पुस्तक खरेदी करताना सर्वसामान्य वाचकांचे निकष काय असतात? आवडता लेखक, आवडता विषय, आवडतं प्रकाशन किंवा खूप गाजलेलं वा बेस्टसेलर- यापैकी कोणतेही.
पण यापैकी काहीही नसताना मी गणेश मतकरींचं 'शेल्फी' विकत घेतलं. गणेश मतकरींचं सिनेमाबद्दलचं लेखन अधून मधून माझ्या वाचनात आलं आहे. 'आवडता लेखक ' होण्याइतपत मी त्यांचं फारसं वाचलेलंच नाहीय.मात्र माझ्या आवडत्या लेखकाचे- रत्नाकर मतकरी यांचे ते चिरंजीव आहेत हे मला माहीत आहे.
मागील आठवड्यात पुस्तकाच्या दुकानात गेले असता 'शेल्फी' नं माझं लक्ष वेधून घेतलं - ते त्याच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे.माझी पुस्तक खरेदी सुरु असतांना, 'शेल्फी' मला वारंवार खुणावत होतं. शेवटी ते पुस्तक चाळण्याचा मोह मला आवरला नाहीच.
' मुंबई मराठी संग्रहालय,वसंत वाचनालय, ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी- माझ्यात वाचनाची शिस्त तयार करणाऱ्या या वाचनालयांना'..... ही अफलातून अर्पणपत्रिका वाचतानाच, हे पुस्तक इंटरेस्टिंग असणार असा माझ्या मेंदूने इशारा दिला.
चाळताना पुस्तकाची 'जरा हटके' आणि वेगळ्या धाटणीची मांडणी नजरेत भरली. अजून पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे - दर महिन्यात खरेदी केलेली पुस्तकं आणि वाचलेली पुस्तकं यांच्या सूचीनं प्रत्येक लेखाची सुरुवात केलेली. आता तर मेंदूनं रीतसर नोंदच करुन टाकली पुस्तकाची.पानं पलटवत असतांना इंग्रजी लेखक आणि इंग्रजी साहित्याशी संबंधित लेख दिसले.या लेखांमधे काय असेल,ही उत्सुकता निर्माण झाली. आणि लगेच मेंदूने पुस्तक खरेदी करायची आज्ञाच दिली.
'पण हे संपूर्ण इंग्रजी साहित्या संबंधी आहे'.... मी बचावात्मक पवित्रा घेतला.
'काही हरकत नाही'- आता मेंदूचीच आज्ञा- - मी 'शेल्फी' चक्क विकत घेतलं.
'शेल्फी' बद्दल अनेक वाचकांचं असंच होत असावं. हातात घेऊन चाळता चाळताच, वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो आणि मग प्रेमात सगळं क्षम्य असल्यामुळे, 'इंग्रजी साहित्य ना?' वाचून तर बघू - - असं होतं.
मला वाचनाचा छंद आहे. माझ्या संग्रही अनेक पुस्तकं आहेत. हा आपल्या सगळ्यांचा एक अभिमानाचा विषय असतो. 'शेल्फी' वाचताना हा अभिमान झरझर गळून जातो. फेब्रुवारी 2016 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत लेखकानं तब्बल 237 पुस्तकं विकत घेतली आहेत. वाचलेली पुस्तकं यापेक्षा वेगळी आहेत आणि ती 90 आहेत. अबब.........
या 90 इंग्रजी पुस्तकांचं- बेस्टसेलर, कार्टुन्स ,रहस्य, भय, चित्रविचित्र, कॉमिक्स, कल्पना, कविता, चित्रपट, समीक्षा, विनोद ,इत्यादी प्रकारात वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या 90 इंग्रजी पुस्तकांची, त्यांच्या कथानकाची, त्यांच्या गुण दोष वैशिष्ट्यांची माहिती देत असतानाच मतकरी त्या पुस्तकांच्या लेखकांबद्दलही वाचकाला शहाणं करुन सोडतात.पुस्तक लिहिण्यामागची लेखकाची भूमिका,त्यामागच्या काही प्रेरणा,एखादी कहाणी,त्यांची इतर पुस्तकं अशी भरपूर माहिती आपल्या समोर येते आणि ती सुद्धा अत्यंत प्रांजळ आणि मनोरंजक शैलीत. त्यामुळे माझ्यासारख्या मराठी वाचकाला, कधीही परिचित नसणाऱ्या लेखकांबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल वाचताना रस निर्माण होऊ लागतो. माझ्यासाठी हे पुस्तक म्हणजे इंग्रजी साहित्यातली एक अद्भुत आणि अचंबित करणारी सफर होती. केवळ कुतूहलापोटी एका नवीन जगात पाऊल टाकावं आणि विस्मित होऊन पुढे पुढे चालत जावं असं माझं झालं. '
' हारुकी मुराकामी','एच पी लवक्राफ्ट', 'स्टीवन किंग', 'आंद्रे वायदा','आशिष राजाध्यक्ष', 'डॕन ब्राऊन', 'सेम्पे'....... कोणाकोणाचा उल्लेख करावा? अशा अनेक लेखकांची, त्यांच्या साहित्याची,वैशिष्ट्याची एक-एक झलक या पुस्तकात वाचकाला मिळत जाते आणि सर्वस्वी अपरिचित अशा इंग्रजी साहित्याच्या दुनियेत वाचक हरवून जातो,गुंतून जातो.
'गॉडफादर' या कादंबरीचं चित्रपटात रूपांतर करतानाचा दिग्दर्शक - फ्रान्सिस कपोला- (एरवी ही नाव कधी कळली असती?) यांनी 'सिनॉप्सिस', 'द टाईम्स','इमेजरी अँड टोन', 'द पिटफॉल्स','द कोअर'- या पाच घटकांमधे केलेला दिग्दर्शनाचा सखोल अभ्यास वाचताना त्यांना सलाम करावासा वाटतो. 'ग्राफिक नॉव्हेल्स' या साहित्य प्रकाराची वाचकाला यात ओळख होते. इंग्रजी वाचायची इच्छा असणारे - पण नक्की काय वाचायचं, या संभ्रमात पडणाऱ्यांना- 'अँथनी डोअर' यांची 'आॕल द लाईट वी कॕनॉट सी'- या पुस्तकाने श्रीगणेशा करावा असा लेखक सल्ला देतात.
या इंग्रजी साहित्य सफरीबरोबरच फोर्टमधल्या 'वेवर्ड अँड वाईज', 'किताबखाना', बंगलोर मधील 'ब्लॉसम बुक हाऊस', 'युएस मधील 'कॅपिटल हिल बुक्स' आणि 'कॉमिक बुक्स स्टोअर्स' मध्ये ही लेखक आपल्याला फिरवून आणतात. कॉमिक बुक स्टोअर्स मध्ये मे महिन्यात पुस्तकावर मिळणाऱ्या सवलती बघून आपले डोळे विस्फारतात.
228 पानांच्या या पुस्तकाबद्दल आणखीही बरंच काही लिहिण्यासारखं आहे पण ती गंमत वाचकांनीच अनुभवावी.
या पुस्तकाचं बघताक्षणी नजरेत भरणारं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक मुखपृष्ठ, आगळीवेगळी अर्पणपत्रिका, जरा हटके असलेली पुस्तकाची रचना आणि बांधणी.यामुळे वाचक हे पुस्तक हातात घेऊन चाळायला प्रवृत्त होतो. नंतर विकत घेतलेल्या आणि वाचलेल्या पुस्तकांची यादी बघूनच लेखकाबद्दल विलक्षण आदर निर्माण होतो - हे या पुस्तकाचं बलस्थान. प्रथमदर्मशनी प्रेमात पडल्यामुळे, इंग्रजी साहित्य असलेलं हे पुस्तक, 'वाचू का नको'- या संभ्रमात असणारा वाचक, 'एकदा वाचून तर बघू'- या निर्णयाप्रत येतो. हे या पुस्तकाचं यश आहे.
नित्यनेमाने आणि आवडीने इंग्रजी साहित्य वाचणार्यांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे.
ज्यांना इंग्रजी साहित्य वाचण्याची इच्छा आहे .पण काय वाचावं हे समजत नाही त्यांच्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे गुरुकिल्ली ठरेल.
मराठी वाचक- जे फक्त 'बेस्टसेलर' ते ही - 'अनुवादित' वाचतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अलिबाबाची गुहा ठरेल. इंग्रजी साहित्यातलं अद्भुत विश्व सहज सुलभ शैलीत त्यांच्यासमोर साकारल्या मुळे भविष्यात त्यांचीही पावलं या दिशेने वळू शकतील.मुळात, इंग्रजी साहित्याबद्दलचं एक अनामिक दडपण घेऊन वावरणारा मराठी वाचक - 'शेल्फी'मुळे जरा आपल्या 'मराठीपणाच्या' कोषातून बाहेर येईल असं वाटतं.
इंग्रजी वाचन म्हणजे ....?? असं म्हणणाऱ्या मला सुद्धा 'शेल्फी' मधल्या काही लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावं - माझ्या 'प्रस्तावित वाचन यादीत' नोंद करा करून ठेवावीशी वाटली.- - - यापेक्षा अजून काही सांगायला हवं?
#शेल्फी
#गणेशमतकरी













