Sunday, March 7, 2021

 "बाई रेखाटताना"

आजच्या लोकसत्तेतील,रविवार वृत्तांत मधील हा लेख.

लेखामधील आशय हा सकारात्मक,आशादायक आणि वास्तवाला धरुन असला तरी लेखकानं दाखवलेलं सुखचित्र हे अर्धसत्य आहे हे खेदानं म्हणावसं वाटतं.

कारण हल्ली मराठी /हिंदीत अत्यंत टुकार आणि अर्थहीन मालिकांचा धोधो रतीब सुरु असतो.त्यातली - सणासुदीच्या स्वयंपाकातल्या बासुंदीत मीठाचा पुडा ओतणारी.....,घरातल्या वाढदिवस समारंभात स्वतःच्या आईला कोंडून ठेवणारी......आयसीयू मधे अत्यवस्थ दिराच्या तोंडावरिल आॕक्सिजन मास्क काढून फेकणारी......मित्राच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला चार पायांवर फिरवणारी.....काळ्या रंगाच्या सुनेचा अनन्वित छळ करणारी.......ई.ई. स्त्रियांच्या रेखाटनाबद्दल लेखकानं मौन साधलं आहे.

मुळात घराघरांमधे अशा महाकारस्थानी,भडक,बटबटीत, हिंसक स्रिया असतात का??

मग अशा काल्पनिक,अतिरंजित ,दुष्ट खलनायिकांना प्रचंड फुटेज देऊन लेखक आणि निर्मात्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा असतो??

भरीस भर म्हणजे नायिका ही अत्यंत प्रेमळ आणि कमालीची सोशिक या दोनच गुणांची असते.याव्यतिरिक्त, बुद्धिमत्ता,व्यवहारज्ञान,

तर्कशुद्धता,धडाडी हे गुण तिच्या आसपासही फिरकत नाहीत .

महत्वाचं म्हणजे प्रथितयश कलावंतही या वास्तवापासून दूर जाणाऱ्या भूमिका रंगवतात आणि त्याचं समर्थन करतात.

यावर अनेकदा सुचवलेला उपाय  म्हणजे - - - रिमोट तर आपल्या हातात असतो ना????

पण हा वरवरचा उपाय झाला.

आज समाजातला एक ठराविक स्तर नियमित आणि नाईलाजाने या मालिका बघतो.

केवळ करमणूक यापेक्षाही लॉकडाऊन,वृद्धत्व,अपंगत्व एकाकीपणा,उदासीनता,वेळ जात नाही,करमत नाही.....अशी परिस्थिती अनेक घरांमधे असते .  यासाठी  या मालिका नाईलाजाने सुद्धा बघितल्या जातात.अशावेळी या सामान्य प्रेक्षकांसाठी अभिरुचीपूर्ण,दर्जेदार सकारात्मक सामाजिक संदेश देणारी कलाकृती निर्माण होऊ नये?

निर्माते /लेखक /दिग्दर्शक यांचं वैचारिक , बौद्धिक ,सांस्कृतिक दारिद्रय तर यात दिसतंच पण त्या कल्पनाशून्यतेचा फटका स्त्री प्रतिमांना बसतोय याचा विचार जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं  होईल का?

Sunday, February 28, 2021

 जागतिक महिला दिनाचे वारे सालाबादप्रमाणे यंदाही वाहू लागले आहेत ‌‌.


चावून चावून चोथा झालेल्या विषयांना आता ऊत येईल.

समाजानं, पुरुषानं, स्त्रीनं, परंपरेनं, धर्मानं स्त्रीवर केलेल्या अन्यायी कथांच्या शिळ्या कढीला भरभरून ऊत येईल.

भाषणं,सत्कार,पुरस्कार , स्त्रियांचे पोवाडे,समारंभ सारं काही रीतसर साजरं होईल.

तसंही देवीचं नवरात्र,मदर्स डे आणि जागतिक महिला दिन या दिवशी होत असणाऱ्या कौतुक सोहळ्यात आम्ही स्त्रिया  स्वतःला अगदी 'महान ' वगैरे समजायला लागतो आणि स्वतःला फसवत राहतो.


मुळात स्त्रीचं उच्च शिक्षण,तिचं घराबाहेर पडून अर्थार्जन करणं,पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या पदांवर नोकरी करणं , त्यामुळे तिच्या भौतिक जगण्यात झालेला आमूलाग्र बदल..... स्त्री प्रगतीचे हे टप्पे किंवा  पॕरामीटर्स आता कालबाह्य समजायला हवेत.

तिच्या जीवनातल्या भौतिक बदलापेक्षा वैचारिक आणि  वागणूकीतील बदल हा जास्त महत्त्वाचा आहे .


आज स्त्री म्हणून कुटुंबानं आणि समाजानं दिलेल्या भूमिका २४/७ आम्ही कवचकुंडला सारख्या मिरवतो की त्यातून बाहेर निघून एक व्यक्ती म्हणून स्वतःचा विचार करतो??? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवा.

आज मी साठी पार केली आहे.  माझ्या लहानपणाचा काळ लक्षात घेता,माझ्यातलं  'स्त्री' हे  ॲप  हे सगळ्यात प्रभावी असणं हे ओघानं आलंच.

आमच्या दैनंदिन जीवनातल्या कोणत़्याही आॕपरेटींग सिस्टीमची किंबहुना अगदी विचार करण्याची सुरुवातच मुळी ' स्त्री' अॕप उघडल्यावर व्हायची.

आत्मभान येईपर्यंत मला स्त्री पुरुषांना दिलेली वेगळी वागणूक खरं तर खटकलीच नव्हती. म्हणूनच मुलींना घातलेली बंधनं  पाळत राहिले- - त्याच समजूतीत जगत राहिले.आणि स्वतंत्र वृत्तीने वागणाऱ्या स्त्रियांना वाईट लेबलं लावीत राहिले .

जसं जसं आत्मभान आलं तसे तसे स्त्री जीवनातल्या अनेकविध भ्रमांचे भोपळे फुटत

 गेले.बरंचसं खटकलं, बरचसं मेंदूला झिणझिण्या आणणारं, कधी संतप्त करणारं, बरेचदा घाव घालणारं........

कळलं सगळंच पण 'वळलं ' का?????

दुर्दैवाने वळलं नाही कारण स्वतःच्या स्त्रीभूमिकेतून बाहेर पडण्याचं धाडस प्रत्येकीत असतंच असं नाही.

 पण 'मी' आज कुठे आहे? माझ्यातल्या 'स्त्री'चं एका व्यक्तीत परिवर्तन झालंय?????

आणि जर झालं असेल तर ते वैचारिक स्तरावर की आचरणातही आलंय?- हा प्रश्न मी स्वतःला हल्ली नेहमीच विचारत असते.

 आज अगदी मनापासून मला हे आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटतेय.

मी वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात 'व्यक्ती ' म्हणून जगतेय????.....की समाजात व्यक्ती  म्हणून आणि घरात मात्र..........

.....की सोयिस्करपणे कधी व्यक्ती आणि कधी स्त्री ..........

म्हणून  आज मला स्वतःलाच आणि माझ्या समविचारी मैत्रिणींना काही प्रश्न विचारावेसे वाटतात.


... रोजच्या जगण्यात मी माझ्या बुद्धीचा आणि माझ्या स्वतंत्र विचारसरणीचा किती उपयोग करते? की हे विचार दाबून टाकून  परंपरागत स्त्री 

मानसिकतेत राहणंच मला सोयीचं वाटतं?


....दैनंदिन जगण्यात माझं  स्त्री असणं प्रभावी असतं की एक व्यक्ती असणं?


....एक स्त्री म्हणून समाजाकडून, कुटुंबाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे का?


....माझ्या मुलगी आई, पत्नी, सासू, आजी,इ.इ. भूमिका  भिरकावून कधीतरी फक्त स्वतःसाठी  जगून बघितलं आहे का?? फक्त स्वतःलाच जाणून घेतलंय का?


....मी माझ्या घरातल्या यच्चयावत पुरुषांना स्वावलंबी केलंय का? माझ्याशिवाय त्यांचं काहीही अडणार नाही अशी परिस्थिती मी निर्माण केलीय का?


.... माझ्या मुलीला आणि मुलाला काहीही भेदभाव न करता खरंच वाढवलंय का?भांडी घासणं, केर काढणं, स्वयंपाक करणं इ.घरगुती कामं माझा मुलगा न सांगता करतो का?


.... घराबाहेर एकटी वावरताना माझं स्त्री असणं मला अडचणीचं वाटतं का?


घरातल्या आर्थिक गुंतवणूकीच्या बाबतीत माझी काही ठोस भूमिका असते की 'फुल्यांच्या' जागी सही करण्याइतपतच माझा सहभाग असतो?


स्वतःच्या बाबतीत,कुटुंबातील किंवा अवती भोवतीच्या स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांकडून गैरवर्तन घडत असल्यास मी आवाज उठवला की गप्प बसले?


आसपास एखादी स्वतंत्र विचारसरणीची,मनस्वी,परंपरा झुगारणारी,पुरुषांमध्ये बिनधास्त वावरणारी,सोलो ट्रिप्स करणारी स्त्री असेल तर मी तिच्यावर 'आगाऊ' , 'फॉरवर्ड' असे शेरे मारुन तिच्यापासून चार हात  लांब रहाणंच योग्य समजते?


..........हे अगदी वैयक्तिक स्तरावरचे प्रश्न मी स्वत:लाच विचारुन माझी परीक्षा घेतली आणि दुर्दैवाने मी त्यात काठावर उत्तीर्ण झाले.


एक दिवस जागतिक महिला दिन साजरा करुन स्वतःला देव्हार्यात बसवून आपलीच आपण किती दिवस फसवणूक करणार?

मैत्रिणींनो.............

माणूस म्हणून जगायला सुरुवात करा.आपणच आपल्यात बदल करायचा आहे.आपल्याला क्रांती घडवून आणायची असेल तर सुरुवात आपल्या पासूनच करणं गरजेचं आहे.

ज्यादिवशी प्रत्येक बाई/मुलगी स्वतःला स्त्रीत्वातून नात्यागोत्यातून पूर्णपणे बाहेर काढून स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेईल तो खरा महिला दिन असेल.

 उत्कृष्ट आई ,उत्तम पत्नी ,आदर्श सून ई.ई.होण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा उत्तम 'माणूस',

उत्तम 'व्यक्ती' होण्याच्या  दिशेनं पाऊल टाकणं.......हे खरं स्त्रीस्वातंत्र्य........

मैत्रिणींनो,नेमका कोणता आतला आवाज आपण दाबून टाकतोय हे माहित नसेल तर शोधा आणि माहित असेल तर तो आवर्जून ऐका.तो आवाजच आपलं भावविश्व उजळून टाकणारा देवदूत असणार आहे याची मला खात्री आहे.




#जागतिकमहिलादिन

Saturday, January 23, 2021

 जाने कहां गये वो दिन......                                                                  


     मी कॉलेजमध्ये शिकत असतानाचा तो काळ. चाळीस वर्षांपूर्वीचा. ते दिवसच वेगळे होते. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन डोसा खाणं ही एन्जॉयमेंट ची परमावधी होती. हो.डोसाच.कारण  सिनेमा आणि डोसा येवढीच चैन आर्थिकदृष्ट्या परवडायची.शिवाय पावभाजी,बर्गर,पिझ्झा या भावंडांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळी.

   बहुचर्चित असलेला सिनेमा रिलीज झाला की लवकरात लवकर तो थिएटर मध्ये जाऊन बघणं... यातली गंमत...अर्थातच 'थ्रील' आणि 'एक्साईटमेंट'... आजच्या पिढीला कळू शकणार नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा बघण्याचा रेकॉर्ड असणारी अनेक थोर व्यक्तिमत्वं आमच्या पिढीने बघितली आहेत. विशेषतः अमिताभ बच्चनचा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं हे तरुण पिढीच्या अनेक ध्येयां पैकी एक महत्त्वाचं ध्येय होतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.

   परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की सेंटर वरून डायरेक्ट थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची परंपराच होती त्यावेळी.  एखाद्या टुकार किंवा सामान्य सिनेमाचीच तेव्हा निवड व्हायची कारण अख्खा वर्ग एकत्र असल्यावर   सिनेमा बघण्यापेक्षा हुल्लडबाजीलाच चेव यायचा.परीक्षा  सुरू असतानाच, अभ्यास सोडून सिनेमाच्या तिकीटांची तजवीज करणारे  काही खंदे सिनेमावीर आमच्यात होते ज्यांचा मला आजही कमालीचा आदर वाटतो.

    सिनेमाची तिकिटं रांगेत उभं राहुन काढण्याचे ते दिवस होते. आणि हाउसफुल सिनेमांसाठी दोन-दोन तास रांगेत उभे राहण्याची आमच्यात  धमकही  होती. काही सुपरहिट सिनेमांचं  तर अॕडव्हान्स बुकिंग असायचं. अशी तिकिटं मिळविण्यासाठी जीवन-मरणाच्या पातळीवर जाऊन जो संघर्ष केलाय ना आम्ही त्याला तोड नाही.  प्रत्येक थिएटरच्या  मॅनेजर पासून डोअरकीपर पर्यंतच्या साखळीतल्या एका एका दुव्याचा सखोल अभ्यास करणारी काही  व्यासंगी,  संशोधक वृत्तीची मित्रमंडळी आम्हाला  माहित होती.वेळप्रसंगी  त्यांना हाताशी धरून ठेवण्याचं कसबही  आम्ही आत्मसात केलं होतं. तिकिटांचा काळाबाजारही त्यावेळी खूप चालत असे पण त्या भानगडीत मात्र आम्ही कधी पडलो नाही. आपला मध्यमवर्गीय पापभिरु बाणा हो.           

      फर्स्ट डे फर्स्ट  शो चा रेकॉर्ड कुठल्याही परिस्थितीत कायम ठेवणारा,  उज्वल भवितव्य असणारा ,शूर-वीर लढवय्या - -- असा  आमचा एक वर्गमित्र होता.  सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पाहिला तर त्याच्या मागच्या आणि पुढच्या पाच पिढ्या नरकात जाणार होत्या बहुतेक. 'सिलसिला' रिलीज झाला त्यावेळी महिनाअखेर होती. तिकिटाचे पंचवीस रुपये ही त्याच्याकडे शिल्लक नव्हते. (तिकिटाची किंमत पंचवीस रुपये हा आज विनोद वाटू शकतो पण ते खरं  आहे.)  घरापासून दूर राहणाऱ्या मुलांचा महिनाअखेर पॉकेटमनी संपूर्ण संपणं ही त्याकाळी नित्याची बाब होती. त्यावेळी ही आर्थिक ओढाताण मुलांनी कधीही पालकांच्या कानावर घातली नाही हे विशेष.आणि पालकही त्याबद्दल चौकशी करित नसत- हे त्याहून विशेष .घरुन मनीऑर्डर येईपर्यंत ही मुलं काय काय युक्त्या करीत हे जर लिहून काढलं तर आजच्या काळातलं बेस्टसेलर पुस्तक होऊ शकतं.असो. पंचवीस रुपये जमवण्यासाठी आमच्या बहाद्दर मित्राने  'मदत करा'- असं लिहून वर्गात एक  वही फिरवली. त्या  काळानुसार अवघे  पाच ते दहा रुपये वजन असणाऱ्या आमच्या पाकिटातून आम्ही प्रत्येकाने चार आणे,आठ आणे, एक रुपया, दोन रुपये पर्यंतची त्याला मदत केली आणि त्याचं फर्स्ट डे फर्स्ट शो चं व्रत सुफळ संपूर्ण झालं.

     एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी 'अभिमान' बघायला गेलो. अर्थातच गर्दी, धक्काबुक्की, खेचाखेची- यातून खिंड लढवून आम्ही तिकीटं मिळवलीत पण या लढाईत 'हाऊसफुल्ल'चा मोठा लाकडी बोर्ड मैत्रिणीच्या पावलावर पडला. जखम नव्हती पण पाऊल चांगलंच दुखावलं होतं. पण 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस'..... असा ध्यास असल्याने पायाकडे दुर्लक्ष करून ,आम्ही तहान भूक हरपून, अभिमान बघितला. सिनेमा संपल्यावर उभं राहिल्यावर जाणवलं की तिच्या  पावलावर प्रचंड सूज आली होती. डॉक्टरांनी पावलाच्या फ्रॅक्चरचं  निदान करून दीड महिना तिचा पाय प्लास्टरमध्ये बांधून ठेवला होता. आज सुद्धा, 'फ्रॅक्चर असतानाही मी सिनेमा बघितला'..... हा 'अभिमान' ती बाळगून आहे .

     'उमरावजान' मधल्या रेखाच्या नृत्यासाठी,'निकाह'मधल्या 'चुपके चुपके रातदिन' या गुलाम अलीच्या गझलेसाठी,'शक्ती' मधे राखीचा मृत्यू झाल्यावर दिलीपकुमार आणि अमिताभचा अबोल आणि चटका लावणारा सीन बघण्यासाठी, 'अंगूर'च्या शेवटच्या सीनमधली आजी बघण्यासाठी,'शोले' मधला प्रत्येकच सीन बघण्यासाठी .....आणि कशाकशा साठी एकाच सिनेमाचा वारंवार झिजवलेला उंबरठा...........अशी समर्पण वृत्ती असणारे भाविक आमच्यात खूप  होते.

त्याकाळी बाल्कनी आणि बॉक्स मधे बसणारी मंडळी उच्चभ्रू असायची.आम्ही  'रिझर्व्ह क्लास'चे वाटसरू  होतो. 

गच्च भरलेलं थिएटर .....

थर्ड क्लास मधली टपोरी पब्लीक......                                                              


थिएटर मधला काळोख ....

भारतीय सरकारची फिल्म डिव्हीजन प्रस्तुत  ब्लॕक अँड व्हाईट डॉक्युमेंटरी....

विको टर्मेरिक ची जाहिरात....

आणि सिनेमाला सुरुवात .....

हे सगळं  जादुई आणि उत्तेजित करणारं वातावरण असायचं. पुढच्या तीन तासात वेळप्रसंगी पडद्यावरची दुःख आपल्या काळजात ओढून घेऊन आम्ही घळाघळा रडत ही होतो.  जया भादुरी- मनोज कुमारचा 'शोर ',अमिताभ -जया भादुरी चा 'मिली' ,पद्मिनी कोल्हापुरेचा, 'आहिस्ता आहिस्ता', राजेश खन्नाचा 'आनंद ',रेखाचा 'जीवनधारा'.....अशा अनेक सिनेमांमध्ये -  प्रत्यक्ष जीवनातही जेवढं रडणार नाही तेवढं धो धो  रडून झालेलंय आमचं.  

    अगदी लहानपणी घराघरातून, वर्षातून दोन-तीनदा घरातल्या सगळ्या बच्चेकंपनीला पौराणिक किंवा ऐतिहासिक सिनेमा दाखवून आणायचा एक भव्य कौटुंबिक कार्यक्रम असायचा. त्यावेळी  'भक्त प्रल्हाद' बघतांना प्रल्हादाचा होणारा छळ बघून आम्हा सर्व भावंडांनी थिएटरमध्ये भोकाड पसरलं होतं -अशी एक वदंता आहे.....

    'माहेरची साडी'बघतांना तर रडून रडून बाया बापड्यांचे डोळे सुजत होते. गर्दी खेचण्यासाठी त्या सिनेमात ईंटरव्हल मधे लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला एक माहेरची साडी भेट मिळत  होती.

     सिनेमे आजही बघितले जातात. पण ते घरच्या होम थिएटर मधे नेटफ्लिक्स वर किंवा ॲमेझॉन प्राईम वर. मल्टीप्लेक्स मधे जाताना आॕनलाईन बुकींग केल्या जातं.   त्यामुळे  तिकीटं काढण्यासाठी रांग नाही , धडपड नाही इंटरवल मधला कोल्ड्रिंक च्या बाटल्यांचा आवाज नाही. गर्दी नाही, धक्काबुक्की नाही.त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.

 आमच्या काळातील तरुणाईला व्यक्त व्हायला आजच्या सारखी मोकळीक नव्हती आणि तशी साधनंही नव्हती .मग मनातलं खूपसं साचलेलं,बरचसं अव्यक्त असं त्या रुपेरी पडद्यावर जिवंत व्हायचं .पडद्यावरचं उमलून येणारं प्रेम,जीवघेणा संघर्ष , पिळवटून टाकणारं दुःख ,तनामनाला नाचवणारा आनंद आमचाच होऊन जायचा.

तो आमच्यासाठी केवळ सिनेमा नसायचाच मुळी.ते तर  स्वतःचंच जगणं  होतं- - औटघटकेचं का होईना पण .......ते स्वतःचंच जगणं होतं.

         आज पूर्वीसारखे सिनेमाभक्तही आढळत नाहीत .  

'होऊनिया वारकरी,पाहिली आज तुझी पंढरी'.....या ओढीनं थिएटरच्या दिशेनं वळणारी पावलं आता अभावानंच सापडत असतील.

      मला वाटतं ज्यांनी सिनेमावर मनापासून प्रेम केलंय, त्यांना अध्यात्माच्या वाटेवरून चालताना फारशी अडचण येत नाही. कारण अध्यात्मातल्या पायऱ्या - -

 मन निर्विचार करणं......

 'मी' ला विसरणं ......

तहानभूक हरपून समोरच्या पडद्याशी एकरुप होणं...... 

पडद्यावरच्या प्रसंगांमधे समर्पित होऊन.....

समाधी अवस्थेत जाणं......  हे सगळं सिनेमाभक्तांचं अनुभवून झालं असतं. 

'आता कोठे धावे मन', तुझे चरण देखिलेया' अशा ध्यासानं आमच्या पिढीतल्या अनेकांचं या  सिनेमा हॉलमध्ये भावजीवन समृद्ध झालेलं आहे. खूप तरल आणि आनंददायी अशा आठवणींचा तो खजिना आहे ज्यामुळे  आजही मन तेवढंच टवटवीत होतं आणि  म्हणतं- - - 'जाने कहां गये वो दिन........

Saturday, January 2, 2021

 कोविड डायरी...

        एका अस्वस्थ मनाची....

जानेवारी 2020 ....

31 डिसेंबर 2019 ला निरोप आणि जानेवारी 2020 चं स्वागत  रीतसर साजरं झालं. तशी व्यक्तिशः मी असल्या सेलिब्रेशनच्या फंदात फारशी पडत नाही पण राष्ट्रीय कुळाचार असल्याप्रमाणे या उत्सवात थोडं का होईना,नाईलाजास्तव ओढल्या जातेच. मग दरसाल दरवर्षी प्रमाणे  नववर्षाचे थातूरमातूर संकल्पही करून झाले . .........अहो,शास्त्र असतं ते....

 दरम्यान वुहानमध्ये कोरोना नामक नवीनच एका साथीच्या उद्रेकाच्या भीषण बातम्या बघितल्या......

 चीनमधे ना??आपल्याला काय त्याचं ???

शेवटी परदुःख शीतलम्.......

आपल्या झोपेचं खोबरं कशाला?

 फेब्रुवारी 2020...

इटलीमध्ये कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.. स्मशानभूमीत जागा कमी पडते आहे....

 पोटात गोळा उठला जबरदस्त!

 पण भारतातल्या 45 डिग्री सें. तापमानात हा विषाणू कसला तगतोय??

 जीव शांतवला जरासा.

नेहमीसारखीच गाढ  झोप लागली .

 मार्च 2020 ....

पुण्यात पहिला कोरोना रुग्ण.. मुंबईत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू.......

 जीव धास्तावला आहे....

 बुद्धीला जरा बाजूला ठेवून थाळीनाद केला.

 दिवे उजळले .

सामूहिक कर्फ्यू .....

थोडासा दिलासा मिळाला.

 होईल सगळं व्यवस्थित.....

साथीचे रोग येतातच की आणि जातातही......

 शांत  झोप लागली.

 एप्रिल 2020....

भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढली.

 जिल्हाबंदी ,शाळा, कॉलेज, ऑफिस, कारखाने, दुकानं, बसेस, रेल्वे, सगळं बंद.

 फक्त आमचे दवाखाने सुरू.. "ऑन ड्युटी डॉक्टर" हे लेबल गाडीवर शौर्य पदका सारखं लावताना ऊर नक्कीच भरुन आला.

 आटोक्यात येणार ही साथ........

फ्लूचा मोठा भाऊ हो......

 उत्साहानं शासनाचे कोविड१९चे ऑनलाईन ट्रेनिंग्ज घेतले. 

सात लेव्हल्सचे सर्टिफिकेट्स जमा झाले.

 कोविडची वैद्यकीय आणि वैज्ञानिक बाजू क्लियर झाल्यामुळे हिरीरीने समाजात ज्ञानवाटप आणि  जनजागरण सुद्धा केलं.

काढे,वाफ,नस्य- दिनक्रमात जोडल्या गेले.

 एसी, कुलर, थंड पाणी, आईस्क्रिम, सरबत, पन्हं,ई. नसतानाही  रात्रीची झोप मात्र निवांत  होती.

  मे -जून-.जुलै 2020 ...

कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतोय.... 

मृत्युदर वाढत चाललाय...

 बरे झालेल्या रुग्णांच्या मोठ्या  संख्येपेक्षा  मृतांचा आकडा कमालीचा छळतोय....

 हा विषाणू आता मनात आलाय वस्तीला ....

कुठेतरी कुणाचा तरी --  श्वासासाठी संघर्ष ......

कुठेतरी भुकेल्यांचा- - अन्नासाठी संघर्ष........

 कुठेतरी एकाकी असहाय व्यक्तिचा- - आधारासाठी संघर्ष....

 सर्व स्तरातील कोविड योद्ध्यांचा - --  कामासाठी घरदार सोडतानाचा संघर्ष......

फॉरिन टूर रद्द झाल्यामुळे कुणाचा तरी- - पंचतारांकित,कोमट संघर्ष ..... 

 आम्ही सुरक्षित आहोत. सगळं कुटुंब एकत्र आहे ..... हा स्वार्थी दिलासा खुपत होता कुठेतरी.. 

आज आश्वस्त वाटतंय पण उद्या?????

 आता रात्री दचकून जाग येतेय.. भीषण सावट आलंय मनावर.. काही लक्षणं नसतानाही, घरातल्यांच्या नकळत  पल्सऑक्सीमीटर उशीखाली लपवून झोपणाऱ्या डॉक्टरांची ही संख्या वाढते आहे.......

ऑगस्ट-सप्टेंबर 2020.... 

आता तर कोरोना विषाणू मनातून अंतर्मनात ही शिरलाय...

 वृत्तपत्र वाचन बंद केलंय..

 बातम्या बघणं बंद केलंय... तरीही येतेच ती दुष्ट, क्रूर बातमी- निकटवर्तीयाच्या मृत्यूची.... 

मृत्यूनं मन हेलावणं हे स्वाभाविकच .

पण या कोरोनानं मृत्यूची थरकाप उडवणारी निष्ठूर बाजू  दाखवली.

प्लास्टिक मध्ये गुंडाळून, एकटेपणाला सोबत घेऊन येणारं मृत्यूचं विदारक रुप..... 

दुःखाला बधीर करणारं....

कुठे आई वडिल दवाखान्यात ...

छोटी मुलं घरी एकाकी.......

वारंवार गळ्याशी आवंढा दाटून येणं वाढलंय आताशा.

मनातला कोरोना धुमाकूळ घालतोय......

 ऑनलाइन गाणी, नाच, रेसिपीज,समुपदेशन, लेक्चर्स योग साधना..... यांनी कसाबसा थोपवलेला हा मनातला विषाणू उचल खातोय परत परत......

हाऊसिंग सोसायट्यांच्या गार्डन मधला शुकशुकाट, स्तब्ध झोपाळे आणि एकाकी  घसरगुंड्या बघून पोटात गोळा  उठतोय.....

 मनातल्या विषाणू साठी कसा करावा लाॕकडाऊन???

मध्यरात्री झोप उघडली की परत डोळा लागतच नाहीय...

आॕक्टोबर - नोव्हेंबर २०२०

.... वरवर तसं सुरळित चाललंय..

मन मात्र धास्तावलेलंच आहे.  दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येणार????

  सण-उत्सव घरच्या घरी होताहेत साजरे.अवतीभोवती बरचसं सकारात्मक,रचनात्मक घडतंय.......

मनातल्या विषाणुचा जोर कमी झाल्यागत वाटतोय..

 पण मनाच्या  चिंधड्या व्हायच्या त्या झाल्याच. 

पण नाही.

आता हतबल व्हायचं नाही.

 डिसेंबर 2020 .....

भारतातील कोविडचं चित्र दिलासादायक... कोरोनाची लस ही येणार........  विषाणूच्या थैमाना पुढे माणसाची जगण्याची धडपड वरचढ ठरली हे निश्चित.

 पण या दहा महिन्यातल्या मनाच्या पडझडीचं काय?? मनात वस्तीला आलेल्या विषाणूला कसं हद्दपार करायचं???

 मानसिक कोविड मधून बरं होणाऱ्यांचं प्रमाण किती टक्के???

मनाच्या कोविडवर आहे का हो लस??? 

नाही....अशा विचारांच्या गुंत्यात अजिबात अडकायचं नाही.

शंभर क्षण  सावरण्याचे आणि  एकच क्षण कोसळण्याचा आहे..

झटकायचा तो क्षण .......

जानेवारी २०२१....

असो.....

 प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी किनार असतेच.मनाच्या कोविडची लस आपली आपल्या जवळच आहे ,हे जाणवतंय... फक्त ती शोधण्याची दृष्टी आणि  वृत्ती  पाहिजे...

.कोविडनंच शिकवलंय ना हे???? पाय रोवून उभं राह्यला....

  "दुःखेष्वनुद्विग्नमनाः 

सुखेषु विगतस्पृहः/

वीतरागभयक्रोधः

स्थितधीर्मुनिरुच्यते//"

ही गीतेतली लस रोज समजून,उमजून स्वतःला टोचत राहणं......हा संकल्प करावा का

 नवीन  वर्षाचा??? 

जमेल???

कारण संकल्प अल्पजीवी असतात ...

असू दे.तो विचार आता  नाहीच करायचा.

पंतप्रधान मोदींच्याच शब्दात सांगायचं तर,


"न अपना न पराया

न तेरा न मेरा,

सबका तेज बनकर

अभी तो सूरज उगा है".

"विकृतिने प्रकृतिको दबोचा

अपनोंसे ध्वस्त होती आज है,

कल बचाने और बनाने

अभी तो सूरज उगा है.

Sunday, December 20, 2020

एका सहभोजनाची गोष्ट ....

 परवा आमच्या जवळच्या एका कुटुंबाकडून त्यांच्या फार्म हाऊस वर एक दिवसाच्या गेट टुगेदर आणि  सहभोजना साठी निमंत्रण आलं. माझ्या अंगात उत्साह संचारला.त्यांच्या फार्महाऊसचं खूप  कौतुक ऐकलं होतं. तेवढंच  त्या कोरोनाच्या उदास वातावरणातून जरा बदल. नवऱ्याने नेहमीप्रमाणेच मीटींगचे कारण सांगून अंग काढून घेतलं आणि चिरंजीव? बाय डिफॉल्ट त्याला घरगुती कार्यक्रमात सहभागी होण्याचं अंगच नाही त्यामुळे सहभोजनाचं निमंत्रण त्याच्या मेंदूपर्यंत शिरण्याचा प्रश्नच नव्हता.

      मीच उत्साहाने तयार होऊन फार्महाऊसवर पोचले. एकदम प्रसन्न  वातावरण होतं. जुन्या धाटणीचं बैठं कौलारू, ऐसपैस घर. चारही बाजूंनी हिरवीगार शेती. बाजूलाच पेरू, लिंबू, आंब्याचा मळा. झाडाला टांगलेले झोके. लहान मुलांसाठी घसरगुंडी , सीसॉ.चुलीवर सुरू असलेला अस्सल गावरान स्वयंपाक. आहाहा..........

 पण मला कोणाची चाहूल लागत नव्हती. मी वेळेआधीच पोचले की काय???

हळूच  घरात शिरले. निमंत्रित मध्यमवयीन मंडळी होम थिएटर वर "चंद्र आहे साक्षीला" सोबत अक्षरशः समाधी अवस्थेत पोचली होती कारण  मी आल्याचं कुणाला  कळलंही नाही.

    दिवसाढवळ्या, निसर्गरम्य वातावरणात,फार्महाऊसच्या घरात बसून त्या  चंद्राला साक्षीला घ्यायचं काय प्रयोजन???

    मी तिथून काढता पाय घेतला आणि मागच्या व्हरांड्यात पोचले.तिथे  अर्ध्या चड्ड्या घातलेल्या, केस विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या, आजूबाजूचं भान नसलेल्या तरुण मुला मुलींचा ग्रुप दिसला. यातील प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपल्या आयुधांसह - (मोबाईल,टॕब, लॅपटॉप - - -सह) (समाधीच्याही  पुढची अवस्था असते का हो???) - परग्रहावर पोचलेला........

  नाही म्हणायला होस्ट जोडपं जोडपं जागृतावस्थेत असल्यामुळे माझा त्यांच्याशी खराखुरा संवाद झाला.ते कामात असल्याने मी  बाहेर आले.मोकळेपणानं  हिंडले. झाडापानांचा गंध शरीरातल्या रंध्रारंध्रात ओढून घेतला. कुणाचं लक्ष नाही हे बघून, माझं वय विसरून, मी  झोक्यावर मनसोक्त  खेळून  घेतलं.

  दरम्यान चंद्राची साक्ष संपल्याने समाधी अवस्थेतली मंडळी आता भौतिक  जगात परतली असतील म्हणून त्यांच्यात जाऊन बसले. त्यापैकी एका आजीकडून "सांग तू आहेस का"चे  तब्बल तीन एपिसोड्स न बघण्याचा घोर अपराध घडला होता त्यामुळे इतर मंडळींकडून ती ष्टोरी ऐकून त्यांचं पापक्षालन सुरू होतं.

" तू नक्कीच नाही यात"- - असं मी मला स्वतःला सांगून परत बाहेर आले .आता तर डोकं फिरलेल्या अवस्थेत , तिरीमिरीत , मी याही वयात (वय वर्षे साठ) घसरगुंडी खेळायचाही निश्चय केला. (अर्थात त्याबद्दल तपशीलवार पुढे कधीतरी .......)  त्यानंतर स्वयंपाक करणाऱ्या बायकांशी  गप्पा-टप्पा करुन हातावरच्या भाकरी करण्याचा अयशस्वी प्रयत्नही करुन झाला .

आता मात्र  सगळी मंडळी भूतलावर परतली होती आणि पाय मोकळे करायला बाहेर आली. मला जरा हुरूप आला.आता गेट टुगेदर घडण्याची आशा निर्माण झाली. पण हाय रे माझ्या कर्मा!!! आता फोटोसेशन सुरू झालं. एका लाईनीत, उंचीप्रमाणे,सगळ्यांनी बाजूच्यांच्या डाव्या खांद्यावर हात ठेवलेले, सगळे पाठमोरे,पण उजवीकडे मान वळवलेले, पायऱ्यांवर एकाखाली एक बसलेले .......अशा हल्लीच्या सगळ्या प्रचलित पोझेस मध्ये यथासांग फोटो झाले. नंतर ड्रेस बदलून हिरव्या रंगात मंडळी अवतीर्ण झाली. मी हिरवा ड्रेस आणला नसल्यामुळे माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक बघूनही झालं. एकंदरीत फोटोंचा तो राष्ट्रीय कार्यक्रम एकदाचा संपला.

   आता मात्र खूप भूक लागली होती .चुलीवरचा तो गावरान मेनू नाकाला, जिभेला, आणि पोटाला खुणावत होता. गर्द वनराईत मस्त भोजनाची व्यवस्था केली होती. आता निवांत हादडायचं या उद्देशाने मी सरसावले......

तितक्यात ....

 फुगलेल्या भाकरीचा, भरलेल्या वांग्याचा,कांदाभजींचा,  झणझणीत रश्शाचा, केशरी चकचकीत जिलब्यांचा,पापडांचा क्लोज-अप घेण्यासाठी आता तरुण मंडळी सरसावली होती. आता हे पुढ्यातलं सुग्रास अन्न खाऊ ,की या फोटोग्राफर मंडळींना "खाऊ कि गिळू "असा माझा नुसता तिळपापड होत होता. शेवटी पुन्हा  फोटोंचा राष्ट्रीय  कार्यक्रम संपल्यानंतर भोजन सुरू झालं.

 चार घास पोटात गेल्यावर मध्यमवयीन लोकांचा थोडाफार तरी - औपचारिक का होईना पण  संवाद सुरू झाला.

 पण तरुण मंडळी??? जितक्या इंटरेस्ट घेऊन त्यांनी पदार्थाचे फोटो काढले, तितक्याच नीरसतेनं ते समोरचं अन्न चिवडत होते. साक्षात  रुचकर अन्नब्रह्म समोर असतानाही त्यांचं आभासी ब्रम्हांडाशी असलेलं अद्वैत तुटलं  नव्हतं . इतक्या लहान वयात, "सुखदुःखे समे कृत्वा, लाभलाभौ  जयाजयौ" प्रत पोचलेली ही मंडळी बघून मला धन्य धन्य  वाटलं. भाकरी, भजी, रश्शाच्या  सुग्रास चवी पलीकडे जाऊन व्हर्च्युअल जगात गुडूप झालेल्या या तरुणाईचा  आनंद नक्की कशात असावा हा प्रश्न मला छळू लागला. तसंच माझ्यामोरच्या मध्यमवयीन मंडळींना, निसर्गाच्या सान्निध्यातही  टीव्ही सिरीयल आणि सोशल मीडियावर टाकायच्या फोटोंचं इतकं महत्त्व असावं???? 

     त्यांचाही आनंद नक्की कशात  असावा?

   असो. मी मात्र माझा झोक्यावरचा आणि घसरगुंडीवर खेळण्याचा(?) चिमुटभर आनंद मात्र उरी पोटी जपून घरी घेऊन आले.



#गेटटुगेदर

#फार्महाऊस

#सहभोजन

#आनंद

Saturday, November 28, 2020

 "आई एक नाव असतं.

घरातल्या घरात,एक गजबजलेलं गाव असतं."

फ.मु.शिंदेंच्या या दोन ओळीतच आख्खी "आई" सामावली आहे- 

तुमची ,माझी,सगळ्यांचीच.

आयुष्यभर अनेक निरर्थक गोष्टींच्या मागे पळताना आईप्रती साधी कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आम्हाला भासत नाही इतकं त्या माऊलीला गृहीत धरल्या जातं.

       मला मिळालीय संधी.....

      तिच्या वाढदिवसाची........

बघतेय,आभाळभर भावना चिमूटभर शब्दात  मांडता येतात  का????



 "अगं, लवकर इकडे ये"..... आईची भल्या सकाळी आलेली हाक ऐकून मी ताड्कन उठून बसले. क्षणभर  छातीत धस्स झालं. धावत जाऊन बघितलं तर आई खिडकीसमोर उभी. 

"अगं बघ. सूर्योदय किती छान दिसतोय. तो लालभडक गोळा हळूहळू वर येतोय ना,ते बघतांना माझी नजर हटतच नाहीये "- - तिचा उत्तेजित आणि आनंदित स्वर .

"आई काय हे? पहिल्यांदा बघतोय का आपण सूर्योदय ?" - - झोप मोडल्यामुळे माझा  चिडका आणि रागीट स्वर. आणि मी तणतणत परत पलंगावर.

 रोजचा सूर्योदय,सूर्यास्त, रोज झाडावर येणारे पक्षी, रोज फुलणारी फुलं- - ही नक्कीच ऊर्जा देणारी आणि सकारात्मकता जोपासणारी निसर्गाची रूपं असली तरी त्यांना बघून लहान मुलांसारखं उत्तेजित होणं आणि त्याहीपुढे जाऊन फोनवर त्याचं वर्णन दुसऱ्याला ऐकवणं - ही वृत्ती नेमकी कोणत्या वयात असावी? 

          विश्वास बसणार नाही पण नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माझ्या आईत हे एक लहान  आनंदी मूल कायम बागडत असतं.

 आणि तिच्यातल्या त्या लहान बालकाच्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी आम्ही तिघीही "पोक्त" वयाच्या तिच्या मुली अगदी सज्ज असतो.

पण तिनं असं कधीच केलं नाही.

 आमच्या लहानपणी सगळ्यात मौल्यवान असं तिनं आम्हाला  काही दिलं असेल तर ते म्हणजे मोकळे श्वास घेण्याचं स्वातंत्र्य.......

सूचनांचा भडिमार नाही किंवा शिस्तीचा बडगा नाही...

संस्कारांचा जाणीवपूर्वक अतिरेक नाही किंवा उपदेशाचे डोस नाहीत ...

एक बंधनमुक्त बालपण तिनं आम्हाला दिलं.

 आजही जगतांना तो मोकळेपणा आम्हाला बळ देतोय .

मी माझ्या मुलांना देऊ शकले असला मोकळा श्वास ???नाहीच बहुतेक .

हात धरून जाणीवपूर्वक तसं तिनं आम्हाला काहीच शिकवलं नाही.

 मात्र तिच्या जगण्यातून कितीतरी महत्त्वाचे धडे आम्हाला मिळाले आणि अजूनही मिळताहेत .पण नेहमीप्रमाणे "आई "जशी गृहीत धरली जाते तसे कितीतरी धडे हे गृहीतच धरले गेले.......

 काही धडे मनापासून अभ्यासले गेले ......

काही धडे रक्तात मुरले...... बरेचसे आचरणातही आले .....

"आई "नावाच्या पाठशाळेला कितीतरी काळ गंभीरपणे घेतलंच नाही कधी.

 हल्ली तर.........

" आई तुला कसं काहीच समजत नाही???"....

 असं म्हणून तिचीच शाळा आम्ही सगळेच घेत असतो. ती सुद्धा शहाण्या विद्यार्थ्याप्रमाणे आमचं ज्ञानामृत शांतपणे पचवते.

  १९३१चा तिचा  जन्म. छिंदवाडा गावातलं लहानपण, लग्नानंतरचं मॕट्रिक ते पीएचडी पर्यंत शिक्षण ,एकत्र कुटुंब , सोवळंओवळं,प्राध्यापिकेची नोकरी ,आम्हा तिघींची शिक्षणं, तिघींची लग्नं,बाबांचं दीर्घ आजारपण,नातवंडं, त्यांची लग्नं,नागपूरहून पुण्याला आणि पुण्याहून नाशिकला स्थलांतर आणि आताचं हे तंत्र युगातलं यांत्रिक जगणं..........ही सगळी स्थित्यंतरं, सुखदुःखाचे चढउतार अनुभवून,सोसून,पचवून तिच्यातलं ते आनंदाचं झाड अजूनही तेवढंच हिरवं आणि टवटवीत कसं आहे  हे मला अजूनही  उमगलेलं नाही.

अंगभूत शांतता ,आनंदी स्वभाव आणि स्थिरचित्त वृत्ती हे तिचे  "इनबिल्ट अॕप्स" मला डाऊनलोड करता आले असते तर????

आई- -आज तुझा एकोणनव्वदावा वाढदिवस .

तुला या वाढदिवसाला काही द्यावं असं माझ्याकडे तरी काहीच नाही.

उलट मीच तुला काहीतरी मागतेय.......

तुझं रक्त तर माझ्या नसानसात आहेच पण.....

तुझ्या शरीरातल्या रक्तासोबत वाहणारा तो निखळ आनंद .....

तो माझ्या  नावावर करुन दे ना एकदाचा.

तुझ्या कपाटात,तुझ्या सामानात मी खूप शोधली ती अक्षय आनंदाची कुपी........

सापडली नाही कधीच .

हल्ली मला खूप गरज भासतेय त्या आनंदाच्या कुपीची...

आजकालच्या आयांसारखा आटापिटा कर,काहीही कर पण माझी  मागणी  पूर्ण करच.

     आणि हो. हे करतांना तुझ्यातलं ते हिरवं आनंदाचं झाड असंच बहरलेलं राहू दे.

       नेहमीसाठीच.

Thursday, November 5, 2020

आज ८ नोव्हेंबर.
 आज पुलंची जयंती.

माझ्या भावविश्वाला आणि  विचारांना समृद्ध करणाऱ्या 'पुलसाहित्याला' कोटी कोटी प्रणाम!!!

पुलंच्या नेमक्या कोणत्या साहित्याची आज उजळणी करायची......हा माझ्या समोर गहन प्रश्न .............

विनोदी की व्यक्तीचित्रण की वैचारिक ??

पुलंच्या बालपणातच जाऊ या आपण....

लहानपणी शाळेत असताना .... तुमच्या आमच्या मनात जे काही विचार  यायचे ना,अगदी तसेच ........

पण शब्द मात्र  पुलंचे.........मिष्किल, खोडकर आणि व्रात्य.

हसवणूक पुस्तकातील .....

     बिगरी ते मॕट्रिक......

माझ्या  शालेय जीवनात गणित, भाषा, इतिहास, भूगोल, ड्रॉइंग आणि व्यायाम हे षड्रिपू. त्यातला गणित हा बलाढ्य, पण मला सगळे सारखे होते. मी यापैकी एकाही विषयात गचकलो नाही, पण कोणाशीही मैत्री जमली नाही. एखाद्या  दुबळ्या राष्ट्राने सर्वांशी मित्रभाव  ठेवून असावे ,तसा राहिलो. पण ह्या सार्‍या विषयांची माझ्या बालपणाला वाळवी लागली होती. रात्रंदिवस ती माझे बाल्य पोखरीत होती. मी पाढे धडाधड म्हणत असे ,पण घाबरून. त्यातल्या तेरा,स"तरा, एकोणीस,तेवीस  आणि एकोणतीस या पाढ्यांना मी आजही भितो. त्या संकटातून सुटत सुटत विसाच्या किंवा तिसाच्या पाढ्यावर आलो की आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे, आणि त्यात जीव नावाची वस्तू पडल्यावर गार वाटते, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे .मॅट्रिक नावाच्या जिवावरच्या दुखण्यातून उठल्यानंतर पुन्हा माझा कधीही या तेरा,सतरा,तेवीस,एकोणीसशी संबंध आला नाही. पाऊणकी, सवायकी, औटकी यातली प्रत्येक गतजन्मीची चेटकी आहे यावर माझा नितांत विश्वास बसायचा.चेटक्या लहान पोरांना पळवतात म्हणे. ह्या चेटक्यांनी माझे बाल्य पळवले.

आम्हाला डोक्याबरोबर डोळे  बिघडवणार्या बारिक टायपात छापलेले गोखल्यांचे अंकगणित असे.इतके कुरुप पुस्तक  त्यानंतर माझ्या  पाहण्यात नाही.गणित वाले गोखले हेच गोपाळ कृष्ण गोखले हे कळल्यावर पुढच्या सर्व पिढ्या त्यांना सोडून गांधींच्या मागे का गेल्या ,हे गणित मला अचानक सुटले."........


हसवणूक पुस्तकातील शब्द न् शब्द वाचकांना विनोदाच्या झोक्यावर अलवारपणे झुलवत ठेवतो आणि मनावरचं मळभ कधी नाहीसं होतं हे कळतही नाही.

हीच  पुलंची शैली  महान व्यक्तींचं वर्णन करतेवेळी अचूक  विश्लेषणात्मक होते - तेही साध्या सहज शब्दात .


एक शून्य या पुस्तकात गांधीजींबद्दल ते लिहीतात.......

 "गांधीजींच्या लेखी एखादा वैज्ञानिक आणि केवळ अंगमेहनत करणारा भंगी ही दोन टोके नव्हती. समाज पुरुषाच्या शरीरातील समान महत्त्वाची घटके होती .शौचकूप गलीच्छ झाल्यावर मायक्रोस्कोप ऐवजी झाडू हवा आणि मलरोग तपासायला मायक्रोस्कोप वापरता यायला हवा. त्या त्या वेळी ती ती कामे समान महत्त्वाची. म्हणूनच गांधींनी लेखणी,टकळी आणि झाडू एकाच तोलाने वापरला .गांधीजी खरे कर्मयोगी होते. प्रार्थनेची जागा आणि शौचाचा संडास या दोन्ही स्थानांविषयी त्यांनी  तितक्याच उत्कटतेनं विचार  केला."

गांधीजींच्या स्वभाववैशिष्ट्याविषयी लिहिताना ,पुलंनी कुठेही जडपणा येऊ न देता,रंजकशैलीत गांधीजी उभे केले आहेत.पुलंच्या लेखामुळे गांधीजींच्या साहित्याकडे वळणारी बरीच मंडळी आहेत.

        पुलंची निरीक्षण शक्ती अफाट तर आहेच पण ते निरीक्षण खुसखुशीत ढंगानं मांडण्याची सिद्धी तर अलौकिकच आहे.

"पानवाला" या लेखात ते लिहितात...............

" महात्माजींचे उघडया अंगाचे फोटो कुठेही दिसतात परंतु नेहरू सदरा घालून ,गांधी टोपी घातलेले गांधी अजूनही आमच्या पानवाल्यानेच जतन करून ठेवले आहेत .गांधी जवाहरलालजींच्या मागे शिवाजी महाराज ,राणा प्रताप,कानात  लांब इयरिंग्ज आणि लांब बाह्यांचे पोलके घातलेल्या इ.स.एकोणीसशे सोळातल्या सरोजिनीदेवी - -यांच्यापुढे मारुती आणि  तोसुद्धा छाती फाडून आतला रामपंचायतनाचा सीन दाखवणारा!!इतिहास ,राजकारण ,धर्मकारण यांचा इतका आटोपशीर आविष्कार !! अजून सूर्योदयाचा देखावा तर विचारायलाच नको.आकाशात विमान  आहे ,विमानातून बाहेर डोकावणारा व डोळ्यांपेक्षा रुंद काळा चष्मा लावलेला पायलट आहे .पुलावर आगगाडी आहे .पुलाखाली गलबत आहे ,गलबताखाली खाडी आहे .खाडीत कमळे आहेत.खाडीच्या बाजूला राजवाडा आहे .त्याच्या कमानीवर 'वेलकम' असा बोर्ड आहे .राजवाड्यासमोर बाग आहे .बागेत भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवतो आहे आणि  राधाबाला मुग्ध होऊन आगगाडीकडे पहात आहे!!! स्थल,काल,विषय - कसल्याही जुलमी मर्यादा न मानणारे हे कलेचे प्रात्यक्षिक फक्त पानवाल्याच्याच काचेवर दिसू शकते!"

 अशी पुलंची नर्मविनोदी शैली आणि त्यामुळे अजरामर झालेल्या असंख्य व्यक्तिरेखा.

     वुडहाऊस हे पुलंचं दैवत .वुडहाऊस बद्दल लिहिताना ते कमालीचे हळवेही होतात.

"१६फेब्रु.१९७५.सकाळच्या गाडीने पुण्याहून मुंबईला जायला निघालो  होतो.वर्षानुवर्षे वुडहाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे .त्याची पुस्तके शिळी व्हायलाच तयार नाहीत .माझ्या  प्रवासी बॕगेत इतर कोणतीही पुस्तके असली तरी वुडहाऊस हा हवाच.तेवढ्यात दाराच्या फटीतून 'सकाळ' सरकला.पहिल्या पानावर वुडहाऊसच्या निधनाची बातमी.एका हातात कधीही न मरणारा वुडहाऊस आणि दुसऱ्या हातात ९४व्या वर्षी वुडहाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा  'सकाळ'.त्या क्षणी मला वुडहाऊसच्याच एका उद्गाराची आठवण झाली .'लेओनारा' ही त्याची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर ६३वर्षाचा वुडहाऊस  उद्गारला होता - - 'आय थॉट शी वॉज इम्माॕर्टल'.आपली  लाडकी  लेओनारा आणि तिचा मृत्यू या  दोन घटना वुडहाऊसच्या स्वप्नातही कधी एकत्र आल्या नव्हत्या .

'मला वाटलं की ती अमर आहे ' - या उद्गारात जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या मनावर बसणार्या निर्घृण घावाला एखाद्या शोकसूत्रासारखी वाचा फुटली आहे.वुडहाऊसच्या निधनानंतर त्याच्या लक्षावधी वाचकांनीही हेच म्हटलं असेल की,अरे,आम्हाला वाटलं होतं की तो अमर आहे!"..........

पुलं, आम्हीही तुम्हाला असंच  म्हटलंय.......आणि तुम्ही आहातच की.....आमच्या रक्तात ,स्पंदनात आणि श्वासात.कायमचे !!!



#पुलंवाढदिवस

#एकशून्यमी

#हसवणूक

#पानवाला

#बिगरीतेमॕट्रिक

#महात्मागांधी

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...