Tuesday, September 12, 2023

यावे गणराया

 


         


यावे देवा महाराजा.गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुझे हार्दिक स्वागत. आपल्या राज्यात तुझ्या आगमनाची रीतसर आणि जय्यत तयारी झाली आहे. शहराकडून गावाकडे जाणाऱ्या रेल्वे ,बस ,खाजगी गाड्यांचं आरक्षण कधीचंच 'फुल्ल' झालेलं आहे. खाजगी वाहनांचे दर नेहमीप्रमाणे प्रचंड वाढले आहेत. तुझ्या विविध मनमोहक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या भव्य, आकर्षक मूर्ती वाजत गाजत, विजेच्या, केबलच्या तारा तोडत आपापल्या  मंडळात डेरेदाखल झाल्या आहेत. ढोल, ताशा लेझीमची प्रॅक्टिस टिपेला म्हणजेच कानाचे पडदे फाटेस्तोवर पोचली आहे. आधीच खड्डे असलेल्या जमिनीवर आणखी खड्डे खोदून  बाप्पा तुमच्यासाठी ठिकठिकाणी भव्य व्यासपीठे उभारली आहेत. खंडणीच्या वसुलीप्रमाणे  वर्गणीही सगळ्या मंडळांनी 'शिस्तीत' जमवली आहे. आपण यावे गणराया.... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

                      बाप्पा तुझ्या उत्सवात बंदोबस्तासाठी पोलिसांची प्रचंड फौज तैनात केली आहे. आता दहा दिवस त्यांना पाणी प्यायला ही सवड नसणार.तुझ्यासारखे व्हीव्हीआयपी आले की सगळी कामं सोडून कायदा आणि सुव्यवस्था योग्य राखण्यात  पोलिसांची काय अवस्था होते हे तुला सांगायची  गरज आहे? सुरळीत वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद केलेले आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे.पण हरकत नाही. तुझ्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची योजना केली आहे. यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी झाला त्यामुळे पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे.शिवाय निर्माल्य पाण्यात शिरवण्याची आपली परंपरा.असो. आपण यावे गणराया..... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

          महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस पुरेसा नसल्याने पिके करपून चालली आहेत. शेतकरी हवालदिल झालाय.पण बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजली आहे. तिथे दुष्काळाचा मागमूसही नाही बरं बाप्पा. तुझे दागिने ,तुझी रेशमी वस्त्र, तुझं मखर, तुझी आरास, तुझ्यासाठी फुले, हार, दुर्वा, नारळ, फळफळावळ यांनी बाजार ओसंडून वाहतोय. दुचाकी चारचाकी वाहनांची खरेदी तुझ्या आशीर्वादाने व्हावी म्हणून अनेकांनी आगाऊ पैसे भरून ठेवले आहेत.सोने खरेदी पण तुझ्या आगमनाप्रित्यर्थ भक्तांनी केली आहे.  तुझ्या साग्रसंगीत  आणि षोडशोपचार पूजेसाठी समस्त ब्रह्मवृंद सज्ज आहे .हल्ली त्यांची वेळ  चार महिने आधीपासून घ्यावी लागते . नाही  तर ऑनलाईन गुरुजींचा पर्याय आहेच की. त्यामुळे सारं काही 'सुशेगात' आहे.आपण यावे गणराया......तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

           ही झाली सार्वजनिक मंडळाची तयारी. पण आम्ही घरी सुद्धा जय्यत तयारी केलीय बरं बाप्पा. अहो ,दोनशे रुपयांनी सिलेंडर स्वस्त झालाय. मग काय विचारता? घर चकाचक स्वच्छ केलं आहे.तांदूळ धुऊन, वाळवून, दळून उकडीच्या मोदकांची तयारी केली आहे. यूट्यूब वरून चीज मोदक, केक मोदक, पनीर मोदक, चायनीज मोदक, मिलेट्स मोदक यांच्या रेसिपीज डाऊनलोड करून ठेवल्या आहेत. अथर्वशीर्षाची पुस्तकं आणून ठेवली आहेत. दहा दिवसांच्या दहा-साड्या आणि पारंपारिक दागिने ठरवले आहेत. आणि यावर्षी ना बाप्पा, माझ्या मैत्रिणीने सरळ चांदीच्या २१ दुर्वा आणि चांदीचे जास्वंदीचे फुल खरेदी केले आहे. म्हणजे रोज दुर्वा तोडायची कटकटच नाही. त्यामुळे आपण यावे गणराया...... तुझं स्वागत घरोघरी दणक्यातच आणि भक्ती भावाने होणार. 

          बाप्पा तू महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहेस. अग्र पूजेचा मान असल्याने तुझी पूजा तर नेहमी आम्ही करतोच पण भक्तीभावाच्या पलीकडेही तुझं आणि आमचं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं आहे. तुझी घरात प्रतिष्ठापना झाली की आख्खी वास्तू चैतन्यमय होते.घरात तुझ्याशी  हितगुज करता येतं, संवाद करता येतो, मनासारखी पूजा करता येते. घरातल्या हवेला मांगल्य आणि पावित्र्याचा गंध येतो. 

          तसंच आम्ही लहान असताना, आमच्या  जोशीवाडीत तुझी स्थापना व्हायची. मग ठरल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी वाडीतील प्रत्येक घराला ठराविक काम असायचं. एक दिवस हार करायचा. मग त्यासाठी पहाटे उठून फुलं तोडायची आणि चोरायची सुद्धा. आपला हार ,आपला नैवेद्य, आपली रांगोळी सगळ्यात चांगली व्हावी म्हणून सगळी घरं मनापासून आणि आनंदानं तयारी करीत. नैवेद्य रुचकर व्हावा यासाठी आईच्या मागे लावलेली भुणभुण, मी काढलेली मोठी रांगोळी लगेच पावसाने वाहून गेली म्हणून कोसळलेलं रडू, तुझ्यासमोर लहानशा स्टेजवर केलेले बाळबोध नाच, नाटकं, नाट्यछटा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत आणि त्यानंतर मिळणारी छोटी छोटी बक्षीसं.... हे सगळंच खूप गोड, लोभस, सात्विक आणि भाबडं होतं. आजूबाजूच्या मंडळांमध्ये परिसंवाद, व्याख्यानमाला, कीर्तन,तीन अंकी नाटकं...असे दर्जेदार उपक्रम असायचे.थोडक्यात काय, उत्सवाचे दहा दिवस हे आमचं संस्कार शिबीरच होतं.

                    पण....पण आता त्यातलं काहीच उरलं नाही. सार्वजनिक मंडळात तुझी रेखीव, सुंदर, सजवलेली महाकाय मूर्ती असते, तुझ्या अंगावर दागिने असतात, दिव्यांची रोषणाई असते, नयनरम्य देखावा असतो, दानपेटीत देणाऱ्यांचा ओघ असतो, वाद्यांचा दणदणाट असतो. सगळं खूप छान असतं पण बाप्पा, तुझी मूर्ती बघून परकं वाटतं. बरेचदा ती मूर्ती  अलिप्त, तटस्थ वाटते. तू नसतो का तिथे? खरं सांग बाप्पा, तू तिथे नसतोच ना?? 

                    खरंतर, गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. प्रादेशिक उत्सव हे भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करित असतात.हा उत्सव बघायला परदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे अत्यंत प्रगल्भ, परिपक्व ,सात्विक आचार विचारांचं प्रदर्शन होणं गरजेचं असतं. पण सध्या सार्वजनिक गणेशोत्सवात शिरलेलं अर्थकारण, राजकारण ,गुंडगिरी ,झुंडशाही, कंपूशाही बघून हा गणेशोत्सव नको असं वाटायला लागलं आहे बाप्पा. तुझ्या उत्सवाचं बाजारीकरण झालं. तुझ्या उत्सवात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होऊ लागली. तुझ्या मंडळात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होऊ लागला. तुझा उत्सव म्हणजे प्रतिष्ठेचं आणि शक्तीचं प्रदर्शन होऊ लागलं .भक्तीची जागा उन्मादाने घेतली. उत्साहाची जागा धिंगाण्याने घेतली .श्रद्धेची जागा अभिमानाने घेतली आणि तुझ्या उत्सवाचा 'इव्हेंट' झाला बाप्पा. 

                        सध्या विलक्षण अस्थिर परिस्थितीत आहे आजचा समाज. एकीकडे  चांद्रयान, विक्रम लँडर, आदित्य एल-वन च्या प्रक्षेपणाने देशाची बौद्धिक उंची वाढते आहे तर दुसरीकडे महिलांना निर्वस्त्र करून, त्यांच्यावर बलात्कार करून, त्यांची धिंड काढणाऱ्या समाजाचा हिंस्र आणि भयंकर चेहरा दिसतो आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे झालेला विकास दिसतो आहे त्याचवेळी त्या महामार्गावर रोज घडणारे अपघात मन सुन्न करताहेत. ज्या देशातले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके मिळवून देशाची मान उंचवतात त्याच देशातल्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार होऊनही त्यांना न्याय मिळत नाहीय. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, नापिकी, प्रदूषण, कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार या सगळ्या विळख्यात आजचा समाज अडकत चालला आहे. बाप्पा, तरीही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आम्ही तुझं जंगी स्वागत करणार आहोत.आपण यावं गणराया...... कारण तुझा उत्सव ही अस्वस्थ समाजाला दिलेली अफूची गोळी आहे. 

                        बाप्पा, तू बुद्धीची देवता आहेस ना? 'त्वं ज्ञानमयो, विज्ञानमयोसि 'असं तुला म्हणतात ना? पण तुला माहित आहे का, सध्या या बुद्धीला कोणीही विचारत नाही, आम्हाला बुद्धी आहे रे पण आम्ही तिचा वापर करित नाही किंबहुना तिचा योग्य वापर केला तर खिल्ली उडविली जाते. आमच्या बुद्धीला गंज चढतो आहे पण आम्हाला त्याचं  काहीही सोयर सुतक नाही .अरे ,आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. आता 'बुद्धिमान', 'मठ्ठ', 'ढ' ही विशेषणं निकालात निघालेली आहेत. पुढे मागे, 'बुद्धी म्हणजे काय रे देवा?' असा प्रश्न तुला विचारला, तर वाईट वाटून घेऊ नकोस. आता तुझ्यासमोर हात जोडून कोणीही ,'चांगली बुद्धी दे देवा'... असं म्हणणार नाही, हे लक्षात ठेव आणि आपण बुद्धीची देवता आहोत या भ्रमात राहू नकोस.         

                        शेवटी काय, काहीही झालं तरी तुझं दणक्यात स्वागत होणारच. त्यामागे भक्ती, श्रद्धा, पावित्र्य नसलं तरीही. तेव्हा बाप्पा, आता तूच ठरवायचं आहेस की यायचं की नाही? 

  ' त्वमेव केवलम् कर्तासि|     त्वमेव केवलम् धर्तासि| 

त्वमेव केवलम् हर्तासि|'.. असं तुला म्हणतात ना? मग तूच आता निर्णय घे. पण तोपर्यंत आम्ही जयघोष करणारच... 'यावं गणराया'.... आणि हळूच म्हणणार, 

         'गणपती बाप्पा मोरया.... 

         पुढच्या वर्षी नक्की काय ते ठरवा'.



डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

 #गणेशोत्सव

#गणपतीबाप्पा

 



Sunday, August 13, 2023

जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?

 




१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला  दर वर्षी मला एकच प्रश्न पडतो की या दिवशी सार्वजनिक सुट्टी का असते ? याचे उत्तरही मला अनेकांनी दिले की हे राष्ट्रीय सण आहेत म्हणून. धार्मिक सणांना सुट्या असतात कारण प्रत्येकाच्या घरी सण साजरे केले जातात. काही धार्मिक विधी पार पाडले जातात, विशिष्ट पूजा असते, नैवेद्य असतो, अन्नदान असते. पण राष्ट्रीय सणाला आपण काय करतो? यावर्षी तर १५ ऑगस्टला मंगळवार आहे. १६ ऑगस्टला पारसी न्यू इयर ची सुटी.१२ ला दुसरा शनिवार तर १३ ला रविवार. म्हणजे सोमवारी १४ ला एक सुटी टाकली की आपोआपच पाच सुट्ट्या पदरात पडणार.हा अगदी मणीकांचन योगच. या योगाची पर्वणी साधून  पावसाळी सहलींना या पाच दिवसात नक्की ऊत येणार. सगळी पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून  जाणार.अशा क्वचितच लाभलेल्या संधीचा फायदा न घेणारा करंटाच.ही सगळी मज्जा फक्त एका १५ ऑगस्ट च्या सुट्टीमुळे. आणि आमच्यासारखे सहलीला न जाणारे  - झेंडावंदन करणार. त्यासाठी आठवडाभरापासून कोणता ड्रेस, कोणती साडी, कोणती थीम, यावर गहन चर्चा घडणार. त्यासाठी वेळप्रसंगी नवीन खरेदी ही होणार. झेंडावंदना नंतर फोटो आणि रिल्स काढण्याचा अत्यावश्यक राष्ट्रीय कार्यक्रम होणार आणि मग आपापल्या घरी जाऊन आराम करणार नाही तर मज्जा करणार.

           देशाच्या स्वातंत्र्यदिनी एक  राष्ट्रगीत म्हणण्याशिवाय दुसरं काय करतो आम्ही? नाही म्हणायला काही उपक्रम राबवलेही जातात पण त्यात देशप्रेमाशिवाय प्रसिद्धीचाच हव्यास दिसून येतो. नवरात्रात अंगात देवी येते त्याचप्रमाणे अनेकांच्या अंगात या दिवशी देशभक्तीचा संचार होतो .अचानक  स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांबद्दल उमाळा दाटून येतो. आणि संध्याकाळपर्यंत हे उसने अवसान जिरले की रीतसर श्रमपरिहाराचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडतो.

            दीडशे वर्षाच्या गुलामगिरीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या तन मन धनाची आहुती देऊन लढा दिला त्यांच्यासाठी १५ ऑगस्ट ला आम्ही  वाट्टेल तशी 'धमाल' करतो, 'धांगडधिंगा' करतो, 'एन्जॉय' करतो.......हे खटकतं. कशाला हवी ही सुटी? सकाळी झेंडावंदन करून नेहमीसारखं कामाला लागायचं.म्हणजे निदान राष्ट्रीय सणाचा धिंगाणा तरी होणार नाही. पण मग  देशप्रेम दाखवण्याची अधिकृत संधीच हातची जाईल की हो. 'देशभक्ती म्हणजे काय रे भाऊ?'असा प्रश्न आज सहज पडू शकतो.  समाजाची प्रासंगिक देशभक्ती उफाळून येण्याचे प्रसंग घडतातही अधूनमधून. नुकतेच झालेले चांद्रयानाचे अंतराळातील प्रक्षेपण ,भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पटकावलेली पदके, भारतीय चित्रपटाचे ऑस्कर मध्ये झालेले नामांकन, सर्जिकल स्ट्राईक.. या आणि यासारख्या अनेक प्रसंगात आपली देशभक्ती उफाळून येत असते. अर्थात ती यायलाच हवी पण ही देशभक्ती प्रासंगिक असते आणि  केवळ भावनेच्या स्तरावर असते. देशभक्ती ही केवळ भावना नाही तर ती एक विचारधारा आहे आणि त्यानुसार केले जाणारे आचरण आहे. आणि या देशभक्तीच्या भावना, विचार, कृतीचे एकत्रित रसायन ज्यांच्या नसांमधून नेहमी वहात असते.. तो खरा देशभक्त. 

आज अनेक मंडळी, अनेक संस्था देशासाठी निस्वार्थी वृत्तिने अथक कार्य करताहेत.त्यांच्यामुळे देशाची मान उंचावली आहे.पण लेखाचा हा विषय नाही.                                                    आज  आपला देश ७६ वर्षाचा झाला आहे. आमच्या साठीच्या पिढीने एकोणिसाव्या शतकातली वर्षोनुवर्षे न बदलणारी आणि कष्टाळू जीवनशैली जगली आहे. त्याचवेळी विसाव्या  शतकातली तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत बदलणारी, वेगवान आणि सुखसोयींनी युक्त अशी जीवनपद्धती आज आम्ही अनुभवत आहोत. वयाच्या या टप्प्यावर किंबहुना कोणत्याही वयात, मी देशासाठी काय केले आहे? किंवा काय करू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला निदान राष्ट्रीय सणाच्या दिवशी तरी विचारायला हवा. 

            'आम्ही नियमित मतदान करतो. नोकरी व्यवसाय करतो. सामाजिक कायदे पाळतो. नियमित कर भरतो. कुटुंब व्यवस्था अबाधित राखतो. आपल्या धर्म संस्कृतीचं पालन करतो .आणखी देशासाठी सामान्य नागरिक वेगळं काय करणार?' असेच उत्तर बहुतांशी  दिले जाण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकाची जबाबदारी आम्ही पाळतो या भ्रमात आपण असतो आणि देशातील अराजकता,अव्यवस्था, हिंसाचारादि बाबींना सरकारला दोषी ठरवतो.डोळे उघडून बघितले तर सामान्य नागरिक ही खूप काही करु शकतो. 

            ताजे उदाहरण घ्यायचे तर समान नागरी कायदा . २०१६ साली हा कायदा लागू करावा का यासाठी आयोगाने जनमताची मागणी केली होती. त्यावेळी जनतेकडून ७५३७८ सूचना आल्या. त्या आधारे विधी आयोगाने १८५ पानांचा अहवाल सादर करून समान नागरी कायदा लागू करू नये

 हा निकाल दिला होता. हे सामान्य नागरिकाच्या शक्तीचे उदाहरण आहे. आताही परत या कायद्यावर विचार मंथन सुरू झाले आहे .आणि आयोगाने १४ जून २०२३ पासून जनतेला आपल्या सूचना देण्याचे आवाहनही केले होते.आपल्या लोकसंख्येचा विचार करता अगदी अत्यल्प प्रमाणात जनतेने ही मत /सूचना देण्याची जबाबदारी  पार पाडली आहे.                       

              'गिव्ह इट अप' ही मोदी सरकारने आवाहन केलेली योजना. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर विकत घेतल्यावर ग्राहकाच्या खात्यात सरकारकडून सबसिडी जमा होत असते. आर्थिकदृष्ट्या संपन्न गटाने ही सबसिडी न स्वीकारता सरकारला परत केली तर समाजातील गरीब वर्गाला त्याचा फायदा होतो. ही संकल्पना 'गिव्ह इट अप' कॅम्पेनची आहे. २३ एप्रिल २०२३ पर्यंत सबसिडी नाकारणाऱ्यांची संख्या जवळजवळ १.१३ करोड झाली आहे. संपन्न गटाचा विचार करता, वरिल संख्या नगण्य आहे.

              भारतीय संविधानात भारतीयांचे मूलभूत हक्क आणि अधिकारांची नोंद आहे हे आपल्याला माहित आहेच पण ३ जानेवारी १९७७ पासून 'कलम ५१-क' द्वारे 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये' विशद करणारा भाग संविधानात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे ३ जानेवारी हा नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळण्यात येतो. किती नागरिकांना याबद्दल माहिती आहे? 

              उदाहरणादाखल, 'ड'- हे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे  -  हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आणि नुकतीच मणिपुर मध्ये घटलेली घडलेली घटना काय सुचवते? 

        'ज' - हे कर्तव्य म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन,मानवतावाद ,शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे - हे आहे. या संदर्भात, मध्य प्रदेशातील सिहोर या गावी रुद्राक्ष मिळवण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली व काही भाविक मृत्युमुखी पडले. ही घटना काय दर्शविते?

 'जनहित याचिका' दाखल करण्याचे धाडस किती नागरिकांमध्ये असते? राजस्थान मधील एका खेड्यात भंवरीदेवी या महिलेने एका वर्षाच्या मुलीच्या विवाहाला विरोध केला त्यामुळे स्थानिक लोकांकडून धमक्या व तिच्या घरावर बहिष्कार टाकण्यात आला. २२ सप्टेंबर १९९२ ला पाच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. भंवरीदेवीने न्यायालयात धाव घेऊनही ती न्यायापासून वंचितच राहिली. यासंदर्भात भंवरीदेवीच्या वतीने नयना कपूर या वकील महिलेने सुप्रीम कोर्टात राजस्थान सरकार विरुद्ध जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे भंवरीदेवीला न्याय तर मिळालाच पण या निकालामुळे स्त्रियांच्या हक्कांविषयी उच्च न्यायालयीन स्तरावर देखील सुधारणा झाली . स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल या जनहित याचिकेचा निकाल हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

 आज आपण सामान्य नागरिक हे, 'कळते पण वळत नाही' या परिस्थितीत आहोत. अवतीभवती ची परिस्थिती आणि सत्तेचे गलिच्छ राजकारण यामुळे अस्वस्थता सगळ्यांमध्येच आहे .पण संवेदनशील व बुद्धिमान वर्गाने आपल्या मनाच्या खिडक्या बंद करुन स्वतः च्या कोषात जगणे सुरु केले आहे हे फार गंभीर आहे .आणि या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी हा सामान्य नागरिक दृकश्राव्य माध्यमाच्या आहारी गेला आहे. अन्नावाचून तडफडणारे लोक, रस्त्यावर घडलेला अपघात, डोळ्यासमोर होणारी महिलेची विटंबना..... याकडे दुर्लक्ष करून तो आभासी आनंदात रमला आहे, कायम पार्टी मूडमध्ये राहू इच्छित आहे हे तर अत्यंत भयावह आहे.वाढत जाणारा हा कोडगेपणा पुढच्या पिढीवर काय परिणाम करेल याची कल्पनाही करवत नाही.   

 प्रसिद्ध पोर्तुगाल लेखक 'सारामागो' यांच्या प्रचंड गाजलेल्या ' द इयर ऑफ द डेथ ऑफ रिकार्डो रिस' या पुस्तकात सध्याच्या सामान्य माणसाच्या मनोवृत्तीवर अचूक भाष्य केले आहे. ते लिहितात,  

'वी स्लीप व्हेन वी शुड बी ऑन अवर गार्ड'

 'वी डिपार्ट व्हेन वी शुड बी अरायव्हिंग' 

 'वी क्लोज द विंडो व्हेन वी शुड लीव्ह इट ओपन'

       ‌‌    आजच्या जगातल्या सामान्य समाजाचे हे यथार्थ वर्णन आहे .आज  तांत्रिक प्रगती व आर्थिक सुबत्तेमुळे माणूस सुखी झाला आहे पण नागरिक म्हणून तो आत्मकेंद्रित आणि निष्क्रिय झाला आहे. चंगळवादी वृत्ती आणि निबर मनाचा जबरदस्त पगडा असल्यामुळे मानवी मेंदूच्या सारासार विवेकाची क्षमता कमी होत चालली आहे.    

          पारतंत्र्यात असताना अनेक महान नेतृत्वांनी जनतेमध्ये एक विचारधारा रुजवली,जागरुक केले. पण आज या स्वतंत्र भारतातल्या  बेजबाबदार नागरिकांना योग्य मार्ग दाखविणारे एकही नेतृत्व नाही ही खरी शोकांतिका आहे. आज लोकमान्य टिळक असते तर,'जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?'असे त्यांनी खडसावून विचारले असते.आणि त्यांच्या या शब्दांनी नक्कीच जादूची कांडी फिरली असती.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी,

अकोला, ९४२२९३९५१०

#स्वातंत्र्यदिन

#भारतीयनागरिक

#गिव्हइटअप

Tuesday, July 11, 2023

बाईपणाचं दळण थांबव रे देवा

  




 जवळपास चाळीस पन्नास वर्षांपूर्वी  जो विषय ज्वलंत होता,ज्या विषयाचा चघळून चघळून चोथा झाला आहे तोच विषय आकर्षक स्वरुपात,कसलेल्या अभिनेत्रींना घेऊन, चुरचुरीत विनोदाची फोडणी देऊन,  तिन्ही त्रिकाळ प्रसिद्धीचा, प्रमोशनचा मारा करुन महाराष्ट्रातील स्त्री प्रेक्षकांवर थोपवलेला सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'.थोडक्यात काय, चित्ताकर्षक वेष्टनात गुंडाळलेली जुनी पुराणी वस्तू.किंवा नव्या बाटलीत जुनी दारु म्हणजे ' बाईपण भारी देवा '.

       बाई असल्यामुळे, सर्वसाधारणतः  कौटुंबिक,  भावनिक गुंत्यात अडकणं हा तिच्या जीवनातील अपरिहार्य भाग असतोच.त्यात नोकरी करुन घर सांभाळणाऱ्या बाईची तर तारेवरची कसरतच असते.  अशाच सहा सख्ख्या बहिणींच्या आयुष्यातले गुंते ही सिनेमाची मुख्य कथा.आणि त्यातून सुटण्यासाठी या सहा बहिणी जो भन्नाट (अजिबातच न पटणारा, अवास्तव) मार्ग निवडतात , तो म्हणजे 'बाईपण भारी देवा'. 

       मुळात या बहिणीं समोरचे प्रश्न अगदी क्षुल्लक आहेत.फक्त सुचित्रा बांदेकरच्या घटस्फोटाचा प्रश्न सोडून. त्यातही शिल्पा नवलकर,वंदना गुप्ते आणि रोहिणी हट्टंगडी यांची घुसमट ( जी अतिशय वरवरची आहे) त्यांनी स्वतःच निर्माण केली आहे.खरंतर काहीही कारण नसतांना चोवीस तास चेहऱ्यावर बारा वाजलेल्या रोहिणी हट्टंगडीच्या नवऱ्याचीच घुसमट व्हायला हवी होती.त्याचं पुरुष पण भारी रे देवा! या बहिणींची दु:खं म्हणजे तूप साखरेत घोळवून, लाडावून कुरवाळून मोठी केलेली दु:खं आहेत.अशा दु:खांना फारसं महत्त्व न देता आजची बाई जगण्याचा आनंद घ्यायला शिकली आहे. अशी फालतू दुःखें आम्ही आणि आसपासच्या बायकांनी अनेकदा अनुभवली आहेत आणि त्यातून लीलया बाहेर पडलो आहोत. बाईपणाच्या वास्तव दुःखांच्या आणि कोंडमाऱ्याच्या जवळपासही हा सिनेमा पोचत नाही.नुकतंच बाईपणातून बाहेर निघून एक माणूस म्हणून जगण्याच्या आजच्या काळात बाईला या सिनेमाने परत बाईपणात ढकललं आहे. शिकलेल्या,नोकरी करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या या सहा बहिणी इतक्या दुबळ्या का असाव्यात की, मंगळागौर स्पर्धेचा त्यांना आधार घ्यावा लागावा आणि तो ही एकत्रितपणे? आज समाजात ,भयंकर संकटांना एकटीने सामोरं जाऊन जीवनाच्या लढ्यात यशस्वी झालेल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी बाईपण भारी आहे हे सिध्द केलं आहे.अशावेळी हा उथळ सिनेमा निव्वळ हास्यास्पद वाटतो.

    मुलांचा वाढदिवसाचा सोहळा सुरु असताना कोणती आई प्रेग्नंसी टेस्ट करेल हो?आणि मेनोपॉज आला म्हणजे आभाळ कोसळलं की काय?(आम्हाला तर हायसं वाटलं बुवा) चिनूच्या ऑपरेशनच्या वेळेस तिचा नवरा आणि सासू कुठे होते? कडक अण्णा एकाएकी मऊ कसे झाले? स्टेशनवरचा नाच म्हणजे निव्वळ मूर्खपणाचा कळस.

       असो.कलाकार सगळेच कसलेले आहेत.वंदना गुप्ते कितीही आवडत असली तरी तिला आता बघवत नाही.  ती स्वतःच्याच प्रेमात आहे."मी- वंदना गुप्ते" याच ऍटिट्युड ने तिने काम करु नये. सुकन्या कुलकर्णी जबरदस्त .तिची बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरचे हावभाव  अप्रतिम. पण नोकरी करणारी बाई इतकी बावळट?असो.

       पण दिग्दर्शक केदार शिंदे खरंच हुशार.त्यांनी आजच्या मध्यमवर्गीय,मध्यमवयीन बायकांची मनोवृत्ती अचूक हेरली आहे. "मज्जा" आणि "एन्जॉय" हा प्राधान्य क्रम असणाऱ्या बायकांची नस त्यांनी बरोबर पकडली आहे. सिनेमातल्या वरवरच्या झगमटाला बाईपणाचं लेबल लावलं आणि त्याला नाव देतांना "भारी" या  जरीची झालर लावली.झालं. तमाम महिला वर्ग खुळावलाच की हो.  थिएटरला तीर्थयात्रेचं स्वरुप आलंय चक्क. बायका झुंडीने सिनेमाला ड्रेस कोड करुन जाताहेत,रील,फोटो काढताहेत. थिएटर मधून बाहेर निघताना आपण "कसल्या भारी" आहोत या आनंदात न्हाऊन निघताहेत. सगळ्याच बायकांचा आत्मविश्वास वाढलाय म्हणे हा सिनेमा बघून - अर्थातच... जमत नसेल, सोसत नसेल तरी सार्वजनिक ठिकाणी नाच करण्याचा हो. हा केदार शिंदे च्या यशाचा फॉर्म्युला. 

      खरंतर "बाईपण किती उथळ देवा"...असा समज या सिनेमामुळे होतोय.पण झापडं बांधूनच वावरायचं असेल तर देव त्यांना सद्बुद्धी देवो !!  असो. डोकं न वापरता सिनेमा डोक्यावर घ्यायचा हे ठरवूनच टाकलं असेल तर प्रेक्षक स्त्रियांचंही "बाईपण भारीच भारी" हो देवा.

     

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

#बाईपणभारीदेवा

Saturday, July 1, 2023

यथा पेशंट: तथा डॉक्टर': ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

   


     


  माझी रोजची ओपीडी. सकाळी नऊ पासून सुरू होणारी. आमचे निमसरकारी आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय. त्यामुळे पेशंटचा प्रचंड ओघ. कॉर्पोरेट  हॉस्पिटल सारखे 'एसी केबिन', 'रिसेप्शनिस्ट', 'अपॉइंटमेंट'.. असे चोचले आम्हाला परवडणारे नाहीत. पेशंट स्वतःच आपली लाईन लावणार, मध्येच घुसणार, भांडणं होणार... हे रोजचंच चित्र. एक पेशंट केबिनमध्ये तपासायला आत शिरला की दुसरा पेशंट एक पाय आत एक पाय बाहेर असा उभा राहणार. तिसरा पेशंट मधूनच पडदा बाजूला करून डोकावणार .चौथा पेशंट खिडकीतून आत बघणार हे नित्याचंच. त्यादिवशी बारा वाजत आले होते. जवळजवळ ४० पेशंट पासून झाले होते. १२ नंतरची वेळ फारच आणीबाणीची असते. तपासण्याचा, बोलण्याचा, ऐकून घेण्याचा.... सगळाच वेग मंदावला असतो. एक ज्येष्ठ   गृहस्थ बराच वेळ पासून मला बाहेर उभे दिसत होते. त्यांना आत येण्याची काही घाई दिसत नव्हती.ते सारखे आत डोकावून बघत होते. सगळे पेशंट आटोपल्यावर मी लांब श्वास घेऊन उठले. आता भूकही लागली होती. तेवढ्यात ते आजोबा आत आले. 

   "या दवाखान्यात तुम्ही पोटदुखीवर औषध देता का हो?"

    त्यांचा हा प्रश्न ऐकून, 'नाही हो. मी इथे भुवया कोरून देते'- - असं सणसणीत उत्तर द्यायची इच्छा मला झाली पण मी स्वतःला आवरलं. डोक्यात जाणाऱ्या पेशंटशी - तेही विशेषतः बारा वाजल्यानंतर, कमीत कमी मनस्ताप करून कसं बोलायचं याचा माझ्याजवळ फॉर्म्युला तयार असतो. उत्तरा दाखल मी फक्त मान हलवली - होकारार्थी. "पोटदुखीवर पंचकर्म पण करतात का हो?" 

  परत माझी होकारार्थी मान हलली. 

  "पंचकर्माचा खर्च किती येतो?" 

  आता मात्र माझ्या श्वासाची गती वाढू लागली. मी डोळ्यांनी इशारा करून नॉन स्ट्रायकर एन्डवर उभ्या असलेल्या माझ्या हाऊस ऑफिसर कडे बॅटिंग दिली.

हाऊस ऑफिसर तरुण, उत्साही आणि अननुभवी असल्याने,त्याने आजोबांचे बॉल दणादण हाणायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात मी एक ते शंभर आकडे मनात मोजून दीर्घ श्वास घेतले.आजोबांच्या ज्ञानात कितपत भर पडली देव जाणे. आता आजोबांनी माझ्याकडे बॉल टाकला. 

"अहो पंचकर्म करायला आठ दिवस लागतात? आम्हाला तर परवाच पुण्याला जायचं आहे." 

आता तर माझ्या हृदयाची गती पण वाढू लागली. त्यांचा बॉल मी न टोलवता सोडून दिला आणि जास्तीत जास्त मख्ख चेहरा करून बसले. 

"मॅडम सांगा ना, काय करायचं ?"-आजोबा. 

आता मात्र त्यांच्या बाॅलवर सीमापार फटका मारायची वेळ होती. 

"अहो पोटदुखीवर पंचकर्मच करायचं, हे तुम्ही कसं काय ठरवता? आधी पेशंटची हिस्ट्री, तपासणी, आजाराचं निदान, गरजेनुसार चाचण्या हे सगळं झाल्यावरच आम्ही ठरवू औषध द्यायचं की पंचकर्म करायचं"

" मॅडम, सगळ्या तपासण्या झाल्या आहेत. सोनोग्राफी, एक्सरे झाले आहेत. पोटदुखीचं निदानही झालं आहे औषधेही खूप दिवस घेतली. काही फायदा नाही. आता ठरवलं , पंचकर्मच करायचं. अहो कित्येक वर्षापासून मी याच भागात राहतोय पण मला माहीतच नव्हता हा दवाखाना"- आजोबा. 

आता मात्र सीतेसारखं मला या दवाखान्यासकट जमिनीत गडप व्हावं असं क्षणभर  वाटून गेलं. गेल्या तीस वर्षाची रुग्णसेवा आजूबाजूंच्या खिजगणतीतही नसावी? 

"हे बघा आजोबा, आधी तुम्ही टेबलवर झोपा .तुमची लक्षणं, हिस्ट्री सांगा. मग काय ते ठरवू ."आता मी अंपायरच्या भूमिकेत शिरले. 

   "नाही हो. मी फक्त चौकशी करायला आलो होतो. माझ्या मिसेसला पोट दुखीचा त्रास आहे. तिला केव्हा आणू?" 

   आजोबांनी गुगली टाकला आणि मी ताडकन उठून थर्ड अंपायर म्हणजे सिस्टर कडे ती केस सोपवून केबिन बाहेर पडले.

      एकदा तर गंमतच झाली .तीव्र कंबर दुखीमुळे उभे राहणे, चालणे कठीण झालेला एक पेशंट पंचकर्म करण्यासाठी दवाखान्यात भरती झाला. उपचार सुरू झाल्यावर त्याची लक्षणे हळूहळू कमी होऊ लागली. रोज राउंड घेताना तो कंबरेचं दुखणं सोडून इतर बऱ्याच तक्रारी सांगायचा.

अंगाला खाज, डोकेदुखी, छातीत जळजळ वगैरे लक्षणांवर त्याला आम्ही औषध देत होतो. त्यातली खाजेची, डोक्याची कोणती गोळी आहे हे तो  हाऊस ऑफिसरला विचारत असे. आठ दिवसाच्या पंचकर्माने त्याची कंबर दुखी पूर्ण नाहीशी झाली. तो उभा राहून चालू लागला. पण अंगाला खाज, डोकेदुखी, जळजळ काही कमी होईना. त्यामुळे तो दवाखान्यातून सुट्टी घ्यायला तयार नव्हता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. मी सिस्टरला त्याच्यावर बारीक नजर ठेवायला सांगितली. तेव्हा हे महाशय डोकेदुखीच्या गोळ्या बायकोसाठी, खाजेच्या गोळ्या आईसाठी आणि छातीत जळजळीच्या गोळ्या मित्रासाठी जमा करून स्वतः 'प्रॅक्टिस' करत होते. दुसऱ्या दिवशी राऊंडच्या वेळेस त्याचं तेच डोकेदुखी खाजेचं रडगाणं सुरू झालं. मी म्हटलं, 

"हे बघा, तुम्ही कमरेच्या दुखण्यासाठी भरती झालात ते दुखणं बंद झालं ना? आता बाकी लक्षणांसाठी औषध देऊनही जर आराम होत नसेल तर

आपण आता डोकेदुखीसाठी सिटीस्कॅन, जळजळीसाठी एंडॉस्कॉपी आणि खाजेसाठी एलर्जी टेस्ट करूया. मी चिठ्ठी लिहून देते तुम्हाला." 

  ही माझी मात्रा अचूक लागू पडली आणि माझ्या राउंड नंतर पेशंट लगेच गाशा गुंडाळून घरी परतला.

         असे मजेदार अनुभव आणि अफलातून किस्से समस्त डॉक्टरांच्या पोतडीत भरपूर जमा झालेले असतात. माझ्या 30 वर्षाच्या अनुभवानुसार कोणत्याही पेशंटशी पाच मिनिटं बोलल्यावर त्याची वृत्ती लक्षात येते. मग त्याच्याशी कसं, किती,कोणत्या स्वरात, कोणत्या भाषेत,कशा पद्धतीनं बोलायचं हे लगेच ठरवता येतं.                                                       आजकाल डॉक्टरांच्या नावानं खूप ओरड केली जाते. पूर्वी डॉक्टर हे देवाप्रमाणे होते. आजकाल असे डॉक्टर्स अभावानेच आढळतात असे अनेकांचे मत असते. परंतु पेशंट सुद्धा पूर्वीसारखे कुठे राहिलेत? हल्लीचे पेशंट गुगल विद्यापीठातून अर्धवट माहिती घेऊन येतात. कशा पद्धतीचे उपचार करायचे हे डॉक्टरच्या ऐवजी तेच ठरवतात.तपासण्या करण्याचा अट्टाहासही अनेक पेशंटचा असतो.  

         खरं तर चरक महर्षींनी सांगितल्या प्रमाणे, 'विद्या, वितर्क,विज्ञान, स्मृती,तत्परता आणि क्रिया '.. या षड्गुणांनी युक्त असे डॉक्टर वास्तवात असतातच.पण हल्ली पेशंट हे  'इंपेशन्ट' झाले आहेत.त्यामुळे बरेचदा डॉक्टरांना ' विद्या, वितर्क' गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.

          आमच्या चरक संहितेत  तर उत्तम रुग्णाचे पण गुण सांगितले आहेत.

  " स्मृती निर्देशकारित्वं अभिरुत्वमथापि च ।  ज्ञापकत्वं च रोगाणां आतुरस्य गुणा:  स्मृता:।।"

उत्तम रोग्याला त्याच्या रोगाच्या कारणांची, पथ्य अपथ्यांची, औषधं घेण्याची आणि वैद्याने दिलेल्या सल्ल्याची पूर्ण आठवण असावी. वैद्याच्या आदेशाचे पालन करणे, न घाबरणे व वैद्यापासून आपल्या रोगाविषयी काहीही न लपवणे ही उत्तम रुग्णाची लक्षणे आहेत. 

       गंमत अशी की संधिवातासाठी गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी सांगितली की हा वैद्यकीय सल्ला न ऐकता, पेशंट धावत पळत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येतो.त्यावेळेस ऑपरेशन चा सल्ला आमच्या पासून लपवून ठेवतो आणि पंचकर्माने माझे गुडघे बरे करून द्या अशी ताकीदच देतो. पुणे, मुंबई अगदी परदेशात राहणारे बरेच जण दिवाळीत आपल्या घरी अकोल्याला येतात .आता दहा दिवस सुट्टी आहे तर पंचकर्म करून द्या. मग नंतर आम्हाला वेळ नाही असं स्वतःच ठणकावून सांगणारे पेशंट खूप वाढले आहेत. ब्लड प्रेशर, मधुमेहाची औषधं स्वतःच्या मनाने बंद करणारे, वाटेल तेव्हा सुरू करणारे, औषधांचे डोस  सोयीनुसार कमीजास्त करणारे, एकाच वेळी एलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषध घेणारे, स्वतःच्या मनाने डायट आणि अघोरी व्यायाम करणारे पेशंट  वाढतांना दिसत आहेत. दोन वर्ष एलोपॅथी ,एक वर्ष होमिओपॅथी घेऊनही आराम न पडल्यामुळे आता आयुर्वेद करून बघूया असा विचार करून पेशंट माझ्याकडे येतात आणि येताक्षणी  पहिला प्रश्न विचारतात,

  ' किती दिवसात बरं वाटेल मॅडम?'

   पूर्वी मी शास्त्रशुद्ध , प्रामाणिकपणे , सविस्तर समजावून सांगत असे. आता मात्र 

   "ऍलोपॅथीला दोन वर्ष, होमिओपॅथीला एक वर्ष दिलेत ना?मग आयुर्वेदाला तीन वर्षे लागणारच "असं ठामपणे सांगून देते. 

    शेवटी काय,कालाय तस्मै नमः.'यथा पेशंट तथा डॉक्टर' हाच आजकालचा मंत्र. रुग्णसेवेचा उदात्त व्यवसाय करतांना आनंदाचे,समाधानाचे क्षण येतातच. पण बरेचदा पेशंटपेक्षा डाॅक्टरच 'बिच्चारा'

    होतो. ही डॉक्टरांची बाजू समजून घेण्यासाठीच हा लेखन प्रपंच.

    ********************************

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी, अकोला

९४२२९३९५१०

#डॉक्टर्सडे

Sunday, June 4, 2023

आभासाशी जडले नाते

 आभासाशी जडले नाते....    


सकाळ झाली. डोळे उघडले.  हातपाय ताणून आळस दिला आणि प्रातर्विधीसाठी उशी खालचा मोबाईल हातात घेतला.  दचकलात ना ? पण तरुण पिढी नाही दचकणार. कॉलेजमध्ये एकदा निरोगी जीवनशैली विषयी बोलत असताना 'प्रातर्विधी' हा शब्द ऐकल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उमटलं .

       'सकाळी उठल्याबरोबर काय करायचं असतं?' मी सोप्या शब्दात विचारलं.  

       'उठल्याबरोबर आधी आम्ही मोबाईल बघतो मॅम' - - डोक्यावर केसांचा उभा तुरा असलेल्या एका मुलाने उत्तर दिलं. तुरा कसला, त्याच्या ताठ उभ्या केसांनी बाथरूम घासता येईल का? हा भलताच विचार माझ्या डोक्यात आला.  डोक्याच्या वरच्या भागात ब्रश सारखे उभे केस आणि खालच्या भागात नाममात्र हिरवळ असणाऱ्या या मुलाला 'प्रातर्विधी' हा शब्द उच्चारण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल ही मला खात्री पटली आणि मी विषय आवरता घेतला. 

        असो. तर थोडक्यात काय की हल्ली पूर्वीच्या व्याख्या.... चुकलं - काॅन्सेप्ट बदलत चाललेय.

 'प्रातर्विधी' म्हणजे सकाळी डोळे उघडल्याबरोबर 'कराग्रे वसते लक्ष्मी' सारखं 'प्रभाते मोबाईल दर्शनम् अशी प्रथा रुढ झाली आहे. शिवाय 'आमच्या पिढीने (साठीच्या)  तर काळाच्या बरोबर चालायला हवं'... अशी येता-जाता तरुण पिढी आमच्यावर पिंक टाकून मोकळी होत असते. तात्पर्य हेच की मी पण प्रातर्विधीसाठी मोबाईल उघडला. वाढदिवस ,लग्न वाढदिवस, निधन वार्ता, गुड मॉर्निंग, सुविचार, विनोद,देवदर्शन ,रेसिपीज ,कविता ,लेख ,प्रवचन...... 

 अबब!!! मोबाईल ओसंडून वाहत होता .या सगळ्यांना उत्तर देणं, हा कार्यक्रम हल्ली जीवनावश्यक कृतींमध्ये मोडत असल्याने खऱ्याखुऱ्या प्रातर्विधीची वाट लागणार नाही तर  दुसरं काय होणार?

      या व्हाॅट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम नामक अक्राळविक्राळ  राक्षसाने जेव्हापासून घराघरात प्रवेश केला तेव्हापासून माणसाचं आयुष्यच बदललंय.अन्न,वस्त्र, निवारा यापेक्षाही मोबाईल च्या गरजेला जास्त प्राधान्य दिलं जातंय. या मोबाईलमुळे माणसांच्या मेंदू मधे बदल व्हायला लागले आहेत.ज्याप्रमाणे उत्क्रांती नंतर माणसाचं शेपूट गळून पडलं तसंच या तांत्रिक युगात मेंदू मधलं बुद्धी आणि विवेकाचं केंद्र गळून त्या जागी मेंढरांच्या मेंदू तील केंद्र निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे की काय, असं मला नेहमी वाटतं. (Herd mentality)

      हल्ली माणसांचे भलतेच समूह निर्माण झालेले आहेत. एक समूह आहे तो अंगठे बहाद्दरांचा. कोणीही, कोणतीही, कसलीही पोस्ट टाका - यांचा अंगठा कायम तयार असतो .बरेचदा पोस्टमध्ये वाचनीय मजकूर असतो जो वाचायला किमान पाच मिनिटं लागणार असतात. पण या अंगठे बहाद्दरांच्या दिव्यदृष्टीची कमाल!! पोस्ट टाकल्यावर अर्ध्या सेकंदात यांचा अंगठा आलाच पाहिजे. या अंगठ्या मागचं मानसशास्त्र नक्की काय असेल हे मी शोधायचा खूप प्रयत्न करतेय पण अजूनही मला त्यात यश आलेलं नाही. हा अंगठेबहाद्दर समूह एखाद्या 'अंगठे बाबाचा' भक्त संप्रदाय तर नसेल ना? बाबांनी अंगठे टाकायचा आदेश दिला असावा, त्यामुळे हे भक्तगण जपमाळे प्रमाणे दररोज किमान 108 अंगठे देत असतील अशी मला दाट शंका येते.

 किंवा दुसरी शक्यता म्हणजे हे अंगठे बहाद्दर नक्कीच पगारी असावेत. जितके अंगठे तितकी कमाई.

        दुसरा जो समूह आहे तो खरंतर आजारी असतो. आता मी डॉक्टर असल्यामुळे हे विधान ठामपणे करण्याचा अधिकार नक्कीच मला आहे. या समूहाला 'फोटोरिया' हा आजार झाला असतो. जसा डायरिया असतो ना तसा 'फोटोरिया 'बरं का. हा समूह कोणत्याही प्रसंगाचे किलोभर फोटो तरी टाकतोच. आणि यांच्या स्टेटस  वर किमान पावभर फोटो असतातच.असं  वाटतं की फोटोसाठी हे ट्रीपला जातात, फोटोसाठी पूजा घालतात, फोटोसाठी सणवार साजरे करतात, फोटोसाठी नाचतात,गातात.घरी केलेली रेसिपी पोटाऐवजी आधी फोटोत जाते. अंगठे बहाद्दरांपेक्षा या समूहाची परिस्थिती गंभीर असते. अंगठे बहाद्दर तसे निरूपद्रवी असतात.पण फोटोरिया झालेला समूह गेल्या जन्माचा सूड उगवतात असं म्हणतात. 'फोटोरीया' झालेल्यांना रोज फोटो टाकल्याशिवाय झोप येत नाही. या फोटोंचेच बहीण भाऊ म्हणजे रिल्स आणि व्हिडिओ असतात. या फोटोरिया समूहाला जेव्हा रिल्स आणि व्हिडिओची लागण होते तेव्हा त्यांची केस हाताबाहेर जाते.फोटोरिया समूहाकडे बघून मला पुलंच्या 'हसवणूक' मधल्या 'माझा शत्रूपक्ष' या लेखाची नेहमीच आठवण येते. 

        तिसरा समूह जरा अध्यात्म मार्गी असतो. त्यांचा वयोगट साधारणतः साठीच्या पुढचा असतो. ही मंडळी फेसबुक, व्हाॅट्सअप ला पूर्णपणे शरण गेली असते. 'उरलो उपकारापुरता' याप्रमाणे 'उरलो फॉरवर्ड पुरता' अशी त्यांची जीवनातली भूमिका  असते .सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र - - या मंडळींचा 'अहर्निशम् सेवामहे' यानुसार आलेल्या कोणत्याही,कशाही पोस्ट  फॉरवर्ड करणं - हे त्यांचं परम कर्तव्य असतं.आणि हे परम कर्तव्य ते कुठेही म्हणजे दुकानात, भाजीबाजारात,सिनेमा बघताना,अगदी व्यासपीठावर असताना सुध्दा बजावत असतात.  'सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ ' ही गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणे त्यांच्या ठायी असतात.

         भुलाबाई चं गाणं असतं ना, 'एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू '....या चालीवर - - 'एक फॉरवर्ड करू बाई, दोन फॉरवर्ड करू, दोन फॉरवर्ड करू बाई तीन फॉरवर्ड करू....' असं आजच्या काळातलं गाणंही या समूहाने जन्माला घातलंय असं ऐकिवात आहे.

          चौथा समूह प्रसिद्धीला हपापलेला असतो. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे. 

  'घटम् भिंद्यात पटम् भिंद्यात कुर्यात रासभरोहणात,   येनकेन प्रकारेण प्रसिद्धं पुरुषो भवेत्.' 

  एखादं वैशिष्ट्यपूर्ण काम केल्यानंतर प्रसिद्धी मिळवणं हे नैसर्गिक आहे. पण मडके फोडून, कपडे फाडून, प्रसंगी गाढवावर बसून अर्थातच काहीही करून प्रसिद्धी मिळवणारा समूह हा खरोखरच पुलंच्या हसवणूक मधला शत्रूपक्ष असतो.जगण्यातल्या सामान्य दैनंदिन गोष्टी समाज माध्यमावर टाकून ' फोमो 'ची स्वतःचीच लढाई लढत असतो.

  या समाज माध्यमाच्या आहारी गेलेले बरेच  विक्षिप्त,नादावलेले  समूह आज निर्माण झालेले दिसतात. खरंतर या समाज माध्यमाद्वारे कितीतरी चांगली रचनात्मक, सकारात्मक,महत्त्वाची कामं होत असतात आणि अशी समाजोपयोगी कामं करणारे समूह सुद्धा भरपूर आहेत.कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, गाजावाजा न करता ही कामं सुरू असतात.

       पण आजचा समाज हा मेंढरांचा कळप झाला आहे. इतर जसे वागतात तसंच आपण वागायचं हे एक चुकीचं मानक  प्रस्थापित होतं आहे, जे फार गंभीर आहे. आजच्या आत्मकेंद्रीत आणि मोबाईलवर पडीक व्यक्तीला सतत इतरांकडून कौतुक, इतरांकडून  मान्यता, लाईक्स.. यांची सारखी गरज असते. सतत  पोस्ट वाचून इतरांशी तुलना करण्याची सवय हल्ली वाढत चालली आहे. स्वतःविषयीचं मत  हे लोक इतरांच्या नजरेतून ठरवतात. त्यामुळे आपण चांगलं कसं ठरु यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू असते. आणि म्हणूनच असे समूह तयार होतात. सदोदित काहीतरी पोस्टायला हवं, ही मनोवृत्ती वाढत चालली आहे. जिंकलेल्यास टाळ्या पाहिजे, हरलेल्याला खांदा पाहिजे, लिहिणाऱ्याला कमेंट पाहिजे, कवितेला दाद पाहिजे, फोटोंना इमोजी पाहिजे ,विनोदाला स्मायली पाहिजे, वाढदिवसाला जीबीयु -एचबीडी पाहिजे आणि मेल्यावर आरआयपी पाहिजे.

  मार्क्सवादी एरिक फ्रॉम म्हणतो, 'जगताना एक मोठा पर्याय आपल्यासमोर असतो तो म्हणजे, टू हॅव ऑर टू बी. मॅन इज द वन हू इज मच, नॉट द वन हू हॅज मच'.

 पण आम्ही सुशिक्षित, जाणते असून 'टू हॅव' च्या मायाजालात इतके गुरफटत चाललोय की त्यामुळे मेंदूत निर्माण होणाऱ्या डोपॅमिनची चटक लागलेली आहे. ही एक प्रकारची नशा असते.या नशेत असतांना , वास्तवात अराजकता आहे,अती महत्वाचे प्रश्न आहेत,भावना भडकताहेत,लहान मुलांवर विपरीत संस्कार होताहेत.... याकडे आपलं लक्षच जात नाही.आपण आपल्या आभासी आटपाट नगरात सुखाने नांदतो. आणि आनंदात गातो,

 सासू म्हणते,

 ' माझ्या फोटोला लाईक कर गं सुने कर गं सुने.

 मग जा अपुल्या माहेरा, माहेरा.

 सून म्हणते,

 चार चार ईमोजी टाकल्या हो सासूबाई,टाकल्या हो सासूबाई. 

 आता तरी जाऊ द्या माहेरा,माहेरा."

   शहाणी ,जाणती,विचारी,परिपक्व जनता जेव्हा या आभासी मायाजालात अडकत जाते , तेव्हा भय वाटतं ते पुढच्या पिढीचं. विकसित मेंदूची परत अविकसित मेंदू कडे होणारी वाटचाल ही या युगातील उत्क्रांती ची नांदी तर नसावी ? कारण सतत या गॅजेट्सचा अनाठायी आणि अन् प्राॅडक्टिव्ह उपयोग होत राहिला तर मानवी विचार,भावना व वर्तमानावर परिणाम होतो आहे. याचा अभ्यास करण्यासाठी 'इंटरनेट सायबर सायकाॅलाॅजी '- या मानसशास्त्राच्या नविन शाखेने जन्म घेतला आहे. या शाखेचे जनक 'जाॅन सुलर' हे म्हणतात, "आपण जर इंटरनेटचा हुषारीने वापर केला नाही तर निश्चितच इंटरनेट आपला हुषारीने वापर करुन घेईल यात शंका नाही'.

त्यामुळे,

"सदा सर्वदा योग फेसबुकचा घडावा....

तुझे कारणी वेळ माझा सरावा..

उपेक्षू नको मज माध्यमा तू आता...

इंटरनेट देवा मागणे हेचि आता'

    अशी शरणागती पत्करली तर भविष्यात विनाश अटळ आहे आणि त्याला कारणीभूत आपणच असणार आहोत.



डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

अकोला, ९४२२९३९५१०

Sunday, May 14, 2023

 



मागच्या वर्षी मदर्स डे ला काढलेला हा फोटो.आई,मी,माझी मुलगी आणि नात......चार पिढ्या एकत्र येण्याचा हा योग दुर्मिळच.म्हणून फोटो टाकला.खरंतर मदर्स डे - हे हल्लीचं फॅड. मग आईबद्दल तीच ठराविक, घासून गुळगुळीत झालेली वाक्य लिहिणं...हे ओघानं आलंच.

         आईबद्दलचं अती   उदात्तीकरण जे केलं जातं त्यामुळे हल्लीची आई सुपरमॉम होण्याच्या नादात विचार न करता धावत असते.

    पण आई ही आईशिवाय एक  व्यक्तीही असते ,तिचीही स्वभाव वैशिष्टे असतात, तिलाही कधीकधी आईपण झुगारून जगावंसं वाटतंच की.मातृत्व ही एक वृत्ती आणि कृती आहे जी सगळ्यांमध्ये असते- - पुरुषांमध्येही असते.

 आज या मातृत्वाला वंदन करुया.

पण ज्यांना आईच नसते त्यांचं काय????

या संदर्भात

मदर्स डे च्या निमित्ताने,

गुलजार यांची स्वतःच्या आईवरची एक विलक्षण हृद्य कविता.......

त्यांची आई त्यांना लहानपणीच सोडून गेली.त्यांचं हे दुःख अतिशय संयतपणे या कवितेत व्यक्त केलं आहे.कुठेही भावनांचा अतिरेक नाही, शब्दजंजाळता नाही की आक्रोश नाही.अगदी सांधे शब्द... पण काळीज चिरत जाणारे...

 या कवितेच्या मराठी अनुवादाचा केलेला एक प्रयत्न.


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

आई..........

तुला ओळखू तरी कसा,

तुला बघितलंच नाही कधी.


शोधत असतो मी तुला,

माझ्या चेहऱ्यावरील रेषेरेषेत.


लोक सांगतात, माझे डोळे.. अगदी माझ्या आईसारखे 

आहेत.


तसे पाणीदार आहेत माझे डोळे

पण...... तृषार्त आहेत .


कानाला एक छिद्र आहे,

जन्मजात असेल बहुतेक.


किंवा नवस फेडण्यासाठी..

तू टोचलास का गं माझा कान?


माझ्या समोरच्या दातात एक 

फट आहे..

तुझ्याही दातात असेल.


तुझ्याही तळपायावर एक

चक्र असेल.


एवढी कशाची घाई झाली तुला,

मला जन्म दिलास....

लगेच निघून गेलीस.


देव दिसला होता तुला????

म्हणून मला सोडून गेलीस??


शोधत असतो सतत...

गवसेल का कुणी?

माझ्या अंगखुणा असलेली ?


तुझ्याशिवाय ही पायाखालची माती .. कधीकधी ,

अनोळखी आणि उपरी वाटते.


आई....

तुला ओळखू तरी कसा,

तुला बघितलंच नाही कधी.


शोधत असतो मी तुला,

माझ्या चेहऱ्यावरील रेषेरेषेत.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

      'धूप आने दो', या पुस्तकातून.

#गुलजार

#धूपआनेदो




Saturday, March 25, 2023

पेंच सहलीतले "पेच"

फेब्रुवारीच्या बारा तारखेला नागपूरला प्रजापिता ब्रम्हकुमारी चं डॉक्टरांसाठी एक दिवसीय माईंड बॉडी मेडिसीन कॉन्फरन्स' होती.आमच्या मैत्रिणींनी या शिबीराला जायचं ठरवलं. 
           अगदीच रविवारी सकाळी निघून रात्री वापस येणं..ही कल्पना बऱ्याच जणींच्या पचनी पडत नव्हती.मग खूप चर्चा, वादविवाद करुन शेवटी शनिवारी पेंच ला जायचा कार्यक्रम आखला.सहलीची सूत्रं ज्योती,माया कराळे आणि मेघा ने हातात घेतली.(नेहमीप्रमाणेच). हो.या तिघी जणी आमच्या गृप मधल्या 'लीडर बायका' आहेत. मी, सुनिता,माया ठाकरे आणि मनीषा शांत, समंजस स्वभावाच्या.(गरीब बिचाऱ्या!) बाकी प्रिया,वर्षा बडगुजर,वर्षा राव आणि सीमा मात्र अगदी शाळकरी पोरी.....नाचणाऱ्या, उंडारणाऱ्या ,मस्ती करणाऱ्या, अति उत्साही.त्यात सीमा म्हणजे पुलं चा 'नारायणच'.
          तर अशा आम्ही अकरा जणी दोन इनोव्हा करुन अकरा तारखेला सकाळी पाच ला अकोला सोडणार,वाटेत रामटेक च्या रामाचं दर्शन घेऊन पेंचच्या मृगनयनी रिसॉर्टला दु. एकच्या सुमारास पोचणार.तिथे जेवणार आणि दुपारी साडेतीनला जंगल सफारी करणार, आणि रविवारी नागपूरला शिबीराला हजर राहणार......इतका साधा, सोपा, निरुपद्रवी कार्यक्रम ठरवला होता. 
          पण पेंच सहलीने आम्हाला पेचात टाकायचा चंगच बांधला होता.पहाटे चार वाजता उठून,घरातल्या यच्चयावत मंडळींच्या रीतसर साखरझोपा उडवून आम्ही अकरा जणी ठरलेल्या ठिकाणी चक्क वेळेवर डेरेदाखल झालो. पण हाय रे दैवा! गाड्यांचा पत्ताच नव्हता.एक गाडी गोरक्षण रोड वरुन ज्योती,मेघा माया आणि वर्षाला घेऊन येणार होती आणि दुसरी रामदास पेठेत सुनिता कडे येणार होती. पण दोन्ही गाड्या 'प्रथम ग्रासे मक्षिकापातः' या नियमानुसार वेळेवर उगवल्याच नाहीत.कसाबसा अर्धा तास संयम टिकवण्याचं शिवधनुष्य आम्ही पेललं खरं पण नाईलाजानं रामप्रहरी ड्रायव्हर आणि उशीर यावर तावातावाने चर्चासत्र घडवून घरच्यांबरोबर शेजाऱ्यांच्या झोपा उडवण्याचं सत्कार्यही हातून घडलंच.
          गाड्या ज्योतीने ठरवलेल्या होत्या त्यामुळे भल्या सकाळी तिच्या पत्रिकेत डोकं फिरण्याचा योग अटळ होताच. 
        'हो निघालो ', आणि 'पोचतोच'..... फक्त हीच दोन उत्तरं ऐकून प्रत्येकीची व्यक्तिगत आणि सामूहिक चिडचिड हास्याचे फवारे उडवत पद्धतशीर पार पडली. शेवटी दोन तास उशिरा आम्ही गाडीत स्थानापन्न झालो. 
           पण गाडीत बसताक्षणी सरड्यालाही लाजवणाऱ्या चपळाईने आम्ही रंग बदलले आणि ट्रिप चा माहौल,गाणी,गप्पा मौजमस्ती, खिदळणं,पांचट विनोद.. सगळं शिस्तीत सुरू झालं. 
           तिवसा गावाच्या जवळपास आमच्या गाडीत डिझेलचा वास येऊ लागला.आमच्या ड्रायव्हर शुभम ला हटकलं तर त्याला अजिबात वास येत नव्हता.(कोरोना?? छे छे.सर्दी असेल) पण आम्ही त्याचा पिच्छा सोडला नाही.शेवटी त्यानं दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला - प्रविणला आमची गाडी चालवायला दिली.शुभम जरा अबोल आणि साधा होता. पण प्रविण मात्र नंबरी होता. 
   'रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकच्या डिझेल चा हा वास आहे ' हे अत्यंत तर्कशुद्ध उत्तर देऊन त्यानं वेळ मारुन नेली. पण तिवसा ला नाश्ता करायला थांबलो तेव्हा गाडीच्या मागच्या बाजूने आॉईल गळताना दिसलं आणि गाडीतल्या वासाचा शोध लागला. आॉईल बरोबर आमचंही अवसान गळलं. ड्रायव्हरने गाडी वरून, खालून, उघडून तपासली.आॉईल लीकेज आहे,मायनर फॉल्ट आहे असं आम्हा अज्ञानी पामरांना समजावलं आणि आम्ही नाश्ता करून पुढे निघालो.
         अवघ्या ५/६ किमी नंतर मागून येणाऱ्या गाड्या आम्हाला इशारा करताहेत हे लक्षात आलं.गाडी थांबवून बघितलं तर मागच्या बाजूने धूर येत होता.सगळ्यांच्याच छातीचे ठोके चुकले.आता पुढे काय??? या गाडीत आता क्षणभरही बसायचं नाही यावर एकमतानं शिक्कामोर्तब झालं.
       हा पेच सोडवून पेंच ला कसं पोचता येईल याचे असंख्य पर्याय आमच्या अकरा डोक्यांमधून स्फोटासारखे बाहेर पडत होते.... डोक्यातूनही धूर येणं बाकी होतं. आता ज्योतीने आपल्या भात्यातून तिचं खास 'सौजन्यास्त्र' काढलं आणि गाडीच्या मालकाला फोन करुन तिच्या पद्धतीने यथेच्छ 'सौजन्यास्त्राचा' वापर केला आणि ताबडतोब दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्यास सांगितली.              आता चांगल्या गाडीने १४ किमी पुढे असलेल्या कारंजा घाडगे टोल वर ७ जणींना ड्रॉप करून प्रविण वापस आम्हा चौघींना घ्यायला येईल.त्याचवेळी शुभम मेकॅनिक शोधून आमची गाडी दुरुस्त करेल.दरम्यान गाडीचे मालक पर्यायी गाडी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतील. चर्चा करुन हा निर्णय आम्ही घेतला.
         चांगल्या गाडीने सात जणी घेऊन प्रविण ने आगेकूच केले. मी,माया, ज्योती आणि मेघा आमचं गरम डोकं थंड करायला एका टपरीवर टेकलो.आमची दर्दभरी कहाणी मालकाला ऐकवली. डोकं थंड करायला तिथे चहा आणि प्राप्त परिस्थितीत हसणं हाच पर्याय होता. वेळ पुढे सरकत होता आणि घडत काहीच नव्हतं. एव्हाना प्रविण आम्हाला घेण्यासाठी यायला हवा होता.कारंजाला आमच्या सात सख्यांना सोडून तो मेकॅनिक आणि पर्यायी गाडीच्या शोधमोहिमेसाठी तो चक्क अंतर्धान पावला.
    इकडे आमचा शुभम, बाजी प्रभू देशपांडेंच्या थाटात, 'हळूहळू नागपूरला पोचू.काहीही होणार नाही'.... असं म्हणत आमच्यातले विझलेले स्फुल्लिंग चेतवत होता.भरीस भर म्हणजे, आता गिऱ्हाईकी सुरू झाली म्हणून टपरीवाल्याने आम्हाला ,
'आता इथून उठा' असा आदेश दिला.(काय वेळ आली बघा.) 
      मग काय, परिवहन महामंडळाच्या 'यष्टीचा' स्टॉप आला मदतीला.फॉर अ चेंज, तिथेही बसून घेतलं.आम्ही सतत प्रविण ला फोन लावत होतो त्यामुळे की काय,तो फोन उचलेनासा झाला. तिकडे कारंजा टोल जवळ सातही जणी गाडीबाहेर विस्थापित अवस्थेत बसल्या होत्या आणि आली वेळ गाणी गाऊन साजरी करित होत्या .प्रविण अजूनही प्रगटला नव्हता. मधेच मायाच्या डोक्यात काय आलं देव जाणे.आमच्या गळक्या गाडीतून ती तिचा कराओके बॉक्स घेऊन आली.आता ही गाणं म्हणते की काय, या भीतीनं माझ्या पोटात गोळा आला. गोष्टीतल्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो,तसा मायाचा जीव कराओके मधे होता याचा उलगडा मला अर्थातच नंतर झाला. 
      आता मात्र सहनशक्तीचा अंत होऊ लागला. आम्ही मिळेल त्या वाहनाने सरळ कारंजा टोल पर्यंत जायचं ठरवलं.शुभम मागून 'हळूहळू' येणार होता.
     इतक्यात समोर एक निळी कार थांबली.गाडीतून एक तरुण उतरला आणि टपरीवर चहा घ्यायला गेला.गाडीत दुसरं कुणीच नव्हतं.मी आणि माया सगळे शिष्टाचार गुंडाळून त्या तरुणा जवळ धावतच गेलो आणि आमचं रडगाणं ऐकवलं.सुरुवातीला त्याचा चेहरा त्रासिक होता पण स्त्री दाक्षिण्य म्हणून कारंजा पर्यंत सोडायला त्याने होकार दिला.त्याने निवांत चहा नाश्ता केला आणि तो गाडीजवळ आला.
आम्ही चौघी एका पायावर उभ्या होतोच. 
"तुम्ही चौघी आहात?" 
     त्याचा बदललेला आवाज आणि चेहेरा याकडे सपशेल दुर्लक्ष करून कोडगेपणाने आम्ही गाडीत घुसलो.गाडीत बसल्यावर अवघड ही वाटत होतं आणि हसायला ही येत होतं. कारंजा टोल १४ कि.मी.वर होता.आम्ही जवळ जवळ १० कि.मी.समोर गेलो आणि गाडीच्या मालकाला फोन आला.फोनवर बोलता बोलता त्याने गाडी थांबवली. "मॅडम तुमचं काही सामान बस स्टॅंडवर राहिलंय का? तो टपरीवाला माझा मित्र आहे, तो विचारतोय ." 
"कराओके "- आम्ही एकदम ओरडलो आणि कपाळावर हात मारला.आता हसावं की रडावं हे ही कळेना. 
"जायचंय वापस?" 
   गाडी मालक विचारु लागला. बहुतेक त्याला आमची फारच दया आली होती.पण एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सौजन्याचा इतकाही फायदा घेणं आम्हाला योग्य वाटलं नाही. टपरी मालकाला फोन करून कराओके व्यवस्थित ठेवायला सांगून आम्ही कारंजा टोल वर उतरलो.मागून शुभम आमची गाडी घेऊन 'हळूहळू' येत होता. आधी पोचलेल्या सात जणींचे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सुरु होते.आता त्यांना 'कराओके स्टोरी 'सांगितल्यावर तर त्या रस्त्यावरच बसकण मारतात की काय अशी शंका आली.या मायाचं आता काय करायचं....(हे अर्थातच मनात.... सगळ्यांच्याच)
दरम्यान प्रविण चा पत्ताच नव्हता. आता शुभम ही आमची गळकी गाडी घेऊन पोचला.मायाने स्वतः मधे असलं-नसलेलं सगळं आर्जव शब्दात ओतलं आणि 'चांगली गाडी घेऊन कराओके आणायला वापस जावं लागतं दादा तुला'........ 
   असं सांगता क्षणी शुभम स्तब्ध झाला.याची वाचा गेली की काय?...अशी उगाच शंका डोकावली.पण नाही.भावनातिरेकाने (भावना नेमक्या कोणत्या हे कळलं नाही) तो निःशब्द झाला होता.शांतपणे तो गाडीत बसला आणि गाडी मागे वळवली. 
     तेवढ्यात प्रविण प्रगटला आणि गाडीची व्यवस्था झाली या गुड न्यूजची घोषणा केली. 
 चला,चला ...एकदम सगळ्यांमध्ये उत्साह संचारला...पण आता शुभम ची वाट होती.कराओके आणण्यासाठी इतका वेळ? आज काहीच तर्कसंगत का घडत नाहीय?
     झिंगाट गाण्याने सुरू झालेली ट्रीप आता ' नको देवराया अंत आता पाहू '....या वळणावर येऊन ठेपली होती.घरी फोन करून आपबिती कळवण्याची जोखीम घेणं परवडणारं नव्हतं ... इतकं शहाणपण प्रत्येकीत उपजतच होतं हे सांगणे नलगे. 
     आला.शुभम कराओके घेऊन आला आणि सगळ्यांनी फिनिक्स पक्षाला लाजवेल अशी उभारी घेतली.आता नवीन गाडीत सामान टाकून गजानन महाराजांचा जयघोष करुन आम्ही मार्गस्थ झालो.
   सकाळचा नाश्ता जिरला आहे याची प्रकर्षानं जाणीव झाली आणि वेफर्स,चिवडा , बिस्कीटं बाहेर निघू लागली.खरं तर या वेळी मृगनयनी रिसॉर्टला आम्ही जेवणं अपेक्षित होतं.त्यामुळे फारसं पोटपूजेचं साहित्य असणं अशक्यच होतं.तरीसुद्धा बॅगांमधून तळापर्यंत संशोधन करुन खरमुरे,आवळा कॅन्डी, गूळपट्टी सोप,ओवा, सुपारी,मुखवास,अनारदाना चॉकलेट्स सगळं खाऊन झालं.आता खाण्यासाठी फक्त औषधं शिल्लक होती. 
      एक वाजला होता. रामटेकच्या श्रीरामाने आमचा दर्शनाचा बेत यथासांग हाणून पाडला होता.आता लढाई पेंचची.आमच्या नवीन गाडीचा सारथी खूप समंजस होता.त्याने तीन वाजेपर्यंत पेंचला सोडण्याचं आश्वासन दिलं. 
      आता माया आणि मेघाने परिस्थिती हातात घेतली. मृगनयनी रिसॉर्ट मालकाला मायाचे तर अमोल या कोआॉर्डिनेटरला मेघाचे फोन सुरू झाले.साडेतीन ची सफारी कॅन्सल करुन रात्रीची, पहाटेची सफारी करण्याचा दोन्ही गाड्यांमधून फतवा निघाला.पण हाय रे दैवा! पेंच चे पेच संपायलाच तयार नव्हते.सफारी कॅन्सल केली तर पैसे वापस मिळणार नाहीत असा पेच समोर उभा ठाकला.मेघाने अमोलला आमची करुण कहाणी ऐकवली आणि अशा परिस्थितीत अडकलेल्या पीडितांना माणुसकीने मदत करणं कसं गरजेचं आहे हे ज्ञानामृत पाजायलाही ती विसरली नाही.त्या ज्ञानामृता पेक्षा तिच्या चढलेल्या आवाजासमोर आणि अती बोलण्यासमोर अमोलने शरणागती पत्करली.(हा माझा आपला अंदाज). रिसॉर्ट वरुन दोन जिप्सीत आम्ही बसणार होतो. आता वेळ नसल्याने खुर्सापार गेट जवळ दोन जिप्सी आमची वाट बघणार असं ठरलं.तिथे सुबोध नामक व्यक्तीला संपर्क करा असं सांगून अमोल ने तात्पुरती स्वतः ची सुटका करून घेतली. 
     आता लढाई ची सूत्रे मायाने हातात घेतली. रिसॉर्ट मालकाचा आणि तिचा परिचय होता. 'आमचं दुपारचं जेवण तुमच्याकडून होतं.आता आम्हाला भूक लागली आहे.आमची खाण्यापिण्याची व्यवस्था तुम्ही केलीच पाहिजे ". आता मायाने त्यांना पेचात टाकलं. आता रिसॉर्ट एका दिशेला,खुर्सापार गेट वेगळ्या दिशेला,वेळेची ओढाताण चाललेली आणि पोटात कोकलणारे कावळे.सगळीच अटीतटीची परिस्थिती. 
        पण  माया मागे हटायला तयार नव्हती.(तशी ती कधीच हटत नाही)."काहीही करा पण आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था खुर्सापार गेट जवळ झालीच पाहिजे".मायाने अल्टिमेटम दिला. .
         आता तीन वाजले होते.पेंच आवाक्यात आलं होतं.आमच्या सारथ्याने गुगल मॅप लावला होता. त्यानुसार खुर्सापार साठी डावीकडे वळायचं होतं.पण कुणीतरी कुणालातरी फोनवर पत्ता विचारला.(काही गरज होती? पण बायकाच त्या.आगाऊनेस कणाकणात भरलेला- - - मी नाही हो त्यातली) डावीकडे न वळता खवासा पर्यंत सरळ जायचं आणि टोल आला की डावीकडे वळायचं.....असं त्या 'फोनवरच्या 'तज्ञाने' सांगितलं. आता 'पेचात पडणं' हेच अटळ प्रारब्ध असल्यानं आम्ही खवासाच्या दिशेने भरधाव निघालो. मागची गाडी शहाण्या सारखी आधीच डावीकडे वळली. टोल आल्यावर आम्ही डावीकडे वळून थांबलो.तिथे कसल्याच खाणाखुणा नव्हत्या. परत त्याच तज्ञाला फोन केला तेव्हा त्याने दुसऱ्याच गेट चा पत्ता सांगितल्याचं लक्षात आलं. 'खुर्सापार गेट साठी तुम्ही खूप समोर आलात.तुम्हाला परत वापस जावं लागेल'..असा मौल्यवान सल्ला त्याने दिला.               आता 'खाऊ की गिळू ' असं तीव्रतेने वाटलं पण शेवटी मूग गिळून गप्प बसलो आणि गाडीने यू टर्न घेतला. दुसरी गाडी व्यवस्थित पोचली होती आणि आमच्या नावानं ठणाणा सुरू होता.यू टर्न घेतल्यामुळे आता आम्हाला खुर्सापार साठी उजवीकडे वळावं लागणार होतं. रोड डिव्हायडर लांबवर सलग असल्याने उजवीकडे वळताच येत नव्हतं. आमचं खुर्सापारचं वळण आम्हाला दिसत होतं पण वळता येत नव्हतं. खूप समोर जाऊन यू टर्न घेतला आणि डावीकडे एकदाचे वळलो. 
      थोड्या अंतरावरच खुर्सापार गेट होतं.तिथे दोन जिप्सी आमची वाट बघत होत्या.बरोबर साडेतीन वाजले होते. आमच्या गाडीतलं सामान प्रविणच्या गाडीत ठेवून तात्पुरती सोय केलेली गाडी नागपूरला रवाना झाली.शुभम नागपूरलाच थांबून गाडी दुरुस्त करणार होता. 
       सफारी साठी खास आटापिटा करुन ठरवलेल्या ड्रेसकोडचं नशीबच फुटकं.आहे त्या अवतारातच जिप्सीत बसलो कारण जिप्सी ड्रायव्हर घाई करत होते.आधार कार्ड तपासत असताना अलकाच्या नावावर सीमा ला दाखवायचा जुगाडही आम्ही घाईघाईत यशस्वी केला.          ‌    ‌आता त्या सुबोधची उलटतपासणी सुरू झाली.आमच्या नाश्ता जेवणाबद्दल त्याला काहीही कल्पना नव्हती.पुन्हा फोनाफोनी,चीडचीड ,वैताग आणि शेवटी खिदळणं..... यांचं आवर्तन झालं.आता ठरवलं, खाण्याचा नाद सोडायचा आणि सफारीला सुरूवात करायची.
आता जिप्सी जंगलात शिरु लागली लागली. जंगलातील शांतता, मधूनच येणारे पक्षांचे आवाज, पळत जाणारा हरिणांचा कळप... यांचं मनावर हळूहळू गारुड होऊ लागलं. सकाळपासून पाठीमागे लागलेला वैताग अलगद बाजूला सरु लागला. जंगलाचा रंग,गंध, शांतता शरीरात अलवारपणे झिरपू लागली आणि भूकेचाही विसर पडला. तेवढ्यात फोन आला.खुर्सापार गेटजवळ रिसॉर्ट कडून आमचं जेवण आलं होतं. ( जय हो मायादेवी) आता गेट पर्यंत वापस जाणं आणि जिप्सी तून जेवण घेऊन येणं भाग होतं. मागे असणारी जिप्सी वापस जाऊन जेवण घेऊन आली. 
 ‌‌     जंगल दाट होत चाललं होतं आणि एका पिसारा फुलवलेल्या मोरानं दर्शन दिलं.माकडं तर जशी आमच्या सोबतीलाच होती.मोठ्या शिंगाचं सांबर ऐटीत फिरताना दिसलं. आता सगळ्याच जणी निःशब्द आणि अंतर्मुख झाल्या होत्या. या जंगलाची मूक भाषा समजून घेताआली असती तर???? जंगल सफारी म्हणजे काय फक्त वाघ बघणं असतं? जंगलातील प्रत्येक जीवाकडे एक जबाबदारी असते...अगदी मुंगीची सुद्धा.आणि प्रत्येक जीव न चुकता आपलं नियत कार्य पार पाडत असतो.जंगलातली शिस्त,नियम आणि त्यातलं सातत्य हे अचंबित करणारं आहे - जे माणसाला आपल्या क्षुद्रतेची जाणिव करुन देतं. जंगलाच्या मौनाची आणि आवाजाची भाषा समजून घेणं म्हणजे स्वतःला आतून विकसित करणं ..नाही का?
         जंगलातील कॅम्प चं ठिकाण आलं.आम्ही सगळे उतरलो. जिप्सीत ठेवलेल्या अन्नाच्या गंधानं जंगलात रमलेलं मन क्षणात पोटात शिरलं. पद्धतशीर पॅक केलेल्या रुचकर जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेऊन थोडावेळ फोटो सेशन केलं, पाळण्यावर झोके घेतले आणि परत जिप्सीत बसलो.आता सूर्य कलल्यामुळे संधीप्रकाशातलं जंगल गूढ वाटायला लागलं. 
      ‌तेवढ्यात आमच्या गाईडला पक्षांचे सिग्नल कॉल्स ऐकू आले.आम्हाला सूचना देऊन त्यानं कमालीच्या वेगाने जिप्सी दामटली.पुढे बघतो तर काय,पाच सहा जिप्सीज उभ्या होत्या.त्यातील सगळे स्तब्ध आणि निःशब्द पणे उभे होते.समोरच ' तो' होता.होय.चित्ता. निवांत बसला होता. कितीतरी वेळ अनिमिष नेत्रांनी हे दृश्य आम्ही बघत होतो.तितक्यात एक चित्त्याचं लहानसं पिल्लू पण दिसलं.हा दुर्मिळ अनुभव डोळ्यात साठवत असताना गाईडनं भानावर आणलं आणि वापस निघायची सूचना दिली. जंगल आणि प्राणी यामुळेच निसर्गाचा समतोल साधला जातो.असं असताना आपण कधीतरी येऊन फक्त ' एन्जॉय ' करायचं या विचारानं आपल्या कोतेपणाची जाणिव आणखी गडद झाली. 
       आता आम्ही जंगलाबाहेर पडलो.दोन्ही जिप्सी आम्हाला रिसॉर्टवर सोडणार हे ठरलं होतं - - -अर्थातच बुकींग करते वेळी.. अंधार पडायला लागला होता.खुर्सापार गेट जवळ ची वर्दळही रोडावली होती.आता आमच्या जिप्सी ड्रायव्हरने आम्हाला 'पेचात ' टाकलं. म्हणाला,'
   मैं आपको छोड दूंगा.एक जिप्सी का एक हजार चार्ज.'- कारण उशीर झालाय. म्हणजे आता परत दोन हजार द्यायचे? 
    परत फोनाफोनी आणि संतापाचं आवर्तन. त्या अवधीत दोन्ही जिप्सी निघून गेल्या.आता तिथे अंधार, आम्ही अकरा जणी आणि एखाद दुसरा फॉरेस्टचा कर्मचारी. शेवटी आमची गाडी होतीच .ती घेऊन प्रविण अर्ध्या जणींना सोडेल आणि परत दुसऱ्या ट्रिप ने उरलेल्यांना घेऊन येईल असा तोडगा काढला. 
    आम्ही पाच जणी गाडीत कशा बसलो असू??? ...ज्या गाडीत अकरा जणींचं सामान खच्चून भरलं होतं!!! या परिस्थितीत ही हास्याचे फवारे सतत उडत होते. 
     रिसॉर्टचा रस्ता स्थानिक लोकांना विचारत निघालो कारण नेटवर्क व्यवस्थित नव्हतं. तो रस्ता नसून पायवाट होती हे लगेच लक्षात आलं कारण अंधार,खड्डे,वळणं,चढाव... याशिवाय काहीच नव्हतं. निर्जन जागा असल्याने कुणाला विचारताही येत नव्हतं. आता मात्र प्रविणचीही सहनशक्ती संपली.तो चिडून म्हणाला, 
 ' बाकीच्यांना मी आणायला जाणार नाही.तुम्ही तुमची सोय करा.मी परत या रस्त्याने येणार नाही.' 
   पेंच आणि पेच यांची जोडी काही तुटायला तयार नव्हती. कोणत्या मुहूर्तावर ही ट्रिप ठरवली, असं वाटायला लागलं. तिकडे आमच्या सहा मैत्रिणी अंधारात तिष्ठत उभ्या होत्या, त्यांची काळजी वाटत होती. मग ज्योती आणि मायाने भात्यातील अस्त्रं बाहेर काढली. ज्योतीने तिच्या खास 'सौजन्यपूर्ण भाषेत' प्रविण ला असं काही समजावलं की त्याची बोलतीच बंद झाली.
  मायाच्या आर्जवास्त्राचा मारा फोनमधून रिसॉर्ट मालकावर अव्याहत सुरु होता.शेवटी आमच्या दुसऱ्या बॅचचा खुर्सापार ते रिसॉर्ट पर्यंत चा जिप्सीचा खर्च करण्याचं त्याने कबूल केलं.झालं.
  मग लगेच तिकडे मेघाला कळवलं.गेट जवळ आता एकही जिप्सी नव्हती.परत पेच. तेवढ्यात रस्त्याने जाताना एक जिप्सी उभी असलेली दिसली.गाडी थांबवून प्रविणला चौकशी करायला पाठवलं .जिप्सीवाला आमच्या मैत्रिणींना आठशे रुपयांत आणायला तयार झाला. फोन नंबर देणे,घेणे,कळवणे पार पडल्यावर आम्ही रिसॉर्ट च्या दिशेने निघालो.खरंतर सकाळपासून घडणाऱ्या पेचप्रसंगांची साखळी पहाता अनोळखी जिप्सी ला मैत्रिणींना आणायला पाठवणं हे सुरक्षित वाटत नव्हतं.पण हा धोका पत्करण्याशिवाय पर्यायच नव्हता. 
     शेवटी आमची पहिली बॅच मृगनयनी रिसॉर्टला पोचली.सकाळपासून आमची चित्तरकथा ऐकल्यामुळे आणि मेघा- मायाच्या धाकामुळे मालकांनी आमचं अगत्याने स्वागत केलं. रिसॉर्ट आणि रुम्स अतिशय मोकळ्या आणि सुंदर असल्याने सगळा थकवा पळून गेला. तेवढ्यात आमची दुसरी बॅच आल्यामुळे जीव भांड्यात पडला.सगळ्यांनी आपापल्या खोल्या ताब्यात घेतल्या आणि सुटकेचा निःश्वास टाकला. 
     आता फ्रेश होणं, कॅम्प फायर साठी आणलेले 'खास आऊटफीट' घालणं, कराओके वर उडती गाणी लावून शेकोटी भोवती नाच करणं.....अर्थात नाचण्यात प्रिया,वर्षा,सीमा, आणि वर्षा या आघाडीवर. रुचकर जेवण......हे सगळं यथासांग, बिना 'पेच ' पार पडलं.शुभम पण गाडी दुरुस्त करुन रिसॉर्ट वर पोचला.
रात्री जागून 'कॉफी विथ गप्पा' तर अविस्मरणीय होत्या. रविवारी सकाळी जंगल सफारी चा ड्रेस कोड (वाया कशाला घालवायचा?) घालून आमच्यातल्या काही अति उत्साही बायका मॉर्निंग वॉक करुन आल्या. मग तयार होऊन, नाश्ता करून, फोटोसेशन चा राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. जातांना रामटेक चा गड चढून गेलो पण रामराया आमच्यावर का रुसला ते कळलंच नाही.देवळाला पडदा लावल्यामुळे दर्शन झालंच नाही.
आता पुढचा पडाव- नागपूर - जामठा.ब्रम्हकुमारीच्या मेडिकल विंगची डॉक्टरांसाठी 'माईंड बॉडी मेडिसीन कॉन्फरन्स'. एकदम ट्रान्स्फर सीन.शांतता! गांभीर्य!! स्व चा शोध!!! 
     व्याख्यानं ऐकताना मी विचार करत होते की माझ्या या मैत्रिणींना खरंच गरज आहे या व्याख्यानांची? कालच्या प्रत्येक पेचप्रसंगाला तोंड देताना कधी धाडसी ,कधी निर्णयक्षम,कधी भांडखोर,कधी दादागिरी,कधी बिनधास्त तर नेहमीच आनंदी , खिदळणारी ,आणि कायम सकारात्मक......अशी त्यांची सगळीच रुपं मी बघितलेली.कोणत्याही प्रसंगातून न घाबरता मजेत राहून योग्य मार्ग काढण्याचं प्रात्यक्षिक तर कालच झालं होतं.            माझ्यातला भित्रा ससा जरी मन लावून व्याख्यान ऐकत होता तरी खरं बळ मिळालं ते कालच्या प्रात्यक्षिकातूनच!! 
      आणि वाघ दिसला म्हणजेच पेंच ट्रिप यशस्वी होते का? आपल्यातली वाघीण जिवंत ठेवून वेळप्रसंगी तिला बाहेर काढून लढणाऱ्या माझ्या दहा मैत्रिणींचं दर्शन हेच आमच्या पेंच ट्रिप चं यश!!!

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...