Sunday, March 2, 2025

अभिजात दर्जा आणि मराठी पाट्या

 आपल्या मराठीच्या अनेक बोलीभाषांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे . प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात तिचं रूप, बाज आणि लय वेगवेगळी असते. दोन वाक्यातच बोलीभाषेचा लहेजा उमजून बोलणा-याचा प्रदेश ओळखता येतो. असं वेगळेपण असलं तरी लिहिताना ‘प्रमाण' मराठी भाषाच वापरली जाते  आता,शुद्ध मराठी लिहिणं आणि बोलणं प्रामुख्याने कुठे आढळतं? उत्तर द्यायची गरजच आहे? प्रमाण किंवा शुद्ध मराठी ही पुण्यातच बोलली जाते - हे 'ब्रम्हवाक्य' आहे नाही का? यावर कुणाचं दुमत आहे का? मग आता ही पाटी  बघा आणि त्यातील शुद्धता तपासा. . 



‘पैसे लागेल कणभर’ हे अचूक आहे का हो? दुसरा फोटो बघा. ‘येतीये मेट्रो तुमच्या भेटीला’. ‘येतीये’ - हे कोणतं क्रियापद आहे हो? 



विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अशी भाषा? पुणेकर खपवून घेतात वाटतं हल्ली. अहो, मराठीला अभिजात दर्जा मिळालाय. जागो. पुणेकर जागो.



     आता एक नामवंत मराठी दैनिकात पहिल्याच पानावरची पूर्ण जाहिरात. फोटो बघा. केसांना ‘बनवाते’ निरोगी. हे म्हणजे हिंदीचं भाषांतर. ‘बनवणे’ या हिंदी क्रियापदानं मराठी माणसाला ‘मामा' बनवलं आहे. आम्ही जेवण बनवतो, घरं बनवतो, शिल्प बनवतो..... असा सगळा ‘उल्लू बनाविंग’ प्रकार. असो. ‘ज्यामुळे तुम्ही दिसाल सुंदर आणि आत्मविश्वासाने भरपूर’.. याचा अर्थ मला कुणी सांगेल काय? शाळेत असतांना निबंधात असल्या चुका झाल्या तर मार्क तर कापले जात, शिवाय चुकलेला शब्द पन्नास वेळी लिहून काढावा लागे. (सुधारणा करून हो.) आता आपल्या मायबोलीची अशी दुर्दशा बघून घशात आवंढा दाटतो हो. चूक भाषा लिहिणाऱ्या या महानुभावांना काहीच शिक्षा नाही?

           बरं. हल्ली तर शुध्द मराठीचा आग्रह धरणाऱ्याची टिंगल केली जाते. ‘भावना पोचणं महत्वाचं. व्याकरण नाही’ - ही आजची टॅग लाईन आहे त्यामुळे Jवण, Cमा, Kले, Aकदम, Pवळा… अशा धेडगुजरी शब्दांना समाजमान्यता मिळाली आहे. आता हीच पाटी बघाना.


हे दुकान पंक्चर दुरुस्तीचं आहे हे समजून घेण्याचा सूज्ञपणा मराठी माणसात आहे म्हणून बरंय. आता पाटी लावण्याचा उद्देश जर पूर्ण होत असेल तर शब्द चूक लिहिले तरी काय हरकत आहे? असा आजकाल प्रतिवाद केला जातो. पण याच पाटीवर त्या अज्ञात लेखकाने ‘संपर्क’ हा शब्द मात्र अचूक लिहिला आहे त्याबद्दल त्याची पाठ थोपटली पाहिजे कारण' रफार' या शत्रूने अनेकांचा 'फार्फार' छळ केलाय. हर्षवर्धन, धैर्यवर्धन, सुदर्शन,अंतर्नाद, निसर्ग इ. रफार असणारी शब्दावली काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट हो.) टाकावी अशी पीडितांनी मागणी केल्याचं मी ऐकलंय. आता ‘आशिर्वाद’ शब्दच बघा ना. किती सकारात्मक, उत्साह वाढवणारा शब्द. पण त्याला चूक लिहिला जाण्याचा शाप आहे. ‘आर्शिवाद’ असं सहजगत्या लिहिलं जातं.जे शापित आयुष्य ‘रफाराला’ तेच नशीब अनुस्वाराचंही आहे. आता हा टॅंकर बघा.

 ‘ज्वलनाचं' धगधगतं स्वरुप 'ज्वलनशील' या शब्दात दडलं आहे.पण 'शिल' लिहिल्यामुळे त्यातली दाहकता थंड पडली आहे .आणि 'अंत्यत' विशेषणामुळे उरल्यासुरल्या दाहकतेनं चक्क शरणागती पत्करली आहे. अनुस्वार नेमका कोणत्या अक्षरावर द्यावा, या गोंधळात अनेक जण असतात. त्यात काही चतुर विद्वान दोन अक्षरांमध्ये त्याला बसवून वाचणा-याच्या कोर्टात बॉल टाकतात. ‘अंतरंग, रंगपंचमी जंगल,’इ. ही कमनशिबी मंडळी आहेत. जी आपल्यासमोर अतंरंग,रगंपचंमी, जगंल या स्वरूपात येतात. '
जोडाक्षरं’ ही तर मराठी लिहिणाऱ्यांच्या कुंडलीतील दुष्टग्रह, पापग्रह आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आता एका प्रसिध्द मंदिरातील हीच पाटी बघा ना. 


वास्तविक मंदिरातील पुजारी मंडळींचं मराठीच नव्हे तर संस्कृत अस्खलित, अचूक सुस्पष्ट असतं पण त्या शाश्वताला ‘श्वाश्वताची’ शिक्षा का दिली हे त्या मंदिरातील देवच जाणे. ‘सद्सद्विवेक’ , ‘दृष्टद्युम्न’, ‘तादात्म्य’, ‘पुनरुज्जीवन’ ई. ‘शब्दोत्तम’ अचूक लिहिणं आणि वाचणं ही स्पर्धा ठेवल्यास त्यात भाग घेणा-यांनाच बक्षीस द्यावं लागेल.( कारण कुणी भाग घेण्याची हिम्मतच करणार नाही.)

       परवा आम्ही  एका खेडेवजा भागात सहलीला गेलो होतो.  पोटपूजा करण्यासाठी प्रचंड संशोधन करून शेवटी एक हॉटेल सापडलं. मेन्यू कार्ड समोर आलेलं बघा आता.

'रसगुल्हा’ हा कोल्ह्याचा भाऊबंद तर नसेल ?या शंकेनं भूक घाबरून पळाली आणि ‘मंच्न्युरियन’ वाचल्यावर तर पोटातल्या कोकलणार्या कावळ्यांचीही बोबडी वळली. ’व्हेज फुलावात’ कोणती फुलं घातली असतील हे तो अन्नदाताच जाणे.

'मनचाह सुप’ वाचून तर माझं 'मन' सुपात पाखडल्यागत वरखाली झालं.'टमोटो' हा 'अजिनोमोटो' हा ग्रामीण अवतार असावा का?                          मराठी लिखाणाची अशी दाणादाण उडवलेत्या पाट्या बघतांना मला अमृत मासिकातील ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ आठवतो. कामाच्या दबावामुळे एका ‘दैनिकाची’ आत्महत्या! (सैनिकाची). ‘सर’ नाही त्याला डर कशाला?  (कर). ‘चरावे’ परी कीर्तिरूपे उरावे (मरावे) ... .... अशा गंमती पूर्वी मुद्रण (अर्थातच टायपिंग/ प्रिंटींग) करतांना होत असत. पूर्वी अगदी अपवादाने घडणारे मुद्राराक्षसाचे विनोद हल्ली सर्रास घडताना दिसतात. किंबहुना मुद्राराक्षसांची संख्या आता वेगानं वाढू लागलीय. इंग्रजी आद्याक्षरं वापरून मराठी लिहिणं ही सध्याची फॅशन असल्याने देवनागरी लिपी लिहिण्याची सवय आता मोडली आहे. कोणतीही भाषा ही बोलण्यापेक्षा लिहिणं कठीण असतं.पण दोष मात्र मराठीला दिला जातो. मुद्राराक्षसांमुळे भाषेत विनोद निर्मिती होते हे एका ठराविक पातळीपर्यंत मान्य आहे.पण उपसंपादकांनी डुलकी घेणं हे मात्र अक्षम्य आहे.’प्रुफ रिडींग’ म्हणजे प्रकाशित करण्याआधी तपासलेलं लिखाण.मग ते पुस्तक असो वा चार शब्दांची पाटी. प्रूफ रिडींग टाळलं की चुकीची भाषा समोर येते.

        नुकताच मराठीत ‘ सलाते सलानाते’ या नावाचा चित्रपट आला आहे. चित्रपटाचा विषय नेमका काय आहे याची मला कल्पना नाही पण त्याचं नाव मात्र आगळंवेगळं आहे.त्या नावानं मला एकदम माझ्या शाळेत मराठीच्या व्याकरणाच्या वर्गात नेऊन बसवलं.’सलाते सलानाते’ हे विभक्ती प्रत्यय असून द्वितीय विभक्तीचे एक व अनेकवचनाचे प्रत्यय आहेत. विभक्ती, समास,कर्तरी - कर्मणी प्रयोग,काळ,नाम…हे व्याकरण शिकताना त्या वयात वैताग येत असे.पण आता लक्षात येतं की व्याकरण हे भाषेचं हार्डवेअर असतं.आणि ते जितकं मजबूत, तितकी भाषा अचूक होते.

       मराठी पाट्या आणि विनोद हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा जरी असला तरी भाषेचं हे विडंबन खेदकारक आहे. त्याहीपेक्षा त्यात सुधारणा न करता ते चालवून घेणं… ही वृत्ती अधिकच गंभीर आहे.वर्षोनवर्षे सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या मराठी पाट्या असणं… हे मराठी भाषेला गौणत्व दिल्यामुळे घडतं.मायबोलीला मनात स्थान नसणं, मराठी म्हणजे ‘लो स्टॅंडर्ड' असा गैरसमज बाळगणं…या वृत्तीमुळे आपणच मराठीचा दर्जा खालावण्यास कारणीभूत आहोत. आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.आपण भाषा प्रेमींनी मराठीचे केवळ गोडवे गाण्यापेक्षा शक्य त्याठिकाणी सुधारणा करणं अपेक्षित आहे आणि  प्रमाण मराठीचा आग्रह बाळगणे अपेक्षित आहे.


#मराठीचीदुदर्शा

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 




९४२२९३९५१०

7 comments:

  1. क्या बात है! 'मराठी पाट्या' लेखाचा विषय झाला आहे!!!!! अगदी अचूक निरीक्षण. खरंच सर्रास चुकीचे मराठी दिसते पाट्यांवर. अनेक शिक्षित लोकांनाही त्यातल्या चुका ओळखू येत नाहीत. इंग्रजाळलेल्या पीढीला तर नाहीच नाही.

    ReplyDelete
  2. अचूक आब्ज़र्वेशन. मस्त interpretation

    ReplyDelete
  3. वा वा! फारच मनोरंजक पण डोळ्यात अंजन घालणारं लिखाण! नेहमीप्रमाणे सुंदर!

    ReplyDelete
  4. "मराठीची दुर्दशा" हा लेख विनोदी शैलीत असूनही भाषेच्या शुद्धतेचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. सार्वजनिक पाट्यांवरील चुकीचे मराठी शब्द आणि व्याकरणाच्या चुका यावर मार्मिक उपहासातून आपण प्रकाश टाकला आहे.
    लेखाची भाषा ओघवती, उदाहरणं ठोस आणि निरीक्षण अचूक आहे.
    "व्याकरण गौण, भावना महत्त्वाच्या"
    या मानसिकतेमुळे मराठीची शुद्धता हरवत चालली आहे, हे आपण प्रभावीपणे मांडले आहे. अशुद्ध भाषा स्वीकारण्याची वृत्तीच धोकादायक आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने यावर जागरूक राहायला हवं.
    हा लेख केवळ हसवणारा नसून विचार करायला लावणारा आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि शुद्धतेसाठी तो निश्चितच महत्त्वाचा आहे.
    डॉ विनय दादळे

    ReplyDelete
  5. वाह खूप छान. ऱ्हस्व दीर्घ च्या पण खूप चुका असतात.
    छान निरीक्षण. लेखन शैली मस्तच

    ReplyDelete
  6. खूप छान लेख‌..डोळ्यात अंजन घालणारा

    ReplyDelete
  7. लेख उत्तम झाला आहे, साधना ताई. मराठीची दुर्दशा खरोखर बघवत नाही आजकाल. मराठी लिखाणाची गरज देखील मराठी भाषिकांना वाटेनाशी झालेली आहे. अर्धशिक्षित लोकांकडून झालेल्या चुका एकवेळ आपण समजू शकतो, पण शिकलेले लोकसुध्दा तशाच चुका करतात, हे बघून वाईट वाटते. प्रूफ रिडींग ही गरजच नष्ट झालेली आहे. त्यात गुगल भाषांतराची भर. म्हणजे सगळॆच "आपोआप"! मग काय विचारायलाच नको. "मराठी वाचवा" चळवळ आपण सुरु करायला हरकत नाही. विचार व्हावा.

    अनिल सहजे

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...