Tuesday, October 11, 2022

आजच्या महानायकास ् ‌‌

 आजच्या महानायकास.......

प्रिय अमिताभ ‌........

  आज तुझा ८० वा वाढदिवस.काय बोलावं तुझ्याबद्दल? तसाही तुझा आणि 'वयाचा' काही संबंध आहे? 

आमची पिढी पंचविशीत असतांना पासूनच तू आमचा हीरो आहेस.

आज मी साठीत पदार्पण केलंय.

तुझे फोटो भिंतीवर लावणं,

तुझ्या सिनेमाच्या तिकीटासाठी तासनतास लाईनीत उभं राहणं,

तुझ्या सिनेमाची पारायणं (की आवर्तनं?) करणं,

तुझे डायलॉग्ज तोंडपाठ करणं,

तुझ्या अभिनयावर शंका घेणार्यांशी रक्त आटेपर्यंत वाद घालणं,

तुझ्या आजारपणात डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करणं.........हे सगळं आम्ही त्या वयात केलंय.

आता मात्र या कलाकारा पलिकडचा तू जास्त समजू लागला आहेस आणि अधिक भावू लागला आहेस.

केबीसी करताना समोरच्या स्पर्धकाचं बोलणं तू ज्या पद्धतीनं ऐकतोस ना, तिथेच तू जिंकतोस.हा अभिनय नाही हे सांगण्यासाठी तुझी नजर आणि तुझी देहबोली पुरेशी आहे.त्यावेळेस तुझ्या नजरेत काय नसतं? समोरच्या व्यक्तीबद्दल सन्मान, आत्मीयता, कौतुक, सुसंस्कृता, मिष्किलता आणि विलक्षण माणुसकी. तुझं आख्खं व्यक्तिमत्व तुझ्या डोळ्यात प्रतिबिंबित होत राहतं आणि आम्ही परत परत  अमिताभ नावाच्या,कमालीची उंची गाठलेल्या माणसाच्या प्रेमात पडत जातो.

तुझी ऊर्जा,तुझी सकारात्मकता, तुझं कामाप्रती समर्पण,तुझं सामाजिक भान हे सगळं अचंबित करणारं आहे आणि त्यामुळे तुझ्या अभिनयाला एक लखलखीत धार येऊ लागलीय.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व कोण? अर्थातच पुलं.

याच चालीवर भारताचे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे अमिताभ बच्चन- - -तुझंच नाव घ्यावंसं वाटतं.तुम्ही दोघंही असामान्य आणि एकमेवाद्वितीय कलाकार आहात , त्याबरोबरच "माणूस" म्हणून तुम्ही त्याहीपेक्षा अधिक मोठे आहात.सामान्य माणसाला पुलं अगदी जवळचे वाटतात तसा तू ही हल्ली जवळचा ,आपला माणूस वाटतो.आणि म्हणूनच हे लाडकेपण निर्माण होतं.

पुलंनी ज्या कलाकृती चं कौतुक केलं ती कलाकृती हमखास अमर होत असे.तुझंही तसंच आहे.मिडास राजासारखा हात लावशील त्याचं सोनं करित असतोस.

नायिकेवर प्रेम करावं ते तूच.

व्हिलनला चारीमुंड्या चीत करावं ते तूच.

केबीसी करावं ते तूच.

हरिवंशरायांच्या कविता  म्हणाव्या त्या तूच.

गुजरात ची जाहिरात करावी ती तूच.

पिकू मधला विक्षिप्त म्हातारा रंगवावा तो तूच.

शौचालयाची मिष्कील जाहिरात करावी ती तूच.

अलाहाबादी भाषा बोलावी ती तूच.

बिकाजी नमकीन ची जाहिरात करावी ती तूच.

आणखी काय आणि किती लिहावं?

अरे काय हे?

किती राज्य करशील आमच्या मनावर?

तुला पर्यायच नाही.

तुझा आवाज, तुझी देहबोली, तुझं बोलणं , तुझं प्रतिसाद देणं,तुझं काव्य वाचन,तुझं सगळंच मापदंडाच्या फुटपट्ट्या ठरलेल्या आहेत.

तू म्हटलेले पसायदान आणि ब्रम्हपुत्रेची आरती ऐकताना अक्षरशः कानात जीव गोळा होतो.

आमची पिढी भाग्यवान की आम्ही तुझ्या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार आहोत.

एक उच्च दर्जाचा आनंद देऊन तू आमचं सांस्कृतीक जीवन समृद्ध केलं आहेस.तुला उदंड, निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!


#अमिताभबच्चनवाढदिवस

#महानायकवाढदिवस

5 comments:

  1. अतिशय सुरेख वर्णन.. 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  2. (1)विजय दीनानाथ चौहान हे सामान्य नाव शांत व बेदरकारपणे उच्चारावे ते AB नेच (अग्निपथ)
    (2)मेरे हात मे जो रिव्हॉल्व्हर है उसमे छे गोली है , जो इतनी महेंगी नही ; जिसे चलाने के बाद मुझे कोई अफसोस हो हे थंड खुनशी नजरेने म्हणावे ते AB नेच (शक्ती)
    (3) तुम्हारा नाम क्या है बसंती हे मिश्किलपणाने म्हणणारा किंवा तिच्या मौसीला विरुचे(अव)गुण गंभीरतेने कथन करणारा जय (शोले)
    (4)मोहब्बते मधला शिस्तप्रिय कठोर मुख्य अध्यापक
    (5) बागबान मधील सेवानिवृत्त बँक अधिकारी ही डोळ्यात पाणी आणणारी भूमिका
    (6) दोस्ताना , याराना चित्रपटातील मैत्रीचे दर्शन
    असो की शराबी कालिया मधील विनोदी भूमिका किंवा दिवार नास्तिक मधील अँगरी यंग मॅन किंवा नमक हलाल मधील स्वामी भक्ती असो...
    कोणतीही भूमिका जणु काही त्याच्याच साठी लिहिली गेली आहे असे वाटायचे
    HAPPY BIRTHDAY BIG BEE

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...