मैत्री ते फ्रेंडशिप...एक उत्क्रांती
रंगीबेरंगी लोकर, मोती, मणी, घुंगरू इ. साहित्य माझ्या समोर ठेवत माझ्या नातीने आदेश दिला. तिचा आदेश धुडकावण्याची माझ्यात कुठे हिम्मत?
'ओके. किती बँड्स तयार करायचे?'
'तू वीस सिंपल बँड्स तयार कर. आणि पाच एकदम मस्त कर. माझ्या पाच बेस्ट फ्रेन्ड्स साठी.'
अर्थातच मी मान हलवली.
'ए आजी, तुला किती फ्रेंड्स आहेत ? शाळेत असताना तुम्ही असे बँड्स बांधायचे का ग?'
आता यावर नेहमीप्रमाणेच बौद्धिक आणि तात्विक उत्तर देण्यासाठी माझी जीभ उचलल्या गेलीच पण ती टाळ्याला लावण्याचा मोह प्रयत्नाने आवरला. कारण या पिढीला मुळात मराठी शब्दांचा अर्थच समजत नाही. त्यात बोधपर भाष्य म्हणजे सोऽऽऽऽ बोअरिंग. त्यांच्या उत्क्रांत मेंदूत असल्या जुनाट विचारांच्या प्रोसेसिंग चा प्रोग्रामच नाही त्याला ते तरी काय करणार? इथे मला आमचा बाळबोध कार्यक्रम (प्रोसेसिंग हो.) आठवतो. आम्ही थोरा मोठ्यांची वक्तव्ये आणि सुभाषिते एका डायरीत लिहून ठेवत असू. निबंधात, प्रसंगानुरूप आणि कधीमधी जगण्यातही त्यांचा उपयोग करित असू. आता लहानपणा पासून हा कार्यक्रम हार्डवायर्ड असल्याने तो कधीमधी उफाळून येतोच. डिलीट ही होत नाही मेला. पण हो.त्याचा कमीत कमी वापर करण्याचं कौशल्य मात्र मी आत्मसात केलंय.
मी शांतपणे म्हणाले,
'मला ना ? मला सात मैत्रिणी आहेत आणि त्या बँड बांधणाऱ्या नाही तर बंध जपणाऱ्या आहेत.' (अपेक्षेनुसार शेवटचं वाक्य अर्थातच 'व्होलटाईल'.)
'फक्त सात ? ममाला तर वन थाउजंड सिक्स्टी फाईव्ह फेसबुक फ्रेंड्स आहेत.'
पुन्हा एकदा जीभ वळवळली. पण संयमानं मी म्हणाले,
'हो गं, काही लोकांना तर फाईव्ह लॅक्स फ्रेंड्स असतात.'
'मी पण मोठी झाली की असेच खूप फ्रेंड्स जमवणार आहे आजी.'
तथास्तु!!! म्हणून मी विषय संपवला आणि लोकर सुया हातात घेतल्या.
महाभारतात एकदा युधिष्ठीर भीष्माचार्यांना आपल्या मनातल्या शंका विचारीत असतांना उत्तम मित्र कसे ओळखावे हा प्रश्न विचारतो. त्यावेळी सहार्थ, भजमान, सहज आणि कृत्रिम असे मित्रांचे चार प्रकार भीष्माचार्य त्याला सांगतात. सहार्थ म्हणजे ज्या मित्राला आपल्या कडून अपेक्षा असतात आणि ही मैत्री केवळ देवाणघेवाणी वर अवलंबून असते. भजमान म्हणजे कौटुंबिक नात्यांमधून निर्माण झालेली मैत्री. भावा- बहिणीची, नवरा - बायकोची, सासू - सुनेची, नणंद - भावजयीची, आई-मुलांची इ.इ. अशी नात्यापलिकडे असणारी मैत्री. ज्यात नात्यांचे बंध अधिक बळकट करण्याची क्षमता असते. तिसरी सहज मैत्री म्हणजे निरपेक्ष मैत्री. अगदी लहानपणापासून असणारी आणि आयुष्यभर निगुतीने जपलेली. या मैत्रीत एकमेकांची सुख -दुः ख, जय-पराजय, गुण-अवगुण, मान- अपमान, गुपितं... सगळं माहित असतं आणि कशानेही या मैत्रीत फरक पडत नाही. प्रेम, निरपेक्षता आणि जिव्हाळा व आधार हे या मैत्रीचे चार खांब. असे मित्र जितके जास्त, तितकी ती व्यक्ति जास्त श्रीमंत. त्यानंतर चवथी कृत्रिम मैत्री. म्हणजे मतलबी मैत्री. जोपर्यंत मतलब साध्य होत नाही तोपर्यंत मैत्री टिकवून ठेवायची. एकदा काम झालं की मग, 'तू कोण?' असं हे चार प्रकारचं मैत्र. भजमान आणि सहज मित्र मिळणं हे भाग्यच.
आता महाभारताच्या काळात फेसबुक नव्हतं म्हणून. नाहीतर भीष्माचार्य यांनी फेबु. मित्र--- नाही नाही. 'फेबु. फ्रेन्ड' हा पाचवा प्रकार नक्कीच सांगितला असता. पण बरं झालं फेसबुक नव्हतं त्याकाळी. नाहीतर आधीच प्रचंड गुंतागुंत असलेलं हे महाकाव्य आणखी अजूनच अवघड झालं असतं. शिवाय भीष्माचार्यां सारख्या महारथीला सुद्धा मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं कठीण झालं असतं.
असो. पण फेसबुक आणि इन्स्टाने ( मला येवढेच माहित आहेत ) मित्र आणि मैत्री यात प्रचंड उत्क्रांती घडवून आणली आहे. आता ती मित्र आणि मैत्री नसून 'फ्रेन्ड आणि फ्रेंडशिप' ही संकल्पना झालेली आहे. ही उत्क्रांती शारीरिक, मानसिक, वैचारिक, वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर झाली आहे. मुळात हा मैत्रीचा- नव्हे, फ्रेन्डशिपचा पाया 'विश्वचि माझे घर' या वैश्विक भूमिकेवर आणि विशाल मनोवृत्तीवर आधारित आहे. आयुष्यात ज्या व्यक्तिला कधी प्रत्यक्ष बघितलं नाही, जिच्या संबंधी काहीही माहिती नाही, जिचा अशा व्यक्तिला फ्रेंड म्हणून स्वीकारणं हे 'वसुधैव कुटुंबकम्' चं लक्षणच नाही काय? वय, लिंग, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक सीमा ,प्रतिष्ठा..... काहीही या फ्रेन्डशिप च्या आड येत नाही. सगळीकडे कसं फ्रेन्ड्ली वातावरण. ही फे.बु. फ्रेन्ड प्रजाती सध्या विलक्षण फोफावली आहे. कोविड विषाणू पेक्षा वेगाने 'व्हायरल' होणा-या या प्रजातीनं समस्त जनतेला ग्रासलं आहे. या फ्रेन्डशिपची लागण झालेले फ्रेन्ड्स सदैव लाईक्स, अंगठे, बदाम, जीआयएफ देण्यात एकतर व्यस्त असतात नाहीतर स्वतःला आलेले मोजण्यात व्यस्त असतात. यात गुणवत्ते पेक्षा संख्येला जास्त महत्व असतं. चुकून एखाद्याने विरोधाची भाषा केलीच तर त्याला 'अनफ्रेन्ड ' करण्याचं वैशिष्ट्यही या उत्क्रांत फ्रेन्डशिप मध्ये आहे. किंबहुना एखाद्याला प्रसिध्दी च्या शिखरावर पोचवण्याची किंवा पायदळी तुडवण्याची क्षमता या उत्क्रांती मुळे निर्माण झाली आहे. प्रामाणिक प्रतिक्रिया ही कितीही कुचकट असो पण कौतुक, अभिनंदन, आनंद व्यक्त करण्याचा मनाचा मोठेपणा या प्रजातीत आवर्जून आढळतो. आता तर घराघरातल्या नातेवाईकांनीही फ्रेन्डशिप स्वीकारली आहे ज्यामुळे नावडते नातेसंबंधही दृढ झाले आहेत. शिवाय घरात एकाच ठिकाणी बसून (किंबहुना त्यामुळेच) ही फ्रेन्डशिप निभावता येत असल्याने वेळ, पैसा, यातायात यांची बचत आणि ऊर्जा, पर्यावरण यांचं संरक्षण या महत्वाच्या उपलब्धी या उत्क्रांति मुळे साध्य झाल्या आहेत . महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्ति मध्ये असलेल्या (मुळात नसलेल्या) कला गुणांच्या प्रदर्शनाची आवड या फ्रेंड्स प्रजातीत प्रामुख्याने आढळून येते. आणि मग यातून स्पर्धा, ईर्षा, मत्सर कुरघोडी हे गुण ? वाढीला लागले आहेत.
पण असं असलं तरी अजूनही काही अति चिवट मित्रजातीने (फ्रेंड्स नाही)या उत्क्रांति समोर शरणागती पत्करलेली नाही. आभासी दुनियेतील फ्रेन्ड्सच्या झंझावातात या जातीनं आपली पाळंमुळं जपून ठेवली आहेत.
कुपथ निवारि सुपंथ चलावा।
गुन प्रगटै अवगुनन्हि दुरावा॥
देत लेत मन संक न धरई।
बल अनुमान सदा हित करई॥
श्रीरामचरितमानस यातील किष्किंधा कांडात गोस्वामी तुलसीदास यांनी उत्तम मित्राचे वर्णन केले आहे. वाईट मार्गाने जाणा-या मित्राला योग्य दिशेने वळविणारा, त्यांचे गुण प्रगट करून अवगुण झाकणारा, नि:शंकपणे देणारा व घेणारा तसेच आपल्या कुवतीनुसार मित्राचे सदैव हित जपणारा --असा आदर्श मित्र असतो.
पौराणिक काळातली कृष्ण - सुदामा यांची मैत्री ही सत्ताधीश व सामान्य व्यक्ति मधील भेद मिटवणारी आहे. शत्रूपक्षात असूनही राक्षसी त्रिजटेने सीतेच्या पाठीशी उभी राहून, तिला आधार देऊन आपल्या मैत्रीचा एक आदर्श निर्माण केला आहे . दुर्योधन- कर्णाच्या मैत्रीत कर्णाने दुर्योधनाच्या आचरणाला नाही तर मैत्रीला प्राधान्य दिले . अकबर बिरबलाची मैत्री ही धर्माच्या भिंती पेक्षा अभेद्य होती.बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय आणि बिपीन चंद्र पाल - अर्थातच' लाल बाल पाल' यांच्या राजकीय मैत्रीने ---( जी आज शोधूनही सापडत नाही ) घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते जे स्वराज्य बांधणीसाठी आवश्यक असे अस्त्र होते. अशी इतिहासातील कितीतरी उदाहरणं आपल्याला आढळतील.
शेवटी काय, आजच्या या अस्थिर, अस्वस्थ वर्तमानकाळात' मित्र' हा एक दिलासा, विसावा आहे तर वेगवान यांत्रिक युगात एकाकी पडलेल्यांसाठी आभासी जगातले ' फ्रेंडस' हा एक विरंगुळा आहे, निराश मनस्थिती वरचा एक उपाय आहे. तेव्हा' मित्र' असो की ' फ्रेन्ड्स ' या अनुक्रमे अतूट आणि तात्पुरत्या नात्यातून आनंद, सकारात्मकता आणि रचनात्मक लाभ घेणं हे आपल्याच हातात आहे आणि हीच काळाची गरज आहे.

👌👌🤝
ReplyDelete