Sunday, June 4, 2023

आभासाशी जडले नाते

 आभासाशी जडले नाते....    


सकाळ झाली. डोळे उघडले.  हातपाय ताणून आळस दिला आणि प्रातर्विधीसाठी उशी खालचा मोबाईल हातात घेतला.  दचकलात ना ? पण तरुण पिढी नाही दचकणार. कॉलेजमध्ये एकदा निरोगी जीवनशैली विषयी बोलत असताना 'प्रातर्विधी' हा शब्द ऐकल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उमटलं .

       'सकाळी उठल्याबरोबर काय करायचं असतं?' मी सोप्या शब्दात विचारलं.  

       'उठल्याबरोबर आधी आम्ही मोबाईल बघतो मॅम' - - डोक्यावर केसांचा उभा तुरा असलेल्या एका मुलाने उत्तर दिलं. तुरा कसला, त्याच्या ताठ उभ्या केसांनी बाथरूम घासता येईल का? हा भलताच विचार माझ्या डोक्यात आला.  डोक्याच्या वरच्या भागात ब्रश सारखे उभे केस आणि खालच्या भागात नाममात्र हिरवळ असणाऱ्या या मुलाला 'प्रातर्विधी' हा शब्द उच्चारण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल ही मला खात्री पटली आणि मी विषय आवरता घेतला. 

        असो. तर थोडक्यात काय की हल्ली पूर्वीच्या व्याख्या.... चुकलं - काॅन्सेप्ट बदलत चाललेय.

 'प्रातर्विधी' म्हणजे सकाळी डोळे उघडल्याबरोबर 'कराग्रे वसते लक्ष्मी' सारखं 'प्रभाते मोबाईल दर्शनम् अशी प्रथा रुढ झाली आहे. शिवाय 'आमच्या पिढीने (साठीच्या)  तर काळाच्या बरोबर चालायला हवं'... अशी येता-जाता तरुण पिढी आमच्यावर पिंक टाकून मोकळी होत असते. तात्पर्य हेच की मी पण प्रातर्विधीसाठी मोबाईल उघडला. वाढदिवस ,लग्न वाढदिवस, निधन वार्ता, गुड मॉर्निंग, सुविचार, विनोद,देवदर्शन ,रेसिपीज ,कविता ,लेख ,प्रवचन...... 

 अबब!!! मोबाईल ओसंडून वाहत होता .या सगळ्यांना उत्तर देणं, हा कार्यक्रम हल्ली जीवनावश्यक कृतींमध्ये मोडत असल्याने खऱ्याखुऱ्या प्रातर्विधीची वाट लागणार नाही तर  दुसरं काय होणार?

      या व्हाॅट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम नामक अक्राळविक्राळ  राक्षसाने जेव्हापासून घराघरात प्रवेश केला तेव्हापासून माणसाचं आयुष्यच बदललंय.अन्न,वस्त्र, निवारा यापेक्षाही मोबाईल च्या गरजेला जास्त प्राधान्य दिलं जातंय. या मोबाईलमुळे माणसांच्या मेंदू मधे बदल व्हायला लागले आहेत.ज्याप्रमाणे उत्क्रांती नंतर माणसाचं शेपूट गळून पडलं तसंच या तांत्रिक युगात मेंदू मधलं बुद्धी आणि विवेकाचं केंद्र गळून त्या जागी मेंढरांच्या मेंदू तील केंद्र निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे की काय, असं मला नेहमी वाटतं. (Herd mentality)

      हल्ली माणसांचे भलतेच समूह निर्माण झालेले आहेत. एक समूह आहे तो अंगठे बहाद्दरांचा. कोणीही, कोणतीही, कसलीही पोस्ट टाका - यांचा अंगठा कायम तयार असतो .बरेचदा पोस्टमध्ये वाचनीय मजकूर असतो जो वाचायला किमान पाच मिनिटं लागणार असतात. पण या अंगठे बहाद्दरांच्या दिव्यदृष्टीची कमाल!! पोस्ट टाकल्यावर अर्ध्या सेकंदात यांचा अंगठा आलाच पाहिजे. या अंगठ्या मागचं मानसशास्त्र नक्की काय असेल हे मी शोधायचा खूप प्रयत्न करतेय पण अजूनही मला त्यात यश आलेलं नाही. हा अंगठेबहाद्दर समूह एखाद्या 'अंगठे बाबाचा' भक्त संप्रदाय तर नसेल ना? बाबांनी अंगठे टाकायचा आदेश दिला असावा, त्यामुळे हे भक्तगण जपमाळे प्रमाणे दररोज किमान 108 अंगठे देत असतील अशी मला दाट शंका येते.

 किंवा दुसरी शक्यता म्हणजे हे अंगठे बहाद्दर नक्कीच पगारी असावेत. जितके अंगठे तितकी कमाई.

        दुसरा जो समूह आहे तो खरंतर आजारी असतो. आता मी डॉक्टर असल्यामुळे हे विधान ठामपणे करण्याचा अधिकार नक्कीच मला आहे. या समूहाला 'फोटोरिया' हा आजार झाला असतो. जसा डायरिया असतो ना तसा 'फोटोरिया 'बरं का. हा समूह कोणत्याही प्रसंगाचे किलोभर फोटो तरी टाकतोच. आणि यांच्या स्टेटस  वर किमान पावभर फोटो असतातच.असं  वाटतं की फोटोसाठी हे ट्रीपला जातात, फोटोसाठी पूजा घालतात, फोटोसाठी सणवार साजरे करतात, फोटोसाठी नाचतात,गातात.घरी केलेली रेसिपी पोटाऐवजी आधी फोटोत जाते. अंगठे बहाद्दरांपेक्षा या समूहाची परिस्थिती गंभीर असते. अंगठे बहाद्दर तसे निरूपद्रवी असतात.पण फोटोरिया झालेला समूह गेल्या जन्माचा सूड उगवतात असं म्हणतात. 'फोटोरीया' झालेल्यांना रोज फोटो टाकल्याशिवाय झोप येत नाही. या फोटोंचेच बहीण भाऊ म्हणजे रिल्स आणि व्हिडिओ असतात. या फोटोरिया समूहाला जेव्हा रिल्स आणि व्हिडिओची लागण होते तेव्हा त्यांची केस हाताबाहेर जाते.फोटोरिया समूहाकडे बघून मला पुलंच्या 'हसवणूक' मधल्या 'माझा शत्रूपक्ष' या लेखाची नेहमीच आठवण येते. 

        तिसरा समूह जरा अध्यात्म मार्गी असतो. त्यांचा वयोगट साधारणतः साठीच्या पुढचा असतो. ही मंडळी फेसबुक, व्हाॅट्सअप ला पूर्णपणे शरण गेली असते. 'उरलो उपकारापुरता' याप्रमाणे 'उरलो फॉरवर्ड पुरता' अशी त्यांची जीवनातली भूमिका  असते .सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र - - या मंडळींचा 'अहर्निशम् सेवामहे' यानुसार आलेल्या कोणत्याही,कशाही पोस्ट  फॉरवर्ड करणं - हे त्यांचं परम कर्तव्य असतं.आणि हे परम कर्तव्य ते कुठेही म्हणजे दुकानात, भाजीबाजारात,सिनेमा बघताना,अगदी व्यासपीठावर असताना सुध्दा बजावत असतात.  'सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ ' ही गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणे त्यांच्या ठायी असतात.

         भुलाबाई चं गाणं असतं ना, 'एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू '....या चालीवर - - 'एक फॉरवर्ड करू बाई, दोन फॉरवर्ड करू, दोन फॉरवर्ड करू बाई तीन फॉरवर्ड करू....' असं आजच्या काळातलं गाणंही या समूहाने जन्माला घातलंय असं ऐकिवात आहे.

          चौथा समूह प्रसिद्धीला हपापलेला असतो. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे. 

  'घटम् भिंद्यात पटम् भिंद्यात कुर्यात रासभरोहणात,   येनकेन प्रकारेण प्रसिद्धं पुरुषो भवेत्.' 

  एखादं वैशिष्ट्यपूर्ण काम केल्यानंतर प्रसिद्धी मिळवणं हे नैसर्गिक आहे. पण मडके फोडून, कपडे फाडून, प्रसंगी गाढवावर बसून अर्थातच काहीही करून प्रसिद्धी मिळवणारा समूह हा खरोखरच पुलंच्या हसवणूक मधला शत्रूपक्ष असतो.जगण्यातल्या सामान्य दैनंदिन गोष्टी समाज माध्यमावर टाकून ' फोमो 'ची स्वतःचीच लढाई लढत असतो.

  या समाज माध्यमाच्या आहारी गेलेले बरेच  विक्षिप्त,नादावलेले  समूह आज निर्माण झालेले दिसतात. खरंतर या समाज माध्यमाद्वारे कितीतरी चांगली रचनात्मक, सकारात्मक,महत्त्वाची कामं होत असतात आणि अशी समाजोपयोगी कामं करणारे समूह सुद्धा भरपूर आहेत.कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, गाजावाजा न करता ही कामं सुरू असतात.

       पण आजचा समाज हा मेंढरांचा कळप झाला आहे. इतर जसे वागतात तसंच आपण वागायचं हे एक चुकीचं मानक  प्रस्थापित होतं आहे, जे फार गंभीर आहे. आजच्या आत्मकेंद्रीत आणि मोबाईलवर पडीक व्यक्तीला सतत इतरांकडून कौतुक, इतरांकडून  मान्यता, लाईक्स.. यांची सारखी गरज असते. सतत  पोस्ट वाचून इतरांशी तुलना करण्याची सवय हल्ली वाढत चालली आहे. स्वतःविषयीचं मत  हे लोक इतरांच्या नजरेतून ठरवतात. त्यामुळे आपण चांगलं कसं ठरु यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू असते. आणि म्हणूनच असे समूह तयार होतात. सदोदित काहीतरी पोस्टायला हवं, ही मनोवृत्ती वाढत चालली आहे. जिंकलेल्यास टाळ्या पाहिजे, हरलेल्याला खांदा पाहिजे, लिहिणाऱ्याला कमेंट पाहिजे, कवितेला दाद पाहिजे, फोटोंना इमोजी पाहिजे ,विनोदाला स्मायली पाहिजे, वाढदिवसाला जीबीयु -एचबीडी पाहिजे आणि मेल्यावर आरआयपी पाहिजे.

  मार्क्सवादी एरिक फ्रॉम म्हणतो, 'जगताना एक मोठा पर्याय आपल्यासमोर असतो तो म्हणजे, टू हॅव ऑर टू बी. मॅन इज द वन हू इज मच, नॉट द वन हू हॅज मच'.

 पण आम्ही सुशिक्षित, जाणते असून 'टू हॅव' च्या मायाजालात इतके गुरफटत चाललोय की त्यामुळे मेंदूत निर्माण होणाऱ्या डोपॅमिनची चटक लागलेली आहे. ही एक प्रकारची नशा असते.या नशेत असतांना , वास्तवात अराजकता आहे,अती महत्वाचे प्रश्न आहेत,भावना भडकताहेत,लहान मुलांवर विपरीत संस्कार होताहेत.... याकडे आपलं लक्षच जात नाही.आपण आपल्या आभासी आटपाट नगरात सुखाने नांदतो. आणि आनंदात गातो,

 सासू म्हणते,

 ' माझ्या फोटोला लाईक कर गं सुने कर गं सुने.

 मग जा अपुल्या माहेरा, माहेरा.

 सून म्हणते,

 चार चार ईमोजी टाकल्या हो सासूबाई,टाकल्या हो सासूबाई. 

 आता तरी जाऊ द्या माहेरा,माहेरा."

   शहाणी ,जाणती,विचारी,परिपक्व जनता जेव्हा या आभासी मायाजालात अडकत जाते , तेव्हा भय वाटतं ते पुढच्या पिढीचं. विकसित मेंदूची परत अविकसित मेंदू कडे होणारी वाटचाल ही या युगातील उत्क्रांती ची नांदी तर नसावी ? कारण सतत या गॅजेट्सचा अनाठायी आणि अन् प्राॅडक्टिव्ह उपयोग होत राहिला तर मानवी विचार,भावना व वर्तमानावर परिणाम होतो आहे. याचा अभ्यास करण्यासाठी 'इंटरनेट सायबर सायकाॅलाॅजी '- या मानसशास्त्राच्या नविन शाखेने जन्म घेतला आहे. या शाखेचे जनक 'जाॅन सुलर' हे म्हणतात, "आपण जर इंटरनेटचा हुषारीने वापर केला नाही तर निश्चितच इंटरनेट आपला हुषारीने वापर करुन घेईल यात शंका नाही'.

त्यामुळे,

"सदा सर्वदा योग फेसबुकचा घडावा....

तुझे कारणी वेळ माझा सरावा..

उपेक्षू नको मज माध्यमा तू आता...

इंटरनेट देवा मागणे हेचि आता'

    अशी शरणागती पत्करली तर भविष्यात विनाश अटळ आहे आणि त्याला कारणीभूत आपणच असणार आहोत.



डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

अकोला, ९४२२९३९५१०

5 comments:

  1. विनोदी पद्धतीने मांडलेले गंभीर वास्तव !!

    ReplyDelete
  2. नर्मविनोदी शैलीतून वास्तव दर्शन

    ReplyDelete
  3. अगदी वास्तव वर्णन! ...मोठ्या फॅमिली गृप मधे रोज कोणाचा तरी वाढदिवस असतो. FOMO मुळे सगळेजण शुभेच्छा देतात.खरं म्हणजे adminनी सगळ्यांतर्फे शुभेच्छा द्यायला पाहिजेत.पण असं सुचवलं तर आपणच व्हिलन होतो.

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...