मध्यंतरी आमचा अंगणातला बगीचा साफसूफ करण्यासाठी एक माळी जोडपं आलं होतं.संपूर्ण बगीचा त्यांनी व्यवस्थित ,नीटनेटका केला पण इकडे तिकडे अनेक तुळशीची झाडं कशीही वाढली होती,ती त्यांनी तशीच ठेवली होती.त्याबद्दल मी त्यांना हटकलं तर ती बाई म्हणाली.
'माऊली ला नाई तोडत आमी.देवी हाय ती.तुमच्या दारी आली ना ती, मंग राहू द्या नं तिले.रायचं तितके दीस राहील ती.' असं म्हणून तुळशीला हात जोडून ती दोघं निघून गेली.
का कुणास ठाऊक पण त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला.मला माझीच लाज वाटली.त्यांच्या प्रगाढ श्रद्धेचा मला हेवा वाटला. एक तुळशीवृंदावन पुरेसं आहे की रोज पाणी घालायला आणि दिवा लावायला.... इतपतच माझी भूमिका कम श्रद्धा होती. पण आत खोलवर मला खूप हलवून गेलं त्यांचं बोलणं.मी राहू दिली तशीच ती झाडं.
आणि नुकतीच बातमी आली की महाराष्ट्रात प्रदूषणाचं प्रमाण कमालीचं वाढलंय आणि त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.मला एकदम तुळस आणि पर्यावरण रक्षण यांचा संबंध आठवला. तुळशीला नैसर्गिक हवा शुद्धीकारक समजलं जातं. दिवसातून बारा तास तुळस ऑक्सिजन सोडत असते.आणि वातावरणातील कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड हे घातक वायू शोषून घेत असते.तसंच तिच्यात असलेलं यूजेनॉल हे संयुग डास,कीटकांना दूर ठेवतं.आणि त्यामुळेच तुळस प्रत्येकाच्या घरासमोर असते.
भारतीय संस्कृतीत तुळशीला पवित्र मानतात,त्याचं कारण पर्यावरणाशी संबंधित असावं का? कारण आपले पूर्वज अत्यंत खुबीने वैज्ञानिक गोष्टींवर धार्मिकतेचं पांघरूण घालून आपल्या कडून योग्य ते करवून घेण्यात तरबेज होते.
पौराणिक कथा बघितल्यास, तुळशीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आढळतात. प्राधान्याने त्यात तुळशीच्या वाट्याला दुःखच आले आहे .कथा आणि कथानायक वेगवेगळे आहेत पण तुळशीची वेदना मात्र तशीच आहे. कसल्या ना कसल्या व्यथेपोटीच तुळशीची उत्पत्ती झाली आहे. पतीच्या आधी भोजन केले म्हणून एका ऋषी पत्नीला राक्षसी होण्याचा शाप भोगावा लागला. या राक्षसी अवतारात ती ऋषी पत्नी अनेक वर्ष जगत राहिली. सुटकेची वाट बघत आयुष्य कंठत राहिली. अखेर एका भक्ताने केलेल्या कृष्णाच्या नामस्मरणाला ऐकून तिला मृत्यू आला. पण तिचा देह तब्बल वर्षभर जळतच राहिला. शंकर-पार्वतीने जेव्हा ही चितान बघितली तेव्हा ते स्तिमित झाले. मृतावस्थेतही ही इतकी शोभायमान आहे. 'मृता लसती- सा एव तुलसी' अशी ही तुलसी आहे. म्हणून त्यांनी तिला स्पर्श केला आणि भूतलावर कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रातःकाळी ती उगवली. भगवान विष्णू ने तिला वर दिला की तुळशी शिवाय माझी पूजा संपूर्ण होणार नाही. तुळशीला मिळालेल्या या मोठेपणामागे तिने सोसलेल्या दुःखाचा डोह जाणवल्याशिवाय राहत नाही.
दुसऱ्या कथेत तर या तुळशीचा देवांनी
उपयोग करून घेतलेला आहे .वृंदा नावाच्या राजकन्येचा पती जालंधर हा प्रचंड शक्तिमान होता .त्याच्यापासून देवांना धोका निर्माण झाला होता. कपटाने देवांनी जालंधरच्या शरीराचे हुबेहूब दोन तुकडे करून वृंदेला दाखविले. वृंदा शोकसागरात बुडून गेली. मग देवांनीच साधू वेष घेऊन जालंधरला जिवंत करण्याचे नाटक केले. हा जालंधर म्हणजे भगवान विष्णूच होते. भोळी वृंदा आनंदली. प्रेमभराने तिने जालंधरला मिठी मारली. देवांचं कपट तिच्या लक्षात आलं नाही. आपल्या पतीशी पूर्ण एकनिष्ठ असलेली वृंदा परपुरुषाच्या स्पर्शामुळे भ्रष्ट तर झालीच पण खऱ्याखुऱ्या जालंधराने तिला हे कृत्य करताना बघितले. जालंधर क्रुद्ध झाला. भ्रष्ट झाल्यामुळे वृंदेची पुण्याई संपली आणि खरा जालंधर मरण पावला. संतापानं आणि दुःखानं वृंदेने विष्णूला शाप दिला. तिच्या शापामुळे भगवान विष्णू अस्वस्थ झाले. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंं साठी भूतलावर तुळस लावली. तिलाच वृंदा किंवा विष्णुप्रिया म्हणतात.
अशा अनेक कथा पुराणात सांगितलेल्या आहेत.स्त्रीरुपात भोगलेली अपरिमित दुःखे आणि परिणामी निर्माण झालेली तुळस.....हे सगळ्या कथांचं सार. म्हणूनच तुळशीचं आणि वेदनेचं अतूट नातं आहे.
या कथा वाचताना आणि तुळशीची वेदना समजून घेताना मला प्रसिद्ध लेखिका श्रीमती दुर्गा भागवतांच्या 'निसर्गोत्सव' पुस्तकाची प्रकर्षाने आठवण आली. तुळशीबद्दल त्या लिहितात,
'अगदी साधी ही तुळस. कधीच डोळ्यात न भरणारी. झाडाची नैसर्गिक शोभा एवढीच की ते नाजूक आहे. मंजिऱ्या तर विचारूच नका. निळी- जांभळी अशी ती अर्धी देठाच्या संपुटात लपलेली फुले - त्यांचा गंधही वाऱ्यावर पारिजातकाप्रमाणे भिरभिरणारा नाही. झाडाची सळसळ नाही. काही नाही. ना या झाडावर भुंगे झेपावत की पाखरे घरकुल करीत. मग असे काय मनोवेधक या तुळशीच्या रोपट्यात आहे? हातात खुडून घेतले तरच त्याचा गंध येतो. आणि हा गंध मात्र जागच्या जागी बसणारा असला तरी ह्रुद्य असतो मादक नसतो. मंजिरीतले प्रत्येक फूल न्याहाळले तर ते थरथरलेले दिसते. लाजेने लपलेले वाटते. प्रत्येक उमललेले फुल अति नाजुक व निखोड रंगछटांनी नटलेले असते. घरातल्या वृंदावनाचे सोडा पण रोपही एरवी कधी एकटे दुकटे नसते. त्याचे बी किती काळेभोर व सुंदर असते वाऱ्याच्या लहरी बरोबर ते सहज उडून जाते आणि पहिल्या सरी बरोबरच उगवते. आणि मग तुळशीचे बनच्या बनच उगवते. अनिवार साधेपणाचे तुळशीचे लहानखोरे रूप भारतीय मनात प्रांतोप्रांती वसलेले आहे. विष्णूच्या प्रणयिनीत ही नायिका लाजाळू असते. ही तुळस हाडामासाची स्त्री नाही तर ते एक झाड आहे. हा झाडरुपी देह असा आहे की त्याचा कायीक संपर्क कुणाही पुरुषाशी होणारच नाही. तिचे बारोमास फुलणारे पुष्पमय ह्रुदय मात्र प्रियकराचे अखंड सांनिध्य शोधत असते. तुळशीचे लग्नही बाळकृष्णाशी होते. ही सुद्धा तिच्या भोगरहित सौभाग्याची आणि अखंड कौमार्याचीच खूण आहे . लग्नाशिवाय स्त्रीने राहू नये. जी राहील ती पतिव्रता असायची नाही, असे मत पुराणात स्वच्छ दिलेले आढळते म्हणून तुळशीच्या लग्नाचा हा पसारा मांडण्यात आला आहे. तुळस ही उत्कंठित प्रेमला असली तरी ती चिरकुमारी आहे हेच या प्रथेचे अंतिम सार आहे. ही कल्पना महाराष्ट्रात पूर्वापार रुढ आहे. उदाहरणार्थ, कुमारिकेच्या चोळीवर तुळशी शिवाय दुसरा कोणताही कशिदा काढायचा नाही असा नियमच महाराष्ट्रात नागपूरच्या बाजूला अजून पर्यंत रूढ होता. तुळशीबद्दलच्या सर्व कथांचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की त्या भीषण कारुण्याने भरलेल्या कथा आहेत.' तुळशीबद्दल दुर्गाबाई भागवतांचं हे भाष्य वाचल्यावर मला तुळशीची वेदना मुळापासून जाणवली. किती अवघड दिव्य पार केल्यावर तिला भारतीय संस्कृतीत मानाचं स्थान मिळालं आहे. मला लोकगीतातल्या दोन ओळी आठवल्या.
तुळशी गं बाई,
काय तुझं हे जीणं, गोविंदाच्या संगे,
वरसा वरसाला लगीन' दुसऱ्या स्त्रियांची दुःखं ऐकून घेणारी ही तुळस स्वतःच वेदनांचं एक मूर्तिमंत रूप आहे. तुळशीचा विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमे पर्यंत केला जातो.ऊस हा मामा म्हणून तिच्या पाठी उभा असतो. तुळशी विवाहा नंतरच लग्नाचे मुहूर्त काढण्याची पद्धत आहे.
आयुर्वेदात अनेक औषधात तुळशीचा वापर केला जातो. सर्दी, खोकला,ताप या औषधात तुळस असतेच.त्वचारोग व कृमींवर तुळस अतिशय परिणामकारक आहे. तिच्यात असणारं, 'थायमॉल' हे तत्व डास, कीटकांना दूर ठेवतं.
अशी ही बहुगुणी तुळस. तिच्या पानाशिवाय नैवेद्य परिपूर्ण होत नाही.मृत व्यक्तीच्या मुखातही तुलसी पत्र ठेवण्याची प्रथा आहे. धार्मिक, पौराणिक, पर्यावरणपूरक, आरोग्यदायी असणारी आणि स्त्री ची सखी असणारी ही तुळस सगळ्यांच्या घरी प्रवेशद्वारीच असते.
पूजने कीर्तने ध्याने,
रोपणे धारणे कलो।
तुलसी दहते पापं,
स्वर्गं मोक्षं ददातिच ।।
अशा या तुळशीचे पूजन प्रत्येक घरात व्हावं असं शास्त्र सांगतं .
श्रीकृष्णासारख्या महानायकाच्या पत्नीचं पद तिला मिळालं आहे पण पूर्वायुष्यात चारित्र्यहीनतेच्या आरोपातून गेल्यावरच. दरवर्षी विवाह वेदीवर चढून आपलं पत्नीत्व सिद्ध करण्याचं दिव्य तिला करावं लागतं तरीसुद्धा श्रीकृष्ण पत्नीचा पहिला मान रुक्मिणीचा असतो. अशा या तुळशीच्या व्यथा समजून घेऊन प्रत्येक भारतीय स्त्रीने तिला योग्य तो सन्मान देऊन जास्तीत जास्त रोपांचं संगोपन करावं हीच काळाची गरज आहे.









