ओसंडून वाहतोय. दुचाकी चारचाकी वाहनांची खरेदी तुझ्या आशीर्वादाने व्हावी म्हणून अनेकांनी आगाऊ पैसे भरून ठेवले आहेत.सोने खरेदी पण तुझ्या आगमनाप्रित्यर्थ भक्तांनी केली आहे. तुझ्या साग्रसंगीत आणि षोडशोपचार पूजेसाठी समस्त ब्रह्मवृंद सज्ज आहे .हल्ली त्यांची वेळ चार महिने आधीपासून घ्यावी लागते . नाही तर ऑनलाईन गुरुजींचा पर्याय आहेच की. त्यामुळे सारं काही 'सुशेगात' आहे.आपण यावे गणराया......तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.
ही झाली सार्वजनिक मंडळाची तयारी. पण आम्ही घरी सुद्धा जय्यत तयारी केलीय बरं बाप्पा. अहो ,दोनशे रुपयांनी सिलेंडर स्वस्त झालाय. मग काय विचारता? घर चकाचक स्वच्छ केलं आहे.तांदूळ धुऊन, वाळवून, दळून उकडीच्या मोदकांची तयारी केली आहे. यूट्यूब वरून चीज मोदक, केक मोदक, पनीर मोदक, चायनीज मोदक, मिलेट्स मोदक यांच्या रेसिपीज डाऊनलोड करून ठेवल्या आहेत. अथर्वशीर्षाची पुस्तकं आणून ठेवली आहेत. दहा दिवसांच्या दहा-साड्या आणि पारंपारिक दागिने ठरवले आहेत. आणि यावर्षी ना बाप्पा, माझ्या मैत्रिणीने सरळ चांदीच्या २१ दुर्वा आणि चांदीचे जास्वंदीचे फुल खरेदी केले आहे. म्हणजे रोज दुर्वा तोडायची कटकटच नाही. त्यामुळे आपण यावे गणराया...... तुझं स्वागत घरोघरी दणक्यातच आणि भक्ती भावाने होणार.
बाप्पा तू महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहेस. अग्र पूजेचा मान असल्याने तुझी पूजा तर नेहमी आम्ही करतोच पण भक्तीभावाच्या पलीकडेही तुझं आणि आमचं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं आहे. तुझी घरात प्रतिष्ठापना झाली की आख्खी वास्तू चैतन्यमय होते.घरात तुझ्याशी हितगुज करता येतं, संवाद करता येतो, मनासारखी पूजा करता येते. घरातल्या हवेला मांगल्य आणि पावित्र्याचा गंध येतो.
तसंच आम्ही लहान असताना, आमच्या जोशीवाडीत तुझी स्थापना व्हायची. मग ठरल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी वाडीतील प्रत्येक घराला ठराविक काम असायचं. एक दिवस हार करायचा. मग त्यासाठी पहाटे उठून फुलं तोडायची आणि चोरायची सुद्धा. आपला हार ,आपला नैवेद्य, आपली रांगोळी सगळ्यात चांगली व्हावी म्हणून सगळी घरं मनापासून आणि आनंदानं तयारी करीत. नैवेद्य रुचकर व्हावा यासाठी आईच्या मागे लावलेली भुणभुण, मी काढलेली मोठी रांगोळी लगेच पावसाने वाहून गेली म्हणून कोसळलेलं रडू, तुझ्यासमोर लहानशा स्टेजवर केलेले बाळबोध नाच, नाटकं, नाट्यछटा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत आणि त्यानंतर मिळणारी छोटी छोटी बक्षीसं.... हे सगळंच खूप गोड, लोभस, सात्विक आणि भाबडं होतं. आजूबाजूच्या मंडळांमध्ये परिसंवाद, व्याख्यानमाला, कीर्तन,तीन अंकी नाटकं...असे दर्जेदार उपक्रम असायचे.थोडक्यात काय, उत्सवाचे दहा दिवस हे आमचं संस्कार शिबीरच होतं.
पण....पण आता त्यातलं काहीच उरलं नाही. सार्वजनिक मंडळात तुझी रेखीव, सुंदर, सजवलेली महाकाय मूर्ती असते, तुझ्या अंगावर दागिने असतात, दिव्यांची रोषणाई असते, नयनरम्य देखावा असतो, दानपेटीत देणाऱ्यांचा ओघ असतो, वाद्यांचा दणदणाट असतो. सगळं खूप छान असतं पण बाप्पा, तुझी मूर्ती बघून परकं वाटतं. बरेचदा ती मूर्ती अलिप्त, तटस्थ वाटते. तू नसतो का तिथे? खरं सांग बाप्पा, तू तिथे नसतोच ना??
खरंतर, गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. प्रादेशिक उत्सव हे भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करित असतात.हा उत्सव बघायला परदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे अत्यंत प्रगल्भ, परिपक्व ,सात्विक आचार विचारांचं प्रदर्शन होणं गरजेचं असतं. पण सध्या सार्वजनिक गणेशोत्सवात शिरलेलं अर्थकारण, राजकारण ,गुंडगिरी ,झुंडशाही, कंपूशाही बघून हा गणेशोत्सव नको असं वाटायला लागलं आहे बाप्पा. तुझ्या उत्सवाचं बाजारीकरण झालं. तुझ्या उत्सवात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होऊ लागली. तुझ्या मंडळात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होऊ लागला. तुझा उत्सव म्हणजे प्रतिष्ठेचं आणि शक्तीचं प्रदर्शन होऊ लागलं .भक्तीची जागा उन्मादाने घेतली. उत्साहाची जागा धिंगाण्याने घेतली .श्रद्धेची जागा अभिमानाने घेतली आणि तुझ्या उत्सवाचा 'इव्हेंट' झाला बाप्पा.
सध्या विलक्षण अस्थिर परिस्थितीत आहे आजचा समाज. एकीकडे चांद्रयान, विक्रम लँडर, आदित्य एल-वन च्या प्रक्षेपणाने देशाची बौद्धिक उंची वाढते आहे तर दुसरीकडे महिलांना निर्वस्त्र करून, त्यांच्यावर बलात्कार करून, त्यांची धिंड काढणाऱ्या समाजाचा हिंस्र आणि भयंकर चेहरा दिसतो आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे झालेला विकास दिसतो आहे त्याचवेळी त्या महामार्गावर रोज घडणारे अपघात मन सुन्न करताहेत. ज्या देशातले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके मिळवून देशाची मान उंचवतात त्याच देशातल्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार होऊनही त्यांना न्याय मिळत नाहीय. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, नापिकी, प्रदूषण, कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार या सगळ्या विळख्यात आजचा समाज अडकत चालला आहे. बाप्पा, तरीही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आम्ही तुझं जंगी स्वागत करणार आहोत.आपण यावं गणराया...... कारण तुझा उत्सव ही अस्वस्थ समाजाला दिलेली अफूची गोळी आहे.
बाप्पा, तू बुद्धीची देवता आहेस ना? 'त्वं ज्ञानमयो, विज्ञानमयोसि 'असं तुला म्हणतात ना? पण तुला माहित आहे का, सध्या या बुद्धीला कोणीही विचारत नाही, आम्हाला बुद्धी आहे रे पण आम्ही तिचा वापर करित नाही किंबहुना तिचा योग्य वापर केला तर खिल्ली उडविली जाते. आमच्या बुद्धीला गंज चढतो आहे पण आम्हाला त्याचं काहीही सोयर सुतक नाही .अरे ,आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. आता 'बुद्धिमान', 'मठ्ठ', 'ढ' ही विशेषणं निकालात निघालेली आहेत. पुढे मागे, 'बुद्धी म्हणजे काय रे देवा?' असा प्रश्न तुला विचारला, तर वाईट वाटून घेऊ नकोस. आता तुझ्यासमोर हात जोडून कोणीही ,'चांगली बुद्धी दे देवा'... असं म्हणणार नाही, हे लक्षात ठेव आणि आपण बुद्धीची देवता आहोत या भ्रमात राहू नकोस.
शेवटी काय, काहीही झालं तरी तुझं दणक्यात स्वागत होणारच. त्यामागे भक्ती, श्रद्धा, पावित्र्य नसलं तरीही. तेव्हा बाप्पा, आता तूच ठरवायचं आहेस की यायचं की नाही?
' त्वमेव केवलम् कर्तासि| त्वमेव केवलम् धर्तासि|
त्वमेव केवलम् हर्तासि|'.. असं तुला म्हणतात ना? मग तूच आता निर्णय घे. पण तोपर्यंत आम्ही जयघोष करणारच... 'यावं गणराया'.... आणि हळूच म्हणणार,
'गणपती बाप्पा मोरया....
पुढच्या वर्षी नक्की काय ते ठरवा'.
डॉ साधना आशुतोष कुलकर्णी
#गणेशोत्सव
#गणपतीबाप्पा
