Showing posts with label सिनेमा सिनेमा. Show all posts
Showing posts with label सिनेमा सिनेमा. Show all posts

Tuesday, July 11, 2023

बाईपणाचं दळण थांबव रे देवा

  




 जवळपास चाळीस पन्नास वर्षांपूर्वी  जो विषय ज्वलंत होता,ज्या विषयाचा चघळून चघळून चोथा झाला आहे तोच विषय आकर्षक स्वरुपात,कसलेल्या अभिनेत्रींना घेऊन, चुरचुरीत विनोदाची फोडणी देऊन,  तिन्ही त्रिकाळ प्रसिद्धीचा, प्रमोशनचा मारा करुन महाराष्ट्रातील स्त्री प्रेक्षकांवर थोपवलेला सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'.थोडक्यात काय, चित्ताकर्षक वेष्टनात गुंडाळलेली जुनी पुराणी वस्तू.किंवा नव्या बाटलीत जुनी दारु म्हणजे ' बाईपण भारी देवा '.

       बाई असल्यामुळे, सर्वसाधारणतः  कौटुंबिक,  भावनिक गुंत्यात अडकणं हा तिच्या जीवनातील अपरिहार्य भाग असतोच.त्यात नोकरी करुन घर सांभाळणाऱ्या बाईची तर तारेवरची कसरतच असते.  अशाच सहा सख्ख्या बहिणींच्या आयुष्यातले गुंते ही सिनेमाची मुख्य कथा.आणि त्यातून सुटण्यासाठी या सहा बहिणी जो भन्नाट (अजिबातच न पटणारा, अवास्तव) मार्ग निवडतात , तो म्हणजे 'बाईपण भारी देवा'. 

       मुळात या बहिणीं समोरचे प्रश्न अगदी क्षुल्लक आहेत.फक्त सुचित्रा बांदेकरच्या घटस्फोटाचा प्रश्न सोडून. त्यातही शिल्पा नवलकर,वंदना गुप्ते आणि रोहिणी हट्टंगडी यांची घुसमट ( जी अतिशय वरवरची आहे) त्यांनी स्वतःच निर्माण केली आहे.खरंतर काहीही कारण नसतांना चोवीस तास चेहऱ्यावर बारा वाजलेल्या रोहिणी हट्टंगडीच्या नवऱ्याचीच घुसमट व्हायला हवी होती.त्याचं पुरुष पण भारी रे देवा! या बहिणींची दु:खं म्हणजे तूप साखरेत घोळवून, लाडावून कुरवाळून मोठी केलेली दु:खं आहेत.अशा दु:खांना फारसं महत्त्व न देता आजची बाई जगण्याचा आनंद घ्यायला शिकली आहे. अशी फालतू दुःखें आम्ही आणि आसपासच्या बायकांनी अनेकदा अनुभवली आहेत आणि त्यातून लीलया बाहेर पडलो आहोत. बाईपणाच्या वास्तव दुःखांच्या आणि कोंडमाऱ्याच्या जवळपासही हा सिनेमा पोचत नाही.नुकतंच बाईपणातून बाहेर निघून एक माणूस म्हणून जगण्याच्या आजच्या काळात बाईला या सिनेमाने परत बाईपणात ढकललं आहे. शिकलेल्या,नोकरी करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या या सहा बहिणी इतक्या दुबळ्या का असाव्यात की, मंगळागौर स्पर्धेचा त्यांना आधार घ्यावा लागावा आणि तो ही एकत्रितपणे? आज समाजात ,भयंकर संकटांना एकटीने सामोरं जाऊन जीवनाच्या लढ्यात यशस्वी झालेल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी बाईपण भारी आहे हे सिध्द केलं आहे.अशावेळी हा उथळ सिनेमा निव्वळ हास्यास्पद वाटतो.

    मुलांचा वाढदिवसाचा सोहळा सुरु असताना कोणती आई प्रेग्नंसी टेस्ट करेल हो?आणि मेनोपॉज आला म्हणजे आभाळ कोसळलं की काय?(आम्हाला तर हायसं वाटलं बुवा) चिनूच्या ऑपरेशनच्या वेळेस तिचा नवरा आणि सासू कुठे होते? कडक अण्णा एकाएकी मऊ कसे झाले? स्टेशनवरचा नाच म्हणजे निव्वळ मूर्खपणाचा कळस.

       असो.कलाकार सगळेच कसलेले आहेत.वंदना गुप्ते कितीही आवडत असली तरी तिला आता बघवत नाही.  ती स्वतःच्याच प्रेमात आहे."मी- वंदना गुप्ते" याच ऍटिट्युड ने तिने काम करु नये. सुकन्या कुलकर्णी जबरदस्त .तिची बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरचे हावभाव  अप्रतिम. पण नोकरी करणारी बाई इतकी बावळट?असो.

       पण दिग्दर्शक केदार शिंदे खरंच हुशार.त्यांनी आजच्या मध्यमवर्गीय,मध्यमवयीन बायकांची मनोवृत्ती अचूक हेरली आहे. "मज्जा" आणि "एन्जॉय" हा प्राधान्य क्रम असणाऱ्या बायकांची नस त्यांनी बरोबर पकडली आहे. सिनेमातल्या वरवरच्या झगमटाला बाईपणाचं लेबल लावलं आणि त्याला नाव देतांना "भारी" या  जरीची झालर लावली.झालं. तमाम महिला वर्ग खुळावलाच की हो.  थिएटरला तीर्थयात्रेचं स्वरुप आलंय चक्क. बायका झुंडीने सिनेमाला ड्रेस कोड करुन जाताहेत,रील,फोटो काढताहेत. थिएटर मधून बाहेर निघताना आपण "कसल्या भारी" आहोत या आनंदात न्हाऊन निघताहेत. सगळ्याच बायकांचा आत्मविश्वास वाढलाय म्हणे हा सिनेमा बघून - अर्थातच... जमत नसेल, सोसत नसेल तरी सार्वजनिक ठिकाणी नाच करण्याचा हो. हा केदार शिंदे च्या यशाचा फॉर्म्युला. 

      खरंतर "बाईपण किती उथळ देवा"...असा समज या सिनेमामुळे होतोय.पण झापडं बांधूनच वावरायचं असेल तर देव त्यांना सद्बुद्धी देवो !!  असो. डोकं न वापरता सिनेमा डोक्यावर घ्यायचा हे ठरवूनच टाकलं असेल तर प्रेक्षक स्त्रियांचंही "बाईपण भारीच भारी" हो देवा.

     

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

#बाईपणभारीदेवा

Saturday, January 23, 2021

 जाने कहां गये वो दिन......                                                                  


     मी कॉलेजमध्ये शिकत असतानाचा तो काळ. चाळीस वर्षांपूर्वीचा. ते दिवसच वेगळे होते. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन डोसा खाणं ही एन्जॉयमेंट ची परमावधी होती. हो.डोसाच.कारण  सिनेमा आणि डोसा येवढीच चैन आर्थिकदृष्ट्या परवडायची.शिवाय पावभाजी,बर्गर,पिझ्झा या भावंडांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळी.

   बहुचर्चित असलेला सिनेमा रिलीज झाला की लवकरात लवकर तो थिएटर मध्ये जाऊन बघणं... यातली गंमत...अर्थातच 'थ्रील' आणि 'एक्साईटमेंट'... आजच्या पिढीला कळू शकणार नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा बघण्याचा रेकॉर्ड असणारी अनेक थोर व्यक्तिमत्वं आमच्या पिढीने बघितली आहेत. विशेषतः अमिताभ बच्चनचा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं हे तरुण पिढीच्या अनेक ध्येयां पैकी एक महत्त्वाचं ध्येय होतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.

   परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की सेंटर वरून डायरेक्ट थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची परंपराच होती त्यावेळी.  एखाद्या टुकार किंवा सामान्य सिनेमाचीच तेव्हा निवड व्हायची कारण अख्खा वर्ग एकत्र असल्यावर   सिनेमा बघण्यापेक्षा हुल्लडबाजीलाच चेव यायचा.परीक्षा  सुरू असतानाच, अभ्यास सोडून सिनेमाच्या तिकीटांची तजवीज करणारे  काही खंदे सिनेमावीर आमच्यात होते ज्यांचा मला आजही कमालीचा आदर वाटतो.

    सिनेमाची तिकिटं रांगेत उभं राहुन काढण्याचे ते दिवस होते. आणि हाउसफुल सिनेमांसाठी दोन-दोन तास रांगेत उभे राहण्याची आमच्यात  धमकही  होती. काही सुपरहिट सिनेमांचं  तर अॕडव्हान्स बुकिंग असायचं. अशी तिकिटं मिळविण्यासाठी जीवन-मरणाच्या पातळीवर जाऊन जो संघर्ष केलाय ना आम्ही त्याला तोड नाही.  प्रत्येक थिएटरच्या  मॅनेजर पासून डोअरकीपर पर्यंतच्या साखळीतल्या एका एका दुव्याचा सखोल अभ्यास करणारी काही  व्यासंगी,  संशोधक वृत्तीची मित्रमंडळी आम्हाला  माहित होती.वेळप्रसंगी  त्यांना हाताशी धरून ठेवण्याचं कसबही  आम्ही आत्मसात केलं होतं. तिकिटांचा काळाबाजारही त्यावेळी खूप चालत असे पण त्या भानगडीत मात्र आम्ही कधी पडलो नाही. आपला मध्यमवर्गीय पापभिरु बाणा हो.           

      फर्स्ट डे फर्स्ट  शो चा रेकॉर्ड कुठल्याही परिस्थितीत कायम ठेवणारा,  उज्वल भवितव्य असणारा ,शूर-वीर लढवय्या - -- असा  आमचा एक वर्गमित्र होता.  सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पाहिला तर त्याच्या मागच्या आणि पुढच्या पाच पिढ्या नरकात जाणार होत्या बहुतेक. 'सिलसिला' रिलीज झाला त्यावेळी महिनाअखेर होती. तिकिटाचे पंचवीस रुपये ही त्याच्याकडे शिल्लक नव्हते. (तिकिटाची किंमत पंचवीस रुपये हा आज विनोद वाटू शकतो पण ते खरं  आहे.)  घरापासून दूर राहणाऱ्या मुलांचा महिनाअखेर पॉकेटमनी संपूर्ण संपणं ही त्याकाळी नित्याची बाब होती. त्यावेळी ही आर्थिक ओढाताण मुलांनी कधीही पालकांच्या कानावर घातली नाही हे विशेष.आणि पालकही त्याबद्दल चौकशी करित नसत- हे त्याहून विशेष .घरुन मनीऑर्डर येईपर्यंत ही मुलं काय काय युक्त्या करीत हे जर लिहून काढलं तर आजच्या काळातलं बेस्टसेलर पुस्तक होऊ शकतं.असो. पंचवीस रुपये जमवण्यासाठी आमच्या बहाद्दर मित्राने  'मदत करा'- असं लिहून वर्गात एक  वही फिरवली. त्या  काळानुसार अवघे  पाच ते दहा रुपये वजन असणाऱ्या आमच्या पाकिटातून आम्ही प्रत्येकाने चार आणे,आठ आणे, एक रुपया, दोन रुपये पर्यंतची त्याला मदत केली आणि त्याचं फर्स्ट डे फर्स्ट शो चं व्रत सुफळ संपूर्ण झालं.

     एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी 'अभिमान' बघायला गेलो. अर्थातच गर्दी, धक्काबुक्की, खेचाखेची- यातून खिंड लढवून आम्ही तिकीटं मिळवलीत पण या लढाईत 'हाऊसफुल्ल'चा मोठा लाकडी बोर्ड मैत्रिणीच्या पावलावर पडला. जखम नव्हती पण पाऊल चांगलंच दुखावलं होतं. पण 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस'..... असा ध्यास असल्याने पायाकडे दुर्लक्ष करून ,आम्ही तहान भूक हरपून, अभिमान बघितला. सिनेमा संपल्यावर उभं राहिल्यावर जाणवलं की तिच्या  पावलावर प्रचंड सूज आली होती. डॉक्टरांनी पावलाच्या फ्रॅक्चरचं  निदान करून दीड महिना तिचा पाय प्लास्टरमध्ये बांधून ठेवला होता. आज सुद्धा, 'फ्रॅक्चर असतानाही मी सिनेमा बघितला'..... हा 'अभिमान' ती बाळगून आहे .

     'उमरावजान' मधल्या रेखाच्या नृत्यासाठी,'निकाह'मधल्या 'चुपके चुपके रातदिन' या गुलाम अलीच्या गझलेसाठी,'शक्ती' मधे राखीचा मृत्यू झाल्यावर दिलीपकुमार आणि अमिताभचा अबोल आणि चटका लावणारा सीन बघण्यासाठी, 'अंगूर'च्या शेवटच्या सीनमधली आजी बघण्यासाठी,'शोले' मधला प्रत्येकच सीन बघण्यासाठी .....आणि कशाकशा साठी एकाच सिनेमाचा वारंवार झिजवलेला उंबरठा...........अशी समर्पण वृत्ती असणारे भाविक आमच्यात खूप  होते.

त्याकाळी बाल्कनी आणि बॉक्स मधे बसणारी मंडळी उच्चभ्रू असायची.आम्ही  'रिझर्व्ह क्लास'चे वाटसरू  होतो. 

गच्च भरलेलं थिएटर .....

थर्ड क्लास मधली टपोरी पब्लीक......                                                              


थिएटर मधला काळोख ....

भारतीय सरकारची फिल्म डिव्हीजन प्रस्तुत  ब्लॕक अँड व्हाईट डॉक्युमेंटरी....

विको टर्मेरिक ची जाहिरात....

आणि सिनेमाला सुरुवात .....

हे सगळं  जादुई आणि उत्तेजित करणारं वातावरण असायचं. पुढच्या तीन तासात वेळप्रसंगी पडद्यावरची दुःख आपल्या काळजात ओढून घेऊन आम्ही घळाघळा रडत ही होतो.  जया भादुरी- मनोज कुमारचा 'शोर ',अमिताभ -जया भादुरी चा 'मिली' ,पद्मिनी कोल्हापुरेचा, 'आहिस्ता आहिस्ता', राजेश खन्नाचा 'आनंद ',रेखाचा 'जीवनधारा'.....अशा अनेक सिनेमांमध्ये -  प्रत्यक्ष जीवनातही जेवढं रडणार नाही तेवढं धो धो  रडून झालेलंय आमचं.  

    अगदी लहानपणी घराघरातून, वर्षातून दोन-तीनदा घरातल्या सगळ्या बच्चेकंपनीला पौराणिक किंवा ऐतिहासिक सिनेमा दाखवून आणायचा एक भव्य कौटुंबिक कार्यक्रम असायचा. त्यावेळी  'भक्त प्रल्हाद' बघतांना प्रल्हादाचा होणारा छळ बघून आम्हा सर्व भावंडांनी थिएटरमध्ये भोकाड पसरलं होतं -अशी एक वदंता आहे.....

    'माहेरची साडी'बघतांना तर रडून रडून बाया बापड्यांचे डोळे सुजत होते. गर्दी खेचण्यासाठी त्या सिनेमात ईंटरव्हल मधे लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला एक माहेरची साडी भेट मिळत  होती.

     सिनेमे आजही बघितले जातात. पण ते घरच्या होम थिएटर मधे नेटफ्लिक्स वर किंवा ॲमेझॉन प्राईम वर. मल्टीप्लेक्स मधे जाताना आॕनलाईन बुकींग केल्या जातं.   त्यामुळे  तिकीटं काढण्यासाठी रांग नाही , धडपड नाही इंटरवल मधला कोल्ड्रिंक च्या बाटल्यांचा आवाज नाही. गर्दी नाही, धक्काबुक्की नाही.त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.

 आमच्या काळातील तरुणाईला व्यक्त व्हायला आजच्या सारखी मोकळीक नव्हती आणि तशी साधनंही नव्हती .मग मनातलं खूपसं साचलेलं,बरचसं अव्यक्त असं त्या रुपेरी पडद्यावर जिवंत व्हायचं .पडद्यावरचं उमलून येणारं प्रेम,जीवघेणा संघर्ष , पिळवटून टाकणारं दुःख ,तनामनाला नाचवणारा आनंद आमचाच होऊन जायचा.

तो आमच्यासाठी केवळ सिनेमा नसायचाच मुळी.ते तर  स्वतःचंच जगणं  होतं- - औटघटकेचं का होईना पण .......ते स्वतःचंच जगणं होतं.

         आज पूर्वीसारखे सिनेमाभक्तही आढळत नाहीत .  

'होऊनिया वारकरी,पाहिली आज तुझी पंढरी'.....या ओढीनं थिएटरच्या दिशेनं वळणारी पावलं आता अभावानंच सापडत असतील.

      मला वाटतं ज्यांनी सिनेमावर मनापासून प्रेम केलंय, त्यांना अध्यात्माच्या वाटेवरून चालताना फारशी अडचण येत नाही. कारण अध्यात्मातल्या पायऱ्या - -

 मन निर्विचार करणं......

 'मी' ला विसरणं ......

तहानभूक हरपून समोरच्या पडद्याशी एकरुप होणं...... 

पडद्यावरच्या प्रसंगांमधे समर्पित होऊन.....

समाधी अवस्थेत जाणं......  हे सगळं सिनेमाभक्तांचं अनुभवून झालं असतं. 

'आता कोठे धावे मन', तुझे चरण देखिलेया' अशा ध्यासानं आमच्या पिढीतल्या अनेकांचं या  सिनेमा हॉलमध्ये भावजीवन समृद्ध झालेलं आहे. खूप तरल आणि आनंददायी अशा आठवणींचा तो खजिना आहे ज्यामुळे  आजही मन तेवढंच टवटवीत होतं आणि  म्हणतं- - - 'जाने कहां गये वो दिन........

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...