Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts
Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts

Sunday, February 6, 2022

आलोक - एक अस्वस्थ करणारा अनुभव



     २०१६ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'आलोक' हा आसाराम लोमटे लिखित कथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. २०१०  मध्ये प्रकाशित झालेल्या या कथासंग्रहाची पाचवी आवृत्ती मी वाचली. खरंतर बऱ्याच उशिरा माझ्या हाती हे पुस्तक आलं .अनेक वाचकांचं हे पुस्तक वाचून झालं असेल आणि त्यावर प्रतिक्रियाही देऊन झाल्या असतील.उत्तम कलाकृतीचा आस्वाद घेतल्यावर त्याबद्दल  दुसर्‍यांना सांगण्याची ऊर्मी निर्माण होणं हा मानवी स्वभाव  आहे आणि याच उद्देशानं मी हातात पेन धरलं.

       मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एक एक कथा वाचताना एखादा चित्रपट डोळ्यासमोरून सरकतो आहे, असा अनुभव आला- इतकं जिवंत आणि प्रत्ययकारी हे लिखाण आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्तरांवर माणसांचं होणारं शोषण, शोषित व्यक्तिंचा जगण्यासाठीचा संघर्ष,  शोषितांच्या मनातले सल,आणि त्यांच्या मनाच्या तळाचा शोध - -हे सर्वसाधारण सूत्र सगळ्या कथांचं आहे.

       पांढरपेशा, वातानुकूलित, नागरी समस्यांमध्ये गुरफटून स्वतःच्या अडचणींचं भांडवल करणाऱ्या शहरी वाचकांचा सुरक्षित कोष टराटरा फाडणाऱ्या या कथा आहेत. लेखकाची ग्रामीण पार्श्वभूमी, पत्रकार असल्यामुळे विविध अनुभवांची शिदोरी, घटना- प्रसंग टिपणारं संवेदनशील मन, त्यातून मानवी स्वभावाचं केलेलं चिंतन, अन्याय- शोषण यामुळे मनात साचलेली खदखद आणि अस्वस्थता....... आणि हे व्यक्त करण्याची  प्रबळ ऊर्मी यांचं बेमालूम रसायन म्हणजे हे पुस्तक.  या सगळ्या अस्सल अनुभवांना मांडणारी ..'भाषा'- हे या पुस्तकाचं बलस्थान आहे.

    शहरी सुरक्षित चौकटीत जगणाऱ्यांच्या कल्पनेपलीकडचं एक ग्रामीण जीवन या कथांमधून समोर येतं. ते केवळ समोरच येत नाही तर थेट मेंदूवर हल्ला करतं, हृदयात कळ आणतं. नेहमीची गुळगुळीत घासलेली, मनावरून ओघळून जाणारी भाषा यात नाही. तर अस्सल ग्रामीण प्रतिमा, प्रतीकं आणि लोककथांमधून रुजलेली, मुरलेली शब्दसंपदा आपल्या मनात रुतत जाते.

 - 'आभाळातून कणी कोंडा गळत राहावा तशी पावसाची भुरभुर'.......

 - 'हे सरकार शेळीसारखं आस्तंय. कासेत बुक्क्या  हाणल्याशिवाय शेळी पान्हा सोडत नाही'....

 - 'कापसाचा कोकडा पडावा तसे सगळ्यांचे चेहरे झालेले'.....

  - 'आडरानात अब्रू लुटलेल्या बाई सारखं पोरकेपण भवती दाटून आलं'.....

 - 'चांगल्या वाड्याला घूस लागावी आणि तिनं रोज उकीर आणून बाहेर टाकावा तसं त्यांच्या टकूर्‍यात झालं'.....

- 'शंका - कुशंका -अंदाज - आडाखे अशा सगळ्या गोष्टींनी टम्म फुगलेली रात्र एखाद्या बुडून वर आलेल्या प्रेतासारखी तरंगायला लागली '........

 अशी थेट मेंदूवर धडका देणारी भाषा वाचतांना वाचक कथांमधे गुंतत जातो.

     'चिरेबंद' कथेचा नायक काही काळासाठी, गावी आजोबांच्या वाड्यात आलेला आहे. आजोबा आता हयात नाहीत. एकुलता एक वारस असूनही, नायकाला वाड्याबद्दल कणभरही आस्था, ओल जाणवत नाही. कारण आजोबांनी लोकांचे शोषण करून ही वास्तू उभारली आहे- हा सल त्याच्या मनात आहे. एकीकडे ही बोच असल्यामुळे स्वतःचा हक्क नाकारणारा नातू आणि दुसरीकडे या प्रचंड वाड्यात एकट्या राहणाऱ्या आजीची जगण्याची असोशी याचा धांडोळा या कथेत लेखकाने घेतला आहे.नातवाची अनास्था आणि आजीचा चिवटपणा रंगवणारी ही कथा संथपणे अंगावर चाल करुन येते.

     गावात शेती करणाऱ्या मोठ्या भावात आणि शहरात नोकरी करणार्‍या लहान भावात वाढत जाणारं अंतर .......पण त्याच वेळी मनाच्या तळात दाबून ठेवलेलं प्रेम- यातील अगतिकतेचं वर्णन आतड्याला पीळ पाडणारं आहे. पुढे मोठ्या भावाच्या आत्महत्येमुळे, लहान भावात निर्माण झालेला अपराधी भाव आणि विधवा वहिनीचा जगण्याचा चिवट संघर्ष -  'ओझं' या कथेतून आपल्यासमोर येतो.

    आप्पांसारख्या निरलस आणि प्रामाणिक समाजसेवका बरोबर काम करित असताना, 'खुंदळण' या कथेचा नायक, आर्थिक गरजेसाठी, नाइलाजास्तव आप्पांचा हात सोडून, आमदारांच्या पक्षात दाखल होतो. पण क्षणोक्षणी बोचणारा अपराधी भाव त्याला आतून कुरतडत असतो. ही त्याची कुतरओढ अत्यंत परिणामकारकतेने लेखकाने साकारली आहे.

        'कुभांड' कथेतली साधीसुधी अंगणवाडीत खिचडी शिजवणारी गवळण बाई. तिचं लहान लेकरु खेळता खेळता माली पाटलांच्या बागेतील  मोसंब्या तोडतं. यावरून माली पाटील त्या मुलाला मारतात आणि गवळण बाईला वाटेल तसं बोलतात. ही संधी साधून माली पाटलांच्या विरोधात  असणारे सरपंच तिला पोलिसात तक्रार नोंदवायला सांगतात. खरं युद्ध असतं माली पाटील आणि सरपंच यांचं. पण भरडली जाते गवळण बाई. तिच्या सामान्य आयुष्यात उलथापालथ होऊन तिचं जगणं कठीण होतं. फुकट ओढवून घेतलेल्या संकटाचं ओझं घेऊन जगणारी गवळणबाई वाचकालाही अस्वस्थ करते.

      'जीत' या कथेतली हरी ची विधवा पत्नी, अकाली वैधव्याचा धक्का सहन करून आपल्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करुन, जगण्याचा संघर्ष करण्यास सिद्ध झालीय पण पण गावातले राजकारणी तिला निवडणूक लढविण्यास बाध्य करतात. काळ्या आईकडे दुर्लक्ष करून दारोदार मतं मागताना होणारी तिची घुसमट वाचकांना सुन्न करते. निकालाच्या दिवशी ती सारं सोडून शेतात धाव घेते. भरलेली कपाशीची बोंडं बघून ती इतकी हरखून जाते की निवडणुकीतला विजयही तिला कवडीमोल वाटतो. सत्तेसाठी निष्पाप जनतेच्या  शोषणाची ही कथा व्यथित करुन टाकणारी आहे.

     'वळण' या कथेत लहानगी प्रयाग शाळेतून घरी येताना एका  हत्येची घटना बघते. तिचं चिमुकलं भावविश्व या घटनेनं विस्कटून जातं. खरी साक्ष दिल्याने, तिच्यावर येणारा सत्ताधाऱ्यांचा दबाव तिच्या शिकण्याच्या स्वप्नालाही सुरुंग लावू लागतो. तिच्या इवलाश्या जगण्यातली उलथापालथ वाचताना मस्तकात संतापाची तिडीक उठते.

     ही सगळी ग्रामीण भागातली 'नाही रे' गटातली अतिसामान्य माणसं. जगण्यातील संघर्षाला, ती त्यांच्या पद्धतीने सामोरी जात आहेत. त्यांना शिक्षण नाही. भौतिक समृद्धी नाही. सोयी-सुविधा नाहीत. पण त्यांच्यात असणारा दुःखाचा सहज स्वीकार, जगण्याचा चिवटपणा, पाय रोवून उभी राहण्याची शक्ती, आणि याबरोबरच त्यांच्यात खोलवर असणारा अगम्य ऊर्जास्रोत ....

या सगळ्यांचं मूळ कशात आहे याचा शोध लेखकाने घेतला आहे. मनाचा तळ ढवळून टाकणाऱ्या, वाचकाला सुरक्षित चौकटीतून बाहेर ओढून, ग्रामीण जीवनातील गुंते दाखवणाऱ्या, मेंदू मनावरील- शहरी- चकचकीत- गुळगुळीत समजुतींची ढापणं ओरबाडून काढणाऱ्या या कथा आहेत. आपल्या भावविश्वाच्या चौकटी विस्तारून  समाजभानाच्या कक्षा रुंदावणार्‍या या कथा आहेत.

       याशिवाय या पुस्तकाचा कळस म्हणजे यातील 'परिशिष्ट'. प्रत्येक लेखकानं ते वाचलंच पाहिजे असं. हे परिशिष्ट म्हणजे लेखकांसाठी एक वस्तुपाठच आहे.यात  लेखकानं आपली लेखन प्रक्रिया आणि लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

   " सत्ता, संपत्ती यांची अविवेकी ताकत ज्यांचे जगणे मुळापासून उखडायला निघालेली आहे आणि जी माणसे सामाजिक, आर्थिक विषमतेत, समाजाच्या तळाशी आहेत... अशी सर्व माणसे मला माझ्या आस्थेच्या  परिघात जवळची वाटतात. त्यांच्या जगण्यातले बारकावे ,दुर्लक्षित कंगोरे, त्यांच्या जगण्यातील हर्ष- खेदा च्या जागा शब्दातून व्यक्त करण्याची मला गरज वाटते .त्यांच्या जगण्याची आच माझ्या पर्यंत पोचते आणि तीच लिहायला भाग पाडते".- हा एक लहानसा परिच्छेद लेखकातल्या  'माणसाची' उंची दाखवणारा आहे. 

   "मस्तकातला सगळा ऐवज घेऊन लेखक जेव्हा लिहायला बसतो तेव्हा केवळ अक्षरेच झरतात असे नाही तर त्याच्या उरातूनही काही झरत असते, पाझरत असते". लेखकाचे हे वाक्य 'आलोक'च्या प्रत्येक ओळीगणिक जाणवत राहतं.

     परिशिष्ट वाचल्यानंतर परत नव्याने कथा वाचण्याचा मोह आवरला नाही. आणि लेखकाची भूमिका समजल्यावर कथेत अधिकाधिक खोल शिरण्याचा अनुभव  आला. हा अनुभव सगळ्या वाचकांनाही यावा यासाठीच हा लेखप्रपंच.


#आलोक

#आसारामलोमटे

#साहित्यअकादमीपुरस्कार

Friday, August 20, 2021

'शेल्फी' - एक अदभुत सफर...



       पुस्तक खरेदी करताना सर्वसामान्य  वाचकांचे निकष काय असतात? आवडता लेखक, आवडता विषय, आवडतं प्रकाशन किंवा खूप गाजलेलं वा बेस्टसेलर- यापैकी कोणतेही.

 पण यापैकी काहीही नसताना मी गणेश मतकरींचं  'शेल्फी' विकत घेतलं. गणेश मतकरींचं सिनेमाबद्दलचं लेखन अधून मधून माझ्या वाचनात आलं आहे. 'आवडता लेखक ' होण्याइतपत मी त्यांचं फारसं वाचलेलंच नाहीय.मात्र  माझ्या आवडत्या लेखकाचे- रत्नाकर मतकरी यांचे ते चिरंजीव आहेत हे मला माहीत आहे.   

        मागील आठवड्यात पुस्तकाच्या दुकानात गेले असता 'शेल्फी' नं  माझं लक्ष वेधून घेतलं - ते त्याच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे.माझी पुस्तक खरेदी सुरु असतांना, 'शेल्फी' मला  वारंवार खुणावत होतं. शेवटी  ते पुस्तक चाळण्याचा मोह मला आवरला नाहीच.

 ' मुंबई मराठी संग्रहालय,वसंत वाचनालय, ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी- माझ्यात वाचनाची शिस्त तयार करणाऱ्या या वाचनालयांना'..... ही अफलातून अर्पणपत्रिका वाचतानाच, हे पुस्तक इंटरेस्टिंग असणार असा माझ्या मेंदूने इशारा दिला. 

   चाळताना पुस्तकाची 'जरा हटके' आणि वेगळ्या धाटणीची मांडणी नजरेत भरली. अजून पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे - दर महिन्यात खरेदी केलेली पुस्तकं आणि वाचलेली पुस्तकं यांच्या सूचीनं प्रत्येक लेखाची सुरुवात केलेली. आता तर मेंदूनं     रीतसर नोंदच करुन टाकली पुस्तकाची.पानं पलटवत असतांना इंग्रजी लेखक आणि इंग्रजी  साहित्याशी संबंधित लेख दिसले.या लेखांमधे काय असेल,ही उत्सुकता निर्माण झाली. आणि लगेच मेंदूने  पुस्तक  खरेदी करायची आज्ञाच दिली.

'पण हे संपूर्ण इंग्रजी साहित्या संबंधी आहे'.... मी बचावात्मक  पवित्रा घेतला.

 'काही हरकत नाही'- आता मेंदूचीच आज्ञा- - मी 'शेल्फी' चक्क  विकत घेतलं. 

        'शेल्फी' बद्दल अनेक वाचकांचं असंच होत असावं. हातात घेऊन चाळता चाळताच, वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो आणि मग प्रेमात सगळं क्षम्य असल्यामुळे, 'इंग्रजी साहित्य ना?' वाचून तर बघू - - असं होतं.

      मला वाचनाचा छंद आहे. माझ्या संग्रही अनेक पुस्तकं आहेत.  हा आपल्या सगळ्यांचा एक अभिमानाचा विषय असतो. 'शेल्फी' वाचताना हा अभिमान झरझर गळून जातो. फेब्रुवारी 2016 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत लेखकानं तब्बल  237 पुस्तकं विकत घेतली आहेत. वाचलेली पुस्तकं यापेक्षा वेगळी  आहेत आणि ती 90 आहेत. अबब......... 

      या 90 इंग्रजी पुस्तकांचं-  बेस्टसेलर, कार्टुन्स ,रहस्य, भय, चित्रविचित्र, कॉमिक्स, कल्पना, कविता, चित्रपट, समीक्षा, विनोद ,इत्यादी प्रकारात वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या 90 इंग्रजी पुस्तकांची, त्यांच्या कथानकाची, त्यांच्या गुण दोष वैशिष्ट्यांची माहिती देत असतानाच मतकरी त्या पुस्तकांच्या लेखकांबद्दलही वाचकाला शहाणं करुन सोडतात.पुस्तक लिहिण्यामागची लेखकाची भूमिका,त्यामागच्या काही प्रेरणा,एखादी कहाणी,त्यांची इतर पुस्तकं अशी भरपूर माहिती आपल्या समोर येते आणि ती सुद्धा अत्यंत प्रांजळ आणि मनोरंजक शैलीत. त्यामुळे माझ्यासारख्या मराठी वाचकाला, कधीही परिचित नसणाऱ्या लेखकांबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल वाचताना रस निर्माण होऊ लागतो. माझ्यासाठी हे पुस्तक म्हणजे इंग्रजी साहित्यातली एक अद्भुत आणि अचंबित करणारी सफर होती. केवळ कुतूहलापोटी एका नवीन जगात पाऊल टाकावं आणि विस्मित होऊन पुढे पुढे चालत जावं असं माझं झालं.    '                        

      ' हारुकी मुराकामी','एच पी लवक्राफ्ट', 'स्टीवन किंग', 'आंद्रे वायदा','आशिष राजाध्यक्ष', 'डॕन ब्राऊन', 'सेम्पे'....... कोणाकोणाचा उल्लेख करावा? अशा अनेक लेखकांची, त्यांच्या साहित्याची,वैशिष्ट्याची एक-एक झलक या पुस्तकात वाचकाला मिळत जाते आणि सर्वस्वी अपरिचित अशा इंग्रजी साहित्याच्या दुनियेत वाचक हरवून जातो,गुंतून जातो.

    'गॉडफादर' या कादंबरीचं चित्रपटात रूपांतर करतानाचा दिग्दर्शक - फ्रान्सिस कपोला- (एरवी ही नाव कधी कळली असती?) यांनी 'सिनॉप्सिस', 'द टाईम्स','इमेजरी अँड टोन', 'द पिटफॉल्स','द कोअर'- या पाच घटकांमधे  केलेला  दिग्दर्शनाचा सखोल अभ्यास  वाचताना  त्यांना सलाम करावासा वाटतो. 'ग्राफिक नॉव्हेल्स' या साहित्य प्रकाराची वाचकाला यात ओळख होते. इंग्रजी वाचायची इच्छा असणारे - पण नक्की काय वाचायचं, या संभ्रमात पडणाऱ्यांना- 'अँथनी डोअर' यांची 'आॕल द लाईट वी  कॕनॉट सी'- या पुस्तकाने श्रीगणेशा करावा असा लेखक सल्ला देतात. 

        या इंग्रजी साहित्य सफरीबरोबरच फोर्टमधल्या  'वेवर्ड अँड वाईज', 'किताबखाना', बंगलोर मधील 'ब्लॉसम बुक हाऊस', 'युएस मधील 'कॅपिटल हिल बुक्स' आणि 'कॉमिक बुक्स स्टोअर्स' मध्ये ही लेखक आपल्याला फिरवून आणतात. कॉमिक बुक स्टोअर्स मध्ये मे महिन्यात पुस्तकावर मिळणाऱ्या सवलती बघून आपले डोळे विस्फारतात.                     

              228 पानांच्या या पुस्तकाबद्दल आणखीही बरंच काही लिहिण्यासारखं आहे पण ती गंमत वाचकांनीच अनुभवावी.                            

        या पुस्तकाचं बघताक्षणी नजरेत भरणारं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक मुखपृष्ठ, आगळीवेगळी अर्पणपत्रिका, जरा हटके असलेली पुस्तकाची रचना आणि बांधणी.यामुळे वाचक हे पुस्तक हातात घेऊन चाळायला प्रवृत्त होतो. नंतर विकत घेतलेल्या आणि वाचलेल्या पुस्तकांची यादी बघूनच लेखकाबद्दल विलक्षण आदर निर्माण होतो - हे या पुस्तकाचं बलस्थान. प्रथमदर्मशनी प्रेमात पडल्यामुळे, इंग्रजी साहित्य असलेलं हे पुस्तक, 'वाचू का नको'- या संभ्रमात असणारा वाचक, 'एकदा वाचून तर बघू'- या निर्णयाप्रत येतो. हे या पुस्तकाचं यश आहे. 

नित्यनेमाने आणि  आवडीने इंग्रजी साहित्य वाचणार्यांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे.

        ज्यांना इंग्रजी साहित्य वाचण्याची इच्छा आहे .पण काय वाचावं हे समजत नाही त्यांच्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे गुरुकिल्ली ठरेल.     

      मराठी वाचक- जे फक्त 'बेस्टसेलर' ते ही - 'अनुवादित' वाचतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अलिबाबाची गुहा ठरेल. इंग्रजी साहित्यातलं अद्भुत विश्व सहज सुलभ शैलीत त्यांच्यासमोर साकारल्या मुळे भविष्यात त्यांचीही पावलं या दिशेने वळू शकतील.मुळात, इंग्रजी साहित्याबद्दलचं एक अनामिक दडपण घेऊन वावरणारा मराठी वाचक - 'शेल्फी'मुळे जरा आपल्या 'मराठीपणाच्या' कोषातून बाहेर येईल असं वाटतं.

 इंग्रजी वाचन म्हणजे ....??  असं म्हणणाऱ्या मला सुद्धा 'शेल्फी' मधल्या काही लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावं - माझ्या 'प्रस्तावित वाचन यादीत' नोंद करा करून ठेवावीशी वाटली.- - - यापेक्षा  अजून काही सांगायला हवं?



#शेल्फी

#गणेशमतकरी

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...