१२ जून. पुलंचा स्मृतिदिन. पुलंना आठवायला स्मृतिदिन कशाला हवा? ते तर रोजच कुठे ना कुठे तरी भेटतातच. - - हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य असलं तरी ते वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण त्यामुळे स्मृतिदिनाचं महत्त्व कमी होत नाही. या दिवशी या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या आठवणींना,साहित्याला, कर्तृत्वाला व्याख्यानाद्वारे, लेखाद्वारे, काही नियोजित कार्यक्रमाद्वारे उजाळा मिळतो आणि त्या व्यक्तिमत्त्वाची परत नव्याने ओळख होते. नवीन पिढीला प्रेरणा मिळते. मनात आनंद आणि अभिमानाची भावना जागृत होते.आपल्या श्रद्धेय व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक निमित्त असतं. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.
योगायोगाने १२ जून २०२१ ला पुलंच्या "एक शून्य मी" या पुस्तकालाही वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुलंच्या निधनानंतर, त्यांच्या स्मृतिदिनी मौज प्रकाशनाने हे पुस्तक १२ जून २००१ साली प्रसिद्ध केलं. अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या पुलंच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात अगदी १९६२, ६४आणि ६९ साली लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे तर काही लेख हे १९९२, ९६ आणि ९९ सालातले आहेत. उर्वरित लेख हे १९७० ते ९० या कालावधीतले आहेत.
खरंं तर "एक शून्य मी" हे पुलंच्या पुस्तकाचं शीर्षक वाचूनच मनात प्रश्न निर्माण होतो आणि यात नेमकं काय असेल ही उत्सुकता ताणल्या जाते. पुलंचं साहित्य ढोबळमानानं विभागायचं ठरवलं तर, - विनोदी, वैचारिक, व्यक्तीचित्रणात्मक आणि नाटकं -- असं होऊ शकेल. त्यातल्या त्यांच्या वैचारिक आणि व्यक्ती चित्रणाच्या लिखाणाचा बाज नेहमीच सकारात्मक आणि कौतुकाचा आणि गुणग्राहकतेचा राहिलेला आहे. व्यक्तिंविषयी, सामाजिक कार्याविषयी,संस्थांविषयी लिहितांना पुलंनी उत्तम, उदात्त उन्नत, सुंदर अशा बाजूंवर प्रकाश टाकलेला आहे त्यामुळे ते लिखाण अत्यंत टवटवीत , ऊर्जस्कर आणि दिशादर्शक झालं आहे. यावर अर्थातच मधून मधून विनोदाचा तडका असल्यामुळे ते परत परत वाचावंसं वाटतं. त्यांच्या लेखनात कुठेही नकारात्मकता, वैफल्य, निराशा, वैताग असा सूर कधीच नसतो. मग ते कोणतेही लिखाण असो. अशा वेळी "एक शून्य मी" या पुस्तकातून पुलंना नेमकं काय सांगायचं असेल, ही उत्कंठा होतीच.खरंतर, "एक शून्य मी" पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत.आजवर अनेक वाचकांनी त्याची पारायणंही केली असतील. पण या पुस्तकातला "एक शून्य मी" हा लेख नेहमीच मला व्यथित करुन जातो.त्यातून एका निराळ्या पुलंचं दर्शन होतं. स्मृतिदिनाच्या निमित्तानं 'त्या' पुलंचं स्मरण............
आजच्या या अतिवेगवान तांत्रिक युगामुळे माणसांमधील बोथट होत जाणाऱ्या संवेदना आणि खिळखिळ्या झालेल्या जाणिवांमुळे पुलं व्यथित झालेले आहेत आणि ती खंत त्यांनी विविध लेखांद्वारे व्यक्त केली आहे, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.
आपल्या अनेक व्यथा, विवंचना, वैताग तसंच उदासीनतेवर उत्तर मिळवण्यासाठी किंवा निखळ मनोरंजनासाठी पुलंच्या साहित्याचा आधार घेण्याची सवय लागलेल्या वाचकांना "एक शून्य मी" या पुस्तकात प्रश्नांच्या फेर्यात अडकलेले पुलं दिसतात, तेव्हा मन खिन्न होतं. "एक शून्य मी" हा या पुस्तकातील एक लेख आहे आणि तेच नाव पुस्तकाला दिलेलं आहे. अर्थात पुस्तकातील सगळेच लेख खिन्न करणारे नाहीत.पण "एक शून्य मी" हा लेख अस्वस्थ करतो.
आपल्या देशातली ढासळत चाललेली मूल्यं बघून,
"कधी कधी वाटते,की हे संगीत, साहित्य, नाटके- आनंदनिधाने शोधण्याची हौस आपल्याला मुळातच नसती तर फार बरे झाले असते"- असं पराकोटीचं निराश विधान त्यांनी या लेखात केलेलं आहे.
" कारण असल्या क्षणांची झपाझप वजाबाकी होत असते. आणि बाकीचे जे जे काही पाहायला लागते ते मात्र कमालीचे विसंवादी असते." असं त्यांनी लिहिलेलं आहे. जे वाचतांना पुलंचा कधीही न दिसलेला निराशेचा सूर काळजात कळ आणतो.
ज्या श्रद्धास्थानांच्या बळावर पुलंनी आयुष्यात जगण्याची दिशा ठरवली होती त्यांच्याबद्दलही कमालीच्या विषण्णतेनं त्यांनी लिहिलं आहे.
"कधी कधी मनापासून चिनी भोजनाचा आनंद लुटल्यावर नेमकं लक्ष रस्त्यावरच्या एखाद्या चिंध्यांनी अब्रु लपवलेल्या भिकारणीकडे आणि तिच्या अस्थिपंजर पोराकडे का जावं? सगळ्या चैनीची क्षणात वजाबाकी होते. अशा वेळी राग येतो तो फुले, आगरकर, टिळक, गांधी, साने गुरुजी ह्यांसारख्या मला सतत फसवत गेलेल्या लोकांचा! मनाचे आणि बुद्धीचे नाही ते कोपरे उजळून जायला ह्या लोकांना कोणी सांगितलं होतं?"
प्रत्येकालाच आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अनेकदा वैफल्य येतं, निराशा दाटून येते. पुलंनाही असे अनुभव असणारच. पण मनातली ती खळबळ, वाचकांसमोर खुल्या दिलानं मांडण्यासाठी, या प्रसिद्ध लेखकाला काही पायऱ्या उतरुन खाली यावं लागलं - - जे त्यांनी सहजपणे केल्यामुळे, "एक शून्य मी" हे पुस्तक, पुलंचं एक पारदर्शक रुप वाचकांसमोर घेऊन आलेलं आहे .
प्रश्नांच्या फेर्यात अडकलेले पुलं उत्तर शोधताना, "एक शून्य मी" या लेखात लिहितात,
"प्रश्नांचे भुंगे जन्मालाच कशाला येतात? डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे. कुणाचीच नाही. मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हा देखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामचिन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती."
स्वतःला शून्य म्हणून घेण्याची ही पुलंची अस्वस्थता आणि सच्चेपणा वाचकांनाही व्याकूळ आणि अंतर्मुख करून सोडते.त्यांचं, हे असं परखड आत्मपरीक्षण शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवणं किती धाडसाचं आहे - हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य . अर्थातच या अस्वस्थतेचे मूळ कारण म्हणजे पुलंची टोकदार संवेदनशीलता आणि जीवनातल्या चांगुलपणावरची प्रबळ निष्ठा.
"एक शून्य मी" हा लेख १९७४ साली लिहिलेला आहे. आज ४७ वर्ष उलटली आहेत. आज परिस्थिती बदललीय पण छळणारे प्रश्न आजही तसेच आहेत. आजही हा लेख कुठेही कालबाह्य वाटत नाही.आजही त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीतच.
याच पुस्तकात विनोबांबद्दल लिहिताना पुलं म्हणतात, "विनोबांनी तीन प्रकारच्या संततीचे वर्णन केले आहे. औरस, दत्तक आणि मानस. मानस संतती सर्वात उत्तम कारण ही संतती आपल्या मानलेल्या बाबांच्या विचारांचा आणि आचारांचा वारसा घेऊन तो वाढीला लावते. विनोबांना बाबा म्हणण्याचा अधिकार या मानस संततीचा. हा अधिकार मला नाही"
विनोबांचा विलक्षण प्रभाव पुलंवर होता.विनोबांचं साहित्य हे त्यांचं श्रद्धास्थान. पण त्यांना बाबा म्हणण्याचा अधिकार मला नाही हे कबूल करण्याचा पुलंचा मोठेपणा त्यांच्या स्वभावाची उंची दाखवून देतो.
आज या स्मृतिदिनाच्या निमित्ताने "एक शून्य मी" या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटला कारण त्यातून पुलंचं स्वतःचं परखड मूल्यमापन करणारं "माणूसपण" पानापानातून डोकावत राहतं.प्रसिद्धीची,मोठेपणाची,लाडकेपणाची झूल उतरवून,सामान्य माणसाच्या पातळीवर उतरुन, समाजातल्या छोट्या छोट्या प्रश्नांचा शोध घेणं.आणि त्याबरोबरच स्वतःचाही शोध घेणं - म्हणजे "एक शून्य मी". सामाजिक बांधिलकी जपण्याचं तत्व आयुष्यभरासाठी अंगिकारल्यावर, जगण्यातल्या चांगूलपणावर असलेला विश्वास जेव्हा डळमळीत होऊ लागतो तेव्हा प्रांजळपणे दिलेला कबुलीजबाब म्हणजे "एक शून्य मी".
पुलंच्या याच उन्नत प्रांजळ स्वभाववैशिष्ट्यांना आज आपण वंदन करु या.
#एकशून्यमी
#पुलदेशपांडे
#मौजप्रकाशन
#विनोबाभावे
