Thursday, September 11, 2025

 एक अनुभव


दिलीप, यावेळी तू टूरवर नाही गेलास तर चालणार नाही का? मला खरंच खूप अस्वस्थ वाटतंय.

हे बघ मिता. माझ्या प्रत्येक टूरच्या वेळी तुझी हीच वाक्यं असतात. आणि इतक्या वर्षांचा अनुभव आहे की मी गावाला गेल्यावर तुला काहीही होत नाही. अगं. काढून टाक ना ही मनातली भिती आणि तू काही जंगलात नाहीस. तू स्वतः डॉक्टर आहेस. तुझी तब्येत ठणठणीत आहे जे तुलाही माहित आहे. मिता - या भिती तून बाहेर येणं तुझ्याच हातात आहे. असं म्हणून दिलीप आपली बॅग घेऊन निघून गेला.

मीताच्या घशाला कोरड पडली. श्वासाचा वेग वाढला. छाती धडधडू लागली. हाता पायाला सूक्ष्म कंप येऊ लागला. उलटी होईल की काय असं वाटू लागलं. त्यातच शौचाची भावना झाली. ती धावतच वॉशरूम मध्ये गेली. एक लूज मोशन झाली आणि ती थकून बाहेर आली.

किती दिवस चालणार हे? दिलीप बाहेरगावी गेला की हीच लक्षणं का दिसतात मला? मनातली खोलवर असलेली भिती का उसळून येते वर? आणि ही भिती तरी नेमकी कशाची आहे? अशावेळी मिताला स्वतःचाच राग यायचा. इतका दुबळेपणा येतो कुठून ? या विचाराने चीड यायची आणि बरेचदा तर स्वतःची कीव ही यायची. स्वतःला कसंबसं सावरून मिता दैनंदिन कामं यंत्रवत उरकू लागली. कशातही मन लागत नव्हतं. एक अदृश्य दडपण सतत डोक्यावर आहे - असं जाणवत होतं. दिवस कसाबसा रेटला आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावून, स्तोत्रं, रोजची साधना, ध्यान करतांना मीतानं मनातली अस्वस्थता घालवण्याचा एक विफल प्रयत्न केला. पुस्तक डोळ्यासमोर धरलं, टीव्ही लावला, आवडती डिश बनवून खाण्याचा प्रयत्न केला. रात्र होऊ लागली तसं भीतीचं प्रमाण वाढू लागलं. आज अजिबात घाबरायचं नाही. जे व्हायचं ते होईल. नेहमी सारखं हे ठरवून मिता अंथरुणावर पडली. थोडं शांत वाटू लागलं. चला! आता झोपू या. असं म्हणत मितानं मनात मारुती स्तोत्र सुरू केलं. चार ओळी झाल्या आणि पुन्हा तेच. प्रचंड अस्वस्थता. उलटीची भावना. मिता ताडकन उठून बसली. छाती धडधडत होती. धावत वॉशरूमला गेली. पुन्हा लूज मोशन. गलितगात्र मिता लांब लांब श्वास घेत किती वेळ बसली कुणास ठाऊक. केव्हातरी डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा बरंच उजाडलं होतं. बरी झोप लागल्याचं समाधान वाटतंय न वाटतंय तेवढ्यात एक भितीची लहर आणि पोटात गोळा उठला. मितानं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. भावना आणि विचारांचा ओघ थोपवण्यासाठी तिने मोठ्या आवाजात रेडिओ सुरू केला आणि ओढून ताणून दिनक्रम सुरू झाला.

गेल्या सहा वर्षापासून तिला हा त्रास सुरू होता. ती वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर होती. दोन्ही मुलं व्यवस्थित शिकून आपापल्या विश्वात दंग होती. बाहेरगावी होती. दिलीप आपल्या व्यवसायात, टूर मध्ये स्थिरावला होता. कसलेच दडपण वा ताण येण्यालायक परिस्थिती नव्हती. सुरुवातीला तर काही शारीरिक आजार असेल म्हणून कितीतरी वेळा तपासण्या झाल्या. काहीही निष्पन्न झालं नाही. मुळात दिलीप बरोबर असतांना तिला काहीच त्रास होत नसे. त्यामुळे हा प्रकार शारीरिक नसून मानसिक आहे हे तिच्या कधीच लक्षात आलं होतं. कितीतरी मानसिक व्याधीग्रस्तांना तिने समजावून, सल्ला देऊन बरं केलं होतं. पॅनिक अटॅक्स मध्ये कोणती औषधं घ्यावी हे ही तिला माहित होती. कधी कधी ती त्या गोळ्या घेतही असे. तात्पुरतं बरं वाटायचं पण कायमचं नाही. खरं तर मिता डॉक्टर जरी असली तरी मनोविकार तज्ञ नव्हती. पण तिने स्वतःची लक्षणं बघून त्यावरचं सगळं मानस वैद्यकीय शास्त्र वाचून काढलं होतं. सगळी इत्थंभूत शास्त्रीय माहिती असूनही मला असं का व्हावं? हा मीताचा पहिला प्रश्न. एकटेपणाची भीती व असुरक्षितता - तेही दिलीप नसतांना - इतका दुबळेपणा माझ्यात कसा काय? हा तिचा दुसरा प्रश्न. या दुबळेपणा वर निश्चय करून, प्रयत्न करूनही  मला मात का करता येत नाही? त्यामुळे निर्माण होणारा अपराधीभाव- हा तिसरा प्रश्न. तात्पुरत्या औषधांनी लगेच बरं वाटतं पण हा काही कायमचा उपाय नाही हे तिला ठाऊक होतं . औषधांशिवायचे उपाय म्हणजे प्राणायाम, ध्यान, ओंकार साधना माईंडफुलनेस, स्वसंवाद, लिखाणा द्वारे भितीचा निचरा, दीर्घश्वसन, मानसिक आरोग्याचे वर्कशॉप्स .... वगैरे सगळं करून झालं. बरं. या लक्षणांची वाच्यता कुणाबरोबर ही करता येत नव्हती कारण ऐकणारा काय म्हणेल? स्वतः तला मानसिक दुबळेपणा इतरांना सांगण्याची तिला लाज वाटत होती. एका डॉक्टर मैत्रिणीशी याबाबतीत वरवर चर्चा केली तर म्हणाली, 'सुख खुपतंय तुला'.

पण या संपूर्ण मानसिक आंदोलनात दिलीप ने तिला पूर्ण समजून घेतलं. तो कधीही तिच्यावर चिडला नाही. तो तिला नेहमीच धीर देत असे. फक्त त्याचं म्हणणं एकच होतं - या भितीला धडक दे. बघ काय होतंय ते. भितीला सांभाळून ठेवणं, तिला महत्व देणं म्हणजे मूर्खपणा आहे. तुझं धाडस, तुझा निश्चय - हेच त्यावर उत्तर आहे. त्याचं तिला पटायचं पण जमायचं नाही. औषधं घेणं त्याला फारसं रुचत नव्हतं. आत्मबळ, इच्छाशक्ती, हिम्मत ही आपली अस्त्रं वापरून यश मिळवायचं हा त्याचा दृष्टिकोन होता कारण तो वैद्यकीय शास्त्र  शिकलेला नव्हता. औषधं घेण्यास त्याचा विरोधच होता. 

मानसिक आजारांवरची औषधं तर मितालाही माहित होती पण  ती मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कधीच घेणार नव्हती. त्यासाठी त्यांच्या दवाखान्यात जाणे गरजेचे होते. स्वतःच्या भित्रे पणाचा, दुबळेपणाचा पाढा त्यांच्यासमोर वाचावा लागणार होता. स्वतः डॉक्टर असल्याने सगळ्याच डॉक्टरांशी ओळख. शारीरिक दुखण्यासाठी त्यांचा सल्ला घेणं ठीक होतं पण मानसिक दुखण्यासाठी? त्यासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि संकोच आड येत होता. पण एकदा धैर्य एकवटून गावातल्या एका प्रसिध्द मानसोपचारतज्ञाच्या दवाखान्याची ती पायरी चढलीच. 

तिची लक्षणं ऐकतांना डॉक्टरांच्या चेहे-यावरचे हावभाव हे तुच्छतादर्शक आणि चिडके होते.

'अहो, तुमचा नवरा गावाला गेला की तुम्ही घाबरता आणि तुम्हाला लूज मोशन्स होतात. मग काय झालं? होऊ द्यायचं. त्यामुळे तुम्ही काही मरणार नाही. ही १५ दिवसांची औषधं घ्या. या औषधाने फायदा झाला नाही तर तुम्हाला शॉक द्यावे लागतील आणि माझा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चा १० दिवसांचा कोर्स आहे तो करा.' हे सगळं ते जोरात रागावून बोलले.

यापलिकडे एक शब्दही न बोलता त्यांनी तिला जायला सांगितले.

या अनुभवाचा तिने धसकाच घेतला. आणि मागिल पानावरून पुढे असं आयुष्य चालतच राह्यलं.

एकदा मुंबईला एका कॉन्फरन्सला ती गेली असताना डॉ. रॉय यांचं मानसिक विकारांवरचं व्याख्यान ऐकलं. अत्यंत शांतपणे आणि ठामपणे त्यांनी हा विषय समजावून सांगितला आणि ते ऐकता ऐकताच तिने त्याच क्षणी ठरवलं की डॉ. रॉय सरांकडे मला नक्कीच उत्तर मिळणार.

आणि एके दिवशी मिता त्यांच्यासमोर गेली आणि अथपासून इति पर्यंत आपलं रडगाणं तिने गाऊन दाखवलं. ते शांतपणे  ऐकत होते. त्यांनी तिला कुठेच अडवलं नाही किंवा काही प्रश्नही विचारले नाहीत. फक्त तिला जास्तीत जास्त बोलण्याची संधी दिली.

खूप प्रयत्न करूनही माझी लक्षणं कमी का होत नाहीत? या तिच्या प्रश्नाला ते म्हणाले,

' ही लक्षणं निर्माण होणार ही धारणा किंवा ही समजूत तुमच्या मेंदूत अनेक वर्षांपासून घट्ट रुजली आहे. या लक्षणांची सुरुवात का? कशी? किंवा त्याची कारणं  शोधणं हा एक उपचारांचा भाग आहे  पण ते नंतर. सध्या या धारणांना आणि  समजुतीला तुमच्या मेंदूतील रसायनांनी अजूनच दृढ केलं आहे. किंवा साध्या शब्दात सांगायचं झाल्यास या  धारणांचं मेंदूतील वायरिंग हे अगदी पक्कं आहे. महत्वाचं म्हणजे ते जितकं जुनं तितकं ते जास्त घट्ट होत जातं. त्यामुळे ठराविक परिस्थिती आली की मेंदूच्या सर्किट मधून भीतीचे, धडधडण्याचे,उलटीच्या भावनांचे संदेश शरीराला जातात. आता हे वायरिंग इतकं पक्कं असतं की त्यावर व्यक्तिचा ताबा नसतो. अशा वेळी हे सर्किट मोडण्यासाठी औषधेच परिणामकारक ठरतात. थोडक्यात हा मेंदूतील केमिकल लोचा नष्ट करण्यासाठी केमिकलच अर्थात औषधं वापरावी लागतात. औषधं सुरू केल्यावर ती शरीराने नीट स्वीकारली की नाही हे आधी बघावं लागतं. नाहीतर वेगळी औषधं वापरावी लागतात. एकदा योग्य औषधं सुरु  झाली की हळूहळू त्रास कमी होतो. जरा बरं वाटलं की पेशंटला औषधं बंद करण्याची घाई असते आणि ५०% पेशंट डॉक्टरला न विचारता तसं करतातही.  अशा वेळी लक्षणं कमी झाली तरी मेंदूतील वायरिंग चे कनेक्शन पूर्णतः विलग  होत नाही. आणि काही दिवसांनी पेशंटला परत डॉक्टरकडे जावे लागते.  जुन्या गैरसमजुतीची कनेक्शन्स नष्ट होऊन त्याठिकाणी योग्य त्या धारणांची वायरिंग निर्माण झाली की मगच पेशंट पूर्णतः बरा होत असतो. आणि कुणाला किती दिवस औषधं घ्यावी लागतील हे आजच सांगता येत नाही. नियमित फॉलोअप दिला तरच औषधोपचाराला यश मिळतं.'

डॉक्टरांचं हे शास्त्रीय विवेचन मिता आणि दिलीप ला समजलं आणि पटलं ही. आणि मिता मध्ये असणारा अपराधी भाव त्याक्षणी मावळला. फक्त दिलीप नॉन मेडिको असल्याने त्याच्या काही प्राथमिक शंकांना डॉ. रॉय यांनी व्यवस्थित उत्तरे दिली.

'या औषधांमध्ये केवळ झोपेची औषधं नसतात. औषधोपचाराने पेशंट निष्क्रीय होत नाही तर सक्रिय होतो. या औषधांची सवय लागत नाही किंवा काही घातक दुष्परिणामही होत नाही. मानसिक व्याधीसाठी उपचार घेणं हे समाजापासून लपवण्याची गरज नाही. आज समाजात ४०% मानसिक रुग्ण आहेत पण औषधोपचार घेणारे मात्र १० % आहेत. स्वतःचा मानसिक विकार ओळखून, त्याचा स्वीकार करून लवकरात लवकर उपचार सुरू करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.'

डॉक्टरांच्या पहिल्या भेटीतच मिता चं दडपण एकदम कमी झालं. औषधोपचाराने व नियमित फॉलोअप ने मिता आज पूर्णतः लक्षणातून बाहेर पडली आहे. पण अजूनही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती औषधे घेते आहे. ती आणि दिलीप दोघंही  आजकाल गरज असलेल्या पेशंटला मानसोपचारतज्ञा कडे आवर्जून पाठवतात.

मिता ला उशीरा का होईना पण डॉ. रॉय भेटले. तसेच सगळ्या रुग्णांना वेळेवारी योग्य डॉक्टर मिळून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होवो ही प्रार्थना.


डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

#मनोविकार 




Tuesday, September 2, 2025

डाकिया डाक लाया

 डाकिया डाक लाया 

 


“पत्र लिही पण नको पाठवू शाई मधून काजळ गहिरे, 

लिपी रेषांच्या जाळीमधूनि, नको पाठवू हसू लाजरे. 

चढण लाडकी भुवई मधली, नको पाठवू वेलांटीतून, 

नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या  बिंदूतून.” 

इंदिरा संत यांची ही कविता वाचताना, आपण (अर्थातच मध्यमवयीन पिढी) भूतकाळात केव्हा प्रवेश करतो हे समजतही नाही. आणि पत्रांच्या त्या अनोख्या, जादुई  विश्वात हरवून जातो.पत्रव्यवहार…हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजुक आणि भावनाप्रधान असा जतन केलेला एक कोपरा असतो.आजही कित्येकांच्या कपाटात, जपून ठेवलेल्या जुन्या पत्रांची चळत सापडेल यांची मला खात्री आहे.

         एक सप्टेंबर हा विश्व पत्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पत्रव्यवहार या लोप पावत चाललेल्या एका जिव्हाळ्याच्या संदेश वहनाला उजाळा   देण्याचा एक प्रयत्न. 

       मानवी जीव हा संवादाशिवाय राहू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे संवाद ही त्याची प्राथमिक गरज आहे. आदिमानवाच्या हाळी देणाऱ्या संवादापासून तर आजच्या इन्स्टाग्राम पर्यंतचा संदेशवहनाचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. पण यात सगळ्यात सहज सोपे, लोकप्रिय, प्रभावी व अनेक शतकांपासून अविरत सुरू असलेले माध्यम म्हणजे पत्रलेखन.. अर्थातच टपाल सेवा. टपाल सेवेच्याही आधी पत्र लेखन होतेच. पण पोस्टखाते नसल्याने निरोप्यांच्या हाती पत्र पोचविले जात असे. पौराणिक काळात रुक्मिणीने कृष्णाला आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी पत्र लिहिले अशी नोंद आहे. चांगदेवाने तर ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठविले. ज्याचा अर्थ मुक्ताबाईला समजला आणि चांगदेवांना मुक्ताबाई सारखा गुरु लाभला. व चांगदेव पासष्टीची निर्मिती झाली.  पत्रातील ‘ध’ चा ‘मा’ केल्यामुळेच पेशवाईत अनर्थ घडला. थोडक्यात काय, मानवी जीवनात पत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे .

            ईस्ट इंडिया कंपनीने १६८८साली मुंबई व चेन्नई येथे टपालसेवा सुरू केली व १७७४ मध्ये संपूर्ण देशात ती सुरू झाली. १८७८ मध्ये जागतिक पातळीवर युनिव्हर्सल पोस्टल युनियन ची स्थापना झाली व जास्तीत जास्त देश या युनियनचे सभासद असणारी ही एकमेव संघटना आहे.भारतात २५० वर्षांपासून तर पाश्चात्त्य देशात त्याही आधीपासून पत्र लेखनाची परंपरा आहे. अनेक थोर विचारवंत, तत्त्वज्ञ, साहित्यिक, लोकनेते, शासनकर्ते यांनी पत्रलेखनाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, मार्टिन ल्युथर किंग, अब्राहम लिंकन, थोरो, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर..अशा अनेक महानुभावांनी पत्र लेखनातून अमूल्य अशा साहित्यिक, वैचारिक , मार्गदर्शक  समाजप्रबोधनाची निर्मिती केली. त्यामुळेच  या पत्रसंपदेच्या

संग्रहाची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणि अशा असामान्य पत्रांना साहित्याचा दर्जा देऊन त्याला पत्रवांग्ङमय म्हटले आहे. हा एक ऐतिहासिक दस्तऐवज असून त्या काळच्या संस्कृतीचा, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा, लेखकाच्या मनोवृत्तीचा, व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा त्यातून घेता येतो .अनेक विद्यापीठांमध्ये या पत्रवाङमयाला संदर्भ ग्रंथ म्हणून जतन केले आहे. इतिहास संशोधकांना तर पत्र वाङ्मयातून अनेक महत्त्वाचे दुवे हाती लागतात. अलीकडच्या साहित्यात ‘लोकहितवादींची शतपत्री’ ‘विश्रब्ध शारदा’ नरहर कुरुंदकरांची समीक्षात्मक पत्रे, जीए कुलकर्णी व ग्रेस, सुनीताबाई देशपांडे व जी ए कुलकर्णी… यांच्या पत्रांनी  साहित्यात मोलाची भर टाकली आहे. 

         वैयक्तिक पत्र व्यवहाराची तर गोष्टच वेगळी. हा एक हळवा, आनंददायी व स्नेह वृद्धिंगत करणारा अनुभव असतो. ही पत्रे  औपचारिक व अनौपचारिक असतात. औपचारिक पत्रे, नोकरी- व्यवसाय , शासकीय, कार्यालयीन संबंधित असतात  आणि  त्यात स्वहस्ताक्षर नसते. मात्र अनौपचारिक पत्र लिहिणे व घरी आलेले पत्र वाचणे…. ही प्रक्रिया मनाला आनंद देणारी असते. आपल्या संबंधित व्यक्तिला पत्र लिहिण्यासाठी कागद पेन घेऊन विचार करणे, भावनांना शब्दांची जोड देऊन प्रत्यक्ष कागदावर  लिहिणे…. ही रचनात्मक प्रक्रिया आहे. पत्र म्हणजे साचेबंद उत्तर किंवा निबंध नसतो. तो दोन व्यक्तिंमधला संवाद असतो. त्यामुळे मनातले विचार मेंदूतून हृदयाद्वारे ,बोटामध्ये येतात व शाईच्या साह्याने शब्दांमध्ये प्राण फुंकले जातात. कागदाला, पेनला जिवंत माणसाचा स्पर्श होणे, जे बोलणे शक्य नाही ते पत्रात लिहिणे, त्यातून डोकावणारी मनस्थिती, संस्कार ,व्यक्तिमत्व, स्वभाव… हे सगळे विलक्षण जिवंत व चैतन्यपूर्ण असते.  पत्राची वाट पाहण्यात  हुरहुर, उत्कंठा, अधीरता याबरोबरच संयम सुद्धा असतो. प्रत्येक टप्प्यावर जिवंतपणाच्या स्पर्शाची खूण  बाळगत.. अखेर पोस्टमनच्या हातून पत्र आपल्याला मिळते. त्यामुळे या जिवंत संदेशवहनाची तुलना कोणत्याही माध्यमाशी होऊ शकत नाही. 

    पत्रामधील हस्ताक्षर हे आठवण, 

प्रेम ,मनाची घालमेल, मनातील आंदोलने अशा अनेक बाजू स्पष्ट करीत असते. हस्ताक्षर ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असल्याने पत्र वाचताना लिहिणारी व्यक्ती आपल्यासमोर साकार होत असते. पत्रलेखनामुळे  विचार, भावना, बुद्धी, भाषाशैली, हस्ताक्षर, शब्दसंपदा.. या  अंगभूत कौशल्यांना वाव मिळत असतो. कागदावर हाताने, पेनाच्या मदतीने लिहिणे ही एक संपूर्ण वैयक्तिक क्रिया आहे जी एकाग्रता वाढवते. ही समाधान देणारी, स्वनिर्मितीची एक कृती असते ज्याची तुलना कीबोर्डवर लिहिलेल्या लेखनाशी होऊ शकत नाही. पत्र लिहिण्यासाठी अक्षर ओळख व कागद पेन एवढीच सामग्री लागते व तिच्या मदतीने जगातली कोणतीही व्यक्ति पत्र लिहू शकते.पत्र डिलीट होत नाहीत. इकडची पत्रे तिकडे फॉरवर्ड करण्याची सोय पत्रव्यवहारात नाही. ही सर्वात मोठी ताकद पत्रलेखनात आहे . वैयक्तिक पत्रातही नवनिर्मिती सर्जनशीलता असते आणि साहित्यिक मूल्य नसले तरी त्यात वाचणाऱ्याचा दिवस उजळून टाकण्याची क्षमता  असते. 

      वैद्यकीय दृष्टिकोनातून पत्रलेखन ही एक उपचार पद्धती आहे. पत्र लिहिण्याच्या विचारानेच व्यक्तिला उत्साह वाटू लागतो. मनात सकारात्मकता  निर्माण होते. मेंदूच्या पेशी उत्तेजित होतात. कागद  पेनाचा स्पर्श हाताला होताक्षणी विचार व भावनांच्या निर्मितीला चालना मिळते. या भावनांना शब्दरूप देण्यासाठी बुद्धी कार्यान्वित होते. प्रत्यक्ष लिखाण करताना बोटे, हात, पाठीचा कणा, मान, डोळे व मेंदू यांचा समन्वय होऊन एकाग्रता साधली जाते.  ही संपूर्ण प्रक्रिया शरीराला आणि मनाला एक सकारात्मक ऊर्जा देते. सेन्सरी आणि मोटाॅर या दोन्हीही मज्जासंस्थेला सक्रियता देण्यासाठी पत्रलेखन ही एक उपचार पद्धती  आहे ज्याला ‘मेंटल वर्कआउट’ म्हणतात. डिप्रेशन व एकाकीपणा पत्रलेखनामुळे कमी होतो. मनात साचलेले विचार कागदावर उतरवले की उदासीनता कमी होते. थोडक्यात काय.. वैयक्तिक, सामाजिक, वैद्यकीय,  व्यावसायिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रांना पत्रव्यवहाराने समृद्ध केले आहे.

      डिजिटल माध्यमाच्या आहारी जाऊन आम्ही आज पत्रव्यवहार बंद केलेला आहे. परंतु त्यामुळे पत्रव्यवहाराचे महत्त्व कमी होत नाही. म्हणूनच ऑस्ट्रेलियन लेखक रिचर्ड सिंपकीन याने २०१४ पासून, एक सप्टेंबर हा जागतिक पत्रलेखन दिवस साजरा करण्याचे सुरू केले आहे. तसेच पत्रलेखनाला  चालना देण्यासाठी, भारतीय डाक विभागातर्फे दरवर्षी पत्रलेखन स्पर्धा आयोजित होत असते. ‘ढाई आखर’ हे या स्पर्धेचे नाव असून,  त्यात अठरा वर्षाखालील व अठरा वर्षावरील असे दोन वयोगट केले आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असते. विशेषतः शालेय मुलांमध्ये पत्र लेखनाला उत्तेजन देण्यासाठी, शाळांमधून हा उपक्रम राबवला जातो. दरवर्षी एक अभिनव विषय या पत्रलेखनासाठी दिला जातो.

      आज तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन मध्यमवयीन पिढी स्वतः हाताने लिहिण्याचे विसरत चालली आहे व पत्रलेखन तर ‘आउटडेटेड’ समजले जाते.हस्ताक्षर व पत्रलेखन ही आपली कौशल्ये आहेत.यांचा वापर केला नाही तर हे कौशल्य अस्तंगत  होईल.आज अनेक मध्यमवयीन लोकांमध्ये लिहिण्याचा सराव नसल्याने ते लिहू शकत नाहीत - हे किती गंभीर आणि भयावह आहे.डिजीटल युगाचा वेग, संदेशवहनातील सहजता,क्षणात जगभरात पोहचण्याचे सामर्थ्य… हे सर्व मान्य आहे.काळाची ती गरज आहे.पण त्यासाठी पत्रव्यवहार  या समृद्ध , लोकप्रिय, सांस्कृतिक, दीर्घकालीन संदेशवहनाचा बळी देण्याची काहीच गरज नाही.पुन्हा मी इंदिरा संतांच्या कवितेचाच आधार घेते.

“‘नको पाठवू अक्षरातुनि,शब्दांमधले गहिरे स्पंदन,

कागदातुनि  नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण, 

नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, तू हट्टी पण, 

पाठविसी ते सगळे सगळे, पहिल्या ओळी मध्येच मिळते. 

पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते .” 

अशी शब्दातीत संवेदना मेसेज मधून मिळेल का हो?

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

९४२२९३९५१०

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...