Sunday, February 28, 2021

 जागतिक महिला दिनाचे वारे सालाबादप्रमाणे यंदाही वाहू लागले आहेत ‌‌.


चावून चावून चोथा झालेल्या विषयांना आता ऊत येईल.

समाजानं, पुरुषानं, स्त्रीनं, परंपरेनं, धर्मानं स्त्रीवर केलेल्या अन्यायी कथांच्या शिळ्या कढीला भरभरून ऊत येईल.

भाषणं,सत्कार,पुरस्कार , स्त्रियांचे पोवाडे,समारंभ सारं काही रीतसर साजरं होईल.

तसंही देवीचं नवरात्र,मदर्स डे आणि जागतिक महिला दिन या दिवशी होत असणाऱ्या कौतुक सोहळ्यात आम्ही स्त्रिया  स्वतःला अगदी 'महान ' वगैरे समजायला लागतो आणि स्वतःला फसवत राहतो.


मुळात स्त्रीचं उच्च शिक्षण,तिचं घराबाहेर पडून अर्थार्जन करणं,पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या पदांवर नोकरी करणं , त्यामुळे तिच्या भौतिक जगण्यात झालेला आमूलाग्र बदल..... स्त्री प्रगतीचे हे टप्पे किंवा  पॕरामीटर्स आता कालबाह्य समजायला हवेत.

तिच्या जीवनातल्या भौतिक बदलापेक्षा वैचारिक आणि  वागणूकीतील बदल हा जास्त महत्त्वाचा आहे .


आज स्त्री म्हणून कुटुंबानं आणि समाजानं दिलेल्या भूमिका २४/७ आम्ही कवचकुंडला सारख्या मिरवतो की त्यातून बाहेर निघून एक व्यक्ती म्हणून स्वतःचा विचार करतो??? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवा.

आज मी साठी पार केली आहे.  माझ्या लहानपणाचा काळ लक्षात घेता,माझ्यातलं  'स्त्री' हे  ॲप  हे सगळ्यात प्रभावी असणं हे ओघानं आलंच.

आमच्या दैनंदिन जीवनातल्या कोणत़्याही आॕपरेटींग सिस्टीमची किंबहुना अगदी विचार करण्याची सुरुवातच मुळी ' स्त्री' अॕप उघडल्यावर व्हायची.

आत्मभान येईपर्यंत मला स्त्री पुरुषांना दिलेली वेगळी वागणूक खरं तर खटकलीच नव्हती. म्हणूनच मुलींना घातलेली बंधनं  पाळत राहिले- - त्याच समजूतीत जगत राहिले.आणि स्वतंत्र वृत्तीने वागणाऱ्या स्त्रियांना वाईट लेबलं लावीत राहिले .

जसं जसं आत्मभान आलं तसे तसे स्त्री जीवनातल्या अनेकविध भ्रमांचे भोपळे फुटत

 गेले.बरंचसं खटकलं, बरचसं मेंदूला झिणझिण्या आणणारं, कधी संतप्त करणारं, बरेचदा घाव घालणारं........

कळलं सगळंच पण 'वळलं ' का?????

दुर्दैवाने वळलं नाही कारण स्वतःच्या स्त्रीभूमिकेतून बाहेर पडण्याचं धाडस प्रत्येकीत असतंच असं नाही.

 पण 'मी' आज कुठे आहे? माझ्यातल्या 'स्त्री'चं एका व्यक्तीत परिवर्तन झालंय?????

आणि जर झालं असेल तर ते वैचारिक स्तरावर की आचरणातही आलंय?- हा प्रश्न मी स्वतःला हल्ली नेहमीच विचारत असते.

 आज अगदी मनापासून मला हे आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटतेय.

मी वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात 'व्यक्ती ' म्हणून जगतेय????.....की समाजात व्यक्ती  म्हणून आणि घरात मात्र..........

.....की सोयिस्करपणे कधी व्यक्ती आणि कधी स्त्री ..........

म्हणून  आज मला स्वतःलाच आणि माझ्या समविचारी मैत्रिणींना काही प्रश्न विचारावेसे वाटतात.


... रोजच्या जगण्यात मी माझ्या बुद्धीचा आणि माझ्या स्वतंत्र विचारसरणीचा किती उपयोग करते? की हे विचार दाबून टाकून  परंपरागत स्त्री 

मानसिकतेत राहणंच मला सोयीचं वाटतं?


....दैनंदिन जगण्यात माझं  स्त्री असणं प्रभावी असतं की एक व्यक्ती असणं?


....एक स्त्री म्हणून समाजाकडून, कुटुंबाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे का?


....माझ्या मुलगी आई, पत्नी, सासू, आजी,इ.इ. भूमिका  भिरकावून कधीतरी फक्त स्वतःसाठी  जगून बघितलं आहे का?? फक्त स्वतःलाच जाणून घेतलंय का?


....मी माझ्या घरातल्या यच्चयावत पुरुषांना स्वावलंबी केलंय का? माझ्याशिवाय त्यांचं काहीही अडणार नाही अशी परिस्थिती मी निर्माण केलीय का?


.... माझ्या मुलीला आणि मुलाला काहीही भेदभाव न करता खरंच वाढवलंय का?भांडी घासणं, केर काढणं, स्वयंपाक करणं इ.घरगुती कामं माझा मुलगा न सांगता करतो का?


.... घराबाहेर एकटी वावरताना माझं स्त्री असणं मला अडचणीचं वाटतं का?


घरातल्या आर्थिक गुंतवणूकीच्या बाबतीत माझी काही ठोस भूमिका असते की 'फुल्यांच्या' जागी सही करण्याइतपतच माझा सहभाग असतो?


स्वतःच्या बाबतीत,कुटुंबातील किंवा अवती भोवतीच्या स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांकडून गैरवर्तन घडत असल्यास मी आवाज उठवला की गप्प बसले?


आसपास एखादी स्वतंत्र विचारसरणीची,मनस्वी,परंपरा झुगारणारी,पुरुषांमध्ये बिनधास्त वावरणारी,सोलो ट्रिप्स करणारी स्त्री असेल तर मी तिच्यावर 'आगाऊ' , 'फॉरवर्ड' असे शेरे मारुन तिच्यापासून चार हात  लांब रहाणंच योग्य समजते?


..........हे अगदी वैयक्तिक स्तरावरचे प्रश्न मी स्वत:लाच विचारुन माझी परीक्षा घेतली आणि दुर्दैवाने मी त्यात काठावर उत्तीर्ण झाले.


एक दिवस जागतिक महिला दिन साजरा करुन स्वतःला देव्हार्यात बसवून आपलीच आपण किती दिवस फसवणूक करणार?

मैत्रिणींनो.............

माणूस म्हणून जगायला सुरुवात करा.आपणच आपल्यात बदल करायचा आहे.आपल्याला क्रांती घडवून आणायची असेल तर सुरुवात आपल्या पासूनच करणं गरजेचं आहे.

ज्यादिवशी प्रत्येक बाई/मुलगी स्वतःला स्त्रीत्वातून नात्यागोत्यातून पूर्णपणे बाहेर काढून स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेईल तो खरा महिला दिन असेल.

 उत्कृष्ट आई ,उत्तम पत्नी ,आदर्श सून ई.ई.होण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा उत्तम 'माणूस',

उत्तम 'व्यक्ती' होण्याच्या  दिशेनं पाऊल टाकणं.......हे खरं स्त्रीस्वातंत्र्य........

मैत्रिणींनो,नेमका कोणता आतला आवाज आपण दाबून टाकतोय हे माहित नसेल तर शोधा आणि माहित असेल तर तो आवर्जून ऐका.तो आवाजच आपलं भावविश्व उजळून टाकणारा देवदूत असणार आहे याची मला खात्री आहे.




#जागतिकमहिलादिन

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...