एक अनुभव
दिलीप, यावेळी तू टूरवर नाही गेलास तर चालणार नाही का? मला खरंच खूप अस्वस्थ वाटतंय.
हे बघ मिता. माझ्या प्रत्येक टूरच्या वेळी तुझी हीच वाक्यं असतात. आणि इतक्या वर्षांचा अनुभव आहे की मी गावाला गेल्यावर तुला काहीही होत नाही. अगं. काढून टाक ना ही मनातली भिती आणि तू काही जंगलात नाहीस. तू स्वतः डॉक्टर आहेस. तुझी तब्येत ठणठणीत आहे जे तुलाही माहित आहे. मिता - या भिती तून बाहेर येणं तुझ्याच हातात आहे. असं म्हणून दिलीप आपली बॅग घेऊन निघून गेला.
मीताच्या घशाला कोरड पडली. श्वासाचा वेग वाढला. छाती धडधडू लागली. हाता पायाला सूक्ष्म कंप येऊ लागला. उलटी होईल की काय असं वाटू लागलं. त्यातच शौचाची भावना झाली. ती धावतच वॉशरूम मध्ये गेली. एक लूज मोशन झाली आणि ती थकून बाहेर आली.
किती दिवस चालणार हे? दिलीप बाहेरगावी गेला की हीच लक्षणं का दिसतात मला? मनातली खोलवर असलेली भिती का उसळून येते वर? आणि ही भिती तरी नेमकी कशाची आहे? अशावेळी मिताला स्वतःचाच राग यायचा. इतका दुबळेपणा येतो कुठून ? या विचाराने चीड यायची आणि बरेचदा तर स्वतःची कीव ही यायची. स्वतःला कसंबसं सावरून मिता दैनंदिन कामं यंत्रवत उरकू लागली. कशातही मन लागत नव्हतं. एक अदृश्य दडपण सतत डोक्यावर आहे - असं जाणवत होतं. दिवस कसाबसा रेटला आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावून, स्तोत्रं, रोजची साधना, ध्यान करतांना मीतानं मनातली अस्वस्थता घालवण्याचा एक विफल प्रयत्न केला. पुस्तक डोळ्यासमोर धरलं, टीव्ही लावला, आवडती डिश बनवून खाण्याचा प्रयत्न केला. रात्र होऊ लागली तसं भीतीचं प्रमाण वाढू लागलं. आज अजिबात घाबरायचं नाही. जे व्हायचं ते होईल. नेहमी सारखं हे ठरवून मिता अंथरुणावर पडली. थोडं शांत वाटू लागलं. चला! आता झोपू या. असं म्हणत मितानं मनात मारुती स्तोत्र सुरू केलं. चार ओळी झाल्या आणि पुन्हा तेच. प्रचंड अस्वस्थता. उलटीची भावना. मिता ताडकन उठून बसली. छाती धडधडत होती. धावत वॉशरूमला गेली. पुन्हा लूज मोशन. गलितगात्र मिता लांब लांब श्वास घेत किती वेळ बसली कुणास ठाऊक. केव्हातरी डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा बरंच उजाडलं होतं. बरी झोप लागल्याचं समाधान वाटतंय न वाटतंय तेवढ्यात एक भितीची लहर आणि पोटात गोळा उठला. मितानं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. भावना आणि विचारांचा ओघ थोपवण्यासाठी तिने मोठ्या आवाजात रेडिओ सुरू केला आणि ओढून ताणून दिनक्रम सुरू झाला.
गेल्या सहा वर्षापासून तिला हा त्रास सुरू होता. ती वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर होती. दोन्ही मुलं व्यवस्थित शिकून आपापल्या विश्वात दंग होती. बाहेरगावी होती. दिलीप आपल्या व्यवसायात, टूर मध्ये स्थिरावला होता. कसलेच दडपण वा ताण येण्यालायक परिस्थिती नव्हती. सुरुवातीला तर काही शारीरिक आजार असेल म्हणून कितीतरी वेळा तपासण्या झाल्या. काहीही निष्पन्न झालं नाही. मुळात दिलीप बरोबर असतांना तिला काहीच त्रास होत नसे. त्यामुळे हा प्रकार शारीरिक नसून मानसिक आहे हे तिच्या कधीच लक्षात आलं होतं. कितीतरी मानसिक व्याधीग्रस्तांना तिने समजावून, सल्ला देऊन बरं केलं होतं. पॅनिक अटॅक्स मध्ये कोणती औषधं घ्यावी हे ही तिला माहित होती. कधी कधी ती त्या गोळ्या घेतही असे. तात्पुरतं बरं वाटायचं पण कायमचं नाही. खरं तर मिता डॉक्टर जरी असली तरी मनोविकार तज्ञ नव्हती. पण तिने स्वतःची लक्षणं बघून त्यावरचं सगळं मानस वैद्यकीय शास्त्र वाचून काढलं होतं. सगळी इत्थंभूत शास्त्रीय माहिती असूनही मला असं का व्हावं? हा मीताचा पहिला प्रश्न. एकटेपणाची भीती व असुरक्षितता - तेही दिलीप नसतांना - इतका दुबळेपणा माझ्यात कसा काय? हा तिचा दुसरा प्रश्न. या दुबळेपणा वर निश्चय करून, प्रयत्न करूनही मला मात का करता येत नाही? त्यामुळे निर्माण होणारा अपराधीभाव- हा तिसरा प्रश्न. तात्पुरत्या औषधांनी लगेच बरं वाटतं पण हा काही कायमचा उपाय नाही हे तिला ठाऊक होतं . औषधांशिवायचे उपाय म्हणजे प्राणायाम, ध्यान, ओंकार साधना माईंडफुलनेस, स्वसंवाद, लिखाणा द्वारे भितीचा निचरा, दीर्घश्वसन, मानसिक आरोग्याचे वर्कशॉप्स .... वगैरे सगळं करून झालं. बरं. या लक्षणांची वाच्यता कुणाबरोबर ही करता येत नव्हती कारण ऐकणारा काय म्हणेल? स्वतः तला मानसिक दुबळेपणा इतरांना सांगण्याची तिला लाज वाटत होती. एका डॉक्टर मैत्रिणीशी याबाबतीत वरवर चर्चा केली तर म्हणाली, 'सुख खुपतंय तुला'.
पण या संपूर्ण मानसिक आंदोलनात दिलीप ने तिला पूर्ण समजून घेतलं. तो कधीही तिच्यावर चिडला नाही. तो तिला नेहमीच धीर देत असे. फक्त त्याचं म्हणणं एकच होतं - या भितीला धडक दे. बघ काय होतंय ते. भितीला सांभाळून ठेवणं, तिला महत्व देणं म्हणजे मूर्खपणा आहे. तुझं धाडस, तुझा निश्चय - हेच त्यावर उत्तर आहे. त्याचं तिला पटायचं पण जमायचं नाही. औषधं घेणं त्याला फारसं रुचत नव्हतं. आत्मबळ, इच्छाशक्ती, हिम्मत ही आपली अस्त्रं वापरून यश मिळवायचं हा त्याचा दृष्टिकोन होता कारण तो वैद्यकीय शास्त्र शिकलेला नव्हता. औषधं घेण्यास त्याचा विरोधच होता.
मानसिक आजारांवरची औषधं तर मितालाही माहित होती पण ती मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कधीच घेणार नव्हती. त्यासाठी त्यांच्या दवाखान्यात जाणे गरजेचे होते. स्वतःच्या भित्रे पणाचा, दुबळेपणाचा पाढा त्यांच्यासमोर वाचावा लागणार होता. स्वतः डॉक्टर असल्याने सगळ्याच डॉक्टरांशी ओळख. शारीरिक दुखण्यासाठी त्यांचा सल्ला घेणं ठीक होतं पण मानसिक दुखण्यासाठी? त्यासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि संकोच आड येत होता. पण एकदा धैर्य एकवटून गावातल्या एका प्रसिध्द मानसोपचारतज्ञाच्या दवाखान्याची ती पायरी चढलीच.
तिची लक्षणं ऐकतांना डॉक्टरांच्या चेहे-यावरचे हावभाव हे तुच्छतादर्शक आणि चिडके होते.
'अहो, तुमचा नवरा गावाला गेला की तुम्ही घाबरता आणि तुम्हाला लूज मोशन्स होतात. मग काय झालं? होऊ द्यायचं. त्यामुळे तुम्ही काही मरणार नाही. ही १५ दिवसांची औषधं घ्या. या औषधाने फायदा झाला नाही तर तुम्हाला शॉक द्यावे लागतील आणि माझा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चा १० दिवसांचा कोर्स आहे तो करा.' हे सगळं ते जोरात रागावून बोलले.
यापलिकडे एक शब्दही न बोलता त्यांनी तिला जायला सांगितले.
या अनुभवाचा तिने धसकाच घेतला. आणि मागिल पानावरून पुढे असं आयुष्य चालतच राह्यलं.
एकदा मुंबईला एका कॉन्फरन्सला ती गेली असताना डॉ. रॉय यांचं मानसिक विकारांवरचं व्याख्यान ऐकलं. अत्यंत शांतपणे आणि ठामपणे त्यांनी हा विषय समजावून सांगितला आणि ते ऐकता ऐकताच तिने त्याच क्षणी ठरवलं की डॉ. रॉय सरांकडे मला नक्कीच उत्तर मिळणार.
आणि एके दिवशी मिता त्यांच्यासमोर गेली आणि अथपासून इति पर्यंत आपलं रडगाणं तिने गाऊन दाखवलं. ते शांतपणे ऐकत होते. त्यांनी तिला कुठेच अडवलं नाही किंवा काही प्रश्नही विचारले नाहीत. फक्त तिला जास्तीत जास्त बोलण्याची संधी दिली.
खूप प्रयत्न करूनही माझी लक्षणं कमी का होत नाहीत? या तिच्या प्रश्नाला ते म्हणाले,
' ही लक्षणं निर्माण होणार ही धारणा किंवा ही समजूत तुमच्या मेंदूत अनेक वर्षांपासून घट्ट रुजली आहे. या लक्षणांची सुरुवात का? कशी? किंवा त्याची कारणं शोधणं हा एक उपचारांचा भाग आहे पण ते नंतर. सध्या या धारणांना आणि समजुतीला तुमच्या मेंदूतील रसायनांनी अजूनच दृढ केलं आहे. किंवा साध्या शब्दात सांगायचं झाल्यास या धारणांचं मेंदूतील वायरिंग हे अगदी पक्कं आहे. महत्वाचं म्हणजे ते जितकं जुनं तितकं ते जास्त घट्ट होत जातं. त्यामुळे ठराविक परिस्थिती आली की मेंदूच्या सर्किट मधून भीतीचे, धडधडण्याचे,उलटीच्या भावनांचे संदेश शरीराला जातात. आता हे वायरिंग इतकं पक्कं असतं की त्यावर व्यक्तिचा ताबा नसतो. अशा वेळी हे सर्किट मोडण्यासाठी औषधेच परिणामकारक ठरतात. थोडक्यात हा मेंदूतील केमिकल लोचा नष्ट करण्यासाठी केमिकलच अर्थात औषधं वापरावी लागतात. औषधं सुरू केल्यावर ती शरीराने नीट स्वीकारली की नाही हे आधी बघावं लागतं. नाहीतर वेगळी औषधं वापरावी लागतात. एकदा योग्य औषधं सुरु झाली की हळूहळू त्रास कमी होतो. जरा बरं वाटलं की पेशंटला औषधं बंद करण्याची घाई असते आणि ५०% पेशंट डॉक्टरला न विचारता तसं करतातही. अशा वेळी लक्षणं कमी झाली तरी मेंदूतील वायरिंग चे कनेक्शन पूर्णतः विलग होत नाही. आणि काही दिवसांनी पेशंटला परत डॉक्टरकडे जावे लागते. जुन्या गैरसमजुतीची कनेक्शन्स नष्ट होऊन त्याठिकाणी योग्य त्या धारणांची वायरिंग निर्माण झाली की मगच पेशंट पूर्णतः बरा होत असतो. आणि कुणाला किती दिवस औषधं घ्यावी लागतील हे आजच सांगता येत नाही. नियमित फॉलोअप दिला तरच औषधोपचाराला यश मिळतं.'
डॉक्टरांचं हे शास्त्रीय विवेचन मिता आणि दिलीप ला समजलं आणि पटलं ही. आणि मिता मध्ये असणारा अपराधी भाव त्याक्षणी मावळला. फक्त दिलीप नॉन मेडिको असल्याने त्याच्या काही प्राथमिक शंकांना डॉ. रॉय यांनी व्यवस्थित उत्तरे दिली.
'या औषधांमध्ये केवळ झोपेची औषधं नसतात. औषधोपचाराने पेशंट निष्क्रीय होत नाही तर सक्रिय होतो. या औषधांची सवय लागत नाही किंवा काही घातक दुष्परिणामही होत नाही. मानसिक व्याधीसाठी उपचार घेणं हे समाजापासून लपवण्याची गरज नाही. आज समाजात ४०% मानसिक रुग्ण आहेत पण औषधोपचार घेणारे मात्र १० % आहेत. स्वतःचा मानसिक विकार ओळखून, त्याचा स्वीकार करून लवकरात लवकर उपचार सुरू करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.'
डॉक्टरांच्या पहिल्या भेटीतच मिता चं दडपण एकदम कमी झालं. औषधोपचाराने व नियमित फॉलोअप ने मिता आज पूर्णतः लक्षणातून बाहेर पडली आहे. पण अजूनही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती औषधे घेते आहे. ती आणि दिलीप दोघंही आजकाल गरज असलेल्या पेशंटला मानसोपचारतज्ञा कडे आवर्जून पाठवतात.
मिता ला उशीरा का होईना पण डॉ. रॉय भेटले. तसेच सगळ्या रुग्णांना वेळेवारी योग्य डॉक्टर मिळून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होवो ही प्रार्थना.
डॉ साधना आशुतोष कुलकर्णी
#मनोविकार
No comments:
Post a Comment