Sunday, October 22, 2023

दसरा - गरज वैचारिक सीमोल्लंघनाची

 


हल्ली मोबाईल किंवा टीव्हीवर, ' द ग्रेट इंडियन फेस्टिवल' ही एमेझाॅन सेल ची जाहिरात दिसायला लागली की समजावे - सणासुदीचे दिवस आलेत.म्हणजे सण आले की खरेदी करायचीच हे समीकरण बाजारपेठेने आपल्या मेंदूवर कोरुन ठेवलेय.नखशिखांत दागिन्याने मढलेल्या,उंची तलम वस्त्रे ल्यायलेल्या अत्यंत देखण्या स्त्रिया चुटकीसरशी विविध प्रकारच्या मिठाया स्वतः तयार करुन घरच्यांना आग्रह करुन खाऊ घालणारी जाहिरात दिसली की समजावे सण आलेत.(अशा महान स्त्रिया शोधा आणि हजार रुपये मिळवा.....अशी माझी फार दिवसांची...असो) मुद्दा हा की सध्या समाजात दोन प्रकारचे समूह प्रामुख्याने दिसतात. सण असले की निर्बुद्ध मालिकेत़ बघितलेल्या सणांचे  उत्सवी , पोषाखी अनुकरण करणारा एक समूह.... हे म्हणे संस्कृतीचे (?) जतन करतात. आणि दुसरीकडे कायम अर्ध्या चड्ड्या घातलेला,दाढीचे खुंट वाढलेला, वर्षभरात कंगवा न लागलेले विस्कटलेले केस असणारा , सदैव लॅपटॉप बडवणारा समूह.यांना  दिवस,रात्र, आंघोळ,जेवण, झोप, सणवार....यांच्याशी कवडीचेही देणेघेणे नसते. ओटीटीवर आवडत्या सीरियलचा सीझन येई दुसरा / तिसरा... तोची दिवाळी दसरा......असेच असावे कदाचित.

      आणि या दोन टोकांच्या मधे असणारी आमची मध्यमवयीन पिढी. एकीकडे लहानपणी साजरे केलेल्या सणांचा सात्विक आनंद शोधण्याची धडपड तर दुसरीकडे सणांचे श्रेयस पकडून ठेवण्याची असमर्थता.

      हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकताच येऊ घातलेला दसरा.दसरा दिवाळीची चाहूल हीच मुळात ऊर्जादायक  असते पण ती केव्हा? जेव्हा बदललेला ऋतू याची हळूवारपणे जाणीव करून देतो तेव्हा.

                    सोन पावलांनी येणारा अश्विन महिना येतानाच भक्ति आणि शक्तीचा संदेश घेऊन येतो. अश्विनातले लख्ख केशरी ऊन, मोकळी हवा, निरभ्र आकाश, टिपूर चांदणे, पिवळ्या- नारिंगी झेंडूंनी रंगलेला निसर्ग..... सगळेच कसे मेंदूला  चेतवणारे असते. अश्विनाच्या हवेतच ऊर्जा असते. नऊ दिवस जगदंबेची केलेली उपासना आणि दहाव्या दिवशीचा दसरा...हे सगळेच दिवस  चैतन्याने रसरसलेले असतात.            

          त्यात मनुष्यप्राणी हा उत्सवप्रिय आहे. भारतीय संस्कृतीत अत्यंत कल्पकतेने आणि  योजकतेने या सण उत्सवांची रचना केली आहे. प्रत्येक सणामागे एक निश्चित विचारांची बैठक आढळून येते आणि त्याचवेळी येणाऱ्या ॠतूचे स्वागत केल्या जाते आणि सोबतच आरोग्याचा एखादा नियमही जोडला जातो.जीवनप्रणाली, विचारप्रणाली ,आणि उपासनाप्रणाली  या तिन्हींचे उन्नयन या सणामुळे व्हावे हे अपेक्षित असते. शुष्क उपदेश सांगितले असते तर ते टाळण्याकडेच माणसाची प्रवृत्ती असते पण सणावारांच्या माध्यमातून आणि प्रतिकांचा उपयोग करून ही संस्कृती आपल्या जीवनात रुजवली गेली आहे.सण उत्सवांद्वारे मन प्रसन्न होते,कौटुंबिक संबंध  दृढ होतात, सामाजिक जाणीवा व्यापक होतात तर प्रतिकांद्वारे बुद्धीचा विकास होतो. भारताचा  सांस्कृतिक इतिहास हा पुस्तकांच्या पानात नाही ,तर त्याच्या जिवंत उत्सवात लिहिला आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व शास्त्रीय माहात्म्य आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण सणांचा संबंध देहाच्या आणि मनाच्या आरोग्याशी तर आहेच पण आत्मिक समाधानाशीही आहे.मानवी जीवन कौटुंबिक,मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक समृद्ध करायचे असेल तर सण उत्सवा मागचा दृष्टीकोन लक्षात घ्यायला हवा.काळ आणि परिस्थितीनुसार कालबाह्य आणि निरुपयोगी प्रथा मोडीत काढून सणांमागचे तत्व व विज्ञान शाबूत ठेवणे गरजेचे आहे.

     या दृष्टीने दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव आहे. या सणासंबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराजय करण्यासाठी लंकेवर स्वारी केली आणि अश्विन महिन्यातल्या दशमीला रावणाला ठार मारले म्हणून या दिवसाला विजयादशमी असं म्हणतात. 

            दुसरी कथा महिषासुरमर्दिनी देवीची आहे पृथ्वीवरील जनतेचा छळ करणाऱ्या  महिषासुराचा नि:पात करण्यासाठी देवाने अष्टभुजा देवीचे रूप धारण करून, दहा दिवस युद्ध करून त्या राक्षसाचा वध केला म्हणूनही या दशमीला विजयादशमी म्हणतात.म्हैसूरला याच देवीला चामुंडेश्वरी या नावाने संबोधतात. 

       रघु राजाने विश्वजीत यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. अशात चौदा विद्या पारंगत असलेला कौत्स त्याच्याकडे दान मागायला आला.  याचकाला विन्मुख पाठवणे ही रघु राजाची संस्कृती  नव्हती.  म्हणून द्रव्य संग्रहासाठी त्याने इंद्रावर स्वारी केली .रघु राजाच्या अचाट पराक्रमाची कल्पना असल्यामुळे इंद्राने युद्धाचे कारण जाणून घेतले व कुबेराला रात्री  शमी व आपट्याच्या वृक्षांवर सुवर्ण मोहरांचा वर्षाव करण्याची आज्ञा दिली. रघुराजांनी या संपत्तीचे कौत्साला दान दिले. आवश्यकतेपेक्षा एकही सुवर्णमोहोर जास्त घेणार नाही हा कौत्साचा निश्चय होता तर या द्रव्याने मी माझी तिजोरी भरणार नाही हा रघु राजाचा आग्रह होता. शेवटी हे सोने लुटून घेण्याचा आदेश त्याने जनतेला दिला. लोकांनी त्या झाडाची पूजा करून  ते सोने लुटून घरी आणले, तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमीचा. तेव्हापासून या झाडाची पाने सोने म्हणून लुटण्याचा प्रघात आहे .

             पांडवांनी देखील अज्ञातवासात असताना आपली अस्त्रे शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. इतिहासाचा मागवा घेतल्यास विजयादशमी चा मुहूर्त स्वारी करण्यासाठी किंवा मोहीम सुरू करण्यासाठी फार महत्त्वाचा होता हे दिसून येते. शिवाजी महाराज, पेशवे याच मुहूर्तावर कूच करीत असत अशी इतिहासात नोंद आहे.                     

         हा सण साजरा करीत असताना सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे. ईशान्य दिशेला असलेल्या शमी किंवा आपट्याच्या  वृक्षाची पूजा करताना, 

    'शमी शमयते पापम् 

    शमी लोहित कंटका |

    धारिण्य अर्जुनं बाणानाम्      

     रामस्य प्रिय वादिनी |

तसेच, 

'अश्वंतक महावृक्ष, 

महादोष निवारणम् |

इष्टानां दर्शनम् देहि, 

कुरु शत्रुविनाशनम् | 

अशी प्रार्थना म्हणून नंतर शमी तसेच आपट्याची पाने आणायची असतात. ही पाने म्हणजे सुवर्ण मोहरांचे प्रतीक आहे. ही पाने आपण देवाला वाहतो, वडीलधाऱ्यांना, मित्रांना देतो. मला हे जे वैभव मिळाले आहे, त्याचा उपभोग मी एकटा घेणार नाही तर सगळ्यांना वाटून या आनंदाचा गुणाकार करायचा..... ही कल्पनाच किती उदात्त आहे. मित्रांबरोबर शत्रूशी ही प्रेमाचे नाते जोडायचे हा दसऱ्याचा संदेश आहे. या दिवशी शस्त्र लेखणी, वाहनांची पूजा करतात. म्हणजे ज्या साधनांनी आपली शक्ती वाढते त्या साधनांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही किती अभिनव कल्पना आहे.या दिवशी रावण दहन करतात.याद्वारे  मनातली दुष्ट वृत्ती नष्ट होऊन रामप्रवृत्तीचा उदय होण्याची प्रेरणा मिळावी हे अपेक्षित आहे. या सगळ्या पद्धती प्रतिकात्मक आहेत.पौराणिक  कथा या कपोलकल्पित असतीलही. पण लहानपणी अशा कथांवर विश्वास बसतो आणि त्यातून मिळणारा संदेश नकळतपणे संस्काररुपात खोलवर रुजत जातो. हे बालवयात झालेले संस्कार मनाला संयमी आणि विवेकी करतात आणि पुढील आयुष्यात सण साजरे करताना कधी वावगे वागू देत नाहीत. 

आश्विन महिना म्हणजे शरद ऋतू .आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील पित्त प्रभावी असते. पित्त म्हणजे बुद्धी, साहस, पराक्रम. अशावेळी प्रत्येकानेच एका चौकटीत बंदिस्त न राहता

 सीमोल्लंघन  करावे अशी अपेक्षा आहे. महिषासूरमर्दिनीचा पराक्रम, रामाने रावणावर केलेली मात,रघुराजाचे दातृत्व, पर धनाबद्दल विरक्ती,कौत्साची निर्मोही वृत्ति.....यातून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे.

  आजच्या युगात वैचारिक सीमोल्लंघन आणि त्यानुसार  केलेली कृती अपेक्षित आहे. या सणातला उत्साह, उल्हास ,आनंद, प्रेम हे जीवनाचे प्रेयस आहे तर,वैचारिक सीमोल्लंघन  हे आत्मशक्ती, संघटन शक्ती, अन्यायनिवारण यासाठी पोषक ठरणारे म्हणजेच या सणातील श्रेयस आहे. उत्सव साजरा करताना श्रेयस आणि प्रेयसाचा योग्य समन्वय हवा.

दसरा विजयाचा सण असल्यानं षड्रिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे सामर्थ्याचे, मैत्रीचे,परस्पर सामंजस्याचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

सण म्हणजे 'धम्माल ', 'मज्जामस्ती ' हे नक्कीच खरे आहे पण त्याचे रूपांतर   'धांगडधिंगा' व 'उन्मादात ' होऊ नये ..हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची तीव्र निकड आहे.

 'आला आश्विन आश्विन, 

 जाती सीमा उल्लंघून,

 लुटा समतेचं सोनं ,

गात मानव्याचं गाणं '

असा समानतेचा,वैचारिक उन्नतीचा,परस्पर सौहार्दाचा दसरा साजरा करु या.मोबाईलवर 'हॅपी दसरा' हा संदेश जगभरात पाठवणाऱ्या मेंढरांच्या कळपात सामील व्हायचे की नाही हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ. साधना कुलकर्णी

9422939510

drsadhana.k@gmail.com


  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...