Friday, October 30, 2020

 माझ्या  मराठीची दुर्दशा...की दुदर्शा की र्दुदशा???

अनेक बारक्या गल्ल्या, अवघड वळणं,डोक्यात जाणारा ट्रॕफिक पार करत शेवटी एकदाचं हवं ते दुकान सापडलं.आणि दुकान सापडल्याच्या आनंदाच्या फुग्याला लगोलग टाचणी पण लागली.  'आर्शिवाद ग्राफिक्स'- हे पाटीवरचं नाव  वाचूनच डोकं फिरलं.  'आशिर्वाद' ला 'आर्शिवाद' लिहिणाऱ्या दुकानात कसल्या ग्राफिक्स ची अपेक्षा करणार? आणि हो - 'ग्राफिक्स' हा इंग्रजी शब्द मात्र अचूक लिहिला होता पाटीवर. दुकानात शिरल्यावर मी टोकलंच त्या मालकाला.

' हो मॅडम.लिहिताना  चूक झाली, हे पाटी लावल्यावर लक्षात आलं. नंतर दुरुस्त करतो करतो म्हणतोय पण कामं इतकी असतात ना............'

       ही खरी माझी डोकेदुखी. लिहीतांना चूक होणं समजू शकते मी. पण ती चूक - पदरी पडलं पवित्र झालं -च्या चालीवर स्वीकारणं - हे मला पटूच शकत नाही.

  ' लिहिल्या गेलं 'आर्शिवाद'.वाचताना 'आशिर्वाद' वाचा की.एवढं  काय  बिघडलं ?'- - -ही जी बेफिकिर वृत्ती असते ना-ती माझ्या  डोक्यात  जाते .

 तसंही रफार आणि अनुस्वार या मंडळींचं नशीबच फुटकं. (आता रफार आणि अनुस्वार म्हणजे काय हे कृपया विचारु नका हो)बिचारे  नेहमीच वेटिंग लिस्टमध्ये असतात. लिहिणारा आपल्या सोयीनुसार, ज्ञानानुसार त्यांना शब्दावर कुठेतरी बसवून मोकळा होतो - मग हर्षवर्धन चं हषर्वर्धन झालं काय किंवा आनंदमंगलचं आनदंमगंल झालं तरी कुणाला फारसा फरक पडत नाही.

   ज्या शाळेत उत्कृष्ट मराठी शिक्षक आहेत अशा मराठी शाळेत माझं शिक्षण झालंय. आजच्या पिढीला हे वाचून मी पुराणवस्तु संग्रहालयातली वाटू शकेन कदाचित. आमच्या मराठीच्या बाई शुद्धलेखन आणि व्याकरण याबद्दल विलक्षण आग्रही होत्या.( हे शुद्धलेखन आणि व्याकरण म्हणजे काय रे भाऊ?- - हो. हा प्रश्न अपेक्षितच आहे मला)

 ह्रस्व, दीर्घ, स्वल्पविराम पूर्णविराम, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, या विभूतींना आमच्या डोक्याच्या  हार्डवेअर मध्ये योग्य रीतीने फिट्ट करण्याचं चोख काम आमच्या बाईंनी प्रामाणिकपणे  केलं. आता या ह्रस्वदीर्घादि विभूतींची नावं ऐकून आजच्या पिढीला हडप्पा-मोहंजोदारो उत्खननातून या वस्तू  सापडल्या असाव्यात असा समज होणं सहज शक्य आहे. आणि हो. काना- मात्रा मधील 'काना'ला 'कान्हा' असंही लिहिलं जातं या ज्ञानाची प्राप्ती मला नुकतीच झाली आहे बरं का.

     एकदा निबंधात हस्तांदोलन च्या ऐवजी हंस्तादोलन - असं मी लिहिलं होतं तेव्हा बाईंनी तो शब्द पन्नास वेळा अचूक लिहिण्याची शिक्षा मला दिली होती.(अशा अनेक शिक्षा त्या कोवळ्या वयात  आम्ही  निमूटपणे भोगल्या आहेत - त्याही पालकांना न समजता)  बरं फक्त लिहिणंच नाही तर उच्चार कसे असावेत यावरही बाईंचं लक्ष असायचं .धडा वाचतांना मी 'भारतात' हा शब्द 'भार्तात' असा वाचता क्षणी बाईंनी डोक्यावर टपली हाणली. 

 'अगं तो काय 'सर्वात', 'मार्गात', 'वर्गात' असा शब्द आहे का? शारदेला शार्दा म्हणशील का?'   

 भाषेच्या लेखना वाचनाचे असे संस्कार झाल्यामुळे कुठेही जरा चूक दिसली की डोकं फिरतंच. माझं शास्त्र जेव्हा 'आर्यूवेद' असं लिहिल्या जातं तेव्हा मस्तकात तिडीक  जातेच. पण हल्ली असल्या चुकांना महत्त्व दिल्या जात नाही किंबहुना त्या चुकाच नाहीत असंही काहींचं म्हणणं आहे. 'भावना पोचणं महत्त्वाचं - -व्याकरण नाही '- ही हल्लीची टॅगलाईन मी काही पचवू शकत नाही .बेफिकीरपणे वाटेल तिथे अनुस्वार आणि रफार देणाऱ्यांची मला खरोखर चीड येते. ज्या शब्दांमध्ये अनुस्वार आणि रफार दोन्ही आहेत ,अशा शब्दांबद्दल मला खूप सहानुभूती वाटते .अंतर्नाद, अंतर्मन, अंतर्यामी ,अंतर्बाह्य अशा शब्दांना विचारा एकदा - त्यांचे कसे हाल केले जातात ते....... 

  'संकर्षण', 'धैर्यवर्धन' अशी नावं असणाऱ्या व्यक्तींना विचारा त्यांच्या व्यथा ..........

 प्रंचड, गुतांगुंत ,वारवांर, ससंर्ग, विर्सजन अशा स्वरूपात येणारे हे नेहमीचे शब्द वाचताना हल्ली सवय करावी लागतेय कारण कोणाला त्याबद्दल फारसं गांभिर्य नसतं. आणि हे मी सध्या फक्त रफार आणि अनुस्वार याबद्दलच लिहिते आहे. बाकी शुद्धलेखना बद्दल लिहायचं तर  ह्रस्वदीर्घादि प्रत्येक  मंडळींवर आणि प्रत्येक  विरामचिन्हावर ( हे आणखी काय  नवीन ?) एक स्वतंत्र लेख होईल .

    बरेचदा असे चुकीचे शब्द वाचताना माझं मनोरंजनही झालेलं आहे .जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण  कंपाउंडवर जवळजवळ  पन्नास वेळा  लिहिलेलं 'छोटं कुंटुब सुखी कुंटुब' वाचताना --काहीही न खटकणाऱ्या  मंडळींजवळ सुखी माणसाचा सदरा आहे याचा हेवाही वाटला आहे.

हलकंफुलकं आणि  हलकफुलक व मोकळंढाकळं आणि मोकळढाकळ यातला नेमका फरक समजणाऱ्यांशी माझी नाळ जुळायला (माझीतरी) हरकत नाही.

    शेवटी मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि माझी मातृभाषा म्हटलं की प्रेम आलंच .प्रेम म्हटलं की  जबाबदारी आलीच. त्यामुळे कुठेही चूक दिसली तर शक्यतो ती दुरुस्त करण्याचा,टोकण्याचा, निषेध नोंदण्याचा प्रयत्न करणं हा माझा खाक्या असतो. तुम्ही काय म्हणाल याबद्दल????#मराठी#शुद्धलेखन#रफार#अनुस्वार#व्याकरण#

Sunday, October 4, 2020

भरतकाम अर्थातच एम्ब्रॉयडरी........ताण व्यवस्थापनाचा माझा उपाय...
गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थिती मुळे प्रत्येकच जण धास्तावला आहे.मी ही त्याला अपवाद नाहीच. त्यात माझा वैद्यकीय व्यवसाय.रोज नवनवीन पेशंटशी संबंध येणार.
कायम डोक्यावर टांगती तलवार.
अनिश्चितता, नकारात्मकता जशा जगण्याचाच भाग झालेल्या.
त्यासाठी 'स्वास्थ्यभान' ही लेखमाला लिहायला सुरुवात केली.
पण लेखमाला जशी संपली तसं लिखाणात गुंतलेलं मन ही मोकळं झालं आणि .......
आता काय????
वेगवेगळ्या रेसिपीज केल्या.पण मनाला हवा तो दिलासा नाही मिळाला.
त्यादिवशी साड्यांचा कप्पा आवरतांना , तळाशी एक रजिस्टर च्या आकाराचं पाकीट दिसलं........
अँकर क्विक स्टिच???
युरेका युरेका- - - असं ओरडायचंच बाकी राह्यलं होतं माझं.
त्या चारही कोऱ्या करकरीत  फ्रेम्स मला खुणावू लागल्या.  लहान मुलीच्या उत्साहानं मी ते भरतकाम करायला घेतलं आणि प्रत्येक टाक्यागणिक नकारात्मकता कमी होऊ लागली.
 

भरतकामाची मला लहानपणापासून खूप आवड.४०/५० वर्षांपूर्वी चा काळ.त्यावेळी मुली आवर्जून भरतकाम करित.मी तर आवड असल्याने रुमाल,कुर्ते,ब्लाऊज,पडदे,टेबलक्लॉथ, बेडशीट,कुशन कव्हर,साड्या........ कुणालाही भरतकामाच्या तावडीतून सोडलं नाही.
 पुढे लग्न, नोकरी, मुलंबाळं यात माझं भरतकाम मागेच पडलं.याचबरोबर भरतकाम आउटडेटेड होण्याचाही तो काळ होता.
   एकदा पंचवीस वर्षांपूर्वी टीव्हीवर मी अँकर क्विक स्टीच ची जाहिरात बघितली आणि माझ्या डोक्यात किडा वळवळू लागला.भरतकाम करुन ती फ्रेम भिंतीवर लावण्याची आयडियाच मुळात भन्नाट होती.
मी या स्टीच कीटचं शोधकार्य सुरु केलं.अकोल्यात कोणत्याही नवीन वस्तूचा नेहमीप्रमाणे नन्नाचाच पाढा होता -जो आजही असतोच.
माझं माहेर नागपूर असल्यानं तिथे बर्डीवरच्या बॉम्बे एम्पोरियम मधे मला अँकर क्विक स्टिच एकदाचं सापडलं.आधाशासारख्या ५ फ्रेम्स विकत घेऊन ,मी जसा वेळ मिळेल तसा, रात्री जागून  त्या पूर्ण केल्या.त्यासाठी घरातल्यांची बोलणी पण खाल्ली.मग प्रश्न आला फ्रेम करण्याचा .......नेहमी प्रमाणे अकोल्यात मनासारख्या फ्रेम्स करुन मिळेनात.झालं ...माझं भरतकाम कित्येक दिवस कपाटातच पडून राहिलं.

     त्या वेळी  कामानिमित्त माझे यजमान महिन्यातून दोनदा  तरी  मुंबई ला जात.ठराविक गेस्टहाऊस मध्ये त्यांचा मुक्काम  असे.योगायोगाने बाजूलाच एक फ्रेमचं दुकान  होतं.मला जशी हवी होती,तशी फ्रेम ह्यांना तिथे  आढळली आणि त्यांचंही "युरेका- युरेका" झालं.मग काय,  लगोलग आमचं भरतकाम  मुंबईला  गेलं आणि  सुरेख  फ्रेम्समधे सजून घरी  वापस आलं.
त्या फ्रेम्स भिंतीवर लावून वीस वर्ष झालीत.आजही पहिल्यांदा बघणार्याच्या नजरेतलं कौतुक माझ्या अंगावर मुठभर मांस चढवतंच.
 मग हा सिलसिला सुरूच राहिला.नागपूरच्या प्रत्येक ट्रीप मधे २/४फ्रेम्स विकत आणायच्या.माझं बघून माझ्या मुलीलाही हा नाद लागला.त्यावेळी लहान मुलांसाठीही त्यांच्या वयानुरूप डीझाईन च्या फ्रेम्स मिळायच्या.आम्ही दोघींनी भरपूर फ्रेम्स केल्या.आमच्या घरातली एक भिंतच मुळी अँकर स्टीच कीटची आहे.

हळूहळू नागपूर च्या ट्रिप्स कमी झाल्या.बर्डीवर जाणंही व्हायचं नाही.कधी काळी बॉम्बे एम्पोरियम मधे गेलंच की नविन नोकर असायचे.त्यांना मला काय हवंय हे कळायचंच नाही.
मग काऊंटर वरच्या मालकांकडे बघितलं की ते हसून आत जायचे आणि शोधून शोधून धूळभरल्या एखाद दोन फ्रेम्स समोर ठेवायचे.
" मॅडम, चलता नही आजकल ये.हम मंगवाते भी नहीं.मुझे पता है इस लिये मैने ये दो पीस आपको ढूंढकर दिये. बाकी किसीको तो समझता मी नहीं".
आणि मग माझं हे भरतकाम जवळपास विस्मरणातच गेलं.
   एकदा साफसफाई करताना मला  जुन्या कीटचं कव्हर सापडलं.त्यावर बंगलोरचा पत्ता दिसला.पुन्हा  "युरेका".आता  बंगलोरहून काही स्टीच कीट्स मागवायला सुरूवात केली पण  त्यांची  सर्व्हिस व्यवस्थित नसल्याने परत  माझा  छंद  मागे  पडला .

   मध्यंतरी  साऊथ टूरला गेलो होतो .बंगलोर दर्शन करतांना एम जे रोडवरचा "अँकर मदुरा कोट्सचा" पत्ता मला  खुणावत होताच .एम जे रोडवरचं "नल्ली सिल्क" चं दुकान पालथं घालण्याचं परमकर्तव्य आम्ही समस्त  बायकांनी  यथास्थित पार पाडल्यावर मी हळूच  माझ्या  पत्त्याची चौकशी  केली .पत्ता  नेमका बदलला  होता आणि  तिथे  जाण्याचा  मोह ,मला सगळ्यांच्या  कपाळावरच्या आठ्या बघून नाईलाजास्तव आवरावा लागला.
पाच वर्षांपूर्वी मला मुलीनं सांगितलं,
" आई , आपल्या साठी आनंदाची बातमी आहे.आता स्टीच कीट्स अँमेझॉन वर मिळायला लागल्यात ".
मला हर्षवायू होणं बाकी होतं. त्यावेळी आॕनलाईन शॉपिंग चा सराव नसल्याने मुलीनंच पुण्यातून सगळे सोपस्कार करुन चार फ्रेम्सचं पार्सल मला पाठवलं.
खरंतर आता डोळ्यांना त्रास व्हायला लागलाय.पूर्वीसारखी बैठकही होत नाही.त्यामुळे ते पार्सल मी ठेवून दिलं.त्यानंतर मुलीचं लग्न, तिचे सणवार, माझ्या कॉलेजच्या जबाबदार्या, आणि मुलीचं बाळंतपण - - यात ते पार्सल दृष्टीआडच झालं.

आत्ता पंधरा दिवसांपूर्वी हा खजिना माझ्या हाती लागला आणि  भरतकाम करता करता मी जुन्या आठवणीत शिरले.डोळ्यांना त्रास नक्कीच झाला पण त्यापेक्षा मिळणारा आनंद खूप जास्त होता.
मुलीला कळवलं तेव्हा तिलाही खूप  आनंद झाला आणि तिच्या अंगातही उत्साह संचारला. आता आँनलाईन शॉपिंग सुरू झाल्याबरोबर तिनंही फ्रेम्स आँर्डर केल्या आणि सध्या ती एम्ब्रॉयडरी करतेय.
गंमतीची गोष्ट म्हणजे माझी चार वर्षांची नात, रोज त्या फ्रेमवर लक्ष ठेवून आहे.
"ममा लवकर पूर्ण कर आणि ही फ्रेम माझ्या बेडरूममध्ये लावू या".
असं ती म्हणते.
माझा छंद तिसऱ्या पिढी पर्यंत झिरपलाय की काय????

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...