Sunday, December 20, 2020

एका सहभोजनाची गोष्ट ....

 परवा आमच्या जवळच्या एका कुटुंबाकडून त्यांच्या फार्म हाऊस वर एक दिवसाच्या गेट टुगेदर आणि  सहभोजना साठी निमंत्रण आलं. माझ्या अंगात उत्साह संचारला.त्यांच्या फार्महाऊसचं खूप  कौतुक ऐकलं होतं. तेवढंच  त्या कोरोनाच्या उदास वातावरणातून जरा बदल. नवऱ्याने नेहमीप्रमाणेच मीटींगचे कारण सांगून अंग काढून घेतलं आणि चिरंजीव? बाय डिफॉल्ट त्याला घरगुती कार्यक्रमात सहभागी होण्याचं अंगच नाही त्यामुळे सहभोजनाचं निमंत्रण त्याच्या मेंदूपर्यंत शिरण्याचा प्रश्नच नव्हता.

      मीच उत्साहाने तयार होऊन फार्महाऊसवर पोचले. एकदम प्रसन्न  वातावरण होतं. जुन्या धाटणीचं बैठं कौलारू, ऐसपैस घर. चारही बाजूंनी हिरवीगार शेती. बाजूलाच पेरू, लिंबू, आंब्याचा मळा. झाडाला टांगलेले झोके. लहान मुलांसाठी घसरगुंडी , सीसॉ.चुलीवर सुरू असलेला अस्सल गावरान स्वयंपाक. आहाहा..........

 पण मला कोणाची चाहूल लागत नव्हती. मी वेळेआधीच पोचले की काय???

हळूच  घरात शिरले. निमंत्रित मध्यमवयीन मंडळी होम थिएटर वर "चंद्र आहे साक्षीला" सोबत अक्षरशः समाधी अवस्थेत पोचली होती कारण  मी आल्याचं कुणाला  कळलंही नाही.

    दिवसाढवळ्या, निसर्गरम्य वातावरणात,फार्महाऊसच्या घरात बसून त्या  चंद्राला साक्षीला घ्यायचं काय प्रयोजन???

    मी तिथून काढता पाय घेतला आणि मागच्या व्हरांड्यात पोचले.तिथे  अर्ध्या चड्ड्या घातलेल्या, केस विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या, आजूबाजूचं भान नसलेल्या तरुण मुला मुलींचा ग्रुप दिसला. यातील प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपल्या आयुधांसह - (मोबाईल,टॕब, लॅपटॉप - - -सह) (समाधीच्याही  पुढची अवस्था असते का हो???) - परग्रहावर पोचलेला........

  नाही म्हणायला होस्ट जोडपं जोडपं जागृतावस्थेत असल्यामुळे माझा त्यांच्याशी खराखुरा संवाद झाला.ते कामात असल्याने मी  बाहेर आले.मोकळेपणानं  हिंडले. झाडापानांचा गंध शरीरातल्या रंध्रारंध्रात ओढून घेतला. कुणाचं लक्ष नाही हे बघून, माझं वय विसरून, मी  झोक्यावर मनसोक्त  खेळून  घेतलं.

  दरम्यान चंद्राची साक्ष संपल्याने समाधी अवस्थेतली मंडळी आता भौतिक  जगात परतली असतील म्हणून त्यांच्यात जाऊन बसले. त्यापैकी एका आजीकडून "सांग तू आहेस का"चे  तब्बल तीन एपिसोड्स न बघण्याचा घोर अपराध घडला होता त्यामुळे इतर मंडळींकडून ती ष्टोरी ऐकून त्यांचं पापक्षालन सुरू होतं.

" तू नक्कीच नाही यात"- - असं मी मला स्वतःला सांगून परत बाहेर आले .आता तर डोकं फिरलेल्या अवस्थेत , तिरीमिरीत , मी याही वयात (वय वर्षे साठ) घसरगुंडी खेळायचाही निश्चय केला. (अर्थात त्याबद्दल तपशीलवार पुढे कधीतरी .......)  त्यानंतर स्वयंपाक करणाऱ्या बायकांशी  गप्पा-टप्पा करुन हातावरच्या भाकरी करण्याचा अयशस्वी प्रयत्नही करुन झाला .

आता मात्र  सगळी मंडळी भूतलावर परतली होती आणि पाय मोकळे करायला बाहेर आली. मला जरा हुरूप आला.आता गेट टुगेदर घडण्याची आशा निर्माण झाली. पण हाय रे माझ्या कर्मा!!! आता फोटोसेशन सुरू झालं. एका लाईनीत, उंचीप्रमाणे,सगळ्यांनी बाजूच्यांच्या डाव्या खांद्यावर हात ठेवलेले, सगळे पाठमोरे,पण उजवीकडे मान वळवलेले, पायऱ्यांवर एकाखाली एक बसलेले .......अशा हल्लीच्या सगळ्या प्रचलित पोझेस मध्ये यथासांग फोटो झाले. नंतर ड्रेस बदलून हिरव्या रंगात मंडळी अवतीर्ण झाली. मी हिरवा ड्रेस आणला नसल्यामुळे माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक बघूनही झालं. एकंदरीत फोटोंचा तो राष्ट्रीय कार्यक्रम एकदाचा संपला.

   आता मात्र खूप भूक लागली होती .चुलीवरचा तो गावरान मेनू नाकाला, जिभेला, आणि पोटाला खुणावत होता. गर्द वनराईत मस्त भोजनाची व्यवस्था केली होती. आता निवांत हादडायचं या उद्देशाने मी सरसावले......

तितक्यात ....

 फुगलेल्या भाकरीचा, भरलेल्या वांग्याचा,कांदाभजींचा,  झणझणीत रश्शाचा, केशरी चकचकीत जिलब्यांचा,पापडांचा क्लोज-अप घेण्यासाठी आता तरुण मंडळी सरसावली होती. आता हे पुढ्यातलं सुग्रास अन्न खाऊ ,की या फोटोग्राफर मंडळींना "खाऊ कि गिळू "असा माझा नुसता तिळपापड होत होता. शेवटी पुन्हा  फोटोंचा राष्ट्रीय  कार्यक्रम संपल्यानंतर भोजन सुरू झालं.

 चार घास पोटात गेल्यावर मध्यमवयीन लोकांचा थोडाफार तरी - औपचारिक का होईना पण  संवाद सुरू झाला.

 पण तरुण मंडळी??? जितक्या इंटरेस्ट घेऊन त्यांनी पदार्थाचे फोटो काढले, तितक्याच नीरसतेनं ते समोरचं अन्न चिवडत होते. साक्षात  रुचकर अन्नब्रह्म समोर असतानाही त्यांचं आभासी ब्रम्हांडाशी असलेलं अद्वैत तुटलं  नव्हतं . इतक्या लहान वयात, "सुखदुःखे समे कृत्वा, लाभलाभौ  जयाजयौ" प्रत पोचलेली ही मंडळी बघून मला धन्य धन्य  वाटलं. भाकरी, भजी, रश्शाच्या  सुग्रास चवी पलीकडे जाऊन व्हर्च्युअल जगात गुडूप झालेल्या या तरुणाईचा  आनंद नक्की कशात असावा हा प्रश्न मला छळू लागला. तसंच माझ्यामोरच्या मध्यमवयीन मंडळींना, निसर्गाच्या सान्निध्यातही  टीव्ही सिरीयल आणि सोशल मीडियावर टाकायच्या फोटोंचं इतकं महत्त्व असावं???? 

     त्यांचाही आनंद नक्की कशात  असावा?

   असो. मी मात्र माझा झोक्यावरचा आणि घसरगुंडीवर खेळण्याचा(?) चिमुटभर आनंद मात्र उरी पोटी जपून घरी घेऊन आले.



#गेटटुगेदर

#फार्महाऊस

#सहभोजन

#आनंद

26 comments:

  1. वास्तवाचे यथार्थ वर्णन,
    विचार करण्यालयाक गंभीर परिस्थिती.
    आज खरोखर अशीच परिस्थिती आहे. मोबाईल ने सर्वानाच इतके अडिक्ट केले आहे की निसर्गाचा निखळ आनंद न घेण्याचा करंटेपणा आपल्यात आला आहे. तीच गोष्ट सिनियर मंडळींची,पण भुक्कड टी. व्ही सिरीयल बाबत झाली आहे

    ReplyDelete
  2. खरय मॅडम
    सुरेख शब्दांकन

    ReplyDelete
  3. अगदी यथार्थ वर्णन!तुमची लिखाण शैली अप्रतिम आहे !हसत खेळत हृदयाला भिडणारी आणि विचार करायला लावणारी !!

    ReplyDelete
  4. यथार्थ च लिहिलेय.असे खरच घडतं न.as if virtual world exists parallaly.mastach likhan👌👌
    Sonal

    ReplyDelete
  5. सत्यपरिस्थिती यथार्थ वर्णन.

    ReplyDelete
  6. आजच्या काळातील वास्तविकतेचे उत्कृष्ट वर्णन केलं आहे .मस्त

    ReplyDelete
  7. आजच्या वासतवाचं यथार्थ वर्णन. मस्त. कुठल्याही सहलीच्या ठिकाणी हीच परिस्थिती असते, तरूण तर तरूण पण मध्यम वतीन लोक सुध्दा सेल्फीच्या नादात वातावरणाचा निखळ आनंद न घेता, स्वतःसाठी न जगता लोकांना दाखवण्यासाठी आणि दिसण्यासाठी जगतात हे दुदैर्वी.अशा लेखणीद्वारे मनोगत व्यक्त केल्यामुळे थोडाफार फरक पडावा ही अपेक्षा.

    ReplyDelete
  8. चारूदत्त सहजे

    ReplyDelete
  9. Haha...so true!!! Yet very sad 🥺

    ReplyDelete
  10. मस्त लिहिलं आहे आणि वास्तविकता आहे ही की एकत्र सगळे जमलो असलो तरी त्या निर्जीव वस्तूत लोकांचं जास्त लक्ष असतं..

    ReplyDelete
  11. गेट टुगेदर कसं करू नये किंवा होऊ नये याचा वस्तुपाठ,अर्थात ते समजून घेण्यासाठी भान असणे गरजेचे.छान लिखाण. अभिनंदन.- राजेंद्र मेंडकी

    ReplyDelete
  12. हेच चित्र सगळीकडे पाहायला मिळते तरुण पिढीला तर निसर्ग काय आहे हेच माहिती नाही आणि माहिती करूनही घ्यायच नाही पण आपलीही पिढी रंग बदललेली पाहून आश्चर्य वाटते.
    खुप छान लिहिले आहे मॅडम ����

    ReplyDelete
  13. Nice
    Sundar likhan
    Khup aawdle mam .asech lihit ja

    ReplyDelete
  14. लय भारी लिखाण
    लय आवडलं
    यातून माणसं काही शिकतील असे वाटते

    ReplyDelete
  15. फार्म हाउस ला जाऊन आल्या सारखंच वाटलं। परफेक्ट वर्णन। दुर्दैव आहे आपलं। सत्य परिस्थिती फार नेमक्या शब्दात मांडली। नेहमी प्रमाणे अप्रतिम लिखाण। 👏👏👍
    माधवी सहजे

    ReplyDelete
  16. खूप छान. आपल्या पिढीतील आनंद नवीन पिढीला अनुभवता येत नाही. ती पिढी आपल्या वयाची झाल्यावर कदाचित येईल अशी आशा ठेवावी.🙏

    ReplyDelete
  17. आता गेट टुगेदर एक फॅशन झाल्यासारखं झालय त्याच यथार्थ वर्णन केलंय,
    प्रत्यक्ष बोलण होत नाही आणि खुप दिवस भेट नाही म्हणून मनातल्या गप्पा करण्यासाठी आणि मन मोकळं झाल्यावर मग वय विसरून मस्त आनंद घेण्यासाठी ,जमावे.
    पण प्रत्येकाचे विचार वेगळे,आपण काय करणार.
    तु महत्वाच्या विषयाला हात घातलास आणि नेहमीप्रमाणे भान ठेऊन विषय मांडला.

    ReplyDelete
  18. मस्तच नोंद घेतलीय वास्तवाची. लोक शरीराने जवळ आणि मनाने दूर असतात आताशा. सगळ्याचा इन्व्हेन्ट करून टाकतात. महत्वाचा विषय आहे हा.

    ReplyDelete
  19. मॅडम आपण नेहमीच मनाला भिडणारं आणि मेंदूला विचार करायला लावणार लिहिता...आभासी दुनियेत कायम स्वतःला खुष मानणारी आजची बहुतांशी तरुण पिढी..आणि दिखावूपणानं स्वतःचीच फसवणूक करणारी अनुभवी (समजणारे) पिढीचे यथार्थ वर्णन केले आहे आपण....सुज्ञ आणि खरच सुशिक्षित वर्गाने आपल्या पासुन सुरुवात केली या जोखडातुन स्वतःला दूर ठेवण्याची तर हळुहळु ही परिस्थिती सुधारेल हे नक्की 🙏🙏😊

    ReplyDelete
    Replies
    1. डाॅ.स्वप्ना जगदाळे

      Delete
  20. 👌👌👌👌👍सद्य परिस्थिती च तंतोतंत वर्णन केलय मॅडम

    ReplyDelete
  21. आहे खरी ही reality. सर्वच जण आपापल्या cell phone चे गुलाम
    👌👌👌 लिखाण

    ReplyDelete
  22. यथार्थ. मी टीव्ही बघत नसल्यानं, ती मालिकांची नावं असावीत असं जरा उशिराच लक्षात आलं. बाकी सगळं चित्रण अनेकांनी अनुभवलं असेलच. शब्दबद्ध छान केलंय

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...