Showing posts with label प्रासंगिक. Show all posts
Showing posts with label प्रासंगिक. Show all posts

Saturday, December 6, 2025









पालकांनी बालकांशी पालकांसम वागणे

            शिर्षक वाचून मनात गोंधळ उडाला असणार. हरकत नाही. बालक आणि पालक यांचे एकमेकांशी कसे संबंध असावेत, हा विषय कायमच ज्वलंत रहाणार आहे. प्रामुख्याने हे संबंध तपासताना, आमचे पालक, आमचं लहानपण, आमचं पालक पण ... या फुटपट्ट्या लावल्या जातात आणि नेमका तिथेच गोंधळ होतो.

                  असो. निमित्त आहे - बालक दिनाचे आणि  नुकताच केबीसी मध्ये इशित भट्ट हॉटसीट वर विराजमान झाल्यानंतरचा प्रसंग. या प्रसंगाच्या खोलात शिरण्याची गरज नाही कारण तो सगळ्यांना माहित आहे. या प्रसंगावर पालक,शिक्षक, समुपदेशक, बालमानसशास्त्रज्ञ, लाईफ कोच सगळ्यांनाच व्यक्त व्हावंसं वाटलं. त्यांनी लिखाणातून आपली मतं मांडली. सामान्य जनतेने गप्पांमधून, बडबड करून यथेच्छ तोंडसुख घेतलं.  कुणी समाजमाध्यमाला, कुणी पालकत्वाला, कुणी शिक्षणपद्धतीला,  कुणी संस्कारशून्य पिढीला तर कुणी विभक्त कुटुंब पद्धतीला जबाबदार ठरवलं. खरं तर, दुसऱ्याकडे बोट दाखवलं की उरलेल्या तीन बोटांची दिशा स्वतःकडे असते हा इतका साधा नियम आपण विसरून गेलोय. समोरच्याला दोषी ठरविण्यासाठी आम्ही इतके उतावीळ , उत्तेजित,आणि सर्वज्ञानी असतो की त्या भरात तारतम्य न ठेवता 'भाष्य' करण्याचीच आम्हाला प्रौढी वाटते. किंबहुना त्यासाठी हल्ली काही ना काही निमित्तच हवं असतं. आणि तसं नसेल तर ते  निमित्त शोधून काढलं जातं. त्यावर चर्चेचा धुराळा उडतो. मतमतांतरांचं मंथन होतं. आणि काहीही निष्पन्न न होताच सगळं काही शांत होतं, विस्मरणात जातं.

                इशीत भट्ट हा लहान मुलगा. जेमतेम दहा - बारा वर्षाचा मुलगा. या वयाची मुलं आपल्या स्वतःच्या घरात असली की 'हल्लीची पिढी काय हुषार आहे नाही?' हे वाक्यं आपण दिवसातून कमीत कमी तीनदा तरी आळवतो. पण हीच मुलं शेजारच्या घरात असली की लगेच आगाऊ आणि भोचक वाटू लागतात. इशीत भट्ट हा मुलगा नेमका केबीसीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोर आल्यामुळे या प्रसंगाची प्रसिद्धी कमालीची वाढली. अमिताभ बच्चन यांच्या बद्दल ज्या भावना, जी आदरयुक्त भिती, जे दडपण मोठ्यांना येतं, तसंच इशीत भट्ट ला वाटणं शक्यच नाही. अमिताभ बच्चनला प्रत्यक्ष समोर बघतांना अति उत्तेजित होऊन,’अजि म्या ब्रम्ह पाहिले’ या भावनेत भल्याभल्यांना सुचेनासं  होतं, हे आपण अनेकदा बघितलं आहे. पण इशीतच्या पिढीने केवळ केबीसी मध्ये आणि जाहिरातीतच त्यांना  बघितलं असण्याची शक्यता आहे  व ते ही घरी नियमित केबीसी बघितल्या जात असेल तरच. पालकांनी अमिताभच्या व्यक्तिमत्वाचा आवाका इशीतला सांगितला असेलही. पण ती माहीती गांभिर्याने घेण्याचं त्याचं वय नाही व तेवढी त्याला समजही नाही. इशीत उद्धटपणे , आगाऊ पणे वागला असं भाष्य करणाऱ्यांनी लहान मुलांचे नृत्याचे आणि संगीताचे रिऍलिटी शो बघावेत.  लहान मुलं जी कार्टून्स बघतात त्यातल्या पात्रांचा अभ्यास करावा. जाहिरातीतली लहान मुलं बघावीत. आणि रोजच्या हिंदी आणि मराठीतल्या ' संस्कारी' मालिका बघाव्यात.

                         जेमतेम अर्धा तास इशीत हॉट सीट वर होता आणि तेवढ्याच वेळात त्याच्या वागण्यावर गदारोळ उठला. ज्यावेळी याच वयाची मुलं रिऍलिटी शो मध्ये नृत्य करतात,गाणी गातात, त्यावेळी तर अनेकदा वयाला न साजेशा गाण्यांची निवड केली जाते. त्यावर नृत्य करतांना उत्तेजक हावभाव, विचित्र स्टेप्स बघणं असह्य होतं. या शो मधले परीक्षक ही डोकं गहाण ठेवून केवळ कौतुक करण्यासाठी आणि छचोरपणा करण्यासाठी बसले असतात. परफॉर्मन्सच्या मध्ये जी काही हुल्लडबाजी आणि वाह्यातपणा सुरू असतो, तो बघता संतापाशिवाय दुसरी कोणतीच भावना मनात येत नाही. स्पर्धकांच्या जोड्या जमवल्या जातात, त्यांना एकमेकांवरुन चिडवलं जातं. प्रपोज करणं, क्रश, ब्रेकअप, लव्ह ट्रँगल... ही भाषा सतत वापरली जाते. आणि या प्रकाराचं प्रचंड कौतुक केलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात ही असंच वागायचं असतं अशी समजूत स्पर्धकांची तर होतेच पण बघणा-या असंख्य लहान मुलांचीही खात्री  होते. परफॉरमन्स वर टिप्स, चुका समजावणं, सुधारणा  करणं या बाबी महत्वाच्या नसतातच. प्रत्येक परीक्षक कौतुकभरल्या नवीन शब्दांची शब्दकोषात मोलाची भर टाकण्याचं काम नेमाने करित असतो .फक्त कौतुक आणि तोंडी लावायला रडणं. 'रडणं' -- हे भावनिक बुद्ध्यांक दाखविणारं. त्याचं प्रदर्शन पण अत्यावश्यक. स्पर्धक, परीक्षक, प्रेक्षक यांनी  टिपं गाळून आपल्या ‘संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणं’ ही अट पाळली की पुढच्या राऊंडच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. शास्त्र असतं ते. त्यामुळे टिपं गाळण्याचं हे संसर्गजन्य अस्त्र कायम सगळेच जण भात्यात ठेवून असतात.

         अशा रिऍलिटी शो वर कुणीच  काहीच कसं बोलत नाही? इशीत तर फक्त अर्धा तास पडद्यावर होता. बाकी शो मधील मुलं तर दर आठवड्याला पडद्यावर येतात आणि परीक्षक व स्पर्धकांचे निरर्थक संवाद,माकडचाळे बघावे लागतात. निषेध करायचा,  टीका करायची किंवा गदारोळ करायचा  तर केबीसीतल्या इशीतवरच का?

          तसंच अनेकांच्या घरी टीव्हीवर मालिका बघितल्या जातात. वडीलधारी बघतातच पण त्याचा कळत नकळत परिणाम लहानांवरही होत असतो. शून्य अभिरूची आणि बुद्धीशी फटकून असलेल्या या मालिकांमध्ये नकारात्मक व्यक्तिरेखांचे  उदात्तीकरण इतक्या जास्त प्रमाणात दाखवलं जातं की अशी पात्रं प्रत्यक्षातही असणारच यावर लहान मुलांचा नक्कीच विश्वास बसू लागतो. फरशीवर तेल सांडवणं, पदार्थात मीठ/ तिखट ओतणं, गॅसचा नाॅब उघडून ठेवणं, कपड्यांवर शाई सांडवणं.......  बालबुद्धीलाही लाजवतील अशा अभिनव कल्पनांचा सुकाळ असणाऱ्या या मालिका लहान पिढीवर काय परिणाम करत असतील याचा विचारही करवत नाही. हीच बाब मुलांच्या कार्टून शो बद्दल. त्यातली पात्रं तर कमालीची आगाऊ , वात्रट आणि वाचाळ  असतात. लहान मुलं तर या कार्टून्स च्या आकंठ प्रेमात बुडालेली असतात. अशावेळी त्यांचं अनुकरण मुलांनी नाही केलं तरच नवल.

            हे सगळे टीव्हीच्या माध्यमातून होणारे संस्कार. पण घरातल्या पालकांकडून सुद्धा काय घडतं? लहान मुलांनी काढलेली चित्र, गायलेली गाणी, कविता, केलेला नाच, फॅन्सी ड्रेस या सगळ्यांचं शूटींग करून रील काढली जाते. ती पोस्ट केली जाते. मग त्यानंतर पडणारा कौतुकाचा आणि लाईक्स चा पाऊस. हे सगळे कुळाचार घरी यथास्थित पार पडत असल्याने लहान मुलांना ते नॉर्मल वाटू लागतं. कौतुक, प्रसिद्धी, रील, फोटो या दैनंदिन जगण्यातल्या आवश्यक बाबी आहेत असा त्यांचा समज होत असेल तर नेमका दोष कुणाचा? मुलांनी काहीही केलं तरी टाळ्या पडल्याच पाहिजेत हा पालकांचा अट्टाहास मुलांवरही परिणाम करतो. आपल्यावर टीका केलेली मुलांना  अजिबात सहन होत नाही. कोणतीही कृती करण्याच्या आनंदापेक्षा त्याचं प्रदर्शन करणं हे मुलांना महत्वाचं वाटू लागतं. अगदी अतिरेक म्हणजे काही पालक मुलांच्या गुणपत्रिका सुद्धा समाज माध्यमावर टाकतात.

            याशिवाय हल्लीच्या पालकत्वानुसार मुलांचे आणि आईवडिलांचे मैत्रीपूर्ण संबंध असावेत असं शास्त्र आहे.   पण प्रसंगी मैत्रीची मर्यादा ओलांडून मुले दादागिरी कधी करू लागतात हे समजतही नाही. त्यामुळे आजच्या कुटुंबात सगळ्यात जास्त धाक कुणाचा असेल तर तो लहान मुलाचा. त्याची आवडनिवड, त्याचे हट्ट त्याच्या मागण्या, त्याचे लाड ही पालकांची प्राथमिकता झाली आहे. सहजपणे ही मुलं आई वडिलांशी, आजी आजोबांशी, पाहुण्यांशी उद्धटपणे बोलतात. अशा वेळी केबीसी मध्ये इशीत उद्धटपणे बोलला तर त्याच्यावरच दोषारोपण का?

       आज समाजात संस्कारवर्गाची खरी आणि महत्वाची भूमिका बजावली जाते आहे ती तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांद्वारे. या वेगवान त्सुनामीमध्ये सगळेच भरडून निघताहेत. पण खरी फरपट होते आहे ती लहान मुलांची. त्यांना या माध्यमाचे आकर्षण वाटणं, त्यावर विश्वास बसणं, त्यांनी या आभासी दुनियेचं अनुकरण करणं - हे साहजिकच आहे कारण त्यांचा जन्मच मुळी हातात स्मार्ट फोन घेऊन झाला आहे. पण त्सुनामीच्या या लाटेत पालकही वहावत जायला लागले तर कसं होईल? आज गोकुळाष्टमी म्हणजे दहीहंडीचा उत्सव,गणेशोत्सव म्हणजे मिरवणूका आणि ढोल, नवरात्र म्हणजे नऊ रंगाचे कपडे आणि गरबा, दिवाळी म्हणजे रोषणाई, फटाके आणि भेटवस्तू …..असे लहान पिढीचे समज झाले आहेत. हे चुकीचे समज कुणामुळे? आपणच आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खरं तर अशा वेळी एका दीपस्तंभा प्रमाणे आज पालकांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मुलं कुठेही भरकटली तरी त्यांना त्यांचा दीपस्तंभ  पालकांनी उपलब्ध करून दिला पाहिजे. मान्य आहे की दुर्दैवाने आजच्या वेगवान तंत्रयुगात पालकांच्या हाती मोजकेच पत्ते उरले आहेत.अनेक आगाऊ, अनावश्यक बाबींवर त्यांचा ताबा असूच शकत नाही. बाहेरच्या प्रत्येक प्रलोभनावर पालकांनी नियंत्रण ठेवणं केवळ अशक्य आहे. पण उरलेले हातातले पत्ते हे हुकुमाचे असणं ही आजच्या काळाची गरज आहे. मग पालकांनी नेमकं करावं तरी काय?पालकांनी इतरांना दोष न देता, आपलं लहानपण आठवावं. आई वडिलांची वागणूक आठवावी.आपल्या स्वतःच्या पालकांचाच आदर्श समोर ठेवून वागलं नाही तर भविष्य कठीण असणार आहे. म्हणूनच २०२५ च्या बालकदिनाच्या निमित्ताने 

 "हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे ।

 पालकांनी बालकांशी पालकासम (म्हणजे आपल्या आईवडिलांसारखं) वागणे"॥

Sunday, November 5, 2023

चला चला, दिवाळी आली

 

चला चला,दिवाळी आली,

मोती साबणाची वेळ झाली"

मोती साबण आणि दिवाळी यांचा नेमका काय संबंध? हा मला नेहमीच छळणारा प्रश्न. बरं,आता हा कुळाचार असल्याप्रमाणे मोती साबणाची  दिवाळीच्या सुमुहूर्तावर बाथरूम मधे  जी प्रतिष्ठापना होते ती पार होळीपर्यंत. कारण दिवाळी संपली की मोती साबणातून हळूहळू आत्मा मुक्त होऊ लागतो आणि त्याचं एका रंगीत गोट्यात रुपांतर होतं.हा गोटा संपेपर्यंत आम्ही त्याने आंघोळ का करतो....हा दुसरा छळणारा प्रश्न. 

      असो.मोती साबणाने  वर्दी दिलीय, 'दिवाळी आली बरं का' .....

    लहानपणी निसर्ग हाळी द्यायचा... दिवाळी आली बरं का' .......

    दसऱ्यापासूनच दिवाळीचे वेध लागत. नुकताच पावसाळा आटोपला असायचा. तृप्त भूमीने अवघ्या सृष्टीला हिरवाईचं दान दिलं असायचं .  वर्षा ॠतूने शरदाला  ओंजळ भरभरून दिलेलं सुजलाम सुफलाम हे दान  स्वीकारून शरद ऋतू कसा टवटवीत आणि ऊर्जादायक झाला असायचा. शेता शेतांमध्ये गच्च भरलेली पिकं डोलताना बघून मन सुद्धा कसं गच्च भरून जायचं. सरलेला पावसाळा आणि येऊ घातलेला हिवाळा यांचा मिश्रण म्हणजे दिवाळी. शरदातली म्हणजेच अश्विन कार्तिकातली पंचमहाभूतं मुळातच विलक्षण जादुभरी असायची. आपलं नवीन समृद्ध रूप बघून ती पंचमहाभूतं हळूच कानात कुजबुजायची.... 'दिवाळी आली बरं का'...... 

         स्वच्छ  मोकळं आकाश. कुठेही मळभ नाही. निरभ्र चांदणं, हलकी गुलाबी थंडी, ओढाळ पहाट वारा,हलक्या धुक्याची चादर लपेटून उगवणारी सकाळ .आमची साखरझोप अलगद ओसरायची ती आजीच्या काकड आरतीच्या आवाजानं. तो वृद्ध, क्वचित बेसूर पण श्रद्धेनं ओतप्रोत भरलेला आवाज कमालीची उब द्यायचा. त्याच्या जोडीला घराघरातून अंगण झाडल्याचा आणि सडा शिंपण्याचा आवाज यायचा. देवघरातला उदबत्ती, कापराचा गंध, अंगणातल्या शेणाच्या सणाचा मृदगंध... हे सगळे नादगंध एकत्र होऊन थेट मस्तकात भिनायचे. ते पहाटेचं वातावरण इंद्रियांना खुळावायचं. आम्ही सगळी भावंडं अंथरुणात उठून बसायचो, खुदकन हसायचो आणि म्हणायचो, 'दिवाळी आली बरं का'.......   

  मग सारवलेल्या अंगणात रांगोळी काढण्याची लगीनघाई. सगळ्यांची अंगणं रांगोळीनं रेखलेली,आणि घरांवर झुलणारे आकाशकंदील बघून मन हरखून जायचं. 

  त्या वेळेची पहाट अशी नादावून टाकायची आणि मग जसा जसा दिवस वर चढायचा तसे तसे आणखी अनेक व्यावहारिक नादगंध त्यात येऊन मिसळायचे. सणासुदीचे जीभेला चाळवणारे, भाजण्याचे तळण्याचे गंध, घराच्या रंगरंगोटीचा उग्र गंध,  कोऱ्या वस्त्र प्रावरणाचे गंध एकत्रित होऊन मनाला वेडावून टाकायचे. एरवी सुस्त, एकलकोंडी, आत्ममग्न असणारी दुपार या काळात कशी जिवंत होऊन जायची. लहान मुलांचा धांगडधिंगा, मातीचा किल्ला करताना होणारी भांडणं, घराघरातून काही कुटण्याचे, ठोकण्याचे, भांडी घासण्याचे आवाज.. हे सगळे ध्वनी कर्कश असले तरी ते खूप भावायचे. त्यात एकच झपाटून टाकणारा विचार असायचा.....'दिवाळी आली बरं का'.......

 मग घराघरात, रस्त्या रस्त्यात, तनामनात  दिवाळी भिनू  लागायची.निसर्गाला,माणसाला चैतन्याचं वाण देत ती उंबरठ्यापाशी येऊन उभी राहायची. 

           नरक चतुर्दशीला तर नरकात पडू नये याची  धास्ती असल्याने झोपच यायची नाही. भल्या पहाटे उठणं, हवेतला किंचित गारवा, दूरवर दिसणारी दिसणाऱ्या पणत्यांची लवलव, आईने केलेलं औक्षण, सुगंधी तेल- शिकेकाई यांनी केलेलं अभ्यंग स्नान हे सगळं आठवलं की आजही अंगावर रोमांच उठतात. घर परिसराच्या स्वच्छतेबरोबर मनही स्वच्छ आणि नितळ होऊन जायचं .लक्ष्मीपूजनाचा दीपोत्सव तर प्रतीकात्मक आहे. कितीतरी सांस्कृतिक, धार्मिक कथा या पूजनाशी जोडल्या  आहेत.त्या आज कालबाह्य वाटू शकतात.पण कालसुसंगत विचार  केल्यास, अज्ञानाच्या अंधारावर विजय मिळवण्यासाठी हा दीपोत्सव आहे.माणसाच्या मनातल्या सगळ्या सद्प्रवृत्तींचा हा उत्सव आहे. जगातलं जे जे उत्तम आहे त्याचा हा उत्सव आहे .शब्द, स्पर्श, रूप,  रस,व गंध या पाच विषयांच्या उत्कटतेचा हा उत्सव आहे. लक्ष्मीपूजनासाठी सुसज्ज असलेले देवघर म्हणजे  समृद्धी व कलात्मकतेचा संगम.  चांदीची लखलखीत भांडी, सुवर्णाचे अलंकार, पिवळ्या केशरी झेंडूच्या फुलांची आरास, हिरव्याकंच  आंब्याच्या पानांचं तोरण, पंचपक्वान्नाचा प्रसाद, रंगाची उधळण करणारी रांगोळी, 

आणि या  कलात्मक दृश्याला तेजःपुंज करणारे दिवे. ते केवळ लक्ष्मीपूजन नसतं तर माणसा माणसातल्या ईश्वरी अंशाचं, सात्विकतेचं पूजन असतं. अशी ही दिवाळी.....

 मनाला तृप्त करणारी,  सगळ्या काळज्या, चिंता नैराश्य ,थोड्या काळासाठी तरी वळचणीला टाकणारी,  स॓पूर्ण घरावर तृप्तीची एक साय पांघरणारी..... 

     अशी ही दिवाळी दरवर्षीच येते. पण तो दिवाळीचा लहानपणीचा माहौल मला सापडतच नाही. हल्ली दिवाळी नुसतीच येते आणि जाते.  रीत  आणि परंपरा म्हणून ती उत्साहाने निभावली जाते तर रेटलीही जाते कधीमधी.  खरंच सणावारांनी आनंद मिळण्याचे दिवस राहिलेत कुठे आता? आता तर आनंदाचे, उत्साहाने निथळून जाण्याचे स्रोत इतके वेगळे आहेत की सण उत्सवांची अडचणच व्हायला लागली आहे.आजकाल दिवाळीत सहली काढण्याची फॅशनच झाली आहे. दिवाळीचा उद्देश, प्रयोजन यांच्याशी फारसं कुणाला सोयरसुतक नसतं. दिवाळीची चाहूल लागते ती बाजारात 'भव्य फेस्टिवल ऑफर ','उत्सव स्पेशल' , फटाके, अनंत भेटवस्तू, आकाश कंदीलांचा झगमगाट, खाद्यपदार्थांची रेलचेल, कपड्यांचे मनोहारी प्रकार, दागिने ,भांडीकुंडी यांनी ओसंडून जाणारी दुकानं यामुळेच. आणि हा आनंद विकत घेण्यासाठी  लोकांची उडालेली जीवघेणी झुंबड  बघून मन धास्तावतं.  मनावर ताण येतो. व्यक्तिगत आयुष्यातले समरसून जगण्याचे काही क्षण या दिवाळीमुळे आपल्या वाट्याला येतात त्यावरही बाजाराचं, धंद्याचं आक्रमण. दिवाळी कशी साजरी करावी याचा विचार करायलाही उसंत मिळत नाही. ही सगळी दिवाळी झगमगटात, पोषाखात,कृत्रिम आनंदात हरवलेली वाटते. ऋतू येऊन सादही घालतात, नाही असं नाही. पण त्यांना प्रतिसाद द्यायला आपल्या मनाची कवाडं उघडी कुठे असतात?     

           आज मी सुद्धा ती लहानपणची राहिलेली नाही. अवतीभवतीचं जगही तसंच राहिलेलं नाही. माझी लहानपणची दिवाळी आता तशीच असणार  नाही हेही मला माहित आहे .तरीसुद्धा पहाटेचा खुळवणारा वारा मी नक्कीच उर भरून घेऊ शकते. अश्विनात फुलणाऱ्या पिवळ्या जर्द झेंडूचा गंध आजही मला, 'दिवाळी आली बरं का' हे सांगायला पुरेसा आहे. कितीतरी हळवे ,उत्कट क्षण

 आजची दिवाळी सुद्धा मला देतेच पण त्यासाठी मनाचा कप्पा उघडा असावा लागतो. त्यातल्या आठवणी मोरपिसासारख्या गालाला लावून अनुभवायच्या असतात. बाकी दिवाळी दरवर्षी येतेच आणि साजरीही होतेच.पण आजच्या दिवाळीतही  चित्तवृत्ती फुलविण्याची शक्ती आहे हे खरंय.दिवाळीचा संचार अंगात हळूहळू होतोच.उत्साहाचं,सकारात्मकतेचं,

आनंदाचं रसायन शरीरातून वाहतं ठेवण्याची क्षमता दिवाळीच्या वातावरणात असतेच असते.

 दिवाळी कशी साजरी करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ही भौतिक दिवाळी आपण नेहमीच अनुभवतो.आता मनातली दिवाळी साजरी करू या.

 "अंतरंग  उजळणारे दिवे,

 सल,द्वेष नष्ट करणारं अभ्यंगस्नान,

 जीवन रंगीत करणारी रांगोळी,

 सदवृत्ति आणि विवेकाचं पूजन  

 आपुलकीनं 'या' म्हणणारा आकाशदिवा,

  स्नेह आणि नाती जपणारा फराळ,

विश्वास आणि मैत्रीची ओवाळणी,

हीच खरी दिवाळी........

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...