परवा आमच्या जवळच्या एका कुटुंबाकडून त्यांच्या फार्म हाऊस वर एक दिवसाच्या गेट टुगेदर आणि सहभोजना साठी निमंत्रण आलं. माझ्या अंगात उत्साह संचारला.त्यांच्या फार्महाऊसचं खूप कौतुक ऐकलं होतं. तेवढंच त्या कोरोनाच्या उदास वातावरणातून जरा बदल. नवऱ्याने नेहमीप्रमाणेच मीटींगचे कारण सांगून अंग काढून घेतलं आणि चिरंजीव? बाय डिफॉल्ट त्याला घरगुती कार्यक्रमात सहभागी होण्याचं अंगच नाही त्यामुळे सहभोजनाचं निमंत्रण त्याच्या मेंदूपर्यंत शिरण्याचा प्रश्नच नव्हता.
मीच उत्साहाने तयार होऊन फार्महाऊसवर पोचले. एकदम प्रसन्न वातावरण होतं. जुन्या धाटणीचं बैठं कौलारू, ऐसपैस घर. चारही बाजूंनी हिरवीगार शेती. बाजूलाच पेरू, लिंबू, आंब्याचा मळा. झाडाला टांगलेले झोके. लहान मुलांसाठी घसरगुंडी , सीसॉ.चुलीवर सुरू असलेला अस्सल गावरान स्वयंपाक. आहाहा..........
पण मला कोणाची चाहूल लागत नव्हती. मी वेळेआधीच पोचले की काय???
हळूच घरात शिरले. निमंत्रित मध्यमवयीन मंडळी होम थिएटर वर "चंद्र आहे साक्षीला" सोबत अक्षरशः समाधी अवस्थेत पोचली होती कारण मी आल्याचं कुणाला कळलंही नाही.
दिवसाढवळ्या, निसर्गरम्य वातावरणात,फार्महाऊसच्या घरात बसून त्या चंद्राला साक्षीला घ्यायचं काय प्रयोजन???
मी तिथून काढता पाय घेतला आणि मागच्या व्हरांड्यात पोचले.तिथे अर्ध्या चड्ड्या घातलेल्या, केस विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या, आजूबाजूचं भान नसलेल्या तरुण मुला मुलींचा ग्रुप दिसला. यातील प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपल्या आयुधांसह - (मोबाईल,टॕब, लॅपटॉप - - -सह) (समाधीच्याही पुढची अवस्था असते का हो???) - परग्रहावर पोचलेला........
नाही म्हणायला होस्ट जोडपं जोडपं जागृतावस्थेत असल्यामुळे माझा त्यांच्याशी खराखुरा संवाद झाला.ते कामात असल्याने मी बाहेर आले.मोकळेपणानं हिंडले. झाडापानांचा गंध शरीरातल्या रंध्रारंध्रात ओढून घेतला. कुणाचं लक्ष नाही हे बघून, माझं वय विसरून, मी झोक्यावर मनसोक्त खेळून घेतलं.
दरम्यान चंद्राची साक्ष संपल्याने समाधी अवस्थेतली मंडळी आता भौतिक जगात परतली असतील म्हणून त्यांच्यात जाऊन बसले. त्यापैकी एका आजीकडून "सांग तू आहेस का"चे तब्बल तीन एपिसोड्स न बघण्याचा घोर अपराध घडला होता त्यामुळे इतर मंडळींकडून ती ष्टोरी ऐकून त्यांचं पापक्षालन सुरू होतं.
" तू नक्कीच नाही यात"- - असं मी मला स्वतःला सांगून परत बाहेर आले .आता तर डोकं फिरलेल्या अवस्थेत , तिरीमिरीत , मी याही वयात (वय वर्षे साठ) घसरगुंडी खेळायचाही निश्चय केला. (अर्थात त्याबद्दल तपशीलवार पुढे कधीतरी .......) त्यानंतर स्वयंपाक करणाऱ्या बायकांशी गप्पा-टप्पा करुन हातावरच्या भाकरी करण्याचा अयशस्वी प्रयत्नही करुन झाला .
आता मात्र सगळी मंडळी भूतलावर परतली होती आणि पाय मोकळे करायला बाहेर आली. मला जरा हुरूप आला.आता गेट टुगेदर घडण्याची आशा निर्माण झाली. पण हाय रे माझ्या कर्मा!!! आता फोटोसेशन सुरू झालं. एका लाईनीत, उंचीप्रमाणे,सगळ्यांनी बाजूच्यांच्या डाव्या खांद्यावर हात ठेवलेले, सगळे पाठमोरे,पण उजवीकडे मान वळवलेले, पायऱ्यांवर एकाखाली एक बसलेले .......अशा हल्लीच्या सगळ्या प्रचलित पोझेस मध्ये यथासांग फोटो झाले. नंतर ड्रेस बदलून हिरव्या रंगात मंडळी अवतीर्ण झाली. मी हिरवा ड्रेस आणला नसल्यामुळे माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक बघूनही झालं. एकंदरीत फोटोंचा तो राष्ट्रीय कार्यक्रम एकदाचा संपला.
आता मात्र खूप भूक लागली होती .चुलीवरचा तो गावरान मेनू नाकाला, जिभेला, आणि पोटाला खुणावत होता. गर्द वनराईत मस्त भोजनाची व्यवस्था केली होती. आता निवांत हादडायचं या उद्देशाने मी सरसावले......
तितक्यात ....
फुगलेल्या भाकरीचा, भरलेल्या वांग्याचा,कांदाभजींचा, झणझणीत रश्शाचा, केशरी चकचकीत जिलब्यांचा,पापडांचा क्लोज-अप घेण्यासाठी आता तरुण मंडळी सरसावली होती. आता हे पुढ्यातलं सुग्रास अन्न खाऊ ,की या फोटोग्राफर मंडळींना "खाऊ कि गिळू "असा माझा नुसता तिळपापड होत होता. शेवटी पुन्हा फोटोंचा राष्ट्रीय कार्यक्रम संपल्यानंतर भोजन सुरू झालं.
चार घास पोटात गेल्यावर मध्यमवयीन लोकांचा थोडाफार तरी - औपचारिक का होईना पण संवाद सुरू झाला.
पण तरुण मंडळी??? जितक्या इंटरेस्ट घेऊन त्यांनी पदार्थाचे फोटो काढले, तितक्याच नीरसतेनं ते समोरचं अन्न चिवडत होते. साक्षात रुचकर अन्नब्रह्म समोर असतानाही त्यांचं आभासी ब्रम्हांडाशी असलेलं अद्वैत तुटलं नव्हतं . इतक्या लहान वयात, "सुखदुःखे समे कृत्वा, लाभलाभौ जयाजयौ" प्रत पोचलेली ही मंडळी बघून मला धन्य धन्य वाटलं. भाकरी, भजी, रश्शाच्या सुग्रास चवी पलीकडे जाऊन व्हर्च्युअल जगात गुडूप झालेल्या या तरुणाईचा आनंद नक्की कशात असावा हा प्रश्न मला छळू लागला. तसंच माझ्यामोरच्या मध्यमवयीन मंडळींना, निसर्गाच्या सान्निध्यातही टीव्ही सिरीयल आणि सोशल मीडियावर टाकायच्या फोटोंचं इतकं महत्त्व असावं????
त्यांचाही आनंद नक्की कशात असावा?
असो. मी मात्र माझा झोक्यावरचा आणि घसरगुंडीवर खेळण्याचा(?) चिमुटभर आनंद मात्र उरी पोटी जपून घरी घेऊन आले.
#गेटटुगेदर
#फार्महाऊस
#सहभोजन
#आनंद










