जेन- झीचं आंदोलन हा सध्याचा ज्वलंत विषय. या विषयावर समस्त संबंधित - असंबंधित लोकांनी यथेच्छ प्रतिक्रिया दिल्या.काहींनी खूप कौतुक केलं तर काहींनी त्यावर कोरडे ओढले. सर्वप्रथम हा लेख मी कोणत्याही राजकीय - पक्षीय भूमिकेतून लिहिलेला नाही हे जाहीर करते. (हो ना. चुकून कुणी वाचलाच आणि चुकून माझ्यावर कारवाई झाली तर आपली बाजू स्पष्ट असावी.)
तर झुरळ पक्षाचं मनापासून अभिनंदन.कशासाठी? तर पेपर फुटी प्रकरण आणि एकंदरीतच कोलमडलेल्या शिक्षण व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी, युवा पिढीने सरकारला जाब विचारावा ही काळाची गरज होती. त्यामुळे पक्षाच्या निर्मिती पासून, विद्यार्थी एकत्रीकरणा पासून, आंदोलनातील मागण्या पूर्ण होईपर्यंत जे काही लोकशाहीचं चित्र निर्माण झालेलं दिसलं ते खरोखरच फार आशादायक आहे. ज्या जेन झी ला आपण कोषात राहणारे, फेसबुक,इन्स्टाग्राम, ओटीटीच्या विश्वात रमणारे म्हणून हिणवतो त्यांनी अभूतपूर्व आंदोलनाचा इतिहास घडवला आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे युवा पिढीच्या या शक्तिप्रदर्शनानं एक दिलासा मिळाला आहे निश्चित. हा या आंदोलनाचा एक सकारात्मक पैलू.
आंदोलनाचा दुसरा पैलू हा विशेष आहे. अनेकांना या आंदोलनाची भुरळ पडली आहे. विद्यमान सरकारची झालेली कोंडी, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांसमोर झुकणारी सत्ता यांचंच काहींना अप्रूप वाटलं. समस्या कोणतीही असो, ' कशी जिरली'- हा मुद्दा त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा . आणि त्या विकृत आनंदानं गुदगुल्या होणारा एक वर्ग, जेन झी चे गोडवे गाताना हुरळून गेला आहे. विद्यमान सरकारला ‘अडचणीत आणणं’ हा एकमेव अजेंडा असलेला हा वर्ग आज खूप आनंदात आहे. नेमके प्रश्न कोणते? ते कशा पध्दतीने सोडवायचे? याविषयी त्यांना काहीही देणे घेणे नाही. सरकारला खिंडीत पकडणं हे एकमेव 'साध्य'. मग ते कुणी, केव्हा, कसेही करेना का. अशी ही झुरळां विषयी एका विशिष्ठ समाजाला भुरळ पडली आहे.आणि त्यांचे पुढचे काही दिवस तरी या आनंदाच्या धुंदीत जातील हे नक्की. तापल्या तव्यावर पोळी भाजणारा हा वर्ग. आयत्या चालून आलेल्या संधीचा फायदा घेऊन उंटावरून शेळ्या हाकणारे सध्या हर्षोल्हासात स्वतःची पाठ थोपटण्यात मग्न आहेत.आता या सरकारचे दिवस भरलेत या स्वप्नरंजनाची त्यांना भुरळ पडलीय.
तिसरा पैलू म्हणजे समाज माध्यमांची मदत . जेन - झी टेक्नोसॅव्ही असल्यामुळे आंदोलनातील प्रत्येक पायरीवरचे निर्णय हे क्षणार्धात तळागाळापर्यंत पोचत होते. त्यामुळे एकत्रीकरण, पाठिंबा (फॉलोअर्स) यासाठी पैसा आणि वेळ यांची कमालीची बचत झाली. तसंच प्रचारासाठी अनेक कल्पक पोस्ट्स, पोस्टर्स, मीम्स यांचा वापर करण्यात आला. यावरून जेन- झी ची सर्जनशीलता,बुद्धीमत्ता आणि प्रसंगी ए -आय चा केलेला उचित उपयोग प्रकर्षाने दिसून आला. योग्य प्रकारे समाज माध्यम हाताळल्यास, आंदोलनाच्या यशात समाज माध्यमांचा सिंहाचा वाटा आहे हे अर्थातच सिध्द झालं.
पण हे आंदोलन पुराण इथे संपत नाही. आंदोलनाची ही यशोगाथा ही केवळ एक बाजू आहे. लोकशाही जिवंत आहे हा दिलासा जरी यातून आपल्याला मिळाला तरी जेन - झी च्या अमर्याद स्वातंत्र्याचा एक कुरूप आणि हिडीस चेहरा समोर आल्यामुळे एक भीतीही निर्माण झाली आहे. जेन - झी ने ओकलेली गरळ ही समाज माध्यमाने तळागाळात पोचवली आहे. या गरळीचं समाजात समर्थनही केलं जात आहे. ही या पिढीची भाषा आहे, त्यात आक्रमकता असणारच असं समर्थक म्हणतात.काही आक्षेपार्ह कृत्येही आंदोलकांनी जंतरमंतर येथे केली. मुलंच ती. असं वागणारच. त्यावर नैतिकतेचे निकष लावू नये, असं समर्थकांचं म्हणणं आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाबतीत ही युवा पिढी कोणतीही तडजोड करणार नाही - हा या आंदोलनातील एक महत्वाचा छुपा संदेश आपल्याला मिळाला आहे. जो एक दुर्लक्ष न करण्याचा पैलू आहे.
आजवर प्रत्येक पिढीची एक भाषा चालत आलेली आहे. प्रत्येक पिढीनं एक आक्रमक, जोषपूर्ण आणि मर्यादा उल्लंघून जाणारं स्वातंत्र्य उपभोगलं आहे हे ही खरंच. पण त्याही वेळी विवेक, संयम, नैतिकता, आदर, धाक यांची चौकट अस्तित्वात होती,भलेही ती काळानुरूप सैल होऊ घातली असेल. आजपर्यंत विद्यार्थ्यांची कितीतरी आंदोलनं झाली असतील.पण कधीही विवेक,संयम, आदरभावाची पातळी इतकी खालावली नव्हती. आतातर या शब्दांचा अर्थही जेन- झी ला माहित नाही. अपवादाने कुणाला माहित असेलच तर अशी वागणूक आता आऊटडेटेड झाली आहे अशी संभावना केली जाईल. पण विवेक, संयम, नैतिकता, कृतज्ञता, करुणा, त्याग, क्षमाशीलता, वात्सल्य हे उन्नत म्हणजेच निओकाॅर्टिकल गुण आहेत. ते पिढी दर पिढी तसेच राहणार आहेत आणि भविष्यातही तसेच असणार आहेत. हे गुण अंगी असलेल्या व्यक्तींना मागासलेले, संकुचित, जुनाट, बुरसटलेले असं म्हणण्याची हल्ली पद्धत आहे.पण असं म्हणणारे लोक भ्रमात आहेत, त्यांचा बुद्धीभेद झाला आहे हे माझं स्पष्ट मत आहे. काळानुरूप सगळ्याच बाबतीत बदल होत असले तरी योग्य ते नेहमीच योग्य असतं. मीम्स च्या माध्यमातून जेन झी ची जशी कल्पकता आणि बुद्धी दिसून आली त्याच बरोबरीनं हिडीस आणि विकृत वृत्तीही समोर आली. जी बघून जेन बुमरला भोवळ यायचीच बाकी होती. वडिलधारे असणा -या राज्यकर्त्यांच्या प्रतिमेचं अश्लील प्रकारे विडंबन करणारी आंदोलनातील रणनिती? रस्त्यावर त्यांची चित्रं काढून त्या चित्रांशी अश्लील चाळे करणारी सुसंस्कृतता? टोमणे, विखार, शिव्या, गलिच्छ घोषणा..... अशा युवा पिढीच्या हाती आपलं भविष्य आहे? जंतरमंतर वर अशा भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन झालं? अत्यंत घृणास्पद, शिवराळ अशी ही भाषा जेन - झीची आहे, हे कौतुकानं सांगितलं जातं. शाळेत शिकतांना अशीच भाषा शिकवली जाते का? भाषा आणि आचरण यांच्या योग्यतेचे निकष कधीच बदलणारे नाहीत.आणि नैतिकतेबद्दल हल्ली काही बोलायचंच नसतं. त्यामुळे भावना दुखावतात, अस्मिता डिवचली जाते आणि बोलणारा मूर्ख ठरविला जातो. ओटीटी वर सतत वाहणारा शिव्यांचा आणि अर्वाच्य शब्दांचा झरा अनुकरणीय नाही, हे या बुद्धिमान पिढीला समजत नसेल तर शिक्षणाचा उपयोग काय?
या आंदोलनात विजय मिळाला तरी जेन- झी चं हे बेभान आणि बेदरकार रूप अत्यंत भयावह आहे. आयुष्यात 'अनुभव' हा एक उत्तम गुरू असतो, जो वडिलधा-या मंडळीत असतो, भलेही त्यांना ऑनलाईन व्यवहार करता येत नसतील. या अनुभवांसमोर नम्र होण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम ची गरज नसते. अन्यायाविरुद्ध जरूर लढावं, सरकारला जाब ही विचारावा पण विवेकाची पातळी सोडू नये. आणि कितीही स्वतंत्र असलं तरी समाजात वावरतांना सभ्यतेचे काही संकेत असतात, ते जर या जेन झी नं पाळले नाहीत तर जी जनता सध्या त्यांचा उदो उदो करते आहे, तीच जनता त्यांना क्षणार्धात पायदळी तुडवेल. आपल्याला आंदोलनात यश मिळालं याचा आनंद मानायचा की आपला विकृत चेहेरा समाजासमोर आला आहे, याचं भान ठेवायचं - हे आता जेन - झी नंच ठरवायचं आहे कारण झेन - झी हुषार आहे.

