- सध्या तरी लग्नाचा विचार नाही . माझा पीएचडी चा प्रोजेक्ट .. अजून २ वर्षे चालणार आहे त्यानंतर लग्नाचं बघू.... ३२ वर्षाची मुलगी
- नुकताच एका रिलेशनशीपचा ब्रेकअप झालाय त्यामुळे सध्या तरी लग्नापासून दूरच राहणं बरंय..... ३० वर्षाचा मुलगा.
- मूव्ह ऑन करतेय. सेट्ल व्हायला जरा वेळ लागेल. पुढे बघू.... उपवर तरुणीचा जाहीरनामा.
- दोघांमध्ये कम्पॅटेबिलीटी आहे की नाही या साठी 'लिव्ह इन' हा उत्तम पर्याय आहे...... जेन झी चं मत.
- मुलगा पसंत आहे पण एका अटीवर - लग्नानंतर घरात सासरची माणसे नकोत..... भावी वधूचा निश्चय.
- लग्नानंतरही एक्स गर्लफ्रेंडशी मैत्री कंटिन्यू करणार आहे.... भावी नवरोबांची मुक्ताफळं.
' मला आवडलाय तो मुलगा. घटस्फोटित असला तरी मला काहीही फरक पडत नाही.. ... ३५ वर्षाची मुलगी
' लग्न केलंच पाहिजे अशी सक्ति आहे का? नाहीच केलं तर काय बिघडणार आहे?.......३४ वर्षाची मुलगी
हल्ली घराघरात लग्नाळू मुला मुलींचे अशाप्रकारचे संवाद सहजपणे ऐकू येत असतात. जे या मुलांच्या दृष्टीने अत्यंत 'कूल' आणि 'सॉर्टेड' असे विचार असतात. गेल्या साधारणतः १०/ १५ वर्षापासून जेन झीं च्या अशा भूमिकांमुळे सुरुवातीला घराघरातल्या आई- बाबा, आजी आजोबांना ४४० व्होल्ट चे सांस्कृतिक धक्के (कल्चरल शॉक हो) बसले . या झटक्यांमधून आई - बाबा आता कसेबसे सावरले आहेत पण आजी आजोबांचा थरकाप अजूनही कमी झालेला नाही. आता बॅकफूटवर जाऊन आजचे आईबाबा संरक्षणात्मक पवित्रा घेऊन फिल्डिंग करताहेत. तीसाव्या वर्षी हल्लीची मुले लग्न करायचे की नाही हा विचार करायला सुरुवात करतात. आई - वडिल त्यांच्या हिरव्या झेंडी ची वाट बघत बसतात. कारण मुलांच्या मनाविरुद्ध काहीही करण्याची आजच्या पालकांची हिम्मत नाही. शेवटी एकदाचे लग्न करायचे ठरवले की टर्मस् अँण्ड कंडीशन्सची मोठी चाळणी तयार होते. त्यातून भराभरा अनेक 'स्थळं' गळून जातात. त्यातून उरलेल्यांचा विचार करायचा तर तेही त्यांची चाळणी घेऊन उभे. त्यातून गळती झाली नाहीच तर कंपॅटेबिलीटी साठी बोलण्याची/ भेटण्याची सत्रे सुरू होतात. अनेक सत्रानंतर एक होकार देतो तर समोरचा विचार करायला आणखी वेळ मागतो. या द्राविडी प्राणायामा मध्ये आई वडिल बिचारे पाच वर्षाने म्हातारे होतात. आणि मग एकदाचे लग्न ठरले की या मुलगी - जावई तसेच सून आणि मुलगा यांनी आपले लग्न ' टिकवावे'.. एवढीच एकमेव अपेक्षा बिचाऱ्या आई बाबांची उरते.
हो. कारण आजकाल घटस्फोट देखिल विवाह संस्थेतील एक मान्यताप्राप्त वलयांकित घटना ठरली आहे. पंधरा, वीस वर्ष संसार केल्यानंतर, ' दीर्घकाल चर्चेअंती, शांतपणे, सामंजस्याने, कोणतीही कटुता न ठेवता आम्ही
विभक्त होत आहोत. पती पत्नी नसलो तरी आमच्यात मित्रत्वाचं नाते असणार आहे. याशिवाय आमच्या मुली/ मुलासाठी आम्ही कायम उपलब्ध राहू.' - - असा आवर्जून जाहीरनामा प्रसिध्द करण्याची सध्या टूम निघाली आहे. प्रसिध्द व्यक्तिं नी आपल्या तथाकथित सामंजस्याचा असा झेंडा फडकवला की त्यांचे चाहते निघालेच तो झेंडा घेऊन ठिकठिकाणी ध्वजारोहण करायला. वास्तविक घटस्फोट ही वैयक्तिक बाब आहे, मग तो एकमेकांच्या झिंज्या उपटून घेतलेला असो वा विचारांती घेतला असो. पण अशा घटनांना जाहीर प्रसिध्दी दिल्यामुळे हळूहळू समाजात त्यांना मान्यता मिळू लागते. शिवाय 'अपत्यासाठी आम्ही कायम एकत्र येऊ' हे ' कलम' त्यात टाकल्यामुळे घटस्फोटाच्या घटनेचं गांभिर्य सौम्य होण्यास मदत होते. परिणामी घटस्फोट हा विवाह संस्थेतील एक सहज, सोपा, योग्य पर्याय ठरू लागला आहे.
त्यामुळे आपला मुलगा -मुलगी लग्नाला तयार होणार की नाही? तयार झालेत तर त्यांच्या पसंतीचा जोडीदार मिळून त्यांचे लग्न जमणार की नाही? लग्न जमल्यावर प्रत्यक्ष लग्नकार्य होईपर्यंत ते टिकेल का? आणि शेवटी लग्न झाल्यावरही त्यांचा संसार अभंग राहिल का? हे यक्षप्रश्न आजच्या आई वडिलांसमोर उभे आहेत.
अशी परिस्थिती समाजात नेमकी कशामुळे निर्माण झाली? विवाह संस्था तकलादू तर होत नाहीये ना? पती- पत्नीच्या नात्यात उथळपणा येत चाललाय का? कुटुंब व्यवस्था विसविशीत होतेय का? बदलाचा प्रचंड वेग, समाज माध्यमांची घट्ट पकड, अनिश्चितता यामुळे विवाह या घटनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे का? या सगळ्यांचा उहापोह करण्याची आज वेळ येऊन ठेपली आहे. लग्नाची, किंबहुना ते टिकवण्याची भीती तरूण पिढीत का निर्माण झाली असावी? या साठी इतिहासात जाऊन बदलत जाणाऱ्या विवाह संस्थेचा आढावा घ्यावा लागेल.
प्राचीन काळापासून विवाहाचा उद्देश हा लौकिक आणि पारलौकिक मूल्यांच्या समन्वया वर आधारित आहे. जीवनविषयक चारही पुरुषार्थ आणि चार आश्रम यांच्या तात्विक बैठकीवर विवाहाची योजना केली आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती ही धर्माच्या आधाराने, भौतिक सुखे उपभोगूनच होत असते. आपल्या समाजातली आश्रम व्यवस्था ही त्यासाठीच निर्माण केली आहे. मानवी जीवनाचा कालावधी हा ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या चार आश्रमात विभागला आहे. विवाहानंतरच व्यक्तिला गृहस्थाश्रमात प्रवेश मिळतो. या काळात 'अर्थ' आणि 'काम' या दोन पुरुषार्थांना धर्माच्या आधाराने जिंकायचे असते. इतर तीनही आश्रमातील लोक हे गृहस्थाश्रम व्यवस्थेवरच अवलंबून असल्यामुळे गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्व दिल्या गेले आहे. अपत्यजन्म म्हणजे पितृऋणातून मुक्ती होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होणे. अशा पारंपारिक मूल्य व तत्वांमुळे समाजात विवाहाची अपरिहार्यता आणि अनिवार्यता लक्षात येते. म्हणजे त्यावेळी मूल पाळण्यात असतांनाच ज्येष्ठ मंडळी त्यांचे विवाह ठरवून ठेवीत. अर्थातच या परंपरागत हिंदू विवाहात पूर्वी व्यक्तिस्वातंत्र्याला काडीचेही महत्व नव्हते. देव, पितर, ऋषी आणि समाज यांच्या ऋणांची फेड करण्यासाठी विवाहाची योजना केली जात होती. वंशसातत्य राखणे हा देखिल विवाहाचा मुख्य हेतू होता. वैदिक आणि धार्मिक संस्कारांनी संपन्न झालेल्या विवाहाला पवित्र बंधनाचे स्वरूप प्राप्त होते अशी पूर्वी आणि आजही श्रद्धा आहे. देवाब्राम्हणा समोर, अग्नीदेवा च्या साक्षीने वडिलधा-यांच्या आशीर्वादाने होणारा विवाह हा व्यक्तिगत जीवनात, कुटुंबात, समाजात मान्यता पावलेला असतो . या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदारी, विश्वास, निष्ठा इत्यादींचे पती पत्नीच्या नात्यात पूर्णतः पालन करावे अशी पूर्वी आणि आजही अपेक्षा आहे . या विवाहपद्धतीत पत्नीने स्वतंत्रपणे विचार करण्याची पद्धत/ मुभा नव्हती. पतीशी एकनिष्ठ राहिलेल्या सीता, सावित्री, मंदोदरी तारा, अहिल्या या पतिव्रता स्त्रियांचा आदर्श विवाहित स्त्री समोर ठेवला जात असे. पतीला त्याकाळी परमेश्वराचा दर्जा होता. या पातिव्रत्यासाठी स्रियांनी सती जाण्याची अतिरेकी प्रथाही सुरु केली होती.
या प्राचीन उद्देशांचा आणि परंपरांचा विचार काळानुसार बराच बदलत गेला . पारलौकिक दृष्टीकोना ऐवजी समाजमान्यतेनुसार नैतिकतेने लैंगिक जीवन जगण्यासाठी कायदेशीर, धार्मिक विधीचे पालन करून गृहस्थाश्रमाची सुरुवात करणे या हेतूने विवाह संपन्न होऊ लागले. विविध नियम आणि सामाजिक संकेतानुसार विवाहानंतर प्रजोत्पादन करणे हे जबाबदार सामाजिक घटक निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक ठरु लागले. एका स्थिर कुटुंबाच्या निर्मिती मुळे समाजातही शिस्त, नियम, कायदे, रीतिरिवाज पाळल्या जाऊ लागली.
अशी ही विवाह परंपरा आजतागायत अव्याहत सुरू आहे. मुलांचे शिक्षण आटोपून नोकरी लागली की पुढील टप्पा लग्न असणार हे आजही गृहित धरल्या जाते-अर्थातच आई वडिलांकडून.
ऐंशी नव्वदीच्या दशकात मुलामुलींच्या पसंतीला प्राधान्य देण्यात आले. त्याकाळात 'मुलगा नापसंत आहे' असे मुलगी पालकांना सांगू शकत होती पण कायम अविवाहित राहण्याचा विचार तिच्या/ त्याच्या मनाला कधीच शिवत नसे. वयाच्या पंचविशी नंतर विवाहाचा शिक्का लागला नसेल तर तो चर्चेचा विषय होई. वय वाढून अविवाहित असलेल्या मुलांनी जणू गुन्हा केला आहे या दृष्टीने समाज त्यांच्याकडे बघत असे. याशिवाय कधीकधी पैलतीरावर डोळे लागलेली घरातली आजीची भावनिक धमकीही असे. 'एकदा नातसूनेचं तोंड बघितलं की मी डोळे मिटायला मोकळी '. 'लाडू कधी देणार?' हा एकमेव राष्ट्रीय प्रश्न विचारून नातेवाईक आणि इष्ट मित्रपरिवार येवढे भंडावून सोडत की या भावनिक छळा मुळे वैतागून बरेचदा समोर येईल त्या स्थळाला होकार देऊन लग्न उरकले जाई आणि निभावलेही जात असे. लग्नानंतर 'आता लौक्कर पेढे किंवा बर्फी द्यायची बरं का'.... ही नविन धमकी भात्यातून काढली जात असे. नातसूनेचे तोंड बघून टुणटुणीत झालेली आजी आता 'पणतू बघू दे... एकदा डोक्यावर सोन्याची फुलं पडली की सरळ स्वर्गात जाईन' ही घोषणा करी. या काळात पती परमेश्वराची पदावनती होऊन त्याला 'नवरा' हा दर्जा मिळाला. अर्थात पदावनती होऊन सुंभ जळला तरी पीळ मात्र कायम राहिला. थोडक्यात काय, त्यावेळी ' लग्न' या विषयात कौटुंबिक आणि सामाजिक अजेंडे पाळल्याशिवाय पर्याय नसे. व्यक्तिगत अजेंड्याचा प्रोग्रामच नव्हता की हो मेंदूत.
पण आता विसाव्या शतकात ही सगळी कौटुंबिक आणि सामाजिक समीकरणे बदलली आहेत.आज
व्यवसायाची सर्व क्षेत्रे स्त्रियांना उपलब्ध झाली आहेत व व्यावसायिक जगात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची स्वाभाविक व रास्त अपेक्षा स्त्रियांच्या ठायी निर्माण झाली आहे. परंपरेने त्यांच्याकडे चालत आलेली कुटुंबातील गृहिणीची भूमिका आजही तितक्याच समर्थपणे त्या पाळतात व त्याचबरोबरीने आपले करिअर पण सांभाळतात. घरकामात साहाय्यभूत होणारी अनेक यंत्रोपकरणे आता गृहिणीला सहज उपलब्ध झाली आहेत, तसेच ऑनलाईन खरेदीच्या सोयीमुळे घरकामाचा ताण बराच कमी झाला आहे.या सर्व घडामोडींचा भलाबुरा प्रभाव आधुनिक समाजातील विवाहसंस्थेवर पडणे अटळ व स्वाभाविकच आहे.
व्यक्तिवादी विचारसरणी आणि स्त्री-पुरुष समानता या मूल्यांच्या निकषावर विवाह संस्थेत अनुकूल बदल घडून आले आहेत जे स्वागतार्ह आहेत. . आधुनिक विवाहसंस्थेत जोडीदाराच्या निवडीचे स्वातंत्र्य वयात आलेल्या मुलामुलींना दिले जाते.आईवडिलांनी व ज्येष्ठ आप्तेष्टांनी मुलामुलींचा विवाह जमविण्याची पद्धती आता समाजातून जवळजवळ नामशेष होत चालली आहे. ह्याचे महत्त्वाचे कारण नागरी समाजातील प्रचंड गतिमान अशा भौगोलिक व सामाजिक चलनशीलतेत आढळून येते. त्यामुळे नागरी समाजात शेजार असा उरला नाही. आज कुटुंबात पती, पत्नी आणि स्वतःची मुले येवढीच चौकट असल्याने परिणामी मुलामुलींचे लग्न जुळविण्याची मक्तेदारी आता विवाह मंडळांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. विवाह मंडळे हा आज फार मोठा - व्यवसाय झाला आहे. आता आईवडील व आप्तेष्ट यांना सहयोगी किंवा एक्स्ट्रा कलाकारांची भूमिका मिळाली आहे. विवाह मंडळा मधून परस्परांना अनुरूप वाटणाऱ्या जोडीदाराची निवड करण्याची अधिकृत सोय- हा या काळातला विवाह संस्थेतला मोठा बदल आहे.
आजकालच्या मुली फार हुषार, चटपटीत, धाडसी असतात असे सरसकट म्हटल्या जाते. पण याच मुली जेव्हा लग्नासाठी उभ्या राहतात किंवा सून म्हणून घरात येतात तेव्हा त्या आगाऊ, मनस्वी आणि आक्रमक आहेत अशी संभावना केली जाते.
सुनेने किंवा विवाहित स्त्रीने कसे वागायचे याचे मापदंड समाजाने पुरातन काळापासून ठरविले आहेत. आणि विसंगती अशी की आजपर्यंत कितीतरी बदल पचवून , स्वीकारून, त्यांचे स्वागत करूनही समाजाची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी मात्र तीच पुरातन, पूर्वग्रहदूषित आहे. पुरातन काळापासून विवाह संस्थेत बळी गेला तो स्त्रियांचाच. अगदी पौराणिक काळातही राजकीय हेतूने लग्न लावली जात. एवढेच नाही तर राजकीय स्वार्थापायी पत्नीला, मुलीला, बहिणीला उपभोग्य वस्तू म्हणून गरजेनुसार इतरांकडे पाठवले जाई. इतिहासाचार्य श्री राजवाडे यांच्या 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या ग्रंथात असे बरेचसे संदर्भ आढळतात जे आपल्या कल्पनेपलीकडचे आहेत. कुटुंबाला जोडून ठेवणे, मुलांचे संगोपन, घराचे व्यवस्थापन, प्रसंगी तडजोड, भावनिक आधार या सगळ्या बाबी आजवर स्त्रीच सांभाळत आली आहे. विवाह संस्था टिकवून ठेवण्यात स्त्रियांच्या त्याग आणि समर्पणाचे भरीव योगदान आहे.
'कार्येषु मंत्री - करणेषु दासी- भोज्येषु माता- शयनेषु रंभा- धर्मा नुकूला- क्षमया धरित्री' या अपेक्षांचे तिच्यावर कायम दडपण राहिले आहे. आणि त्यांची पूर्ती करतांना ती स्वतः ला विसरली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा पूर्णतः अभाव ते पुरस्कार या विवाहसंस्थेच्या प्रवासात स्त्री चा संघर्ष ज्ञात आहेच.
पतीच्या बरोबरीने आपणही नोकरी अथवा विविध व्यवसाय करून अर्थार्जन करतो, तेव्हा पतीने आपल्या बरोबरीने घरकामाची व बालसंगोपनाची जबाबदारी उचलावी, अशी रास्त अपेक्षा आधुनिक समाजातील स्त्री करू लागली आहे. त्यामुळे आधुनिक समाजातील कुटुंब हे पितृसत्ताक राहिले नसून समसत्ताक झाले आहे. पतीला आता मित्राचा दर्जा मिळाला आहे. (ती पदोन्नती आहे की पदावनती, हे त्या - त्या पतीनेच ठरवावे ही विनंती.) मूल केव्हा व्हावे , किती मुले व्हावीत, याविषयीचे निर्णय घेण्याची क्षमता व स्वातंत्र्य आधुनिक समाजातील स्त्रीला प्राप्त झाले आहे. कुटुंबनियोजनाच्या प्रभावी साधनांच्या उपलब्धतेमुळे मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे तिला शक्य झाले आहे. लैंगिक सुख आणि मातृत्व यांची निसर्गाने जी सांगड घातली होती, ती आता प्रजननाच्या शास्त्रीय ज्ञानाने व संततिनियमनाच्या साधनांच्या क्रांतीमुळे तुटली आहे. मूल होऊ न देता लैंगिक सुखाचा उपभोग घेणे आधुनिक समाजातील स्त्री-पुरुषांना आता शक्य झाले आहे.
हे सगळे बदल स्त्रियांचे शिक्षण, नोकरी आणि आत्मभान यामुळे घडले आहेत. पण जुनाट चष्मा लावून बसलेल्या संस्कृती रक्षकांना कुटुंबातली स्त्री - पुरुष समानता अजूनही स्वीकारता येत नाहीय. त्यात २०१५ मे मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे विवाह संस्थेचे भविष्य डळमळीत होतेय या शंकेला खतपाणी च मिळाले. इंदूर चा व्यापारी राजा रघुवंशी व सोनम रघुवंशी यांचं लग्न ११ मे २०२५ रोजी झाले आणि २० मे ला ते हनीमून साठी मेघालय येथे गेले.२३ मे ला ते नांगरेयाट गावातून बेपत्ता झाले. १ जून ला राजाचा मृतदेह वेई- सॉडोंग धबधब्याजवळ खोल दरीत सापडला. टॅटू वरून ओळख पटविण्यात आली. देहावर धारदार शास्त्राने वार केलेले आढळले. तेव्हापासून बेपत्ता असलेली सोनम ९ जून ला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका ढाब्यावर सापडली. तिने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. संपूर्ण जगाला या घटने मुळे हादरा बसला. पोलिसांनुसार, सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी लग्नाच्या आधीपासूनच म्हणजे फेब्रुवारी पासून राजा रघुवंशी च्या हत्येचा कट रचला होता. आणि त्याला मारायचा हा चौथा प्रयत्न होता. आधीच्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश आले नाही. या घटनेची पोलीसांनी ७९० पानी चार्जशीट दाखल केली आहे. २३ जुलै २०२६ ला सुप्रिम कोर्टाने सोनम ची जमानत रद्द केली आहे. व ३ आठवड्यांच्या आत कोर्टासमोर सरेंडर करण्याचा आदेश दिला आहे.
ही घटना कशीबशी पचत नाही तोच केतन विशाल अग्रवाल , सक्सेस गृप या रिअल इस्टेट कंपनीचा संचालक याचा १८ जून २० १६ ला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून करण्यात आला. केतन आणि सिया गोयल यांचा साखरपुडा फेब्रुवारी २०२६ मध्ये झाला होता व जयपूर येथे नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होते. पण सियाचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी मेघालयातील 'ऑपरेशन हनीमून' घटनेचा सखोल अभ्यास केला. खूनावर आधारित चित्रपट, पाॅडकास्ट बघितले. मे अखेरीस लोणावळ्यात टायगर पॉईंट सह अनेक ठिकाणची रेकी केली. आणि जेथे सीसीटीव्ही नाही अशी जागा म्हणजे लोहगड. इथे आधीही एक महिला पडून मरण पावली होती. ३१ मे आणि १४ जून रोजी दोन वेळा सियाने केतनला लोहगडावर नेऊन ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. पण शेवटी १८ जून ला सिया या हत्येत यशस्वी झाली. सध्या सिया, चेतन आणि त्याचा मित्र हे तिघेही आरोपी येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. ५०५३ पानांचे आरोपपत्र पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केले आहे.
या दोन घटनांमुळे केवळ दोन होतकरू तरुणांची हत्या झाली नसून विवाह संस्थेतील पावित्र्याची, निष्ठेची, विश्वासाची, नात्यातल्या संवादाची, प्रामाणिकतेची हत्या झाली आहे. सोनम आणि सिया यांच्या क्रौर्याची कमाल वाटते. आणि त्याहीपुढे जाऊन अशा घटनांची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? याची भिती वाटते. मुळात या मुलींना ठरविलेला जोडीदार नको होता तर त्यांनी नकाराधिकार का वापरला नाही? त्याउलट सरळ हत्येचा पर्याय स्वीकारला? याचा अर्थ त्यांचा कुटुंबाशी योग्य संवाद नव्हता किंवा कुटुंबाने त्यांच्यावर सक्ती केली असावी. पण तरीसुद्धा हत्येचे समर्थन होऊच शकत नाही. आणि ही हत्या भावनेच्या भरात, गरम डोक्याने केलेली नाही तर थंड डोक्याने नियोजन करून केलेली हिंसा आहे जी जास्त घातक आहे.असे गुन्हे करण्यासाठी धाडस, क्रौर्य, सूडभावना, हिंसक वृत्ति लागते. या पाशवी भावना स्त्रियांमध्ये क्वचित आढळतात. त्यामुळे विवाह संस्थेचे भविष्य काय? पती -पत्नीच्या नात्यातली निष्ठा, बांधिलकी, विश्वास लोप पावत चालला काय? असे अनेक प्रश्नचिन्ह समोर उभे राहिले आहेत .
पण NCRB (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) चा २०२४ चा अधिकृत डेटा सांगतो की वर्षभरात ५ ७३७ हुंडाबळी नोंदवले गेलेत. यात २०३ ८ मृत्यू उत्तरप्रदेशात झाले आहेत तर १० ७ ८ मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत.२०२३ मध्ये हाच हुंडाबळी चा आकडा ६४ ५० होता. विवाहा नंतर पत्नीचा छळ, हत्या, अत्याचार, हिंसाचार असे अनेक पाशवी प्रकार दरवर्षी घडतात . जितके समाजासमोर उघड झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त अत्याचार प्रकाशात आलेले नाहीत. वर्षानुवर्षे जास्तीत जास्त हिंसाचार पुरुषांनी स्त्रीवर केले आहेत. मग स्त्रियांनी केलेल्या आणि पुरुषांनी केलेल्या हिंसाचाराचे मापदंड वेगळे लावायचे का? दोन स्रियांनी हत्या केल्याबरोबर विवाह संस्था विसविशीत झाली का? कितीही हिंसाचार, अत्याचार झाले तरी विवाह टिकवून ठेवणा-यांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. कोणताही हिंसाचार असो, पुरुषाने अथवा स्त्रीने केला असो - तो समर्थनीय नाहीच. पण त्यामुळे परंपरागत रुजलेल्या विवाह संस्थेला बाधा येऊ शकत नाही. मात्र त्यामध्ये लक्षणीय बदल झाले हे नक्की.
आता विवाह संस्थेतील हे बदल नेमके कशामुळे झाले?
पहिला मुद्दा म्हणजे विवाहानंतर आर्थिक स्थैर्य व पुरुषाचा हक्काचा आधार मिळतो ही जुनाट संकल्पना झाली. आज मुली आर्थिकरित्या स्वतंत्र आहेत तसेच त्या एकटेपणाचा इतका बाऊ करित नाही उलटपक्षी त्यामुळे स्वातंत्र्य जपले जाते जे त्यांना गरजेचे वाटते.
दुसरा मुद्दा म्हणजे विवाहानंतर लैंगिक सुखाची सोय होते. या सोवळ्या कल्पना आता अस्तित्वात नाहीत. याऊलट विवाहा पूर्वी लैंगिक सुखाचा अनुभव नसलेली व्यक्ति कमालीची मागासलेली असते असा समज आहे. याला समाजमान्यता नसली तरी असे प्रकार सर्रास चालतात.
तिसरा मुद्दा म्हणजे कुटुंब नियोजनाची अद्ययावत साधने उपलब्ध असल्यामुळे सुरक्षित संबंध ठेवण्यात काहीच अडचण येत नाही व गर्भधारणेचीही भिती नसते.
चवथा मुद्दा म्हणजे विवाह विषयक कायदे , लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसा
या बाबतीत कायदा व पोलीस यांचे संरक्षण मिळण्याची सोय यामुळे महिलांमध्ये निर्भयता निर्माण होण्यास मदत होते.
पाचवा मुद्दा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. या प्रकाराला व्यापक स्तरावर सामाजिक मान्यता नसली तरी आता यावर चर्चा होऊ लागल्या आहेत.
सहावा मुद्दा म्हणजे घटस्फोट हा पर्याय. सामाजिक नियंत्रणाचा दबाव कमी झाल्याने, घटस्फोटितांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अधिक सौम्य व उदार झाला आहे. विवाहबंधनाकडे धार्मिक भावनेतून पाहिले न जाता केवळ एक सामाजिक करार म्हणून पाहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने घटस्फोटावर धर्माचे नियंत्रण उरलेले नाही.
तसेच न्यायसंस्थेच्या घटस्फोटाबाबतच्या उदार दृष्टिकोणामुळे घटस्फोट घेणे ही बाब आता अधिक सुलभ झाली आहे. परस्परसंमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे. पूर्वी घटस्फोट घेणारांना जसे सामाजिक टीकेस तोंड द्यावे लागत होते, तशी परिस्थिती आता आधुनिक समाजात राहिलेली नाही.
सहावा मुद्दा म्हणजे ज्याप्रमाणे लैंगिक सुखासाठी विवाहाची गरज वाटत नाही तसेच मातृत्वासाठीही नाही. असिस्टेड रिप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी नुसार कोणतीही सज्ञान अविवाहित स्त्री डोनर स्पर्मच्या मदतीने आयव्हीएफ किंवा आययुआय पध्दतीने जैविक माता बनू शकते. ११ ते ५० वयोगटातील स्त्रिया याचा लाभ घेऊ शकतात. मुलाच्या जन्मदाखल्यावर फक्त आईचेच नाव असते. हा कायदेशीर पर्याय आहे. अनेक अविवाहित स्त्रियांनी याचा लाभ घेऊन मातृत्वाची इच्छा पूर्ण केली आहे. याशिवाय मूल दत्तक घेण्याचा दुसरा पर्यायही उपलब्ध आहे.
विवाह संस्थेतील हे बदल काही अनुकूल आहेत तर काही सैल आहेत. त्यामुळे विवाह संस्थेसमोर आज नक्कीच काही आव्हाने आहेत.
-परफेक्ट पार्टनर, परफेक्ट लाईफ आणि परफेक्ट चाईल्ड या अवाजवी अपेक्षा आजच्या मुलांच्या आहेत, ज्या योग्य नाहीत.
-लिव्ह इन आणि घटस्फोट हे पर्याय खुले आहेत, जे हवे तसे वापरले जातात.
- अपत्य जन्माचा दर अतिशय खालावला आहे. ' मूल नको' हा निर्णय भविष्यावर प्रतिकूल परिणाम करणारा आहे. आणि ही आव्हाने काळा बरोबर वाढत जाणारी आहेत.
पण असे असले तरी माणसाची सोबतीची गरज संपलेली नाही. हक्काची व्यक्ति, भावनिक सुरक्षितता आणि कुटुंबाची ऊब या गोष्टी भौतिक समृद्धीतून मिळत नाहीत. आजच्या आभासी जगात मानवी स्पर्श, संवेदना, नात्यांचे बंध, जिव्हाळा या सुखाची अनुभूती कुटुंबामुळेच होते. अनेक संवेदनशील तरुण आजही जाणीवपूर्वक एकत्र आयुष्य घडविताना दिसतात. मुळात सामंजस्य, संयम, सहनशीलता, आदरभाव हे मानसिक भाव कधीही न बदलणारे आहेत आणि तेच या विवाह संस्थेचा पाया आहेत. बाकी बाह्य बदल हे परिस्थितीनुसार घडतात. शेवटी संस्कृति ही प्रवाही असते. बदल हा तिचा नित्य स्वभाव असतो. सांस्कृतिक नीतिमुल्ये ही कालसापेक्ष असतात. त्यामुळे विवाह संस्थेतली नैतिक- अनैतिकता ही कालसापेक्ष आहे. विवाह संस्थेत काळानुरूप अनुकुल बदल झाले म्हणूनच ती आज जिवंत आहे. समाजाचा पाया कुटुंब आहे आणि कुटुंबाचा पाया विवाह संस्था आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्यामुळे विवाहसंस्था टिकणार आहे हे निश्चित आणि ती पती आणि पत्नी यांच्या समसत्ताक पद्धतीनेच. 'धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि ' हे सिध्द करण्याची हीच वेळ आहे अशी आपण आशा ठेवूया.

विवाह संस्था तकलादू झालेली नाही आता तरुणांच्या विचार आणि आकलनात वैपुल्याने व्यापकता आलेली आहे त्यामुळे विवाहाच्या संदर्भातले निर्णय आता ते घेऊ लागले आहेत .
ReplyDeleteउत्कृष्ट लिखाण. विवाह संस्थेवरील आपला अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.
ReplyDelete