Sunday, October 22, 2023

दसरा - गरज वैचारिक सीमोल्लंघनाची

 


हल्ली मोबाईल किंवा टीव्हीवर, ' द ग्रेट इंडियन फेस्टिवल' ही एमेझाॅन सेल ची जाहिरात दिसायला लागली की समजावे - सणासुदीचे दिवस आलेत.म्हणजे सण आले की खरेदी करायचीच हे समीकरण बाजारपेठेने आपल्या मेंदूवर कोरुन ठेवलेय.नखशिखांत दागिन्याने मढलेल्या,उंची तलम वस्त्रे ल्यायलेल्या अत्यंत देखण्या स्त्रिया चुटकीसरशी विविध प्रकारच्या मिठाया स्वतः तयार करुन घरच्यांना आग्रह करुन खाऊ घालणारी जाहिरात दिसली की समजावे सण आलेत.(अशा महान स्त्रिया शोधा आणि हजार रुपये मिळवा.....अशी माझी फार दिवसांची...असो) मुद्दा हा की सध्या समाजात दोन प्रकारचे समूह प्रामुख्याने दिसतात. सण असले की निर्बुद्ध मालिकेत़ बघितलेल्या सणांचे  उत्सवी , पोषाखी अनुकरण करणारा एक समूह.... हे म्हणे संस्कृतीचे (?) जतन करतात. आणि दुसरीकडे कायम अर्ध्या चड्ड्या घातलेला,दाढीचे खुंट वाढलेला, वर्षभरात कंगवा न लागलेले विस्कटलेले केस असणारा , सदैव लॅपटॉप बडवणारा समूह.यांना  दिवस,रात्र, आंघोळ,जेवण, झोप, सणवार....यांच्याशी कवडीचेही देणेघेणे नसते. ओटीटीवर आवडत्या सीरियलचा सीझन येई दुसरा / तिसरा... तोची दिवाळी दसरा......असेच असावे कदाचित.

      आणि या दोन टोकांच्या मधे असणारी आमची मध्यमवयीन पिढी. एकीकडे लहानपणी साजरे केलेल्या सणांचा सात्विक आनंद शोधण्याची धडपड तर दुसरीकडे सणांचे श्रेयस पकडून ठेवण्याची असमर्थता.

      हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकताच येऊ घातलेला दसरा.दसरा दिवाळीची चाहूल हीच मुळात ऊर्जादायक  असते पण ती केव्हा? जेव्हा बदललेला ऋतू याची हळूवारपणे जाणीव करून देतो तेव्हा.

                    सोन पावलांनी येणारा अश्विन महिना येतानाच भक्ति आणि शक्तीचा संदेश घेऊन येतो. अश्विनातले लख्ख केशरी ऊन, मोकळी हवा, निरभ्र आकाश, टिपूर चांदणे, पिवळ्या- नारिंगी झेंडूंनी रंगलेला निसर्ग..... सगळेच कसे मेंदूला  चेतवणारे असते. अश्विनाच्या हवेतच ऊर्जा असते. नऊ दिवस जगदंबेची केलेली उपासना आणि दहाव्या दिवशीचा दसरा...हे सगळेच दिवस  चैतन्याने रसरसलेले असतात.            

          त्यात मनुष्यप्राणी हा उत्सवप्रिय आहे. भारतीय संस्कृतीत अत्यंत कल्पकतेने आणि  योजकतेने या सण उत्सवांची रचना केली आहे. प्रत्येक सणामागे एक निश्चित विचारांची बैठक आढळून येते आणि त्याचवेळी येणाऱ्या ॠतूचे स्वागत केल्या जाते आणि सोबतच आरोग्याचा एखादा नियमही जोडला जातो.जीवनप्रणाली, विचारप्रणाली ,आणि उपासनाप्रणाली  या तिन्हींचे उन्नयन या सणामुळे व्हावे हे अपेक्षित असते. शुष्क उपदेश सांगितले असते तर ते टाळण्याकडेच माणसाची प्रवृत्ती असते पण सणावारांच्या माध्यमातून आणि प्रतिकांचा उपयोग करून ही संस्कृती आपल्या जीवनात रुजवली गेली आहे.सण उत्सवांद्वारे मन प्रसन्न होते,कौटुंबिक संबंध  दृढ होतात, सामाजिक जाणीवा व्यापक होतात तर प्रतिकांद्वारे बुद्धीचा विकास होतो. भारताचा  सांस्कृतिक इतिहास हा पुस्तकांच्या पानात नाही ,तर त्याच्या जिवंत उत्सवात लिहिला आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व शास्त्रीय माहात्म्य आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण सणांचा संबंध देहाच्या आणि मनाच्या आरोग्याशी तर आहेच पण आत्मिक समाधानाशीही आहे.मानवी जीवन कौटुंबिक,मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक समृद्ध करायचे असेल तर सण उत्सवा मागचा दृष्टीकोन लक्षात घ्यायला हवा.काळ आणि परिस्थितीनुसार कालबाह्य आणि निरुपयोगी प्रथा मोडीत काढून सणांमागचे तत्व व विज्ञान शाबूत ठेवणे गरजेचे आहे.

     या दृष्टीने दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव आहे. या सणासंबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराजय करण्यासाठी लंकेवर स्वारी केली आणि अश्विन महिन्यातल्या दशमीला रावणाला ठार मारले म्हणून या दिवसाला विजयादशमी असं म्हणतात. 

            दुसरी कथा महिषासुरमर्दिनी देवीची आहे पृथ्वीवरील जनतेचा छळ करणाऱ्या  महिषासुराचा नि:पात करण्यासाठी देवाने अष्टभुजा देवीचे रूप धारण करून, दहा दिवस युद्ध करून त्या राक्षसाचा वध केला म्हणूनही या दशमीला विजयादशमी म्हणतात.म्हैसूरला याच देवीला चामुंडेश्वरी या नावाने संबोधतात. 

       रघु राजाने विश्वजीत यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. अशात चौदा विद्या पारंगत असलेला कौत्स त्याच्याकडे दान मागायला आला.  याचकाला विन्मुख पाठवणे ही रघु राजाची संस्कृती  नव्हती.  म्हणून द्रव्य संग्रहासाठी त्याने इंद्रावर स्वारी केली .रघु राजाच्या अचाट पराक्रमाची कल्पना असल्यामुळे इंद्राने युद्धाचे कारण जाणून घेतले व कुबेराला रात्री  शमी व आपट्याच्या वृक्षांवर सुवर्ण मोहरांचा वर्षाव करण्याची आज्ञा दिली. रघुराजांनी या संपत्तीचे कौत्साला दान दिले. आवश्यकतेपेक्षा एकही सुवर्णमोहोर जास्त घेणार नाही हा कौत्साचा निश्चय होता तर या द्रव्याने मी माझी तिजोरी भरणार नाही हा रघु राजाचा आग्रह होता. शेवटी हे सोने लुटून घेण्याचा आदेश त्याने जनतेला दिला. लोकांनी त्या झाडाची पूजा करून  ते सोने लुटून घरी आणले, तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमीचा. तेव्हापासून या झाडाची पाने सोने म्हणून लुटण्याचा प्रघात आहे .

             पांडवांनी देखील अज्ञातवासात असताना आपली अस्त्रे शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. इतिहासाचा मागवा घेतल्यास विजयादशमी चा मुहूर्त स्वारी करण्यासाठी किंवा मोहीम सुरू करण्यासाठी फार महत्त्वाचा होता हे दिसून येते. शिवाजी महाराज, पेशवे याच मुहूर्तावर कूच करीत असत अशी इतिहासात नोंद आहे.                     

         हा सण साजरा करीत असताना सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे. ईशान्य दिशेला असलेल्या शमी किंवा आपट्याच्या  वृक्षाची पूजा करताना, 

    'शमी शमयते पापम् 

    शमी लोहित कंटका |

    धारिण्य अर्जुनं बाणानाम्      

     रामस्य प्रिय वादिनी |

तसेच, 

'अश्वंतक महावृक्ष, 

महादोष निवारणम् |

इष्टानां दर्शनम् देहि, 

कुरु शत्रुविनाशनम् | 

अशी प्रार्थना म्हणून नंतर शमी तसेच आपट्याची पाने आणायची असतात. ही पाने म्हणजे सुवर्ण मोहरांचे प्रतीक आहे. ही पाने आपण देवाला वाहतो, वडीलधाऱ्यांना, मित्रांना देतो. मला हे जे वैभव मिळाले आहे, त्याचा उपभोग मी एकटा घेणार नाही तर सगळ्यांना वाटून या आनंदाचा गुणाकार करायचा..... ही कल्पनाच किती उदात्त आहे. मित्रांबरोबर शत्रूशी ही प्रेमाचे नाते जोडायचे हा दसऱ्याचा संदेश आहे. या दिवशी शस्त्र लेखणी, वाहनांची पूजा करतात. म्हणजे ज्या साधनांनी आपली शक्ती वाढते त्या साधनांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही किती अभिनव कल्पना आहे.या दिवशी रावण दहन करतात.याद्वारे  मनातली दुष्ट वृत्ती नष्ट होऊन रामप्रवृत्तीचा उदय होण्याची प्रेरणा मिळावी हे अपेक्षित आहे. या सगळ्या पद्धती प्रतिकात्मक आहेत.पौराणिक  कथा या कपोलकल्पित असतीलही. पण लहानपणी अशा कथांवर विश्वास बसतो आणि त्यातून मिळणारा संदेश नकळतपणे संस्काररुपात खोलवर रुजत जातो. हे बालवयात झालेले संस्कार मनाला संयमी आणि विवेकी करतात आणि पुढील आयुष्यात सण साजरे करताना कधी वावगे वागू देत नाहीत. 

आश्विन महिना म्हणजे शरद ऋतू .आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील पित्त प्रभावी असते. पित्त म्हणजे बुद्धी, साहस, पराक्रम. अशावेळी प्रत्येकानेच एका चौकटीत बंदिस्त न राहता

 सीमोल्लंघन  करावे अशी अपेक्षा आहे. महिषासूरमर्दिनीचा पराक्रम, रामाने रावणावर केलेली मात,रघुराजाचे दातृत्व, पर धनाबद्दल विरक्ती,कौत्साची निर्मोही वृत्ति.....यातून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे.

  आजच्या युगात वैचारिक सीमोल्लंघन आणि त्यानुसार  केलेली कृती अपेक्षित आहे. या सणातला उत्साह, उल्हास ,आनंद, प्रेम हे जीवनाचे प्रेयस आहे तर,वैचारिक सीमोल्लंघन  हे आत्मशक्ती, संघटन शक्ती, अन्यायनिवारण यासाठी पोषक ठरणारे म्हणजेच या सणातील श्रेयस आहे. उत्सव साजरा करताना श्रेयस आणि प्रेयसाचा योग्य समन्वय हवा.

दसरा विजयाचा सण असल्यानं षड्रिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे सामर्थ्याचे, मैत्रीचे,परस्पर सामंजस्याचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

सण म्हणजे 'धम्माल ', 'मज्जामस्ती ' हे नक्कीच खरे आहे पण त्याचे रूपांतर   'धांगडधिंगा' व 'उन्मादात ' होऊ नये ..हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची तीव्र निकड आहे.

 'आला आश्विन आश्विन, 

 जाती सीमा उल्लंघून,

 लुटा समतेचं सोनं ,

गात मानव्याचं गाणं '

असा समानतेचा,वैचारिक उन्नतीचा,परस्पर सौहार्दाचा दसरा साजरा करु या.मोबाईलवर 'हॅपी दसरा' हा संदेश जगभरात पाठवणाऱ्या मेंढरांच्या कळपात सामील व्हायचे की नाही हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ. साधना कुलकर्णी

9422939510

drsadhana.k@gmail.com


Tuesday, September 12, 2023

यावे गणराया

 


         


यावे देवा महाराजा.गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुझे हार्दिक स्वागत. आपल्या राज्यात तुझ्या आगमनाची रीतसर आणि जय्यत तयारी झाली आहे. शहराकडून गावाकडे जाणाऱ्या रेल्वे ,बस ,खाजगी गाड्यांचं आरक्षण कधीचंच 'फुल्ल' झालेलं आहे. खाजगी वाहनांचे दर नेहमीप्रमाणे प्रचंड वाढले आहेत. तुझ्या विविध मनमोहक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या भव्य, आकर्षक मूर्ती वाजत गाजत, विजेच्या, केबलच्या तारा तोडत आपापल्या  मंडळात डेरेदाखल झाल्या आहेत. ढोल, ताशा लेझीमची प्रॅक्टिस टिपेला म्हणजेच कानाचे पडदे फाटेस्तोवर पोचली आहे. आधीच खड्डे असलेल्या जमिनीवर आणखी खड्डे खोदून  बाप्पा तुमच्यासाठी ठिकठिकाणी भव्य व्यासपीठे उभारली आहेत. खंडणीच्या वसुलीप्रमाणे  वर्गणीही सगळ्या मंडळांनी 'शिस्तीत' जमवली आहे. आपण यावे गणराया.... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

                      बाप्पा तुझ्या उत्सवात बंदोबस्तासाठी पोलिसांची प्रचंड फौज तैनात केली आहे. आता दहा दिवस त्यांना पाणी प्यायला ही सवड नसणार.तुझ्यासारखे व्हीव्हीआयपी आले की सगळी कामं सोडून कायदा आणि सुव्यवस्था योग्य राखण्यात  पोलिसांची काय अवस्था होते हे तुला सांगायची  गरज आहे? सुरळीत वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद केलेले आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे.पण हरकत नाही. तुझ्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची योजना केली आहे. यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी झाला त्यामुळे पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे.शिवाय निर्माल्य पाण्यात शिरवण्याची आपली परंपरा.असो. आपण यावे गणराया..... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

          महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस पुरेसा नसल्याने पिके करपून चालली आहेत. शेतकरी हवालदिल झालाय.पण बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजली आहे. तिथे दुष्काळाचा मागमूसही नाही बरं बाप्पा. तुझे दागिने ,तुझी रेशमी वस्त्र, तुझं मखर, तुझी आरास, तुझ्यासाठी फुले, हार, दुर्वा, नारळ, फळफळावळ यांनी बाजार ओसंडून वाहतोय. दुचाकी चारचाकी वाहनांची खरेदी तुझ्या आशीर्वादाने व्हावी म्हणून अनेकांनी आगाऊ पैसे भरून ठेवले आहेत.सोने खरेदी पण तुझ्या आगमनाप्रित्यर्थ भक्तांनी केली आहे.  तुझ्या साग्रसंगीत  आणि षोडशोपचार पूजेसाठी समस्त ब्रह्मवृंद सज्ज आहे .हल्ली त्यांची वेळ  चार महिने आधीपासून घ्यावी लागते . नाही  तर ऑनलाईन गुरुजींचा पर्याय आहेच की. त्यामुळे सारं काही 'सुशेगात' आहे.आपण यावे गणराया......तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

           ही झाली सार्वजनिक मंडळाची तयारी. पण आम्ही घरी सुद्धा जय्यत तयारी केलीय बरं बाप्पा. अहो ,दोनशे रुपयांनी सिलेंडर स्वस्त झालाय. मग काय विचारता? घर चकाचक स्वच्छ केलं आहे.तांदूळ धुऊन, वाळवून, दळून उकडीच्या मोदकांची तयारी केली आहे. यूट्यूब वरून चीज मोदक, केक मोदक, पनीर मोदक, चायनीज मोदक, मिलेट्स मोदक यांच्या रेसिपीज डाऊनलोड करून ठेवल्या आहेत. अथर्वशीर्षाची पुस्तकं आणून ठेवली आहेत. दहा दिवसांच्या दहा-साड्या आणि पारंपारिक दागिने ठरवले आहेत. आणि यावर्षी ना बाप्पा, माझ्या मैत्रिणीने सरळ चांदीच्या २१ दुर्वा आणि चांदीचे जास्वंदीचे फुल खरेदी केले आहे. म्हणजे रोज दुर्वा तोडायची कटकटच नाही. त्यामुळे आपण यावे गणराया...... तुझं स्वागत घरोघरी दणक्यातच आणि भक्ती भावाने होणार. 

          बाप्पा तू महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहेस. अग्र पूजेचा मान असल्याने तुझी पूजा तर नेहमी आम्ही करतोच पण भक्तीभावाच्या पलीकडेही तुझं आणि आमचं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं आहे. तुझी घरात प्रतिष्ठापना झाली की आख्खी वास्तू चैतन्यमय होते.घरात तुझ्याशी  हितगुज करता येतं, संवाद करता येतो, मनासारखी पूजा करता येते. घरातल्या हवेला मांगल्य आणि पावित्र्याचा गंध येतो. 

          तसंच आम्ही लहान असताना, आमच्या  जोशीवाडीत तुझी स्थापना व्हायची. मग ठरल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी वाडीतील प्रत्येक घराला ठराविक काम असायचं. एक दिवस हार करायचा. मग त्यासाठी पहाटे उठून फुलं तोडायची आणि चोरायची सुद्धा. आपला हार ,आपला नैवेद्य, आपली रांगोळी सगळ्यात चांगली व्हावी म्हणून सगळी घरं मनापासून आणि आनंदानं तयारी करीत. नैवेद्य रुचकर व्हावा यासाठी आईच्या मागे लावलेली भुणभुण, मी काढलेली मोठी रांगोळी लगेच पावसाने वाहून गेली म्हणून कोसळलेलं रडू, तुझ्यासमोर लहानशा स्टेजवर केलेले बाळबोध नाच, नाटकं, नाट्यछटा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत आणि त्यानंतर मिळणारी छोटी छोटी बक्षीसं.... हे सगळंच खूप गोड, लोभस, सात्विक आणि भाबडं होतं. आजूबाजूच्या मंडळांमध्ये परिसंवाद, व्याख्यानमाला, कीर्तन,तीन अंकी नाटकं...असे दर्जेदार उपक्रम असायचे.थोडक्यात काय, उत्सवाचे दहा दिवस हे आमचं संस्कार शिबीरच होतं.

                    पण....पण आता त्यातलं काहीच उरलं नाही. सार्वजनिक मंडळात तुझी रेखीव, सुंदर, सजवलेली महाकाय मूर्ती असते, तुझ्या अंगावर दागिने असतात, दिव्यांची रोषणाई असते, नयनरम्य देखावा असतो, दानपेटीत देणाऱ्यांचा ओघ असतो, वाद्यांचा दणदणाट असतो. सगळं खूप छान असतं पण बाप्पा, तुझी मूर्ती बघून परकं वाटतं. बरेचदा ती मूर्ती  अलिप्त, तटस्थ वाटते. तू नसतो का तिथे? खरं सांग बाप्पा, तू तिथे नसतोच ना?? 

                    खरंतर, गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. प्रादेशिक उत्सव हे भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करित असतात.हा उत्सव बघायला परदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे अत्यंत प्रगल्भ, परिपक्व ,सात्विक आचार विचारांचं प्रदर्शन होणं गरजेचं असतं. पण सध्या सार्वजनिक गणेशोत्सवात शिरलेलं अर्थकारण, राजकारण ,गुंडगिरी ,झुंडशाही, कंपूशाही बघून हा गणेशोत्सव नको असं वाटायला लागलं आहे बाप्पा. तुझ्या उत्सवाचं बाजारीकरण झालं. तुझ्या उत्सवात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होऊ लागली. तुझ्या मंडळात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होऊ लागला. तुझा उत्सव म्हणजे प्रतिष्ठेचं आणि शक्तीचं प्रदर्शन होऊ लागलं .भक्तीची जागा उन्मादाने घेतली. उत्साहाची जागा धिंगाण्याने घेतली .श्रद्धेची जागा अभिमानाने घेतली आणि तुझ्या उत्सवाचा 'इव्हेंट' झाला बाप्पा. 

                        सध्या विलक्षण अस्थिर परिस्थितीत आहे आजचा समाज. एकीकडे  चांद्रयान, विक्रम लँडर, आदित्य एल-वन च्या प्रक्षेपणाने देशाची बौद्धिक उंची वाढते आहे तर दुसरीकडे महिलांना निर्वस्त्र करून, त्यांच्यावर बलात्कार करून, त्यांची धिंड काढणाऱ्या समाजाचा हिंस्र आणि भयंकर चेहरा दिसतो आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे झालेला विकास दिसतो आहे त्याचवेळी त्या महामार्गावर रोज घडणारे अपघात मन सुन्न करताहेत. ज्या देशातले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके मिळवून देशाची मान उंचवतात त्याच देशातल्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार होऊनही त्यांना न्याय मिळत नाहीय. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, नापिकी, प्रदूषण, कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार या सगळ्या विळख्यात आजचा समाज अडकत चालला आहे. बाप्पा, तरीही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आम्ही तुझं जंगी स्वागत करणार आहोत.आपण यावं गणराया...... कारण तुझा उत्सव ही अस्वस्थ समाजाला दिलेली अफूची गोळी आहे. 

                        बाप्पा, तू बुद्धीची देवता आहेस ना? 'त्वं ज्ञानमयो, विज्ञानमयोसि 'असं तुला म्हणतात ना? पण तुला माहित आहे का, सध्या या बुद्धीला कोणीही विचारत नाही, आम्हाला बुद्धी आहे रे पण आम्ही तिचा वापर करित नाही किंबहुना तिचा योग्य वापर केला तर खिल्ली उडविली जाते. आमच्या बुद्धीला गंज चढतो आहे पण आम्हाला त्याचं  काहीही सोयर सुतक नाही .अरे ,आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. आता 'बुद्धिमान', 'मठ्ठ', 'ढ' ही विशेषणं निकालात निघालेली आहेत. पुढे मागे, 'बुद्धी म्हणजे काय रे देवा?' असा प्रश्न तुला विचारला, तर वाईट वाटून घेऊ नकोस. आता तुझ्यासमोर हात जोडून कोणीही ,'चांगली बुद्धी दे देवा'... असं म्हणणार नाही, हे लक्षात ठेव आणि आपण बुद्धीची देवता आहोत या भ्रमात राहू नकोस.         

                        शेवटी काय, काहीही झालं तरी तुझं दणक्यात स्वागत होणारच. त्यामागे भक्ती, श्रद्धा, पावित्र्य नसलं तरीही. तेव्हा बाप्पा, आता तूच ठरवायचं आहेस की यायचं की नाही? 

  ' त्वमेव केवलम् कर्तासि|     त्वमेव केवलम् धर्तासि| 

त्वमेव केवलम् हर्तासि|'.. असं तुला म्हणतात ना? मग तूच आता निर्णय घे. पण तोपर्यंत आम्ही जयघोष करणारच... 'यावं गणराया'.... आणि हळूच म्हणणार, 

         'गणपती बाप्पा मोरया.... 

         पुढच्या वर्षी नक्की काय ते ठरवा'.



डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

 #गणेशोत्सव

#गणपतीबाप्पा

 



Sunday, August 13, 2023

जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?

 




१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला  दर वर्षी मला एकच प्रश्न पडतो की या दिवशी सार्वजनिक सुट्टी का असते ? याचे उत्तरही मला अनेकांनी दिले की हे राष्ट्रीय सण आहेत म्हणून. धार्मिक सणांना सुट्या असतात कारण प्रत्येकाच्या घरी सण साजरे केले जातात. काही धार्मिक विधी पार पाडले जातात, विशिष्ट पूजा असते, नैवेद्य असतो, अन्नदान असते. पण राष्ट्रीय सणाला आपण काय करतो? यावर्षी तर १५ ऑगस्टला मंगळवार आहे. १६ ऑगस्टला पारसी न्यू इयर ची सुटी.१२ ला दुसरा शनिवार तर १३ ला रविवार. म्हणजे सोमवारी १४ ला एक सुटी टाकली की आपोआपच पाच सुट्ट्या पदरात पडणार.हा अगदी मणीकांचन योगच. या योगाची पर्वणी साधून  पावसाळी सहलींना या पाच दिवसात नक्की ऊत येणार. सगळी पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून  जाणार.अशा क्वचितच लाभलेल्या संधीचा फायदा न घेणारा करंटाच.ही सगळी मज्जा फक्त एका १५ ऑगस्ट च्या सुट्टीमुळे. आणि आमच्यासारखे सहलीला न जाणारे  - झेंडावंदन करणार. त्यासाठी आठवडाभरापासून कोणता ड्रेस, कोणती साडी, कोणती थीम, यावर गहन चर्चा घडणार. त्यासाठी वेळप्रसंगी नवीन खरेदी ही होणार. झेंडावंदना नंतर फोटो आणि रिल्स काढण्याचा अत्यावश्यक राष्ट्रीय कार्यक्रम होणार आणि मग आपापल्या घरी जाऊन आराम करणार नाही तर मज्जा करणार.

           देशाच्या स्वातंत्र्यदिनी एक  राष्ट्रगीत म्हणण्याशिवाय दुसरं काय करतो आम्ही? नाही म्हणायला काही उपक्रम राबवलेही जातात पण त्यात देशप्रेमाशिवाय प्रसिद्धीचाच हव्यास दिसून येतो. नवरात्रात अंगात देवी येते त्याचप्रमाणे अनेकांच्या अंगात या दिवशी देशभक्तीचा संचार होतो .अचानक  स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांबद्दल उमाळा दाटून येतो. आणि संध्याकाळपर्यंत हे उसने अवसान जिरले की रीतसर श्रमपरिहाराचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडतो.

            दीडशे वर्षाच्या गुलामगिरीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या तन मन धनाची आहुती देऊन लढा दिला त्यांच्यासाठी १५ ऑगस्ट ला आम्ही  वाट्टेल तशी 'धमाल' करतो, 'धांगडधिंगा' करतो, 'एन्जॉय' करतो.......हे खटकतं. कशाला हवी ही सुटी? सकाळी झेंडावंदन करून नेहमीसारखं कामाला लागायचं.म्हणजे निदान राष्ट्रीय सणाचा धिंगाणा तरी होणार नाही. पण मग  देशप्रेम दाखवण्याची अधिकृत संधीच हातची जाईल की हो. 'देशभक्ती म्हणजे काय रे भाऊ?'असा प्रश्न आज सहज पडू शकतो.  समाजाची प्रासंगिक देशभक्ती उफाळून येण्याचे प्रसंग घडतातही अधूनमधून. नुकतेच झालेले चांद्रयानाचे अंतराळातील प्रक्षेपण ,भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पटकावलेली पदके, भारतीय चित्रपटाचे ऑस्कर मध्ये झालेले नामांकन, सर्जिकल स्ट्राईक.. या आणि यासारख्या अनेक प्रसंगात आपली देशभक्ती उफाळून येत असते. अर्थात ती यायलाच हवी पण ही देशभक्ती प्रासंगिक असते आणि  केवळ भावनेच्या स्तरावर असते. देशभक्ती ही केवळ भावना नाही तर ती एक विचारधारा आहे आणि त्यानुसार केले जाणारे आचरण आहे. आणि या देशभक्तीच्या भावना, विचार, कृतीचे एकत्रित रसायन ज्यांच्या नसांमधून नेहमी वहात असते.. तो खरा देशभक्त. 

आज अनेक मंडळी, अनेक संस्था देशासाठी निस्वार्थी वृत्तिने अथक कार्य करताहेत.त्यांच्यामुळे देशाची मान उंचावली आहे.पण लेखाचा हा विषय नाही.                                                    आज  आपला देश ७६ वर्षाचा झाला आहे. आमच्या साठीच्या पिढीने एकोणिसाव्या शतकातली वर्षोनुवर्षे न बदलणारी आणि कष्टाळू जीवनशैली जगली आहे. त्याचवेळी विसाव्या  शतकातली तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत बदलणारी, वेगवान आणि सुखसोयींनी युक्त अशी जीवनपद्धती आज आम्ही अनुभवत आहोत. वयाच्या या टप्प्यावर किंबहुना कोणत्याही वयात, मी देशासाठी काय केले आहे? किंवा काय करू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला निदान राष्ट्रीय सणाच्या दिवशी तरी विचारायला हवा. 

            'आम्ही नियमित मतदान करतो. नोकरी व्यवसाय करतो. सामाजिक कायदे पाळतो. नियमित कर भरतो. कुटुंब व्यवस्था अबाधित राखतो. आपल्या धर्म संस्कृतीचं पालन करतो .आणखी देशासाठी सामान्य नागरिक वेगळं काय करणार?' असेच उत्तर बहुतांशी  दिले जाण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकाची जबाबदारी आम्ही पाळतो या भ्रमात आपण असतो आणि देशातील अराजकता,अव्यवस्था, हिंसाचारादि बाबींना सरकारला दोषी ठरवतो.डोळे उघडून बघितले तर सामान्य नागरिक ही खूप काही करु शकतो. 

            ताजे उदाहरण घ्यायचे तर समान नागरी कायदा . २०१६ साली हा कायदा लागू करावा का यासाठी आयोगाने जनमताची मागणी केली होती. त्यावेळी जनतेकडून ७५३७८ सूचना आल्या. त्या आधारे विधी आयोगाने १८५ पानांचा अहवाल सादर करून समान नागरी कायदा लागू करू नये

 हा निकाल दिला होता. हे सामान्य नागरिकाच्या शक्तीचे उदाहरण आहे. आताही परत या कायद्यावर विचार मंथन सुरू झाले आहे .आणि आयोगाने १४ जून २०२३ पासून जनतेला आपल्या सूचना देण्याचे आवाहनही केले होते.आपल्या लोकसंख्येचा विचार करता अगदी अत्यल्प प्रमाणात जनतेने ही मत /सूचना देण्याची जबाबदारी  पार पाडली आहे.                       

              'गिव्ह इट अप' ही मोदी सरकारने आवाहन केलेली योजना. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर विकत घेतल्यावर ग्राहकाच्या खात्यात सरकारकडून सबसिडी जमा होत असते. आर्थिकदृष्ट्या संपन्न गटाने ही सबसिडी न स्वीकारता सरकारला परत केली तर समाजातील गरीब वर्गाला त्याचा फायदा होतो. ही संकल्पना 'गिव्ह इट अप' कॅम्पेनची आहे. २३ एप्रिल २०२३ पर्यंत सबसिडी नाकारणाऱ्यांची संख्या जवळजवळ १.१३ करोड झाली आहे. संपन्न गटाचा विचार करता, वरिल संख्या नगण्य आहे.

              भारतीय संविधानात भारतीयांचे मूलभूत हक्क आणि अधिकारांची नोंद आहे हे आपल्याला माहित आहेच पण ३ जानेवारी १९७७ पासून 'कलम ५१-क' द्वारे 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये' विशद करणारा भाग संविधानात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे ३ जानेवारी हा नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळण्यात येतो. किती नागरिकांना याबद्दल माहिती आहे? 

              उदाहरणादाखल, 'ड'- हे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे  -  हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आणि नुकतीच मणिपुर मध्ये घटलेली घडलेली घटना काय सुचवते? 

        'ज' - हे कर्तव्य म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन,मानवतावाद ,शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे - हे आहे. या संदर्भात, मध्य प्रदेशातील सिहोर या गावी रुद्राक्ष मिळवण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली व काही भाविक मृत्युमुखी पडले. ही घटना काय दर्शविते?

 'जनहित याचिका' दाखल करण्याचे धाडस किती नागरिकांमध्ये असते? राजस्थान मधील एका खेड्यात भंवरीदेवी या महिलेने एका वर्षाच्या मुलीच्या विवाहाला विरोध केला त्यामुळे स्थानिक लोकांकडून धमक्या व तिच्या घरावर बहिष्कार टाकण्यात आला. २२ सप्टेंबर १९९२ ला पाच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. भंवरीदेवीने न्यायालयात धाव घेऊनही ती न्यायापासून वंचितच राहिली. यासंदर्भात भंवरीदेवीच्या वतीने नयना कपूर या वकील महिलेने सुप्रीम कोर्टात राजस्थान सरकार विरुद्ध जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे भंवरीदेवीला न्याय तर मिळालाच पण या निकालामुळे स्त्रियांच्या हक्कांविषयी उच्च न्यायालयीन स्तरावर देखील सुधारणा झाली . स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल या जनहित याचिकेचा निकाल हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

 आज आपण सामान्य नागरिक हे, 'कळते पण वळत नाही' या परिस्थितीत आहोत. अवतीभवती ची परिस्थिती आणि सत्तेचे गलिच्छ राजकारण यामुळे अस्वस्थता सगळ्यांमध्येच आहे .पण संवेदनशील व बुद्धिमान वर्गाने आपल्या मनाच्या खिडक्या बंद करुन स्वतः च्या कोषात जगणे सुरु केले आहे हे फार गंभीर आहे .आणि या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी हा सामान्य नागरिक दृकश्राव्य माध्यमाच्या आहारी गेला आहे. अन्नावाचून तडफडणारे लोक, रस्त्यावर घडलेला अपघात, डोळ्यासमोर होणारी महिलेची विटंबना..... याकडे दुर्लक्ष करून तो आभासी आनंदात रमला आहे, कायम पार्टी मूडमध्ये राहू इच्छित आहे हे तर अत्यंत भयावह आहे.वाढत जाणारा हा कोडगेपणा पुढच्या पिढीवर काय परिणाम करेल याची कल्पनाही करवत नाही.   

 प्रसिद्ध पोर्तुगाल लेखक 'सारामागो' यांच्या प्रचंड गाजलेल्या ' द इयर ऑफ द डेथ ऑफ रिकार्डो रिस' या पुस्तकात सध्याच्या सामान्य माणसाच्या मनोवृत्तीवर अचूक भाष्य केले आहे. ते लिहितात,  

'वी स्लीप व्हेन वी शुड बी ऑन अवर गार्ड'

 'वी डिपार्ट व्हेन वी शुड बी अरायव्हिंग' 

 'वी क्लोज द विंडो व्हेन वी शुड लीव्ह इट ओपन'

       ‌‌    आजच्या जगातल्या सामान्य समाजाचे हे यथार्थ वर्णन आहे .आज  तांत्रिक प्रगती व आर्थिक सुबत्तेमुळे माणूस सुखी झाला आहे पण नागरिक म्हणून तो आत्मकेंद्रित आणि निष्क्रिय झाला आहे. चंगळवादी वृत्ती आणि निबर मनाचा जबरदस्त पगडा असल्यामुळे मानवी मेंदूच्या सारासार विवेकाची क्षमता कमी होत चालली आहे.    

          पारतंत्र्यात असताना अनेक महान नेतृत्वांनी जनतेमध्ये एक विचारधारा रुजवली,जागरुक केले. पण आज या स्वतंत्र भारतातल्या  बेजबाबदार नागरिकांना योग्य मार्ग दाखविणारे एकही नेतृत्व नाही ही खरी शोकांतिका आहे. आज लोकमान्य टिळक असते तर,'जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?'असे त्यांनी खडसावून विचारले असते.आणि त्यांच्या या शब्दांनी नक्कीच जादूची कांडी फिरली असती.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी,

अकोला, ९४२२९३९५१०

#स्वातंत्र्यदिन

#भारतीयनागरिक

#गिव्हइटअप

Tuesday, July 11, 2023

बाईपणाचं दळण थांबव रे देवा

  




 जवळपास चाळीस पन्नास वर्षांपूर्वी  जो विषय ज्वलंत होता,ज्या विषयाचा चघळून चघळून चोथा झाला आहे तोच विषय आकर्षक स्वरुपात,कसलेल्या अभिनेत्रींना घेऊन, चुरचुरीत विनोदाची फोडणी देऊन,  तिन्ही त्रिकाळ प्रसिद्धीचा, प्रमोशनचा मारा करुन महाराष्ट्रातील स्त्री प्रेक्षकांवर थोपवलेला सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'.थोडक्यात काय, चित्ताकर्षक वेष्टनात गुंडाळलेली जुनी पुराणी वस्तू.किंवा नव्या बाटलीत जुनी दारु म्हणजे ' बाईपण भारी देवा '.

       बाई असल्यामुळे, सर्वसाधारणतः  कौटुंबिक,  भावनिक गुंत्यात अडकणं हा तिच्या जीवनातील अपरिहार्य भाग असतोच.त्यात नोकरी करुन घर सांभाळणाऱ्या बाईची तर तारेवरची कसरतच असते.  अशाच सहा सख्ख्या बहिणींच्या आयुष्यातले गुंते ही सिनेमाची मुख्य कथा.आणि त्यातून सुटण्यासाठी या सहा बहिणी जो भन्नाट (अजिबातच न पटणारा, अवास्तव) मार्ग निवडतात , तो म्हणजे 'बाईपण भारी देवा'. 

       मुळात या बहिणीं समोरचे प्रश्न अगदी क्षुल्लक आहेत.फक्त सुचित्रा बांदेकरच्या घटस्फोटाचा प्रश्न सोडून. त्यातही शिल्पा नवलकर,वंदना गुप्ते आणि रोहिणी हट्टंगडी यांची घुसमट ( जी अतिशय वरवरची आहे) त्यांनी स्वतःच निर्माण केली आहे.खरंतर काहीही कारण नसतांना चोवीस तास चेहऱ्यावर बारा वाजलेल्या रोहिणी हट्टंगडीच्या नवऱ्याचीच घुसमट व्हायला हवी होती.त्याचं पुरुष पण भारी रे देवा! या बहिणींची दु:खं म्हणजे तूप साखरेत घोळवून, लाडावून कुरवाळून मोठी केलेली दु:खं आहेत.अशा दु:खांना फारसं महत्त्व न देता आजची बाई जगण्याचा आनंद घ्यायला शिकली आहे. अशी फालतू दुःखें आम्ही आणि आसपासच्या बायकांनी अनेकदा अनुभवली आहेत आणि त्यातून लीलया बाहेर पडलो आहोत. बाईपणाच्या वास्तव दुःखांच्या आणि कोंडमाऱ्याच्या जवळपासही हा सिनेमा पोचत नाही.नुकतंच बाईपणातून बाहेर निघून एक माणूस म्हणून जगण्याच्या आजच्या काळात बाईला या सिनेमाने परत बाईपणात ढकललं आहे. शिकलेल्या,नोकरी करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या या सहा बहिणी इतक्या दुबळ्या का असाव्यात की, मंगळागौर स्पर्धेचा त्यांना आधार घ्यावा लागावा आणि तो ही एकत्रितपणे? आज समाजात ,भयंकर संकटांना एकटीने सामोरं जाऊन जीवनाच्या लढ्यात यशस्वी झालेल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी बाईपण भारी आहे हे सिध्द केलं आहे.अशावेळी हा उथळ सिनेमा निव्वळ हास्यास्पद वाटतो.

    मुलांचा वाढदिवसाचा सोहळा सुरु असताना कोणती आई प्रेग्नंसी टेस्ट करेल हो?आणि मेनोपॉज आला म्हणजे आभाळ कोसळलं की काय?(आम्हाला तर हायसं वाटलं बुवा) चिनूच्या ऑपरेशनच्या वेळेस तिचा नवरा आणि सासू कुठे होते? कडक अण्णा एकाएकी मऊ कसे झाले? स्टेशनवरचा नाच म्हणजे निव्वळ मूर्खपणाचा कळस.

       असो.कलाकार सगळेच कसलेले आहेत.वंदना गुप्ते कितीही आवडत असली तरी तिला आता बघवत नाही.  ती स्वतःच्याच प्रेमात आहे."मी- वंदना गुप्ते" याच ऍटिट्युड ने तिने काम करु नये. सुकन्या कुलकर्णी जबरदस्त .तिची बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरचे हावभाव  अप्रतिम. पण नोकरी करणारी बाई इतकी बावळट?असो.

       पण दिग्दर्शक केदार शिंदे खरंच हुशार.त्यांनी आजच्या मध्यमवर्गीय,मध्यमवयीन बायकांची मनोवृत्ती अचूक हेरली आहे. "मज्जा" आणि "एन्जॉय" हा प्राधान्य क्रम असणाऱ्या बायकांची नस त्यांनी बरोबर पकडली आहे. सिनेमातल्या वरवरच्या झगमटाला बाईपणाचं लेबल लावलं आणि त्याला नाव देतांना "भारी" या  जरीची झालर लावली.झालं. तमाम महिला वर्ग खुळावलाच की हो.  थिएटरला तीर्थयात्रेचं स्वरुप आलंय चक्क. बायका झुंडीने सिनेमाला ड्रेस कोड करुन जाताहेत,रील,फोटो काढताहेत. थिएटर मधून बाहेर निघताना आपण "कसल्या भारी" आहोत या आनंदात न्हाऊन निघताहेत. सगळ्याच बायकांचा आत्मविश्वास वाढलाय म्हणे हा सिनेमा बघून - अर्थातच... जमत नसेल, सोसत नसेल तरी सार्वजनिक ठिकाणी नाच करण्याचा हो. हा केदार शिंदे च्या यशाचा फॉर्म्युला. 

      खरंतर "बाईपण किती उथळ देवा"...असा समज या सिनेमामुळे होतोय.पण झापडं बांधूनच वावरायचं असेल तर देव त्यांना सद्बुद्धी देवो !!  असो. डोकं न वापरता सिनेमा डोक्यावर घ्यायचा हे ठरवूनच टाकलं असेल तर प्रेक्षक स्त्रियांचंही "बाईपण भारीच भारी" हो देवा.

     

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

#बाईपणभारीदेवा

Saturday, July 1, 2023

यथा पेशंट: तथा डॉक्टर': ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

   


     


  माझी रोजची ओपीडी. सकाळी नऊ पासून सुरू होणारी. आमचे निमसरकारी आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय. त्यामुळे पेशंटचा प्रचंड ओघ. कॉर्पोरेट  हॉस्पिटल सारखे 'एसी केबिन', 'रिसेप्शनिस्ट', 'अपॉइंटमेंट'.. असे चोचले आम्हाला परवडणारे नाहीत. पेशंट स्वतःच आपली लाईन लावणार, मध्येच घुसणार, भांडणं होणार... हे रोजचंच चित्र. एक पेशंट केबिनमध्ये तपासायला आत शिरला की दुसरा पेशंट एक पाय आत एक पाय बाहेर असा उभा राहणार. तिसरा पेशंट मधूनच पडदा बाजूला करून डोकावणार .चौथा पेशंट खिडकीतून आत बघणार हे नित्याचंच. त्यादिवशी बारा वाजत आले होते. जवळजवळ ४० पेशंट पासून झाले होते. १२ नंतरची वेळ फारच आणीबाणीची असते. तपासण्याचा, बोलण्याचा, ऐकून घेण्याचा.... सगळाच वेग मंदावला असतो. एक ज्येष्ठ   गृहस्थ बराच वेळ पासून मला बाहेर उभे दिसत होते. त्यांना आत येण्याची काही घाई दिसत नव्हती.ते सारखे आत डोकावून बघत होते. सगळे पेशंट आटोपल्यावर मी लांब श्वास घेऊन उठले. आता भूकही लागली होती. तेवढ्यात ते आजोबा आत आले. 

   "या दवाखान्यात तुम्ही पोटदुखीवर औषध देता का हो?"

    त्यांचा हा प्रश्न ऐकून, 'नाही हो. मी इथे भुवया कोरून देते'- - असं सणसणीत उत्तर द्यायची इच्छा मला झाली पण मी स्वतःला आवरलं. डोक्यात जाणाऱ्या पेशंटशी - तेही विशेषतः बारा वाजल्यानंतर, कमीत कमी मनस्ताप करून कसं बोलायचं याचा माझ्याजवळ फॉर्म्युला तयार असतो. उत्तरा दाखल मी फक्त मान हलवली - होकारार्थी. "पोटदुखीवर पंचकर्म पण करतात का हो?" 

  परत माझी होकारार्थी मान हलली. 

  "पंचकर्माचा खर्च किती येतो?" 

  आता मात्र माझ्या श्वासाची गती वाढू लागली. मी डोळ्यांनी इशारा करून नॉन स्ट्रायकर एन्डवर उभ्या असलेल्या माझ्या हाऊस ऑफिसर कडे बॅटिंग दिली.

हाऊस ऑफिसर तरुण, उत्साही आणि अननुभवी असल्याने,त्याने आजोबांचे बॉल दणादण हाणायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात मी एक ते शंभर आकडे मनात मोजून दीर्घ श्वास घेतले.आजोबांच्या ज्ञानात कितपत भर पडली देव जाणे. आता आजोबांनी माझ्याकडे बॉल टाकला. 

"अहो पंचकर्म करायला आठ दिवस लागतात? आम्हाला तर परवाच पुण्याला जायचं आहे." 

आता तर माझ्या हृदयाची गती पण वाढू लागली. त्यांचा बॉल मी न टोलवता सोडून दिला आणि जास्तीत जास्त मख्ख चेहरा करून बसले. 

"मॅडम सांगा ना, काय करायचं ?"-आजोबा. 

आता मात्र त्यांच्या बाॅलवर सीमापार फटका मारायची वेळ होती. 

"अहो पोटदुखीवर पंचकर्मच करायचं, हे तुम्ही कसं काय ठरवता? आधी पेशंटची हिस्ट्री, तपासणी, आजाराचं निदान, गरजेनुसार चाचण्या हे सगळं झाल्यावरच आम्ही ठरवू औषध द्यायचं की पंचकर्म करायचं"

" मॅडम, सगळ्या तपासण्या झाल्या आहेत. सोनोग्राफी, एक्सरे झाले आहेत. पोटदुखीचं निदानही झालं आहे औषधेही खूप दिवस घेतली. काही फायदा नाही. आता ठरवलं , पंचकर्मच करायचं. अहो कित्येक वर्षापासून मी याच भागात राहतोय पण मला माहीतच नव्हता हा दवाखाना"- आजोबा. 

आता मात्र सीतेसारखं मला या दवाखान्यासकट जमिनीत गडप व्हावं असं क्षणभर  वाटून गेलं. गेल्या तीस वर्षाची रुग्णसेवा आजूबाजूंच्या खिजगणतीतही नसावी? 

"हे बघा आजोबा, आधी तुम्ही टेबलवर झोपा .तुमची लक्षणं, हिस्ट्री सांगा. मग काय ते ठरवू ."आता मी अंपायरच्या भूमिकेत शिरले. 

   "नाही हो. मी फक्त चौकशी करायला आलो होतो. माझ्या मिसेसला पोट दुखीचा त्रास आहे. तिला केव्हा आणू?" 

   आजोबांनी गुगली टाकला आणि मी ताडकन उठून थर्ड अंपायर म्हणजे सिस्टर कडे ती केस सोपवून केबिन बाहेर पडले.

      एकदा तर गंमतच झाली .तीव्र कंबर दुखीमुळे उभे राहणे, चालणे कठीण झालेला एक पेशंट पंचकर्म करण्यासाठी दवाखान्यात भरती झाला. उपचार सुरू झाल्यावर त्याची लक्षणे हळूहळू कमी होऊ लागली. रोज राउंड घेताना तो कंबरेचं दुखणं सोडून इतर बऱ्याच तक्रारी सांगायचा.

अंगाला खाज, डोकेदुखी, छातीत जळजळ वगैरे लक्षणांवर त्याला आम्ही औषध देत होतो. त्यातली खाजेची, डोक्याची कोणती गोळी आहे हे तो  हाऊस ऑफिसरला विचारत असे. आठ दिवसाच्या पंचकर्माने त्याची कंबर दुखी पूर्ण नाहीशी झाली. तो उभा राहून चालू लागला. पण अंगाला खाज, डोकेदुखी, जळजळ काही कमी होईना. त्यामुळे तो दवाखान्यातून सुट्टी घ्यायला तयार नव्हता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. मी सिस्टरला त्याच्यावर बारीक नजर ठेवायला सांगितली. तेव्हा हे महाशय डोकेदुखीच्या गोळ्या बायकोसाठी, खाजेच्या गोळ्या आईसाठी आणि छातीत जळजळीच्या गोळ्या मित्रासाठी जमा करून स्वतः 'प्रॅक्टिस' करत होते. दुसऱ्या दिवशी राऊंडच्या वेळेस त्याचं तेच डोकेदुखी खाजेचं रडगाणं सुरू झालं. मी म्हटलं, 

"हे बघा, तुम्ही कमरेच्या दुखण्यासाठी भरती झालात ते दुखणं बंद झालं ना? आता बाकी लक्षणांसाठी औषध देऊनही जर आराम होत नसेल तर

आपण आता डोकेदुखीसाठी सिटीस्कॅन, जळजळीसाठी एंडॉस्कॉपी आणि खाजेसाठी एलर्जी टेस्ट करूया. मी चिठ्ठी लिहून देते तुम्हाला." 

  ही माझी मात्रा अचूक लागू पडली आणि माझ्या राउंड नंतर पेशंट लगेच गाशा गुंडाळून घरी परतला.

         असे मजेदार अनुभव आणि अफलातून किस्से समस्त डॉक्टरांच्या पोतडीत भरपूर जमा झालेले असतात. माझ्या 30 वर्षाच्या अनुभवानुसार कोणत्याही पेशंटशी पाच मिनिटं बोलल्यावर त्याची वृत्ती लक्षात येते. मग त्याच्याशी कसं, किती,कोणत्या स्वरात, कोणत्या भाषेत,कशा पद्धतीनं बोलायचं हे लगेच ठरवता येतं.                                                       आजकाल डॉक्टरांच्या नावानं खूप ओरड केली जाते. पूर्वी डॉक्टर हे देवाप्रमाणे होते. आजकाल असे डॉक्टर्स अभावानेच आढळतात असे अनेकांचे मत असते. परंतु पेशंट सुद्धा पूर्वीसारखे कुठे राहिलेत? हल्लीचे पेशंट गुगल विद्यापीठातून अर्धवट माहिती घेऊन येतात. कशा पद्धतीचे उपचार करायचे हे डॉक्टरच्या ऐवजी तेच ठरवतात.तपासण्या करण्याचा अट्टाहासही अनेक पेशंटचा असतो.  

         खरं तर चरक महर्षींनी सांगितल्या प्रमाणे, 'विद्या, वितर्क,विज्ञान, स्मृती,तत्परता आणि क्रिया '.. या षड्गुणांनी युक्त असे डॉक्टर वास्तवात असतातच.पण हल्ली पेशंट हे  'इंपेशन्ट' झाले आहेत.त्यामुळे बरेचदा डॉक्टरांना ' विद्या, वितर्क' गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.

          आमच्या चरक संहितेत  तर उत्तम रुग्णाचे पण गुण सांगितले आहेत.

  " स्मृती निर्देशकारित्वं अभिरुत्वमथापि च ।  ज्ञापकत्वं च रोगाणां आतुरस्य गुणा:  स्मृता:।।"

उत्तम रोग्याला त्याच्या रोगाच्या कारणांची, पथ्य अपथ्यांची, औषधं घेण्याची आणि वैद्याने दिलेल्या सल्ल्याची पूर्ण आठवण असावी. वैद्याच्या आदेशाचे पालन करणे, न घाबरणे व वैद्यापासून आपल्या रोगाविषयी काहीही न लपवणे ही उत्तम रुग्णाची लक्षणे आहेत. 

       गंमत अशी की संधिवातासाठी गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी सांगितली की हा वैद्यकीय सल्ला न ऐकता, पेशंट धावत पळत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येतो.त्यावेळेस ऑपरेशन चा सल्ला आमच्या पासून लपवून ठेवतो आणि पंचकर्माने माझे गुडघे बरे करून द्या अशी ताकीदच देतो. पुणे, मुंबई अगदी परदेशात राहणारे बरेच जण दिवाळीत आपल्या घरी अकोल्याला येतात .आता दहा दिवस सुट्टी आहे तर पंचकर्म करून द्या. मग नंतर आम्हाला वेळ नाही असं स्वतःच ठणकावून सांगणारे पेशंट खूप वाढले आहेत. ब्लड प्रेशर, मधुमेहाची औषधं स्वतःच्या मनाने बंद करणारे, वाटेल तेव्हा सुरू करणारे, औषधांचे डोस  सोयीनुसार कमीजास्त करणारे, एकाच वेळी एलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषध घेणारे, स्वतःच्या मनाने डायट आणि अघोरी व्यायाम करणारे पेशंट  वाढतांना दिसत आहेत. दोन वर्ष एलोपॅथी ,एक वर्ष होमिओपॅथी घेऊनही आराम न पडल्यामुळे आता आयुर्वेद करून बघूया असा विचार करून पेशंट माझ्याकडे येतात आणि येताक्षणी  पहिला प्रश्न विचारतात,

  ' किती दिवसात बरं वाटेल मॅडम?'

   पूर्वी मी शास्त्रशुद्ध , प्रामाणिकपणे , सविस्तर समजावून सांगत असे. आता मात्र 

   "ऍलोपॅथीला दोन वर्ष, होमिओपॅथीला एक वर्ष दिलेत ना?मग आयुर्वेदाला तीन वर्षे लागणारच "असं ठामपणे सांगून देते. 

    शेवटी काय,कालाय तस्मै नमः.'यथा पेशंट तथा डॉक्टर' हाच आजकालचा मंत्र. रुग्णसेवेचा उदात्त व्यवसाय करतांना आनंदाचे,समाधानाचे क्षण येतातच. पण बरेचदा पेशंटपेक्षा डाॅक्टरच 'बिच्चारा'

    होतो. ही डॉक्टरांची बाजू समजून घेण्यासाठीच हा लेखन प्रपंच.

    ********************************

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी, अकोला

९४२२९३९५१०

#डॉक्टर्सडे

Sunday, June 4, 2023

आभासाशी जडले नाते

 आभासाशी जडले नाते....    


सकाळ झाली. डोळे उघडले.  हातपाय ताणून आळस दिला आणि प्रातर्विधीसाठी उशी खालचा मोबाईल हातात घेतला.  दचकलात ना ? पण तरुण पिढी नाही दचकणार. कॉलेजमध्ये एकदा निरोगी जीवनशैली विषयी बोलत असताना 'प्रातर्विधी' हा शब्द ऐकल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उमटलं .

       'सकाळी उठल्याबरोबर काय करायचं असतं?' मी सोप्या शब्दात विचारलं.  

       'उठल्याबरोबर आधी आम्ही मोबाईल बघतो मॅम' - - डोक्यावर केसांचा उभा तुरा असलेल्या एका मुलाने उत्तर दिलं. तुरा कसला, त्याच्या ताठ उभ्या केसांनी बाथरूम घासता येईल का? हा भलताच विचार माझ्या डोक्यात आला.  डोक्याच्या वरच्या भागात ब्रश सारखे उभे केस आणि खालच्या भागात नाममात्र हिरवळ असणाऱ्या या मुलाला 'प्रातर्विधी' हा शब्द उच्चारण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल ही मला खात्री पटली आणि मी विषय आवरता घेतला. 

        असो. तर थोडक्यात काय की हल्ली पूर्वीच्या व्याख्या.... चुकलं - काॅन्सेप्ट बदलत चाललेय.

 'प्रातर्विधी' म्हणजे सकाळी डोळे उघडल्याबरोबर 'कराग्रे वसते लक्ष्मी' सारखं 'प्रभाते मोबाईल दर्शनम् अशी प्रथा रुढ झाली आहे. शिवाय 'आमच्या पिढीने (साठीच्या)  तर काळाच्या बरोबर चालायला हवं'... अशी येता-जाता तरुण पिढी आमच्यावर पिंक टाकून मोकळी होत असते. तात्पर्य हेच की मी पण प्रातर्विधीसाठी मोबाईल उघडला. वाढदिवस ,लग्न वाढदिवस, निधन वार्ता, गुड मॉर्निंग, सुविचार, विनोद,देवदर्शन ,रेसिपीज ,कविता ,लेख ,प्रवचन...... 

 अबब!!! मोबाईल ओसंडून वाहत होता .या सगळ्यांना उत्तर देणं, हा कार्यक्रम हल्ली जीवनावश्यक कृतींमध्ये मोडत असल्याने खऱ्याखुऱ्या प्रातर्विधीची वाट लागणार नाही तर  दुसरं काय होणार?

      या व्हाॅट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम नामक अक्राळविक्राळ  राक्षसाने जेव्हापासून घराघरात प्रवेश केला तेव्हापासून माणसाचं आयुष्यच बदललंय.अन्न,वस्त्र, निवारा यापेक्षाही मोबाईल च्या गरजेला जास्त प्राधान्य दिलं जातंय. या मोबाईलमुळे माणसांच्या मेंदू मधे बदल व्हायला लागले आहेत.ज्याप्रमाणे उत्क्रांती नंतर माणसाचं शेपूट गळून पडलं तसंच या तांत्रिक युगात मेंदू मधलं बुद्धी आणि विवेकाचं केंद्र गळून त्या जागी मेंढरांच्या मेंदू तील केंद्र निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे की काय, असं मला नेहमी वाटतं. (Herd mentality)

      हल्ली माणसांचे भलतेच समूह निर्माण झालेले आहेत. एक समूह आहे तो अंगठे बहाद्दरांचा. कोणीही, कोणतीही, कसलीही पोस्ट टाका - यांचा अंगठा कायम तयार असतो .बरेचदा पोस्टमध्ये वाचनीय मजकूर असतो जो वाचायला किमान पाच मिनिटं लागणार असतात. पण या अंगठे बहाद्दरांच्या दिव्यदृष्टीची कमाल!! पोस्ट टाकल्यावर अर्ध्या सेकंदात यांचा अंगठा आलाच पाहिजे. या अंगठ्या मागचं मानसशास्त्र नक्की काय असेल हे मी शोधायचा खूप प्रयत्न करतेय पण अजूनही मला त्यात यश आलेलं नाही. हा अंगठेबहाद्दर समूह एखाद्या 'अंगठे बाबाचा' भक्त संप्रदाय तर नसेल ना? बाबांनी अंगठे टाकायचा आदेश दिला असावा, त्यामुळे हे भक्तगण जपमाळे प्रमाणे दररोज किमान 108 अंगठे देत असतील अशी मला दाट शंका येते.

 किंवा दुसरी शक्यता म्हणजे हे अंगठे बहाद्दर नक्कीच पगारी असावेत. जितके अंगठे तितकी कमाई.

        दुसरा जो समूह आहे तो खरंतर आजारी असतो. आता मी डॉक्टर असल्यामुळे हे विधान ठामपणे करण्याचा अधिकार नक्कीच मला आहे. या समूहाला 'फोटोरिया' हा आजार झाला असतो. जसा डायरिया असतो ना तसा 'फोटोरिया 'बरं का. हा समूह कोणत्याही प्रसंगाचे किलोभर फोटो तरी टाकतोच. आणि यांच्या स्टेटस  वर किमान पावभर फोटो असतातच.असं  वाटतं की फोटोसाठी हे ट्रीपला जातात, फोटोसाठी पूजा घालतात, फोटोसाठी सणवार साजरे करतात, फोटोसाठी नाचतात,गातात.घरी केलेली रेसिपी पोटाऐवजी आधी फोटोत जाते. अंगठे बहाद्दरांपेक्षा या समूहाची परिस्थिती गंभीर असते. अंगठे बहाद्दर तसे निरूपद्रवी असतात.पण फोटोरिया झालेला समूह गेल्या जन्माचा सूड उगवतात असं म्हणतात. 'फोटोरीया' झालेल्यांना रोज फोटो टाकल्याशिवाय झोप येत नाही. या फोटोंचेच बहीण भाऊ म्हणजे रिल्स आणि व्हिडिओ असतात. या फोटोरिया समूहाला जेव्हा रिल्स आणि व्हिडिओची लागण होते तेव्हा त्यांची केस हाताबाहेर जाते.फोटोरिया समूहाकडे बघून मला पुलंच्या 'हसवणूक' मधल्या 'माझा शत्रूपक्ष' या लेखाची नेहमीच आठवण येते. 

        तिसरा समूह जरा अध्यात्म मार्गी असतो. त्यांचा वयोगट साधारणतः साठीच्या पुढचा असतो. ही मंडळी फेसबुक, व्हाॅट्सअप ला पूर्णपणे शरण गेली असते. 'उरलो उपकारापुरता' याप्रमाणे 'उरलो फॉरवर्ड पुरता' अशी त्यांची जीवनातली भूमिका  असते .सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र - - या मंडळींचा 'अहर्निशम् सेवामहे' यानुसार आलेल्या कोणत्याही,कशाही पोस्ट  फॉरवर्ड करणं - हे त्यांचं परम कर्तव्य असतं.आणि हे परम कर्तव्य ते कुठेही म्हणजे दुकानात, भाजीबाजारात,सिनेमा बघताना,अगदी व्यासपीठावर असताना सुध्दा बजावत असतात.  'सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ ' ही गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणे त्यांच्या ठायी असतात.

         भुलाबाई चं गाणं असतं ना, 'एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू '....या चालीवर - - 'एक फॉरवर्ड करू बाई, दोन फॉरवर्ड करू, दोन फॉरवर्ड करू बाई तीन फॉरवर्ड करू....' असं आजच्या काळातलं गाणंही या समूहाने जन्माला घातलंय असं ऐकिवात आहे.

          चौथा समूह प्रसिद्धीला हपापलेला असतो. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे. 

  'घटम् भिंद्यात पटम् भिंद्यात कुर्यात रासभरोहणात,   येनकेन प्रकारेण प्रसिद्धं पुरुषो भवेत्.' 

  एखादं वैशिष्ट्यपूर्ण काम केल्यानंतर प्रसिद्धी मिळवणं हे नैसर्गिक आहे. पण मडके फोडून, कपडे फाडून, प्रसंगी गाढवावर बसून अर्थातच काहीही करून प्रसिद्धी मिळवणारा समूह हा खरोखरच पुलंच्या हसवणूक मधला शत्रूपक्ष असतो.जगण्यातल्या सामान्य दैनंदिन गोष्टी समाज माध्यमावर टाकून ' फोमो 'ची स्वतःचीच लढाई लढत असतो.

  या समाज माध्यमाच्या आहारी गेलेले बरेच  विक्षिप्त,नादावलेले  समूह आज निर्माण झालेले दिसतात. खरंतर या समाज माध्यमाद्वारे कितीतरी चांगली रचनात्मक, सकारात्मक,महत्त्वाची कामं होत असतात आणि अशी समाजोपयोगी कामं करणारे समूह सुद्धा भरपूर आहेत.कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, गाजावाजा न करता ही कामं सुरू असतात.

       पण आजचा समाज हा मेंढरांचा कळप झाला आहे. इतर जसे वागतात तसंच आपण वागायचं हे एक चुकीचं मानक  प्रस्थापित होतं आहे, जे फार गंभीर आहे. आजच्या आत्मकेंद्रीत आणि मोबाईलवर पडीक व्यक्तीला सतत इतरांकडून कौतुक, इतरांकडून  मान्यता, लाईक्स.. यांची सारखी गरज असते. सतत  पोस्ट वाचून इतरांशी तुलना करण्याची सवय हल्ली वाढत चालली आहे. स्वतःविषयीचं मत  हे लोक इतरांच्या नजरेतून ठरवतात. त्यामुळे आपण चांगलं कसं ठरु यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू असते. आणि म्हणूनच असे समूह तयार होतात. सदोदित काहीतरी पोस्टायला हवं, ही मनोवृत्ती वाढत चालली आहे. जिंकलेल्यास टाळ्या पाहिजे, हरलेल्याला खांदा पाहिजे, लिहिणाऱ्याला कमेंट पाहिजे, कवितेला दाद पाहिजे, फोटोंना इमोजी पाहिजे ,विनोदाला स्मायली पाहिजे, वाढदिवसाला जीबीयु -एचबीडी पाहिजे आणि मेल्यावर आरआयपी पाहिजे.

  मार्क्सवादी एरिक फ्रॉम म्हणतो, 'जगताना एक मोठा पर्याय आपल्यासमोर असतो तो म्हणजे, टू हॅव ऑर टू बी. मॅन इज द वन हू इज मच, नॉट द वन हू हॅज मच'.

 पण आम्ही सुशिक्षित, जाणते असून 'टू हॅव' च्या मायाजालात इतके गुरफटत चाललोय की त्यामुळे मेंदूत निर्माण होणाऱ्या डोपॅमिनची चटक लागलेली आहे. ही एक प्रकारची नशा असते.या नशेत असतांना , वास्तवात अराजकता आहे,अती महत्वाचे प्रश्न आहेत,भावना भडकताहेत,लहान मुलांवर विपरीत संस्कार होताहेत.... याकडे आपलं लक्षच जात नाही.आपण आपल्या आभासी आटपाट नगरात सुखाने नांदतो. आणि आनंदात गातो,

 सासू म्हणते,

 ' माझ्या फोटोला लाईक कर गं सुने कर गं सुने.

 मग जा अपुल्या माहेरा, माहेरा.

 सून म्हणते,

 चार चार ईमोजी टाकल्या हो सासूबाई,टाकल्या हो सासूबाई. 

 आता तरी जाऊ द्या माहेरा,माहेरा."

   शहाणी ,जाणती,विचारी,परिपक्व जनता जेव्हा या आभासी मायाजालात अडकत जाते , तेव्हा भय वाटतं ते पुढच्या पिढीचं. विकसित मेंदूची परत अविकसित मेंदू कडे होणारी वाटचाल ही या युगातील उत्क्रांती ची नांदी तर नसावी ? कारण सतत या गॅजेट्सचा अनाठायी आणि अन् प्राॅडक्टिव्ह उपयोग होत राहिला तर मानवी विचार,भावना व वर्तमानावर परिणाम होतो आहे. याचा अभ्यास करण्यासाठी 'इंटरनेट सायबर सायकाॅलाॅजी '- या मानसशास्त्राच्या नविन शाखेने जन्म घेतला आहे. या शाखेचे जनक 'जाॅन सुलर' हे म्हणतात, "आपण जर इंटरनेटचा हुषारीने वापर केला नाही तर निश्चितच इंटरनेट आपला हुषारीने वापर करुन घेईल यात शंका नाही'.

त्यामुळे,

"सदा सर्वदा योग फेसबुकचा घडावा....

तुझे कारणी वेळ माझा सरावा..

उपेक्षू नको मज माध्यमा तू आता...

इंटरनेट देवा मागणे हेचि आता'

    अशी शरणागती पत्करली तर भविष्यात विनाश अटळ आहे आणि त्याला कारणीभूत आपणच असणार आहोत.



डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

अकोला, ९४२२९३९५१०

Sunday, May 14, 2023

 



मागच्या वर्षी मदर्स डे ला काढलेला हा फोटो.आई,मी,माझी मुलगी आणि नात......चार पिढ्या एकत्र येण्याचा हा योग दुर्मिळच.म्हणून फोटो टाकला.खरंतर मदर्स डे - हे हल्लीचं फॅड. मग आईबद्दल तीच ठराविक, घासून गुळगुळीत झालेली वाक्य लिहिणं...हे ओघानं आलंच.

         आईबद्दलचं अती   उदात्तीकरण जे केलं जातं त्यामुळे हल्लीची आई सुपरमॉम होण्याच्या नादात विचार न करता धावत असते.

    पण आई ही आईशिवाय एक  व्यक्तीही असते ,तिचीही स्वभाव वैशिष्टे असतात, तिलाही कधीकधी आईपण झुगारून जगावंसं वाटतंच की.मातृत्व ही एक वृत्ती आणि कृती आहे जी सगळ्यांमध्ये असते- - पुरुषांमध्येही असते.

 आज या मातृत्वाला वंदन करुया.

पण ज्यांना आईच नसते त्यांचं काय????

या संदर्भात

मदर्स डे च्या निमित्ताने,

गुलजार यांची स्वतःच्या आईवरची एक विलक्षण हृद्य कविता.......

त्यांची आई त्यांना लहानपणीच सोडून गेली.त्यांचं हे दुःख अतिशय संयतपणे या कवितेत व्यक्त केलं आहे.कुठेही भावनांचा अतिरेक नाही, शब्दजंजाळता नाही की आक्रोश नाही.अगदी सांधे शब्द... पण काळीज चिरत जाणारे...

 या कवितेच्या मराठी अनुवादाचा केलेला एक प्रयत्न.


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

आई..........

तुला ओळखू तरी कसा,

तुला बघितलंच नाही कधी.


शोधत असतो मी तुला,

माझ्या चेहऱ्यावरील रेषेरेषेत.


लोक सांगतात, माझे डोळे.. अगदी माझ्या आईसारखे 

आहेत.


तसे पाणीदार आहेत माझे डोळे

पण...... तृषार्त आहेत .


कानाला एक छिद्र आहे,

जन्मजात असेल बहुतेक.


किंवा नवस फेडण्यासाठी..

तू टोचलास का गं माझा कान?


माझ्या समोरच्या दातात एक 

फट आहे..

तुझ्याही दातात असेल.


तुझ्याही तळपायावर एक

चक्र असेल.


एवढी कशाची घाई झाली तुला,

मला जन्म दिलास....

लगेच निघून गेलीस.


देव दिसला होता तुला????

म्हणून मला सोडून गेलीस??


शोधत असतो सतत...

गवसेल का कुणी?

माझ्या अंगखुणा असलेली ?


तुझ्याशिवाय ही पायाखालची माती .. कधीकधी ,

अनोळखी आणि उपरी वाटते.


आई....

तुला ओळखू तरी कसा,

तुला बघितलंच नाही कधी.


शोधत असतो मी तुला,

माझ्या चेहऱ्यावरील रेषेरेषेत.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

      'धूप आने दो', या पुस्तकातून.

#गुलजार

#धूपआनेदो




  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...