Monday, November 24, 2025

वीण दोघातली ही तुटेना

 वीण दोघातली ही तुटेना


          ते दिवसच वेगळे होते. ७८ ते ८२ या कालावधीतले. नागपूरला रहात असल्यामुळे पुण्या मुंबईला दिसणाऱ्या टीव्हीचं खूप अप्रूप होतं. घरात बसल्या बसल्या टीव्हीवर कार्यक्रम, सिनेमा बघणं... ही सुखाची परमावधी वाटायची तेव्हा. त्या काळात एकदा पुण्याला मावशीकडे गेल्यावर शेजा-यांच्या टीव्हीवर दाराच्या फटीतून ( हो. फटीतूनच. पुणंच ते. नशीब. माझ्या तोंडावर आपटून दार बंद झालं नाही. (कारण मंडळी 

'गज-यात' मग्न होती.) 'गजरा' बघितल्यावर लंडन च्या अल्बर्ट हॉल मध्ये कार्यक्रम बघितल्याचा 'फील' आला होता. नागपूरात अनेक दिवस तो अनुभव सांगतांना मला शब्द पुरत नव्हते.

                       घरी टीव्ही आणूया असं म्हणण्याची तर हिम्मतच नव्हती. 'आधी अभ्यासात दिवे लावा. काय करायचाय घरात तो इडियट बॉक्स?' असे वाग्बाण कोण झेलणार हो? महाराष्ट्रातील तमाम मराठी मध्यमवर्गीय घरातल्या परंपरेनुसार, नवीन कोणत्याही तंत्रज्ञानाला सुरुवातीला विरोध करणं म्हणजे- - शास्त्र असतं ते. याशिवाय मॅट्रिक ची परीक्षा असेल तर विरोधाचे एक सबळ कारण घरच्यांच्या हातात असायचं. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे मामाकडे टीव्ही घेतला. मग काय, महिन्यातून एक दोन वेळा टीव्ही बघण्याचं सुख मिळू लागलं. एका सुदिनी मामाने घरचं कार्य असल्यासारखं सगळ्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं. त्या रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर 'आनंद' सिनेमा दाखवणार होते. आता संध्याकाळचा सिनेमा - संपेस्तोवर रात्रीचे नऊ वाजणार. मामाचं घर दूर. त्यावेळी घरी गाड्या, बाईक्स असली चैन नव्हती. मग काय, मुक्कामालाच जायचं. बिचाऱ्या मामीने पंधरा जणांचा स्वयंपाक आधीच रांधून ठेवला. आम्ही मामाकडे पोचलो तर ' हाऊसफुल्ल' चा बोर्ड लावायचा का, या चिंतेत मामा होता. हॉलमध्ये सोफा, खुर्च्या, स्टूल, टीपाॅय, सतरंज्या, आसनं घेऊन शेजारची मंडळी आधीच येऊन बसली होती. आम्ही गेल्यावर काही जण खिडकीत, काही जिन्यात काही डायनिंग टेबलवर आसनस्थ झाले. आता या मंडळींसाठी शेजारधर्म म्हणून चहा - पाणी पण ओघानं आलंच. सिनेमा सुरू झाल्यावर थोड्यावेळानं मुसमुसण्याचा आवाज येऊ लागला. नंतर नाकाचा 'सू सू' आवाज आणि त्यानंतर  'हुंदके' सुरू झाले. समस्त माता भगिनींचं सामूहिक रुदन ऐकून पुरुषवर्ग अवघडून गेला . त्यात मध्येच कुणाला पाणी तर कुणाला' घाईची'_ हे सतत सुरू होतं. आम्ही सगळे आनंद सिनेमा पाहून धो धो रडलो पण मामा मामी मात्र प्रेक्षकांची उस्तवार करता करता रडकुंडीला आले. तेव्हा पासून मामाने कानाला खडा लावला.

                आणि माझ्या मोठ्या बहिणी कडची तर वेगळीच गंमत. ती खानदेशात एका लहानशा खेड्यात रहात होती कारण भावजी डॉक्टर होते. त्या खेड्यात ते एकुलते एक डॉक्टर असल्याने समस्त जनता त्यांची पेशंट होती. खाली दवाखाना आणि वर बंगला असल्यामुळे घर - दवाखाना एकच होतं - सार्वजनिक. मुंबईत टीव्ही आल्याबरोबर लगेच आमचे भावजीही टीव्ही घेऊन आले. गावात सिग्नलच नव्हता त्यामुळे टीव्हीवर फक्त मुंग्या. गावकऱ्यांना टीव्ही हा प्रकारच माहित नसल्याने दादांचे( भावजींचे) आणि पेशंटचे खानदेशी भाषेत अत्यंत मनोरंजक संवाद होत.

'दादा, कोंची मिशीन आन्ली व्ह तुम्हीनं?'-  बाई.

'टीव्ही आहे तो. त्याच्या मध्ये शिनिमा, गाने आनि बातम्या बी दिसता' - दादा.

'आह्या माय, आमाले बी पाहता येतीन का?' - बाई

'वा. वा. काहून नी पाहता येनार?'- दादा.

'माय वं. याच्यात तं मुंग्या दिसू रायल्या. मुंग्याईंचा शिनिमा हाय का?'- बाई

'नाई न. वं. मले तं येक झाड दिसलं आता.'- दुसरी बाई.

'हाव बयना, मले तर आता ढगं दिसू राह्यले माय. लय भारी हाय  दादा तुमची टीवी. पन एच्यात आवाज नी का? '- बाई

'आता बाई, झाड, ढग आन मुंगी बोलते का? जहा बाया मानसं येतीन तहा आवाज बी यीन '- दादा.

'काय जादू हाय माय बयना.'- बाई

अशा रीतीने त्या  मुंग्या असलेल्या टीव्हीत समस्त गावकरी झाडं, ढग, पक्षी, प्राणी, घर, पाऊस बघत तासभर सहज घालवीत आणि 'मले काय दिसलं' यावर चर्चा करीत.

          असो. हे सगळं आठवणयाचं कारण म्हणजे, २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिन आहे. १९९६ साली संयुक्त राष्ट्र संघाने पहिला जागतिक दूरदर्शन मंच आयोजित केला होता. तेव्हापासून २१ नोव्हेंबर हा दिवस दूरचित्रवाणी या माध्यमाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी, देशातील शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी, तसंच शिक्षण, मनोरंजन, माहिती, बातम्या यासाठी दूरचित्रवाणी  या माध्यमाची भूमिका अधिक प्रगत सशक्त करण्यासाठी हा विशिष्ठ दिवस नेमून दिला आहे. जगभरातील पत्रकार, विद्वान, लेखक यांनी या भूमिकेवर २१ नोव्हेंबर रोजी चर्चा करणे, बदल करणे, अद्ययावत करणे अपेक्षित आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि संवाद ही चतु:सूत्री ठरवून  भारतात १५ सप्टेंबर १९५९ रोजी, नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवनात तात्पुरत्या उभारलेल्या स्टुडिओतून दूरदर्शवरून पहिले प्रसारण करण्यात आले. पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच टेलिव्हिजनसाठी ‘दूरदर्शन’ असे  नाव सुचवले.यासाठी दूरदर्शनवर काम करण्यापूर्वी,  त्यांनी बीबीसीमध्ये एक वर्षासाठी प्रशिक्षण घेतले होते आणि फ्रान्स व पश्चिम जर्मनीमध्येही यासंबंधी काम केले होते. पु.लं. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी दूरदर्शनवर एक तासाचा पहिला कार्यक्रम तयार केला होता. त्यात पपेट शो, वैजयंतीमाला यांचे नृत्य, भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती अशा लोकप्रबोधन आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधणाऱ्या घटकांचा अंतर्भाव होता. प्रायोगिक तत्त्वावरचे हे प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवस दिल्ली परिसरातच पाहता येत होते.

           मुंबईत १९७२ मध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झाले.  दूरदर्शनच्या आशियाई स्पर्धेतील सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे, असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी श्री भटकर यांच्यावर सोपविली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम पुढे वाढतंच गेलं. त्यावेळी दूरदर्शनवर हम लोग, बुनियाद, चित्रहार, सुरभी या मालिका फार प्रसिध्द होत्या. मराठीची फक्त सह्याद्री हीच वाहिनी होती. आभाळमाया, वादळवाट, दामिनी,गजरा असे दर्जेदार कार्यक्रम त्यावेळी होत असत.  पुढे वेगवेगळे चॅनेल्स सुरू झाल्यावर तर टीव्हीने कातच टाकली. चोवीस तास... अनेक चॅनेल्स... माहिती, बातम्या, मनोरंजन, क्रीडा, ज्ञान काय नव्हतं त्या चौकोनी पडद्यावर? रामायण, महाभारत, क्यूं की सास... यांनी तर विक्रम केले. , हे कार्यक्रम सुरू असतांना रस्त्यावर कर्फ्यू लागल्याप्रमाणे शुकशुकाट असे. हळूहळू या टीव्हीने सगळ्यांच्या घरात एका अति महत्वाच्या घटकाचे स्थान मिळवले

             पण मोबाईल आला. त्या मागून इंटरनेट, स्मार्ट फोन आले. टीव्हीनं पण आपलं  'धूड' बदलून स्मार्ट, स्लीम, एलईडी टीव्हीचं रूप घेतलं. आज व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम फेसबुक, ओटीटी च्या  लोकप्रियतेमुळे टीव्हीचं महत्व थोडं कमी झालंय पण तरीसुध्दा टीव्हीची गरज असतेच. प्रत्येक माध्यमाची ठराविक वैशिष्ठ्यं, काही फायदे, काही तोटे असतातच. आपण आपल्या टीव्हीवर काय बघायचं, कितीवेळ बघायचं, नेमका कोणता हेतू मनात ठेवून बघायचं हे आपल्याच हाती आहे. मनोरंजन? शिक्षण? बातम्या? जगाची माहिती? की टाईम पास? या माध्यमाचा योग्य तो फायदा करून घेण्याची जबाबदारी आपलीच आहे. कारण आपण एकटे नसतो तर सोबत कुटुंबही असतं.  माध्यमाला वेगवेगळ्या चाळण्या लावण्याचा संस्कार करणं हे आज विलक्षण  गरजेचं आहे.

            पण माध्यमाची स्वतः ची ही काही जबाबदारी असेलच ना? आज संपूर्ण विश्वात कुणीही, कुठेही, केव्हाही हे माध्यम बघू शकत असेल तर माध्यमाची नक्कीच जबाबदारी वाढते. आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मराठी वाहिन्या या आपल्या महाराष्ट्राचं चित्र योग्य स्वरूपात मांडतात का?

       उत्तर दुर्दैवानं 'नाहीं' हेच आहे. मराठी वाहिनी वरिल कार्यक्रमांचा दर्जा, कल्पकता, वैविध्य, याविषयी बोलण्यासारखी परिस्थिती आहे आज?  तंत्रज्ञानानी जगण्यावर कितीही आक्रमण केलं तरी आजही कुटुंबाचं महत्व, कौटुंबिक मूल्य आणि कौटुंबिक संस्कार यांची सर कुणालाच नाही. अशा कुटुंबाची नेमकी कोणती प्रतिमा आपल्या वाहिन्या निर्माण करित आहेत? अनेक वर्षांपासून एकच साचा. मोठ्ठं श्रीमंत कुटुंब. त्यात दोन गट. एक बुद्धिमान, कर्तृत्ववान, मनमिळावू प्रेमळ गट आणि दुसरा कपटी, खलनायकी गट, ज्यात  स्त्रियांचं वर्चस्व.(असं का?) या कुटुंबावर एकामागून एक संकटं येतच राहतात.( का?) या संकटांच्या वणव्यात  खलनायकी गट कायम तेलाची धार ओतत असतो. घरातल्यांचं हे कुकर्तृत्व या बुद्धिमान(?) गटाला कधीच लक्षात येत नाही.( फारच बाई मठ्ठ). बरं या कर्तृत्ववान, बुद्धीमान गटाचं कौशल्य सिध्द होईल असा एकही प्रसंग मालिकेत नसतो. म्हणजे खरं तर तो गटही 'ढ' च असतो. खलनायकी गट चिकाटीने पदार्थात मीठ ओतणं, दुधाच्या पेल्यात झोपेच्या गोळ्या टाकणं, महत्वाचं पत्र लपवणं, कपड्यांवर डाग पाडणं, रांगोळी विस्कटून टाकणं, डोक्यावर कुंडी पाडणं, फरशीवर साबणाचं पाणी पसरवणं, मेंदीत ॲसिड टाकणं,पाय धुवायला उकळतं पाणी........ अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कल्पक आणि अभिनव युक्त्या लढविण्यात  व्यस्त असतो आणि हे कुणाच्याही लक्षात येत नाही. मनमिळावू गटातली स्त्री सोशिकतेची, प्रेमळपणाची, परिसीमा गाठणारी असते. कोणत्याही वाहिनी वरील कोणतीही मालिका लावा. हेच चित्र असतं. कुणी लग्न मोडतंय, कुणी चक्क आयसीयू मध्ये जाऊन पेशंटला लावलेला ऑक्सीजन मास्क काढून फेकतंय, तर कुणी सलाईन मधे गुपचूप एखादं इंजेक्शन टाकतंय. काय हे? यामुळे वैद्यकीय क्षेत्राचं किती अवमूल्यन होतंय यांचंही भान नसावं? वैद्यकीयच नव्हे तर सगळ्याच महत्वाच्या व्यवसायांचा दर्जा इतका निकृष्ट आणि विकृत दाखवला जातो की मालिकांच्या लेखक, दिग्दर्शक, कलाकार,इ.इ. यांनी बुद्धीशी फारकत घेण्याची शपथ घेतलीय यांची खात्री होते.

            असं चित्र असतं का आपल्या कुटुंबात? आणि समाजात?इतक्या नकारात्मक व्यक्ति असतात आपल्या घरात? कसलीच नीतीमूल्यं नसणारी खलनायकी कुटुंबं दाखवून काय सिद्ध करायचंय? कधीतरी त्या कौटुंबिक अवास्तव आणि निरर्थक भांडणातून बाहेर पडणार की नाही? जगातले विषय संपले की काय? मालिकांचा आणि बुद्धीचा शून्य संबंध, कमालीचं कल्पनादारिद्र्य, दर्जाहीन लेखन, अर्थहीन संवाद, अवास्तव परिस्थिती म्हणजे मराठी वाहिन्या असं म्हटलं तरी काहीही अतिशयोक्ती होणार नाही. नामवंत म्हणवणारे कलाकारही निर्मितीमूल्यं नसणाऱ्या मालिकांमध्ये कसे काम करतात आणि सिध्दहस्त लेखकही इतकं सुमार लेखन कसं करतात हे एक कोडंच आहे. असो. जागतिक दूरचित्रवाणी दिनाच्या निमित्तानं यावर काही विचार होईल का? नाहीतर आहेच आपली 'वीण दोघातली ही तुटे ना' म्हणजे मराठी वाहिन्या आणि निर्बुद्धतेची हो.


#वीणदोघातलीहीतुटेना

#मराठीमालिका

Tuesday, November 4, 2025

शिक्षक दिनानिमित्त

 आज 'शिक्षक दिन'. या निमित्ताने पुलं आणि त्यांचे शिक्षक यांचे स्मरण करु या - -त्यांच्याच  शब्दात.

"माझ्या तथाकथित रम्य बालपणाला तडा पाडण्याच्या श्रेयाचे पहिले मानकरी 'दामले मास्तर' हे नाव धारण करणारे कर्दनकाळ होते. आपल्या ताब्यात चार घरची  पोरे ही केवळ चिंचेच्या फोकाने फोडून काढण्यासाठीच पाठविण्यात येतात, असे त्यांनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला त्याच दिवशी ठरविले असावे. दामले मास्तर चुकूनसुद्धा आजारी पडत नसत. कवितेला चाल लावणे त्यांना अजिबात मंजूर नव्हते. ते ज्या आवाजाने  "भाते पिकून पिवळी झाली" म्हणत , ते ऐकून हिरवी भाते पिवळी झाली असती. शाळेला काही लोक कोंडवाडा म्हणतात. आमचा कोंडवाडा नव्हता, कसाईखाना होता. अनेकांच्या सुऱ्या आमच्या कोवळ्या मानेवरून फिरत. त्या सामुदायिक कत्तलीत तत्कालीन आईबापे आणि पंक्तीचे पाहुणेही मोठ्या हौसेने भाग घेत. 

शहाजीचा मुलगा शिवाजी याने मावळे गोळा करून मुघलांचा काटा काढला आणि हिंदूंचे राज्य स्थापन केले एवढ्या एका वाक्यात दामले मास्तरांनी सारा इतिहास समर्पक रीतीने गुंडाळला होता. आमच्या काळात सगळ्या शाळांचे बोधचिन्ह "गप्प बसा" असे होते. माझे बालजीवन होरपळून टाकण्याची पहिली जबाबदारी दामले मास्तरांनी घेतली आणि नंतर अनेक मास्तरांनी तिला हातभार लावला. 

भाषा नामक विषयाचे 'गद्य' आणि 'पद्य' असे ठळक दोन हिस्से वाटले होते. गद्य नाही ते पद्य आणि जे पद्य नाही ते गद्य असे. आणि गद्यातले तलाठ्याने काढून दिल्यासारखे उतारे असत. इंग्रजी दुसरीत गोळे नावाचे एक मास्तर आम्हाला कविता शिकवीत. हे गोळे मास्तर सगळ्या कविता "कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की" या सुरावर वाचायचे. सगळे शिक्षक विद्यार्थ्याला विषयाची गोडी लागेल म्हणून भीत असत. आम्हाला इंग्रजी शिकविणारे मास्तर दशग्रंथी इंग्रजी शिकवत त्यामुळे 'यज्ञेन यज्ञ मय जन्त देवा:'  या चालीवर 'जॅक अँड जिल' चालत असे. खेळ हा बाल 

जीवनातला एक आसरा असतो असे म्हणतात. पण ड्रिल मास्तर नावाच्या शत्रुने तोही उध्वस्त केला. उजवीकडून काही पाहण्यासारखे जात असताना हे मास्तर नेमके 'बाये निघा' करायचे. हिंदी या भाषेशी पहिला संबंध 'दाहिने निघा', 'बाये निघा', 'कदम खोल 'असल्या क्रूर शब्दातून आल्यामुळे, त्या भाषेविषयी मी धास्तीच घेतली आहे.

सगळेच शिक्षक असे नव्हते. काही भले शिक्षकही असत. पण मंगळाच्या मुलीसारखे आम्हाला ते लाभत नसत. भूगोलाच्या मास्तरांनी 'मसाल्याची बेटे कुठली' हा प्रश्न सदैव सुषुम्नावस्थेत असणाऱ्या शामू तळेकरला विचारल्यावर, 'बेडेकर आणि कुबल' असे उत्तर देऊन त्याने मान टाकली होती. मास्तरांनी त्याला धरून कुबल कुबल कुबलला.

     अकरा वर्ष चाललेल्या या निरुपयोगी उद्योगात सारे बालपण पायाखालच्या चटके देणाऱ्या वाळू सारखे सरकले. शेवटी काय, आयत्या वेळी उपयोगी पडणारे हाती काहीच लागले नाही. हाती लागला फक्त मार आणि म्हणूनच त्या बालपणाला ज्या कोणी महाभागाने  'विद्यार्थी दशा' म्हटले त्याचे कौतुक करावे असे वाटते".

     'हसवणूक'-- यातील "बिगरी ते मॅट्रिक " या लेखातून.

#हसवणूक

#बिगरीतेमॅट्रिक

#शिक्षकदिन

अंदरकी बात

 अंदरकी बात 

रात्रीचे ११ वाजले. नेहमीप्रमाणे अंथरुणावर बसून मी हात जोडले आणि देवाला विनवणी केली की आजतरी सलग सात तास झोप मिळू दे.  डिलीव्हरी च्या कळा मध्यरात्रीच का सुरू होतात?  बरं. दिवसाढवळ्या  कळा सुरु झाल्या तरी जास्तीतजास्त डिलिव्हरी मध्यरात्रीच का होतात?- हा माझा यक्षप्रश्न.  आठवड्यातून चार वेळा हमखास झोपेचं खोबरं व्हायलाच हवं…. हा माझ्या पत्रिकेतच योग असावा. शिकत असताना गायनॅकॉलॉजिस्ट मॅडमचं येवढं आकर्षण वाटायचं. त्यांचा तो रुबाब, त्यांच्याभोवती असणारं वलय,काम करण्याची पद्धत, ऑपरेशन्स,यांचं मी बारकाईनं निरीक्षण करित असे. अर्थातच पुढे मी ' स्त्री रोग प्रसूती' हीच शाखा निवडली पण…. तो रुबाब, ते वलय आजपर्यंत तरी माझ्या आसपास फिरकलेलं नाहीय. किंवा, “बच्चा और मां इन दोनो मे एक ही बच सकता है” -  असं परंपरागत, ‘बाॅलीवुड विरचितम् ब्रम्हवाक्य’  फेकायची  तर कधीच वेळ आली नाही.

            एकतर, चोवीस तास हाँस्पिटलच्या क्वार्टर मधे रहात असल्याने  कोणतीही इमर्जन्सी आली की हातातील काम सोडून पळायचं हाच खाक्या.सण असो, ठरवलेला कार्यक्रम असो,नाटक सिनेमा असो की बीसी असो, आमच्या पेशंटला कोणती सिद्धी होती देवजाणे. माझ्या कार्यक्रमाच्या मुहूर्तावर ती कळा देत हजर होणार.म्हणजे ‘कळा’ तिच्या आणि माझ्या आनंदाची कायम ‘उतरती कळा’ ….’कळायोग’- हा सुद्धा पत्रिकेतलाच. कसला रुबाब आणि कुठली ऐट ? असो.  मी झोपले..... आणि मध्यरात्री काॅलबेल वाजलीच. दोन वाजले होते. 

' चला! आपला दिवस सुरू झाला' - असं म्हणत मी दार उघडलं.

 ‘मॅडम, पेशंट  फुल डायलेटेशनमधेच आली आहे. ज्युनियर मॅडम नी तुम्हाला बोलावलंय कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे’

' आलीया भोगासी असावे सादर' - असं म्हणून मी वॉर्डमध्ये शिरले. लेबर रुममध्ये पेशंट विव्हळत होती.

 ‘मॅम, सेकंडपॅरा आहे. पहिली डिलीव्हरी नॉर्मल आहे.  पेशंट फुल डायलेटेशन मधेच आली. घरीच मेम्ब्रेन गेलंय आणि ब्रीच प्रेझेंटेशन आहे.’

  ती सांगत असतानाच पेशंटला एक जोरात कळ आली आणि बाळाची पावलं दिसू लागली.

इतक्या वेळेवर येणाऱ्या पेशंटची ‘आधी सुटका' आणि नंतर विचारपूस’ असा उलटा प्रवास करावा लागतो. सोनोग्राफी, हिमोग्लोबीन, शुगर, ब्लडप्रेशर, अंगावरची सूज हे सगळं बाजूला सारून आधी पेशंटला मोकळं करायचं. आणि बाळाला व आईला काही काॅम्प्लिकेशन झाले तर त्याचं खापर डॉक्टरवरच फुटणार…हा सुद्धा माझ्या पत्रिकेतील योग बरं. असो. 

      ‘ब्रीच’ ऐकताक्षणी माझी छाती धडधडू लागली. आता' ब्रीच' म्हणजे पायाळू. अशी पेशंट जर नियमित तपासणीसाठी आली तर  तिला सिझेरियनची कल्पना दिली जाते. कारण पायाळू बाळाचं डोकं वर असल्यामुळे आईचं पेल्व्हिस व बाळाचं डोकं यांचे परस्पर आकारमान जुळतं की नाही हे ठरवणं कठीण असतं .अशा वेळेस डोकं अडकण्याची शक्यता असते.  डोकं अडकलं तर बाळ गुदमरतं.बाळाला ऑक्सीजन मिळाला नाही तर सेकंदागणिक धोका वाढू लागतो. एका क्षणात हे सगळे विचार मनात येऊन गेले.आता सध्या या केसमधे  सगळ्या शास्त्रीय बाबी गुंडाळून लवकरात लवकर डिलिव्हरी करणं हाच पर्याय होता. मी गाऊन आणि  ग्लोव्हज् चढवले.

          अशा तणावपूर्ण परिस्थितीत  नातेवाईकांना सगळी परिस्थिती समजावून त्यांची ‘हाय रिस्क कन्सेन्ट' घ्यायला  सिस्टरला पाठवले. ओटी   तयार  ठेवण्यास सांगितली. ॲनस्थेटिस्ट, पेडियाट्रिशियन, आणि सीनियर मॅडम ला  केसबद्दल कल्पना दिली आणि  रणभूमीवर सज्ज झाले.

       बाळाची पावलं हळूच दोन बोटांनी  धरली. . तितक्यात पेशंट ने कळ दिली आणि बाळ कमरेपर्यंत बाहेर आलं. आता त्याचं डोकं सुस्थितीत बाहेर येणं, ही फार मोठी परीक्षा. कमी वजनाचं बाळ सहज बाहेर येतं. पण गुबगुबीत बाळाची मात्र पंचाईत. आणि पर्यायाने  डॉक्टरांचीही पंचाईत.इकडे बाळाचं डोकं अडकलं तर डॉक्टरचाही श्वास अडकतो. मला ब्रीच डिलीव्हरीच्या तंत्राची पुस्तकातली आकृती डोळ्यासमोर आली.एक एक क्षण महत्वाचा होता. बाळाची कंबर धरुन हळूच पोटा पर्यंतचं शरीर बाहेर काढलं. दोन्ही हातांनी त्याला वरच्या दिशेने उभं धरलं आणि पेशंटच्या पोटाच्या दिशेने तिरपं केलं. याच पोझिशन मध्ये बाळाला धरून ठेवण्याची असिस्टंट ला सूचना दिली. माझे दोन्ही हात मोकळे झाले.  डावा हात बाळाच्या खांद्यापाशी नेऊन  हळूच त्याचा एक हात बाहेर काढला. दुसराही हात  बाहेर काढून बाळाचे हात मोकळे केले. आता बाळाचं तोंड हाताने चाचपलं. उजव्या हाताची दोन बोटं त्याच्या तोंडात घातली व डाव्या हाताने त्याच्या मानेला आधार दिला. तोंडात घातलेल्या दोन बोटांनी त्याचा जबडा आणि पर्यायाने हनुवटी हलकेच समोर ओढली. डाव्या बोटांनी मान आणि उजव्या बोटांनी हनुवटीला धरून त्याच्या डोक्याला हळूच हलवणं आणि समोर ओढणं- ही क्रिया सुरू ठेवली आणि अलगदपणे बाळाला बाहेर काढण्यात मी यशस्वी झाले. बाहेर येता क्षणी बाळाने ठणाणा केला . ज्यामुळे ते गुदमरलं नाही याची खात्री पटली.  बाळाला धरून सरळ बाहेर ओढलं तर कोणत्याही भागाचं फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळे तंत्रशुद्धता गरजेची असते. पण बरेचदा परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शास्त्र- तंत्र गुंडाळून ठेवावं लागतं. सुदैवाने हे बाळ ठणठणीत होतं. पुढचे सगळे सोपस्कार  आटोपले आणि मी निवांतपणे डिलीव्हरी च्या नोट्स लिहू लागले.

‘ मॅडम नमस्कार. ओळखलं नाही का?’ 

  असा आवाज येताक्षणी मी वर बघितलं. मला कसलाच संदर्भ लागत नव्हता. मी  प्रश्नार्थक चेहे-याने समोरच्या व्यक्तीकडे बघू लागले.

‘हे बघा मॅडम ‘- असं म्हणून त्या व्यक्तिने   मळकट पिशवीतून एक पिवळ्या रंगाचं जीर्ण  कार्ड काढलं..

‘अरे, हे तर आमच्या हॉस्पिटलचं डिसचार्ज कार्ड दिसतंय.’

‘हो मॅडम. याच दवाखान्यात माझी पत्नी   2 वर्षापूर्वी डिलीव्हरीसाठी भरती झाली होती. त्यावेळी ती सीरियस झाली आणि दोन बाटल्या रक्त  द्यावं लागलं होतं’.

डिसचार्ज कार्डवर माझंच अक्षर होतं. जसे माझे डोळे त्या अक्षरांवरून फिरत होते, माझ्या समोर सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलं.

वर्षानुवर्ष वैद्यकीय व्यवसाय करित असल्यानं प्रत्येक पेशंट ओळखणं शक्यच नसतं. नाव, चेहेरा लक्षात राहणं ही अशक्य कोटीतली बाब असते. मात्र  ‘विशिष्ट केसेस’ या मेंदूतून कधीच डीलीट होत नाहीत. कारण त्यांना  स्वतः हाताळून कधी यश, अपयश,चुका…. अनुभवल्या असतात. त्यामुळे अशा केसेस कायम मेमरी त असतात.

      मी चटकन उठून पेशंट जवळ गेले. रुक्मिणीबाई श्रांत क्लांत अवस्थेत निपचित पडून होती. माझी चाहूल लागताच तिने डोळे उघडले आणि हात जोडून नमस्कार केला. '

‘ अगं, तू आहेस हे मला कळलंच नाही. तू सुद्धा ओळख दिली नाहीस’.

‘येळच कुठे भेटला मॅडम? माझ्याकडे बघाले तुमाले कोठे फुरसत होती? तुमी तुमच्या घोरात. आन मले तं काईच सुदरत नवतं’.

‘धन्य आहे तुझी रुक्मिणी बाई . तूच संकटात टाकतेस आणि त्यातून बाहेरही काढतेस.’

मी कोपरापासून हात जोडत म्हणाले.

ही रुक्मिणी बाई दोन वर्षापूर्वी आमच्या दवाखान्यात भरती झाली. पहिलटकरीण होती. बारिक कळा सुरु झाल्या होत्या. नऊ महिन्यात नियमित तपासणी, ब्लडप्रेशर, हिमोग्लोबीन, शुगर, सोनोग्राफी या  भानगडीत न  पडणारी ,  कळा सुरू झाल्यावरच डायरेक्ट दवाखान्यात येणारी एक अघोषित संघटना असते. रुक्मिणी त्यांचीच सदस्य. 

तपासणी केल्यावर सगळं काही नॉर्मल असल्याने काळजीचं  काहीही कारण नव्हतं. साधारणतः दहा बारा तासात तिची नॉर्मल डिलीव्हरी होणं अपेक्षित होतं . अर्थात, ‘होप फॉर द बेस्ट अँन्ड प्रिपेअर फॉर द वर्स्ट .’.... हा मंत्र नेहमी लक्षात  ठेवायचा हे माझं तंत्र. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गोंधळ होत नाही. नॉर्मल पेशंटला ज्युनियर डॉक्टर्स  व्यवस्थित सांभाळत असल्याने मला प्रत्येक पेशंटला अटेंड करण्याची गरज नसायची. रुक्मिणी बाईचीची रात्री एक वाजता नॉर्मल डिलिव्हरी  होऊन मुलगी झाली. आता प्लॅसेंटा पडण्याची वाट होती. प्लॅॅसेंटा हा ठराविक वेळेत पडणं आवश्यक असतं. कधी कधी पोटावर हलकासा दाब देऊन त्याला बाहेर पडण्यास मदत करावी लागते. रुक्मिणी बाईच्या बाबतीतही असंच झालं.थोडा उशीर झाल्यामुळे पोटावर दाब देण्यात आला आणि भलतंच घडलं. प्लॅसेंटा बरोबर गर्भाशय ही बाहेर आलं. याला ‘इनव्हर्शन ऑफ युटेरस’ असं म्हणतात.  यात गर्भाशयाची आतली बाजू बाहेर येते.एखादी पिशवी उलटी केल्याप्रमाणे. ही अत्यंत दुर्मिळ अशी अवस्था आहे. अनेक बाळंतपणं, अनेकदा गर्भपात, काही गंभीर आजार..... ज्यामुळे गर्भाशयाचे स्नायू कमकुवत होतात - अशा स्त्रियांमध्ये बाळंतपणाच्या वेळी गर्भाशया वर अतिरिक्त दाब दिला, तर असं चित्र दिसू शकतं. रुक्मिणी तर वयाने २४ वर्षाची व पहिलटकरीण होती. तिला  कोणत्याही आजाराचा इतिहास नव्हता. पोटावर दिलेल्या दाबाबद्दल  सिस्टर आणि ज्युनियरला खोदून खोदून विचारलं . पण  ज्युनिअर अनुभवी असल्याने ती अशी चूक करणं शक्यच नव्हतं.

          अशी केस कधीच बघितली नसल्याने ज्युनियर डॉक्टर आणि सिस्टर ला काहीच समजलं नाही. हे नक्की काय आहे, यावर त्यांचे आडाखे बांधणं सुरु होतं.. फायब्राॅइड ? ट्युमर?...वेगवेगळे तर्क करत त्यांनी मला कॉल पाठवला. मी सुद्धा अशी केस पहिल्यांदाच बघत होते. ‘इन्व्हर्शन ऑफ युटेरस’ असावं का, ही शंका माझ्या मनात  डोकावताक्षणी हृदयाचा ठोका चुकला. कारण बाळंतपणानंतर गर्भाशय हे क्षतिग्रस्त असतं. प्लॅसेंटा गर्भाशयाला चिकटला असतो.  हा चिकटून बसलेला प्लॅसेंटा सुटल्यावर त्या ठिकाणी आतून जखम झाली असते, जी भरून येण्यास सव्वा महिना लागतो. असं हे गर्भाशय शरीराबाहेर आलं आहे, त्यातून रक्तस्त्राव होतो आहे. म्हणजे पेशंट शॉक मध्ये जाऊ शकते. या विचारांनी मला धडकी भरली. मी ताबडतोब बीपी -पल्स चा रेकॉर्ड बघितला. बीपी कमी झालं होतं.पेशंट अर्धवट शुद्धीत होती. .ताबडतोब सलाईन, ऑक्सीजन लावलं.  सीनियर मॅडम, ॲनस्थेटिस्ट 

 यांना अर्जंट कॉल केला.  बाहेर आलेल्या गर्भाशयाचा रक्तस्त्राव व इन्फेक्शन नियंत्रणात राहण्यासाठी गर्भाशयाला तात्पुरतं पॅकिंग केलं.पेशंटला ओटीत हलवलं. हिमोग्लोबिन तपासल्यावर ते पाच ग्रॅम  निघालं. नातेवाईकांना रक्ताची सोय करायला सांगितली. ' हाय रिस्क कन्सेन्ट ' घेतली. अशा या केसमध्ये लवकरात लवकर गर्भाशयाला जागच्या जागी बसवणं हे महत्त्वाचं.  हाच एकमेव उपाय आहे . त्याचंही एक तंत्र आहे, ज्यासाठी पेशंटला भूल द्यावी लागते . नंतर ओटी मध्ये पद्धतशीर सगळ्या प्रक्रिया पार पडल्या.   रक्ताच्या तीन बाटल्या लागल्या.४८ तास डोळ्यात तेल घालून पेशंटवर लक्ष ठेवलं. तिसऱ्या दिवशी सकाळी पेशंट धोक्याबाहेर आली. आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.

          पेशंट आमच्या दवाखान्यात ३ आठवडे राहिली. कारण  संपूर्ण विश्रांती ही , तिचं गर्भाशय पूर्ववत होण्यासाठी आवश्यक होती. तिला, तिच्या आईला, सासूला, नवऱ्याला रोज आम्ही पुढची काळजी कशी घ्यायची हे समजावून सांगत होतो. तिच्या डिसचार्ज  कार्ड वर मोठ्या अक्षरात सूचना पण लिहिल्या होत्या. ‘दुसऱ्या मुलाची घाई करू नये. चार ते पाच वर्षांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भधारणेचा विचार करावा. समजा गर्भधारणा झालीच तर प्रत्येक महिन्यात वैद्यकीय तपासणी करावी. दुसरे बाळंतपण हे सिझेरियनच होईल याची कल्पना आताच देण्यात येत आहेे.’

इतकं ठासून सांगण्याचा उद्देश हाच, की पेशंट ला त्याचं गांभिर्य उमजावं. 

      पण इतकं ‘ प्रबोधन ‘करुनही ही ‘महान माऊली’ जेमतेम दोन वर्षांनी आमच्याकडे दाखल झाली - ती सुद्धा अगदी वेळेवर. त्यातही आधीची हिस्ट्री सांगण्याच्या परिस्थितीत ' माता' नव्हती तर पिताश्रींना त्याची गरजच वाटली नाही. नशीब हे की आधीचं डिस्चार्ज कार्ड फाटकं का असेना पण शाबूत होतं ज्यामुळे तिची हिस्ट्री तरी कळली -  अर्थात ती ही उशीराच .आणि माझ्या ‘प्रबोधनपर लिखाणाचा’ शून्य उपयोग होतो’- हा मला साक्षात्कारही झाला.

      आता मात्र मी चिंतन (विचारांच्या वरची पातळी हो.) करु लागले. रुक्मिणीबाई आमच्या सल्ल्यानुसार वागली असती तर???  लगेच होणाऱ्या गर्भधारणेपासून आम्ही तिला परावृत्त केलं असतं. चार वर्षानंतर गरोदरावस्थेचे शेवटचे तीन महिने तिला  भरती करून सक्तीची विश्रांती दिली असती. आणि एखादा योग्य दिवस ठरवून तिचं सिझेरियन केलं असतं.

         पण  वैद्यकीय सल्ला धुडकावूनही, तिचं सिझेरियन टळून नैसर्गिक प्रसूती झाली. बाळ गुटगुटीत निरोगी. बाळंतीण टुणटुणीत. याला काय म्हणायचं? म्हणजे आमच्या सल्ल्याला काही अर्थच नाही का? थोडक्यात काय,आमचं न ऐकल्यानं तिचा फायदाच झाला. पण मग आमचा सल्ला चुकीचा होता ???

 रुक्मिणीचा राऊंड घेताना मी चिडून जाब विचारलाच.

  ‘ मॅडम, आमाले बाबूच पायजे होता तं पयली पोट्टीच झाली.पन घरचा बुढा, बाबू साठी आस लावून बशेल होता. तुम्ही म्हनत का चार वरीस गॅप ठेवतो. पन मले तं काईच तरास नवता.रोज वावरात दन काम करत जावो मी. बाकी बाया बी इमारत, का येका पोरीत डंगरी होत अस्ते का माय? आमाला तं चार पाच पोरं होऊनबी आमी टनटन हावो. आता  घरचा बुढा ‘बाबू बाबू’ म्हनता मधीच गचकला तर मलेच बोल लागला अस्ता की नाय?’ 

   आणि मग मला उत्तर मिळालं .मी रुक्मिणीबाईची दुसरी डिलिव्हरी करत असताना

 मी तिला ओळखलंच नव्हतं .त्यामुळे तिची तिच्या हिस्ट्रीचंही विस्मरण झालं. फक्त हिस्ट्री अर्थातच विस्मरणात. मी‘ब्रीच’ वर लक्ष केंद्रित करूनतिची सुटका. केली. तिचं व्यवस्थित बाळंतपण केलं.   तात्पर्य हे, की ‘विस्मरण’ अनेकदा फायदेशीर असतं ते असं.

          “यद् पिंडी तद् ब्रम्हांडी” …. या न्यायाने प्रत्येक शरीरातही एक निसर्ग असतो - जो कधीही चुका करित नाही . उलट आपल्या चुकांवर पांघरूण घालून शरीराला सांभाळत असतो. प्रत्येकाची शरीररचना आणि शरीरक्रिया ही समान असली तरी स्वभाव आणि आतला निसर्ग वेगवेगळा असतो .  

     रुक्मिणीबाईचा जीवनस्तर बघता आरोग्य ही तिची प्राथमिकता कधीच नव्हती. म्हणून आमच्या सूचनांचं तिला आणि तिच्या कुटुंबियांना शून्य महत्व होतं. ती मोकळ्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून शारीरिक कष्ट करणारी.अशा लोकांची तब्येत नैसर्गिक वातावरणातच सुधारते. माझ्या पुस्तकी सल्ल्यापेक्षा ‘बुढ्याले नातू दाखवणं’, ‘इतर आयाबायांचे उपदेश’ …  हे तिच्या साठी जास्त महत्वाचं होतं.नैसर्गिक, अभावग्रस्त परिस्थितीत जगणारे हे जास्त निरोगी असतात कारण बाह्य निसर्ग त्यांच्या शरीरातील निसर्गावर परिणाम करित असतो.

       इथे रुक्मिणीबाई ऐवजी एखादी सुशिक्षित, संपन्न  आर्थिक स्थितीतली स्त्री असती तर तिने अजून चार डॉक्टरांचे सल्ले घेतले असते. मग शरीरमनाला फुलासारखं जपत ती ‘ व्हीआयपी’ पेशंट झाली असती आणि स्वतः बरोबर आम्हालाही तिनं वाचवलं असतं.

             शरीरावर उपचार आणि शरीरानुसारच सल्ले हे डॉक्टरचं काम. पण त्याहीपेक्षा प्रभावी शरीरातला ‘निसर्ग’ असतो जो  शरीराच्या संरक्षक आणि उपचारात्मक प्रणालीचं काम करतो..पेशंटमधल्या या प्रणालीचा अंदाज नसल्याने  शास्त्रीय वैद्यकीय आडाखे बरेचदा चुकतात. म्हणूनच ९९% ब्लॉक असणाऱे एखादे आजोबा बायपास सर्जरी नाकारतात आणि पुढची दहा वर्षे मजेत जगतात. त्याचवेळी चाळीशीचा तरुण छाती दुखते म्हणून ॲंजिओप्लास्टी करतो आणि तणावात राहून दोन वर्षांतच बायपासला सामोरा जातो.

     आज वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही अद्ययावत झालं, कृत्रिम गर्भधारणेचं तंत्र कितीही विकसित झालं तरी गर्भधारणा,   गर्भपात आणि प्रसूती  हे  हुकुमी एक्के शरीरातील निसर्गाने स्वतःच्या हातात ठेवले आहेत. विज्ञानाला शरीरातील  हा निसर्ग आजही अगम्य आहे.कारण तो  कोणत्याही प्रयोगशाळेत तपासता येत नाही. म्हणूनच पेशंटला (आणीबाणीची परिस्थिती नसेल तर) कधी कधी  त्याच्या आतल्या निसर्गाच्या हवाली करावं……    हा निसर्ग डॉक्टरांपेक्षा तल्लख असतो.  तो त्याचं काम चोख करतो.पण ही ‘अंदरकी बात’ आहे बरं का.पेशंटला याची अजिबात कल्पना नसावी.हे ही एक तंत्र आहे जे पेशंटला कळू न देता केव्हा आणि कसं वापरायचं ….हे  मात्र मी का सांगू? “डॉक्टरांच्या हाताला गुण आहे हो”.... हे वाक्य ऐकून माझा आतला निसर्ग सुदृढ होतो की.मग? ये अंदरकी बात है!!!









Thursday, September 11, 2025

 एक अनुभव


दिलीप, यावेळी तू टूरवर नाही गेलास तर चालणार नाही का? मला खरंच खूप अस्वस्थ वाटतंय.

हे बघ मिता. माझ्या प्रत्येक टूरच्या वेळी तुझी हीच वाक्यं असतात. आणि इतक्या वर्षांचा अनुभव आहे की मी गावाला गेल्यावर तुला काहीही होत नाही. अगं. काढून टाक ना ही मनातली भिती आणि तू काही जंगलात नाहीस. तू स्वतः डॉक्टर आहेस. तुझी तब्येत ठणठणीत आहे जे तुलाही माहित आहे. मिता - या भिती तून बाहेर येणं तुझ्याच हातात आहे. असं म्हणून दिलीप आपली बॅग घेऊन निघून गेला.

मीताच्या घशाला कोरड पडली. श्वासाचा वेग वाढला. छाती धडधडू लागली. हाता पायाला सूक्ष्म कंप येऊ लागला. उलटी होईल की काय असं वाटू लागलं. त्यातच शौचाची भावना झाली. ती धावतच वॉशरूम मध्ये गेली. एक लूज मोशन झाली आणि ती थकून बाहेर आली.

किती दिवस चालणार हे? दिलीप बाहेरगावी गेला की हीच लक्षणं का दिसतात मला? मनातली खोलवर असलेली भिती का उसळून येते वर? आणि ही भिती तरी नेमकी कशाची आहे? अशावेळी मिताला स्वतःचाच राग यायचा. इतका दुबळेपणा येतो कुठून ? या विचाराने चीड यायची आणि बरेचदा तर स्वतःची कीव ही यायची. स्वतःला कसंबसं सावरून मिता दैनंदिन कामं यंत्रवत उरकू लागली. कशातही मन लागत नव्हतं. एक अदृश्य दडपण सतत डोक्यावर आहे - असं जाणवत होतं. दिवस कसाबसा रेटला आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावून, स्तोत्रं, रोजची साधना, ध्यान करतांना मीतानं मनातली अस्वस्थता घालवण्याचा एक विफल प्रयत्न केला. पुस्तक डोळ्यासमोर धरलं, टीव्ही लावला, आवडती डिश बनवून खाण्याचा प्रयत्न केला. रात्र होऊ लागली तसं भीतीचं प्रमाण वाढू लागलं. आज अजिबात घाबरायचं नाही. जे व्हायचं ते होईल. नेहमी सारखं हे ठरवून मिता अंथरुणावर पडली. थोडं शांत वाटू लागलं. चला! आता झोपू या. असं म्हणत मितानं मनात मारुती स्तोत्र सुरू केलं. चार ओळी झाल्या आणि पुन्हा तेच. प्रचंड अस्वस्थता. उलटीची भावना. मिता ताडकन उठून बसली. छाती धडधडत होती. धावत वॉशरूमला गेली. पुन्हा लूज मोशन. गलितगात्र मिता लांब लांब श्वास घेत किती वेळ बसली कुणास ठाऊक. केव्हातरी डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा बरंच उजाडलं होतं. बरी झोप लागल्याचं समाधान वाटतंय न वाटतंय तेवढ्यात एक भितीची लहर आणि पोटात गोळा उठला. मितानं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. भावना आणि विचारांचा ओघ थोपवण्यासाठी तिने मोठ्या आवाजात रेडिओ सुरू केला आणि ओढून ताणून दिनक्रम सुरू झाला.

गेल्या सहा वर्षापासून तिला हा त्रास सुरू होता. ती वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर होती. दोन्ही मुलं व्यवस्थित शिकून आपापल्या विश्वात दंग होती. बाहेरगावी होती. दिलीप आपल्या व्यवसायात, टूर मध्ये स्थिरावला होता. कसलेच दडपण वा ताण येण्यालायक परिस्थिती नव्हती. सुरुवातीला तर काही शारीरिक आजार असेल म्हणून कितीतरी वेळा तपासण्या झाल्या. काहीही निष्पन्न झालं नाही. मुळात दिलीप बरोबर असतांना तिला काहीच त्रास होत नसे. त्यामुळे हा प्रकार शारीरिक नसून मानसिक आहे हे तिच्या कधीच लक्षात आलं होतं. कितीतरी मानसिक व्याधीग्रस्तांना तिने समजावून, सल्ला देऊन बरं केलं होतं. पॅनिक अटॅक्स मध्ये कोणती औषधं घ्यावी हे ही तिला माहित होती. कधी कधी ती त्या गोळ्या घेतही असे. तात्पुरतं बरं वाटायचं पण कायमचं नाही. खरं तर मिता डॉक्टर जरी असली तरी मनोविकार तज्ञ नव्हती. पण तिने स्वतःची लक्षणं बघून त्यावरचं सगळं मानस वैद्यकीय शास्त्र वाचून काढलं होतं. सगळी इत्थंभूत शास्त्रीय माहिती असूनही मला असं का व्हावं? हा मीताचा पहिला प्रश्न. एकटेपणाची भीती व असुरक्षितता - तेही दिलीप नसतांना - इतका दुबळेपणा माझ्यात कसा काय? हा तिचा दुसरा प्रश्न. या दुबळेपणा वर निश्चय करून, प्रयत्न करूनही  मला मात का करता येत नाही? त्यामुळे निर्माण होणारा अपराधीभाव- हा तिसरा प्रश्न. तात्पुरत्या औषधांनी लगेच बरं वाटतं पण हा काही कायमचा उपाय नाही हे तिला ठाऊक होतं . औषधांशिवायचे उपाय म्हणजे प्राणायाम, ध्यान, ओंकार साधना माईंडफुलनेस, स्वसंवाद, लिखाणा द्वारे भितीचा निचरा, दीर्घश्वसन, मानसिक आरोग्याचे वर्कशॉप्स .... वगैरे सगळं करून झालं. बरं. या लक्षणांची वाच्यता कुणाबरोबर ही करता येत नव्हती कारण ऐकणारा काय म्हणेल? स्वतः तला मानसिक दुबळेपणा इतरांना सांगण्याची तिला लाज वाटत होती. एका डॉक्टर मैत्रिणीशी याबाबतीत वरवर चर्चा केली तर म्हणाली, 'सुख खुपतंय तुला'.

पण या संपूर्ण मानसिक आंदोलनात दिलीप ने तिला पूर्ण समजून घेतलं. तो कधीही तिच्यावर चिडला नाही. तो तिला नेहमीच धीर देत असे. फक्त त्याचं म्हणणं एकच होतं - या भितीला धडक दे. बघ काय होतंय ते. भितीला सांभाळून ठेवणं, तिला महत्व देणं म्हणजे मूर्खपणा आहे. तुझं धाडस, तुझा निश्चय - हेच त्यावर उत्तर आहे. त्याचं तिला पटायचं पण जमायचं नाही. औषधं घेणं त्याला फारसं रुचत नव्हतं. आत्मबळ, इच्छाशक्ती, हिम्मत ही आपली अस्त्रं वापरून यश मिळवायचं हा त्याचा दृष्टिकोन होता कारण तो वैद्यकीय शास्त्र  शिकलेला नव्हता. औषधं घेण्यास त्याचा विरोधच होता. 

मानसिक आजारांवरची औषधं तर मितालाही माहित होती पण  ती मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कधीच घेणार नव्हती. त्यासाठी त्यांच्या दवाखान्यात जाणे गरजेचे होते. स्वतःच्या भित्रे पणाचा, दुबळेपणाचा पाढा त्यांच्यासमोर वाचावा लागणार होता. स्वतः डॉक्टर असल्याने सगळ्याच डॉक्टरांशी ओळख. शारीरिक दुखण्यासाठी त्यांचा सल्ला घेणं ठीक होतं पण मानसिक दुखण्यासाठी? त्यासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि संकोच आड येत होता. पण एकदा धैर्य एकवटून गावातल्या एका प्रसिध्द मानसोपचारतज्ञाच्या दवाखान्याची ती पायरी चढलीच. 

तिची लक्षणं ऐकतांना डॉक्टरांच्या चेहे-यावरचे हावभाव हे तुच्छतादर्शक आणि चिडके होते.

'अहो, तुमचा नवरा गावाला गेला की तुम्ही घाबरता आणि तुम्हाला लूज मोशन्स होतात. मग काय झालं? होऊ द्यायचं. त्यामुळे तुम्ही काही मरणार नाही. ही १५ दिवसांची औषधं घ्या. या औषधाने फायदा झाला नाही तर तुम्हाला शॉक द्यावे लागतील आणि माझा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चा १० दिवसांचा कोर्स आहे तो करा.' हे सगळं ते जोरात रागावून बोलले.

यापलिकडे एक शब्दही न बोलता त्यांनी तिला जायला सांगितले.

या अनुभवाचा तिने धसकाच घेतला. आणि मागिल पानावरून पुढे असं आयुष्य चालतच राह्यलं.

एकदा मुंबईला एका कॉन्फरन्सला ती गेली असताना डॉ. रॉय यांचं मानसिक विकारांवरचं व्याख्यान ऐकलं. अत्यंत शांतपणे आणि ठामपणे त्यांनी हा विषय समजावून सांगितला आणि ते ऐकता ऐकताच तिने त्याच क्षणी ठरवलं की डॉ. रॉय सरांकडे मला नक्कीच उत्तर मिळणार.

आणि एके दिवशी मिता त्यांच्यासमोर गेली आणि अथपासून इति पर्यंत आपलं रडगाणं तिने गाऊन दाखवलं. ते शांतपणे  ऐकत होते. त्यांनी तिला कुठेच अडवलं नाही किंवा काही प्रश्नही विचारले नाहीत. फक्त तिला जास्तीत जास्त बोलण्याची संधी दिली.

खूप प्रयत्न करूनही माझी लक्षणं कमी का होत नाहीत? या तिच्या प्रश्नाला ते म्हणाले,

' ही लक्षणं निर्माण होणार ही धारणा किंवा ही समजूत तुमच्या मेंदूत अनेक वर्षांपासून घट्ट रुजली आहे. या लक्षणांची सुरुवात का? कशी? किंवा त्याची कारणं  शोधणं हा एक उपचारांचा भाग आहे  पण ते नंतर. सध्या या धारणांना आणि  समजुतीला तुमच्या मेंदूतील रसायनांनी अजूनच दृढ केलं आहे. किंवा साध्या शब्दात सांगायचं झाल्यास या  धारणांचं मेंदूतील वायरिंग हे अगदी पक्कं आहे. महत्वाचं म्हणजे ते जितकं जुनं तितकं ते जास्त घट्ट होत जातं. त्यामुळे ठराविक परिस्थिती आली की मेंदूच्या सर्किट मधून भीतीचे, धडधडण्याचे,उलटीच्या भावनांचे संदेश शरीराला जातात. आता हे वायरिंग इतकं पक्कं असतं की त्यावर व्यक्तिचा ताबा नसतो. अशा वेळी हे सर्किट मोडण्यासाठी औषधेच परिणामकारक ठरतात. थोडक्यात हा मेंदूतील केमिकल लोचा नष्ट करण्यासाठी केमिकलच अर्थात औषधं वापरावी लागतात. औषधं सुरू केल्यावर ती शरीराने नीट स्वीकारली की नाही हे आधी बघावं लागतं. नाहीतर वेगळी औषधं वापरावी लागतात. एकदा योग्य औषधं सुरु  झाली की हळूहळू त्रास कमी होतो. जरा बरं वाटलं की पेशंटला औषधं बंद करण्याची घाई असते आणि ५०% पेशंट डॉक्टरला न विचारता तसं करतातही.  अशा वेळी लक्षणं कमी झाली तरी मेंदूतील वायरिंग चे कनेक्शन पूर्णतः विलग  होत नाही. आणि काही दिवसांनी पेशंटला परत डॉक्टरकडे जावे लागते.  जुन्या गैरसमजुतीची कनेक्शन्स नष्ट होऊन त्याठिकाणी योग्य त्या धारणांची वायरिंग निर्माण झाली की मगच पेशंट पूर्णतः बरा होत असतो. आणि कुणाला किती दिवस औषधं घ्यावी लागतील हे आजच सांगता येत नाही. नियमित फॉलोअप दिला तरच औषधोपचाराला यश मिळतं.'

डॉक्टरांचं हे शास्त्रीय विवेचन मिता आणि दिलीप ला समजलं आणि पटलं ही. आणि मिता मध्ये असणारा अपराधी भाव त्याक्षणी मावळला. फक्त दिलीप नॉन मेडिको असल्याने त्याच्या काही प्राथमिक शंकांना डॉ. रॉय यांनी व्यवस्थित उत्तरे दिली.

'या औषधांमध्ये केवळ झोपेची औषधं नसतात. औषधोपचाराने पेशंट निष्क्रीय होत नाही तर सक्रिय होतो. या औषधांची सवय लागत नाही किंवा काही घातक दुष्परिणामही होत नाही. मानसिक व्याधीसाठी उपचार घेणं हे समाजापासून लपवण्याची गरज नाही. आज समाजात ४०% मानसिक रुग्ण आहेत पण औषधोपचार घेणारे मात्र १० % आहेत. स्वतःचा मानसिक विकार ओळखून, त्याचा स्वीकार करून लवकरात लवकर उपचार सुरू करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.'

डॉक्टरांच्या पहिल्या भेटीतच मिता चं दडपण एकदम कमी झालं. औषधोपचाराने व नियमित फॉलोअप ने मिता आज पूर्णतः लक्षणातून बाहेर पडली आहे. पण अजूनही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती औषधे घेते आहे. ती आणि दिलीप दोघंही  आजकाल गरज असलेल्या पेशंटला मानसोपचारतज्ञा कडे आवर्जून पाठवतात.

मिता ला उशीरा का होईना पण डॉ. रॉय भेटले. तसेच सगळ्या रुग्णांना वेळेवारी योग्य डॉक्टर मिळून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होवो ही प्रार्थना.


डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

#मनोविकार 




Tuesday, September 2, 2025

डाकिया डाक लाया

 डाकिया डाक लाया 

 


“पत्र लिही पण नको पाठवू शाई मधून काजळ गहिरे, 

लिपी रेषांच्या जाळीमधूनि, नको पाठवू हसू लाजरे. 

चढण लाडकी भुवई मधली, नको पाठवू वेलांटीतून, 

नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या  बिंदूतून.” 

इंदिरा संत यांची ही कविता वाचताना, आपण (अर्थातच मध्यमवयीन पिढी) भूतकाळात केव्हा प्रवेश करतो हे समजतही नाही. आणि पत्रांच्या त्या अनोख्या, जादुई  विश्वात हरवून जातो.पत्रव्यवहार…हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजुक आणि भावनाप्रधान असा जतन केलेला एक कोपरा असतो.आजही कित्येकांच्या कपाटात, जपून ठेवलेल्या जुन्या पत्रांची चळत सापडेल यांची मला खात्री आहे.

         एक सप्टेंबर हा विश्व पत्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पत्रव्यवहार या लोप पावत चाललेल्या एका जिव्हाळ्याच्या संदेश वहनाला उजाळा   देण्याचा एक प्रयत्न. 

       मानवी जीव हा संवादाशिवाय राहू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे संवाद ही त्याची प्राथमिक गरज आहे. आदिमानवाच्या हाळी देणाऱ्या संवादापासून तर आजच्या इन्स्टाग्राम पर्यंतचा संदेशवहनाचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. पण यात सगळ्यात सहज सोपे, लोकप्रिय, प्रभावी व अनेक शतकांपासून अविरत सुरू असलेले माध्यम म्हणजे पत्रलेखन.. अर्थातच टपाल सेवा. टपाल सेवेच्याही आधी पत्र लेखन होतेच. पण पोस्टखाते नसल्याने निरोप्यांच्या हाती पत्र पोचविले जात असे. पौराणिक काळात रुक्मिणीने कृष्णाला आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी पत्र लिहिले अशी नोंद आहे. चांगदेवाने तर ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठविले. ज्याचा अर्थ मुक्ताबाईला समजला आणि चांगदेवांना मुक्ताबाई सारखा गुरु लाभला. व चांगदेव पासष्टीची निर्मिती झाली.  पत्रातील ‘ध’ चा ‘मा’ केल्यामुळेच पेशवाईत अनर्थ घडला. थोडक्यात काय, मानवी जीवनात पत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे .

            ईस्ट इंडिया कंपनीने १६८८साली मुंबई व चेन्नई येथे टपालसेवा सुरू केली व १७७४ मध्ये संपूर्ण देशात ती सुरू झाली. १८७८ मध्ये जागतिक पातळीवर युनिव्हर्सल पोस्टल युनियन ची स्थापना झाली व जास्तीत जास्त देश या युनियनचे सभासद असणारी ही एकमेव संघटना आहे.भारतात २५० वर्षांपासून तर पाश्चात्त्य देशात त्याही आधीपासून पत्र लेखनाची परंपरा आहे. अनेक थोर विचारवंत, तत्त्वज्ञ, साहित्यिक, लोकनेते, शासनकर्ते यांनी पत्रलेखनाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, मार्टिन ल्युथर किंग, अब्राहम लिंकन, थोरो, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर..अशा अनेक महानुभावांनी पत्र लेखनातून अमूल्य अशा साहित्यिक, वैचारिक , मार्गदर्शक  समाजप्रबोधनाची निर्मिती केली. त्यामुळेच  या पत्रसंपदेच्या

संग्रहाची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणि अशा असामान्य पत्रांना साहित्याचा दर्जा देऊन त्याला पत्रवांग्ङमय म्हटले आहे. हा एक ऐतिहासिक दस्तऐवज असून त्या काळच्या संस्कृतीचा, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा, लेखकाच्या मनोवृत्तीचा, व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा त्यातून घेता येतो .अनेक विद्यापीठांमध्ये या पत्रवाङमयाला संदर्भ ग्रंथ म्हणून जतन केले आहे. इतिहास संशोधकांना तर पत्र वाङ्मयातून अनेक महत्त्वाचे दुवे हाती लागतात. अलीकडच्या साहित्यात ‘लोकहितवादींची शतपत्री’ ‘विश्रब्ध शारदा’ नरहर कुरुंदकरांची समीक्षात्मक पत्रे, जीए कुलकर्णी व ग्रेस, सुनीताबाई देशपांडे व जी ए कुलकर्णी… यांच्या पत्रांनी  साहित्यात मोलाची भर टाकली आहे. 

         वैयक्तिक पत्र व्यवहाराची तर गोष्टच वेगळी. हा एक हळवा, आनंददायी व स्नेह वृद्धिंगत करणारा अनुभव असतो. ही पत्रे  औपचारिक व अनौपचारिक असतात. औपचारिक पत्रे, नोकरी- व्यवसाय , शासकीय, कार्यालयीन संबंधित असतात  आणि  त्यात स्वहस्ताक्षर नसते. मात्र अनौपचारिक पत्र लिहिणे व घरी आलेले पत्र वाचणे…. ही प्रक्रिया मनाला आनंद देणारी असते. आपल्या संबंधित व्यक्तिला पत्र लिहिण्यासाठी कागद पेन घेऊन विचार करणे, भावनांना शब्दांची जोड देऊन प्रत्यक्ष कागदावर  लिहिणे…. ही रचनात्मक प्रक्रिया आहे. पत्र म्हणजे साचेबंद उत्तर किंवा निबंध नसतो. तो दोन व्यक्तिंमधला संवाद असतो. त्यामुळे मनातले विचार मेंदूतून हृदयाद्वारे ,बोटामध्ये येतात व शाईच्या साह्याने शब्दांमध्ये प्राण फुंकले जातात. कागदाला, पेनला जिवंत माणसाचा स्पर्श होणे, जे बोलणे शक्य नाही ते पत्रात लिहिणे, त्यातून डोकावणारी मनस्थिती, संस्कार ,व्यक्तिमत्व, स्वभाव… हे सगळे विलक्षण जिवंत व चैतन्यपूर्ण असते.  पत्राची वाट पाहण्यात  हुरहुर, उत्कंठा, अधीरता याबरोबरच संयम सुद्धा असतो. प्रत्येक टप्प्यावर जिवंतपणाच्या स्पर्शाची खूण  बाळगत.. अखेर पोस्टमनच्या हातून पत्र आपल्याला मिळते. त्यामुळे या जिवंत संदेशवहनाची तुलना कोणत्याही माध्यमाशी होऊ शकत नाही. 

    पत्रामधील हस्ताक्षर हे आठवण, 

प्रेम ,मनाची घालमेल, मनातील आंदोलने अशा अनेक बाजू स्पष्ट करीत असते. हस्ताक्षर ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असल्याने पत्र वाचताना लिहिणारी व्यक्ती आपल्यासमोर साकार होत असते. पत्रलेखनामुळे  विचार, भावना, बुद्धी, भाषाशैली, हस्ताक्षर, शब्दसंपदा.. या  अंगभूत कौशल्यांना वाव मिळत असतो. कागदावर हाताने, पेनाच्या मदतीने लिहिणे ही एक संपूर्ण वैयक्तिक क्रिया आहे जी एकाग्रता वाढवते. ही समाधान देणारी, स्वनिर्मितीची एक कृती असते ज्याची तुलना कीबोर्डवर लिहिलेल्या लेखनाशी होऊ शकत नाही. पत्र लिहिण्यासाठी अक्षर ओळख व कागद पेन एवढीच सामग्री लागते व तिच्या मदतीने जगातली कोणतीही व्यक्ति पत्र लिहू शकते.पत्र डिलीट होत नाहीत. इकडची पत्रे तिकडे फॉरवर्ड करण्याची सोय पत्रव्यवहारात नाही. ही सर्वात मोठी ताकद पत्रलेखनात आहे . वैयक्तिक पत्रातही नवनिर्मिती सर्जनशीलता असते आणि साहित्यिक मूल्य नसले तरी त्यात वाचणाऱ्याचा दिवस उजळून टाकण्याची क्षमता  असते. 

      वैद्यकीय दृष्टिकोनातून पत्रलेखन ही एक उपचार पद्धती आहे. पत्र लिहिण्याच्या विचारानेच व्यक्तिला उत्साह वाटू लागतो. मनात सकारात्मकता  निर्माण होते. मेंदूच्या पेशी उत्तेजित होतात. कागद  पेनाचा स्पर्श हाताला होताक्षणी विचार व भावनांच्या निर्मितीला चालना मिळते. या भावनांना शब्दरूप देण्यासाठी बुद्धी कार्यान्वित होते. प्रत्यक्ष लिखाण करताना बोटे, हात, पाठीचा कणा, मान, डोळे व मेंदू यांचा समन्वय होऊन एकाग्रता साधली जाते.  ही संपूर्ण प्रक्रिया शरीराला आणि मनाला एक सकारात्मक ऊर्जा देते. सेन्सरी आणि मोटाॅर या दोन्हीही मज्जासंस्थेला सक्रियता देण्यासाठी पत्रलेखन ही एक उपचार पद्धती  आहे ज्याला ‘मेंटल वर्कआउट’ म्हणतात. डिप्रेशन व एकाकीपणा पत्रलेखनामुळे कमी होतो. मनात साचलेले विचार कागदावर उतरवले की उदासीनता कमी होते. थोडक्यात काय.. वैयक्तिक, सामाजिक, वैद्यकीय,  व्यावसायिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रांना पत्रव्यवहाराने समृद्ध केले आहे.

      डिजिटल माध्यमाच्या आहारी जाऊन आम्ही आज पत्रव्यवहार बंद केलेला आहे. परंतु त्यामुळे पत्रव्यवहाराचे महत्त्व कमी होत नाही. म्हणूनच ऑस्ट्रेलियन लेखक रिचर्ड सिंपकीन याने २०१४ पासून, एक सप्टेंबर हा जागतिक पत्रलेखन दिवस साजरा करण्याचे सुरू केले आहे. तसेच पत्रलेखनाला  चालना देण्यासाठी, भारतीय डाक विभागातर्फे दरवर्षी पत्रलेखन स्पर्धा आयोजित होत असते. ‘ढाई आखर’ हे या स्पर्धेचे नाव असून,  त्यात अठरा वर्षाखालील व अठरा वर्षावरील असे दोन वयोगट केले आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असते. विशेषतः शालेय मुलांमध्ये पत्र लेखनाला उत्तेजन देण्यासाठी, शाळांमधून हा उपक्रम राबवला जातो. दरवर्षी एक अभिनव विषय या पत्रलेखनासाठी दिला जातो.

      आज तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन मध्यमवयीन पिढी स्वतः हाताने लिहिण्याचे विसरत चालली आहे व पत्रलेखन तर ‘आउटडेटेड’ समजले जाते.हस्ताक्षर व पत्रलेखन ही आपली कौशल्ये आहेत.यांचा वापर केला नाही तर हे कौशल्य अस्तंगत  होईल.आज अनेक मध्यमवयीन लोकांमध्ये लिहिण्याचा सराव नसल्याने ते लिहू शकत नाहीत - हे किती गंभीर आणि भयावह आहे.डिजीटल युगाचा वेग, संदेशवहनातील सहजता,क्षणात जगभरात पोहचण्याचे सामर्थ्य… हे सर्व मान्य आहे.काळाची ती गरज आहे.पण त्यासाठी पत्रव्यवहार  या समृद्ध , लोकप्रिय, सांस्कृतिक, दीर्घकालीन संदेशवहनाचा बळी देण्याची काहीच गरज नाही.पुन्हा मी इंदिरा संतांच्या कवितेचाच आधार घेते.

“‘नको पाठवू अक्षरातुनि,शब्दांमधले गहिरे स्पंदन,

कागदातुनि  नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण, 

नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, तू हट्टी पण, 

पाठविसी ते सगळे सगळे, पहिल्या ओळी मध्येच मिळते. 

पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते .” 

अशी शब्दातीत संवेदना मेसेज मधून मिळेल का हो?

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

९४२२९३९५१०

Sunday, March 16, 2025

Gen baby boomer

 जेन बेबी बुमर आणि लग्न    

        बहिणीच्या मुलाचं लग्न पाच दिवसांवर आलंय. आजपासून रोज भरगच्च कार्यक्रम - साॅरी- 'इव्हेन्ट्स' ठरवले आहेत. त्यानुसार ठराविक ड्रेस - साड्या - दागिने घालून हजर राहायचं आहे. आज कुळाचार असल्याने नऊवारी व धोतर - अशी थीम होती. नऊवारी जांभळ्या रंगाची म्हणजे मस्तानीने  'पिंगा ग पोरी' नाचतांना घातलेला जांभळा रंग बरं का. त्याला जांभळा नाही 'बर्गंडी' म्हणायचं असं हळूच माझ्या कन्येनं कानात ज्ञान ओतलं.

"मावशी, मज्जा आली की नाही? आता सगळ्या थीम्स फॉलो करायच्या बरं " नवरदेवाचा लाडिक? (अट्टाहास) हट्ट.

"तुझ्या थीम्स फॉलो करताना माझा बँक बॅलन्स 'हाॅलो' होतोय त्याचं काय? अरे मी स्वतः च्या लग्नातही इतक्या साड्या घेतल्या नव्हत्या."

"मावशी तुझं लग्न आता हिस्टाॅरिकल इव्हेन्ट  झालंय. त्या १८५७ च्या गोष्टी आणि आमची जनरेशन यात खूप फरक पडलाय."

खरंच. आमची 'बेबी बुम जनरेशन' (४६ ते ६४ मधे जन्म) कुठे     आणि या मुलांची 'जेन वाय' (७७ ते ९५ मधे जन्म) कुठे? जमीन अस्मानाचा फरक आम्ही स्वतःच अनुभवला आहे. नकळत मी इतिहासात शिरले आणि 'जेन बे बु' ची(आमची हो.) लग्नं डोळ्यासमोर आली.

                 त्या काळातील लग्नात कसल्या आल्या थीम्स? त्यावेळी आमच्या जगण्याचीच एक थीम ठरली होती. ती म्हणजे 'जेन सायलेंट' चे आज्ञापालन करणं.

"सदासर्वदा बोध अमुचाच घ्यावा।"

"विरोधाचा सूर कधी ना निघावा॥"

  असं आमच्या मेंदूचं प्रोग्रॅमिंगच करून ठेवलं होतं. (गरीब बिच्चारी आमची पिढी) अपत्य संगोपनाचा  सार्वत्रिक अजेंडा म्हणजे मुलांना धाकात ठेवणं,मुलांचं कौतुक न करणं,त्यांचं ऐकून  न घेणं.......अशा या 'जेन सायलेंटच्या' (२८ ते ४५ मधे जन्म ) धाकात, आमच्या लग्नाबाबत काय बोलावं? लग्न या विषयाची आमची प्रश्नपत्रिका कितीही सोपी वा कठीण असो - सोडवणार कोण? तर वडिलधारे. लग्नसमारंभ म्हणजे मज्जा, धमाल, आनंद, एन्जॉयमेन्ट अशा भलत्याच संकल्पना त्याकाळी नव्हत्या. विशेषतः मुलीचं लग्न असेल तर दडपण, ताण, भिती आणि कष्ट - हीच थीम असायची.  "वरपक्ष हा कायम वरचढ असतो" , "पसंती - नापसंती ठरविण्याचा अधिकृत अधिकार वरपक्षाचा असतो." हे आमच्या मेंदूवर कोरलेलं ब्रम्हवाक्य. त्यामुळे घरात मुलीच्या लग्नाच्या हालचाली सुरु झाल्या की आया बायांच्या डोळ्यातून प्रसंगी टिपं गाळण्याची थीम सुरू व्हायची. एरवी समंजस, सुस्वभावी, सुसंस्कृत असलेली मंडळी 'वरपक्षाची' असली की त्यांची छाती ५६ इंच झालीच समजा.

             कांदेपोह्यांच्या प्रसंगी मुलीनं मान वर करून बघायचं नाही तर पायाच्या अंगठ्याकडे बघावं अशी आवर्जून सूचना दिली जाई. 'पायाच्या अंगठ्याने माती उकरणं ' ही संस्कारी परंपरा, फरशी किंवा टाईल्समुळे कठीण होऊ लागली होती.  तरी सुद्धा  "प्रयत्ने फरशी रगडता मातीही निघे" असा बाणा असलेल्या मुलींच्या अंगठ्याला नाहक इजा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे अंगठ्याकडे केवळ बघावं....  अशी सूचनेत तरतूद करण्यात आली. तसंच मुलीला हसण्याची बंदी असे. मख्ख, गंभीर किंवा तणावात असलेला चेहेरा 'जेन सायलेंटला' फारच सोयीचा वाटे. 

              एकदाचा होकार आला की दोन्ही कुटुंबातील वृध्द, वृध्दतर वृद्धतम ('जेन ग्रेटेस्ट' हो) व्यक्तींचा अचानक  भाव वाढत असे. हुंडा, सालंकृत कन्यादान, मानपान, देणीघेणी, मुलामुलीचा कपडा, जाण्यायेण्याचं भाडं,वरात,घोडा,.......ही  अस्त्रं , शस्त्रं केव्हा व कशी चालवायची... यात ही मंडळी अनुभवी . त्यांच्या उपस्थितीतच मंडळींची व्यवहाराची बोलणी होत. आणि कुटुंबाच्या जाज्वल्य इतिहासात वृद्धतम खापर पणजोबांच्या खाती नववं लग्न जमवण्याचा विक्रम सुवर्णाक्षरात नोंदविला जाई.

             असो. तर  लग्न जमताक्षणी नवरीसाठी खास आचारसंहिता लावली जाई. हल्ली ' प्री वेडिंग फोटोशूट 'असतं म्हणे.....( हे नेमकं काय? आणि कशासाठी?) . 'जेन बे.बु'.तील भावी वधुवरांमध्ये  जरासंही 'खुट्ट' झालं की 'शूट’असायचं.’शूट बाय साईट' हो........ म्हणजे 'जेन सायलेंटची' जळजळीत नजर!!

        'लग्नाचा बस्ता' ही महत्त्वपूर्ण घटना. दोन्ही पक्षातील महत्वाचे आणि मानाचे - अर्थातच ' जेन ग्रेटेस्ट'...... असा वीस- पंचवीस जणांचा जथ्था 'लग्नाचा बस्ता' खरेदीला जाई कारण विवाह समारंभात 'मानापमान नाट्य ' घडू नये म्हणून . नवरीसाठी फक्त पाच (अरेरे!!) साड्या. त्यापैक दोन घरी नेसायला(अरेरेरेरेरे!!!) आणि तीन लग्नाच्या. त्यावेळी शालूला फार महत्व. समोरच्या ढिगातून नेमका शालूचा रंग कोणता घ्यावा? यावर सासूबाईंचं निळ्याकडे तर , सासरेबुवांचं हिरव्याकडे बोट . आणि  डोळ्याच्या कोपऱ्यातून मुलीनं हळूच मुलाच्या बोटाकडे  बघावं तर ते सद्गृहस्थ शालूंच्या किंमतीचे लेबल बघण्यात गुंतलेले. बाकी मंडळी चहाच्या वाटेकडे डोळे लावून , जांभया दाबत बसलेली. आचारसंहितेमुळे वधुपक्षाला  'ब्र' काढायची परवानगी नसे. चाणाक्ष नोकराला परिस्थितीचा नेमका अंदाज आल्याने  शेवटी निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे हे समजे. 'ताईला गुलाबी रंग किती खुलतो ' असं म्हणत गुलाबी शालू बाजूला ठेवी. ठराविक रंग, ‘ताईला 'शोभतो ’- हा जप करित कमीत कमी वेळात तो ताईची खरेदी निपटून टाकी. त्यानंतर पोटझाकणी, नणंददुरडी, आजीबोंद्री अशा 'जेन सायलेंटच्या' अगम्य विधीसाठी साड्या खरेदी होई . खरेदी संपल्यावर नेमक्या कोणाच्या पसंतीच्या  साड्या घेतल्या हे कधीच कुणीच सांगू शकत नसे. 

             वधूपक्षाकडे आता 'रुखवत' अंगात येई. नवरी मुलगी सर्वगुणसंपन्न आहे याचं प्रमाण म्हणजे रुखवत. युद्धपातळीवर चादरी, उशा, पडदे, टेबल क्लाॅथ, रुमाल, साडी यावर भरतकाम, कापसाचा ससा, पेपरमिंटचे तुळशी वृंदावन, आईस्क्रीमच्या काड्यांची होडी,  पैशाच्या नाण्यांचं देऊळ .... अशा कलात्मकतेशी फारकत घेणाऱ्या, व  प्राथमिक शाळेतील  प्रोजेक्टप्रमाणे बाळबोध कलाकृती  तयार होत. गोळाफेकीतल्या गोळ्या प्रमाणे अगडबंब लाडू, कासवछाप काॅईलशी स्पर्धा करणार्‍या चकल्या, आणि एका हातात न मावणार्‍या  महाकाय करंज्याही रुखवतासाठी सज्ज होत.

                हळदीच्या दिवशी नवरीचा खरा रंग ओळखू येणार नाही आणि पुढील पंघरा दिवस  पिवळा रंग पक्का राहील याची काळजी घेत  घरातील तमाम माऊल्या तिला मुक्तहस्ते हळद लावत. माझ्याच लग्नात माझ्या डोळ्यात,नाकात,कानात गेलेल्या हळदी मुळे मला पंधरा दिवस पिवळ्या रंगाचीच  स्वप्नं पडत होती.

          लग्नाचं कार्यालय म्हणजे एक मोठ्ठा हॉल.  वरपक्षाला दोन , वधूपक्षाला दोन खोल्या व कोठीघर. अशा चार खोल्या. वऱ्हाडी मंडळींची संख्या व शौचालय, बाथरूम, गाद्या, उशा , चादरी, पंखे यांच्या संख्येचे गुणोत्तर  कायम व्यस्त. त्यामुळे इकडे सीमांतपूजन तर दुसरीकडे पंगतीतली जागा आणि पंख्याखालची गादी एकाच वेळी आरक्षित करण्यासाठी  मंडळींच्या कोलांट्या, सूरपारंब्या, लांब उडी, उंच उडी, यांची प्रात्याक्षिकं . जेवावं तर गादी निसटणार. गादी पकडणार तर उपाशी रहाणार- अशी अटीतटीची परिस्थिती. बरं, सीमांत पूजनाचं जेवण तरी कसलं हो? फोडणीचं आंबटगोड वरण, भाजी, पोळ्या, भात. असलाच तर घासभर साखरभात किंवा शिरा. दीड वितीच्या पोटाची खळगी भरणं आणि देहासाठी  साडेतीन हाताची गादी......लागतंच काय माणसाला शेवटी? असा साक्षात्कारही( तात्पुरता !) काही पुण्यवान जीवांना त्याप्रसंगी होत असे. पण काहीही म्हणा. हल्लीच्या ' संगीत' पेक्षा हा रिअँलिटी शो नक्कीच 'अस्सल' असे .

.                लग्नाचा दिवस. लग्नाच्या प्रत्येक विधीत 'जेन बे.बु.' नवरा नवरी जास्तीत जास्त हतबल , केविलवाणे आणि विनोदी कसे होतील ही थीम 'जेन सायलेंट' कटाक्षाने पाळत.'मेकअप,   हेअरस्टाईल' हे शब्द डिक्शनरीतच नसल्यामुळे एखादी चुणचुणीत ( आगाऊ) मैत्रिण नवरीला तयार करायला येई. हळदीचा पिवळा रंग झाकण्यासाठी,  गुलाबी पावडरचा थर फासला जाई. अनेक नवर्‍यांनी वापरलेल्या लिपस्टिकच्या थोटकाने ओठ रंगवले जात. नवऱ्या मुलीने हसू नये अशी थीम असल्याने  वेळोवेळी टिपं गाळण्याचा लघु कार्यक्रम होई. त्यामुळे पावडरच्या थरामधून ओघळांचे निसर्गचित्र तयार होई. लग्न लागलं की नवरदेव अक्षतांची ओंजळ  नवरीच्या डोक्यावर रिकामी करून निसर्गचित्रात जिवंतपणा आणित असे.

      आयुष्यात पहिल्यांदाच घातलेला सूट, गळा आवळणारा टाय , त्यावर टोपी आणि मुंडावळ्या या विसंगतीच्या ' थीम' मध्ये नवरदेव 'विदुषक'  दिसे.त्यात उन्हाळा असल्याने घामाच्या धारा वाटेल तिथून वहात. नंतर 'सुलग्न'. यात नवरा नवरीची डोकी एकमेकांवर आपटण्याचा एक अश्मयुगीन लोकप्रिय कार्यक्रम असे. ही प्रथा का? कशी? कुणी?  सुरू केली याचं सूतभरही गम्य नसणारी मंडळी सुलग्न लावतांना, डोकी आपटायचं परमकर्तव्य करून जात. काही तरुण मित्रमंडळी तर शक्ती पणाला लावून डोक्यांची टक्कर करित. मध्येच काही महिलावर्ग हळदी कुंकवाची बोटं नवरीच्या कपाळावर (  बायकांचं कपाळ हे केवळ हळदीकुंकू लावण्यासाठीच देवानं निर्माण केलं आहे!!!)  टेकवून नवरीच्या हातात एखादं  स्टीलचं भांडं सरकवीत.नवरीच्या अंगावर किती आणि कसं सोनं घातलं हे बारकाईनं बघताना, नवरीचे हात , मान ,कान कसेही ओढण्याचा , त्यांना जन्मसिद्ध अधिकार असे. वडीलधा-यांना वाकून नमस्कार..  आणि डोक्यांच्या टक्करेमुळे नवदांपत्याची कंबर व डोकं हमखास ठणकू लागे.  त्यात नवरीच्या मुंडावळ्या घसरून नाकावर येत ,केसांच्या पिसार्‍यात  लोंबकळलेले गजरे ,कपाळावर मळवट, घामाच्या धारा....... नवरदेवाची टोपी उत्तर - दक्षिण, अशी एकंदरित  "आपण यांना पाहिलंत का" ही थीम आपोआप निर्माण होई. नवऱ्याची बहिण आपलं दोन वर्षाचं कारटं नवरीच्या मांडीवर ठेवून, ‘नवीन मामीजवल कोन बशनार?’असं म्हणून निघून जाई. ते बाळ मामीचे केस आणि मुंडावळ्या ओढून तिच्या देखणेपणात भर घाली. महत्वाचं म्हणजे,वधुवरांच्या भुकेची कुणालाही पर्वा नसे.कारण सगळी मंडळी चिवडा लाडूच्या ताटावर ‘आक्रमण’ करण्यासाठी रणांगणात उतरली असत. हो.आमच्या काळात ‘फ्याशनेबल’ नाश्त्याची भानगड नव्हती. ताटं भरुन चिवडा लाडू कोठी घरातून मांडवात पाठवला जाई. पुढची जबाबदारी ही सर्वस्वी वऱ्हाडींची. ताटांभोवती गटागटानं बसून मंडळी ताटं ‘साफ’ करित.  कुणीतरी  कुटुंबवत्सल व्यक्ति एखादी गरम झालेली कोल्ड्रिंकची एक बाटली व दोन पुंगळ्या आणून देई. एकाच बाटलीतून दोघांनी पेय पिण्याचा तो एक तरल, अतिरोमॅंटिक क्षण अनुभवावा तर एक पुंगळी चेपलेली असे. पण पोकळ पुंगळीतून जे बेचव,कोमट पेय तोंडात येई त्यापेक्षा चेपलेली पुंगळी बरी......असं होई. एकूणच नवदांपत्याचं पूर्णतः मानसिक व प्रेक्षणीय खच्चीकरण म्हणजे 'जेन बे बु 'चे लग्नसमारंभ.

              त्यानंतर होम आणि सप्तपदी मध्ये उरल्यासुरल्या अवयवाची - अर्थातच डोळ्यांची आग होऊन डोळे  आपोआप मिटले जात. तसंही बाजूच्या जोडीदाराचा 'आधार कार्डावरील फोटोप्रमाणे' अवतार असल्याने डोळे मिटणं ही इष्टापत्तीच असे. हे सगळं कमी असे की काय तर अजून शारीरिक ऊर्जेच्या खच्चीकरणाचा प्रकार म्हणजे 'विहीणीची पंगत.' पोटात भुकेने कावळे कोकलत असताना, पानात अन्न वाढलं असतांना, विहिणबाईंचा षोडशोपचार मानसन्मान निवांतपणे केला जाई. मग जरा एखादा घास पोटात जात नाही तोच 'घास भरवा, उखाणा घ्या' हा खेळ सुरू होई. त्यावेळी तर उखाणा ऐकल्यावरच मोक्षप्राप्ती होणार .... या आविर्भावात  दोन्ही कुटुंबांच्या यच्चयावत पिढ्यांचे जीव कानात गोळा होत. आतातरी ते गारगोटी झालेले पदार्थ गिळावे म्हटलं तर कुणीतरी विलक्षण बेसूर आवाजात 'विहीण' म्हणू लागे.जेवण आणि  गाणं या दोन्ही संकटांना सामोरं जाताना पंगतीच्या घशात घास अडकत असे आणि  नवरीच्याही डोळ्यातून गंगा यमुना. आता नवरदेवालाही या करुण भावनोत्कट प्रसंगात भोजनावर आडवा हात मारणं शक्यच नसे. एकंदरित दोघेही अर्धपोटी रहात.शेवटी काय, लग्न हा आनंदी, उत्साही समारंभ नसून डोकं गहाण ठेवून स्वतःचं अप्रेक्षणीय असं प्रदर्शन आहे.... हे अर्थात लग्नानंतरच कळतं.

            असो. पण आजचे लग्नसमारंभ बघतांना, नवरा - नवरी खिदळतांना, फोटोशूटच्या वेळी नको ते चाळे करतांना - प्रत्येक विधीला 'थीममध्ये' बसवलेलं बघताना, संगीतमध्ये आख्ख्या कुटुंबाचं 'न भूतो न भविष्यति' नाचकाम बघतांना........... खरंतर एखादी केविलवाणी विनोदी   एकांकिकेची आठवण येते. वरवर बघतांना आमच्या पिढीतली लग्नं हास्यास्पद नक्कीच होती पण त्यात सच्चेपणा होता.  आजचं लग्न हा एक आभासी आनंदाचा खर्चिक मुखवटा आहे. आणि त्यातली मेख अशी की आपण हा आनंद ओढूनताणून मुठीत पकडून आपलीच फसवणूक करतोय....  समजून उमजूनही....! हाही खरंतर एक केविलवाणा विनोदच!!! विवाह समारंभ हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात अतिमहत्त्वाचा दिवस असतो.पण समस्त लग्न विधींना साग्रसंगीत समाजमाध्यमांवर प्रसिद्धी देण्याइतका तो अभिनव  ही नसतो. अगदी पांढऱ्याशुभ्र घोड्यावरून एखादा देखणा राजकुमार हलकेच प्रगट ह्वावा.....हे स्वप्न अर्थातच प्रत्येक लग्नेच्छु तरुणीचं असतं ,यात वावगं काहीच नाही. अशक्य असणारं स्वप्न बघायला काय हरकत आहे? पण ज्या स्वप्नांचा भविष्यात सुतराम संबंध नाही, ती स्वप्नं एका दिवसा करिता प्रत्यक्षात आणण्यासाठी किती आटापिटा? किती खर्च?, बॉलिवूडच्या,टीव्ही सीरियल मधल्या, किंवा अब्जोपती उद्योगसम्राटांच्या विवाह समारंभांचं अनुकरण आपण सामान्यांनी का करावं? त्यामुळे नेमकं काय सिद्ध होतं? कुणी करेल का विचार???

#marriageceremony

#genbabybumer




__________________________


डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

 ९/१३५, केला प्लॉट, जठारपेठ, अकोला 

४४४००५

९४२२९३९५१०







Sunday, March 2, 2025

अभिजात दर्जा आणि मराठी पाट्या

 आपल्या मराठीच्या अनेक बोलीभाषांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे . प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात तिचं रूप, बाज आणि लय वेगवेगळी असते. दोन वाक्यातच बोलीभाषेचा लहेजा उमजून बोलणा-याचा प्रदेश ओळखता येतो. असं वेगळेपण असलं तरी लिहिताना ‘प्रमाण' मराठी भाषाच वापरली जाते  आता,शुद्ध मराठी लिहिणं आणि बोलणं प्रामुख्याने कुठे आढळतं? उत्तर द्यायची गरजच आहे? प्रमाण किंवा शुद्ध मराठी ही पुण्यातच बोलली जाते - हे 'ब्रम्हवाक्य' आहे नाही का? यावर कुणाचं दुमत आहे का? मग आता ही पाटी  बघा आणि त्यातील शुद्धता तपासा. . 



‘पैसे लागेल कणभर’ हे अचूक आहे का हो? दुसरा फोटो बघा. ‘येतीये मेट्रो तुमच्या भेटीला’. ‘येतीये’ - हे कोणतं क्रियापद आहे हो? 



विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अशी भाषा? पुणेकर खपवून घेतात वाटतं हल्ली. अहो, मराठीला अभिजात दर्जा मिळालाय. जागो. पुणेकर जागो.



     आता एक नामवंत मराठी दैनिकात पहिल्याच पानावरची पूर्ण जाहिरात. फोटो बघा. केसांना ‘बनवाते’ निरोगी. हे म्हणजे हिंदीचं भाषांतर. ‘बनवणे’ या हिंदी क्रियापदानं मराठी माणसाला ‘मामा' बनवलं आहे. आम्ही जेवण बनवतो, घरं बनवतो, शिल्प बनवतो..... असा सगळा ‘उल्लू बनाविंग’ प्रकार. असो. ‘ज्यामुळे तुम्ही दिसाल सुंदर आणि आत्मविश्वासाने भरपूर’.. याचा अर्थ मला कुणी सांगेल काय? शाळेत असतांना निबंधात असल्या चुका झाल्या तर मार्क तर कापले जात, शिवाय चुकलेला शब्द पन्नास वेळी लिहून काढावा लागे. (सुधारणा करून हो.) आता आपल्या मायबोलीची अशी दुर्दशा बघून घशात आवंढा दाटतो हो. चूक भाषा लिहिणाऱ्या या महानुभावांना काहीच शिक्षा नाही?

           बरं. हल्ली तर शुध्द मराठीचा आग्रह धरणाऱ्याची टिंगल केली जाते. ‘भावना पोचणं महत्वाचं. व्याकरण नाही’ - ही आजची टॅग लाईन आहे त्यामुळे Jवण, Cमा, Kले, Aकदम, Pवळा… अशा धेडगुजरी शब्दांना समाजमान्यता मिळाली आहे. आता हीच पाटी बघाना.


हे दुकान पंक्चर दुरुस्तीचं आहे हे समजून घेण्याचा सूज्ञपणा मराठी माणसात आहे म्हणून बरंय. आता पाटी लावण्याचा उद्देश जर पूर्ण होत असेल तर शब्द चूक लिहिले तरी काय हरकत आहे? असा आजकाल प्रतिवाद केला जातो. पण याच पाटीवर त्या अज्ञात लेखकाने ‘संपर्क’ हा शब्द मात्र अचूक लिहिला आहे त्याबद्दल त्याची पाठ थोपटली पाहिजे कारण' रफार' या शत्रूने अनेकांचा 'फार्फार' छळ केलाय. हर्षवर्धन, धैर्यवर्धन, सुदर्शन,अंतर्नाद, निसर्ग इ. रफार असणारी शब्दावली काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट हो.) टाकावी अशी पीडितांनी मागणी केल्याचं मी ऐकलंय. आता ‘आशिर्वाद’ शब्दच बघा ना. किती सकारात्मक, उत्साह वाढवणारा शब्द. पण त्याला चूक लिहिला जाण्याचा शाप आहे. ‘आर्शिवाद’ असं सहजगत्या लिहिलं जातं.जे शापित आयुष्य ‘रफाराला’ तेच नशीब अनुस्वाराचंही आहे. आता हा टॅंकर बघा.

 ‘ज्वलनाचं' धगधगतं स्वरुप 'ज्वलनशील' या शब्दात दडलं आहे.पण 'शिल' लिहिल्यामुळे त्यातली दाहकता थंड पडली आहे .आणि 'अंत्यत' विशेषणामुळे उरल्यासुरल्या दाहकतेनं चक्क शरणागती पत्करली आहे. अनुस्वार नेमका कोणत्या अक्षरावर द्यावा, या गोंधळात अनेक जण असतात. त्यात काही चतुर विद्वान दोन अक्षरांमध्ये त्याला बसवून वाचणा-याच्या कोर्टात बॉल टाकतात. ‘अंतरंग, रंगपंचमी जंगल,’इ. ही कमनशिबी मंडळी आहेत. जी आपल्यासमोर अतंरंग,रगंपचंमी, जगंल या स्वरूपात येतात. '
जोडाक्षरं’ ही तर मराठी लिहिणाऱ्यांच्या कुंडलीतील दुष्टग्रह, पापग्रह आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आता एका प्रसिध्द मंदिरातील हीच पाटी बघा ना. 


वास्तविक मंदिरातील पुजारी मंडळींचं मराठीच नव्हे तर संस्कृत अस्खलित, अचूक सुस्पष्ट असतं पण त्या शाश्वताला ‘श्वाश्वताची’ शिक्षा का दिली हे त्या मंदिरातील देवच जाणे. ‘सद्सद्विवेक’ , ‘दृष्टद्युम्न’, ‘तादात्म्य’, ‘पुनरुज्जीवन’ ई. ‘शब्दोत्तम’ अचूक लिहिणं आणि वाचणं ही स्पर्धा ठेवल्यास त्यात भाग घेणा-यांनाच बक्षीस द्यावं लागेल.( कारण कुणी भाग घेण्याची हिम्मतच करणार नाही.)

       परवा आम्ही  एका खेडेवजा भागात सहलीला गेलो होतो.  पोटपूजा करण्यासाठी प्रचंड संशोधन करून शेवटी एक हॉटेल सापडलं. मेन्यू कार्ड समोर आलेलं बघा आता.

'रसगुल्हा’ हा कोल्ह्याचा भाऊबंद तर नसेल ?या शंकेनं भूक घाबरून पळाली आणि ‘मंच्न्युरियन’ वाचल्यावर तर पोटातल्या कोकलणार्या कावळ्यांचीही बोबडी वळली. ’व्हेज फुलावात’ कोणती फुलं घातली असतील हे तो अन्नदाताच जाणे.

'मनचाह सुप’ वाचून तर माझं 'मन' सुपात पाखडल्यागत वरखाली झालं.'टमोटो' हा 'अजिनोमोटो' हा ग्रामीण अवतार असावा का?                          मराठी लिखाणाची अशी दाणादाण उडवलेत्या पाट्या बघतांना मला अमृत मासिकातील ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ आठवतो. कामाच्या दबावामुळे एका ‘दैनिकाची’ आत्महत्या! (सैनिकाची). ‘सर’ नाही त्याला डर कशाला?  (कर). ‘चरावे’ परी कीर्तिरूपे उरावे (मरावे) ... .... अशा गंमती पूर्वी मुद्रण (अर्थातच टायपिंग/ प्रिंटींग) करतांना होत असत. पूर्वी अगदी अपवादाने घडणारे मुद्राराक्षसाचे विनोद हल्ली सर्रास घडताना दिसतात. किंबहुना मुद्राराक्षसांची संख्या आता वेगानं वाढू लागलीय. इंग्रजी आद्याक्षरं वापरून मराठी लिहिणं ही सध्याची फॅशन असल्याने देवनागरी लिपी लिहिण्याची सवय आता मोडली आहे. कोणतीही भाषा ही बोलण्यापेक्षा लिहिणं कठीण असतं.पण दोष मात्र मराठीला दिला जातो. मुद्राराक्षसांमुळे भाषेत विनोद निर्मिती होते हे एका ठराविक पातळीपर्यंत मान्य आहे.पण उपसंपादकांनी डुलकी घेणं हे मात्र अक्षम्य आहे.’प्रुफ रिडींग’ म्हणजे प्रकाशित करण्याआधी तपासलेलं लिखाण.मग ते पुस्तक असो वा चार शब्दांची पाटी. प्रूफ रिडींग टाळलं की चुकीची भाषा समोर येते.

        नुकताच मराठीत ‘ सलाते सलानाते’ या नावाचा चित्रपट आला आहे. चित्रपटाचा विषय नेमका काय आहे याची मला कल्पना नाही पण त्याचं नाव मात्र आगळंवेगळं आहे.त्या नावानं मला एकदम माझ्या शाळेत मराठीच्या व्याकरणाच्या वर्गात नेऊन बसवलं.’सलाते सलानाते’ हे विभक्ती प्रत्यय असून द्वितीय विभक्तीचे एक व अनेकवचनाचे प्रत्यय आहेत. विभक्ती, समास,कर्तरी - कर्मणी प्रयोग,काळ,नाम…हे व्याकरण शिकताना त्या वयात वैताग येत असे.पण आता लक्षात येतं की व्याकरण हे भाषेचं हार्डवेअर असतं.आणि ते जितकं मजबूत, तितकी भाषा अचूक होते.

       मराठी पाट्या आणि विनोद हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा जरी असला तरी भाषेचं हे विडंबन खेदकारक आहे. त्याहीपेक्षा त्यात सुधारणा न करता ते चालवून घेणं… ही वृत्ती अधिकच गंभीर आहे.वर्षोनवर्षे सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या मराठी पाट्या असणं… हे मराठी भाषेला गौणत्व दिल्यामुळे घडतं.मायबोलीला मनात स्थान नसणं, मराठी म्हणजे ‘लो स्टॅंडर्ड' असा गैरसमज बाळगणं…या वृत्तीमुळे आपणच मराठीचा दर्जा खालावण्यास कारणीभूत आहोत. आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.आपण भाषा प्रेमींनी मराठीचे केवळ गोडवे गाण्यापेक्षा शक्य त्याठिकाणी सुधारणा करणं अपेक्षित आहे आणि  प्रमाण मराठीचा आग्रह बाळगणे अपेक्षित आहे.


#मराठीचीदुदर्शा

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 




९४२२९३९५१०

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...