माझी रोजची ओपीडी. सकाळी नऊ पासून सुरू होणारी. आमचे निमसरकारी आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय. त्यामुळे पेशंटचा प्रचंड ओघ. कॉर्पोरेट हॉस्पिटल सारखे 'एसी केबिन', 'रिसेप्शनिस्ट', 'अपॉइंटमेंट'.. असे चोचले आम्हाला परवडणारे नाहीत. पेशंट स्वतःच आपली लाईन लावणार, मध्येच घुसणार, भांडणं होणार... हे रोजचंच चित्र. एक पेशंट केबिनमध्ये तपासायला आत शिरला की दुसरा पेशंट एक पाय आत एक पाय बाहेर असा उभा राहणार. तिसरा पेशंट मधूनच पडदा बाजूला करून डोकावणार .चौथा पेशंट खिडकीतून आत बघणार हे नित्याचंच. त्यादिवशी बारा वाजत आले होते. जवळजवळ ४० पेशंट पासून झाले होते. १२ नंतरची वेळ फारच आणीबाणीची असते. तपासण्याचा, बोलण्याचा, ऐकून घेण्याचा.... सगळाच वेग मंदावला असतो. एक ज्येष्ठ गृहस्थ बराच वेळ पासून मला बाहेर उभे दिसत होते. त्यांना आत येण्याची काही घाई दिसत नव्हती.ते सारखे आत डोकावून बघत होते. सगळे पेशंट आटोपल्यावर मी लांब श्वास घेऊन उठले. आता भूकही लागली होती. तेवढ्यात ते आजोबा आत आले.
"या दवाखान्यात तुम्ही पोटदुखीवर औषध देता का हो?"
त्यांचा हा प्रश्न ऐकून, 'नाही हो. मी इथे भुवया कोरून देते'- - असं सणसणीत उत्तर द्यायची इच्छा मला झाली पण मी स्वतःला आवरलं. डोक्यात जाणाऱ्या पेशंटशी - तेही विशेषतः बारा वाजल्यानंतर, कमीत कमी मनस्ताप करून कसं बोलायचं याचा माझ्याजवळ फॉर्म्युला तयार असतो. उत्तरा दाखल मी फक्त मान हलवली - होकारार्थी. "पोटदुखीवर पंचकर्म पण करतात का हो?"
परत माझी होकारार्थी मान हलली.
"पंचकर्माचा खर्च किती येतो?"
आता मात्र माझ्या श्वासाची गती वाढू लागली. मी डोळ्यांनी इशारा करून नॉन स्ट्रायकर एन्डवर उभ्या असलेल्या माझ्या हाऊस ऑफिसर कडे बॅटिंग दिली.
हाऊस ऑफिसर तरुण, उत्साही आणि अननुभवी असल्याने,त्याने आजोबांचे बॉल दणादण हाणायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात मी एक ते शंभर आकडे मनात मोजून दीर्घ श्वास घेतले.आजोबांच्या ज्ञानात कितपत भर पडली देव जाणे. आता आजोबांनी माझ्याकडे बॉल टाकला.
"अहो पंचकर्म करायला आठ दिवस लागतात? आम्हाला तर परवाच पुण्याला जायचं आहे."
आता तर माझ्या हृदयाची गती पण वाढू लागली. त्यांचा बॉल मी न टोलवता सोडून दिला आणि जास्तीत जास्त मख्ख चेहरा करून बसले.
"मॅडम सांगा ना, काय करायचं ?"-आजोबा.
आता मात्र त्यांच्या बाॅलवर सीमापार फटका मारायची वेळ होती.
"अहो पोटदुखीवर पंचकर्मच करायचं, हे तुम्ही कसं काय ठरवता? आधी पेशंटची हिस्ट्री, तपासणी, आजाराचं निदान, गरजेनुसार चाचण्या हे सगळं झाल्यावरच आम्ही ठरवू औषध द्यायचं की पंचकर्म करायचं"
" मॅडम, सगळ्या तपासण्या झाल्या आहेत. सोनोग्राफी, एक्सरे झाले आहेत. पोटदुखीचं निदानही झालं आहे औषधेही खूप दिवस घेतली. काही फायदा नाही. आता ठरवलं , पंचकर्मच करायचं. अहो कित्येक वर्षापासून मी याच भागात राहतोय पण मला माहीतच नव्हता हा दवाखाना"- आजोबा.
आता मात्र सीतेसारखं मला या दवाखान्यासकट जमिनीत गडप व्हावं असं क्षणभर वाटून गेलं. गेल्या तीस वर्षाची रुग्णसेवा आजूबाजूंच्या खिजगणतीतही नसावी?
"हे बघा आजोबा, आधी तुम्ही टेबलवर झोपा .तुमची लक्षणं, हिस्ट्री सांगा. मग काय ते ठरवू ."आता मी अंपायरच्या भूमिकेत शिरले.
"नाही हो. मी फक्त चौकशी करायला आलो होतो. माझ्या मिसेसला पोट दुखीचा त्रास आहे. तिला केव्हा आणू?"
आजोबांनी गुगली टाकला आणि मी ताडकन उठून थर्ड अंपायर म्हणजे सिस्टर कडे ती केस सोपवून केबिन बाहेर पडले.
एकदा तर गंमतच झाली .तीव्र कंबर दुखीमुळे उभे राहणे, चालणे कठीण झालेला एक पेशंट पंचकर्म करण्यासाठी दवाखान्यात भरती झाला. उपचार सुरू झाल्यावर त्याची लक्षणे हळूहळू कमी होऊ लागली. रोज राउंड घेताना तो कंबरेचं दुखणं सोडून इतर बऱ्याच तक्रारी सांगायचा.
अंगाला खाज, डोकेदुखी, छातीत जळजळ वगैरे लक्षणांवर त्याला आम्ही औषध देत होतो. त्यातली खाजेची, डोक्याची कोणती गोळी आहे हे तो हाऊस ऑफिसरला विचारत असे. आठ दिवसाच्या पंचकर्माने त्याची कंबर दुखी पूर्ण नाहीशी झाली. तो उभा राहून चालू लागला. पण अंगाला खाज, डोकेदुखी, जळजळ काही कमी होईना. त्यामुळे तो दवाखान्यातून सुट्टी घ्यायला तयार नव्हता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. मी सिस्टरला त्याच्यावर बारीक नजर ठेवायला सांगितली. तेव्हा हे महाशय डोकेदुखीच्या गोळ्या बायकोसाठी, खाजेच्या गोळ्या आईसाठी आणि छातीत जळजळीच्या गोळ्या मित्रासाठी जमा करून स्वतः 'प्रॅक्टिस' करत होते. दुसऱ्या दिवशी राऊंडच्या वेळेस त्याचं तेच डोकेदुखी खाजेचं रडगाणं सुरू झालं. मी म्हटलं,
"हे बघा, तुम्ही कमरेच्या दुखण्यासाठी भरती झालात ते दुखणं बंद झालं ना? आता बाकी लक्षणांसाठी औषध देऊनही जर आराम होत नसेल तर
आपण आता डोकेदुखीसाठी सिटीस्कॅन, जळजळीसाठी एंडॉस्कॉपी आणि खाजेसाठी एलर्जी टेस्ट करूया. मी चिठ्ठी लिहून देते तुम्हाला."
ही माझी मात्रा अचूक लागू पडली आणि माझ्या राउंड नंतर पेशंट लगेच गाशा गुंडाळून घरी परतला.
असे मजेदार अनुभव आणि अफलातून किस्से समस्त डॉक्टरांच्या पोतडीत भरपूर जमा झालेले असतात. माझ्या 30 वर्षाच्या अनुभवानुसार कोणत्याही पेशंटशी पाच मिनिटं बोलल्यावर त्याची वृत्ती लक्षात येते. मग त्याच्याशी कसं, किती,कोणत्या स्वरात, कोणत्या भाषेत,कशा पद्धतीनं बोलायचं हे लगेच ठरवता येतं. आजकाल डॉक्टरांच्या नावानं खूप ओरड केली जाते. पूर्वी डॉक्टर हे देवाप्रमाणे होते. आजकाल असे डॉक्टर्स अभावानेच आढळतात असे अनेकांचे मत असते. परंतु पेशंट सुद्धा पूर्वीसारखे कुठे राहिलेत? हल्लीचे पेशंट गुगल विद्यापीठातून अर्धवट माहिती घेऊन येतात. कशा पद्धतीचे उपचार करायचे हे डॉक्टरच्या ऐवजी तेच ठरवतात.तपासण्या करण्याचा अट्टाहासही अनेक पेशंटचा असतो.
खरं तर चरक महर्षींनी सांगितल्या प्रमाणे, 'विद्या, वितर्क,विज्ञान, स्मृती,तत्परता आणि क्रिया '.. या षड्गुणांनी युक्त असे डॉक्टर वास्तवात असतातच.पण हल्ली पेशंट हे 'इंपेशन्ट' झाले आहेत.त्यामुळे बरेचदा डॉक्टरांना ' विद्या, वितर्क' गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.
आमच्या चरक संहितेत तर उत्तम रुग्णाचे पण गुण सांगितले आहेत.
" स्मृती निर्देशकारित्वं अभिरुत्वमथापि च । ज्ञापकत्वं च रोगाणां आतुरस्य गुणा: स्मृता:।।"
उत्तम रोग्याला त्याच्या रोगाच्या कारणांची, पथ्य अपथ्यांची, औषधं घेण्याची आणि वैद्याने दिलेल्या सल्ल्याची पूर्ण आठवण असावी. वैद्याच्या आदेशाचे पालन करणे, न घाबरणे व वैद्यापासून आपल्या रोगाविषयी काहीही न लपवणे ही उत्तम रुग्णाची लक्षणे आहेत.
गंमत अशी की संधिवातासाठी गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी सांगितली की हा वैद्यकीय सल्ला न ऐकता, पेशंट धावत पळत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येतो.त्यावेळेस ऑपरेशन चा सल्ला आमच्या पासून लपवून ठेवतो आणि पंचकर्माने माझे गुडघे बरे करून द्या अशी ताकीदच देतो. पुणे, मुंबई अगदी परदेशात राहणारे बरेच जण दिवाळीत आपल्या घरी अकोल्याला येतात .आता दहा दिवस सुट्टी आहे तर पंचकर्म करून द्या. मग नंतर आम्हाला वेळ नाही असं स्वतःच ठणकावून सांगणारे पेशंट खूप वाढले आहेत. ब्लड प्रेशर, मधुमेहाची औषधं स्वतःच्या मनाने बंद करणारे, वाटेल तेव्हा सुरू करणारे, औषधांचे डोस सोयीनुसार कमीजास्त करणारे, एकाच वेळी एलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषध घेणारे, स्वतःच्या मनाने डायट आणि अघोरी व्यायाम करणारे पेशंट वाढतांना दिसत आहेत. दोन वर्ष एलोपॅथी ,एक वर्ष होमिओपॅथी घेऊनही आराम न पडल्यामुळे आता आयुर्वेद करून बघूया असा विचार करून पेशंट माझ्याकडे येतात आणि येताक्षणी पहिला प्रश्न विचारतात,
' किती दिवसात बरं वाटेल मॅडम?'
पूर्वी मी शास्त्रशुद्ध , प्रामाणिकपणे , सविस्तर समजावून सांगत असे. आता मात्र
"ऍलोपॅथीला दोन वर्ष, होमिओपॅथीला एक वर्ष दिलेत ना?मग आयुर्वेदाला तीन वर्षे लागणारच "असं ठामपणे सांगून देते.
शेवटी काय,कालाय तस्मै नमः.'यथा पेशंट तथा डॉक्टर' हाच आजकालचा मंत्र. रुग्णसेवेचा उदात्त व्यवसाय करतांना आनंदाचे,समाधानाचे क्षण येतातच. पण बरेचदा पेशंटपेक्षा डाॅक्टरच 'बिच्चारा'
होतो. ही डॉक्टरांची बाजू समजून घेण्यासाठीच हा लेखन प्रपंच.
********************************
डॉ साधना आशुतोष कुलकर्णी, अकोला
९४२२९३९५१०
#डॉक्टर्सडे

खुसखुशीत शैलीतून वास्तवदर्शन
ReplyDeleteProfessional hazards!
ReplyDeleteव्यक्ती व काल परत्वे प्रत्येक वैद्यकीय व्यवसायिकास प्रेम , लोभ , गैरसमज तसेच आनंद , दुःख ,संघर्ष ,कृतज्ञ ,कृतघ्न, असे रुग्णानुभव येतात त्यामुळे रुग्णांच्या लक्षणांवरून रोगनिदान आणि वर्तनावरून अनुमान काढणारा डॉक्टर यशस्वी चिकित्सक ठरतो...
ReplyDelete