भरतकाम अर्थातच एम्ब्रॉयडरी........ताण व्यवस्थापनाचा माझा उपाय...
गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थिती मुळे प्रत्येकच जण धास्तावला आहे.मी ही त्याला अपवाद नाहीच. त्यात माझा वैद्यकीय व्यवसाय.रोज नवनवीन पेशंटशी संबंध येणार.
कायम डोक्यावर टांगती तलवार.
अनिश्चितता, नकारात्मकता जशा जगण्याचाच भाग झालेल्या.
त्यासाठी 'स्वास्थ्यभान' ही लेखमाला लिहायला सुरुवात केली.
पण लेखमाला जशी संपली तसं लिखाणात गुंतलेलं मन ही मोकळं झालं आणि .......
आता काय????
वेगवेगळ्या रेसिपीज केल्या.पण मनाला हवा तो दिलासा नाही मिळाला.
त्यादिवशी साड्यांचा कप्पा आवरतांना , तळाशी एक रजिस्टर च्या आकाराचं पाकीट दिसलं........
अँकर क्विक स्टिच???
युरेका युरेका- - - असं ओरडायचंच बाकी राह्यलं होतं माझं.
त्या चारही कोऱ्या करकरीत फ्रेम्स मला खुणावू लागल्या. लहान मुलीच्या उत्साहानं मी ते भरतकाम करायला घेतलं आणि प्रत्येक टाक्यागणिक नकारात्मकता कमी होऊ लागली.
पुढे लग्न, नोकरी, मुलंबाळं यात माझं भरतकाम मागेच पडलं.याचबरोबर भरतकाम आउटडेटेड होण्याचाही तो काळ होता.
एकदा पंचवीस वर्षांपूर्वी टीव्हीवर मी अँकर क्विक स्टीच ची जाहिरात बघितली आणि माझ्या डोक्यात किडा वळवळू लागला.भरतकाम करुन ती फ्रेम भिंतीवर लावण्याची आयडियाच मुळात भन्नाट होती.
मी या स्टीच कीटचं शोधकार्य सुरु केलं.अकोल्यात कोणत्याही नवीन वस्तूचा नेहमीप्रमाणे नन्नाचाच पाढा होता -जो आजही असतोच.
माझं माहेर नागपूर असल्यानं तिथे बर्डीवरच्या बॉम्बे एम्पोरियम मधे मला अँकर क्विक स्टिच एकदाचं सापडलं.आधाशासारख्या ५ फ्रेम्स विकत घेऊन ,मी जसा वेळ मिळेल तसा, रात्री जागून त्या पूर्ण केल्या.त्यासाठी घरातल्यांची बोलणी पण खाल्ली.मग प्रश्न आला फ्रेम करण्याचा .......नेहमी प्रमाणे अकोल्यात मनासारख्या फ्रेम्स करुन मिळेनात.झालं ...माझं भरतकाम कित्येक दिवस कपाटातच पडून राहिलं.
त्या वेळी कामानिमित्त माझे यजमान महिन्यातून दोनदा तरी मुंबई ला जात.ठराविक गेस्टहाऊस मध्ये त्यांचा मुक्काम असे.योगायोगाने बाजूलाच एक फ्रेमचं दुकान होतं.मला जशी हवी होती,तशी फ्रेम ह्यांना तिथे आढळली आणि त्यांचंही "युरेका- युरेका" झालं.मग काय, लगोलग आमचं भरतकाम मुंबईला गेलं आणि सुरेख फ्रेम्समधे सजून घरी वापस आलं.
त्या फ्रेम्स भिंतीवर लावून वीस वर्ष झालीत.आजही पहिल्यांदा बघणार्याच्या नजरेतलं कौतुक माझ्या अंगावर मुठभर मांस चढवतंच.
हळूहळू नागपूर च्या ट्रिप्स कमी झाल्या.बर्डीवर जाणंही व्हायचं नाही.कधी काळी बॉम्बे एम्पोरियम मधे गेलंच की नविन नोकर असायचे.त्यांना मला काय हवंय हे कळायचंच नाही.
मग काऊंटर वरच्या मालकांकडे बघितलं की ते हसून आत जायचे आणि शोधून शोधून धूळभरल्या एखाद दोन फ्रेम्स समोर ठेवायचे.
" मॅडम, चलता नही आजकल ये.हम मंगवाते भी नहीं.मुझे पता है इस लिये मैने ये दो पीस आपको ढूंढकर दिये. बाकी किसीको तो समझता मी नहीं".
आणि मग माझं हे भरतकाम जवळपास विस्मरणातच गेलं.
मध्यंतरी साऊथ टूरला गेलो होतो .बंगलोर दर्शन करतांना एम जे रोडवरचा "अँकर मदुरा कोट्सचा" पत्ता मला खुणावत होताच .एम जे रोडवरचं "नल्ली सिल्क" चं दुकान पालथं घालण्याचं परमकर्तव्य आम्ही समस्त बायकांनी यथास्थित पार पाडल्यावर मी हळूच माझ्या पत्त्याची चौकशी केली .पत्ता नेमका बदलला होता आणि तिथे जाण्याचा मोह ,मला सगळ्यांच्या कपाळावरच्या आठ्या बघून नाईलाजास्तव आवरावा लागला.
पाच वर्षांपूर्वी मला मुलीनं सांगितलं,
" आई , आपल्या साठी आनंदाची बातमी आहे.आता स्टीच कीट्स अँमेझॉन वर मिळायला लागल्यात ".
मला हर्षवायू होणं बाकी होतं. त्यावेळी आॕनलाईन शॉपिंग चा सराव नसल्याने मुलीनंच पुण्यातून सगळे सोपस्कार करुन चार फ्रेम्सचं पार्सल मला पाठवलं.
आत्ता पंधरा दिवसांपूर्वी हा खजिना माझ्या हाती लागला आणि भरतकाम करता करता मी जुन्या आठवणीत शिरले.डोळ्यांना त्रास नक्कीच झाला पण त्यापेक्षा मिळणारा आनंद खूप जास्त होता.
मुलीला कळवलं तेव्हा तिलाही खूप आनंद झाला आणि तिच्या अंगातही उत्साह संचारला. आता आँनलाईन शॉपिंग सुरू झाल्याबरोबर तिनंही फ्रेम्स आँर्डर केल्या आणि सध्या ती एम्ब्रॉयडरी करतेय.
गंमतीची गोष्ट म्हणजे माझी चार वर्षांची नात, रोज त्या फ्रेमवर लक्ष ठेवून आहे.
"ममा लवकर पूर्ण कर आणि ही फ्रेम माझ्या बेडरूममध्ये लावू या".
असं ती म्हणते.
माझा छंद तिसऱ्या पिढी पर्यंत झिरपलाय की काय????






शब्दब्रम्ह 👌👍,मस्त tress management
ReplyDeleteधन्यवाद उज्वला
Deleteखुप छान ..
ReplyDeleteसुंदर लिखान आणी भरतकाम सुद्धा.
या कलेचा लोप होणार नाही हेही निश्चीत.
छंद हा तणावमुक्ती,आत्मिक समाधान देतो.तो एका चिकित्से सारखा कार्य करु शकतो.
आदित्य खरंय .
Deleteधन्यवाद
Khup ch sundar Mam👌👌👌
ReplyDeleteसाधना धन्यवाद
DeleteSurekh 👏
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम लिहिलं. खरचं corona ने काय दिल नाही पेक्षा काय दिल ह्याचीच यादी मोठी आहे. मस्त वाटल वाचून. ताई मी पण नागपूरचीच आहे. म्हणजे आपण गावबहिणी का?
ReplyDeleteधन्यवाद .
ReplyDeleteहोय नागपूर माझा वीक पॉईंट .आहे
वा वा. अप्रतिम लिखाण. अगदी लहानपणीच्या काळात घेऊन गेलीस.तुझी भरतकामाची आवड चांगलीच माहितीये. छंद पण जोपासता यायला Great writing. मा धवी स हजे
ReplyDelete