Friday, August 6, 2021

दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.....


   


   काही व्यक्ति या केवळ व्यक्ति नसून त्या संस्था असतात. आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. श्री गजानन महाराज संस्थान आणि  श्री भाऊ यांना एकमेकांपासून वेगळं करताच येणार नाही. या उत्तुंग, आभाळाची उंची लाभलेल्या,  ऋषितुल्य  आणि कर्मयोगाची साक्षात व्याख्या असणाऱ्या  व्यक्तिचा मलाही एकदा जवळून अनुभव आलेला आहे. तो अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अमूल्य असा ऐवज आहे.आणि मला त्याचा अभिमान आहे.

    2006 साली आम्ही अकोला येथील काही समविचारी डॉक्टर मैत्रिणींनी  'निमा विमेन्स फोरम' या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. 2010 पर्यंतच्या चार वर्षात  महाराष्ट्रात निमा विमेन्स फोरमच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. 2010 साली मी महाराष्ट्र राज्य निमा  विमेन्स फोरमची अध्यक्ष होते. त्यावेळी विमेन्स फोरमची पहिली राज्यस्तरीय  परिषद घेण्याची कल्पना डोक्यात आली. हा प्रस्ताव आम्ही बुलढाणा येथील डॉ. गजानन पडघन यांच्या समोर ठेवला कारण तेव्हा डॉ पडघन महाराष्ट्र राज्य निमाचे अध्यक्ष होते .

'ही राज्यस्तरीय परिषद तुम्ही शेगावला घ्या'... डॉ.पडघन यांनी सुचवले.

 'शेगाव? शेगाव ला का??'

 'तिथे तयारी कशी करणार??'

 'तिथे आमची कुणाशी ओळख नाही.'

'अकोल्यात राहून शेगावला परिषदेचं आयोजन अशक्य आहे.'......हे प्रश्न  मनात होते .

 आमची टीम नकारावर ठाम होती.

  शेगाव संस्थान चे सर्वेसर्वा श्री शिवशंकर भाऊ पाटील डॉ. पडघन यांचे  निकटवर्तीय होते. श्री भाऊंच्या नियोजन कौशल्याची, कामाच्या  पद्धतीची, कामाच्या प्रचंड आवाक्याची डॉ. पडघन यांना कल्पना असल्यानेच त्यांनी शेगाव चा पर्याय आम्हाला सुचविला होता. शिवाय संपूर्ण राज्यातून जास्तीत जास्त प्रतिनिधी हे 'शेगाव ' या नावामुळेच येतील ही मात्र  सगळ्यांना खात्री होती. डॉ. पडघन यांनी  श्री भाऊंना सगळी पूर्वकल्पना आधी देऊन ठेवली आणि आमच्या टीमची श्री भाऊंसोबत मीटिंग ठरवली. श्री भाऊंबद्दल माहिती बरीच होती पण त्यांना कधी बघण्याचा योग आला नव्हता .

  आम्ही भाऊंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मनावर दडपण होतंच. अत्यंत साधं, मृदुभाषी, मितभाषी आणि विलक्षण आश्वासक व्यक्तिमत्व. त्यांच्यासमोर आम्ही परिषदेची कल्पना मांडत असतांना, ते ज्या पद्धतीने प्रतिसाद देत होते तेव्हाच  मनातले सगळे शंकेचे ढग निवळायला लागले होते. प्राथमिक बोलणी झाल्यावर आम्ही खर्चाचा विषय काढला.

'आधी परिषद होऊ द्या ,मग बघू.

बरं ,महाराजांचं दर्शन घेतलं का?

 निघताना श्री भाऊंनी विचारलं. 

'आत्ता घेणार आहोत. कारण आलो तेव्हा बरीच मोठी रांग होती'-आम्ही म्हटलं.

' यांना दर्शनाला घेऊन जा'. श्री भाऊंनी एका सेवेकर्याला सांगितलं. लगेच दोन सेवेकरी आमच्या जवळ आले आणि  म्हणाले,' चला माऊली '.

एका सेवेकर्याच्या हातात पूजेचं ताट होतं. त्यात फुलं, तुळशी, बेलपत्र, प्रसाद ,नारळ, उदबत्ती  हे सगळं अतिशय  कलात्मक पद्धतीने मांडलं होतं. आम्हा सर्वांसाठी ही खास दर्शनाची सोय म्हणजे ........आंधळा मागतो एक....अशीच होती. त्या दिवशी नमस्कार करतांना,  डोक्यात परिषदेची कल्पना,समोर श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि पाठीशी श्री भाऊंचा होकार ....येवढंच हाती होतं पण परिषद यशस्वी होणार याची खात्रीही होती.

    आनंद सागर विसावा येथे दुसऱ्या मजल्यावर चा हॉल आम्हाला परिषदेसाठी देण्यात आला. बाजूच्याच खोल्यांमध्ये प्रतिनिधींची राहण्याची सोय करण्यात येणार होती. आम्हाला श्री भाऊंनी हॉल आणि खोल्या दाखवल्या. आनंद सागर विसावा चे व्यवस्थापक श्री मोरघडे यांच्याशी आमची ओळख करून दिली.

 'तुम्हाला जे काय लागेल ते यांना सांगा आणि काहीही अडचण आली तर मला भेटा'- असं श्री भाऊंनी सांगितलं.

    झालं. आमची दर आठवड्यात शेगाव ची वारी, मोरघडेंं सोबत बैठक ,श्री महाराजांचे दर्शन आणि अगदीच आवश्यक असल्यास श्री भाऊंची भेट असं सत्र सुरू झालं. या सगळ्या सत्रांमध्ये एकच वैशिष्ट्य होतं. आमच्या गरजा आम्ही बारीक-सारीक तपशिलानुसार सांगायच्या आणि  मोरघडे यांनी  रजिस्टर मध्ये लिहून घ्यायच्या.

' नाही ','जमणार नाही', 'शक्य नाही', 'कशाला' 'काय गरज आहे' ,'पाहू' .....हे शब्द आम्ही कधीही,चुकूनही ऐकले नाहीत.

जेव्हा जेव्हा श्री भाऊंची भेट झाली तेव्हा त्यांना परिषदेच्या तयारीचा संपूर्ण तपशील माहित असायचा.आणि खर्चाचा विषय काढला की ठरलेलं उत्तर....

'बघू पुढे'.

     आम्हाला दिलेला हॉल पूर्ण रिकामा होता. परिषदेसाठी स्टेज आवश्यक होतं. धन्वंतरी पूजनासाठी, दीपप्रज्वलनासाठी, परिषदेचं सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी होती. 

त्यांचे सगळे तपशील मोरघडेंना द्यावे लागायचे. म्हणजे, 

उदा.स्टेज ची लांबी रुंदी उंची-

 स्टेजवरच्या खुर्च्यांची संख्या-

 मान्यवरांच्या सोफ्यांची संख्या- 

स्टेज आणि हॉलमधल्या खुर्च्यां मधील अंतर -

हॉलमध्ये खुर्च्या लावल्यावर वावरण्यासाठी मोकळ्या पॕसेजची लांबी रुंदी-

श्री धन्वंतरी आणि श्री गजानन महाराजांच्या फोटोंची लांबी रुंदी -- - -

 हे आणि अशाच कितीतरी बाबी बारकाईने विचारून तशीच्या तशीच त्वरित  अंमलबजावणी करायची - - ही श्री भाऊंची शिस्त आणि पद्धत आजपर्यंत कुठेही अनुभवली नव्हती. समस्त सेवेकर्यांमधील नम्रता आणि सांगितलेलं काम तत्परतेनं आणि चोखपणे करण्याचे श्री भाऊंचे संस्कार पदोपदी जाणवायचे.तिथल्या  स्वच्छतेच्या सवयींनी तर आम्हाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलं.

       परिषदेच्या  सगळ्या प्रतिनिधींना  शेगाव प्रसादालयातील नाश्ता आणि भोजन देण्याचं आधी ठरलं होतं. शेगावचा महाप्रसाद हा उत्तम चवीचा, उत्तम दर्जाचा असतो याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं. पण परिषदेच्या दृष्टीने हे जेवण अतिशय साधं होईल त्यामुळे बाहेरून केटरिंग सेवा घ्यायची का? असा सूर आमच्या  एका बैठकीत  निघाला. मोरघडे यांनी अर्थातच ' भाऊंना विचारून सांगतो'- हे उत्तर दिलं.खरं तर 'प्रसाद नको '- हे सांगणं खूप अवघड वाटत होतं पण मोरघडें समोर कशीबशी  ती हिम्मत केली.आता यावर श्री भाऊंची प्रतिक्रिया काय होईल,या कल्पनेनं जीव धास्तावला होता.शेगाव हून  आम्ही अकोल्यात पोचत नाही तोच मोरघडेंचा फोन आला.   

 'मॅडम,भाऊंशी बोलणं झालंय. प्रतिनिधींच्या भोजनासाठी आपण एक वेगळा हाॕल ठेवणार आहोत. बाहेरचं केटरिंग नको. संस्थान कडूनच भोजनाची आणि  नाश्त्याची व्यवस्था होईल .आणि त्यात हे पदार्थ राहतील.'

पदार्थांंची भली मोठी यादी ऐकताना मी स्वतःला चिमटा घेऊन पाहिला.आणखी वर मोरघडे विचारत होते,

'याशिवाय काही वेगळं लागेल का मॕडम?'

माझ्या तोंडून शब्द फुटणं अशक्य होतं त्यावेळी.

  परिषद चार दिवसांवर आली असताना आम्ही शेवटच्या तयारीसाठी शेगाव ला पोचलो. नेमका आनंद सागर विसावा  समोरचा रस्ता खोदून ठेवलेला होता. रस्त्याचं काम सुरू झालं होतं त्यामुळे आनंद सागर विसावा मध्ये समोरुन प्रवेश करणं शक्य नव्हतं. विसावा च्या मागच्या बाजूला जे फाटक आहे त्यातून रहदारी सुरु होती.  त्यासाठी गोल फिरुन जावं लागणार होतं.रस्त्याचं काम चार दिवसात आटोपणार नव्हतंच.दर्शनी प्रवेशद्वारावर आमचं मोठ्ठं बॕनर लागणार होतं, ते आम्ही मागच्या फाटकावर लावायचं ठरवलं. थोडा विरस झाला पण रस्त्याचं काम आमच्यासाठी का थांबावं?

 आम्ही वर हॉलमध्ये आलो.खुर्च्या लावल्या होत्या. एन्ट्री पासून स्टेज पर्यंत जाण्यासाठी हिरव्या किंवा लाल  मॕट्स टाकायला हव्या असं आमचं आपसात बोलणं सुरू होतं.संस्थानमध्ये अशा मॅट्स उपलब्ध  नसल्याने आम्ही तो विषय वाढवला नाही.

    परिषद 24 जानेवारी 2010 ला होती. 23 जानेवारीला आम्ही दुपारी आनंद सागर विसावा समोर आमची गाडी थांबवली आणि आमचे डोळे विस्फारले. रस्ता व्यवस्थित तयार झाला होता. हा रस्ता कुणाच्या आदेशाने इतक्या लवकर  तयार झाला असावा हे कोणी  सांगायची गरजच नव्हती. या धक्क्यातून सावरत सावरत  आम्ही हॉलवर पोचलो. तिथे खाली टाकलेल्या लाल मॕट्स आमचे स्वागत करायला सज्ज होत्या. आम्ही आणलेल्या  श्री धन्वंतरी आणि  श्री गजानन महाराजांच्या फोटोच्या आकारानुसार एक सुबक लोखंडी स्टॅन्ड कोपऱ्यात विराजमान होता. त्या स्टँडला समई ठेवायची जागा होती. आणि पूजेच्या इत्थंभूत साहित्याने सजलेलं एक तबक सुद्धा होतं. हे सगळं बघून आम्ही अक्षरशः  निशब्द झालो. क्षणभर पुढचं काही दिसेनासं झालं कारण डोळे भरून आले होते. 

     


परिषद कमालीची यशस्वी झाली. दोनशे प्रतिनिधींची अपेक्षा असताना हजार प्रतिनिधींनी हजेरी लावली. त्यानंतर अनेक ठिकाणी, अनेक नामवंत हॉटेल्समध्ये परिषदा झाल्या पण शेगावच्या परिषदेचा  अनुभव , त्यामागचं श्री भाऊंचं नियोजन आणि परफेक्शन, आपुलकी,स्वच्छता आणि श्रद्धेने संस्कारित प्रत्येक सेवेकरी.....याची सर  कोणालाच नाही. श्री गजानन महाराजांचा आशिर्वाद आणि श्री भाऊंचं पाठीशी असणं- - ही पुंजी  आजही आमच्या संघटनेला बळ देते आहे. आम्ही कोण, कुठली अनोळखी सामान्य माणसं. नुकतीच निर्माण झालेली आणि धडपडणारी आमची संघटना. का आम्हाला एवढी मदत करावी श्री भाऊंनी???अर्थात  डॉ पडघान यांचं यात 90 टक्के  श्रेय आहे.

      या परिषदेत आम्ही  श्री भाऊंना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली पण अर्थातच  त्यांनी  ते ऐकलं नाहीच. परिषदेत भाषण करताना मी एक वाक्य म्हटलं होतं.

     'श्री भाऊं सारख्या हिमालयाची उंची असलेल्या,  व्यक्तीचे आभार मांडण्याचा मी उद्धटपणा करणार नाही'- आणि  हे म्हणताना माझ्या घशात आवंढा दाटला होता. आता हे लिहितांना आजही माझी  तीच अवस्था आहे. 

श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्यातील देवत्वाचा एक चिमुकला कवडसा माझ्या ओंजळीत आला जो मी प्राणपणाने जतन करुन ठेवलाय. 

श्री भाऊंसारख्या नरश्रेष्ठाचा कधीच मृत्यू होत नसतो. ते आहेतच मंदिराच्या भिंती विटांमधे...,प्रत्येक सेवेकर्यांच्या आचरणामधे......श्री महाराजांच्या मूर्ती शेजारी



#शिवशंकरभाऊपाटील

#श्रीगजाननमहाराजसंस्थान

#शेगाव

21 comments:

  1. Apratim .Bhauchya karyala shatash:pranam

    ReplyDelete
  2. Bhau saheb yana shatshah pranam .Adaranjali.Apratim bhavna prakat kelya ahet mam .

    ReplyDelete
  3. श्री शिवशंकर भाऊ यांच्या भेटीचा किंवा दर्शनाचा योग कधी आला नाही, पण डॉ गजाननदादा पडघन यांच्या कडून त्यांच्या निस्सीम भक्तीची, असामान्य कार्याची , शिस्तीची , नियोजनाची व दूरदृष्टीची महती ऐकून होतो आणि एवढे सगळे असूनही प्रसिद्धी , मानसन्मान यांच्यापासून कोसो दूर राहणाऱ्या या व्रतस्थ कर्मयोगी महापुरूषाची आपण श्रध्दासुमनांनी गुंफलेले एक सुंदर शब्दांकन येथे व्यक्त केले आहे.....
    वंदनीय श्री शिवशंकर भाऊ यांच्या कार्यास नतमस्तक आदरांजली !!

    ReplyDelete
  4. ह्रदयस्पर्शी
    भाऊंच्या निरलस व्यक्तीमत्वाला नमन

    ReplyDelete
  5. फारच सुरेख अनुभव.

    ReplyDelete
  6. भावपूर्ण श्रध्दांजलि

    ReplyDelete
  7. सूरेख सचित्र विवरण

    ReplyDelete
  8. खूप सुंदर लेखनअनुभूती . भेटच घडवली भाऊंसोबत तुम्ही👌
    सोनल अं

    ReplyDelete
  9. अप्रतिम, खूप छान, सुंदर
    संपूर्ण जिवंत चित्रण आहे असेच वाटत.
    आपल्या लिखाणाला व भाऊंच्या स्मृतीला सलाम
    प्राची पाटील

    ReplyDelete
  10. Apratim. Sampurna likhanatun ch tyancha vyaktimatwa ubha kelay . Atishay yathartha warnan. Sunder ch

    ReplyDelete
  11. स्व.श्री.भाऊंचे जीवन म्हणजे कर्मयोग व भक्तियोगाचा सुरेख संगमच.स्व.भाऊ म्हणजे संत गजाननभक्तशिरोमणीच.
    त्यांचे श्रेष्ठत्वाची प्रत्यक्ष अनुभूती आपण भावपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे.

    ReplyDelete
  12. भावस्पर्शी मनोगत. स्व. शिवशंकरभाऊ नजरे समोर उभे केलेत. धन्यवाद.त्यांचे सोबत मी कुटुंबीयासमवेत जपलेले सुवर्ण क्षण हीच आमुची आज ऊर्जा आहे. जय श्रीराम!! जय हनुमान !! --- डॉ. दीनबंधु श्रीराम शेळके खामगांव

    ReplyDelete
  13. सुबोध लेखनाद्वारे आम्हाला सुध्दा दिव्यत्वाची प्रचीती दिली.
    स्व.भाऊंना विनम्र नमन

    ReplyDelete
  14. Jethe divyatvachi prachiti tethe kar maze multi.

    ReplyDelete
  15. Vachtana hi kanth datun aala madam... apratim vyaktimatva ani tumchi likhanshaili..

    ReplyDelete
  16. Very nice..I do remember some moments from that conference..they were incredible. माणसात ला देव म्हणतात,ते ह्यालाच!
    Neha Deshpande

    ReplyDelete
  17. फार सुंदर .. अप्रतीम .. भाऊंचे एक नवे रुप उलगडले

    ReplyDelete
  18. मी नुकतेच तुमच्या ब्लॉग वर वाचले. खूप छान, सहज लिहिले आहे.
    मला नेहमीच वाटते की ज्या व्यक्तींविषयी आपल्याला आदर किंवा प्रेम असतो त्यांच्या विषयी लिहितांना खूप त्रास होत नाही किंवा विचार करायची गरज नसते.
    तुमच्या लिहिण्यात हे जाणवते की तुम्ही खूपच सहज लिहिता.
    भाऊंच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. तूम्ही खूप छान पद्धतीने त्याचे विश्लेषण केले आहे.
    एकंदरीत लेख वाचतांना छान वाटले. तुमचे सहज सुंदर लेखना साठी अभिनंदन.
    भाऊंना विनम्र आदरांजली.
    नितीन बक्षी

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...