Showing posts with label वैचारिक. Show all posts
Showing posts with label वैचारिक. Show all posts

Monday, November 24, 2025

वीण दोघातली ही तुटेना

 वीण दोघातली ही तुटेना


          ते दिवसच वेगळे होते. ७८ ते ८२ या कालावधीतले. नागपूरला रहात असल्यामुळे पुण्या मुंबईला दिसणाऱ्या टीव्हीचं खूप अप्रूप होतं. घरात बसल्या बसल्या टीव्हीवर कार्यक्रम, सिनेमा बघणं... ही सुखाची परमावधी वाटायची तेव्हा. त्या काळात एकदा पुण्याला मावशीकडे गेल्यावर शेजा-यांच्या टीव्हीवर दाराच्या फटीतून ( हो. फटीतूनच. पुणंच ते. नशीब. माझ्या तोंडावर आपटून दार बंद झालं नाही. (कारण मंडळी 

'गज-यात' मग्न होती.) 'गजरा' बघितल्यावर लंडन च्या अल्बर्ट हॉल मध्ये कार्यक्रम बघितल्याचा 'फील' आला होता. नागपूरात अनेक दिवस तो अनुभव सांगतांना मला शब्द पुरत नव्हते.

                       घरी टीव्ही आणूया असं म्हणण्याची तर हिम्मतच नव्हती. 'आधी अभ्यासात दिवे लावा. काय करायचाय घरात तो इडियट बॉक्स?' असे वाग्बाण कोण झेलणार हो? महाराष्ट्रातील तमाम मराठी मध्यमवर्गीय घरातल्या परंपरेनुसार, नवीन कोणत्याही तंत्रज्ञानाला सुरुवातीला विरोध करणं म्हणजे- - शास्त्र असतं ते. याशिवाय मॅट्रिक ची परीक्षा असेल तर विरोधाचे एक सबळ कारण घरच्यांच्या हातात असायचं. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे मामाकडे टीव्ही घेतला. मग काय, महिन्यातून एक दोन वेळा टीव्ही बघण्याचं सुख मिळू लागलं. एका सुदिनी मामाने घरचं कार्य असल्यासारखं सगळ्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं. त्या रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर 'आनंद' सिनेमा दाखवणार होते. आता संध्याकाळचा सिनेमा - संपेस्तोवर रात्रीचे नऊ वाजणार. मामाचं घर दूर. त्यावेळी घरी गाड्या, बाईक्स असली चैन नव्हती. मग काय, मुक्कामालाच जायचं. बिचाऱ्या मामीने पंधरा जणांचा स्वयंपाक आधीच रांधून ठेवला. आम्ही मामाकडे पोचलो तर ' हाऊसफुल्ल' चा बोर्ड लावायचा का, या चिंतेत मामा होता. हॉलमध्ये सोफा, खुर्च्या, स्टूल, टीपाॅय, सतरंज्या, आसनं घेऊन शेजारची मंडळी आधीच येऊन बसली होती. आम्ही गेल्यावर काही जण खिडकीत, काही जिन्यात काही डायनिंग टेबलवर आसनस्थ झाले. आता या मंडळींसाठी शेजारधर्म म्हणून चहा - पाणी पण ओघानं आलंच. सिनेमा सुरू झाल्यावर थोड्यावेळानं मुसमुसण्याचा आवाज येऊ लागला. नंतर नाकाचा 'सू सू' आवाज आणि त्यानंतर  'हुंदके' सुरू झाले. समस्त माता भगिनींचं सामूहिक रुदन ऐकून पुरुषवर्ग अवघडून गेला . त्यात मध्येच कुणाला पाणी तर कुणाला' घाईची'_ हे सतत सुरू होतं. आम्ही सगळे आनंद सिनेमा पाहून धो धो रडलो पण मामा मामी मात्र प्रेक्षकांची उस्तवार करता करता रडकुंडीला आले. तेव्हा पासून मामाने कानाला खडा लावला.

                आणि माझ्या मोठ्या बहिणी कडची तर वेगळीच गंमत. ती खानदेशात एका लहानशा खेड्यात रहात होती कारण भावजी डॉक्टर होते. त्या खेड्यात ते एकुलते एक डॉक्टर असल्याने समस्त जनता त्यांची पेशंट होती. खाली दवाखाना आणि वर बंगला असल्यामुळे घर - दवाखाना एकच होतं - सार्वजनिक. मुंबईत टीव्ही आल्याबरोबर लगेच आमचे भावजीही टीव्ही घेऊन आले. गावात सिग्नलच नव्हता त्यामुळे टीव्हीवर फक्त मुंग्या. गावकऱ्यांना टीव्ही हा प्रकारच माहित नसल्याने दादांचे( भावजींचे) आणि पेशंटचे खानदेशी भाषेत अत्यंत मनोरंजक संवाद होत.

'दादा, कोंची मिशीन आन्ली व्ह तुम्हीनं?'-  बाई.

'टीव्ही आहे तो. त्याच्या मध्ये शिनिमा, गाने आनि बातम्या बी दिसता' - दादा.

'आह्या माय, आमाले बी पाहता येतीन का?' - बाई

'वा. वा. काहून नी पाहता येनार?'- दादा.

'माय वं. याच्यात तं मुंग्या दिसू रायल्या. मुंग्याईंचा शिनिमा हाय का?'- बाई

'नाई न. वं. मले तं येक झाड दिसलं आता.'- दुसरी बाई.

'हाव बयना, मले तर आता ढगं दिसू राह्यले माय. लय भारी हाय  दादा तुमची टीवी. पन एच्यात आवाज नी का? '- बाई

'आता बाई, झाड, ढग आन मुंगी बोलते का? जहा बाया मानसं येतीन तहा आवाज बी यीन '- दादा.

'काय जादू हाय माय बयना.'- बाई

अशा रीतीने त्या  मुंग्या असलेल्या टीव्हीत समस्त गावकरी झाडं, ढग, पक्षी, प्राणी, घर, पाऊस बघत तासभर सहज घालवीत आणि 'मले काय दिसलं' यावर चर्चा करीत.

          असो. हे सगळं आठवणयाचं कारण म्हणजे, २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिन आहे. १९९६ साली संयुक्त राष्ट्र संघाने पहिला जागतिक दूरदर्शन मंच आयोजित केला होता. तेव्हापासून २१ नोव्हेंबर हा दिवस दूरचित्रवाणी या माध्यमाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी, देशातील शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी, तसंच शिक्षण, मनोरंजन, माहिती, बातम्या यासाठी दूरचित्रवाणी  या माध्यमाची भूमिका अधिक प्रगत सशक्त करण्यासाठी हा विशिष्ठ दिवस नेमून दिला आहे. जगभरातील पत्रकार, विद्वान, लेखक यांनी या भूमिकेवर २१ नोव्हेंबर रोजी चर्चा करणे, बदल करणे, अद्ययावत करणे अपेक्षित आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि संवाद ही चतु:सूत्री ठरवून  भारतात १५ सप्टेंबर १९५९ रोजी, नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवनात तात्पुरत्या उभारलेल्या स्टुडिओतून दूरदर्शवरून पहिले प्रसारण करण्यात आले. पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच टेलिव्हिजनसाठी ‘दूरदर्शन’ असे  नाव सुचवले.यासाठी दूरदर्शनवर काम करण्यापूर्वी,  त्यांनी बीबीसीमध्ये एक वर्षासाठी प्रशिक्षण घेतले होते आणि फ्रान्स व पश्चिम जर्मनीमध्येही यासंबंधी काम केले होते. पु.लं. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी दूरदर्शनवर एक तासाचा पहिला कार्यक्रम तयार केला होता. त्यात पपेट शो, वैजयंतीमाला यांचे नृत्य, भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती अशा लोकप्रबोधन आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधणाऱ्या घटकांचा अंतर्भाव होता. प्रायोगिक तत्त्वावरचे हे प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवस दिल्ली परिसरातच पाहता येत होते.

           मुंबईत १९७२ मध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झाले.  दूरदर्शनच्या आशियाई स्पर्धेतील सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे, असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी श्री भटकर यांच्यावर सोपविली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम पुढे वाढतंच गेलं. त्यावेळी दूरदर्शनवर हम लोग, बुनियाद, चित्रहार, सुरभी या मालिका फार प्रसिध्द होत्या. मराठीची फक्त सह्याद्री हीच वाहिनी होती. आभाळमाया, वादळवाट, दामिनी,गजरा असे दर्जेदार कार्यक्रम त्यावेळी होत असत.  पुढे वेगवेगळे चॅनेल्स सुरू झाल्यावर तर टीव्हीने कातच टाकली. चोवीस तास... अनेक चॅनेल्स... माहिती, बातम्या, मनोरंजन, क्रीडा, ज्ञान काय नव्हतं त्या चौकोनी पडद्यावर? रामायण, महाभारत, क्यूं की सास... यांनी तर विक्रम केले. , हे कार्यक्रम सुरू असतांना रस्त्यावर कर्फ्यू लागल्याप्रमाणे शुकशुकाट असे. हळूहळू या टीव्हीने सगळ्यांच्या घरात एका अति महत्वाच्या घटकाचे स्थान मिळवले

             पण मोबाईल आला. त्या मागून इंटरनेट, स्मार्ट फोन आले. टीव्हीनं पण आपलं  'धूड' बदलून स्मार्ट, स्लीम, एलईडी टीव्हीचं रूप घेतलं. आज व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम फेसबुक, ओटीटी च्या  लोकप्रियतेमुळे टीव्हीचं महत्व थोडं कमी झालंय पण तरीसुध्दा टीव्हीची गरज असतेच. प्रत्येक माध्यमाची ठराविक वैशिष्ठ्यं, काही फायदे, काही तोटे असतातच. आपण आपल्या टीव्हीवर काय बघायचं, कितीवेळ बघायचं, नेमका कोणता हेतू मनात ठेवून बघायचं हे आपल्याच हाती आहे. मनोरंजन? शिक्षण? बातम्या? जगाची माहिती? की टाईम पास? या माध्यमाचा योग्य तो फायदा करून घेण्याची जबाबदारी आपलीच आहे. कारण आपण एकटे नसतो तर सोबत कुटुंबही असतं.  माध्यमाला वेगवेगळ्या चाळण्या लावण्याचा संस्कार करणं हे आज विलक्षण  गरजेचं आहे.

            पण माध्यमाची स्वतः ची ही काही जबाबदारी असेलच ना? आज संपूर्ण विश्वात कुणीही, कुठेही, केव्हाही हे माध्यम बघू शकत असेल तर माध्यमाची नक्कीच जबाबदारी वाढते. आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मराठी वाहिन्या या आपल्या महाराष्ट्राचं चित्र योग्य स्वरूपात मांडतात का?

       उत्तर दुर्दैवानं 'नाहीं' हेच आहे. मराठी वाहिनी वरिल कार्यक्रमांचा दर्जा, कल्पकता, वैविध्य, याविषयी बोलण्यासारखी परिस्थिती आहे आज?  तंत्रज्ञानानी जगण्यावर कितीही आक्रमण केलं तरी आजही कुटुंबाचं महत्व, कौटुंबिक मूल्य आणि कौटुंबिक संस्कार यांची सर कुणालाच नाही. अशा कुटुंबाची नेमकी कोणती प्रतिमा आपल्या वाहिन्या निर्माण करित आहेत? अनेक वर्षांपासून एकच साचा. मोठ्ठं श्रीमंत कुटुंब. त्यात दोन गट. एक बुद्धिमान, कर्तृत्ववान, मनमिळावू प्रेमळ गट आणि दुसरा कपटी, खलनायकी गट, ज्यात  स्त्रियांचं वर्चस्व.(असं का?) या कुटुंबावर एकामागून एक संकटं येतच राहतात.( का?) या संकटांच्या वणव्यात  खलनायकी गट कायम तेलाची धार ओतत असतो. घरातल्यांचं हे कुकर्तृत्व या बुद्धिमान(?) गटाला कधीच लक्षात येत नाही.( फारच बाई मठ्ठ). बरं या कर्तृत्ववान, बुद्धीमान गटाचं कौशल्य सिध्द होईल असा एकही प्रसंग मालिकेत नसतो. म्हणजे खरं तर तो गटही 'ढ' च असतो. खलनायकी गट चिकाटीने पदार्थात मीठ ओतणं, दुधाच्या पेल्यात झोपेच्या गोळ्या टाकणं, महत्वाचं पत्र लपवणं, कपड्यांवर डाग पाडणं, रांगोळी विस्कटून टाकणं, डोक्यावर कुंडी पाडणं, फरशीवर साबणाचं पाणी पसरवणं, मेंदीत ॲसिड टाकणं,पाय धुवायला उकळतं पाणी........ अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कल्पक आणि अभिनव युक्त्या लढविण्यात  व्यस्त असतो आणि हे कुणाच्याही लक्षात येत नाही. मनमिळावू गटातली स्त्री सोशिकतेची, प्रेमळपणाची, परिसीमा गाठणारी असते. कोणत्याही वाहिनी वरील कोणतीही मालिका लावा. हेच चित्र असतं. कुणी लग्न मोडतंय, कुणी चक्क आयसीयू मध्ये जाऊन पेशंटला लावलेला ऑक्सीजन मास्क काढून फेकतंय, तर कुणी सलाईन मधे गुपचूप एखादं इंजेक्शन टाकतंय. काय हे? यामुळे वैद्यकीय क्षेत्राचं किती अवमूल्यन होतंय यांचंही भान नसावं? वैद्यकीयच नव्हे तर सगळ्याच महत्वाच्या व्यवसायांचा दर्जा इतका निकृष्ट आणि विकृत दाखवला जातो की मालिकांच्या लेखक, दिग्दर्शक, कलाकार,इ.इ. यांनी बुद्धीशी फारकत घेण्याची शपथ घेतलीय यांची खात्री होते.

            असं चित्र असतं का आपल्या कुटुंबात? आणि समाजात?इतक्या नकारात्मक व्यक्ति असतात आपल्या घरात? कसलीच नीतीमूल्यं नसणारी खलनायकी कुटुंबं दाखवून काय सिद्ध करायचंय? कधीतरी त्या कौटुंबिक अवास्तव आणि निरर्थक भांडणातून बाहेर पडणार की नाही? जगातले विषय संपले की काय? मालिकांचा आणि बुद्धीचा शून्य संबंध, कमालीचं कल्पनादारिद्र्य, दर्जाहीन लेखन, अर्थहीन संवाद, अवास्तव परिस्थिती म्हणजे मराठी वाहिन्या असं म्हटलं तरी काहीही अतिशयोक्ती होणार नाही. नामवंत म्हणवणारे कलाकारही निर्मितीमूल्यं नसणाऱ्या मालिकांमध्ये कसे काम करतात आणि सिध्दहस्त लेखकही इतकं सुमार लेखन कसं करतात हे एक कोडंच आहे. असो. जागतिक दूरचित्रवाणी दिनाच्या निमित्तानं यावर काही विचार होईल का? नाहीतर आहेच आपली 'वीण दोघातली ही तुटे ना' म्हणजे मराठी वाहिन्या आणि निर्बुद्धतेची हो.


#वीणदोघातलीहीतुटेना

#मराठीमालिका

Tuesday, November 4, 2025

शिक्षक दिनानिमित्त

 आज 'शिक्षक दिन'. या निमित्ताने पुलं आणि त्यांचे शिक्षक यांचे स्मरण करु या - -त्यांच्याच  शब्दात.

"माझ्या तथाकथित रम्य बालपणाला तडा पाडण्याच्या श्रेयाचे पहिले मानकरी 'दामले मास्तर' हे नाव धारण करणारे कर्दनकाळ होते. आपल्या ताब्यात चार घरची  पोरे ही केवळ चिंचेच्या फोकाने फोडून काढण्यासाठीच पाठविण्यात येतात, असे त्यांनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला त्याच दिवशी ठरविले असावे. दामले मास्तर चुकूनसुद्धा आजारी पडत नसत. कवितेला चाल लावणे त्यांना अजिबात मंजूर नव्हते. ते ज्या आवाजाने  "भाते पिकून पिवळी झाली" म्हणत , ते ऐकून हिरवी भाते पिवळी झाली असती. शाळेला काही लोक कोंडवाडा म्हणतात. आमचा कोंडवाडा नव्हता, कसाईखाना होता. अनेकांच्या सुऱ्या आमच्या कोवळ्या मानेवरून फिरत. त्या सामुदायिक कत्तलीत तत्कालीन आईबापे आणि पंक्तीचे पाहुणेही मोठ्या हौसेने भाग घेत. 

शहाजीचा मुलगा शिवाजी याने मावळे गोळा करून मुघलांचा काटा काढला आणि हिंदूंचे राज्य स्थापन केले एवढ्या एका वाक्यात दामले मास्तरांनी सारा इतिहास समर्पक रीतीने गुंडाळला होता. आमच्या काळात सगळ्या शाळांचे बोधचिन्ह "गप्प बसा" असे होते. माझे बालजीवन होरपळून टाकण्याची पहिली जबाबदारी दामले मास्तरांनी घेतली आणि नंतर अनेक मास्तरांनी तिला हातभार लावला. 

भाषा नामक विषयाचे 'गद्य' आणि 'पद्य' असे ठळक दोन हिस्से वाटले होते. गद्य नाही ते पद्य आणि जे पद्य नाही ते गद्य असे. आणि गद्यातले तलाठ्याने काढून दिल्यासारखे उतारे असत. इंग्रजी दुसरीत गोळे नावाचे एक मास्तर आम्हाला कविता शिकवीत. हे गोळे मास्तर सगळ्या कविता "कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की" या सुरावर वाचायचे. सगळे शिक्षक विद्यार्थ्याला विषयाची गोडी लागेल म्हणून भीत असत. आम्हाला इंग्रजी शिकविणारे मास्तर दशग्रंथी इंग्रजी शिकवत त्यामुळे 'यज्ञेन यज्ञ मय जन्त देवा:'  या चालीवर 'जॅक अँड जिल' चालत असे. खेळ हा बाल 

जीवनातला एक आसरा असतो असे म्हणतात. पण ड्रिल मास्तर नावाच्या शत्रुने तोही उध्वस्त केला. उजवीकडून काही पाहण्यासारखे जात असताना हे मास्तर नेमके 'बाये निघा' करायचे. हिंदी या भाषेशी पहिला संबंध 'दाहिने निघा', 'बाये निघा', 'कदम खोल 'असल्या क्रूर शब्दातून आल्यामुळे, त्या भाषेविषयी मी धास्तीच घेतली आहे.

सगळेच शिक्षक असे नव्हते. काही भले शिक्षकही असत. पण मंगळाच्या मुलीसारखे आम्हाला ते लाभत नसत. भूगोलाच्या मास्तरांनी 'मसाल्याची बेटे कुठली' हा प्रश्न सदैव सुषुम्नावस्थेत असणाऱ्या शामू तळेकरला विचारल्यावर, 'बेडेकर आणि कुबल' असे उत्तर देऊन त्याने मान टाकली होती. मास्तरांनी त्याला धरून कुबल कुबल कुबलला.

     अकरा वर्ष चाललेल्या या निरुपयोगी उद्योगात सारे बालपण पायाखालच्या चटके देणाऱ्या वाळू सारखे सरकले. शेवटी काय, आयत्या वेळी उपयोगी पडणारे हाती काहीच लागले नाही. हाती लागला फक्त मार आणि म्हणूनच त्या बालपणाला ज्या कोणी महाभागाने  'विद्यार्थी दशा' म्हटले त्याचे कौतुक करावे असे वाटते".

     'हसवणूक'-- यातील "बिगरी ते मॅट्रिक " या लेखातून.

#हसवणूक

#बिगरीतेमॅट्रिक

#शिक्षकदिन

Sunday, September 29, 2024


 चला आखू या लक्ष्मणरेषा

   कोलकाता आणि बदलापूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी घडलेल्या घटना कदाचित  आताच्या क्षणी आम्ही विसरलो असू. कारण त्यानंतर आम्ही उत्साहाने झेंडावंदन केले. स्वतंत्र भारताचे प्रतिक असलेला हा तिरंगा नक्की कोणत्या स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करतो हे भारतमाता च जाणे. पण  ७७ वर्षाच्या स्वतंत्र भारतात हा तिरंगा दिमाखाने फडकत होता हे मात्र खरे. त्यानंतर गौरी गणपतीची धामधूम सुरू झाली आणि त्या पुढे देवीचे नवरात्र समोर आहेच. या सगळ्या उत्सवी वातावरणात कोलकाता आणि बदलापूर घटनांचे नेहमीप्रमाणेच  विस्मरण झाले. वास्तविक महिलांच्या लैंगिक छळाची परंपरा फार जुनी आहे. ज्या बलात्काराच्या घटना आपल्या समोर येतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात असे प्रसंग घडत असतात. फक्त ते उजेडात येत नाही म्हणून कळतही नाहीत. पण त्यामुळे कुठे काय बिघडते?

या वर्षी आपल्या भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलाच की.. १४ वर्ष एका महिला पंतप्रधानांनी आपल्या देशाची धुरा सांभाळली आहे. सध्या आणि याआधीही राष्ट्रपती पदाचा मान महिलेला मिळाला आहे. म्हणजेच या ७७ वर्षात महिलांच्या जीवन पध्दतीत झालेला सकारात्मक बदल लक्षात घ्यायला हवा. भारतीय मुलींची  ऑलिम्पिक मधील कामगिरी, लष्कर, उद्योग व्यवसायातील भरारी- - - या मुद्द्यांवर लक्ष केन्द्रित करायला हवे. आणि आता तर नवरात्रा मुळे  देवी पूजनाइतके महत्वाचे दुसरे काही असूच शकत नाही.

                   असेच आहे ना वास्तव? तरीसुद्धा एक प्रश्न सगळ्या मैत्रिणी, माता, भगिनींना मला विचारायचा आहे ज्याचे प्रामाणिक उत्तर मला अपेक्षित आहे. ‘एक महिला म्हणुन मी  संपूर्ण सुरक्षित आहे का? भविष्यात माझ्या, माझ्या मुलींच्या, बाबतीत असला घृणास्पद व्यवहार घडणारच नाही याची खात्री मला आहे का? याचे उत्तर , 'हो' असेल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. किंबहुना या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करता आहात. याहीपेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की या ज्वलंत प्रश्नाला भिडण्याची तुम्हाला भिती वाटते आहे. आणि उत्तर 'नाही' हे असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी  काही प्रयत्न केले का?

        आपल्या आयुष्यात डोकावून बघितल्यास कमीत कमी एकदा तरी लैंगिक छळाचा अनुभव आपल्याला आला असतोच. त्यावेळी आपण काय केले होते?  त्याक्षणी प्रतिकार केला? आरडाओरड केली? की अळी मिळी गुपचिळी? आपल्या मुलींनी, मैत्रिणींनी कधीतरी असे वाईट अनुभव आपल्याला सांगितले असतात. त्यावेळी आपण काय केले असते? 'लक्ष नको देऊ. सांभाळून रहा' .... असे सल्ले  देऊन तिला रागावले असते. दुर्दैवाची बाब ही, की अशी एखादी घटना जेव्हा बलात्कारा च्या स्तरावर घडते आणि  'व्हायरल' होते त्यावेळीच आम्हाला कंठ फुटतो. मग दोषी कोण हे ठरविण्याची अहमहमिका सुरू होते. पुरुषी मानसिकता, मुलींचे कपडे, पालकांचे दुर्लक्ष, मोबाईल, इंटरनेट, चित्रपट, पोर्नोग्राफी इ. इ या सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. मग मोर्चा, निषेध, बंद, आंदोलन, अगदी ताबडतोब फाशीची मागणी...... हे सालंकृत सोपस्कार झाले की विषय तिथेच संपतो.

 यात जबाबदारी कुणाची? 

अर्थातच शासनाची, पोलीसांची, न्यायालयांची आणि काही महिला संघटनांची - . ही आपली परंपरागत समजूत आहे .आणि त्यामागे लपून आपण आपली स्वतःची जबाबदारी टाळतो आहोत. इव्ह टीझिंग, छेडछाड, बलात्कार या घटना व्यक्तिगत आणि सामूहिक अशा दोन्ही प्रकारे घडू शकतात. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे असा कंठशोष करायला आपण एका पायावर तयार असतो. पण पीडित महिला आपली तक्रार नोंदवते का?ती चवताळून उठते का? - शक्यतोवर नाहीच.फारच क्वचित तिने आक्रमक भूमिका घेतली की त्यावेळी मात्र तिला मूग गिळून गप्प बसण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे तक्रार करण्याची अगदी प्राथमिक जबाबदारी पाळली जाते का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बदनामी च्या भितीने तक्रार केली जात नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. पण महिलांनी मौन धरणे, तक्रार न करणे, अत्याचार सहन करणे ., प्रतिकार न करणे.....यामुळे या नराधमांचे धैर्य वाढत जाते, याचा विचार कोण करणार?  तिहार जेलमधील बलात्काराच्या गुन्ह्यासाठी डांबलेल्या कैद्यांवर  संशोधन केले असता , त्यावेळी त्या प्रत्येकाला आपण निर्दोष सुटणार याची खात्री होती. .ही खात्री आपल्या निष्क्रियतेमुळेच आहे, हे न समजण्याइतपत आपण भाबडे नाही. तेव्हा मैत्रिणींनो, पहिली जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा.अनेकदा असे गैरवर्तन होताक्षणी तिथेच या वृत्तीला ठेचणे गरजेचे असते. तक्रार करण्यास वेळ नसतो. पण अशावेळी सुद्धा आपण माघार घेण्यात धन्यता मानतो. बघे लोकही डोळ्यावर कातडे ओढून स्वस्थ बसले असतात . आपली ही उदासीनता , सहनशीलता कामांध वृत्तीला  प्रोत्साहन देते आणि नराधमांची भीड चेपते.

 आपले अज्ञान

आज आपण उच्च शिक्षित आहोत पण लैंगिक छळाची व्याख्या आपल्याला माहित आहे का? नेमकी कोणती कृती ही लैंगिक छळात मोडते याची कल्पना आपल्याला आहे का? ' विशाखा' समिती काय आहे व तिचे काम कसे चालते? ‘ पॉश ‘हा कायदा , ‘पाॅक्सो,’ रिक्लेम द नाईट,मीटू   म्हणजे नेमके काय? समजा काही गैरप्रकार घडला तर काय करायचे? हेल्पलाईन नंबर्स, हेल्पलाईन ॲप्स आपल्या मोबाईल मध्ये आहेत का?

 असहकार्याचे तत्व

बदनामीची भीती ही स्त्रियांना  पोलिसांशी असहकार्य करण्यास भाग पाडते. आपल्या देशात काही गृहीतके पालनपोषण करून बळकट केली आहेत. वास्तविक जो पुरुष गैरवर्तन करतो - बदनामी त्याची व्हायला हवी. पीडित स्त्रीचा काहीही दोष नसताना चूक, अपराधीपणाचा गंड, बदनामी मात्र तिचीच. स्त्रियांनी या  गृहीतकाला केराची टोपली दाखवायला हवी.सुदैवाने हल्ली या विषयावर किमान बोलले तरी जाते.  आज सरकारने याबाबत अध्यादेश, नियमावली , तरतूदी  कायदे अपडेट करून स्वागतार्ह पाऊल उचलेले आहे. ज्यामुळे स्त्रियांना नक्कीच न्याय मिळू शकतो. पण  अशावेळी , पोलिस, न्यायालय  या भानगडीत पडायचे नाही हा सुद्धा आमचा ‘बाणा' असतो. भारतीय स्त्रियांच्या 'जनुकांमधील' मौन,  शरणागती , सहनशक्ती, भीती, इ.इ. ‘बलस्थाने' पुरुष जातीला चांगलीच माहित आहेत. स्त्रिया या बाबतीत ‘ब्र' ही काढणार नाहीत ही त्यांना खात्री असते. पण ज्या दिवसापासून स्त्रिया तक्रारींची नोंद करू लागतील, त्यावेळी पुरुषांच्या मनात भीती, धाक निर्माण होईल. अर्थातच हे चित्र बदलण्यासाठी स्त्रीला स्वतः समोर यावे लागेल.

 मार्गदर्शक तत्वे

लैगिक छळाची व्याख्या -

कोणताही अस्वागतार्ह शारीरिक स्पर्श

शरीरसंबंधाची मागणी किंवा विनंती

लैंगिकता सूचक शेरे मारणे व अश्लील बोलणे '

अश्लील चित्रे दाखवणे, अश्लील मेसेज, ईमेल करणे

लैंगिकता सूचक कृती- शारीरिक, मौखिक किंवा निः शब्द पणे केलेली  कोणतीही कृती

            महिलांचे लैंगिक शोषण होऊ नये यासाठी कायद्यात तरतुदी आहेत. संविधानातील कलम १४ , १५, १९ आणि ११ यात महिलांना समानतेचा अधिकार दिला आहे.१९ सप्टें. २००६ रोजी महाराष्ट्र शासनाने विशाखा समिती गठित करण्याचा निर्णय पारित केला. यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, रुग्णालये या ठिकाणी  नोकरी करणाऱ्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झाल्यास ' महिला तक्रार निवारण समिती' म्हणजेच विशाखा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या सदस्यांची नावे लिहून तो फलक  कार्यालयात प्रत्येकाला दिसेल अशा जागी लावणे बंधनकारक आहे.

  छेडछाड किंवा इव्ह टीझिंग हे गुन्हे हाताळण्यासाठी अद्याप कायदा अस्तित्वात नाही. परंतु या बाबतीत न्यायालयाने महत्वाच्या सूचना राज्य व केन्द्र सरकारला दिल्या आहेत. बस, रेल्वे, मेट्रो स्टेशन, थिएटर,बाजार, मॉल, बगीचे, समुद्रकिनारे, मंदिर परिसर - या ठिकाणी सीसी टीव्ही बसवणे आवश्यक आहे. ‘छेडछाड करणे हा गुन्हा आहे’ ही समज देणारे फलक या स्थानी लावण्यात यावे, तसेच सिव्हील ड्रेस मधील महिला पोलीसांची नेमणूक करण्यात यावी. बस किंवा रेल्वे मध्ये अशी घटना घडल्यास, चालक वाहक यांच्याकडे तक्रार करून सदर वाहन हे पोलिस स्टेशनला नेण्यात यावे.चालक - वाहकाने विरोध केल्यास वाहनाचा परवाना रद्द होतो.छेडछाडीचा गुन्हा घडत असतांना' ‘बघ्यांनी' त्वरित महिला हेल्पलाईनला कळवावे व महिलांना वाचविण्याची भूमिका घ्यावी. यासाठी प्रत्येक गावात दामिनी पथक निर्माण केले आहे. महिला पोलीसांचे पथक बाईक वरून किंवा गाडीमधून त्वरित मदतीला येते. रेल्वे मधून एकट्या स्त्रीला प्रवास करताना अनेकदा लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. अशावेळी १३१नं डायल करावा.  पुढच्याच स्टेशन वर पोलिस मदतीला येतात. रेल्वेमध्ये एकट्या स्त्रीला मदत करण्या साठी  ‘मेरी सहेली'   हे ॲप उपलब्ध आहे.   नॅशनल कमिशन फॉर विमेन द्वारा २४ × ७ हेल्पलाईन साठी  २४ जुलै २०११ पासून  - ७८२७१७०१७० हा नंबर दिला असून www.ncw.nic.in ही वेबसाईट पण उपलब्ध करुन दिली आहे. १०९० हा राष्ट्रीय महिला हेल्पलाईन नंबर असून महाराष्ट्राचे १८१, १०३ हे नं. आहेत.

          आज शासकीय स्तरावर अनेक सकारात्मक बदल होत आहेत.स्त्रियांविषयी अवमानकारक शब्द वापरणे,विनोद करणे,शरीर अवयवांवर टिप्पणी करणे……हा पुरुषांचा जन्मतःच हक्क असतो. पण न्यायदानाच्या प्रक्रियेत तरी स्त्रियांचा उल्लेख संवेदनशीलतेने केला जावा- यासाठी पुढाकार घेणाऱ्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आभार. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली, कोलकात्याच्या उच्च न्यायालयातील विदुषींनी दोन वर्षे काम करून ३० पानांची वर्ज्य शब्दावली तयार केली आहे. ही पुस्तिका विशेषत्वाने पुरुषांनी वाचायला हवी. अनेक विशेषणांमधून तिचे मानसिक खच्चीकरण करण्याचा मार्ग नाकारण्याच्या वाटेवर न्यायव्यवस्थेने हे स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. नुकताच  कोणत्याही धर्माच्या मुलींच्या विवाहाचे वय २१ वर्षे असावे हा कायदा हिमाचल प्रदेशाने पारित केला आहे.

         ही माहिती प्रत्येक स्त्रीला असणे अत्यावश्यक तर आहेच पण मुलामुलींना ही माहिती देणे हे तर आपले परमकर्तव्य आहे. आता स्त्रीनेच स्वतःच पुढाकार घ्यायचा आहे. स्वतः सक्षम होऊन दुसऱ्या पीडित स्त्रीची मदत करण्यास तत्पर असणे ही काळाची गरज आहे. स्त्रियांचा प्रतिकार वाढू लागला तर लैंगिक छळाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. लैगिक छळ हा प्रश्न वैयक्तिक जरी असला तरी तो संपूर्ण समाजावर परिणाम करणारा आहे. आज एक स्त्री स्वतःसाठी न्याय मागत असेल तर ती सगळ्याच स्त्रियांना  मदत करित असते हे कृपया सगळ्यांनीच लक्षात ठेवावे.

            रामायणात लक्ष्मणाने सीतेच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणरेषा आखली होती. आज ही लक्ष्मणरेषा सगळ्याच स्त्रियांनी आपल्या भोवती आखायची आहे जेणेकरून कोणत्याही वासनांध रावणाला ती अडवू शकेल. आज कायदे, पोलीस, सरकारी योजना आपल्या मदतीला तत्पर आहेत. फक्त आपण भीती, लाज, संकोच, बदनामी, मौन, शरणागती या स्वअडथळ्यांवर मात करायची आहे. आपल्या मुला मुलींना  या बाबतीत प्रशिक्षित करायचे आहे. मुलांनाही अशावेळी मदतीला धावून जाण्याची शिकवण देणे गरजेचे आहे. आपल्या स्वभावात धैर्य, समयसूचकता,  स्पष्टवक्तेपणा, अन्यायाचा प्रतिकार आणि स्वाभिमान या  अस्त्रांचा समावेश करून  पोलीस, कायद्याच्या मदतीने आपली लक्ष्मण रेषा आपल्यालाच आखायची आहे. देवीची उपासना करतांना महिषासुरमर्दिनीची कथा केवळ मनोरंजनासाठी किंवा डोके टेकवण्यासाठी  वाचायची नाही .उलट प्रतिकारासाठी आपल्या  वापरात नसलेली अस्त्रे परजून ठेवायची आहेत. केवळ नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, उपास, ओटी, गरबा - यात गुंतून न राहता आपण  पुढाकार घेऊन कृती करून दाखविण्याची वेळ आली आहे. चला तर मग. समाजातील रावणांसाठी आपली लक्ष्मणरेषा आपणच  आखू या.

#लैंगिकछळ

#विशाखासमिती

#पाॅशकायदा

Sunday, November 26, 2023

शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी


 

मध्यंतरी आमचा अंगणातला बगीचा साफसूफ करण्यासाठी एक माळी जोडपं आलं होतं.संपूर्ण बगीचा त्यांनी व्यवस्थित ,नीटनेटका केला पण इकडे तिकडे अनेक तुळशीची झाडं कशीही वाढली होती,ती त्यांनी तशीच ठेवली होती.त्याबद्दल मी त्यांना हटकलं तर ती बाई म्हणाली.

    'माऊली ला नाई तोडत आमी.देवी हाय  ती.तुमच्या दारी आली ना ती, मंग राहू द्या नं तिले.रायचं तितके दीस राहील ती.' असं म्हणून तुळशीला हात जोडून ती दोघं निघून गेली.

    का कुणास ठाऊक पण त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला.मला माझीच लाज वाटली.त्यांच्या प्रगाढ श्रद्धेचा मला हेवा वाटला. एक तुळशीवृंदावन पुरेसं आहे की रोज पाणी घालायला आणि दिवा लावायला.... इतपतच माझी भूमिका कम श्रद्धा होती. पण आत खोलवर मला खूप हलवून गेलं त्यांचं बोलणं.मी राहू दिली तशीच ती झाडं.

    आणि नुकतीच बातमी आली की महाराष्ट्रात प्रदूषणाचं प्रमाण कमालीचं वाढलंय आणि त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.मला एकदम तुळस आणि पर्यावरण रक्षण यांचा संबंध आठवला. तुळशीला नैसर्गिक हवा शुद्धीकारक समजलं जातं. दिवसातून बारा तास तुळस ऑक्सिजन सोडत असते.आणि वातावरणातील कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड हे घातक वायू शोषून घेत असते.तसंच तिच्यात असलेलं यूजेनॉल हे संयुग डास,कीटकांना दूर ठेवतं.आणि त्यामुळेच तुळस प्रत्येकाच्या घरासमोर असते.

    भारतीय संस्कृतीत तुळशीला पवित्र मानतात,त्याचं कारण पर्यावरणाशी संबंधित असावं का? कारण आपले पूर्वज अत्यंत खुबीने वैज्ञानिक गोष्टींवर धार्मिकतेचं पांघरूण घालून आपल्या कडून योग्य ते करवून घेण्यात तरबेज होते.

    पौराणिक कथा बघितल्यास, तुळशीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आढळतात. प्राधान्याने त्यात तुळशीच्या वाट्याला दुःखच आले आहे .कथा आणि कथानायक वेगवेगळे आहेत पण तुळशीची वेदना मात्र तशीच आहे. कसल्या ना कसल्या व्यथेपोटीच तुळशीची उत्पत्ती झाली आहे. पतीच्या आधी भोजन केले म्हणून एका ऋषी पत्नीला राक्षसी होण्याचा शाप भोगावा लागला. या राक्षसी अवतारात ती ऋषी पत्नी अनेक वर्ष जगत राहिली. सुटकेची वाट बघत आयुष्य कंठत राहिली. अखेर एका भक्ताने केलेल्या कृष्णाच्या नामस्मरणाला ऐकून तिला मृत्यू आला. पण तिचा देह तब्बल वर्षभर जळतच राहिला. शंकर-पार्वतीने  जेव्हा ही चितान बघितली तेव्हा ते स्तिमित झाले. मृतावस्थेतही ही इतकी शोभायमान आहे. 'मृता लसती- सा एव तुलसी' अशी ही तुलसी आहे. म्हणून त्यांनी तिला स्पर्श केला आणि भूतलावर कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रातःकाळी ती उगवली. भगवान विष्णू ने तिला वर दिला की तुळशी शिवाय माझी पूजा संपूर्ण होणार नाही. तुळशीला मिळालेल्या या मोठेपणामागे तिने सोसलेल्या दुःखाचा डोह जाणवल्याशिवाय राहत नाही. 

    दुसऱ्या कथेत तर या तुळशीचा देवांनी

 उपयोग करून घेतलेला आहे .वृंदा नावाच्या राजकन्येचा पती जालंधर हा प्रचंड शक्तिमान होता .त्याच्यापासून देवांना धोका निर्माण झाला होता. कपटाने देवांनी जालंधरच्या शरीराचे हुबेहूब दोन तुकडे करून वृंदेला दाखविले. वृंदा शोकसागरात बुडून गेली. मग देवांनीच साधू वेष घेऊन जालंधरला जिवंत करण्याचे नाटक केले. हा जालंधर म्हणजे भगवान विष्णूच होते. भोळी वृंदा आनंदली. प्रेमभराने तिने जालंधरला मिठी मारली. देवांचं कपट तिच्या लक्षात आलं नाही. आपल्या पतीशी पूर्ण एकनिष्ठ असलेली वृंदा परपुरुषाच्या स्पर्शामुळे भ्रष्ट तर झालीच पण खऱ्याखुऱ्या जालंधराने तिला हे कृत्य करताना बघितले. जालंधर क्रुद्ध झाला. भ्रष्ट झाल्यामुळे वृंदेची पुण्याई संपली आणि खरा जालंधर मरण पावला. संतापानं आणि दुःखानं वृंदेने विष्णूला शाप दिला. तिच्या शापामुळे भगवान विष्णू अस्वस्थ झाले. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंं साठी भूतलावर तुळस लावली. तिलाच वृंदा किंवा विष्णुप्रिया म्हणतात. 

           अशा अनेक कथा पुराणात सांगितलेल्या आहेत.स्त्रीरुपात भोगलेली अपरिमित दुःखे आणि परिणामी निर्माण झालेली तुळस.....हे सगळ्या कथांचं सार. म्हणूनच तुळशीचं आणि वेदनेचं  अतूट नातं आहे. 

           या कथा वाचताना आणि तुळशीची वेदना समजून घेताना मला प्रसिद्ध लेखिका श्रीमती दुर्गा भागवतांच्या  'निसर्गोत्सव' पुस्तकाची प्रकर्षाने आठवण आली. तुळशीबद्दल त्या लिहितात, 

           


'अगदी साधी ही तुळस. कधीच डोळ्यात न भरणारी. झाडाची नैसर्गिक शोभा एवढीच की ते नाजूक आहे. मंजिऱ्या तर विचारूच नका. निळी- जांभळी अशी ती अर्धी देठाच्या संपुटात लपलेली फुले  - त्यांचा गंधही वाऱ्यावर पारिजातकाप्रमाणे भिरभिरणारा नाही. झाडाची सळसळ नाही. काही नाही. ना या झाडावर भुंगे झेपावत की पाखरे घरकुल करीत. मग असे काय मनोवेधक या तुळशीच्या रोपट्यात आहे? हातात खुडून घेतले तरच त्याचा गंध येतो. आणि हा गंध मात्र जागच्या जागी बसणारा असला तरी ह्रुद्य असतो मादक नसतो. मंजिरीतले प्रत्येक फूल न्याहाळले तर ते थरथरलेले दिसते. लाजेने लपलेले वाटते. प्रत्येक उमललेले फुल अति नाजुक व निखोड रंगछटांनी नटलेले असते.  घरातल्या वृंदावनाचे सोडा पण रोपही एरवी कधी एकटे दुकटे नसते. त्याचे बी किती काळेभोर व सुंदर असते वाऱ्याच्या लहरी बरोबर ते सहज उडून जाते आणि पहिल्या सरी बरोबरच उगवते. आणि मग तुळशीचे बनच्या बनच उगवते. अनिवार साधेपणाचे तुळशीचे लहानखोरे रूप भारतीय मनात प्रांतोप्रांती वसलेले आहे. विष्णूच्या प्रणयिनीत ही नायिका  लाजाळू असते. ही तुळस हाडामासाची स्त्री नाही तर ते एक झाड आहे. हा  झाडरुपी देह असा आहे की त्याचा कायीक संपर्क कुणाही पुरुषाशी होणारच नाही. तिचे बारोमास फुलणारे पुष्पमय ह्रुदय मात्र प्रियकराचे अखंड सांनिध्य शोधत असते. तुळशीचे लग्नही बाळकृष्णाशी होते. ही सुद्धा तिच्या भोगरहित सौभाग्याची आणि अखंड कौमार्याचीच खूण आहे . लग्नाशिवाय स्त्रीने राहू नये. जी राहील ती पतिव्रता असायची नाही, असे मत पुराणात स्वच्छ दिलेले आढळते म्हणून तुळशीच्या लग्नाचा हा पसारा मांडण्यात आला आहे. तुळस ही उत्कंठित प्रेमला असली तरी ती चिरकुमारी आहे हेच या प्रथेचे अंतिम सार आहे. ही कल्पना महाराष्ट्रात पूर्वापार रुढ आहे. उदाहरणार्थ, कुमारिकेच्या चोळीवर तुळशी शिवाय दुसरा कोणताही कशिदा काढायचा नाही असा नियमच महाराष्ट्रात नागपूरच्या बाजूला अजून पर्यंत रूढ होता. तुळशीबद्दलच्या सर्व कथांचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की त्या भीषण कारुण्याने भरलेल्या कथा आहेत.'    तुळशीबद्दल दुर्गाबाई भागवतांचं हे भाष्य वाचल्यावर मला तुळशीची वेदना मुळापासून जाणवली. किती अवघड दिव्य पार केल्यावर तिला भारतीय संस्कृतीत मानाचं स्थान मिळालं आहे. मला लोकगीतातल्या दोन ओळी आठवल्या. 

तुळशी गं बाई, 

काय तुझं हे जीणं,   गोविंदाच्या संगे, 

वरसा वरसाला लगीन'   दुसऱ्या स्त्रियांची दुःखं ऐकून घेणारी ही तुळस स्वतःच वेदनांचं एक मूर्तिमंत रूप आहे. तुळशीचा विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमे पर्यंत केला जातो.ऊस हा मामा म्हणून तिच्या पाठी उभा असतो. तुळशी विवाहा नंतरच लग्नाचे मुहूर्त काढण्याची पद्धत आहे.

    आयुर्वेदात अनेक औषधात तुळशीचा वापर केला जातो. सर्दी, खोकला,ताप या औषधात तुळस असतेच.त्वचारोग व कृमींवर तुळस अतिशय परिणामकारक आहे. तिच्यात असणारं, 'थायमॉल' हे तत्व डास, कीटकांना दूर ठेवतं.

    अशी ही बहुगुणी तुळस.  तिच्या पानाशिवाय नैवेद्य परिपूर्ण होत नाही.मृत व्यक्तीच्या मुखातही तुलसी पत्र ठेवण्याची प्रथा आहे. धार्मिक, पौराणिक, पर्यावरणपूरक, आरोग्यदायी असणारी आणि स्त्री ची सखी असणारी ही तुळस सगळ्यांच्या घरी प्रवेशद्वारीच असते.

   पूजने कीर्तने ध्याने, 

रोपणे धारणे कलो। 

तुलसी दहते पापं, 

स्वर्गं मोक्षं ददातिच ।।

   अशा या तुळशीचे पूजन प्रत्येक घरात व्हावं असं शास्त्र सांगतं .

श्रीकृष्णासारख्या महानायकाच्या पत्नीचं पद तिला मिळालं आहे पण पूर्वायुष्यात चारित्र्यहीनतेच्या  आरोपातून गेल्यावरच. दरवर्षी विवाह वेदीवर चढून आपलं पत्नीत्व सिद्ध करण्याचं दिव्य तिला करावं लागतं तरीसुद्धा श्रीकृष्ण पत्नीचा पहिला मान रुक्मिणीचा असतो. अशा या तुळशीच्या व्यथा समजून घेऊन प्रत्येक भारतीय स्त्रीने तिला योग्य तो सन्मान देऊन जास्तीत जास्त रोपांचं संगोपन करावं हीच काळाची गरज आहे.

Sunday, October 3, 2021

नवरात्र आणि आत्मविकास


        हल्ली कळेनासं झालंय की आपल्या समाजाचा चेहरा नक्की कसा आहे?? सप्टेंबर महिन्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात बलात्कारांच्या घटनांनी उच्चांक गाठला. तक्रार न झालेल्या अशा घटना आणखी किती असतील देव जाणे. समाजाचा हा हिडीस, विकृत आणि माणुसकीला काळिमा फासणारा चेहरा डोळ्यासमोर असतानाच नवरात्र सुरू होतंय. आता हा समाज 360 अंश कोनातून गर्रकन फिरेल आणि नऊ दिवस देवीच्या भक्तीचा  उन्माद सुरू होईल. उपवास, नऊ दिवसाचे नऊ रंग,ओटी भरणे, सवाष्ण, कुमारीका पूजन, गरबा, अखंड दिवा.... इ. सारी कर्मकांडे समस्त  स्त्रिया यथास्थित आणि रीतसर करतील..... बलात्कार, स्त्रियांवर होणारा हिंसाचार, अन्याय - सगळं विसरून.... दृष्टीआड करून.....भक्तीच्या उन्मादात सगळ्या विकृत वृत्तिंचा सोयीस्कर विसर पडेल.

      नऊ दिवसांची देवीची  ही पुजा, आम्हा स्त्रियांना आत्मभान देत नसेल आणि आमच्या विचारात आणि कृतीत परिवर्तन घडवून आणत  नसेल तर काय अर्थ असल्या पूजेत? देवीमधल्य एखाद्या तरी गुणाचा थोडाफार अंश आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो का आम्ही?मुळात आमची पूजा ही श्रेयसासाठी की प्रेयसासाठी??

      आपल्या  नवरात्र पूजेमागे अनेक पौराणिक कथा आहेत. पण मी जेव्हा सखोल विचार केला, तेव्हा माझ्या बुद्धी आणि तर्कानुसार मला असं लक्षात आलं की स्त्रीचं आयुष्य हे नऊ टप्प्यात पूर्ण होतं. हे नऊ टप्पे आणि  नवरात्राच्या नऊ दिवसांचं देवीचं स्वरूप विलक्षण  मिळतंजुळतं आहे.ही नऊ दिवसाची पूजा म्हणजे आपल्याच जीवनातला एक एक टप्पा डोळस,समृद्ध,सक्षम आणि परिपूर्ण करणं होय.

   पहिली देवी  'शैलपुत्री' म्हणजेच पार्वती. पार्वतीचा  आदिशक्ती म्हणून गौरव केला आहे . आदी म्हणजे आरंभ. घटस्थापना करतांना आपण माती मध्ये धान्य पेरत असतो. म्हणजेच पहिल्या दिवशी स्त्री मधल्या 'सृजनशक्तीची','निर्मिती  क्षमतेची' पूजा असते. त्याच बरोबर गर्भाशयात रूजलेल्या इवलाश्या स्त्री गर्भाची पूजा असते. या दिवशी प्रत्येक स्रीनं देवीसमोर डोकं टेकवताना स्त्री भ्रूणहत्ये विरुद्ध लढण्याची शपथ घेणं गरजेचं आहे.गर्भनिर्मिती करणाऱ्या अवयवांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. शैलपुत्री देवीच्या डाव्या हातात कमळ तर उजव्या हातात त्रिशूळ आहे .या त्रिशूळाचा उपयोग केव्हा आणि कसा करायला हवा हे प्रत्येक स्त्रीनं समजून घेणं हे आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल........

       दुसऱ्या दिवशीची देवी म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चरणी म्हणजे तपस्या करणारी. ही देवी शुभ्र वस्त्रांकित असून तिच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात कमंडलू आहे. ही देवी पार्वती असून तिने शंकराच्या प्राप्तीसाठी तप केलं हे आपण जाणतोच. स्त्री जीवनातला पहिला टप्पा म्हणजे जन्मापासून बारा वर्षापर्यंत.दुसऱ्या दिवसाची पूजा ही 'ध्यासाची' आहे. स्त्रीने आपल्या घरातील, समाजातील बाल्यावस्थेतील मुलींचा विचार करायचा आहे. या मुलींना काही छंद, नाद, ध्यास असेल तर तो त्यांना जोपासू द्यावा, त्यांना पाठिंबा द्यावा. तरच मेरी कोम, पी व्ही सिंधू,मिताली राज घराघरात निर्माण होतील. फक्त या ध्यासामध्ये जपमाळेतील  सातत्य आणि शुभ्रवस्त्रातील सात्विकता जपण्याकडे लक्ष देणं हेच आत्मभानाच्या च्या दिशेने टाकलेलं दुसरं पाऊल......

      तिसऱ्या दिवसा ची देवी ही 'चंद्रघंटा'. हिची कांती सोनेरी असून ही देवी लावण्यवती आहे. तिच्या डोक्यावर चंद्राच्या आकाराची घंटा असून त्या घंटा नादानं असूर भयभीत झाले होते. स्त्री  जीवनातला दुसरा टप्पा म्हणजे तारूण्य. ही पूजा 'सौंदर्य' आणि 'शक्ती'ची असते. तारुण्यावस्थेत स्त्री शरीरातले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सक्रिय असल्याने तिचं सौंदर्य आणि कांती झळाळून उठतं आणि याच हॉर्मोनमुळेच  या वयात धाडसी वृत्ती असते.  देवीसमोर नतमस्तक होताना  मुलींचं खच्चीकरण न करता तिच्यातील स्फुल्लिंग जपणं,धिटाईला योग्य वळण देणं आणि सौंदर्यप्रदर्शनास विरोध करणं - हा संकल्प करणं -  हेच आत्मभानाच्या दिशेनं  टाकलेलं तिसरं  पाऊल........

     चौथ्या दिवसा ची देवी म्हणजे 'कुष्मांडा'. या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तिने आपल्या हास्यापासून ब्रम्हांडाची निर्मिती केली अशी कथा आहे.चौथी पूजा ही 'हास्याची' म्हणजेच आनंदाची आहे. स्त्री जीवनातला चौथा टप्पा म्हणजे विवाह. विवाहानंतर स्त्री  आपलं नवीन जग निर्माण करित असते. पण यासाठी तिच्या चेहऱ्यावर हास्य, आनंद आहे का, हे बघण्याची जबाबदारी कुटुंबातल्या प्रत्येकाची- नवरा, सासू, नणंद, दीर इत्यादींची आहे. अंतर्मनातून फुलणारंं हास्य,स्वातंत्र्य  आणि आनंद हे प्रत्येक सासुरवाशिणीला, माहेरवाशिणी ला मिळावं यासाठी देवीसमोर संकल्प  करणं- हेच आत्मभानाच्या दिशेने टाकलेले चौथं पाऊल.......

     पाचव्या दिवसाची देवी आहे 'स्कंदमाता'. ही देवी पार्वती असून हिच्या हातात कार्तिकेय आहे. या देवीचं वैशिष्ट्य हे, की तिला चार हात असून एकाही हातात शस्त्र नाही कारण ही पूजा ' वात्सल्याची ' आहे. विवाहानंतर चा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातृत्व. मातृत्वाच्या थोरवी बद्दल मी नव्याने काही सांगण्याची गरज नाही. पण या देवीसमोर नतमस्तक होताना आजच्या आयांनी काही संकल्प आवर्जून करावे. ते म्हणजे घरातील पुरुषांना (नवरा/मुलगा) स्त्रियांकडे एक 'माणूस' म्हणून बघायला,सन्मान करायला शिकवावं.घरातल्या सगळ्या कामांची- स्वयंपाकाची- सवय लावावी .अशी आई होणं म्हणजेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पाचवं पाऊल.........

      सहावी देवी आहे , 'कात्यायनी'. हिने महिषासुराला ठार मारले असून, हिच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातात कमळ आहे. हिच्या अचाट सामर्थ्याच्या अनेक कथा आहेत. या देवीचं पूजन म्हणजे 'असामान्य सामर्थ्याचं' पूजन आहे. स्त्री जीवनातला पाचवा टप्पा हा मुलांच्या संगोपनाचा,घरकामाचा,नोकरीचा- अत्यंत व्यस्त असा असतो. या काळात ती 'मल्टिटास्किंग' करत असते. या दिवशी देवीची   पूजा करताना, तिचं सामर्थ्य स्वतःसाठी मागायचं आहे. पण ही अफाट क्षमता, ऊर्जा - घरातील आणि समाजातील सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी मागायची आहे. आजच्या कृत्रिम आणि पोशाखी दिखाऊपणा साठी नाही किंवा 'सुपरवुमन' बनण्यासाठी नाही. हे आत्मभानाच्या दृष्टीनं   सहावं पाऊल............

           सातवी देवी म्हणजे 'कालरात्री'. स्त्री जीवनातला सहावा टप्पा म्हणजे चाळिशीनंतरचा. या काळात  मुलं मोठी झाल्यामुळे स्त्री  थोडी निवांत असते. ही कोशातून, चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ असते. तिने आता स्वतःला आणि समाजाला वेळ देणं गरजेचं आहे. कशासाठी?? तर- घरात, घराबाहेर, कुठेही अन्याय, अत्याचार होत असेल, तर प्रतिकार करण्यासाठी. कालरात्री  देवी चं स्वरूप बघितलं, तर ते भयावह आहे. काळा रंग, मोकळे केस, तिसरा डोळा- - हे कशाचं प्रतीक असावं? जर काहीही चुकीचं घडत असेल, तर रंगरूपाची पर्वा न करता 'तिसरा डोळा' उघडायचा. या देवीचं वाहन 'गाढव' आहे. का?कशासाठी?? दुष्टांचा संहार करण्यासाठी, जमेल त्या मार्गानं, सुचेल त्या आयुधानं, मिळेल त्या मदतीनं- - धावून जायचं असतं. मग ते वाहन गाढव का असेना. या वयात स्त्रीला परिपक्वता, चांगल्या वाईटाची जाण,अनुभव   असतो. म्हणून देवीला नमस्कार करतांना, समाजातील अपप्रवृत्तींचा नाश करण्याचा संकल्प करणं- हेच आत्मभानाच्या च्या दिशेनं टाकलेलं  सातवं पाऊल.......

     आठवी देवी आहे 'महागौरी'. ही श्वेत वस्त्रांकित आहे. या देवी मधील 'शांती व ज्ञानाची '  पूजा  केली जाते . स्त्री जीवनातला सातवा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीचा आणि सेवानिवृत्तीचा.  या काळात शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होतात त्यामुळे बरेचदा  मनात उदासीनता आणि नैराश्य निर्माण होतं. पण याच टप्प्यावर महागौरी देवीची पूजा करून मन स्थिर,शांत आणि समंजस  करणं गरजेचं आहे .देवीच्या हातातील डमरू हे सृष्टीतील उत्पत्ती आणि लय यांचं प्रतीक आहे .हे प्रतीक जीवनातलं अंतिम सत्य आहे हे समजून, सध्याच्या आभासी जगातले अशाश्वत मोह, सुख, मनातून बाहेर काढून, अंतर्मनाच्या शांतीचा व ज्ञानाचा संकल्प करणं- - हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं आठवं  पाऊल........

      नवव्या दिवसाची देवी 'सिद्धीदात्री'. ही कमळात विराजमान आहे आणि हिला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आहेत. या टप्प्यावरील स्त्री ही वार्धक्यावस्थेतली असते . साधारण सत्तर वर्षापासून पुढचा हा काळ आहे. या वयातल्या स्त्रीमध्ये समाधान, सामंजस्य, शांती, परिपक्वता, निर्लेपता, निर्मळता, प्रेम आणि आनंद या अष्टसिद्धी असणं अपेक्षित आहे. यासाठी तिनं स्वतः आणि कुटुंबीयांनी जागरूक असायला हवं.  या देवी समोर नमन करताना कुटुंबीयांनी तिला सन्मान देण्याचा आणि स्त्रीने स्वतःला षड्रिपु पासून दूर ठेवण्याचा संकल्प करणं हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं नववं पाऊल........

 अशा पद्धतीने नऊ दिवस देवीच्या मूर्तिपूजेबरोबर  देवीचे गुण स्वतःमध्ये आणि आपल्या समाजात रुजवले तर नवरात्राचे श्रेयस आपल्या पदरी पडेल. घराघरांमध्ये दुर्गादेवीचं अस्तित्व निर्माण होऊन स्त्री  ही खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सक्षम होईल. स्त्रीमधील हे आत्मभान जागृत झाल्यावर हा समाजही सुसंस्कृत आणि विवेकी होईल.

स्त्री ही संपूर्ण समाजाला योग्य वळण लावू शकते,त्याचवेळी त्याला वठणीवरही आणू शकते.फक्त स्वतःमधील वैशिष्ट्यांचा नेमका,अचूक आणि  योग्य वापर करण्याचं आत्मभान आलं तरच!!!



  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...