जाने कहां गये वो दिन......
मी कॉलेजमध्ये शिकत असतानाचा तो काळ. चाळीस वर्षांपूर्वीचा. ते दिवसच वेगळे होते. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन डोसा खाणं ही एन्जॉयमेंट ची परमावधी होती. हो.डोसाच.कारण सिनेमा आणि डोसा येवढीच चैन आर्थिकदृष्ट्या परवडायची.शिवाय पावभाजी,बर्गर,पिझ्झा या भावंडांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळी.
बहुचर्चित असलेला सिनेमा रिलीज झाला की लवकरात लवकर तो थिएटर मध्ये जाऊन बघणं... यातली गंमत...अर्थातच 'थ्रील' आणि 'एक्साईटमेंट'... आजच्या पिढीला कळू शकणार नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा बघण्याचा रेकॉर्ड असणारी अनेक थोर व्यक्तिमत्वं आमच्या पिढीने बघितली आहेत. विशेषतः अमिताभ बच्चनचा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं हे तरुण पिढीच्या अनेक ध्येयां पैकी एक महत्त्वाचं ध्येय होतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.
परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की सेंटर वरून डायरेक्ट थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची परंपराच होती त्यावेळी. एखाद्या टुकार किंवा सामान्य सिनेमाचीच तेव्हा निवड व्हायची कारण अख्खा वर्ग एकत्र असल्यावर सिनेमा बघण्यापेक्षा हुल्लडबाजीलाच चेव यायचा.परीक्षा सुरू असतानाच, अभ्यास सोडून सिनेमाच्या तिकीटांची तजवीज करणारे काही खंदे सिनेमावीर आमच्यात होते ज्यांचा मला आजही कमालीचा आदर वाटतो.
सिनेमाची तिकिटं रांगेत उभं राहुन काढण्याचे ते दिवस होते. आणि हाउसफुल सिनेमांसाठी दोन-दोन तास रांगेत उभे राहण्याची आमच्यात धमकही होती. काही सुपरहिट सिनेमांचं तर अॕडव्हान्स बुकिंग असायचं. अशी तिकिटं मिळविण्यासाठी जीवन-मरणाच्या पातळीवर जाऊन जो संघर्ष केलाय ना आम्ही त्याला तोड नाही. प्रत्येक थिएटरच्या मॅनेजर पासून डोअरकीपर पर्यंतच्या साखळीतल्या एका एका दुव्याचा सखोल अभ्यास करणारी काही व्यासंगी, संशोधक वृत्तीची मित्रमंडळी आम्हाला माहित होती.वेळप्रसंगी त्यांना हाताशी धरून ठेवण्याचं कसबही आम्ही आत्मसात केलं होतं. तिकिटांचा काळाबाजारही त्यावेळी खूप चालत असे पण त्या भानगडीत मात्र आम्ही कधी पडलो नाही. आपला मध्यमवर्गीय पापभिरु बाणा हो.
फर्स्ट डे फर्स्ट शो चा रेकॉर्ड कुठल्याही परिस्थितीत कायम ठेवणारा, उज्वल भवितव्य असणारा ,शूर-वीर लढवय्या - -- असा आमचा एक वर्गमित्र होता. सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पाहिला तर त्याच्या मागच्या आणि पुढच्या पाच पिढ्या नरकात जाणार होत्या बहुतेक. 'सिलसिला' रिलीज झाला त्यावेळी महिनाअखेर होती. तिकिटाचे पंचवीस रुपये ही त्याच्याकडे शिल्लक नव्हते. (तिकिटाची किंमत पंचवीस रुपये हा आज विनोद वाटू शकतो पण ते खरं आहे.) घरापासून दूर राहणाऱ्या मुलांचा महिनाअखेर पॉकेटमनी संपूर्ण संपणं ही त्याकाळी नित्याची बाब होती. त्यावेळी ही आर्थिक ओढाताण मुलांनी कधीही पालकांच्या कानावर घातली नाही हे विशेष.आणि पालकही त्याबद्दल चौकशी करित नसत- हे त्याहून विशेष .घरुन मनीऑर्डर येईपर्यंत ही मुलं काय काय युक्त्या करीत हे जर लिहून काढलं तर आजच्या काळातलं बेस्टसेलर पुस्तक होऊ शकतं.असो. पंचवीस रुपये जमवण्यासाठी आमच्या बहाद्दर मित्राने 'मदत करा'- असं लिहून वर्गात एक वही फिरवली. त्या काळानुसार अवघे पाच ते दहा रुपये वजन असणाऱ्या आमच्या पाकिटातून आम्ही प्रत्येकाने चार आणे,आठ आणे, एक रुपया, दोन रुपये पर्यंतची त्याला मदत केली आणि त्याचं फर्स्ट डे फर्स्ट शो चं व्रत सुफळ संपूर्ण झालं.
एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी 'अभिमान' बघायला गेलो. अर्थातच गर्दी, धक्काबुक्की, खेचाखेची- यातून खिंड लढवून आम्ही तिकीटं मिळवलीत पण या लढाईत 'हाऊसफुल्ल'चा मोठा लाकडी बोर्ड मैत्रिणीच्या पावलावर पडला. जखम नव्हती पण पाऊल चांगलंच दुखावलं होतं. पण 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस'..... असा ध्यास असल्याने पायाकडे दुर्लक्ष करून ,आम्ही तहान भूक हरपून, अभिमान बघितला. सिनेमा संपल्यावर उभं राहिल्यावर जाणवलं की तिच्या पावलावर प्रचंड सूज आली होती. डॉक्टरांनी पावलाच्या फ्रॅक्चरचं निदान करून दीड महिना तिचा पाय प्लास्टरमध्ये बांधून ठेवला होता. आज सुद्धा, 'फ्रॅक्चर असतानाही मी सिनेमा बघितला'..... हा 'अभिमान' ती बाळगून आहे .
'उमरावजान' मधल्या रेखाच्या नृत्यासाठी,'निकाह'मधल्या 'चुपके चुपके रातदिन' या गुलाम अलीच्या गझलेसाठी,'शक्ती' मधे राखीचा मृत्यू झाल्यावर दिलीपकुमार आणि अमिताभचा अबोल आणि चटका लावणारा सीन बघण्यासाठी, 'अंगूर'च्या शेवटच्या सीनमधली आजी बघण्यासाठी,'शोले' मधला प्रत्येकच सीन बघण्यासाठी .....आणि कशाकशा साठी एकाच सिनेमाचा वारंवार झिजवलेला उंबरठा...........अशी समर्पण वृत्ती असणारे भाविक आमच्यात खूप होते.
त्याकाळी बाल्कनी आणि बॉक्स मधे बसणारी मंडळी उच्चभ्रू असायची.आम्ही 'रिझर्व्ह क्लास'चे वाटसरू होतो.
गच्च भरलेलं थिएटर .....
थर्ड क्लास मधली टपोरी पब्लीक......
थिएटर मधला काळोख ....
भारतीय सरकारची फिल्म डिव्हीजन प्रस्तुत ब्लॕक अँड व्हाईट डॉक्युमेंटरी....
विको टर्मेरिक ची जाहिरात....
आणि सिनेमाला सुरुवात .....
हे सगळं जादुई आणि उत्तेजित करणारं वातावरण असायचं. पुढच्या तीन तासात वेळप्रसंगी पडद्यावरची दुःख आपल्या काळजात ओढून घेऊन आम्ही घळाघळा रडत ही होतो. जया भादुरी- मनोज कुमारचा 'शोर ',अमिताभ -जया भादुरी चा 'मिली' ,पद्मिनी कोल्हापुरेचा, 'आहिस्ता आहिस्ता', राजेश खन्नाचा 'आनंद ',रेखाचा 'जीवनधारा'.....अशा अनेक सिनेमांमध्ये - प्रत्यक्ष जीवनातही जेवढं रडणार नाही तेवढं धो धो रडून झालेलंय आमचं.
अगदी लहानपणी घराघरातून, वर्षातून दोन-तीनदा घरातल्या सगळ्या बच्चेकंपनीला पौराणिक किंवा ऐतिहासिक सिनेमा दाखवून आणायचा एक भव्य कौटुंबिक कार्यक्रम असायचा. त्यावेळी 'भक्त प्रल्हाद' बघतांना प्रल्हादाचा होणारा छळ बघून आम्हा सर्व भावंडांनी थिएटरमध्ये भोकाड पसरलं होतं -अशी एक वदंता आहे.....
'माहेरची साडी'बघतांना तर रडून रडून बाया बापड्यांचे डोळे सुजत होते. गर्दी खेचण्यासाठी त्या सिनेमात ईंटरव्हल मधे लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला एक माहेरची साडी भेट मिळत होती.
सिनेमे आजही बघितले जातात. पण ते घरच्या होम थिएटर मधे नेटफ्लिक्स वर किंवा ॲमेझॉन प्राईम वर. मल्टीप्लेक्स मधे जाताना आॕनलाईन बुकींग केल्या जातं. त्यामुळे तिकीटं काढण्यासाठी रांग नाही , धडपड नाही इंटरवल मधला कोल्ड्रिंक च्या बाटल्यांचा आवाज नाही. गर्दी नाही, धक्काबुक्की नाही.त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.
आमच्या काळातील तरुणाईला व्यक्त व्हायला आजच्या सारखी मोकळीक नव्हती आणि तशी साधनंही नव्हती .मग मनातलं खूपसं साचलेलं,बरचसं अव्यक्त असं त्या रुपेरी पडद्यावर जिवंत व्हायचं .पडद्यावरचं उमलून येणारं प्रेम,जीवघेणा संघर्ष , पिळवटून टाकणारं दुःख ,तनामनाला नाचवणारा आनंद आमचाच होऊन जायचा.
तो आमच्यासाठी केवळ सिनेमा नसायचाच मुळी.ते तर स्वतःचंच जगणं होतं- - औटघटकेचं का होईना पण .......ते स्वतःचंच जगणं होतं.
आज पूर्वीसारखे सिनेमाभक्तही आढळत नाहीत .
'होऊनिया वारकरी,पाहिली आज तुझी पंढरी'.....या ओढीनं थिएटरच्या दिशेनं वळणारी पावलं आता अभावानंच सापडत असतील.
मला वाटतं ज्यांनी सिनेमावर मनापासून प्रेम केलंय, त्यांना अध्यात्माच्या वाटेवरून चालताना फारशी अडचण येत नाही. कारण अध्यात्मातल्या पायऱ्या - -
मन निर्विचार करणं......
'मी' ला विसरणं ......
तहानभूक हरपून समोरच्या पडद्याशी एकरुप होणं......
पडद्यावरच्या प्रसंगांमधे समर्पित होऊन.....
समाधी अवस्थेत जाणं...... हे सगळं सिनेमाभक्तांचं अनुभवून झालं असतं.
'आता कोठे धावे मन', तुझे चरण देखिलेया' अशा ध्यासानं आमच्या पिढीतल्या अनेकांचं या सिनेमा हॉलमध्ये भावजीवन समृद्ध झालेलं आहे. खूप तरल आणि आनंददायी अशा आठवणींचा तो खजिना आहे ज्यामुळे आजही मन तेवढंच टवटवीत होतं आणि म्हणतं- - - 'जाने कहां गये वो दिन........


Wow!!! I know our generation haven't experienced anything like this..but the way you have described all this..I felt everything! Amazingly written. You are modern and digital version of हरितात्या! Because I did feel like a little kid listening to amazing story..
ReplyDelete-Neha
अफलातून!! जबरदस्त लेखणी!! त्या काळात घेऊन जाण्याची ताकद आहे या लेखनात! माझ्या पण डोळ्यासमोर अनेक सिनेमे, अनेक टाॅकिज, तिकीटांच्या रांगा. .. सगळं आलं. सगळं सहज मिळाल्या वर गंमत निघून जाते नं तसं आता सिनेमाचं झालंय. केव्हाही उपलब्ध असतात, कुठेही पाहता येतात! खरंच आपलं जगणंच होतं ते.
ReplyDeleteवा वा. मजा आली. As usual the content and the style-- both superb.
Madhavi sahaje.
ते सगळे सिनेमा वेडे लोकही डोळ्यासमोर आले, कोणत्या वर्षी, कोणते सिनेमे कसे कसे पाहिले ह्याची पण उजळणी झाली. मस्त अनुभव दिला ह्या लेखनाने. 👏👏👌👌
ReplyDeleteमस्त वेगळे फ्रेश लिखाण
ReplyDeleteतल्लीन होऊन वाचत रहावेसे वाटले
खूप मस्त लेख.मला माझ्या मैत्रिणींसह ,तिकिटांसाठी केलेल्या करामती ,मध्यंतरात आवश्यक असलेला समोसा.....सगळे ताजे झाले. बघायला गेलो एक सिनेमा, बघितला दुसरा ,चुकून एकच सिनेमा तीनदा बघण्याचा केलेला विक्रम... बापरे कितीतरी आठवणी ताज्या झाल्या... पल्लवी देशपांडे.
ReplyDeleteवा मॅडम. सिनेभक्त मस्त जागविले. खरंच जाने कहा गये वो दिन.
ReplyDeleteKharah toooo good aho mam thumi aflatun relation pan sundar ahe navin subject wonderful shabdanchi mandani
DeleteAnju
Deleteप्रसंग डोळ्यासमोर उभे करणारे लिखाण. छान.
ReplyDeleteKharach , jane kaha gaye wo din😔
ReplyDeleteएकदम मस्त.
ReplyDeleteखूप सुंदर लिखाण.
स्वतःचा भूतकाळ एकदम डोळ्या समोर आणण्याची जबरदस्त ताकद तुमच्या लिखाणात आहे.
आम्ही सुद्धा साधारण त्याच काळातील.
हे सर्व वाचून आपलाच भूतकाळ तंतोतंत लिहला असे वाटते.
आणि बराच वेळ त्या काळात जावून पुन्हा ते दिवस अनुभवले.
खरोखर लिखाणात जिवंत पणा आहे.
धमाल मज्जा आली वाचून . त्या काळात जगूनच झालं असं वाटलं . मध्यंतरातला फँटा च्या बाटल्यांचा आवाज ऐकू आला. मनातल्या मनात सरोज , रिजंट , रीगल , व्हरायटी , जयश्री या थिटएर्स मध्ये तिकिटांच्या रांगेत उभं राहून शेवटी तिकिट मिळाल्याचा रोमांच अनुभवला . आमची तर आई पण या गँगची सभासदच नव्हे तर पुढारी असायची . तिने मधुमती , पाकिजा , सरस्वतीचंद्र , ममता , आशा असे आणखी जुने चित्रपट पण आवर्जून दाखवले . हो , त्या काळी चित्रपट पुन्हा पुन्हा लागत असत . फारच सुंदर दिवस होते ते ! मध्यंतरानंतर पिवळ्या पाकिटातलं पॉपकॉर्न किंवा साध्या पाकिटातले खाली बराचसा चुरा असणारे वेफर्स खात राहिलं की रडव्या चित्रपटात पण रडू यायचं नाही असं आठवतं आहे . हे सगळं या सुंदर लिखाणामुळे पुन्हा एकदा जगता आलं .
ReplyDeleteKhupch chan lihala ahe mam.👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर....त्या काळात अगदी डोअरकीपरला ठराविक सिनसाठी थोडेसे पैसे देऊन दाराचा पडदा थोडासा बाजुला करुन उभ्याने बघितलेले काही सिन्स...काही गाणी...सलामे इश्क सारखी...मजा होती...
ReplyDeleteखूप सुंदर....त्या काळात अगदी डोअरकीपरला ठराविक सिनसाठी थोडेसे पैसे देऊन दाराचा पडदा थोडासा बाजुला करुन उभ्याने बघितलेले काही सिन्स...काही गाणी...सलामे इश्क सारखी...मजा होती...
ReplyDeleteमस्त लिहिलाय.मजा आली.शिरीष कणेकरांचा भास होतो वाचताना.waiting for d next🤗
ReplyDeleteसोनल अं.
Wow.....khupch chan👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर लिखाण
ReplyDeleteWow ma'am...beautifully expressed..spiritual connection loved it..👌👌👌😊💐🎊
ReplyDeleteखरचं तो काळ अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.
ReplyDeleteBeautifully written
ReplyDeleteखुप मजा आली वाचताना. कॉलेजचे ते दिवस आठवले. नागपूरला युनिव्हर्सिटीमध्ये यूनिवर्सिटी टीमची प्रॅक्टिस करायला यायचं आणि दुपारी नागपुरातले सर्व थेटर धोंडाळायचे. अकोल्याला परत येऊन गोडवे गायचे फार थोर वाटायचं तेव्हा त्या काळात तुम्ही नेऊन सोडलं धन्यवाद
ReplyDeleteमला पण लिहायचंय या विषयावर ...
ReplyDeleteविषय ,आशय अगदी फ्लॅश बॅक मध्ये नेणारा ...
आम्ही तर काय काय केलंय ...सांगेन प्रत्यक्ष भेटीत किंवा एखाद्या पोस्ट मध्ये !!
पण खूपच छान ...
अविस्मरणीय भूतकाळ आठवून ताजा झाला !!!
माझ्या शालेय मित्रांच्या ग्रुप वर फॉरवर्ड करतोय (तुमच्या परवानगी शिवाय) 🙏😊😊
मला पण लिहायचंय या विषयावर ...
ReplyDeleteविषय ,आशय अगदी फ्लॅश बॅक मध्ये नेणारा ...
आम्ही तर काय काय केलंय ...सांगेन प्रत्यक्ष भेटीत किंवा एखाद्या पोस्ट मध्ये !!
पण खूपच छान ...
अविस्मरणीय भूतकाळ आठवून ताजा झाला !!!
माझ्या शालेय मित्रांच्या ग्रुप वर फॉरवर्ड करतोय (तुमच्या परवानगी शिवाय) ������
मला पण लिहायचंय या विषयावर ...
ReplyDeleteविषय ,आशय अगदी फ्लॅश बॅक मध्ये नेणारा ...
आम्ही तर काय काय केलंय ...सांगेन प्रत्यक्ष भेटीत किंवा एखाद्या पोस्ट मध्ये !!
पण खूपच छान ...
अविस्मरणीय भूतकाळ आठवून ताजा झाला !!!
माझ्या शालेय मित्रांच्या ग्रुप वर फॉरवर्ड करतोय (तुमच्या परवानगी शिवाय) 🙏😊😊
आपल्या वेळच चित्र जस च्या तस्स उभ राहील नव्हे तुझ्या लिखाणात ती ताकद आहे..
ReplyDeleteआम्हालाही हे सारं माहिती असत पण...
हा लिखाणाचा विषय होऊ शकतो हे पण डोक्यात येत नाही आमच्या ,,ती आकलन शक्ती ज्याला उपजतच असते तोच इतकं तंतोतंत वर्णन करू शकतो.
खुप छान लिहिलय.
Khup mast lihilay mam...😍😍
ReplyDeleteVery happy to go through this article. I am pleasantly surprised that you could remember so many details. You wrote everything so nicely that the entire scenario of yesteryears simply stood before me. Great !
ReplyDeleteCongratulations.. Keep sending the link of your further articles too.
खूप सुंदर आठवणी! आपल्या पिढीतल्या प्रत्येकाने हे अनुभवलेलं!
ReplyDeleteखूपच सुंदर लिखाण मॅडम
ReplyDeleteअतिशय सुन्दर,
ReplyDeleteअलौकिक वर्णन ।
बीते हुए दिनों ki प्यारी यादें ताजा हो गई।
शानदार साहित्यकार शैली के धनवान हो आप।
खुप सुंदर लिखाण 🙏👍
ReplyDeleteखरंच जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहिले. 11 चा matinee show म्हणजे जुना, बघावा वाटत असलेला picture कमी पैशात बघताना खूपच आनंद होत असे.
ReplyDelete-वासंती पंडित
अप्रतिम वर्णन.... सर्व चित्र रेखाटल्या सारखे डोळ्यासमोर आले
ReplyDeleteखूपच सुंदर लिखाण.अगदी वास्तव डोळ्यासमोर उभं केलं.
ReplyDeleteअसेच विविध विषयावर लिहित जा मॅडम
Waw! मस्तच मला तर थिएटरमध्ये बघितलेले बरेच सिनेमे आठवले,मला तर आमचे Msc चे hostel days पुन्हा remind झालेत👌👍
ReplyDelete