Monday, October 14, 2024


 

सामान्य माणूस आणि अभिजात मराठी

छोटू -'अभिजात' म्हणजे काय रे भाऊ?'

भाऊ - 'तू असे चुकीचे प्रश्न का विचारतोस मला? अरे, अभिजात नाही ते अभिजीत आहे आणि  ते मुलाचे नाव आहे.'

छोटू - 'अरे, नव्हे . नव्हे. . - अभिजित नव्हे. आपल्या मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' मिळाला आहे. असे मी वाचले. म्हणजे काय रे भाऊ?'

-भाऊ -  'हो. मी पण ते वाचले आहे.  छोटू तुला माहित आहे की  फक्त घरात 'मराठी बोलणे ' येवढाच माझा मराठी भाषेशी संबंध आहे. आणि माझ्यासारखे असे असंख्य मराठी लोक आहेत .ज्यांचा मराठीशी  अजिबात संबंध नाही. त्यामुळे तू सांगतो आहेस तो दर्जा का आणि कशासाठी दिला हे मला ठाऊक नाही.'

छोटू-'असं काय करतोस रे भाऊ? हं. हं. म्हणजे ते बहिणीला 'लाडकी बहीण' म्हणतात, सणासुदीला रेशनच्या धान्याला 'आनंदाचा शिधा' म्हणतात, तसंच आहे का रे भाऊ  ?'

 भाऊ - अरे,  वेगळं आहे हे छोटू . हे बघ  मला या मराठी भाषेत एक पर्सेंट ही इंटरेस्ट नाही. आय लव्ह इंग्लीश. त्यामुळे 'अभिजात दर्जा' असे कठीण शब्दांचे कोडे मला घालू नकोस. बाय द वे, दर्जा म्हणजे लेव्हल ना? मराठी भाषेला बेसिकली दर्जाच नाहीय.'

छोटू- 'तू तर मला बुचकळ्यातच टाकले आहे. मग 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' असे सुरेश भटांनी का म्हटले आहे?'

भाऊ - 'आता कसं सांगू तुला? अरे, असे म्हणण्याची पद्धतच असते. आता तू ते काय आजिबात - सॉरी अभिजात वगैरे म्हणतो आहेस ना, ते फक्त बोलण्यासाठी आणि क्रेडिट घेण्यासाठी असणार आहे.'

छोटू- 'तू मला गोंधळात का टाकतो आहेस भाऊ? मला मराठी विषय खूप आवडतो. मराठी धडे, कविता किती छान असतात. आता अभिजात दर्जा मिळाल्यावर नेमके काय होईल हेच मला कुणी सांगत नाही. हे म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण सारखे आहे का रे भाऊ?'

भाऊ - 'अरे छोटू , माझा आजपर्यंतचा कॉमन सेन्स सांगतो की तुझ्या या मराठी भाषेत काहीही फरक पडणार नाही. जसे औरंगाबाद चे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव ......... यामुळे काही बदलले का? नाही ना? तसेच हे.'

छोटू-’म्हणजे 'अभिजात' ही पदवी का रे भाऊ?

भाऊ - 'तुझ्याच मराठीत बोलतोय ना मी? इंग्लीश मध्ये समजावून सांगू का?

एखाद्या कागदावर  भारतीय शासनाचा शिक्का असला तर ती माहिती ऑथेंटिक  होते  की नाही? तर आता ही  मराठी शासन दरबारी ॲक्सेप्ट झाली आहे. येवढेच तू लक्षात ठेव. बाकी सगळे आहे तसेच राहणार आहे.'

छोटू-’'पण अभिजात म्हणजे ???????’

         यातला विनोदाचा आणि अतिशयोक्ती चा भाग सोडला तर सध्या अशीच परिस्थिती आहे.  जे मराठी भाषाप्रेमी आहेत , त्यांना आनंद तर झालाय पण तो नक्की कशाचा? हेच त्यांना समजत नाहीय. आणि जे मराठी असूनही तिचा तिरस्कार करतात,त्यांना याबद्दल काहीही सोयर सुतक नाही.

           वास्तविक आज प्रश्न हा भाषेचा नसून ती भाषा वापरणाऱ्या जनतेचा आहे. मराठी भाषा 'अभिजात' आहे यावर शिक्कामोर्तब करायला शासनाने अनेक वर्षे घेतली पण भाषाप्रेमींना तिच्या अभिजाततेची प्रचिती येण्यासाठी शासन मान्यतेची गरजच नाही. मराठी भाषेचा हा समृध्द प्रवाह अखंड वाहत राहणे यासाठी मराठी माणसाच्या प्रयत्नांची गरज आहे. असो. पण मराठी च्या हालअपेष्टा निवारण्यासाठी शासनदरबाराने उचललेले - पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे, अभिनंदनीय आहे. उलटपक्षी आता मराठी माणसाची जबाबदारी वाढलेली आहे कारण शासनाच्या नावाने बोटे मोडून आता नामानिराळे राहता येणार नाही. 

           आमची पिढी मराठी शाळेतली, मराठी माध्यमातली. मराठी धडे, कविता, गाण्यांवर प्रेम करणारी. 'बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' किंवा ' हा शर गर धर सा पवि सा रवि सा स्मरारि सायक सा। पार्थ भुजांतरि पडला वल्मिका माजी नायक सा'॥ अशा तालबद्ध कविता  म्हणतांना  भान हरपणारी आमची पिढी.  पाढ्यांची तर मजा वेगळीच.  बेंबी च्या देठापासून ओरडून पाढे म्हणायचे. मग दाहोदरसे, पाचोदरसे या संख्या म्हणतांना हसू आवरत नसे.त्यावेळच्या शाळांमधून मराठीचे जे संस्कार झाले, मराठीची जी गोडी लागली ती आजही तितकीच जिवंत आणि टवटवीत आहे. 

       पण मराठी बोलणारी , मराठी माध्यमातली मुले ही गावठी, कनिष्ठ आणि बुजरी असतात हा एक सार्वत्रिक समजही त्यावेळी होत. त्यामुळे हा न्यूनगंड सावली सारखा आमची साथसंगत करायचा.  इंग्रजी माध्यमातील मुले ही हुषार, चटपटीत स्मार्ट असतात हा नियमच होता . शालेय विद्यार्थी असतांना मानगुटी वर बसलेल्या या हीन भावनेने आमचा पिच्छा कधीच सोडला नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागला. 

       मी नागपूर विद्यापीठात 'बी. जे' या कोर्स ला प्रवेश घेतला होता. पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात मराठीत लिहिणारे  दोघेच जण.  त्यामुळे साहाजिकच आमच्याकडे लक्ष देण्याचे प्रयोजनच नव्हते. शिकविणारे सगळे शिक्षक मराठी होते पण ते इंग्रजीतूनच शिकवायचे. मराठी ऐकले की अंगावर पाल पडल्याप्रमाणे प्रतिक्रिया असायची. दर महिन्यात होणारे व्याख्यान  मराठीत असले तर संपूर्ण वर्ग रिकामा होई येवढे   आंग्रजाळलेले वातावरण होते. समाजात वावरतांना भाषेच्या संदर्भात असे घाव किंवा अपमान झेलावे लागतात - तेही आपल्या महाराष्ट्रात - ही भावना विलक्षण बोचरी आणि दुखावणारी  होती. भाषेवरून व्यक्तिची गुणवत्ता जोखण्याचा हा प्रकार खच्चीकरण करणारा होता. इंटर्नल परिक्षेत मास कम्युनिकेशन शिकवणाऱ्या श्री. शरद पाटील सरांनी  माझा पेपर वाचला आणि वर्गात तो दाखवून म्हणाले की मराठीत लिहिलेल्या या  पेपरमधले  विचार आणि स्पष्ट भूमिका मला फार आवडली. त्यादिवशी वर्गातल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी मान वळवून माझ्याकडे पहिल्यांदा बघितले - तेही अविश्वासाने. आपल्या मायबोलीत विचार करून ते स्पष्ट मांडणे ही खरी शहाणीव आहे याची मला त्यावेळी जाणीव झाली. आम्ही मराठीच आहोत पण मराठी माध्यमातून शिकणं??? नो वे. इंग्रजी मधून  एक्स्प्रेस होतांना जे वजन येते त्याची सर मराठीला नाही असे वर्ग मित्रांचे ठाम  मत होते.

             दुर्दैवाने हा समज आजही तसाच आहे. आपले मराठी कलाकार पुरस्कार समारंभात ' आय मीन टू से की मला ही भूमिका जगायला मिळाली' किंवा 'इट वॉज अँन युनिक एक्स्पिरियन्स यू नो? अशी 'वजनदार' सुरुवात करून नंतर मराठीतच बोलतात तेव्हा त्यांच्या लांगूलचालनेची चीड येते. प्रतिष्ठित , प्रस्थापित व्यक्तींनी इंग्रजीतच बोलायला हवे किंवा इंग्रजीत बोलणारा व्यासंगी आणि बुद्धिमान असतो ही डोळ्यांवर आणि मनावर लावलेली झापडे मराठी माणूस कधी काढणार? त्यामुळेच मराठी शाळांचे महत्व कमी होऊन इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे . माझ्या दोन्ही मुलांना मी मराठी माध्यमातच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी मला वेड्यात काढले. सुरुवातीला मुलांनीही मला दोष दिला पण आज मराठी आणि इंग्रजी साहित्य तेवढ्याच आवडीने ते वाचतात .अचूक इंग्रजी लिहितात. बोलतात.इंग्रजी, मराठीतली प्रसिध्द पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत.  इंग्रजी माध्यमातील मुलांना इंग्रजीही थातुरमातुर येते व मराठीला ते तुच्छ समजतात ही वस्तुस्थिती आहे.

         मराठीची अशी दुर्दशा करण्यात महत्वाचा हात समाज माध्यमांवरिल संदेशांचा. J1 zale ka ? अशी मराठी आणि इंग्रजी भाषेची  लक्तरे बघतांना जीव तुटतो. जाहिरातींमधले, बातम्यांमधले मराठी ऐकतांना अंगावर काटा येतो. भक्ती बर्वे  मुलाखतीत म्हणाल्या होत्या , की दूरदर्शनवर बातम्या देण्यापूर्वी रोज अचूक शब्दोच्चारांचा कसून सराव होत असे. श आणि ष मधला फरक ,  'र्‍हस्व दीर्घ -हे 'उच्चारांवरून ऐकणा-याला समजले पाहिजे हा कटाक्ष होता. आज तर सगळाच आनंदी - आनंद आहे. ' भावना पोचवणे - (याला सुद्धा भा. पो. म्हणायचं ) - हे महत्वाचे. भाषा नाही - हा आजचा परवलीचा मंत्र आहे.

         मराठी माणूसच मराठी भाषेच्या अधोगतीला जबाबदार आहे. मराठी घरात  पाळलेल्या कुत्र्याशी इंग्रजीतूनच का बोलले जाते? इंग्रजी माध्यमातील पाल्यांवर मराठी व इंग्रजीचे धेडगुजरी संस्कार करण्यात काय शहाणपण आहे? सही ही इंग्रजीतूनच केली पाहिजे का? घराचा पत्ता इंग्रजीत लिहिल्या शिवाय समजत नाही का?   कोणताही अर्ज  हा इंग्रजीतच लिहिला पाहिजे का?  माध्यमांवर व्यक्त होतांना अधून मधून इंग्रजी शब्द (आपले साधेच हो - यू नो , ॲक्च्युअली , इव्हेन्च्युअली वगैरे वगैरे ) पेरल्या शिवाय कर्तृत्वाची उंची वाढत नाही का? चांगले मराठी शब्द वापरणाऱ्या व्यक्तिची चेष्टा का केली जाते?  कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील अमिताभ बच्चनचे अस्खलित आणि समृद्ध हिंदी ऐकतांना त्याची चेष्टा केली जाते का? आशुतोष राणा, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी यांचे शुध्द हिंदी कानाला किती गोड वाटते. मग मराठीचीच मानहानी का? - ते ही मराठी माणसाकडूनच? 

             याचे एकच उत्तर मला दिसते, ते म्हणजे न्यूनगंड, इतर भाषांचे लांगूलचालन , स्वतंत्र विचार न करता इतर भाषांची नक्कल आणि गुलामी पत्करण्याची वृत्ती - ही वैशिष्ठ्ये मराठी मनाच्या रक्तात भिनली आहेत हे दुर्दैवाने मान्य करावे लागेल. त्याचवेळी दुसरे टोक म्हणजे मराठीचा आत्यंतिक अभिमान, मराठी हेच विश्व, मराठी हीच उत्कृष्ठ ,असे समजणाराही एक समुदाय आहे.हे आपल्या कूपमंडूक वृत्तीवरच खूष असतात.मग यांचे हसे होते आणि निष्कारण भाषेला दोष दिला जातो.

                दैनंदिन जगण्यातून सामान्य मराठी माणसाला कसे अनुभव येतात हे मी मांडले आहे.  अभिजात दर्जामुळे मराठी साहित्यविश्वात, शासन दरबारात, उद्योगधंद्यात, चित्रपटसृष्टीत , विद्यापीठांमध्ये , जागतिक स्तरावर काय बदल घडणे अपेक्षित आहे याचा उहापोह करण्याची माझी बुद्धी नाही. पण कागदपत्र, कायदे करूनही शेवटी सामान्य जनता प्रत्यक्ष कसे आचरण करते यावरच सारे अवलंबून असते. ज्यादिवशी मराठी माणसाला जाहीरपणे मराठी बोलायची लाज वाटू लागली त्या दिवसापासून मराठी माणसाचा कणा नष्ट झाला. आता ही अभिजातता खेचून आणण्याची व टिकवण्याची जबाबदारी जनतेची आहे. शासनाने कुलूप उघडून आपल्या हातात किल्ली दिली आहे. तिचा कसा उपयोग करायचा हे आपणच ठरवायचे आहे.

"पर भाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी.

मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका.

भाषा मरता देशा ही मरतो संस्कृतीचा ही दिवा विझे.

गुलाम भाषिक होऊ नी अपुल्या प्रगतीचे शीर कापू नका."

कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील एक कडवे आहे. मराठी माणसाची नस ओळखून त्यांनी ह्या ओळी रचल्या असाव्यात. ही संपूर्ण कविता राज्याच्या मंत्रालयात दर्शनी भागी लावली होती.ती पूर्ण वाचणा-याचा ही सत्कार व्हावा अशी आज परिस्थिती आहे. पण घटस्थापनेच्या शुभदिवशी अभिजात दर्जाची पहिली माळ लागली आहे. यातून नक्कीच अभिजाततेचे सोने लुटले जाईल अशी आशा करू या.

#अभिजातमराठी

#मायमराठी

Sunday, September 29, 2024


 चला आखू या लक्ष्मणरेषा

   कोलकाता आणि बदलापूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी घडलेल्या घटना कदाचित  आताच्या क्षणी आम्ही विसरलो असू. कारण त्यानंतर आम्ही उत्साहाने झेंडावंदन केले. स्वतंत्र भारताचे प्रतिक असलेला हा तिरंगा नक्की कोणत्या स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करतो हे भारतमाता च जाणे. पण  ७७ वर्षाच्या स्वतंत्र भारतात हा तिरंगा दिमाखाने फडकत होता हे मात्र खरे. त्यानंतर गौरी गणपतीची धामधूम सुरू झाली आणि त्या पुढे देवीचे नवरात्र समोर आहेच. या सगळ्या उत्सवी वातावरणात कोलकाता आणि बदलापूर घटनांचे नेहमीप्रमाणेच  विस्मरण झाले. वास्तविक महिलांच्या लैंगिक छळाची परंपरा फार जुनी आहे. ज्या बलात्काराच्या घटना आपल्या समोर येतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात असे प्रसंग घडत असतात. फक्त ते उजेडात येत नाही म्हणून कळतही नाहीत. पण त्यामुळे कुठे काय बिघडते?

या वर्षी आपल्या भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलाच की.. १४ वर्ष एका महिला पंतप्रधानांनी आपल्या देशाची धुरा सांभाळली आहे. सध्या आणि याआधीही राष्ट्रपती पदाचा मान महिलेला मिळाला आहे. म्हणजेच या ७७ वर्षात महिलांच्या जीवन पध्दतीत झालेला सकारात्मक बदल लक्षात घ्यायला हवा. भारतीय मुलींची  ऑलिम्पिक मधील कामगिरी, लष्कर, उद्योग व्यवसायातील भरारी- - - या मुद्द्यांवर लक्ष केन्द्रित करायला हवे. आणि आता तर नवरात्रा मुळे  देवी पूजनाइतके महत्वाचे दुसरे काही असूच शकत नाही.

                   असेच आहे ना वास्तव? तरीसुद्धा एक प्रश्न सगळ्या मैत्रिणी, माता, भगिनींना मला विचारायचा आहे ज्याचे प्रामाणिक उत्तर मला अपेक्षित आहे. ‘एक महिला म्हणुन मी  संपूर्ण सुरक्षित आहे का? भविष्यात माझ्या, माझ्या मुलींच्या, बाबतीत असला घृणास्पद व्यवहार घडणारच नाही याची खात्री मला आहे का? याचे उत्तर , 'हो' असेल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. किंबहुना या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करता आहात. याहीपेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की या ज्वलंत प्रश्नाला भिडण्याची तुम्हाला भिती वाटते आहे. आणि उत्तर 'नाही' हे असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी  काही प्रयत्न केले का?

        आपल्या आयुष्यात डोकावून बघितल्यास कमीत कमी एकदा तरी लैंगिक छळाचा अनुभव आपल्याला आला असतोच. त्यावेळी आपण काय केले होते?  त्याक्षणी प्रतिकार केला? आरडाओरड केली? की अळी मिळी गुपचिळी? आपल्या मुलींनी, मैत्रिणींनी कधीतरी असे वाईट अनुभव आपल्याला सांगितले असतात. त्यावेळी आपण काय केले असते? 'लक्ष नको देऊ. सांभाळून रहा' .... असे सल्ले  देऊन तिला रागावले असते. दुर्दैवाची बाब ही, की अशी एखादी घटना जेव्हा बलात्कारा च्या स्तरावर घडते आणि  'व्हायरल' होते त्यावेळीच आम्हाला कंठ फुटतो. मग दोषी कोण हे ठरविण्याची अहमहमिका सुरू होते. पुरुषी मानसिकता, मुलींचे कपडे, पालकांचे दुर्लक्ष, मोबाईल, इंटरनेट, चित्रपट, पोर्नोग्राफी इ. इ या सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. मग मोर्चा, निषेध, बंद, आंदोलन, अगदी ताबडतोब फाशीची मागणी...... हे सालंकृत सोपस्कार झाले की विषय तिथेच संपतो.

 यात जबाबदारी कुणाची? 

अर्थातच शासनाची, पोलीसांची, न्यायालयांची आणि काही महिला संघटनांची - . ही आपली परंपरागत समजूत आहे .आणि त्यामागे लपून आपण आपली स्वतःची जबाबदारी टाळतो आहोत. इव्ह टीझिंग, छेडछाड, बलात्कार या घटना व्यक्तिगत आणि सामूहिक अशा दोन्ही प्रकारे घडू शकतात. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे असा कंठशोष करायला आपण एका पायावर तयार असतो. पण पीडित महिला आपली तक्रार नोंदवते का?ती चवताळून उठते का? - शक्यतोवर नाहीच.फारच क्वचित तिने आक्रमक भूमिका घेतली की त्यावेळी मात्र तिला मूग गिळून गप्प बसण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे तक्रार करण्याची अगदी प्राथमिक जबाबदारी पाळली जाते का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बदनामी च्या भितीने तक्रार केली जात नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. पण महिलांनी मौन धरणे, तक्रार न करणे, अत्याचार सहन करणे ., प्रतिकार न करणे.....यामुळे या नराधमांचे धैर्य वाढत जाते, याचा विचार कोण करणार?  तिहार जेलमधील बलात्काराच्या गुन्ह्यासाठी डांबलेल्या कैद्यांवर  संशोधन केले असता , त्यावेळी त्या प्रत्येकाला आपण निर्दोष सुटणार याची खात्री होती. .ही खात्री आपल्या निष्क्रियतेमुळेच आहे, हे न समजण्याइतपत आपण भाबडे नाही. तेव्हा मैत्रिणींनो, पहिली जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा.अनेकदा असे गैरवर्तन होताक्षणी तिथेच या वृत्तीला ठेचणे गरजेचे असते. तक्रार करण्यास वेळ नसतो. पण अशावेळी सुद्धा आपण माघार घेण्यात धन्यता मानतो. बघे लोकही डोळ्यावर कातडे ओढून स्वस्थ बसले असतात . आपली ही उदासीनता , सहनशीलता कामांध वृत्तीला  प्रोत्साहन देते आणि नराधमांची भीड चेपते.

 आपले अज्ञान

आज आपण उच्च शिक्षित आहोत पण लैंगिक छळाची व्याख्या आपल्याला माहित आहे का? नेमकी कोणती कृती ही लैंगिक छळात मोडते याची कल्पना आपल्याला आहे का? ' विशाखा' समिती काय आहे व तिचे काम कसे चालते? ‘ पॉश ‘हा कायदा , ‘पाॅक्सो,’ रिक्लेम द नाईट,मीटू   म्हणजे नेमके काय? समजा काही गैरप्रकार घडला तर काय करायचे? हेल्पलाईन नंबर्स, हेल्पलाईन ॲप्स आपल्या मोबाईल मध्ये आहेत का?

 असहकार्याचे तत्व

बदनामीची भीती ही स्त्रियांना  पोलिसांशी असहकार्य करण्यास भाग पाडते. आपल्या देशात काही गृहीतके पालनपोषण करून बळकट केली आहेत. वास्तविक जो पुरुष गैरवर्तन करतो - बदनामी त्याची व्हायला हवी. पीडित स्त्रीचा काहीही दोष नसताना चूक, अपराधीपणाचा गंड, बदनामी मात्र तिचीच. स्त्रियांनी या  गृहीतकाला केराची टोपली दाखवायला हवी.सुदैवाने हल्ली या विषयावर किमान बोलले तरी जाते.  आज सरकारने याबाबत अध्यादेश, नियमावली , तरतूदी  कायदे अपडेट करून स्वागतार्ह पाऊल उचलेले आहे. ज्यामुळे स्त्रियांना नक्कीच न्याय मिळू शकतो. पण  अशावेळी , पोलिस, न्यायालय  या भानगडीत पडायचे नाही हा सुद्धा आमचा ‘बाणा' असतो. भारतीय स्त्रियांच्या 'जनुकांमधील' मौन,  शरणागती , सहनशक्ती, भीती, इ.इ. ‘बलस्थाने' पुरुष जातीला चांगलीच माहित आहेत. स्त्रिया या बाबतीत ‘ब्र' ही काढणार नाहीत ही त्यांना खात्री असते. पण ज्या दिवसापासून स्त्रिया तक्रारींची नोंद करू लागतील, त्यावेळी पुरुषांच्या मनात भीती, धाक निर्माण होईल. अर्थातच हे चित्र बदलण्यासाठी स्त्रीला स्वतः समोर यावे लागेल.

 मार्गदर्शक तत्वे

लैगिक छळाची व्याख्या -

कोणताही अस्वागतार्ह शारीरिक स्पर्श

शरीरसंबंधाची मागणी किंवा विनंती

लैंगिकता सूचक शेरे मारणे व अश्लील बोलणे '

अश्लील चित्रे दाखवणे, अश्लील मेसेज, ईमेल करणे

लैंगिकता सूचक कृती- शारीरिक, मौखिक किंवा निः शब्द पणे केलेली  कोणतीही कृती

            महिलांचे लैंगिक शोषण होऊ नये यासाठी कायद्यात तरतुदी आहेत. संविधानातील कलम १४ , १५, १९ आणि ११ यात महिलांना समानतेचा अधिकार दिला आहे.१९ सप्टें. २००६ रोजी महाराष्ट्र शासनाने विशाखा समिती गठित करण्याचा निर्णय पारित केला. यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, रुग्णालये या ठिकाणी  नोकरी करणाऱ्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झाल्यास ' महिला तक्रार निवारण समिती' म्हणजेच विशाखा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या सदस्यांची नावे लिहून तो फलक  कार्यालयात प्रत्येकाला दिसेल अशा जागी लावणे बंधनकारक आहे.

  छेडछाड किंवा इव्ह टीझिंग हे गुन्हे हाताळण्यासाठी अद्याप कायदा अस्तित्वात नाही. परंतु या बाबतीत न्यायालयाने महत्वाच्या सूचना राज्य व केन्द्र सरकारला दिल्या आहेत. बस, रेल्वे, मेट्रो स्टेशन, थिएटर,बाजार, मॉल, बगीचे, समुद्रकिनारे, मंदिर परिसर - या ठिकाणी सीसी टीव्ही बसवणे आवश्यक आहे. ‘छेडछाड करणे हा गुन्हा आहे’ ही समज देणारे फलक या स्थानी लावण्यात यावे, तसेच सिव्हील ड्रेस मधील महिला पोलीसांची नेमणूक करण्यात यावी. बस किंवा रेल्वे मध्ये अशी घटना घडल्यास, चालक वाहक यांच्याकडे तक्रार करून सदर वाहन हे पोलिस स्टेशनला नेण्यात यावे.चालक - वाहकाने विरोध केल्यास वाहनाचा परवाना रद्द होतो.छेडछाडीचा गुन्हा घडत असतांना' ‘बघ्यांनी' त्वरित महिला हेल्पलाईनला कळवावे व महिलांना वाचविण्याची भूमिका घ्यावी. यासाठी प्रत्येक गावात दामिनी पथक निर्माण केले आहे. महिला पोलीसांचे पथक बाईक वरून किंवा गाडीमधून त्वरित मदतीला येते. रेल्वे मधून एकट्या स्त्रीला प्रवास करताना अनेकदा लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. अशावेळी १३१नं डायल करावा.  पुढच्याच स्टेशन वर पोलिस मदतीला येतात. रेल्वेमध्ये एकट्या स्त्रीला मदत करण्या साठी  ‘मेरी सहेली'   हे ॲप उपलब्ध आहे.   नॅशनल कमिशन फॉर विमेन द्वारा २४ × ७ हेल्पलाईन साठी  २४ जुलै २०११ पासून  - ७८२७१७०१७० हा नंबर दिला असून www.ncw.nic.in ही वेबसाईट पण उपलब्ध करुन दिली आहे. १०९० हा राष्ट्रीय महिला हेल्पलाईन नंबर असून महाराष्ट्राचे १८१, १०३ हे नं. आहेत.

          आज शासकीय स्तरावर अनेक सकारात्मक बदल होत आहेत.स्त्रियांविषयी अवमानकारक शब्द वापरणे,विनोद करणे,शरीर अवयवांवर टिप्पणी करणे……हा पुरुषांचा जन्मतःच हक्क असतो. पण न्यायदानाच्या प्रक्रियेत तरी स्त्रियांचा उल्लेख संवेदनशीलतेने केला जावा- यासाठी पुढाकार घेणाऱ्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आभार. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली, कोलकात्याच्या उच्च न्यायालयातील विदुषींनी दोन वर्षे काम करून ३० पानांची वर्ज्य शब्दावली तयार केली आहे. ही पुस्तिका विशेषत्वाने पुरुषांनी वाचायला हवी. अनेक विशेषणांमधून तिचे मानसिक खच्चीकरण करण्याचा मार्ग नाकारण्याच्या वाटेवर न्यायव्यवस्थेने हे स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. नुकताच  कोणत्याही धर्माच्या मुलींच्या विवाहाचे वय २१ वर्षे असावे हा कायदा हिमाचल प्रदेशाने पारित केला आहे.

         ही माहिती प्रत्येक स्त्रीला असणे अत्यावश्यक तर आहेच पण मुलामुलींना ही माहिती देणे हे तर आपले परमकर्तव्य आहे. आता स्त्रीनेच स्वतःच पुढाकार घ्यायचा आहे. स्वतः सक्षम होऊन दुसऱ्या पीडित स्त्रीची मदत करण्यास तत्पर असणे ही काळाची गरज आहे. स्त्रियांचा प्रतिकार वाढू लागला तर लैंगिक छळाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. लैगिक छळ हा प्रश्न वैयक्तिक जरी असला तरी तो संपूर्ण समाजावर परिणाम करणारा आहे. आज एक स्त्री स्वतःसाठी न्याय मागत असेल तर ती सगळ्याच स्त्रियांना  मदत करित असते हे कृपया सगळ्यांनीच लक्षात ठेवावे.

            रामायणात लक्ष्मणाने सीतेच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणरेषा आखली होती. आज ही लक्ष्मणरेषा सगळ्याच स्त्रियांनी आपल्या भोवती आखायची आहे जेणेकरून कोणत्याही वासनांध रावणाला ती अडवू शकेल. आज कायदे, पोलीस, सरकारी योजना आपल्या मदतीला तत्पर आहेत. फक्त आपण भीती, लाज, संकोच, बदनामी, मौन, शरणागती या स्वअडथळ्यांवर मात करायची आहे. आपल्या मुला मुलींना  या बाबतीत प्रशिक्षित करायचे आहे. मुलांनाही अशावेळी मदतीला धावून जाण्याची शिकवण देणे गरजेचे आहे. आपल्या स्वभावात धैर्य, समयसूचकता,  स्पष्टवक्तेपणा, अन्यायाचा प्रतिकार आणि स्वाभिमान या  अस्त्रांचा समावेश करून  पोलीस, कायद्याच्या मदतीने आपली लक्ष्मण रेषा आपल्यालाच आखायची आहे. देवीची उपासना करतांना महिषासुरमर्दिनीची कथा केवळ मनोरंजनासाठी किंवा डोके टेकवण्यासाठी  वाचायची नाही .उलट प्रतिकारासाठी आपल्या  वापरात नसलेली अस्त्रे परजून ठेवायची आहेत. केवळ नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, उपास, ओटी, गरबा - यात गुंतून न राहता आपण  पुढाकार घेऊन कृती करून दाखविण्याची वेळ आली आहे. चला तर मग. समाजातील रावणांसाठी आपली लक्ष्मणरेषा आपणच  आखू या.

#लैंगिकछळ

#विशाखासमिती

#पाॅशकायदा

Thursday, September 19, 2024

जागतिक आरोग्य दिन

 आज जागतिक आरोग्य दिन.या वर्षाची थीम आहे...'माझे आरोग्य माझा अधिकार '.आता हा अधिकार म्हणजे नेमकं काय? 'मुळात आरोग्य म्हणजे काय रे भाऊ?'...हा एक यक्षप्रश्न... प्रत्येक डॉक्टरच्या कुंडलीत ठाण मांडून बसला असतो.जिथे डॉक्टरच गोंधळलेला..तिथे पेशंट बद्दल काय बोलावं ? ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'..अशा आवेशात अनेक पेशंट्स येतात आणि रॅपिड फायर राऊंड सारख्या प्रश्नांनी डॉक्टरांची तब्येत बिघडवतात.आणि शेवटी जाताना एक कळीचा प्रश्न टाकून, अर्धमेल्या डॉक्टरवर प्राणांतिक वार करतात.

'किती दिवसात बरं वाटेल?'...

 बॅटिंग ला निघालेल्या विराट कोहलीला विचारतो का आपण,की किती रन काढून आऊट होणार म्हणून?

               असो.परवा राजधानी ने दिल्ली ला चालले होते. एकटी आणि निवांत होते.

डोक्याखाली उशा, अंगावर ब्लॅंकेट आणि एसी या अत्यंत अनुकूल?? वातावरणात मी प्रचंड सकारात्मकतेने आणि लढाऊ बाण्याने मेडिसीन च्या पुस्तकाचं वाचन सुरु केलं. चक्क दोन चॅप्टर्स वाचून झाले. मी माझी पाठ थोपटली.यापुढे प्रवासात अशीच पुस्तकं वाचण्याचा संकल्प पण सोडला.आणि मस्त आळस दिला.

    नेमका हाच क्षण माझ्या शेजारच्या बर्थ वरील बाईनं अचूक पकडला.

"तुम्ही डॉक्टर आहात ना?" 

तिनं अनपेक्षित बाउन्सर टाकला.मी कन्फ्युज्ड. हिनं कसं ओळखलं? टिपीकल डाॅक्टरसारखा स्मार्ट,अॅटिट्युड असणारा माझा चेहेरा दिसतोय की काय? जवळपास आरसा ही नव्हता.पण लगेचच लक्षात आलं की माझ्या पुस्तकानं घात केलाय.माझी जुजबी चौकशी करून त्या माऊलीने बॅटिंग सुरु केली.

"माझ्या टाचा खूप दुखतात हो. ४ पोळ्या पण लाटू शकत नाही मी"

"हे बघा माझ्या पाठीवर पुरळ आलंय. घामोळं नाहीय ते"

"मानेच्या हालचाली केल्या की चक्कर येते हल्ली"

मी गाडीच्या डब्यात दवाखाना तर थाटला नाही ना,अशी माझीच मला शंका आली. आता माझ्या समोर तीन पर्याय होते.तिचे बाऊन्सर्स आक्रमकपणे परतवायचे, सोडून द्यायचे नाहीतर टाईमपास टोलवाटोलवी करायची.मी तिसरा पर्याय निवडला कारण पुढचे ७/८तास तरी हा शेजारधर्म नाईलाजाने मला पाळणं भाग होतं.

  थातुरमातुर उत्तर देऊन मी पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं.पण समोरची बाई खिंड सोडायला तयार नव्हती.बाजी प्रभू देशपांडेंच्या वंशातली होती की काय देव जाणे.जरा पुस्तकातून माझी नजर जरा वळली की केलाच तिनं प्रश्नाचा वार.

"राईस ब्रॅन चांगलं की करडईचं?"

"शेवगा रोज खावा का?"

"खजूर चांगला की मनुके?"

बाई काहीही खा पण माझं डोकं खाऊ नको- -- -असं मला म्हणता आलं असतं तर????

  डॉक्टर या प्राण्याची छळवणूक आणि पिळवणूक करणारी एक जमात असते आणि तिचा योग माझ्या कुंडलीत वारंवार का येतो हे मला न सुटलेलं कोडं आहे.

   कुणाच्याही घरात, अंगणात, देवळात, मॉलमध्ये, रिसेप्शनमध्ये, थिएटरमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर.....फक्त दवाखाना सोडून कुठेही एखादी जुजबी ओळखीची व्यक्ति जेव्हा

"मला नेहमी सर्दी होते हो,काय करायला पाहिजे त्यासाठी?" किंवा

"हल्ली माझे केस फार गळतात हो, काय करावं त्यासाठी?"............

"किडनी स्टोन साठी आयुर्वेदिक औषधे आहेत का हो?"......

आता 'माझे आरोग्य माझा अधिकार '....हे मान्य आहे हो पण या अधिकाराचा गैरवापर होत असेल तर त्या दीन, पीडित डॉक्टरच्या आरोग्याची पातळी खालावते त्याचं काय???

आणि वरुन हेच पेशंट आम्हाला ' काळजीने' विचारतात.....'अरे, तुम्ही पण आजारी पडता? डॉक्टर असून सुद्धा???


असो.जागतिक आरोग्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा.

Monday, September 9, 2024

पक्षाघात पुनर्वसन - एक आव्हान


 पक्षाघात पुनर्वसन - एक आव्हान

    पक्षाघात हा आजार ४० वर्षांपूर्वी साधारणतः जेष्ठवयीन व्यक्तींमध्ये आढळत असे. पण आज परिस्थिती विलक्षण बदलली आहे . आज तरुण व्यक्तींना म्हणजे तिशी चाळीशीच्या वयातही पक्षाघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पक्षाघाताचा अत्यंत दुर्दैवी परिणाम म्हणजे कायमस्वरूपी येणारे अपंगत्व. या अपंगत्वावर मात करण्याचे अनेक उपाय आहेत. काही रुग्ण त्यात यशस्वी होतात. पण बरेचसे रुग्ण संपूर्ण आयुष्य एकाच जागी अंथरुणावर व्यतीत करतात. आज पक्षाघाताचे वाढते प्रमाण हे व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर अत्यंत भयावह आणि निराशाजनक चित्र निर्माण करणारे आहे.. जेव्हा एक व्यक्ती पक्षाघातामुळे अपंग होऊन अंथरुणाला खिळते तेव्हा त्या व्यक्तीचे उत्पादक मूल्य शून्य होते. ही व्यक्ती कुटुंबप्रमुख व अर्थार्जन करणारी असेल तर कुटुंबाची आर्थिक बाजू कोलमडून पडते.परिणामी पीडित व्यक्तीचे मानसिक व शारीरिक  स्वास्थ्य खालावत जाते. कुटुंबावर पण  औषधोपचाराचा आर्थिक बोजा वाढतो. रुग्णाची शुश्रुषा करण्यासाठी कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला गुंतून राहावे लागते किंवा एखादा मदतनीस ठेवावा लागतो. रुग्णाचे कार्यालयीन  योगदानही बंद पडल्यामुळे ऑफिसचे /संस्थेचे/ वा कार्यालयाचेही नुकसान होते. पक्षाघात हा आजार केवळ रुग्णापुरता मर्यादित रहाणारा नाही . तसेच यातून पूर्णतः बरे होण्याचा कालावधीही निश्चित नाही. ज्यामुळे स्वतः रुग्ण, त्याचे कुटुंब आणि समाज यांच्याही स्वास्थ्यावर परिणाम होतो.यासाठी पक्षाघात व्याधी बद्दल जनजागरण करणे ही काळाची गरज आहे. आता हे जनजागरण तीन प्रकारे करायला हवे.
१ .पक्षाधात होऊ नये होऊ नये यासाठी काय करावे?
ब्लड प्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार व व्यसनाधीनता यामुळे पक्षाघाताची शक्यता वाढते. म्हणून योग्य आहार, विहार, व्यायाम व नैसर्गिक जीवनशैली....या बाबी आज अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.वास्तविक आज सगळ्याच व्याधी टाळण्यासाठी आयुर्वेदोक्त जीवनशैली हेच एकमेव उत्तर आहे . 
 निसर्गाविरुद्ध असणारी जीवनशैली आणि आजकाल प्रामुख्याने घडणारे अपघात यामुळे पक्षाघाताचा धोका वाढलेला आहे. ही कारणे टाळण्याचा पूर्णतः प्रयत्न करणे ही आजच्या काळाची गरज आहे. 
. पक्षाघात झाल्याबरोबर काय करावे ?
 यासाठी पक्षाघाताची लक्षणे सामान्य व्यक्तीलाही माहित हवीत. यासाठी  'रिमेंबर रेकग्नाईज अँड ऍक्ट फास्ट 'हे वाक्य नेहमी लक्षातअसावे .
F- face- रुग्णाला हसण्यास सांगावे. जर ओठांची एक बाजू खाली झुकत असेल, 
A- Arm-  दोन्ही हात वर करताना निरिक्षण करावे. कोणताही एक हात आपोआप खाली येत असेल,
 S - Speech- एकाएकी बोलण्यात फरक पडला असेल ,
T- Time- म्हणजे  वरिल लक्षणे दिसल्यास, एक क्षणही वाया घालवू नये. पक्षाघाताच्या चिकित्सेत प्रत्येक सेकंदाला महत्त्व आहे. चिकित्सेला जितका उशीर तितकी परिस्थिती गंभीर आणि आटोक्याबाहेर जाते. म्हणून पक्षाघाताच्या रुग्णाला ताबडतोब आयसीयु मधे हलविणे हा योग्य निर्णय असतो. 
  'रिकॉम्बिनंट टिशू प्लासमिनोजिन ऍक्टिव्हेटर' हे औषध मेंदूतील रक्ताच्या गुठळीला विरघळवून टाकते. फक्त हे औषध पहिल्या चार ते पाच तासातच द्यावे लागते. हे अत्यंत प्रभावी औषध असून रुग्ण पूर्णतः बरा होतो.पण त्यासाठी वेळ फार महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने अनेक रुग्ण वेळेत पोहोचू शकत नाही व या उपचारापासून वंचित रहातात.  तरीसुद्धा सुरुवातीचे 12 ते 24 तास हे गोल्डन अवर्स मानले जातात. या कालावधीत योग्य चिकित्सा झाली तर रुग्ण पूर्णतः बरा होतो. 
        पक्षाघाताची चिकित्सा तीन टप्प्यांमध्ये केली जाते. 
. आत्ययिक चिकित्सा 
२.  रुग्णाचे पुनर्वसन 
३. अपुनर्भव चिकित्सा. 
          दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आयुर्वेदाची भूमिका महत्त्वाची ठरते. रुग्णाचे पुनर्वसन  कसे करावे हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात वेळेवर दिलेल्या योग्य चिकित्सेवर पुनर्वसन अवलंबून असते. हा कालावधी कितीही लांबू शकतो. किंबहुना रुग्णाच्या मृत्यूपर्यंत तो अस्तित्वात असतो. हा सगळ्यात आव्हानात्मक असा कालावधी आहे. 
       या काळात  युक्तीव्यपाश्रय, सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा एकाच वेळी पद्धतशीर करावी लागते. किंबहुना सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा जितक्या क्षमतेने केली जाईल, तितक्याच क्षमतेने रुग्ण औषधे व फिजिओथेरपी ला प्रतिसाद देतो असा माझा अनुभव आहे.
        मोटर नाडीसंस्था व सेन्सरी नाडी संस्था या दोन्हींवरही पक्षाघाताचा कमी जास्त परिणाम झाल्यामुळे रुग्ण खचतो, निराश होतो व त्याची वृत्ती नकारात्मक होते.त्यामुळे चिकित्सेला प्रतिसाद देण्याइतके मनोबल रुग्णात शिल्लक रहात नाही. 
      बाह्य स्नेहन, स्वेदन, नस्य, शिरोधारा, मात्राबस्ती या उपक्रमामुळे रुग्ण शरीराच्या मांसधातू व वातनाड्यांना बल तर मिळतेच त्याबरोबरच मनोबलही उंचावते कारण पंचकर्म उपक्रमामुळे वैद्य व रुग्णाचा प्रत्यक्ष व स्पर्शाद्वारे संपर्क होतो, संवाद होतो - जी अत्यंत महत्त्वाची कृती आहे .
       पण रुग्णात सुधारणा होण्याची प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होत असते अशावेळी रुग्णाचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, रुग्णाचा उत्साह वाढवणे, सकारात्मकता  कायम ठेवणे....ही जबाबदारी कुटुंबातील सदस्यांवर येऊन पडते. ही जबाबदारी फार मोठी आणि  गरजेची आहे . 
     पण बरेचदा असे दिसते की रुग्ण आजारामुळे कंटाळला असतो, परावलंबित्वामुळे असहाय्य असतो आणि कुटुंबावर आपला भार होतो आहे या जाणिवेने कुढत असतो. अशात कुटुंबियांची होणारी चिडचिड, वैताग, रस्सीखेच, वैफल्य....या सगळ्या भावना बरेचदा रुग्णाच्या उपेक्षेत , अवहेलनेत ,कटू शब्द बोलण्यात व्यक्त होतात.आणि परिस्थिती अधिकच चिघळत जाते.आणि विश्वास बसणार नाही, पण अशावेळी नात्यांच्या बंधनांपेक्षा,  'यातून सुटका ' ..ही भावना रुग्णाच्या आणि कुटुंबियांच्या मनात वरचढ ठरते... हे कटू सत्य मी अनेकदा डॉक्टर या भूमिकेतून अनुभवले आहे जे फार विदारक आहे.
     यासाठी कुटुंबाचेही समुपदेशन करणे अत्यावश्यक ठरते.रुग्णाच्या मनाची उभारी टिकवून ठेवणे, आजारातून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती जागृत करणे, अवतीभवती आनंदी वातावरण कायम ठेवणे, लहानसहान घरगुती कामांची जबाबदारी देणे, ऑनलाईन कामे करवून घेणे - अशा वागण्याने रुग्णाचे मन गुंतून राहते.वाचनाची आवड असल्यास प्रेरणादायी पुस्तके वाचायला देणे,घरी लहान मुले असल्यास त्यांचा अभ्यास घेण्यास सांगणे, संगीत, टीव्ही यात मन रमविणे - यामुळे रुग्णाचा उत्साह वाढतो , सकारात्मकता वाढते व कुटुंबाला उपयोगी पडल्याने समाधान वाटते. कोणतेही रचनात्मक काम रोज केले तर मेंदूला सकारात्मक संदेश जातात आणि मेंदू उपचाराला प्रतिसाद देऊ लागतो.अपंग शरीर पेशींना पुर्ववत करण्याची मेंदूला सतत आज्ञा देणे ही वृत्ती औषधोपचारापेक्षाही प्रभावी ठरते .मनाची शक्ती ही शरीरावर राज्य करीत असते त्यामुळे मानसिक स्तरावर जो रुग्ण स्थिर असतो तो या आजारातून नक्कीच बाहेर पडण्यास यशस्वी ठरतो.फक्त हे मानसोपचार प्रत्येक रुग्ण आणि कुटूंबानुसार भिन्न असतात.व ते कुटुंबातील सदस्यच करु शकतात.
    त्यानंतर महत्त्वाची चिकित्सा म्हणजे आत्मबळ वाढविणे. हे आत्मबळ दैवव्यपाश्रय चिकित्सेने वाढविण्यास मदत होते. आपल्या आराध्य देवतेची उपासना, नामस्मरण,जप, स्तोत्रपठन केल्यामुळे शांती, समाधान , श्रद्धा या वृत्ती वृद्धिंगत होतात. त्यामुळे शरीरातील 'सेल्फ हीलिंग' म्हणजेच 'स्व उपचार' प्रक्रिया कार्यान्वित होते. जपामुळे बोटांचा व्यायाम तर स्तोत्राने स्पीच थेरपी हा दुहेरी फायदा होतो.
      पुनर्वसनासाठी मानसिक आणि आत्मिक शक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. रुग्णाला एकटेपणा, निराशा, हतबलता यातून बाहेर काढणे हे  मानसोपचारतज्ज्ञापेक्षाही कुटुंबावर सर्वस्वी अवलंबून आहे.  औषधोपचार, फीजियोथेरपी याबरोबरच जेव्हा रुग्णाच्या 'प्रसन्न आत्मेंद्रिय मनः' याकडे चिकित्सा  उपक्रम म्हणून अंमलात आणले जाते त्यावेळी रुग्णाची प्रतिसादक्षमता अनेक पटीने वाढते हा माझा अनुभव आहे. 
    पक्षाघाताच्या दुसऱ्या टप्प्यात शरीर,मन व आत्मा सुदृढ करण्यासाठी आपल्या शास्त्रात प्रभावी उपाय आहे हे खात्रीने आपण सांगू शकतो. सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा यांचे सुद्धा एक वेळापत्रक तयार करून वेळोवेळी त्यात बदल करावे म्हणजे रुग्णालाही त्यांचे महत्त्व जाणवते.आपल्या शास्त्रातील चिकित्सा  लोकप्रिय, मौल्यवान, महत्वपूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. पक्षाघाताच नव्हे तर अनेक आजारांवर  त्रिविध चिकित्सा आपणच प्रचलित करायला हवी.

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी
प्रोफेसर, काय चिकित्सा
आर.टी.आयुर्वेद महाविद्यालय, अकोला.
9422939510
#पक्षाघात
#पक्षाघातपुनर्वसन
#आयुर्वेदपक्षाघातपुनर्वसन

 *कहे कबीर सुनो भाई साधो*

प्रगत देशांचे आपल्याला विलक्षण आकर्षण असते.परदेशात गेल्यावर सतत भारताशी तुलना केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही.तिकडची समृद्धी बघून आपले डोळे दिपतात. पण तेव्हा विसर पडतो की एक समृद्ध संत परंपरा आपल्याला लाभली आहे. या संतांच्या लेखणीतून स्फुरलेले साहित्य - हा आपला वैचारिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवा आहे. जो अक्षय आहे. युगानुयुगे  हे संत साहित्य समाजाचे मानसिक आणि अध्यात्मिक पोषण करीत आले आहे. संतांनी आपल्या साहित्यातून अमूल्य आणि आजही कालसुसंगत असणारे जीवन तत्वज्ञान आपल्याला प्रदान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ज्ञान कोणीही विद्यापीठातून वा भरमसाठ पदव्या मिळवून घेतलेले नाही. संतांची अंगभूत शहाणीव व प्रज्ञा यांची आपल्यावर कायम कृपा असते हे भाग्यच आहे.

     ‌‌ ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीरदास यांची जयंती असते. कबीराचे दोहे अत्यंत लोकप्रिय आहेत. अनेकांना ते मुखोद्गत आहेत. शिक्षित, अशिक्षित, विचारवंत बुद्धिवंत समाजाला संत कबीरांचे  साहित्य अवगत आहे.पण विरोधाभास असा की कबीरदासांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल कमालीची संदिग्धता आहे. त्यामुळे अनेक खऱ्या खोट्या कथा त्यांच्या धर्माबद्दल, जन्माबद्दल, गुरुं बद्दल सांगितल्या जातात. संत कबीरांचा जन्म हा वाराणसी येथील एका गावात झाला. साधारणतः पंधराव्या शतकात, चौदाशे चाळीस साली त्यांचा जन्म झाला असावा. पण यातही मत मतांतरे आहेत.  निरू आणि निमा या मुसलमान जोडप्याने, एका तळ्यात कमळाच्या फुलावर बाल कबीरला तरंगताना बघितले. हे जोडपे निपुत्रिक असल्याने, त्यांनी या बाळाला घरी आणले. नामकरणाचे वेळी मौलवींना  पाचारण करण्यात आले. मौलवींनी त्यासाठी कुराण शरीफ उघडले. पण आश्चर्याची बाब अशी की त्यांनी ज्या ज्या नावावर बोट ठेवले, ते नाव कबीर होते.  कबीर याचा अर्थ ईश्वर असल्याने मौलवींनी नाईलाजानेच हे नाव ठेवले. 

       निरू आणि निमा यांच्या घरात  कबीर यांचे संगोपन झाले. ते दोघेही विणकर असल्यामुळे सहाजिकच कबीर देखील हेच काम करू लागले. त्यावेळी देशातली स्थिती अतिशय ढासळलेली होती. मोगलांचे वर्चस्व होते.अराजक, जुलमी राजवट, हिंसा ,अन्याय अत्याचार अशा परिस्थितीत समाज भरकटलेला होता. ही परिस्थिती अनुभवतच कबीरदास लहानाचे मोठे झाले . कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी ,परंपरा या विषयीही त्यांना नेहमीच प्रश्न पडत. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांच्या उपजत आध्यात्मिक प्रतिभेला धुमारे फुटू लागले. आणि शाली, चादरी विणता विणता दोहे व कवितांमधून ते परिस्थितीवर भाष्य करू लागले.त्यावर मार्गदर्शन करू लागले. 

      कबीरदासांच्या या अलौकिक, दैवी व्यक्तिमत्त्वाची जनमानसात प्रसिद्धी होऊ लागली. अनेकांना त्यांच्या प्रतिभेचे आकर्षण होते. पण ते हिंदू की मुसलमान हा प्रश्न समाजासाठी फार महत्त्वाचा ठरला. कबीरदासांचे विचार आणि तत्वे, त्यावेळच्या भरकटलेल्या, गोंधळलेल्या समाजाला पेलले नाहीत.कारण ते काळाच्या  कितीतरी पुढे होते.त्यावेळी सिकंदर लोधीचे राज्य होते. हिंदूंना राज्यातून बहिष्कृत कराण्याचे त्याचे धोरण होते. त्यामुळे कबीरदासांनाही धर्मद्रोही ठरवून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले. पण त्यामुळे विचलित न होता ,अहिंसा, प्रेम, मानवता, नैतिकता यांची शिकवण देऊन समाज परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकत हे कार्य कबीरदासांनी अविरत सुरू ठेवले. 

*जाती न पूछो साधो की,*    

*पूछ लिजिए ज्ञान,।* 

*मोल करो तरवार का*, *पडा रहने दो म्यान।।* 

धर्म ,जात,पंथ यापलीकडे पोचलेले, मानवतेचे पुजारी असलेले  कबीरदास हे बंडखोर व क्रांतिकारक विचारांचे होते. दोह्यांमध्ये सिद्धांत आणि उदाहरण शब्दबद्ध करणे, ही त्यांची विशिष्ट शैली होती. निर्गुण भक्ती यावर त्यांचा विश्वास होता. 

*हरी को ढूंढन मै चला,*  *जा पहुचा हरिद्वार।* 

*पग थके ना हरी मिले*, *क्यूं की हरी थे मेरे द्वार।।*        मूर्ती पूजेला त्यांनी नेहमीच विरोध केला. कर्मकांड, अंधश्रद्धा यापासून दूर राहण्यासाठी त्यांनी समाजाला शाब्दिक फटकारे दिले. त्यांचे दोहे समजून घेण्यासाठी शब्दार्थ भावार्थ  (तात्पर्य) व गूढार्थ  (प्रतिकात्मक) लक्षात घेणे गरजेचे आहे. 

*राम राम सब कोई कहे,*  *दशॠत कहे ना कोई ।*

*एकवार दशॠत कहे*, *कोटी यज्ञ फल होय।।* 

 यात अनेक ठिकाणी 'दशरथ' हे चुकीचे लिहिले जाते.कबीरदासांचे दैवत श्री राम आहे असा अनेकांचा समज आहे. परंतु निर्गुण राम म्हणजेच 'आत्माराम' हे त्यांचे दैवत आहे.  वरिल दोह्यात  दशरथ आणि राम हाच  अर्थ समजला जातो. 'दशॠत' म्हणजे दहा अपराधांपासून मुक्त होऊन  रामाचे नामस्मरण करावे. 

    सोप्या - साध्या भाषेत, कमीत कमी शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे व तेही व्यवहारातील उदाहरणे देऊन.... त्यामुळे संत कबीर तळागाळापर्यंत सहज पोचले आणि भक्तांच्या हृदयात विराजमान झाले. त्यांच्या उपासनेची पद्धत परंपरागत नसल्याने, त्यांनी धर्म आणि समाजाकडे बघण्याचा आपला स्वतःचा मार्ग विकसित केला. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. आणि भाषा तरी कोणती? अरबी, फारसी, पंजाबी, बुंदेलखंडी आणि खडीबोली यांचे मिश्रण. म्हणून कबीरांच्या भाषेला पंचमेल खिचडी म्हणतात 

    बीजक आणि साकी हे त्यांचे महत्त्वाचे दोन साहित्य प्रकार. याशिवायही अनेक   प्रकारांमधून त्यांचे शब्दधन समाजाला दिशा देत असते.   महत्त्वाचे म्हणजे कबीरदासांनी स्वतःबद्दल काहीही लिहिले नाही. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल, त्यांच्या गुरुंबद्दल संदिग्धता आहे. श्री रामानंद त्यांचे गुरु होते असे म्हटले जाते.संत कबीरांचे छायाचित्र सुद्धा काल्पनिक आहे.कुणी त्यांना टोपी घातली आहे तर कुणी त्यांना मोरपीस लावले आहे.स्वतःबद्दल ते म्हणतात, 

*मसी कागद छुओ नही,* *कलम गही  नहि हाथ।* 

*चारिक जूग को महातम*  *मुखही जनाई बात।।* 

 कबीरदास निरक्षर होते. त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी हे अक्षरधन त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवलेले आहे. आणि कबीर पंथाची स्थापना केली. बाबू शाम सुंदर दास यांनी संपादन करुन १९३० मध्ये कबीरांच्या पूर्ण रचना हिंदीत प्रथम प्रकाशित केल्या. तसेच 'वन हंड्रेड पोएम्स ऑफ कबीर' हे मॅकमिलन लंडन येथे १९१५ मध्ये प्रकाशित झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे .डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी कबीरदासांना आपले गुरु मानले होते. कबीरांच्या शिकवणीमुळे मला आत्मिक शक्ती मिळाली आहे असे आंबेडकर म्हणतात. 

कबीरांची सुखाची कल्पना म्हणजे ,

*चाह मिटी चिंता मिटी*, *मनवा  बेपरवाह।* 

*जिसको कुछ नहि चाहिये*, 

   *वह शहनशाह।।* 

संत कबीरांचा निर्गुणवाद हा स्वर्ग ,नरक, पुनर्जन्म, मोक्ष, अवतार, पूजा, तीर्थयात्रा आणि उपवास या संकल्पना नाकारणारा आहे. त्यांचा भर केवळ प्रेमावर आहे. प्रेमाशिवाय  समता, स्वातंत्र्य, बंधुत्व असूच शकत नाही असं ते म्हणतात. 

  *कबीर बादल प्रेम का,* *हमपर बरसा आई।* 

*अंतरी भिगी आतमा*,

  *हरीभरी वनराई।।* 

      कबीरांचे विचार काल, सांस्कृतिक व भौगोलिक सीमा ओलांडून विश्वभर प्रसारित झाले आहेत. त्यांचे पंढरपूरच्या विठ्ठलावर  पण अतिशय प्रेम होते. त्यांनी यावर अभंगही लिहिले आहेत. 

*छोड दिया वैकुंठ*, 

*हरि भाव भगतका भूका।* 

*कहत कबीर हरी से मीठा,* 

*लागत तुलसी का  बुक्का।।*. 

   त्याकाळी किंवा आजही अशी समजूत आहे की काशीला मृत्यू आला की मोक्ष मिळतो. ही अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी कबीरदास काशीतून मगहर या ठिकाणी आले आणि तिथेच त्यांचे महानिर्वाण 

 झाले. 

 *सकल जनम शिवपुरी गंवाया।*

*मरतो बार मगहर उठि आया।।*

अशी स्वतः उक्ती आणि कृती करणारे ते समाज सुधारक होते. 

   वास्तविक आज त्यांच्या विचारांची समाजाला खूप गरज आहे. आम्हाला दोहे पाठ आहेत.पण ते अंगीकारण्याचे, आत्मसात करण्याचे धाडस आजही नाही. आम्ही व्यक्तिपूजेतच समाधानी असतो. व्यक्तिगत, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे वागावे याचे नीतीपूर्ण ज्ञान संत कबीरांच्या साहित्यातून मिळते. त्यांच्या अनेक दोह्यांमधून  *कहे कबीर सुनो भाई साधो* .. असे म्हटले असते.. इथे या   'साधोचा' शब्दार्थ म्हणजे साधू. म्हणजेच शुद्ध मनाने ऐका. भावार्थ हा 'साधक'  आहे. आणि गूढार्थ असा आहे की  'साध्य करा.'कबीर वाणी ऐका आणि साध्य करा.

       माझी कणभरही पात्रता नसताना मी संत कबीर जयंती निमित्त लिखाण केले आहे. त्याबद्दल आधीच मी वाचकांची क्षमा मागते. कारण कबीर हा विषय सामान्यांच्या आवाक्यातला अजिबात नाही.  तूर्त त्यांचा, 

*बुरा जो देखन मै चला*,

 *बुरा न मिलिया कोय।*

*जो दिल खोजा आपणा,* 

*मुझसे बुरा ना कोय।।*

हा एक जरी दोहा आपण आत्मसात केला तरी सुद्धा आपले कल्याण होऊन जीवनाचे सार्थक होऊ शकते.


#कबीरदोहे

#संतकबीर


Sunday, June 2, 2024

तीनशे शब्दांचा निबंध

 


तीनशे शब्दांचा निबंध

"तीनशे शब्दांचा निबंध" या घटनेनं अल्पवयीन, अपराधी बालकांच्या सुधारणा प्रक्रियेला एक अभिनव आयाम मिळाला आहे.निबंध लिहिण्याची 'शिक्षा' या घटनेचं किती बरं कौतुक करावं? आम्ही शाळेत असताना इंग्रजी हिंदी, मराठी या विषयात 'निबंध' हा एक अनिवार्य भाग असायचा. 'मी केलेला प्रवास', 'एक अविस्मरणीय घटना', 'माझा आवडता सण', 'माझा आवडता प्राणी/ पक्षी... असे विषय सामान्यतः असायचे.मग 'गाय' या विषयावर निबंध लिहिताना......'गाय हा पाळीव प्राणी आहे. गाईला चार पाय व एक शेपूट असते.या शेपटीने ती स्वतः च्या अंगावरच्या माशा हाकलते. गाय गवत खाते....'असे अनेक माहितीपूर्ण निबंध आमच्या लेखणीतून उतरलेले आहेत.निबंधात म्हणी आणि वाक्प्रचार टाकायचे असतात ...हा एक अनिवार्य नियम. ' चोर सोडून संन्यासाला सुळी ', 'उथळ पाण्याला खळखळाट फार ' , 

' कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' , 'आपलेच दात आणि आपलेच ओठ', 'आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी'...... अशा म्हणींनी आम्ही निबंधाची उंची वाढवित असू ..   अर्थात हे माझ्या पिढीचे अनुभव बरं का. हल्लीच्या मुलांचा आणि निबंध या शब्दाचा  काही संबंध असतो का याबद्दल मी अनभिज्ञ आहे.असो. मग जरा वरच्या वर्गात गेलं की 'विज्ञान शाप की वरदान?', 'एका वृक्षाचे आत्मवृत्त', 'माझे ध्येय', 'जिच्या हाती पाळण्याची दोरी' वगैरे वैचारिक आणि बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारे निबंध असायचे. 

         आता मला प्रश्न पडला आहे की परवाच्या घटनेच्या  त्या अल्पवयीन बाबुला निबंधाचा कोणता विषय  दिला असेल हो? 'मी केलेला अपघात', 'दारू पिण्याचे दुष्परिणाम', 'महागड्या गाडीचे वर्णन',  'एक अविस्मरणीय प्रसंग',माझे वाहन - माझा वेग'..... या प्रश्नानं माझा अक्षरशः  छळवाद मांडला आहे.. पण दुसऱ्या आणखी एका बाबीने माझा मेंदू  वैचारिक आवर्तात गरगरतो आहे....तो म्हणजे ही शिक्षा देणारे अधिकारी नेमके कोण आहेत? अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे की आदरणीय अधिकाऱ्यांच्या डोक्यातून या शिक्षेचा उगम झालेला आहे?  निबंध लिहिणे या शिक्षेमागचा त्यांचा नेमका दृष्टिकोन काय असावा बरं? हे महाशय पूर्वी शिक्षक तर नसावेत ना? नाही तर शिक्षण मंडळावर तर नक्कीच असतील.

    परवा घडलेल्या अपघाताच्या घटनेवर असंख्य प्रतिक्रिया आल्या. जोपर्यंत काही भयानक घटना घडत नाही तोपर्यंत सारं काही आलबेल असतं.पण जेव्हा काही घडतं तेव्हा समस्त जनतेची  तत्वनिष्ठा, नीतिमत्ता , विद्वत्ता , वक्तृत्व  शिगेला पोचतं.....मी पण त्यातलीच की. 

       परवा होर्डिंग कोसळलं आणि मग आम्ही तोंडसुख घ्यायला मोकळे झालो.आपलं कसं आहे ना, प्रश्न निर्माण झाल्यावर जागं व्हायचं.... तोपर्यंत झोपेचं सोंग घ्यायचं.आणि दुसरं म्हणजे अस्तित्वात नसलेल्या प्रश्नांमध्ये आपली शक्ती, बुद्धी पणाला लावायची आणि खर्च करायची. यातच आम्ही गुंतलेले.तसंही 'निवडणूक' या विषयावर बोलून, ऐकून, चर्चा करुन जरा अजीर्णच झालं होतं.


     असो. अपघाताच्पा घटनेवर प्रतिक्रिया देण्याचा जन्मसिध्द अधिकार असल्याने  जनता (म्हणजे  आपणच हो.) एकदमच जागृतावस्थेत पोचली. आणि आमच्यातले संस्कार, संस्कृती, नीतिमूल्यं, कायदे, वाहतूक नियम.. सगळंच सरसरून उफाळून आलं.

      यात  कोणी पालकांना दोषी ठरवलं . काहींच्या मते अती संपत्त्तीच याला कारणीभूत आहे.  कुणी आरटीओवर हल्लाबोल केला तर काहीनी वाहतूक  पोलीसांवर ताशेरे झाडले.. तरुण पिढीचा उद्धार तर यातला महत्त्वाचा मुद्दा  होता.आयुष्यात 'पब'चं  तोंडही न  पाहिलेल्यांनी पबच्या कायदे , नियमावलींचे वाभाडे काढले  . काहींना तर एक मुलगा आणि मुलगी इतक्या रात्री बाईकवरून कुठे जात होते हा प्रश्न पडला. त्यांच्या दृष्टीनं  हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, की ही   दोघेजणं मध्यरात्री नेमकं काय करत होती? त्या दोघांचं एकमेकात काही नातं होतं का? आता पुण्यातील संस्कृतीचं काय?     

              ही घटनाच अशी होती की प्रत्येक संवेदनशील मनाला  अस्वस्थता येऊन काहीतरी व्यक्त करावसं वाटलं. मला मात्र या भयानक प्रसंगातही एक आशेचा किरण दिसला.निबंधाचा मुद्दा मला इतका आश्वासक आणि  महत्त्वाचा वाटला ,(कुणाचं काय, नि कुणाचं काय) की बाकी तपशील जरा नजरेआडच झाला.एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, महागडी गाडी अत्यंत वेगाने चालवून मध्यरात्री अपघात केला. त्यात बाईकवरचे दोघे  घटनास्थळी मृत्युमुखी पडले. आपल्या सल्लूभाईंच्या बाबतीतही असं झालंच होतं की. दिवसागणिक अपघात होतात. लोक प्राणाला मुकतात.  पण सगळ्या घटना आपल्यासमोर येतातच असंही नाही.                 

         त्यामुळे  शिक्षा म्हणून '300 शब्दांचा निबंध' हा माझ्यासाठी या घटनेतील अनपेक्षित, अकल्पित आणि अभिनव असा ट्विस्ट अर्थातच वळण आहे. म्हणूनच हा शिक्षेचा अभिनव प्रकार इतिहास घडविणार याची मला खात्री वाटते.

          मी एक हाडाची (ऑर्थो नाही हो) शिक्षिका आहे. आणि अधून मधून  कागदावर खरडण्याची 'खाज' असल्याने  निबंध, शब्द याबद्दल मला कमालीचं ममत्व आहे. शाळेत असताना बरेचदा शिक्षा म्हणून आम्हाला चूक लिहिलेला शब्द शंभर वेळा परत लिहायला सांगायचे.(पुन्हा  तेच.आमच्या काळातलं हो.) पण अपघात  केला म्हणून आजच्या काळातल्या अल्पवयीन मुलाला चक्क निबंध लिहायची शिक्षा करणं, ते ही स्वतः शिक्षक नसतांना? हे दिव्य दूरदृष्टीचे एक उदाहरण आहे असं मला वाटतं.

      आजच्या कॉपी पेस्ट च्या जगात, मुलांनी निबंध लिहायचा- हे आव्हान अपघात करण्यापेक्षाही भारी आहे हो. निबंध लिहायचा म्हणजे विचार करणे आले. आता हल्लीच्या पिढीचा विचार करण्यावर विश्वास नाही. यांच्या मेंदूत विचार करण्याची प्रणाली विकसित झालेलीच नाही . कारण त्यांना विचार करण्याची संधी पालक आणि आपली शिक्षण व्यवस्था देत नाही .  ही  पिढी न कळत्या वयापासून सतत काहीतरी ऍक्शनपॅक्ड  प्रसंग बघत असते.त्यामुळे ही मुले डायरेक्ट कृती करणारी आहेत .मग निबंधासाठी मनातले विचार कागदावर उतरवण्याची शक्यता तर दूरच. तसंहीआता ही Gen -Z मुलं, कागदावर लिहिण्याची निर्बुद्ध कामं अजिबातच   करत नाही हो. ते टाईपतात . शब्दांऐवजी ईमोजी टाकतात.  आता अशा परिस्थितीत  विचार करुन, कागदावर    ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या प्रक्रियेतून ....सदरहू अल्पवयीन बाबू जेव्हा जाईल. ,तेव्हा त्याच्या बालमेंदूत किती वैचारिक वादळं आणि केमिकल लोच्या होईल याचा विचार संबंधित अधिकारी यांनी केला नाही का? याशिवाय  निबंध लेखनाबरोबर शुद्धलेखन,  व्याकरण, आणि चांगलं अक्षर हे ओघाने आलंच की हो. म्हणजे किती मानसिक ताण? यापेक्षा गाडी चालवून लोकांना मारणं किती बरं सोप्पंय.

      पण काहीही असो. निबंध लिहिण्याची शिक्षा हा भारतीय इतिहासात एक मैलाचा दगड ठरावा.  अल्पवयीन गुन्हेगारांचं मनपरिवर्तन  व मतपरिवर्तन घडवून  आणणाऱ्या वैचारिक क्रांतीची ही रुजवात आहे.  ही साधीसुधी कारवाई नाही तर अल्पवयीन अपराधींच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडवणारी एक प्रक्रिया आहे.बालसुधारगृहांच्या कार्यपद्धतीला एक वैशिष्ट्यपूर्ण , बौद्धिक कलाटणी मिळण्याचे हे संकेत आहेत. ज्या साहेबांनी ही शिक्षा ठोठावण्याचा विचार केला ते नक्कीच अभिनंदनाला पात्र आहेत. यात मला एक सूचना करण्याची खुमखुमी (मुलभूत प्रेरणा) आली आहे, ती म्हणजे अल्पवयीन भावी गुन्हेगारांच्या पालकांनाही १००० शब्दांचा निबंध लिहिण्याचा या शिक्षेत अंतर्भाव करावा. विषय मी सुचवू शकेन हे ही इथेच सुचवून टाकते हो.

         जो परिणाम आरटीओ कारवाई मुळे होणार नाही, वाहतूक पोलीसांच्या दट्ट्या मुळे होणार नाही, पब बंद केल्याने होणार नाही, तो परिणाम एका निबंधाने साध्य होईल. निबंध लिहिण्याच्या शिक्षेची दहशतच येवढी भयंकर असणार आहे की कुणाची बिशाद आहे हो गुन्हा करण्याची?

     वाईटातून चांगलं घडतं ते हेच!!!

Sunday, May 12, 2024

आई, तू कशाला काही करते?


        परवा वर्तमानपत्रात एका खटल्याच्या निकालाची बातमी वाचली. खटल्याच्या तपशिलात  शिरायची गरज नाही. एका पतीने पत्नीकडून आपल्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वर्षभरापूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हापासून मुलगी आईजवळ राहत होती. पतीच्या बाजूने जेष्ठ कायदेतज्ञ व मानवी हक्क कार्यकर्ता इंदिरा जयसिंग यांनी युक्तिवाद केला. 'मुलीच्या आईचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे मुलीला आईच्या ताब्यात देणे योग्य नाही '..असे मत त्यांनी युक्तिवादात मांडले. यावर उच्च न्यायालयाने दिलेले उत्तर असे की, 'चांगली पत्नी नसणे, याचा अर्थ संबंधित महिला चांगली 'आई 'नाही असा नव्हे.   व्यभिचार हे घटस्फोटाचे कारण असू शकते. परंतु अपत्याचा ताबा आईकडे न देण्याचे ते कारण असू शकत नाही.' असे निरीक्षण नोंदवून मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला.

    आता मुद्दा असा आहे की 'आई 'असणारी आणि 'व्यभिचार करणारी' व्यक्ति तर एकच आहे. इंदिरा जयसिंग यांनी महिलेच्या 'वागणुकीचा' निकष लावला तर उच्च न्यायालयाने 'आई' हा निकष लावला. म्हणजे फक्त आई असणे हे एक असामान्य गुणवैशिष्ट्य आहे का?

        यासंदर्भात महाभारतातील कुंतीची कथा आठवणे हे अपरिहार्य आहे .दुर्वास ऋषींनी शिवसेन राजाच्या कन्येवर -  कुंतीवर प्रसन्न होऊन वर दिला होता. ज्या देवाचे स्मरण केले , तो देव वश होईल अशी ती शक्ती होती. लग्नापूर्वी कुंतीने सहज सूर्य देवाचे स्मरण केले. सूर्य देव प्रगट झाले आणि त्यांनी कुंतीच्या नाभीला बोट लावले. 'माझ्याप्रमाणेच तेजस्वी पुत्र तुला होईल'.. असा आशिर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. आणि खरोखरच कुंतीला सूर्यपुत्राचा लाभ झाला. या  अनपेक्षित  घटनेने कुंती घाबरून गेली. समाजाच्या भीतीने तिने सूर्यपुत्राला नदीत  सोडून दिले व हे सत्य दडवून ठेवले. आता या प्रसंगी कुंतीने कशाला प्राधान्य दिले- हे तर सर्वश्रुतच आहे. म्हणजे एका स्त्रीच्या व्यक्तिमत्वात आई असण्याबरोबरच अनेक गुण अवगुण एकवटले असतात. मग केवळ ती आई आहे म्हणून श्रेष्ठ ठरते का?

 आपल्या  संस्कृतीने  मातेचा नेहमीच गौरव केला आहे किंबहुना मातेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. (ओव्हर रेटेड - मराठीत हो).

 •'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी|'

    •'न मातु :परदैवतम् | ' 

 • 'कुपुत्रो जायते  क्वचिदपि, माता कुमाता न भवति|

 •'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.'

 •'देवाला प्रत्येक  ठिकाणी जन्म घेणे शक्य नव्हते म्हणून  त्याने आई निर्माण केली'.

     अशा  आणि  यासारख्या असंख्य वाक्प्रचार ,सुभाषिते श्लोकांनी  प्रत्येक भारतीय मनाचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे. उपरोक्त ही जी ब्रह्मवाक्ये आहेत, ती शाळेत निबंधात लिहून, पाठ करून , आई बद्दल अतिउदात्त धारणा प्रस्थापित झाल्या आहेत .आई म्हटले की ममतेचा सागर, त्यागमूर्ती, आदर्श, वात्सल्य,करुणा  इत्यादी घासून गुळगुळीत झालेले शब्द वापरलेच पाहिजेत असा असा एक अलिखित नियम आहे. याशिवाय चित्रपट, मालिकांमध्ये दाखवलेली आई तर अतिरंजित स्वरूपात असते. ऐन कसोटीच्या, जीवन मरणाच्या प्रसंगात ही सिनेमातली आई मुलासमोर भात्यातले एक ब्रह्मास्त्र सोडते. 'नौ महिने मैने तुम्हे अपने पेट मे पाला है....'

  प्रत्यक्ष ब्रम्हदेवाला आव्हान देणारे हे 'भावनिक ब्रम्हास्त्र'..मुलाला क्षणात गारद करणारे!!!


      वास्तविक नऊ महिने बाळाला पोटात सांभाळणे हा काही विश्वपराक्रम नाही किंवा  जन्मणाऱ्या बाळावर केलेले उपकार तर नाहीच नाही. ही अत्यंत नैसर्गिक अशी शारीरिक घटना आहे, ज्यात भावी आईचे काहीही कर्तृत्व नाही. उठसुठ, 'तुला नऊ महिने पोटात वाढवले आणि तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या'... हे वाक्य हुकमी एक्क्यासारखे का म्हटले जाते, हे अनाकलनीय आहे. 'गाजर का हलवा' खाऊ घालणारी, सतत टिपे गाळणारी, मशीन वर कपडे शिवणारी, डोक्यावर घमेले घेऊन  दगड उचलणारी, स्वतः उपाशी राहणारी..... अशा ठराविक साच्यातील आईची प्रतिमा चित्रपटात रंगवली जाते.

 पण आई ही सुद्धा एक हाडामांसाची जिवंत व्यक्ती आहे. तिला चांगल्या वाईट संवेदना आहेत . तिचा ठराविक स्वभाव आहे. तिला आवडीनिवडी आहेत. ही वस्तुस्थिती महत्त्वाची नाही का ?  प्रत्येक आई आपल्या कुवतीनुसार ,बुद्धीनुसार आपल्या अपत्यांची काळजी घेत असते. संगोपन करते. कुठेही गेली तरी तिचा जीव लेकरांमध्ये गुंतला असतो .अपत्याच्या सुखासाठी ती जे जे शक्य असेल ते ती करते. आई व मुले हे एकमेकांचे सर्वस्व असतात. निरपेक्ष प्रेम हे आईचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे मायलेकांचे नाते हे सर्वोत्कृष्ट मानले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी, भविष्यातील सुरक्षित जीवनासाठी ती वैयक्तिकरित्या अनेक तडजोडी करते.ही प्रत्येक आईची गुणवैशिष्ट्ये आहेत..जी सर्वसामान्य आहेत, अंगभूत आहेत. (बाय डिफॉल्ट - मराठीत हो.)

        पण अनेकदा, ती मुलांच्या अती लाडापोटी चुकते सुद्धा. 'सुपर कीड' ची 'सुपर मॉम' बनण्याच्या हव्यासापोटी ती भरकटतेही .मुलांवर आपल्या अपेक्षांची ओझी लादून, त्यांचे बाल्य हिरावल्या जाते आहे , याचेही तिला भान नसते. मुलांचे बोट धरून चालताना,त्यांना वाढवताना ती सक्षम झाल्यावर, एक क्षण असा येतो की अलगद पणे मुलांचे बोट सोडून त्यांना स्वातंत्र्य द्यायचे असते. मुलांचे विवाह झाले की आईच्या भूमिकेतून हलकेच अंग काढून घ्यायचे असते. पण ही समयोचित वागणूक अनेक आयांना जमतेच असे नाही.

  .'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे'...( कोणी लिहिले आहे देव जाणे) हे ब्रह्मवाक्य सुद्धा आईवर लादले जाते. मातेच्या भूमिकेतून तिने कधी बाहेरच येऊ नये असा 'सोयिस्कर बहुमान' तिच्या गळी उतरवला जातो. आणि या अपेक्षांच्या दडपणाखाली, 

'पुत्राचे सहस्त्र अपराध ,माता काय मानी तयाचा खेद'..      असे म्हणत ती अपत्याचे लाड करते. त्याच्या चुका पोटात घालते. स्वतः झिजत राहते. मग ज्यावेळी या आईचे काळीज प्रेयसी कडे घेऊन जाताना मुलगा ठेचकाळतो, तेव्हा.. 'तुला लागले तर नाही ना बाळा?'.. असा त्या आईच्या काळजातून हुंकार येतो. हे तर आईच्या उदात्तीकरणाचे अतिरेकी उदाहरण आहे.त्यावर अजून तडका मारणारी लोकप्रिय मालिका...' आई कुठे काय करते?' यातल्या अरुंधतीला 'महाराष्ट्रभूषण' नक्की मिळणार बघा.सध्याची मालिकेची लांबण बघता, 'आई तू कशाला काही करते?'...असे म्हणावेसे वाटते.

      वास्तविक भारतीय संस्कृतीने 'मातृत्वाचा' गौरव केला आहे. 'आई' या मर्यादित व्यक्तिमत्त्वाचा नाही. मातृत्व ही एक उदात्त, उन्नत वृत्ती आहे. जी मानवी जीवनाची  परमोच्च,उत्कट  भावना    आहे. सगळ्या संतांना त्यांचे परमभक्त 'माऊली' म्हणतात. 

"विठु माझा लेकुरवाळा" या संत जनाबाईच्या अभंगातून किंवा... "बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई"- या संत एकनाथांच्या अभंगातून जे सर्वव्यापी, निरपेक्ष निर्मळ मातृत्व प्रतित होते, ते उच्च कोटीच्या संतांमध्ये प्राधान्याने दिसून येते.राणी कौसल्येला आदर्श मातृत्वाचे प्रतिक समजले जाते.पण हा बहुमान कैकेयीला का मिळाला नाही ? कारण तिच्या मातृत्वाला स्वार्थ आणि मत्सराची किनार होती.

महानायक श्रीकृष्णाची आई देवकी.पण श्रीकृष्ण वाढला तो यशोदेच्या वत्सल छायेत.

अगदी प्रसिद्ध उदाहरणे बघायची तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल, मदर टेरेसा, माता जिजाबाई, सिंधुताई सपकाळ... यांचे वंदनीय मातृत्व कायम प्रेरणा देणारे आहे.आणि महत्त्वाचे म्हणजे ही मातृत्व वृत्ती पुरुषातही असते तसेच आई होऊ न शकलेल्या स्त्रीतही असते.

      थोडक्यात काय, आई आणि मातृत्व वृत्ती यांच्यात गल्लत होऊ नये.स्त्री ही व्यक्ती म्हणून उत्तम असेल तर ती आई म्हणूनही उत्तमच असते.अविवेकी,अविचारी स्त्री असेल तर ती आईही तशीच असू शकते.स्त्री व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगिण मूल्यमापन केल्यानंतरच तिच्या 'आईपणाला' जोखणे गरजेचे आहे. म्हणूनच केवळ 'आई होणे ' हे  जीवनाचे सार्थक नाही तर जिजामातेसारखी मातृत्व वृत्ती असेल तरच शिवाजी घडतात .मुलांना सतत उपदेश देऊन,त्यांची तुलना करून , अनेक क्लासेस ला पाठवून संस्कार होत नसतात. पालकांची दैनंदिन, प्रासंगिक वागणूक आणि कौटुंबिक वातावरण....यातून संस्कार आपोआप झिरपतात.म्हणूनच म्हणावेसे वाटते.....'आई तू कशाला काही करते?'


#मदर्सडे

#आई

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...