जेन- झीचं आंदोलन हा सध्याचा ज्वलंत विषय. या विषयावर समस्त संबंधित - असंबंधित लोकांनी यथेच्छ प्रतिक्रिया दिल्या.काहींनी खूप कौतुक केलं तर काहींनी त्यावर कोरडे ओढले. सर्वप्रथम हा लेख मी कोणत्याही राजकीय - पक्षीय भूमिकेतून लिहिलेला नाही हे जाहीर करते. (हो ना. चुकून कुणी वाचलाच आणि चुकून माझ्यावर कारवाई झाली तर आपली बाजू स्पष्ट असावी.)
तर झुरळ पक्षाचं मनापासून अभिनंदन.कशासाठी? तर पेपर फुटी प्रकरण आणि एकंदरीतच कोलमडलेल्या शिक्षण व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी, युवा पिढीने सरकारला जाब विचारावा ही काळाची गरज होती. त्यामुळे पक्षाच्या निर्मिती पासून, विद्यार्थी एकत्रीकरणा पासून, आंदोलनातील मागण्या पूर्ण होईपर्यंत जे काही लोकशाहीचं चित्र निर्माण झालेलं दिसलं ते खरोखरच फार आशादायक आहे. ज्या जेन झी ला आपण कोषात राहणारे, फेसबुक,इन्स्टाग्राम, ओटीटीच्या विश्वात रमणारे म्हणून हिणवतो त्यांनी अभूतपूर्व आंदोलनाचा इतिहास घडवला आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे युवा पिढीच्या या शक्तिप्रदर्शनानं एक दिलासा मिळाला आहे निश्चित. हा या आंदोलनाचा एक सकारात्मक पैलू.
आंदोलनाचा दुसरा पैलू हा विशेष आहे. अनेकांना या आंदोलनाची भुरळ पडली आहे. विद्यमान सरकारची झालेली कोंडी, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांसमोर झुकणारी सत्ता यांचंच काहींना अप्रूप वाटलं. समस्या कोणतीही असो, ' कशी जिरली'- हा मुद्दा त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा . आणि त्या विकृत आनंदानं गुदगुल्या होणारा एक वर्ग, जेन झी चे गोडवे गाताना हुरळून गेला आहे. विद्यमान सरकारला ‘अडचणीत आणणं’ हा एकमेव अजेंडा असलेला हा वर्ग आज खूप आनंदात आहे. नेमके प्रश्न कोणते? ते कशा पध्दतीने सोडवायचे? याविषयी त्यांना काहीही देणे घेणे नाही. सरकारला खिंडीत पकडणं हे एकमेव 'साध्य'. मग ते कुणी, केव्हा, कसेही करेना का. अशी ही झुरळां विषयी एका विशिष्ठ समाजाला भुरळ पडली आहे.आणि त्यांचे पुढचे काही दिवस तरी या आनंदाच्या धुंदीत जातील हे नक्की. तापल्या तव्यावर पोळी भाजणारा हा वर्ग. आयत्या चालून आलेल्या संधीचा फायदा घेऊन उंटावरून शेळ्या हाकणारे सध्या हर्षोल्हासात स्वतःची पाठ थोपटण्यात मग्न आहेत.आता या सरकारचे दिवस भरलेत या स्वप्नरंजनाची त्यांना भुरळ पडलीय.
तिसरा पैलू म्हणजे समाज माध्यमांची मदत . जेन - झी टेक्नोसॅव्ही असल्यामुळे आंदोलनातील प्रत्येक पायरीवरचे निर्णय हे क्षणार्धात तळागाळापर्यंत पोचत होते. त्यामुळे एकत्रीकरण, पाठिंबा (फॉलोअर्स) यासाठी पैसा आणि वेळ यांची कमालीची बचत झाली. तसंच प्रचारासाठी अनेक कल्पक पोस्ट्स, पोस्टर्स, मीम्स यांचा वापर करण्यात आला. यावरून जेन- झी ची सर्जनशीलता,बुद्धीमत्ता आणि प्रसंगी ए -आय चा केलेला उचित उपयोग प्रकर्षाने दिसून आला. योग्य प्रकारे समाज माध्यम हाताळल्यास, आंदोलनाच्या यशात समाज माध्यमांचा सिंहाचा वाटा आहे हे अर्थातच सिध्द झालं.
पण हे आंदोलन पुराण इथे संपत नाही. आंदोलनाची ही यशोगाथा ही केवळ एक बाजू आहे. लोकशाही जिवंत आहे हा दिलासा जरी यातून आपल्याला मिळाला तरी जेन - झी च्या अमर्याद स्वातंत्र्याचा एक कुरूप आणि हिडीस चेहरा समोर आल्यामुळे एक भीतीही निर्माण झाली आहे. जेन - झी ने ओकलेली गरळ ही समाज माध्यमाने तळागाळात पोचवली आहे. या गरळीचं समाजात समर्थनही केलं जात आहे. ही या पिढीची भाषा आहे, त्यात आक्रमकता असणारच असं समर्थक म्हणतात.काही आक्षेपार्ह कृत्येही आंदोलकांनी जंतरमंतर येथे केली. मुलंच ती. असं वागणारच. त्यावर नैतिकतेचे निकष लावू नये, असं समर्थकांचं म्हणणं आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाबतीत ही युवा पिढी कोणतीही तडजोड करणार नाही - हा या आंदोलनातील एक महत्वाचा छुपा संदेश आपल्याला मिळाला आहे. जो एक दुर्लक्ष न करण्याचा पैलू आहे.
आजवर प्रत्येक पिढीची एक भाषा चालत आलेली आहे. प्रत्येक पिढीनं एक आक्रमक, जोषपूर्ण आणि मर्यादा उल्लंघून जाणारं स्वातंत्र्य उपभोगलं आहे हे ही खरंच. पण त्याही वेळी विवेक, संयम, नैतिकता, आदर, धाक यांची चौकट अस्तित्वात होती,भलेही ती काळानुरूप सैल होऊ घातली असेल. आजपर्यंत विद्यार्थ्यांची कितीतरी आंदोलनं झाली असतील.पण कधीही विवेक,संयम, आदरभावाची पातळी इतकी खालावली नव्हती. आतातर या शब्दांचा अर्थही जेन- झी ला माहित नाही. अपवादाने कुणाला माहित असेलच तर अशी वागणूक आता आऊटडेटेड झाली आहे अशी संभावना केली जाईल. पण विवेक, संयम, नैतिकता, कृतज्ञता, करुणा, त्याग, क्षमाशीलता, वात्सल्य हे उन्नत म्हणजेच निओकाॅर्टिकल गुण आहेत. ते पिढी दर पिढी तसेच राहणार आहेत आणि भविष्यातही तसेच असणार आहेत. हे गुण अंगी असलेल्या व्यक्तींना मागासलेले, संकुचित, जुनाट, बुरसटलेले असं म्हणण्याची हल्ली पद्धत आहे.पण असं म्हणणारे लोक भ्रमात आहेत, त्यांचा बुद्धीभेद झाला आहे हे माझं स्पष्ट मत आहे. काळानुरूप सगळ्याच बाबतीत बदल होत असले तरी योग्य ते नेहमीच योग्य असतं. मीम्स च्या माध्यमातून जेन झी ची जशी कल्पकता आणि बुद्धी दिसून आली त्याच बरोबरीनं हिडीस आणि विकृत वृत्तीही समोर आली. जी बघून जेन बुमरला भोवळ यायचीच बाकी होती. वडिलधारे असणा -या राज्यकर्त्यांच्या प्रतिमेचं अश्लील प्रकारे विडंबन करणारी आंदोलनातील रणनिती? रस्त्यावर त्यांची चित्रं काढून त्या चित्रांशी अश्लील चाळे करणारी सुसंस्कृतता? टोमणे, विखार, शिव्या, गलिच्छ घोषणा..... अशा युवा पिढीच्या हाती आपलं भविष्य आहे? जंतरमंतर वर अशा भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन झालं? अत्यंत घृणास्पद, शिवराळ अशी ही भाषा जेन - झीची आहे, हे कौतुकानं सांगितलं जातं. शाळेत शिकतांना अशीच भाषा शिकवली जाते का? भाषा आणि आचरण यांच्या योग्यतेचे निकष कधीच बदलणारे नाहीत.आणि नैतिकतेबद्दल हल्ली काही बोलायचंच नसतं. त्यामुळे भावना दुखावतात, अस्मिता डिवचली जाते आणि बोलणारा मूर्ख ठरविला जातो. ओटीटी वर सतत वाहणारा शिव्यांचा आणि अर्वाच्य शब्दांचा झरा अनुकरणीय नाही, हे या बुद्धिमान पिढीला समजत नसेल तर शिक्षणाचा उपयोग काय?
या आंदोलनात विजय मिळाला तरी जेन- झी चं हे बेभान आणि बेदरकार रूप अत्यंत भयावह आहे. आयुष्यात 'अनुभव' हा एक उत्तम गुरू असतो, जो वडिलधा-या मंडळीत असतो, भलेही त्यांना ऑनलाईन व्यवहार करता येत नसतील. या अनुभवांसमोर नम्र होण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम ची गरज नसते. अन्यायाविरुद्ध जरूर लढावं, सरकारला जाब ही विचारावा पण विवेकाची पातळी सोडू नये. आणि कितीही स्वतंत्र असलं तरी समाजात वावरतांना सभ्यतेचे काही संकेत असतात, ते जर या जेन झी नं पाळले नाहीत तर जी जनता सध्या त्यांचा उदो उदो करते आहे, तीच जनता त्यांना क्षणार्धात पायदळी तुडवेल. आपल्याला आंदोलनात यश मिळालं याचा आनंद मानायचा की आपला विकृत चेहेरा समाजासमोर आला आहे, याचं भान ठेवायचं - हे आता जेन - झी नंच ठरवायचं आहे कारण झेन - झी हुषार आहे.

Khupch chhan observation. Changlya ani vait donhi goshti jawalun pahayla milalya. Again kahi lokanvarun apan purna generation chi kalpana nahi karu shakat. Hopefully ajun hi khai GenZ s astil je neocortically respond karat astil. lets hope for the best and bright future of India.
ReplyDeleteया विषयावरचा इतका चांगला लेख मी पहिल्यांदाच वाचला, आणि खरं सांगायचं तर मला यातला शब्द न शब्द पटला .
ReplyDeleteसमर्पक , साधी सोपी मांडणी, अर्थपूर्ण शब्दांची निवड , आणि मनातल्या भावना कुठेही compromise न करता इतक्या सुंदर शब्दांत पोहोचवता येणं हे एका उत्तम वाचक, श्रोता , विचारवंत आणि लेखकालाच शक्य आहे ,जे आपण आहात. या विषयावर बोलण्याची खूप गरज होती , परिस्थती कुठलीही असो विवेक , विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि राहील .
आपल्या लेखणीतून अशीच श्रीविद्या बरसत राहो , आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळत राहो ,
याच सदिच्छासह......अनेक अनेक अभिनंदन आणि शुभेच्छा ! 💐✨
डॉ रेणुका बेदरकर
फारच समर्पक शब्दांत विचार मांडले आहेत. आंदोलनाचा इतकं परफेक्ट अनॅलिसिस कुणीही केलं नाहीये. जेन झी आणि त्यांच्या आधीच्या पिढ्या, दोघांचेही प्लस मायनस पाॅईंट्स अगदी योग्य लिहिले आहेत. हातातलं काम टाकून आधी तुझं लिखाण वाचते यातंच तुझ्या लिखाणाची ताकद आहे. अशीच सतत लिहीत राहा.
ReplyDeleteमाधवी सहजे
तटस्थ, वास्तववादी भूमिका या लेखातून प्रकर्षाने जाणवते
ReplyDeleteआणि सरकार व जेन झी या नाण्याच्या दोन बाजू असुन एका बाजूला बहुमताचा अहंकार तर दुसऱ्या बाजूला तारुण्याच्या उत्साहात होत असणारा प्रमाद आहे.
आता कौल समस्त जनतेला द्यायचा आहे. या दोघांवर ही नियंत्रण जनसामांन्यांचे
असले पाहिजे.
दोघांपैकी कोणा एकाच्याच हातात नियंत्रण गेले तर ते भविष्यातील अराजकतेची नांदी ठरेल असे आजतरी वाटते आहे.
Made appropriate observations about GenZ. Loved the concluding part.
ReplyDelete*जेन-झीला शिकवण्याआधी सत्तेला आरसा दाखवा*!
ReplyDeleteजेन-झीच्या आंदोलनावर लिहिताना त्यांच्या भाषेतील आक्रमकता, काही आंदोलकांचे असभ्य वर्तन आणि सोशल मीडियावरील कथित विकृती यावर बोट ठेवणे सोपे आहे. पण प्रश्न असा आहे की, आपण आंदोलनाच्या भाषेवर चर्चा करणार आहोत की आंदोलनाने उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नांवर?
पेपरफुटी, शिक्षणव्यवस्थेतील गोंधळ, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आणि प्रशासनाची उत्तरदायित्वाची कमतरता—हे प्रश्न अचानक निर्माण झालेले नाहीत. वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांना या व्यवस्थेचा फटका बसत असेल, तर त्यांचा संताप केवळ “जेन-झीची बेफिकिरी” म्हणून झटकून टाकणे हा त्यांच्या वेदनेचा अपमान आहे.
Crococh Partyचे आंदोलन याच अर्थाने महत्त्वाचे ठरते. एका प्रश्नाभोवती तरुण एकत्र येतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून संघटन उभे करतात, सत्तेला प्रश्न विचारतात आणि अखेर सरकारला आपली भूमिका बदलण्यास भाग पाडतात—ही लोकशाहीचीच प्रक्रिया आहे. आंदोलन करणाऱ्या तरुणांनी परिपूर्ण असले पाहिजे, ही अपेक्षा योग्य आहे; पण सत्ताधाऱ्यांनीही परिपूर्ण उत्तरदायित्व दाखवले पाहिजे, ही अपेक्षा त्याहून अधिक योग्य आहे.
आज विचित्र परिस्थिती अशी आहे की, तरुणांनी सरकारला प्रश्न विचारला की त्यांच्या भाषेची चर्चा सुरू होते; पण सरकारने वर्षानुवर्षे प्रश्न अनुत्तरित ठेवले तर त्याच्या प्रशासनाची भाषा कोण तपासणार?
तरुणांनी चुकीचे काही केले असेल तर त्यावर टीका झालीच पाहिजे. परंतु काही व्यक्तींच्या वर्तनावरून संपूर्ण पिढीला ‘विकृत’, ‘बेदरकार’ किंवा ‘नैतिकदृष्ट्या अधोगतीकडे गेलेली’ ठरवणे हा दुसरा अतिरेक आहे. जेन-झी ही फक्त मीम्स, इंस्टाग्राम आणि शिव्यांची पिढी नाही; ती प्रश्न विचारणारी, माहिती तपासणारी, तंत्रज्ञान हाताळणारी आणि सत्तेला थेट जाब विचारणारी पिढीही आहे.
आणि इथेच या चर्चेचा सर्वात मोठा विरोधाभास समोर येतो.
आपण तरुणांच्या आक्रमक भाषेवर नाराज होतो; पण राजकीय व्यासपीठांवर विरोधकांविषयी वापरली जाणारी भाषा, सोशल मीडियावरील ट्रोलिंग, व्यक्तिपूजा, द्वेष आणि अंधसमर्थन याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. नेत्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे, प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही किंवा विरोधक ठरवणे आणि सत्तेला आरसा दाखवणाऱ्याला शत्रू समजणे—ही कोणती लोकशाही?
आज समाजात एक विचित्र राजकीय मानसिकता तयार झाली आहे. “माझा नेता चुकू शकत नाही” आणि “माझ्या पक्षावर टीका म्हणजे माझ्यावर टीका”—या मानसिकतेने विवेकाची जागा घेतली आहे. ही अंधभक्ती कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नाही. सत्ता कोणाचीही असो, सत्तेला प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेचा आहे.
लोकशाहीत सरकार जिंकते म्हणून जनता हरत नाही आणि सरकारला आंदोलनामुळे माघार घ्यावी लागते म्हणून लोकशाही कमजोर होत नाही. उलट, जनतेच्या दबावामुळे सत्तेला निर्णय बदलावा लागतो, तेव्हा लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण दिसते.
म्हणून जेन-झीला नैतिकतेचे धडे देण्यापूर्वी आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत.
आपण सत्तेला प्रश्न विचारतो का?
आपल्या आवडत्या नेत्याची चूक मान्य करण्याची हिंमत आहे का?
विरोधी मत ऐकण्याची तयारी आहे का?
की राजकीय डोमिनेशनच्या सावलीत आपण स्वतःची विचारशक्ती गहाण ठेवली आहे?
जेन-झीने कदाचित काही ठिकाणी मर्यादा ओलांडल्या असतील. त्यावर टीका होऊ द्या. पण त्यांच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्या शैलीची चर्चा करू नका.
कारण इतिहासात बदल घडवणाऱ्या प्रत्येक पिढीला आधी “अतिरेकी”, “उद्धट”, “बेशिस्त” आणि “बंडखोर” अशी विशेषणे मिळाली आहेत.
आजच्या तरुणांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे—
“सत्ता मोठी असली तरी प्रश्न विचारणारी जनता त्याहून मोठी असते.”
आणि कदाचित या आंदोलनाचा सर्वात आशादायी पैलू हाच आहे.
तरुणांनी रस्त्यावर उतरावे की नाही, यापेक्षा त्यांनी का उतरावे लागू नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.
आंदोलनकर्त्यांच्या हातात फलक आहेत; पण सत्तेच्या हातात व्यवस्था आहे.
आंदोलनकर्त्यांकडे आवाज आहे; पण सरकारकडे निर्णयक्षमता आहे.
म्हणून जबाबदारीची तुला समान असू शकत नाही.
तरुणांच्या घोषणांवर ताशेरे ओढण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या.
जेन-झीला शिकवण्यापेक्षा सत्तेला ऐकण्याची सवय लावा.
आणि अंधभक्तीपेक्षा लोकशाही मोठी ठेवा.
कारण लोकशाहीची खरी कसोटी ही सत्ताधाऱ्यांचे कौतुक करण्यात नाही—
तर सत्ताधाऱ्यांना निर्भयपणे प्रश्न विचारण्याच्या अधिकारात आहे.
डॉ राजेश देशमुख
लेखक, दिग्दर्शक