Sunday, November 15, 2026

धर्मेच अर्थेच कामेच...( न) अतिचरामि???*



- सध्या तरी लग्नाचा विचार नाही . माझा पीएचडी चा प्रोजेक्ट .. अजून २ वर्षे चालणार आहे त्यानंतर लग्नाचं बघू.... ३२ वर्षाची मुलगी

- नुकताच एका रिलेशनशीपचा ब्रेकअप झालाय त्यामुळे सध्या तरी लग्नापासून दूरच राहणं बरंय..... ३० वर्षाचा मुलगा.

- मूव्ह ऑन करतेय. सेट्ल व्हायला जरा वेळ लागेल. पुढे बघू.... उपवर तरुणीचा जाहीरनामा.

- दोघांमध्ये कम्पॅटेबिलीटी आहे की नाही या साठी 'लिव्ह इन' हा उत्तम पर्याय आहे...... जेन झी चं मत.

- मुलगा पसंत आहे पण एका अटीवर - लग्नानंतर घरात सासरची माणसे नकोत..... भावी वधूचा निश्चय.

- लग्नानंतरही एक्स गर्लफ्रेंडशी मैत्री कंटिन्यू करणार आहे.... भावी नवरोबांची मुक्ताफळं.

' मला आवडलाय तो मुलगा. घटस्फोटित असला तरी मला काहीही फरक पडत नाही.. ... ३५ वर्षाची मुलगी

' लग्न केलंच पाहिजे अशी सक्ति आहे का? नाहीच केलं तर काय बिघडणार आहे?.......३४ वर्षाची मुलगी

हल्ली घराघरात लग्नाळू मुला मुलींचे अशाप्रकारचे संवाद सहजपणे ऐकू येत असतात. जे या मुलांच्या दृष्टीने अत्यंत 'कूल' आणि 'सॉर्टेड' असे विचार असतात. गेल्या साधारणतः १०/ १५ वर्षापासून जेन झीं च्या अशा भूमिकांमुळे सुरुवातीला घराघरातल्या आई- बाबा, आजी आजोबांना ४४० व्होल्ट चे सांस्कृतिक धक्के (कल्चरल शॉक हो)  बसले . या झटक्यांमधून आई - बाबा आता कसेबसे सावरले आहेत पण आजी आजोबांचा थरकाप अजूनही कमी झालेला नाही. आता बॅकफूटवर जाऊन आजचे आईबाबा संरक्षणात्मक पवित्रा घेऊन फिल्डिंग करताहेत. तीसाव्या  वर्षी हल्लीची मुले लग्न करायचे की नाही हा विचार  करायला सुरुवात करतात. आई - वडिल त्यांच्या हिरव्या झेंडी ची वाट बघत बसतात. कारण मुलांच्या मनाविरुद्ध काहीही करण्याची आजच्या पालकांची हिम्मत नाही.   शेवटी एकदाचे लग्न करायचे ठरवले की टर्मस् अँण्ड कंडीशन्सची  मोठी चाळणी तयार होते. त्यातून भराभरा अनेक 'स्थळं' गळून जातात. त्यातून उरलेल्यांचा विचार करायचा तर तेही त्यांची चाळणी घेऊन उभे. त्यातून गळती झाली नाहीच तर कंपॅटेबिलीटी साठी बोलण्याची/ भेटण्याची सत्रे सुरू होतात. अनेक सत्रानंतर एक होकार देतो तर समोरचा विचार करायला आणखी वेळ मागतो. या द्राविडी प्राणायामा मध्ये आई वडिल बिचारे पाच वर्षाने म्हातारे होतात. आणि मग एकदाचे लग्न ठरले की या मुलगी - जावई तसेच सून आणि मुलगा यांनी आपले लग्न ' टिकवावे'.. एवढीच एकमेव अपेक्षा बिचाऱ्या आई बाबांची उरते.

         हो. कारण आजकाल घटस्फोट देखिल विवाह संस्थेतील एक मान्यताप्राप्त वलयांकित घटना ठरली आहे. पंधरा, वीस वर्ष  संसार केल्यानंतर, ' दीर्घकाल चर्चेअंती, शांतपणे, सामंजस्याने, कोणतीही कटुता न ठेवता आम्ही 

 विभक्त होत आहोत. पती पत्नी नसलो तरी आमच्यात मित्रत्वाचं नाते असणार आहे. याशिवाय आमच्या मुली/ मुलासाठी आम्ही कायम उपलब्ध राहू.' - - असा आवर्जून जाहीरनामा प्रसिध्द करण्याची सध्या टूम निघाली आहे. प्रसिध्द व्यक्तिं नी  आपल्या तथाकथित सामंजस्याचा असा झेंडा फडकवला  की त्यांचे चाहते निघालेच तो झेंडा घेऊन ठिकठिकाणी ध्वजारोहण करायला. वास्तविक घटस्फोट ही वैयक्तिक बाब आहे, मग तो एकमेकांच्या झिंज्या उपटून घेतलेला असो वा विचारांती घेतला असो. पण अशा घटनांना जाहीर प्रसिध्दी दिल्यामुळे हळूहळू समाजात त्यांना मान्यता मिळू लागते. शिवाय 'अपत्यासाठी आम्ही कायम एकत्र येऊ' हे ' कलम' त्यात टाकल्यामुळे घटस्फोटाच्या घटनेचं गांभिर्य सौम्य होण्यास मदत होते. परिणामी घटस्फोट हा विवाह संस्थेतील एक सहज, सोपा, योग्य पर्याय ठरू लागला आहे.

त्यामुळे आपला मुलगा -मुलगी लग्नाला तयार होणार की नाही? तयार झालेत तर त्यांच्या पसंतीचा जोडीदार मिळून त्यांचे लग्न जमणार की नाही? लग्न जमल्यावर प्रत्यक्ष लग्नकार्य होईपर्यंत ते टिकेल का? आणि शेवटी लग्न झाल्यावरही त्यांचा संसार अभंग राहिल का? हे यक्षप्रश्न आजच्या आई वडिलांसमोर उभे आहेत.

      अशी परिस्थिती समाजात नेमकी कशामुळे निर्माण झाली? विवाह संस्था तकलादू तर होत नाहीये ना? पती- पत्नीच्या नात्यात उथळपणा येत चाललाय का? कुटुंब व्यवस्था विसविशीत होतेय का? बदलाचा प्रचंड वेग, समाज माध्यमांची घट्ट पकड, अनिश्चितता यामुळे विवाह या घटनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे का? या सगळ्यांचा उहापोह करण्याची आज वेळ येऊन ठेपली आहे. लग्नाची, किंबहुना ते टिकवण्याची भीती तरूण पिढीत का निर्माण झाली असावी? या साठी इतिहासात जाऊन बदलत जाणाऱ्या विवाह संस्थेचा आढावा घ्यावा लागेल.

      प्राचीन काळापासून विवाहाचा उद्देश हा लौकिक आणि पारलौकिक मूल्यांच्या समन्वया वर आधारित आहे. जीवनविषयक चारही पुरुषार्थ आणि चार आश्रम यांच्या तात्विक बैठकीवर विवाहाची योजना केली आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती ही धर्माच्या आधाराने, भौतिक सुखे उपभोगूनच होत असते. आपल्या समाजातली आश्रम व्यवस्था ही त्यासाठीच निर्माण केली आहे. मानवी जीवनाचा कालावधी हा ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या चार आश्रमात विभागला आहे. विवाहानंतरच व्यक्तिला गृहस्थाश्रमात प्रवेश मिळतो. या काळात 'अर्थ' आणि 'काम' या दोन पुरुषार्थांना धर्माच्या आधाराने जिंकायचे असते. इतर तीनही आश्रमातील लोक हे गृहस्थाश्रम व्यवस्थेवरच अवलंबून असल्यामुळे  गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्व दिल्या गेले आहे. अपत्यजन्म म्हणजे पितृऋणातून मुक्ती होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होणे. अशा पारंपारिक मूल्य व तत्वांमुळे समाजात विवाहाची अपरिहार्यता आणि अनिवार्यता लक्षात येते. म्हणजे त्यावेळी मूल पाळण्यात असतांनाच ज्येष्ठ मंडळी त्यांचे विवाह ठरवून ठेवीत. अर्थातच या परंपरागत हिंदू विवाहात पूर्वी व्यक्तिस्वातंत्र्याला काडीचेही महत्व नव्हते. देव, पितर, ऋषी आणि समाज यांच्या ऋणांची फेड करण्यासाठी विवाहाची योजना केली जात होती. वंशसातत्य राखणे हा देखिल विवाहाचा मुख्य हेतू होता. वैदिक आणि धार्मिक संस्कारांनी संपन्न झालेल्या विवाहाला पवित्र बंधनाचे स्वरूप प्राप्त होते अशी पूर्वी आणि आजही श्रद्धा आहे.  देवाब्राम्हणा समोर, अग्नीदेवा च्या साक्षीने  वडिलधा-यांच्या आशीर्वादाने होणारा विवाह हा व्यक्तिगत  जीवनात, कुटुंबात, समाजात मान्यता पावलेला असतो  . या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदारी, विश्वास, निष्ठा इत्यादींचे पती पत्नीच्या नात्यात  पूर्णतः पालन करावे अशी पूर्वी आणि आजही अपेक्षा आहे . या विवाहपद्धतीत पत्नीने स्वतंत्रपणे विचार करण्याची पद्धत/ मुभा नव्हती. पतीशी एकनिष्ठ राहिलेल्या सीता, सावित्री, मंदोदरी तारा, अहिल्या या पतिव्रता स्त्रियांचा आदर्श विवाहित स्त्री समोर ठेवला जात असे. पतीला त्याकाळी परमेश्वराचा दर्जा होता. या पातिव्रत्यासाठी  स्रियांनी सती जाण्याची अतिरेकी प्रथाही सुरु केली होती. 

         या प्राचीन उद्देशांचा आणि परंपरांचा विचार काळानुसार बराच बदलत गेला . पारलौकिक दृष्टीकोना ऐवजी  समाजमान्यतेनुसार नैतिकतेने लैंगिक जीवन जगण्यासाठी कायदेशीर, धार्मिक विधीचे पालन करून गृहस्थाश्रमाची सुरुवात करणे या हेतूने विवाह संपन्न होऊ लागले.  विविध नियम आणि सामाजिक संकेतानुसार विवाहानंतर प्रजोत्पादन करणे हे जबाबदार सामाजिक घटक निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक ठरु लागले. एका स्थिर कुटुंबाच्या निर्मिती मुळे  समाजातही शिस्त, नियम, कायदे, रीतिरिवाज पाळल्या जाऊ लागली.

अशी ही विवाह परंपरा आजतागायत अव्याहत सुरू आहे. मुलांचे शिक्षण आटोपून नोकरी लागली की पुढील टप्पा लग्न असणार हे आजही गृहित धरल्या जाते-अर्थातच आई वडिलांकडून. 

           ऐंशी नव्वदीच्या दशकात मुलामुलींच्या पसंतीला प्राधान्य देण्यात आले. त्याकाळात 'मुलगा नापसंत आहे' असे मुलगी पालकांना सांगू शकत होती पण कायम अविवाहित राहण्याचा विचार तिच्या/ त्याच्या मनाला कधीच शिवत नसे. वयाच्या पंचविशी नंतर विवाहाचा शिक्का लागला नसेल तर तो चर्चेचा विषय होई. वय वाढून अविवाहित असलेल्या मुलांनी जणू गुन्हा केला आहे या दृष्टीने समाज त्यांच्याकडे बघत असे. याशिवाय कधीकधी पैलतीरावर डोळे लागलेली घरातली आजीची भावनिक धमकीही असे. 'एकदा नातसूनेचं तोंड बघितलं की मी डोळे मिटायला मोकळी '. 'लाडू कधी देणार?' हा एकमेव राष्ट्रीय प्रश्न विचारून नातेवाईक आणि इष्ट मित्रपरिवार येवढे भंडावून सोडत की या भावनिक छळा मुळे वैतागून बरेचदा समोर येईल त्या स्थळाला होकार देऊन लग्न उरकले जाई  आणि निभावलेही जात असे. लग्नानंतर 'आता लौक्कर पेढे किंवा बर्फी द्यायची बरं का'.... ही नविन धमकी भात्यातून काढली जात असे. नातसूनेचे तोंड बघून टुणटुणीत झालेली आजी आता 'पणतू बघू दे...  एकदा डोक्यावर सोन्याची फुलं पडली की सरळ स्वर्गात जाईन' ही घोषणा करी. या काळात पती परमेश्वराची पदावनती होऊन त्याला 'नवरा' हा दर्जा मिळाला. अर्थात पदावनती होऊन सुंभ जळला तरी पीळ मात्र कायम राहिला. थोडक्यात काय, त्यावेळी ' लग्न' या विषयात कौटुंबिक आणि सामाजिक अजेंडे पाळल्याशिवाय पर्याय नसे. व्यक्तिगत  अजेंड्याचा प्रोग्रामच नव्हता की  हो मेंदूत.

पण आता विसाव्या शतकात ही सगळी कौटुंबिक आणि सामाजिक समीकरणे बदलली आहेत.आज

 व्यवसायाची सर्व क्षेत्रे स्त्रियांना उपलब्ध झाली आहेत व व्यावसायिक जगात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची स्वाभाविक व रास्त अपेक्षा स्त्रियांच्या ठायी निर्माण झाली आहे. परंपरेने त्यांच्याकडे चालत आलेली कुटुंबातील गृहिणीची भूमिका आजही तितक्याच समर्थपणे त्या पाळतात व त्याचबरोबरीने आपले करिअर पण सांभाळतात. घरकामात साहाय्यभूत होणारी अनेक यंत्रोपकरणे आता गृहिणीला सहज उपलब्ध झाली आहेत, तसेच ऑनलाईन खरेदीच्या सोयीमुळे घरकामाचा ताण बराच कमी झाला आहे.या सर्व घडामोडींचा भलाबुरा प्रभाव आधुनिक समाजातील विवाहसंस्थेवर पडणे अटळ व स्वाभाविकच आहे.

व्यक्तिवादी विचारसरणी आणि स्त्री-पुरुष समानता या मूल्यांच्या निकषावर विवाह संस्थेत अनुकूल बदल घडून आले आहेत जे स्वागतार्ह आहेत. . आधुनिक विवाहसंस्थेत जोडीदाराच्या निवडीचे स्वातंत्र्य वयात आलेल्या मुलामुलींना दिले जाते.आईवडिलांनी व ज्येष्ठ आप्तेष्टांनी मुलामुलींचा विवाह जमविण्याची पद्धती आता  समाजातून जवळजवळ नामशेष होत चालली आहे. ह्याचे महत्त्वाचे कारण नागरी समाजातील प्रचंड गतिमान अशा भौगोलिक व सामाजिक चलनशीलतेत आढळून येते. त्यामुळे नागरी समाजात शेजार असा उरला नाही. आज कुटुंबात पती, पत्नी आणि स्वतःची मुले येवढीच चौकट असल्याने  परिणामी मुलामुलींचे लग्न जुळविण्याची मक्तेदारी आता विवाह मंडळांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. विवाह मंडळे हा आज  फार  मोठा - व्यवसाय झाला आहे. आता आईवडील व आप्तेष्ट यांना सहयोगी किंवा एक्स्ट्रा कलाकारांची भूमिका मिळाली आहे. विवाह मंडळा मधून परस्परांना अनुरूप वाटणाऱ्या जोडीदाराची निवड करण्याची अधिकृत सोय- हा या काळातला विवाह संस्थेतला मोठा बदल आहे.

     आजकालच्या मुली फार हुषार, चटपटीत, धाडसी असतात असे सरसकट म्हटल्या जाते. पण याच मुली जेव्हा लग्नासाठी उभ्या राहतात किंवा सून म्हणून घरात येतात तेव्हा त्या आगाऊ, मनस्वी आणि आक्रमक  आहेत अशी संभावना केली जाते.

सुनेने किंवा विवाहित स्त्रीने कसे वागायचे याचे मापदंड समाजाने पुरातन काळापासून ठरविले आहेत. आणि विसंगती अशी की आजपर्यंत कितीतरी बदल पचवून , स्वीकारून, त्यांचे स्वागत करूनही समाजाची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी मात्र तीच पुरातन, पूर्वग्रहदूषित आहे. पुरातन काळापासून विवाह संस्थेत बळी गेला तो स्त्रियांचाच. अगदी पौराणिक काळातही राजकीय हेतूने लग्न लावली जात. एवढेच नाही तर राजकीय स्वार्थापायी पत्नीला, मुलीला, बहिणीला उपभोग्य वस्तू म्हणून गरजेनुसार इतरांकडे पाठवले जाई. इतिहासाचार्य श्री राजवाडे यांच्या  'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या ग्रंथात असे बरेचसे संदर्भ आढळतात जे आपल्या कल्पनेपलीकडचे आहेत. कुटुंबाला जोडून ठेवणे, मुलांचे संगोपन, घराचे व्यवस्थापन, प्रसंगी तडजोड, भावनिक आधार या सगळ्या बाबी आजवर स्त्रीच सांभाळत आली आहे. विवाह संस्था टिकवून ठेवण्यात स्त्रियांच्या त्याग आणि समर्पणाचे भरीव योगदान आहे.

'कार्येषु मंत्री - करणेषु दासी- भोज्येषु माता- शयनेषु रंभा- धर्मा नुकूला- क्षमया धरित्री' या अपेक्षांचे तिच्यावर कायम दडपण राहिले आहे. आणि त्यांची पूर्ती करतांना ती स्वतः ला विसरली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा पूर्णतः अभाव ते पुरस्कार या विवाहसंस्थेच्या प्रवासात स्त्री चा संघर्ष ज्ञात आहेच.

 पतीच्या बरोबरीने आपणही नोकरी अथवा विविध व्यवसाय करून अर्थार्जन करतो, तेव्हा पतीने आपल्या बरोबरीने घरकामाची व बालसंगोपनाची जबाबदारी उचलावी, अशी रास्त अपेक्षा आधुनिक समाजातील स्त्री करू लागली आहे. त्यामुळे आधुनिक समाजातील कुटुंब हे पितृसत्ताक राहिले नसून समसत्ताक झाले आहे. पतीला आता मित्राचा दर्जा मिळाला आहे. (ती पदोन्नती आहे की पदावनती, हे त्या - त्या पतीनेच ठरवावे ही विनंती.) मूल केव्हा व्हावे , किती मुले व्हावीत, याविषयीचे निर्णय घेण्याची क्षमता व स्वातंत्र्य आधुनिक समाजातील स्त्रीला प्राप्त झाले आहे. कुटुंबनियोजनाच्या प्रभावी साधनांच्या उपलब्धतेमुळे मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे तिला शक्य झाले आहे. लैंगिक सुख आणि मातृत्व यांची निसर्गाने जी सांगड घातली होती, ती आता प्रजननाच्या शास्त्रीय ज्ञानाने व संततिनियमनाच्या साधनांच्या क्रांतीमुळे तुटली आहे. मूल  होऊ न देता लैंगिक सुखाचा उपभोग घेणे आधुनिक समाजातील स्त्री-पुरुषांना आता शक्य झाले आहे. 

हे सगळे बदल स्त्रियांचे शिक्षण, नोकरी आणि आत्मभान यामुळे घडले आहेत. पण जुनाट चष्मा लावून बसलेल्या संस्कृती रक्षकांना कुटुंबातली स्त्री - पुरुष समानता अजूनही स्वीकारता येत नाहीय. त्यात २०१५ मे मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे विवाह संस्थेचे भविष्य डळमळीत होतेय  या शंकेला खतपाणी च मिळाले. इंदूर चा व्यापारी राजा रघुवंशी व सोनम रघुवंशी यांचं लग्न ११ मे २०२५ रोजी झाले आणि २० मे ला ते हनीमून साठी मेघालय येथे गेले.२३ मे ला ते नांगरेयाट गावातून बेपत्ता झाले. १ जून ला राजाचा मृतदेह वेई- सॉडोंग धबधब्याजवळ खोल दरीत सापडला. टॅटू वरून ओळख पटविण्यात आली. देहावर धारदार शास्त्राने वार केलेले आढळले. तेव्हापासून बेपत्ता असलेली सोनम ९ जून ला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका ढाब्यावर सापडली. तिने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. संपूर्ण जगाला या घटने मुळे हादरा बसला. पोलिसांनुसार, सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी लग्नाच्या आधीपासूनच म्हणजे फेब्रुवारी पासून राजा रघुवंशी च्या हत्येचा कट रचला होता. आणि त्याला मारायचा हा चौथा प्रयत्न होता. आधीच्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश आले नाही. या घटनेची पोलीसांनी ७९० पानी चार्जशीट दाखल केली आहे. २३ जुलै २०२६ ला सुप्रिम कोर्टाने सोनम ची जमानत रद्द केली आहे. व ३ आठवड्यांच्या आत कोर्टासमोर सरेंडर करण्याचा आदेश दिला आहे.

          ही घटना कशीबशी पचत नाही तोच केतन विशाल अग्रवाल , सक्सेस गृप या रिअल इस्टेट कंपनीचा संचालक याचा १८ जून २० १६ ला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून करण्यात आला. केतन आणि सिया गोयल यांचा साखरपुडा फेब्रुवारी २०२६ मध्ये झाला होता व जयपूर येथे नोव्हेंबरमध्ये लग्न  होणार होते. पण सियाचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी मेघालयातील 'ऑपरेशन हनीमून' घटनेचा सखोल अभ्यास केला. खूनावर आधारित चित्रपट, पाॅडकास्ट बघितले. मे अखेरीस लोणावळ्यात टायगर पॉईंट सह अनेक ठिकाणची रेकी केली. आणि जेथे सीसीटीव्ही नाही अशी जागा म्हणजे लोहगड. इथे आधीही एक महिला पडून मरण पावली होती. ३१ मे आणि १४ जून रोजी दोन वेळा सियाने केतनला लोहगडावर नेऊन ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. पण शेवटी १८ जून ला सिया या हत्येत यशस्वी झाली. सध्या सिया, चेतन आणि त्याचा मित्र हे तिघेही आरोपी येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. ५०५३ पानांचे आरोपपत्र पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केले आहे.

       या दोन घटनांमुळे केवळ दोन होतकरू तरुणांची हत्या झाली नसून विवाह संस्थेतील पावित्र्याची, निष्ठेची, विश्वासाची, नात्यातल्या संवादाची, प्रामाणिकतेची हत्या झाली आहे. सोनम आणि सिया यांच्या क्रौर्याची कमाल वाटते. आणि त्याहीपुढे जाऊन अशा घटनांची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? याची भिती वाटते. मुळात या मुलींना ठरविलेला जोडीदार नको होता तर त्यांनी नकाराधिकार का वापरला नाही? त्याउलट सरळ हत्येचा पर्याय स्वीकारला? याचा अर्थ त्यांचा कुटुंबाशी योग्य संवाद नव्हता किंवा कुटुंबाने त्यांच्यावर सक्ती केली असावी. पण तरीसुद्धा हत्येचे समर्थन होऊच शकत नाही. आणि ही हत्या  भावनेच्या भरात, गरम डोक्याने केलेली नाही तर थंड डोक्याने नियोजन करून केलेली हिंसा आहे जी जास्त घातक आहे.असे गुन्हे करण्यासाठी धाडस, क्रौर्य, सूडभावना, हिंसक वृत्ति लागते. या पाशवी भावना स्त्रियांमध्ये क्वचित आढळतात. त्यामुळे विवाह संस्थेचे भविष्य काय? पती -पत्नीच्या नात्यातली निष्ठा, बांधिलकी, विश्वास लोप पावत चालला काय? असे अनेक प्रश्नचिन्ह समोर उभे राहिले आहेत .

           पण NCRB (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) चा २०२४ चा अधिकृत डेटा सांगतो की वर्षभरात ५ ७३७ हुंडाबळी नोंदवले गेलेत. यात २०३ ८ मृत्यू उत्तरप्रदेशात झाले आहेत तर १० ७ ८ मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत.२०२३ मध्ये हाच  हुंडाबळी चा आकडा ६४ ५० होता. विवाहा नंतर पत्नीचा छळ, हत्या, अत्याचार, हिंसाचार असे अनेक पाशवी प्रकार दरवर्षी घडतात . जितके समाजासमोर उघड झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त अत्याचार प्रकाशात  आलेले नाहीत.  वर्षानुवर्षे जास्तीत जास्त हिंसाचार  पुरुषांनी स्त्रीवर केले आहेत. मग स्त्रियांनी केलेल्या आणि पुरुषांनी केलेल्या हिंसाचाराचे मापदंड वेगळे लावायचे का? दोन स्रियांनी हत्या केल्याबरोबर विवाह संस्था विसविशीत झाली का? कितीही हिंसाचार, अत्याचार झाले तरी विवाह टिकवून ठेवणा-यांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. कोणताही हिंसाचार असो, पुरुषाने अथवा स्त्रीने केला असो - तो समर्थनीय नाहीच. पण त्यामुळे परंपरागत रुजलेल्या विवाह संस्थेला बाधा येऊ शकत नाही. मात्र त्यामध्ये लक्षणीय बदल झाले हे नक्की.

आता विवाह संस्थेतील हे बदल नेमके कशामुळे झाले?

पहिला मुद्दा म्हणजे विवाहानंतर आर्थिक स्थैर्य व पुरुषाचा हक्काचा आधार मिळतो ही जुनाट संकल्पना झाली. आज मुली आर्थिकरित्या स्वतंत्र आहेत तसेच त्या एकटेपणाचा इतका बाऊ करित नाही उलटपक्षी त्यामुळे स्वातंत्र्य जपले जाते जे त्यांना गरजेचे वाटते.

दुसरा मुद्दा म्हणजे विवाहानंतर लैंगिक सुखाची सोय होते. या सोवळ्या कल्पना आता  अस्तित्वात  नाहीत. याऊलट विवाहा पूर्वी लैंगिक सुखाचा अनुभव नसलेली व्यक्ति कमालीची मागासलेली असते असा समज आहे. याला समाजमान्यता नसली तरी असे प्रकार सर्रास चालतात.

तिसरा मुद्दा म्हणजे कुटुंब नियोजनाची अद्ययावत साधने उपलब्ध असल्यामुळे सुरक्षित संबंध ठेवण्यात काहीच अडचण येत नाही व गर्भधारणेचीही भिती नसते.

चवथा मुद्दा म्हणजे विवाह विषयक कायदे , लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसा

 या बाबतीत कायदा व पोलीस यांचे संरक्षण मिळण्याची सोय यामुळे महिलांमध्ये निर्भयता निर्माण होण्यास मदत होते. 

पाचवा मुद्दा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. या प्रकाराला व्यापक स्तरावर सामाजिक मान्यता नसली तरी आता यावर चर्चा होऊ लागल्या आहेत.

सहावा मुद्दा म्हणजे घटस्फोट हा पर्याय. सामाजिक नियंत्रणाचा दबाव कमी झाल्याने, घटस्फोटितांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अधिक सौम्य व उदार झाला आहे.  विवाहबंधनाकडे धार्मिक भावनेतून पाहिले न जाता केवळ एक सामाजिक करार म्हणून पाहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने घटस्फोटावर धर्माचे नियंत्रण उरलेले नाही. 

तसेच न्यायसंस्थेच्या घटस्फोटाबाबतच्या उदार दृष्टिकोणामुळे घटस्फोट घेणे ही बाब आता अधिक सुलभ झाली आहे. परस्परसंमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे. पूर्वी घटस्फोट घेणारांना जसे सामाजिक टीकेस तोंड द्यावे लागत होते, तशी परिस्थिती आता आधुनिक समाजात राहिलेली नाही. 

सहावा मुद्दा म्हणजे ज्याप्रमाणे लैंगिक सुखासाठी विवाहाची गरज वाटत नाही तसेच मातृत्वासाठीही नाही. असिस्टेड रिप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी नुसार कोणतीही सज्ञान अविवाहित स्त्री डोनर स्पर्मच्या मदतीने आयव्हीएफ किंवा आययुआय पध्दतीने जैविक माता बनू शकते. ११ ते ५० वयोगटातील स्त्रिया याचा लाभ घेऊ शकतात. मुलाच्या जन्मदाखल्यावर फक्त आईचेच नाव असते. हा कायदेशीर पर्याय आहे. अनेक अविवाहित स्त्रियांनी याचा लाभ घेऊन मातृत्वाची इच्छा पूर्ण केली आहे. याशिवाय मूल दत्तक घेण्याचा दुसरा पर्यायही उपलब्ध आहे.

  विवाह संस्थेतील हे बदल काही अनुकूल आहेत तर काही सैल आहेत. त्यामुळे विवाह संस्थेसमोर आज नक्कीच काही आव्हाने आहेत.

-परफेक्ट पार्टनर, परफेक्ट लाईफ आणि परफेक्ट चाईल्ड या अवाजवी अपेक्षा आजच्या मुलांच्या आहेत, ज्या योग्य नाहीत.

 -लिव्ह इन आणि घटस्फोट हे पर्याय खुले आहेत, जे हवे तसे वापरले जातात. 

- अपत्य जन्माचा दर अतिशय खालावला आहे. ' मूल नको' हा निर्णय भविष्यावर प्रतिकूल परिणाम करणारा आहे. आणि ही आव्हाने काळा बरोबर वाढत जाणारी आहेत.


             पण असे असले तरी माणसाची सोबतीची गरज संपलेली नाही. हक्काची व्यक्ति, भावनिक सुरक्षितता आणि कुटुंबाची ऊब या गोष्टी भौतिक समृद्धीतून मिळत नाहीत. आजच्या आभासी जगात मानवी स्पर्श, संवेदना, नात्यांचे बंध, जिव्हाळा या सुखाची अनुभूती कुटुंबामुळेच होते. अनेक संवेदनशील तरुण आजही जाणीवपूर्वक एकत्र आयुष्य घडविताना दिसतात. मुळात सामंजस्य, संयम, सहनशीलता, आदरभाव हे मानसिक भाव कधीही न बदलणारे आहेत आणि तेच या विवाह संस्थेचा पाया आहेत. बाकी बाह्य बदल हे परिस्थितीनुसार घडतात. शेवटी संस्कृति ही प्रवाही असते. बदल हा तिचा नित्य स्वभाव असतो. सांस्कृतिक नीतिमुल्ये ही कालसापेक्ष असतात.  त्यामुळे विवाह संस्थेतली नैतिक- अनैतिकता ही कालसापेक्ष आहे. विवाह संस्थेत काळानुरूप अनुकुल बदल झाले म्हणूनच ती आज जिवंत आहे. समाजाचा पाया कुटुंब आहे आणि कुटुंबाचा पाया विवाह संस्था आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्यामुळे विवाहसंस्था टिकणार आहे हे निश्चित आणि ती पती आणि पत्नी यांच्या समसत्ताक पद्धतीनेच. 'धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि ' हे सिध्द करण्याची हीच वेळ आहे अशी आपण आशा ठेवूया.

Monday, August 10, 2026

कारण जेन झी हुषार आहे


 

      जेन- झीचं आंदोलन हा सध्याचा ज्वलंत विषय. या विषयावर समस्त संबंधित - असंबंधित लोकांनी यथेच्छ प्रतिक्रिया दिल्या.काहींनी खूप कौतुक केलं तर काहींनी त्यावर कोरडे ओढले. सर्वप्रथम हा लेख मी कोणत्याही राजकीय - पक्षीय भूमिकेतून लिहिलेला नाही हे जाहीर करते. (हो ना. चुकून कुणी वाचलाच आणि चुकून माझ्यावर कारवाई झाली तर आपली बाजू स्पष्ट असावी.)

          तर झुरळ पक्षाचं मनापासून अभिनंदन.कशासाठी? तर पेपर फुटी प्रकरण आणि एकंदरीतच कोलमडलेल्या शिक्षण व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी, युवा पिढीने सरकारला जाब विचारावा ही काळाची गरज होती. त्यामुळे पक्षाच्या निर्मिती पासून, विद्यार्थी एकत्रीकरणा पासून, आंदोलनातील मागण्या पूर्ण होईपर्यंत जे काही लोकशाहीचं चित्र निर्माण झालेलं दिसलं ते खरोखरच फार आशादायक आहे. ज्या जेन झी ला आपण कोषात राहणारे, फेसबुक,इन्स्टाग्राम, ओटीटीच्या विश्वात रमणारे म्हणून हिणवतो त्यांनी अभूतपूर्व आंदोलनाचा इतिहास घडवला आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे युवा पिढीच्या या शक्तिप्रदर्शनानं एक दिलासा मिळाला आहे निश्चित. हा या आंदोलनाचा एक सकारात्मक पैलू.          

            आंदोलनाचा दुसरा पैलू हा विशेष आहे. अनेकांना या आंदोलनाची भुरळ पडली आहे. विद्यमान सरकारची झालेली कोंडी, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांसमोर झुकणारी सत्ता यांचंच काहींना अप्रूप वाटलं. समस्या कोणतीही असो, ' कशी जिरली'- हा मुद्दा त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा . आणि त्या विकृत आनंदानं गुदगुल्या होणारा एक वर्ग, जेन झी चे  गोडवे गाताना हुरळून गेला आहे. विद्यमान सरकारला ‘अडचणीत आणणं’ हा एकमेव अजेंडा असलेला हा वर्ग आज खूप आनंदात आहे. नेमके प्रश्न कोणते? ते कशा पध्दतीने सोडवायचे? याविषयी त्यांना काहीही देणे घेणे नाही. सरकारला खिंडीत पकडणं हे एकमेव 'साध्य'. मग ते कुणी, केव्हा, कसेही करेना का. अशी ही झुरळां विषयी एका विशिष्ठ समाजाला भुरळ पडली आहे.आणि  त्यांचे पुढचे काही दिवस तरी या आनंदाच्या धुंदीत जातील हे नक्की. तापल्या तव्यावर पोळी भाजणारा हा वर्ग. आयत्या चालून आलेल्या संधीचा फायदा घेऊन  उंटावरून शेळ्या हाकणारे सध्या हर्षोल्हासात स्वतःची पाठ थोपटण्यात मग्न  आहेत.आता या सरकारचे  दिवस भरलेत या स्वप्नरंजनाची त्यांना भुरळ पडलीय.

             तिसरा पैलू म्हणजे समाज माध्यमांची मदत . जेन - झी टेक्नोसॅव्ही असल्यामुळे आंदोलनातील प्रत्येक पायरीवरचे निर्णय हे क्षणार्धात तळागाळापर्यंत पोचत होते. त्यामुळे एकत्रीकरण, पाठिंबा (फॉलोअर्स) यासाठी पैसा आणि वेळ यांची कमालीची बचत झाली. तसंच प्रचारासाठी अनेक कल्पक पोस्ट्स, पोस्टर्स, मीम्स यांचा वापर करण्यात आला. यावरून जेन- झी ची सर्जनशीलता,बुद्धीमत्ता आणि प्रसंगी ए -आय चा केलेला उचित उपयोग प्रकर्षाने दिसून आला. योग्य प्रकारे समाज माध्यम हाताळल्यास, आंदोलनाच्या यशात समाज माध्यमांचा सिंहाचा वाटा आहे हे अर्थातच सिध्द झालं.

           पण हे आंदोलन पुराण इथे संपत नाही. आंदोलनाची ही यशोगाथा ही केवळ एक बाजू आहे.  लोकशाही जिवंत आहे हा दिलासा जरी यातून आपल्याला मिळाला तरी जेन - झी च्या अमर्याद स्वातंत्र्याचा एक कुरूप आणि हिडीस चेहरा समोर आल्यामुळे  एक भीतीही निर्माण झाली आहे. जेन - झी ने ओकलेली गरळ ही समाज माध्यमाने तळागाळात पोचवली आहे.   या गरळीचं समाजात समर्थनही केलं जात आहे. ही या पिढीची भाषा आहे, त्यात आक्रमकता असणारच असं समर्थक म्हणतात.काही आक्षेपार्ह कृत्येही आंदोलकांनी जंतरमंतर येथे केली. मुलंच ती. असं वागणारच. त्यावर नैतिकतेचे निकष लावू नये, असं समर्थकांचं म्हणणं आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाबतीत ही युवा पिढी कोणतीही तडजोड करणार नाही - हा या आंदोलनातील एक महत्वाचा छुपा संदेश आपल्याला मिळाला आहे. जो एक दुर्लक्ष न करण्याचा  पैलू आहे.

      आजवर प्रत्येक पिढीची एक भाषा चालत आलेली आहे.  प्रत्येक पिढीनं एक आक्रमक, जोषपूर्ण आणि मर्यादा उल्लंघून जाणारं स्वातंत्र्य उपभोगलं आहे हे ही  खरंच. पण त्याही वेळी विवेक, संयम, नैतिकता, आदर, धाक यांची चौकट अस्तित्वात होती,भलेही ती काळानुरूप सैल होऊ घातली असेल. आजपर्यंत विद्यार्थ्यांची कितीतरी आंदोलनं झाली असतील.पण कधीही विवेक,संयम, आदरभावाची पातळी इतकी खालावली नव्हती. आतातर या शब्दांचा अर्थही जेन- झी ला माहित नाही. अपवादाने कुणाला माहित असेलच तर अशी वागणूक आता आऊटडेटेड झाली आहे अशी संभावना केली जाईल. पण विवेक, संयम, नैतिकता, कृतज्ञता, करुणा, त्याग, क्षमाशीलता, वात्सल्य हे उन्नत म्हणजेच निओकाॅर्टिकल गुण आहेत. ते पिढी दर पिढी तसेच राहणार आहेत आणि भविष्यातही तसेच असणार आहेत. हे गुण अंगी असलेल्या व्यक्तींना मागासलेले, संकुचित, जुनाट, बुरसटलेले असं म्हणण्याची हल्ली पद्धत आहे.पण असं म्हणणारे लोक भ्रमात आहेत, त्यांचा बुद्धीभेद झाला आहे हे माझं स्पष्ट मत आहे. काळानुरूप सगळ्याच बाबतीत बदल होत असले तरी योग्य ते नेहमीच योग्य असतं. मीम्स च्या माध्यमातून  जेन झी ची जशी कल्पकता आणि बुद्धी दिसून आली त्याच बरोबरीनं हिडीस आणि विकृत  वृत्तीही समोर आली. जी बघून जेन बुमरला भोवळ यायचीच बाकी होती. वडिलधारे असणा -या  राज्यकर्त्यांच्या प्रतिमेचं अश्लील प्रकारे विडंबन करणारी आंदोलनातील रणनिती? रस्त्यावर त्यांची चित्रं काढून त्या चित्रांशी अश्लील चाळे करणारी सुसंस्कृतता? टोमणे, विखार, शिव्या, गलिच्छ घोषणा..... अशा युवा पिढीच्या हाती आपलं भविष्य आहे? जंतरमंतर वर अशा भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन झालं? अत्यंत घृणास्पद, शिवराळ अशी ही भाषा जेन - झीची आहे, हे कौतुकानं सांगितलं जातं. शाळेत शिकतांना अशीच भाषा शिकवली जाते का? भाषा आणि आचरण यांच्या योग्यतेचे निकष कधीच बदलणारे नाहीत.आणि नैतिकतेबद्दल हल्ली काही बोलायचंच नसतं. त्यामुळे भावना दुखावतात, अस्मिता डिवचली जाते आणि बोलणारा मूर्ख ठरविला जातो. ओटीटी वर सतत वाहणारा शिव्यांचा आणि अर्वाच्य शब्दांचा झरा अनुकरणीय नाही, हे या बुद्धिमान पिढीला समजत नसेल तर शिक्षणाचा उपयोग काय?

              या आंदोलनात विजय मिळाला तरी जेन- झी चं हे बेभान आणि बेदरकार रूप अत्यंत भयावह आहे. आयुष्यात 'अनुभव' हा एक उत्तम गुरू असतो, जो वडिलधा-या मंडळीत असतो, भलेही त्यांना ऑनलाईन व्यवहार करता येत नसतील. या अनुभवांसमोर नम्र होण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम ची गरज नसते. अन्यायाविरुद्ध जरूर लढावं, सरकारला जाब ही विचारावा पण विवेकाची पातळी सोडू नये. आणि कितीही स्वतंत्र असलं तरी समाजात वावरतांना सभ्यतेचे काही संकेत असतात, ते जर या जेन झी नं पाळले नाहीत तर जी जनता सध्या त्यांचा उदो उदो करते आहे, तीच जनता त्यांना क्षणार्धात पायदळी तुडवेल. आपल्याला आंदोलनात यश मिळालं याचा आनंद मानायचा की आपला विकृत चेहेरा समाजासमोर आला आहे, याचं भान ठेवायचं - हे आता जेन - झी नंच ठरवायचं आहे कारण झेन - झी हुषार आहे.
















 

Sunday, August 2, 2026


मैत्री ते फ्रेंडशिप...एक उत्क्रांती 

' आजी तुला निटींग येतं ना? मला फ्रेंडशिप बँड्स करून दे ना.' 

रंगीबेरंगी लोकर, मोती, मणी, घुंगरू इ. साहित्य माझ्या समोर ठेवत माझ्या नातीने आदेश दिला. तिचा आदेश धुडकावण्याची माझ्यात कुठे हिम्मत? 

'ओके. किती बँड्स तयार करायचे?'

'तू  वीस  सिंपल बँड्स तयार कर. आणि पाच एकदम मस्त कर. माझ्या पाच बेस्ट फ्रेन्ड्स साठी.'

अर्थातच मी मान हलवली.

'ए आजी, तुला किती फ्रेंड्स आहेत ? शाळेत असताना तुम्ही असे बँड्स बांधायचे का ग?'

आता यावर नेहमीप्रमाणेच बौद्धिक आणि तात्विक उत्तर देण्यासाठी माझी जीभ उचलल्या गेलीच पण ती टाळ्याला  लावण्याचा मोह  प्रयत्नाने आवरला. कारण या पिढीला मुळात मराठी शब्दांचा अर्थच समजत नाही. त्यात बोधपर भाष्य म्हणजे सोऽऽऽऽ बोअरिंग. त्यांच्या उत्क्रांत मेंदूत असल्या जुनाट  विचारांच्या प्रोसेसिंग चा प्रोग्रामच नाही त्याला ते तरी काय करणार? इथे मला आमचा बाळबोध कार्यक्रम (प्रोसेसिंग हो.) आठवतो. आम्ही थोरा मोठ्यांची वक्तव्ये आणि सुभाषिते एका डायरीत लिहून ठेवत असू.  निबंधात, प्रसंगानुरूप आणि कधीमधी जगण्यातही त्यांचा उपयोग करित असू. आता लहानपणा पासून हा कार्यक्रम हार्डवायर्ड असल्याने तो कधीमधी उफाळून येतोच.  डिलीट ही होत नाही मेला. पण हो.त्याचा कमीत कमी  वापर करण्याचं कौशल्य मात्र मी आत्मसात केलंय.

मी शांतपणे म्हणाले,

'मला ना ? मला सात मैत्रिणी आहेत आणि त्या बँड बांधणाऱ्या नाही तर बंध जपणाऱ्या आहेत.' (अपेक्षेनुसार शेवटचं वाक्य अर्थातच 'व्होलटाईल'.)

'फक्त सात ? ममाला तर वन थाउजंड सिक्स्टी फाईव्ह फेसबुक फ्रेंड्स आहेत.'

पुन्हा एकदा जीभ वळवळली. पण संयमानं मी म्हणाले,

'हो गं, काही लोकांना तर फाईव्ह लॅक्स फ्रेंड्स असतात.'

'मी पण मोठी झाली की असेच खूप फ्रेंड्स जमवणार आहे आजी.'

तथास्तु!!! म्हणून मी विषय संपवला आणि लोकर सुया हातात घेतल्या.

महाभारतात एकदा युधिष्ठीर भीष्माचार्यांना आपल्या मनातल्या शंका विचारीत असतांना उत्तम मित्र कसे ओळखावे हा प्रश्न विचारतो. त्यावेळी सहार्थ, भजमान, सहज आणि कृत्रिम असे मित्रांचे चार प्रकार भीष्माचार्य त्याला सांगतात. सहार्थ म्हणजे ज्या मित्राला आपल्या कडून अपेक्षा असतात आणि ही मैत्री केवळ देवाणघेवाणी वर अवलंबून असते. भजमान म्हणजे कौटुंबिक नात्यांमधून निर्माण झालेली मैत्री. भावा- बहिणीची, नवरा - बायकोची, सासू - सुनेची, नणंद - भावजयीची, आई-मुलांची इ.इ. अशी नात्यापलिकडे असणारी मैत्री. ज्यात नात्यांचे बंध अधिक बळकट करण्याची क्षमता असते.  तिसरी सहज मैत्री म्हणजे निरपेक्ष मैत्री. अगदी लहानपणापासून असणारी आणि आयुष्यभर निगुतीने जपलेली. या मैत्रीत एकमेकांची सुख -दुः ख, जय-पराजय,  गुण-अवगुण, मान- अपमान, गुपितं... सगळं माहित असतं आणि कशानेही या मैत्रीत फरक पडत नाही. प्रेम, निरपेक्षता आणि जिव्हाळा व आधार हे या मैत्रीचे चार खांब. असे मित्र जितके जास्त, तितकी ती व्यक्ति जास्त श्रीमंत. त्यानंतर चवथी कृत्रिम मैत्री. म्हणजे मतलबी मैत्री. जोपर्यंत मतलब साध्य होत नाही तोपर्यंत मैत्री टिकवून ठेवायची. एकदा काम झालं की मग, 'तू कोण?' असं हे चार प्रकारचं मैत्र. भजमान आणि सहज मित्र मिळणं हे भाग्यच.

आता महाभारताच्या काळात फेसबुक नव्हतं म्हणून. नाहीतर भीष्माचार्य यांनी फेबु. मित्र--- नाही नाही. 'फेबु. फ्रेन्ड' हा पाचवा प्रकार नक्कीच सांगितला असता. पण बरं झालं फेसबुक नव्हतं त्याकाळी. नाहीतर आधीच प्रचंड गुंतागुंत असलेलं हे महाकाव्य आणखी अजूनच अवघड झालं असतं. शिवाय भीष्माचार्यां सारख्या महारथीला सुद्धा मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं कठीण झालं असतं. 

                असो. पण फेसबुक आणि इन्स्टाने ( मला येवढेच माहित आहेत ) मित्र आणि मैत्री यात प्रचंड उत्क्रांती घडवून आणली आहे. आता ती मित्र आणि मैत्री नसून 'फ्रेन्ड आणि फ्रेंडशिप' ही संकल्पना झालेली आहे. ही उत्क्रांती शारीरिक, मानसिक, वैचारिक, वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर झाली आहे. मुळात हा मैत्रीचा- नव्हे, फ्रेन्डशिपचा पाया 'विश्वचि माझे घर' या वैश्विक भूमिकेवर आणि विशाल मनोवृत्तीवर आधारित आहे. आयुष्यात ज्या व्यक्तिला कधी प्रत्यक्ष बघितलं नाही, जिच्या संबंधी काहीही माहिती नाही, जिचा अशा व्यक्तिला फ्रेंड म्हणून स्वीकारणं हे 'वसुधैव कुटुंबकम्' चं लक्षणच नाही काय? वय, लिंग, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक सीमा ,प्रतिष्ठा..... काहीही या फ्रेन्डशिप च्या आड येत नाही. सगळीकडे कसं फ्रेन्ड्ली वातावरण. ही फे.बु. फ्रेन्ड प्रजाती सध्या विलक्षण फोफावली आहे. कोविड विषाणू पेक्षा वेगाने 'व्हायरल' होणा-या या  प्रजातीनं समस्त जनतेला ग्रासलं आहे. या फ्रेन्डशिपची लागण झालेले फ्रेन्ड्स सदैव लाईक्स, अंगठे, बदाम, जीआयएफ देण्यात एकतर व्यस्त असतात नाहीतर स्वतःला आलेले मोजण्यात व्यस्त असतात. यात गुणवत्ते पेक्षा संख्येला जास्त महत्व असतं. चुकून एखाद्याने विरोधाची भाषा केलीच तर त्याला 'अनफ्रेन्ड ' करण्याचं वैशिष्ट्यही या उत्क्रांत फ्रेन्डशिप मध्ये आहे. किंबहुना एखाद्याला प्रसिध्दी च्या शिखरावर पोचवण्याची किंवा पायदळी तुडवण्याची क्षमता या उत्क्रांती मुळे निर्माण झाली आहे. प्रामाणिक प्रतिक्रिया ही कितीही कुचकट असो पण कौतुक, अभिनंदन, आनंद व्यक्त करण्याचा मनाचा मोठेपणा या प्रजातीत आवर्जून आढळतो. आता तर घराघरातल्या नातेवाईकांनीही  फ्रेन्डशिप स्वीकारली आहे ज्यामुळे नावडते नातेसंबंधही  दृढ झाले आहेत. शिवाय घरात एकाच ठिकाणी बसून (किंबहुना त्यामुळेच) ही फ्रेन्डशिप निभावता येत असल्याने वेळ, पैसा, यातायात यांची बचत आणि ऊर्जा, पर्यावरण यांचं संरक्षण या महत्वाच्या उपलब्धी या उत्क्रांति मुळे साध्य झाल्या आहेत . महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्ति मध्ये असलेल्या (मुळात नसलेल्या) कला गुणांच्या प्रदर्शनाची आवड या फ्रेंड्स प्रजातीत प्रामुख्याने आढळून येते. आणि मग यातून स्पर्धा, ईर्षा, मत्सर कुरघोडी हे गुण ? वाढीला लागले आहेत.

           पण असं असलं तरी अजूनही काही अति चिवट मित्रजातीने (फ्रेंड्स नाही)या उत्क्रांति  समोर शरणागती पत्करलेली नाही. आभासी दुनियेतील फ्रेन्ड्सच्या झंझावातात या जातीनं आपली पाळंमुळं जपून ठेवली आहेत.

कुपथ निवारि सुपंथ चलावा।

गुन प्रगटै अवगुनन्हि दुरावा॥

देत लेत मन संक न धरई।

बल अनुमान सदा हित करई॥

श्रीरामचरितमानस यातील किष्किंधा कांडात गोस्वामी तुलसीदास यांनी उत्तम मित्राचे वर्णन केले आहे. वाईट मार्गाने जाणा-या मित्राला योग्य दिशेने वळविणारा, त्यांचे गुण प्रगट करून अवगुण झाकणारा, नि:शंकपणे देणारा व घेणारा तसेच आपल्या कुवतीनुसार मित्राचे सदैव हित जपणारा --असा आदर्श मित्र असतो.

पौराणिक काळातली कृष्ण - सुदामा यांची मैत्री ही सत्ताधीश व सामान्य व्यक्ति मधील भेद मिटवणारी आहे.  शत्रूपक्षात असूनही राक्षसी त्रिजटेने  सीतेच्या पाठीशी उभी राहून, तिला आधार देऊन आपल्या मैत्रीचा एक आदर्श निर्माण  केला आहे . दुर्योधन- कर्णाच्या मैत्रीत कर्णाने  दुर्योधनाच्या आचरणाला नाही तर मैत्रीला प्राधान्य दिले . अकबर बिरबलाची मैत्री ही धर्माच्या भिंती पेक्षा अभेद्य होती.बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय आणि बिपीन चंद्र पाल - अर्थातच' लाल बाल पाल' यांच्या राजकीय मैत्रीने ---( जी आज शोधूनही सापडत नाही ) घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते जे स्वराज्य बांधणीसाठी आवश्यक असे अस्त्र होते. अशी इतिहासातील कितीतरी उदाहरणं आपल्याला आढळतील.

               शेवटी काय, आजच्या या अस्थिर, अस्वस्थ वर्तमानकाळात' मित्र' हा एक दिलासा, विसावा आहे तर वेगवान यांत्रिक युगात  एकाकी पडलेल्यांसाठी आभासी जगातले ' फ्रेंडस' हा एक विरंगुळा आहे, निराश मनस्थिती वरचा एक उपाय आहे.  तेव्हा' मित्र' असो की ' फ्रेन्ड्स ' या अनुक्रमे  अतूट आणि तात्पुरत्या नात्यातून आनंद, सकारात्मकता आणि रचनात्मक लाभ घेणं हे आपल्याच हातात आहे आणि हीच काळाची गरज आहे.

Tuesday, July 21, 2026


नको नको रे माणसा 

असा बेभान तू होऊ 

             शेवटी एकदाचा तो बहुप्रतिक्षित पाऊस, उशिरा का होईना पण आला. वैशाख वणव्यात शरीर मनाची लाहीलाही होत असतांना आषाढाची चाहूल लागते. आषाढ मनात आशा घेऊनच उजाडतो. व्याकूळ होऊन संपूर्ण सृष्टी पावसाची वाट बघू लागते. उन्हाळा आणि हिवाळ्या पेक्षा पावसाळा या ऋतूत परिवर्तनाचे, सर्जनाचे सामर्थ्य असते. त्यात आषाढातला पहिला पाऊस हा जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे तना मनाचा, सृष्टीचा स्वभाव बदलून टाकतो. हा पहिला पाऊस भूमीला तृप्त करतो, शेतकऱ्यांच्या जीवात जीव आणतो, कवी मंडळींच्या मनात कल्पनांचे मोहोर फुलवतो, साहित्यिकांच्या प्रतिभेला बहर आणतो, प्रेमिकांच्या मनात विरहाची आग पेटवतो तर जुन्या जाणत्यांना आठवणीत रमवून टाकतो. असा अनेकांच्या भावविश्वात वेगवेगळे बदल हा पहिला पाऊस घडवून आणत असला तरी सर्वसाधारणतः सार्वत्रिक आनंदाचं वातावरण निर्माण करण्याची शक्ती त्यात असतेच. आणि मग जुन्या कटू घटना काही काळासाठी तरी विस्मरणात जातात आणि मनात फक्त पाऊस उरतो.

           यावर्षीचा उन्हाळा जरा जास्तच जाणवला. अर्थात आयुष्याचे कितीही उन्हाळे बघितले तरी... 'यंदाचा उन्हाळा जरा जास्तच हो'. असं म्हणण्याचा प्रघात आहे. पण खरंच या उन्हाळ्यात डोक्यावर सूर्य आग तर ओकत होताच पण आजूबाजूला ज्या घटना घडत होत्या त्यामुळे वातावरणातील दाहकता कमालीची वाढली होती. सुरूवातीला मे महिन्यात आला तो अधिक मास. अधिक मासात  धार्मिक कार्य करायचा  वरून (वरून म्हणजे साक्षात 'वरून'- श्री विष्णू भगवानांकडून, बरं का).   परवानाच मिळाला असतो. पण आदेशानुसार कार्यवाही  करायची नाही - हा आपल्या भूतलावरचा नियम. त्यामुळे अधिक मासात जनमानसातले 'अधिक अतिरेकी' धार्मिक रूप बघून भर मे महिन्यात जरा अधिकच घाम फुटला. आदेशानुसार जप, तप, व्रत, वैकल्ये सोडून यच्चयावत जामात मंडळींना दानधर्म करण्याचे ठिकठिकाणी सामूहिक उत्सव साजरे केले गेले. जितक्या जास्त जामातांचं पूजन तितके जास्त पुण्य पदरी पडणार याची खात्री असल्यामुळे  सख्खे, चुलत, मामे, मावस...  अशा सगळ्याच जावई वर्गाला प्रचंड लाभ मिळाला. याशिवाय नदीत स्नान करण्याचं व तिला प्रदूषित करण्याचे शास्त्र देखिल आवर्जून पाळल्या गेले. एकंदरीत हा उन्हाळा श्वशुरांना जरा भारीच गेला.

   त्यात नेमकं' नीट' पेपर फूट प्रकरण उद्भवलं.  खरं तर पेपर फोडण्याची यंत्रणा प्रचंड कठीण आणि किचकट असावी हे माझं निष्पाप मन सांगतं. वास्तविक या पेपर फुटी यंत्रणेत गुंतण्यापेक्षा' नीट' चा अभ्यास नीट होऊ शकेल.. हे ही माझं प्रामाणिक मत. पण हल्ली 'बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको' या पंथाचे लोक अल्पसंख्य असल्याने शिक्षक - विद्यार्थी, राजकारणी इ.इ. अनेकांनी या पेपरफुटी प्रकरणात नीट सहकार्य केले. त्यानंतर लगोलग टीईटी चाही पेपर फुटल्याने शिक्षकांचीही प्रवेश परीक्षा रद्द झाली. पेपरफूट प्रकरण तापल्या मुळे उन्हाळा अर्थातच जास्त कोपला.

       या घटना कशाबशा पचविण्यासाठी निष्पाप जनतेची भर उन्हाळ्यात प्रचंड ऊर्जा खर्च झाली. तेवढ्यात भावी नवऱ्याला लोहगडावरून ढकलून देऊन हत्या केल्याची बातमी समोर आली. लग्नाला नकार देण्याचा एक नवीन पर्याय तरूण विवाहेच्चछू मंडळीं समोर उघड झाला. या घटनेच्या अनेक बाजूंचं माध्यमावर प्रचंड चर्वितचर्वण आणि दळण दळलं गेलं की त्यात गुंतल्यामुळे या दाहक उन्हाळ्याकडे लक्ष द्यायला फुरसत मिळाली नाही.

 एखाद्या निष्पाप व्यक्तिचा जीव घेणं ही इतकी सहज, सोपी आणि साधी प्रक्रिया असते याचा साक्षात्कार आजच्या तरूण पिढीला तसंच शालेय पिढीलाही झाला - या धक्क्यातून (की एका उत्तम पर्यायातून ?) सावरत नाही तोच  विनोदाची (?) एक जात समोर आली, ज्या विनोदाला लाखो फॉलोअर्स ने उचलून धरलं. पु. लं, आचार्य अत्रे, द.मा. मिरासदार, वि. आ. बुवा, मंगला गोडबोले, शिरीष कणेकर यांच्या विनोदावर पोसलेल्या आमच्या निष्पाप पिढीसमोर एका नवीनच विनोदाचं महाद्वार उघडलं. वैद्यकीय, शिक्षण घेतांना मृतदेहाचं डिसेक्शन करणं हा एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे शरीररचना स्पष्टपणे लक्षात येते. या संदर्भात एका स्टँड अप कॉमेडी शो मध्ये, पुरुष शरीराचं डिसेक्शन करतांना...." त्याच्या काही अवयवांवरून आम्ही ज्योक्स करतो".... असे गौरवोद्गार प्रथितयश कॉलेजमध्ये  वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीने हसत हसत काढले. या तिच्या विनोदबुद्धी(?) ला प्रचंड लाईक्स येऊन क्षणार्धात ती प्रसिध्द झाली.

"घटं भिंद्यात् पटं छिंद्यात् कुर्यात् रासभरोहणम् ।

येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुष भवेत् ॥"

एका संस्कृत सुभाषितानुसार आजकालची परिस्थिती आहे. प्रसिध्द होण्यासाठी कर्तृत्व, गुणवत्ता, कौशल्य यांची अजिबात गरज नाही. कपडे फोडणे, भांडी फोडणे, गाढवावर बसणे इत्यादी कृतीं मुळेच माणूस कमालीच्या प्रसिद्धीला पावतो.

     असे अनेक सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक धक्के बसत असतांना साक्षात वैशाख वणवा ही फिका पडला.

"मै चाहे ये करू, मै चाहे वो करू - मेरी मर्जी ".....हे गॅम्बलर  चित्रपटातलं गोविंदाचं गाणं मला अचानक आठवलं. आणि हे गीतलेखन करणाऱ्या त्या द्रष्ट्या कवीवर्याचं मला विलक्षण कौतुक वाटलं. 'मी करेन ती पूर्व दिशा'.... असा कमालीचा आत्मविश्वास या गाण्यात आहे, जो हल्ली सगळ्यांमध्ये आढळतो. तो योग्य आहे की अयोग्य हे काळच ठरवणार.

     या सगळ्या घटना कमी होत्या की काय तर धार्मिक स्तरावर एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला. संपूर्ण देशाचं आराध्यदैवत असलेल्या, अभिमानाचा विषय असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिरात देणग्यांच्या निधीमध्ये, दागिन्यांमध्ये अफरातफर होण्याचा अनवस्था प्रसंग समोर आला. कायम विश्वास आणि श्रध्दा ठेवावी अशी काही ठिकाणं समाजमनात असतात ज्यावर घाव घालून या प्रसंगाने वैशाख    वणव्यावरही कडी केली.

       पण आणखी एक गंमतीची गोष्ट सांगायचीच राहीली. नुकतंच ऑटो चालकांना मराठीचे धडे देणं सुरू केलं होतं. तीन महिन्याची आगाऊ फी घेऊन मराठी शिकवणी आता कुठे रंगात आली होती तोच विधानसभेच्या सभापतींनी संसदेत अभिजात मराठीचा नवीन आविष्कार सादर केला. शिकवणीतले यूपी भय्या विद्यार्थी लगेच तावातावाने घरी आले आणि 'दुगनी फीसवा वापस दे दे' असं धरणं देऊन बसले. या आर्थिक फटक्या मुळे भर वैशाखात मला हुडहुडी भरली.

असा हा चित्रविचित्र घटनां नी भरलेला वैशाख या वर्षी जरा जास्तच जाणवला आणि पावसाची वाट बघतांना डोळ्यात प्राण आले. . "मै चाहे ये करू, मै चाहे वो करू - मेरी मर्जी -" असं पावसानं म्हटलं असतं तर? माणूस आपल्या मर्जीने कसाही वागतो पण निसर्गानं, ऋतू नं नियमाप्रमाणेच वागावं अशी अपेक्षा करतो.

  पण उशिरा का होईना बरसला आणि सा-या कटू घटनांचा विसर पडेल असा त्यानं आनंदही दिला. समाजाची ही रीतच आहे. प्रसंग घडतात, गाजतात, चर्चा होतात आणि विस्मरणात जातात. घटनांमधून काही बोध घ्यावा, शिकवण घ्यावी अशी आज कुणाचीही मनोभूमिका नाही.

शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरं. हे लिहिता लिहिता इंद्रायणी नदीला पूर आल्याच्या बातम्या ऐकू येताहेत. दरड खचून रहदारी बंद झाली आहे. आता इंदिरा संत यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे ..." नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी" असं म्हणायची वेळ तर येणार नाही ना, अशी भिती वाटते. पण त्यापेक्षा त्याच चालीवर "नको नको रे माणसा असा बेभान तू होऊ, 

आपल्याच लेकरांचा तू काळ नको होऊ"

असं म्हणणं हे जास्त संयुक्तीक वाटतं आहे. आपल्या पुढच्या पिढीवर नेमके काय संस्कार घडतील , याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे.

असो. इंद्रायणी ला जरी पूर आला आहे, तरी वारक -यांच्या विठ्ठल भक्तीचा महापूर इंद्रायणी नक्कीच समजून घेईल कारण ती निसर्गाचा एक अंश आहे - माणूस नाही.


Sunday, May 17, 2026

 मनोविकासाचे ध्यासपर्व  

 




“सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्तिगत साधना आणि सामाजिक कार्य यातील भेद मिटवून टाकावा लागेल .आपण या दोन गोष्टी भिन्न समजतो. त्यामुळे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक कार्य यात ओढाताण होते. व्यक्तिगत अध्यात्मिक चिंतन आणि सामाजिक कर्मयोग हे दोन्ही एकच मानले पाहिजे. म्हणजे आपली कार्ये सदैव प्राणवान राहतील. चिंतन ही सुद्धा सेवा आहे आणि सेवेमध्ये चिंतन केले पाहिजे”. - आचार्य विनोबा भावे.

' शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत वरिल परिच्छेद डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उद्धृत केला आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्यामागची वैचारिक बैठक या परिच्छेदातून दिसून येते. ‘सेवा आणि चिंतन यांची सांगड घालण्याचा माझा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक,’ असं ते म्हणतात. पण हा प्रयत्न डॉ. नाडकर्णी यांनी आयुष्यभर केला, आणि त्यात ते कमालीचे यशस्वी झाले असं आज ठामपणे म्हणता येतं.

        आज डॉ. आनंद नाडकर्णी अनंताच्या प्रवासाला निघून गेले.   आनंदी वृत्ति कायम रक्तात असणारा हा आनंदयात्री, आपल्यासाठी,आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कायम असणारच आहे, असंच वाटत होतं, नव्हे तशी खात्रीच होती. त्यांच्याशी संबंधित प्रत्येकाला आज निराधार,  पोरकं वाटत असेल. हजारो लोकांना जगण्याची उमेद देणाऱ्या डॉक्टर नाडकर्णींचं अकाली जाणं हे न पटण्यासारखं आहे. अनेक व्यक्ति आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येत असतात. अनेकांमुळे आपण प्रभावित होतो, अनेकांमुळे जगण्याला दिशा मिळते. हे सगळं असूनही कायमस्वरूपी आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तिंची  जातकुळीच वेगळी असते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जसं मराठी वाचकांच्या मनातून बाहेर काढता येत नाही तसाच डॉ. आनंद नाडकर्णीं बद्दल माझा अनुभव आहे.  

'आपल्या सहित जे चालतं ते साहित्य'.... अशी विनोबा भावे यांनी साहित्याची व्याख्या केली आहे. नाडकर्णी सरांचं साहित्य आणि व्याख्यानं या व्याख्येची पुष्टी करणारं आहे. माझी आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख होती का? तर नाही. मी कधीतरी त्यांना भेटले होते का? तर नाही. कधीतरी त्यांच्याशी पत्रव्यवहार किंवा फोनवर संवाद झाला होता का? अजिबात नाही. पण त्यांच्या पुस्तकांमधून, व्याख्यानातून  माझ्या मनावर, मेंदूवर, जडणघडणीत  कायमस्वरुपी परिणाम करणारी , माझ्या सोबत असल्याची प्रकर्षाने जाणीव देणारी ही व्यक्ति आहे हे मात्र खरंय. हाच माझा आणि त्यांच्यातील दुवा. वैयक्तिक ओळख नसतानाही आपली जवळची व्यक्ति गमावल्याची वेदना आज वेढून बसली आहे.             पुलंचा इथे संदर्भ आठवण्याचं कारण हे, की महात्मा गांधी, विनोबा भावे, रविन्द्रनाथ टागोर, स्वा. सावरकर, साने गुरुजी इत्यादी विभूतींचं मोठेपण पुलं च्या शब्दातून सहज उमजत गेलं. तर त्यांच्या जगण्यातलं उन्नत मानसशास्त्र आणि अध्यात्म डॉ. नाडकर्णींनी अलगद उलगडून सांगितलं - ते ही अगदी सोप्या भाषेत. मानस विज्ञानाच्या अनेक शास्त्रीय सिद्धांतांना सहजपणे अध्यात्माला जोडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.. मानसशास्त्रीय विवेचन आणि अध्यात्म यांची बेमालूम सांगड घालून आधुनिक प्रवचन करणारा हा 'महर्षी' होता असं म्हटलं तर अतिशयोक्ति होणार नाही.  मनोविकार होऊच नये म्हणून मनोविकास व्हायला हवा, हा त्यांचा अट्टाहास होता.आणि हे व्रत त्यांनी कायम पाळलं. एवढंच नाही तर या व्रतात अनेक कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली.

          एका सायकिॲट्रिस्टची डायरी, शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट , स्वभाव विभाव, विषादयोग, गध्धेपंचविशी, कर्मधर्मसंयोग, वैद्यकसत्ता, मनोगती, हे ही दिवस जातील.... या पुस्तकांनी मला खूप काही शिकवलं. केवळ शिकवलंच नाही तर ती शिकवण आजतागायत सोबत करते आहे हे महत्वाचं आहे. याशिवाय डॉ. नाडकर्णी अधिक जवळ आले ते कोविड काळात. सायंकाळची संवादमाला, माईंड फीस्ट, कळण्याचे दिवस, करण्याचे दिवस या व्याख्यानमालेतून त्यांचा अधिक परिचय झाला. कोविड काळातील ताणाला विवेक बुद्धीने कसं हाताळायचं, अशा परिस्थितीत सकारात्मकता आणि आनंद कसा टिकवून ठेवायचा याचं उत्तम विवेचन त्यांनी केलं. त्यांच्यातील अंगभूत सामंजस्य, व्यवहारातील यथोचित उदाहरणं, त्यावर विनोदाचा तडका आणि समाजाला नवीन दृष्टिकोन देण्याची तळमळ ........ या  सगळ्यांचं मिश्रण त्यांच्या वाचिक  शब्दांना अस्सल रूप देई. याशिवाय त्यांच्या व्याख्यानात संत साहित्याचे दाखले, ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामांचे अभंग, भगवद्गीतेचे संदर्भ, विवेकानंद, महात्मा गांधी, ओशो, विनोबा भावे, सर्वपल्ली राधाकृष्णन अशा विद्वानांच्या वचनांचे संदर्भ असल्याने त्या व्याख्यानांची उंची कमालीची वाढलेली असे. कोविड काळातील तसंच इतरही त्यांच्या अनेक व्याख्यानांमध्ये  निराशेतून बाहेर काढण्याची, ऊर्जा प्रदान करण्याची आणि मनोविकास घडवून आणण्याची जबरदस्त क्षमता होती. वेद उपनिषद, कुराण, बायबल यांचा प्रगाढ व्यासंग त्यांच्या व्याख्यानातून जाणवत असे. वाचक आणि श्रोत्याला समृध्द करणारं त्यांचं साहित्य वारंवार वाचनाला प्रवृत्त करणारं आहे.कोविड काळातील त्यांची व्याख्यानं आजही मनाला उभारी देतात. .महत्वाचं  म्हणजे ही व्याख्यानं ऐकताना या सखोल विद्वत्तेच्या वर, सामाजिक बांधिलकीच्या वर दशांगुळे पुरुन उरणारा एक मिश्किल,पारदर्शक, डोळ्यात लहान लेकराचं कुतूहल असणारा एक निर्व्याज, सच्चा माणूस बघताना विलक्षण अनुभव येत असे.

            उत्क्रांती मध्ये मेंदूत होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदल हे अपरिहार्य असतात. पण स्वतः माणूस देखिल स्व प्रयत्नाने आपल्या मेंदूचा योग्य विकास करू शकतो मेंदूचं सामर्थ्य वाढवू शकतो हे आजच्या तांत्रिक भाषेत डॉक्टर नाडकर्णी खूप सोपं करून सांगायचे. हे सांगताना  ‘आधी केले मग सांगितले’ याची प्रचिती यायची. उन्नत मेंदूचे विचार, भावना व  कृती द्वारे कसे पोषण होऊ शकते, हे त्यांना बघूनच पटत असे. आस्था, करुणा, तन्मयता, कृतज्ञता त्याग सहिष्णुता, निर्मलता , कैवल्य या उन्नत मनोवृत्तींचे ते स्वतः एक जिवंत उदाहरण होते. उन्नत मेंदू (निओकाॅर्टिकल ब्रेन) हे आपल्या शरीरातील सॉफ्टवेअर असून ते वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे,हे ते आवर्जून सांगत. आपण आज जर मेंदू नियमित अपडेट केला तर पुढील पिढ्यांनंतर हा अपडेटेड मेंदू शरीराचं हार्डवेअर होऊ शकतो पण त्यासाठी आजपासूनच प्रयत्न करायला हवेत, हे ते अत्यंत कळकळीने सांगत.

             आज डॉ. आनंद नाडकर्णी आपल्यात नाहीत. या हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल अनेक विद्वान, अभ्यासू व्यक्ति  लेख लिहितील आणि भावना व्यक्त करतील. त्यांच्या कार्याचे, त्यांच्यातील विविध पैलूं चे वर्णन करतील. अशा वेळी माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तिने त्यांच्यावर चार ओळी लिहिण्याचे काय प्रयोजन? त्यांच्यावर लिहिण्याची माझी पात्रता नाही. एक अभ्यासू, विद्वान, सामाजिक भान असलेला मानसविकार तज्ञ हा केवळ साहित्यातून सामान्य माणसाच्या जडणघडणीत चांगला बदल घडवून आणू शकतो हे मला अधोरेखित करायचे आहे, जेणेकरून माझं लिखाण कुणा गरजू व्यक्तिला  डॉ. नाडकर्णी यांच्या साहित्य, व्याख्यानांना जाणून घेण्याची प्रेरणा देईल. माझं हे लिखाण माझ्या व्यक्तिगत अनुभवापुरतं मर्यादित आहे.तसंच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एकच मार्ग माझ्या आवाक्यातला आहे.

समाज हा मूठभर चांगल्या लोकांमुळे चालत असतो. समाजातली सकारात्मकता, आशावाद, अस्सलपणाफ, सामंजस्य, कृतज्ञता टिकवून ठेवणारी अशी आनंद नाडकर्णी सारखी माणसं जाऊ नयेत असं वाटतं. त्यांचं असणं हे निरोगी समाजासाठी खूप आवश्यक, आश्वासक आणि दिलासा देणारं असतं. त्यांच्यातला अखंड ऊर्जेचा झरा हा प्रेरणा देणारा असतो. आजच्या विवेक भ्रष्ट समाजाला शहाणीव असणारी माणसं हवी आहेत.आनंद मरा नही…आनंद कभी मरते नही…. हे कितीही खरं असलं तरी, डाॅ नाडकर्णी सर, तुम्ही अजून  रहायला हवं होतं.


#आनंदनाडकर्णी

#मनोविकास

#आयपीएच

Friday, April 24, 2026

किताबे

 जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने गुलजार यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयीची कविता आठवली नाही तरच नवल.

किताबें झाँकती हैं बंद आलमारी के शीशों से

बड़ी हसरत से तकती हैं

महीनों अब मुलाकातें नहीं होती

जो शामें उनकी सोहबत में कटा करती थीं

अब अक्सर गुज़र जाती है कम्प्यूटर के पर्दों पर

बड़ी बेचैन रहती हैं क़िताबें

उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है

जो कदरें वो सुनाती थी कि जिनके

जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधरे-उधरे हैं

कोई सफा पलटता हूँ तो इक सिसकी निकलती है

कई लफ्ज़ों के मानी गिर पड़े हैं

बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो अल्फ़ाज़

जिनपर अब कोई मानी नहीं उगते

जबां पर जो ज़ायका आता था जो सफ़ा पलटने का

अब ऊँगली क्लिक करने से बस झपकी गुजरती है

किताबों से जो ज़ाती राब्ता था, वो कट गया है

कभी सीने पर रखकर लेट जाते थे

कभी गोदी में लेते थे

कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बनाकर

नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबीं से

वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी

मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल

और महके हुए रुक्के

किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे

उनका क्या होगा

वो शायद अब नही होंगे.........

या अप्रतिम कवितेची पारायणं करता करता मलाही काहीतरी सुचलंय.


कपाटात बंद असलेली पुस्तकं बघत असतात काचेतून आपल्याकडे,

कधी आशेनं 

कधी असहाय्यतेनं.

शब्दांपलिकडलं बरंच काही सांगत असतात पुस्तकं.

काही घुसमटत असतात.

काही गुदमरत असतात.

काही पुस्तकांना सलत असतो बुकमार्क,

खूप काळापासून शरीरात असलेल्या फॉरीनबॉडी सारखा.

काही गुळगुळीत कव्हर पांघरुन उभी असतात,

मॅनीक्वीन सारखी.

काही जीवापाड सांभाळतात - सुकलेल्या फुलाला, एका विस्मृतीतील  इतिहासाला.

काही आसुसलेली असतात, जिवंत स्पर्शासाठी.

काही मिरवतात हायलाईटरच्या खुणा, दागिन्यांप्रमाणे.

काही फक्त असतात, कोमात गेलेल्या पेशंटप्रमाणे,मृतवत.

काही अस्वस्थ होतात, सतत हाताळल्याने. 

काही उपरी असतात, सतत आपल्या घराकडे डोळे लावलेली.

शब्दांपलिकडलं बरंच काही सांगत असतात पुस्तकं.

कधी काळी हीच पुस्तकं वाचता वाचता, त्यांचीच ऊब पांघरुन गाढ झोप येत असे.

कितीतरी पुस्तकं अंगाखांद्यावर विसावत असत.

काही पुस्तकांवर कपाळाचा डाग पडलाय, नतमस्तक होतांना.

आणि ते वेगवेगळे बहाणे?

पुस्तकांची देवाणघेवाण आणि त्यात लपलेली सूचक चिठ्ठी.

नाजूक नात्यांना दृढ करणारी पुस्तकं.

संपुष्टात आलंय सगळं.

दिवस ? महिने ?? वर्ष ???

कधी भेट झाली होती पुस्तकांशी ??

पुस्तकंही अस्वस्थ झालीय हल्ली.

शून्यात बघत, मूक आक्रोश करत,

काचेच्या कपाटात अर्धमेली होत असतात पुस्तकं.

शब्दांपलिकडलं बरंच काही सांगत असतात पुस्तकं !!!!!


#किताबे

#गुलजार






......................................................................

Saturday, December 6, 2025









पालकांनी बालकांशी पालकांसम वागणे

            शिर्षक वाचून मनात गोंधळ उडाला असणार. हरकत नाही. बालक आणि पालक यांचे एकमेकांशी कसे संबंध असावेत, हा विषय कायमच ज्वलंत रहाणार आहे. प्रामुख्याने हे संबंध तपासताना, आमचे पालक, आमचं लहानपण, आमचं पालक पण ... या फुटपट्ट्या लावल्या जातात आणि नेमका तिथेच गोंधळ होतो.

                  असो. निमित्त आहे - बालक दिनाचे आणि  नुकताच केबीसी मध्ये इशित भट्ट हॉटसीट वर विराजमान झाल्यानंतरचा प्रसंग. या प्रसंगाच्या खोलात शिरण्याची गरज नाही कारण तो सगळ्यांना माहित आहे. या प्रसंगावर पालक,शिक्षक, समुपदेशक, बालमानसशास्त्रज्ञ, लाईफ कोच सगळ्यांनाच व्यक्त व्हावंसं वाटलं. त्यांनी लिखाणातून आपली मतं मांडली. सामान्य जनतेने गप्पांमधून, बडबड करून यथेच्छ तोंडसुख घेतलं.  कुणी समाजमाध्यमाला, कुणी पालकत्वाला, कुणी शिक्षणपद्धतीला,  कुणी संस्कारशून्य पिढीला तर कुणी विभक्त कुटुंब पद्धतीला जबाबदार ठरवलं. खरं तर, दुसऱ्याकडे बोट दाखवलं की उरलेल्या तीन बोटांची दिशा स्वतःकडे असते हा इतका साधा नियम आपण विसरून गेलोय. समोरच्याला दोषी ठरविण्यासाठी आम्ही इतके उतावीळ , उत्तेजित,आणि सर्वज्ञानी असतो की त्या भरात तारतम्य न ठेवता 'भाष्य' करण्याचीच आम्हाला प्रौढी वाटते. किंबहुना त्यासाठी हल्ली काही ना काही निमित्तच हवं असतं. आणि तसं नसेल तर ते  निमित्त शोधून काढलं जातं. त्यावर चर्चेचा धुराळा उडतो. मतमतांतरांचं मंथन होतं. आणि काहीही निष्पन्न न होताच सगळं काही शांत होतं, विस्मरणात जातं.

                इशीत भट्ट हा लहान मुलगा. जेमतेम दहा - बारा वर्षाचा मुलगा. या वयाची मुलं आपल्या स्वतःच्या घरात असली की 'हल्लीची पिढी काय हुषार आहे नाही?' हे वाक्यं आपण दिवसातून कमीत कमी तीनदा तरी आळवतो. पण हीच मुलं शेजारच्या घरात असली की लगेच आगाऊ आणि भोचक वाटू लागतात. इशीत भट्ट हा मुलगा नेमका केबीसीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोर आल्यामुळे या प्रसंगाची प्रसिद्धी कमालीची वाढली. अमिताभ बच्चन यांच्या बद्दल ज्या भावना, जी आदरयुक्त भिती, जे दडपण मोठ्यांना येतं, तसंच इशीत भट्ट ला वाटणं शक्यच नाही. अमिताभ बच्चनला प्रत्यक्ष समोर बघतांना अति उत्तेजित होऊन,’अजि म्या ब्रम्ह पाहिले’ या भावनेत भल्याभल्यांना सुचेनासं  होतं, हे आपण अनेकदा बघितलं आहे. पण इशीतच्या पिढीने केवळ केबीसी मध्ये आणि जाहिरातीतच त्यांना  बघितलं असण्याची शक्यता आहे  व ते ही घरी नियमित केबीसी बघितल्या जात असेल तरच. पालकांनी अमिताभच्या व्यक्तिमत्वाचा आवाका इशीतला सांगितला असेलही. पण ती माहीती गांभिर्याने घेण्याचं त्याचं वय नाही व तेवढी त्याला समजही नाही. इशीत उद्धटपणे , आगाऊ पणे वागला असं भाष्य करणाऱ्यांनी लहान मुलांचे नृत्याचे आणि संगीताचे रिऍलिटी शो बघावेत.  लहान मुलं जी कार्टून्स बघतात त्यातल्या पात्रांचा अभ्यास करावा. जाहिरातीतली लहान मुलं बघावीत. आणि रोजच्या हिंदी आणि मराठीतल्या ' संस्कारी' मालिका बघाव्यात.

                         जेमतेम अर्धा तास इशीत हॉट सीट वर होता आणि तेवढ्याच वेळात त्याच्या वागण्यावर गदारोळ उठला. ज्यावेळी याच वयाची मुलं रिऍलिटी शो मध्ये नृत्य करतात,गाणी गातात, त्यावेळी तर अनेकदा वयाला न साजेशा गाण्यांची निवड केली जाते. त्यावर नृत्य करतांना उत्तेजक हावभाव, विचित्र स्टेप्स बघणं असह्य होतं. या शो मधले परीक्षक ही डोकं गहाण ठेवून केवळ कौतुक करण्यासाठी आणि छचोरपणा करण्यासाठी बसले असतात. परफॉर्मन्सच्या मध्ये जी काही हुल्लडबाजी आणि वाह्यातपणा सुरू असतो, तो बघता संतापाशिवाय दुसरी कोणतीच भावना मनात येत नाही. स्पर्धकांच्या जोड्या जमवल्या जातात, त्यांना एकमेकांवरुन चिडवलं जातं. प्रपोज करणं, क्रश, ब्रेकअप, लव्ह ट्रँगल... ही भाषा सतत वापरली जाते. आणि या प्रकाराचं प्रचंड कौतुक केलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात ही असंच वागायचं असतं अशी समजूत स्पर्धकांची तर होतेच पण बघणा-या असंख्य लहान मुलांचीही खात्री  होते. परफॉरमन्स वर टिप्स, चुका समजावणं, सुधारणा  करणं या बाबी महत्वाच्या नसतातच. प्रत्येक परीक्षक कौतुकभरल्या नवीन शब्दांची शब्दकोषात मोलाची भर टाकण्याचं काम नेमाने करित असतो .फक्त कौतुक आणि तोंडी लावायला रडणं. 'रडणं' -- हे भावनिक बुद्ध्यांक दाखविणारं. त्याचं प्रदर्शन पण अत्यावश्यक. स्पर्धक, परीक्षक, प्रेक्षक यांनी  टिपं गाळून आपल्या ‘संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणं’ ही अट पाळली की पुढच्या राऊंडच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. शास्त्र असतं ते. त्यामुळे टिपं गाळण्याचं हे संसर्गजन्य अस्त्र कायम सगळेच जण भात्यात ठेवून असतात.

         अशा रिऍलिटी शो वर कुणीच  काहीच कसं बोलत नाही? इशीत तर फक्त अर्धा तास पडद्यावर होता. बाकी शो मधील मुलं तर दर आठवड्याला पडद्यावर येतात आणि परीक्षक व स्पर्धकांचे निरर्थक संवाद,माकडचाळे बघावे लागतात. निषेध करायचा,  टीका करायची किंवा गदारोळ करायचा  तर केबीसीतल्या इशीतवरच का?

          तसंच अनेकांच्या घरी टीव्हीवर मालिका बघितल्या जातात. वडीलधारी बघतातच पण त्याचा कळत नकळत परिणाम लहानांवरही होत असतो. शून्य अभिरूची आणि बुद्धीशी फटकून असलेल्या या मालिकांमध्ये नकारात्मक व्यक्तिरेखांचे  उदात्तीकरण इतक्या जास्त प्रमाणात दाखवलं जातं की अशी पात्रं प्रत्यक्षातही असणारच यावर लहान मुलांचा नक्कीच विश्वास बसू लागतो. फरशीवर तेल सांडवणं, पदार्थात मीठ/ तिखट ओतणं, गॅसचा नाॅब उघडून ठेवणं, कपड्यांवर शाई सांडवणं.......  बालबुद्धीलाही लाजवतील अशा अभिनव कल्पनांचा सुकाळ असणाऱ्या या मालिका लहान पिढीवर काय परिणाम करत असतील याचा विचारही करवत नाही. हीच बाब मुलांच्या कार्टून शो बद्दल. त्यातली पात्रं तर कमालीची आगाऊ , वात्रट आणि वाचाळ  असतात. लहान मुलं तर या कार्टून्स च्या आकंठ प्रेमात बुडालेली असतात. अशावेळी त्यांचं अनुकरण मुलांनी नाही केलं तरच नवल.

            हे सगळे टीव्हीच्या माध्यमातून होणारे संस्कार. पण घरातल्या पालकांकडून सुद्धा काय घडतं? लहान मुलांनी काढलेली चित्र, गायलेली गाणी, कविता, केलेला नाच, फॅन्सी ड्रेस या सगळ्यांचं शूटींग करून रील काढली जाते. ती पोस्ट केली जाते. मग त्यानंतर पडणारा कौतुकाचा आणि लाईक्स चा पाऊस. हे सगळे कुळाचार घरी यथास्थित पार पडत असल्याने लहान मुलांना ते नॉर्मल वाटू लागतं. कौतुक, प्रसिद्धी, रील, फोटो या दैनंदिन जगण्यातल्या आवश्यक बाबी आहेत असा त्यांचा समज होत असेल तर नेमका दोष कुणाचा? मुलांनी काहीही केलं तरी टाळ्या पडल्याच पाहिजेत हा पालकांचा अट्टाहास मुलांवरही परिणाम करतो. आपल्यावर टीका केलेली मुलांना  अजिबात सहन होत नाही. कोणतीही कृती करण्याच्या आनंदापेक्षा त्याचं प्रदर्शन करणं हे मुलांना महत्वाचं वाटू लागतं. अगदी अतिरेक म्हणजे काही पालक मुलांच्या गुणपत्रिका सुद्धा समाज माध्यमावर टाकतात.

            याशिवाय हल्लीच्या पालकत्वानुसार मुलांचे आणि आईवडिलांचे मैत्रीपूर्ण संबंध असावेत असं शास्त्र आहे.   पण प्रसंगी मैत्रीची मर्यादा ओलांडून मुले दादागिरी कधी करू लागतात हे समजतही नाही. त्यामुळे आजच्या कुटुंबात सगळ्यात जास्त धाक कुणाचा असेल तर तो लहान मुलाचा. त्याची आवडनिवड, त्याचे हट्ट त्याच्या मागण्या, त्याचे लाड ही पालकांची प्राथमिकता झाली आहे. सहजपणे ही मुलं आई वडिलांशी, आजी आजोबांशी, पाहुण्यांशी उद्धटपणे बोलतात. अशा वेळी केबीसी मध्ये इशीत उद्धटपणे बोलला तर त्याच्यावरच दोषारोपण का?

       आज समाजात संस्कारवर्गाची खरी आणि महत्वाची भूमिका बजावली जाते आहे ती तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांद्वारे. या वेगवान त्सुनामीमध्ये सगळेच भरडून निघताहेत. पण खरी फरपट होते आहे ती लहान मुलांची. त्यांना या माध्यमाचे आकर्षण वाटणं, त्यावर विश्वास बसणं, त्यांनी या आभासी दुनियेचं अनुकरण करणं - हे साहजिकच आहे कारण त्यांचा जन्मच मुळी हातात स्मार्ट फोन घेऊन झाला आहे. पण त्सुनामीच्या या लाटेत पालकही वहावत जायला लागले तर कसं होईल? आज गोकुळाष्टमी म्हणजे दहीहंडीचा उत्सव,गणेशोत्सव म्हणजे मिरवणूका आणि ढोल, नवरात्र म्हणजे नऊ रंगाचे कपडे आणि गरबा, दिवाळी म्हणजे रोषणाई, फटाके आणि भेटवस्तू …..असे लहान पिढीचे समज झाले आहेत. हे चुकीचे समज कुणामुळे? आपणच आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खरं तर अशा वेळी एका दीपस्तंभा प्रमाणे आज पालकांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मुलं कुठेही भरकटली तरी त्यांना त्यांचा दीपस्तंभ  पालकांनी उपलब्ध करून दिला पाहिजे. मान्य आहे की दुर्दैवाने आजच्या वेगवान तंत्रयुगात पालकांच्या हाती मोजकेच पत्ते उरले आहेत.अनेक आगाऊ, अनावश्यक बाबींवर त्यांचा ताबा असूच शकत नाही. बाहेरच्या प्रत्येक प्रलोभनावर पालकांनी नियंत्रण ठेवणं केवळ अशक्य आहे. पण उरलेले हातातले पत्ते हे हुकुमाचे असणं ही आजच्या काळाची गरज आहे. मग पालकांनी नेमकं करावं तरी काय?पालकांनी इतरांना दोष न देता, आपलं लहानपण आठवावं. आई वडिलांची वागणूक आठवावी.आपल्या स्वतःच्या पालकांचाच आदर्श समोर ठेवून वागलं नाही तर भविष्य कठीण असणार आहे. म्हणूनच २०२५ च्या बालकदिनाच्या निमित्ताने 

 "हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे ।

 पालकांनी बालकांशी पालकासम (म्हणजे आपल्या आईवडिलांसारखं) वागणे"॥

धर्मेच अर्थेच कामेच...( न) अतिचरामि???*

- सध्या तरी लग्नाचा विचार नाही . माझा पीएचडी चा प्रोजेक्ट .. अजून २ वर्षे चालणार आहे त्यानंतर लग्नाचं बघू.... ३२ वर्षाची मुलगी - नुकताच एका ...