चला आखू या लक्ष्मणरेषा
कोलकाता आणि बदलापूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी घडलेल्या घटना कदाचित आताच्या क्षणी आम्ही विसरलो असू. कारण त्यानंतर आम्ही उत्साहाने झेंडावंदन केले. स्वतंत्र भारताचे प्रतिक असलेला हा तिरंगा नक्की कोणत्या स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करतो हे भारतमाता च जाणे. पण ७७ वर्षाच्या स्वतंत्र भारतात हा तिरंगा दिमाखाने फडकत होता हे मात्र खरे. त्यानंतर गौरी गणपतीची धामधूम सुरू झाली आणि त्या पुढे देवीचे नवरात्र समोर आहेच. या सगळ्या उत्सवी वातावरणात कोलकाता आणि बदलापूर घटनांचे नेहमीप्रमाणेच विस्मरण झाले. वास्तविक महिलांच्या लैंगिक छळाची परंपरा फार जुनी आहे. ज्या बलात्काराच्या घटना आपल्या समोर येतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात असे प्रसंग घडत असतात. फक्त ते उजेडात येत नाही म्हणून कळतही नाहीत. पण त्यामुळे कुठे काय बिघडते?
या वर्षी आपल्या भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलाच की.. १४ वर्ष एका महिला पंतप्रधानांनी आपल्या देशाची धुरा सांभाळली आहे. सध्या आणि याआधीही राष्ट्रपती पदाचा मान महिलेला मिळाला आहे. म्हणजेच या ७७ वर्षात महिलांच्या जीवन पध्दतीत झालेला सकारात्मक बदल लक्षात घ्यायला हवा. भारतीय मुलींची ऑलिम्पिक मधील कामगिरी, लष्कर, उद्योग व्यवसायातील भरारी- - - या मुद्द्यांवर लक्ष केन्द्रित करायला हवे. आणि आता तर नवरात्रा मुळे देवी पूजनाइतके महत्वाचे दुसरे काही असूच शकत नाही.
असेच आहे ना वास्तव? तरीसुद्धा एक प्रश्न सगळ्या मैत्रिणी, माता, भगिनींना मला विचारायचा आहे ज्याचे प्रामाणिक उत्तर मला अपेक्षित आहे. ‘एक महिला म्हणुन मी संपूर्ण सुरक्षित आहे का? भविष्यात माझ्या, माझ्या मुलींच्या, बाबतीत असला घृणास्पद व्यवहार घडणारच नाही याची खात्री मला आहे का? याचे उत्तर , 'हो' असेल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. किंबहुना या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करता आहात. याहीपेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की या ज्वलंत प्रश्नाला भिडण्याची तुम्हाला भिती वाटते आहे. आणि उत्तर 'नाही' हे असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी काही प्रयत्न केले का?
आपल्या आयुष्यात डोकावून बघितल्यास कमीत कमी एकदा तरी लैंगिक छळाचा अनुभव आपल्याला आला असतोच. त्यावेळी आपण काय केले होते? त्याक्षणी प्रतिकार केला? आरडाओरड केली? की अळी मिळी गुपचिळी? आपल्या मुलींनी, मैत्रिणींनी कधीतरी असे वाईट अनुभव आपल्याला सांगितले असतात. त्यावेळी आपण काय केले असते? 'लक्ष नको देऊ. सांभाळून रहा' .... असे सल्ले देऊन तिला रागावले असते. दुर्दैवाची बाब ही, की अशी एखादी घटना जेव्हा बलात्कारा च्या स्तरावर घडते आणि 'व्हायरल' होते त्यावेळीच आम्हाला कंठ फुटतो. मग दोषी कोण हे ठरविण्याची अहमहमिका सुरू होते. पुरुषी मानसिकता, मुलींचे कपडे, पालकांचे दुर्लक्ष, मोबाईल, इंटरनेट, चित्रपट, पोर्नोग्राफी इ. इ या सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. मग मोर्चा, निषेध, बंद, आंदोलन, अगदी ताबडतोब फाशीची मागणी...... हे सालंकृत सोपस्कार झाले की विषय तिथेच संपतो.
यात जबाबदारी कुणाची?
अर्थातच शासनाची, पोलीसांची, न्यायालयांची आणि काही महिला संघटनांची - . ही आपली परंपरागत समजूत आहे .आणि त्यामागे लपून आपण आपली स्वतःची जबाबदारी टाळतो आहोत. इव्ह टीझिंग, छेडछाड, बलात्कार या घटना व्यक्तिगत आणि सामूहिक अशा दोन्ही प्रकारे घडू शकतात. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे असा कंठशोष करायला आपण एका पायावर तयार असतो. पण पीडित महिला आपली तक्रार नोंदवते का?ती चवताळून उठते का? - शक्यतोवर नाहीच.फारच क्वचित तिने आक्रमक भूमिका घेतली की त्यावेळी मात्र तिला मूग गिळून गप्प बसण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे तक्रार करण्याची अगदी प्राथमिक जबाबदारी पाळली जाते का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बदनामी च्या भितीने तक्रार केली जात नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. पण महिलांनी मौन धरणे, तक्रार न करणे, अत्याचार सहन करणे ., प्रतिकार न करणे.....यामुळे या नराधमांचे धैर्य वाढत जाते, याचा विचार कोण करणार? तिहार जेलमधील बलात्काराच्या गुन्ह्यासाठी डांबलेल्या कैद्यांवर संशोधन केले असता , त्यावेळी त्या प्रत्येकाला आपण निर्दोष सुटणार याची खात्री होती. .ही खात्री आपल्या निष्क्रियतेमुळेच आहे, हे न समजण्याइतपत आपण भाबडे नाही. तेव्हा मैत्रिणींनो, पहिली जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा.अनेकदा असे गैरवर्तन होताक्षणी तिथेच या वृत्तीला ठेचणे गरजेचे असते. तक्रार करण्यास वेळ नसतो. पण अशावेळी सुद्धा आपण माघार घेण्यात धन्यता मानतो. बघे लोकही डोळ्यावर कातडे ओढून स्वस्थ बसले असतात . आपली ही उदासीनता , सहनशीलता कामांध वृत्तीला प्रोत्साहन देते आणि नराधमांची भीड चेपते.
आपले अज्ञान
आज आपण उच्च शिक्षित आहोत पण लैंगिक छळाची व्याख्या आपल्याला माहित आहे का? नेमकी कोणती कृती ही लैंगिक छळात मोडते याची कल्पना आपल्याला आहे का? ' विशाखा' समिती काय आहे व तिचे काम कसे चालते? ‘ पॉश ‘हा कायदा , ‘पाॅक्सो,’ रिक्लेम द नाईट,मीटू म्हणजे नेमके काय? समजा काही गैरप्रकार घडला तर काय करायचे? हेल्पलाईन नंबर्स, हेल्पलाईन ॲप्स आपल्या मोबाईल मध्ये आहेत का?
असहकार्याचे तत्व
बदनामीची भीती ही स्त्रियांना पोलिसांशी असहकार्य करण्यास भाग पाडते. आपल्या देशात काही गृहीतके पालनपोषण करून बळकट केली आहेत. वास्तविक जो पुरुष गैरवर्तन करतो - बदनामी त्याची व्हायला हवी. पीडित स्त्रीचा काहीही दोष नसताना चूक, अपराधीपणाचा गंड, बदनामी मात्र तिचीच. स्त्रियांनी या गृहीतकाला केराची टोपली दाखवायला हवी.सुदैवाने हल्ली या विषयावर किमान बोलले तरी जाते. आज सरकारने याबाबत अध्यादेश, नियमावली , तरतूदी कायदे अपडेट करून स्वागतार्ह पाऊल उचलेले आहे. ज्यामुळे स्त्रियांना नक्कीच न्याय मिळू शकतो. पण अशावेळी , पोलिस, न्यायालय या भानगडीत पडायचे नाही हा सुद्धा आमचा ‘बाणा' असतो. भारतीय स्त्रियांच्या 'जनुकांमधील' मौन, शरणागती , सहनशक्ती, भीती, इ.इ. ‘बलस्थाने' पुरुष जातीला चांगलीच माहित आहेत. स्त्रिया या बाबतीत ‘ब्र' ही काढणार नाहीत ही त्यांना खात्री असते. पण ज्या दिवसापासून स्त्रिया तक्रारींची नोंद करू लागतील, त्यावेळी पुरुषांच्या मनात भीती, धाक निर्माण होईल. अर्थातच हे चित्र बदलण्यासाठी स्त्रीला स्वतः समोर यावे लागेल.
मार्गदर्शक तत्वे
लैगिक छळाची व्याख्या -
कोणताही अस्वागतार्ह शारीरिक स्पर्श
शरीरसंबंधाची मागणी किंवा विनंती
लैंगिकता सूचक शेरे मारणे व अश्लील बोलणे '
अश्लील चित्रे दाखवणे, अश्लील मेसेज, ईमेल करणे
लैंगिकता सूचक कृती- शारीरिक, मौखिक किंवा निः शब्द पणे केलेली कोणतीही कृती
महिलांचे लैंगिक शोषण होऊ नये यासाठी कायद्यात तरतुदी आहेत. संविधानातील कलम १४ , १५, १९ आणि ११ यात महिलांना समानतेचा अधिकार दिला आहे.१९ सप्टें. २००६ रोजी महाराष्ट्र शासनाने विशाखा समिती गठित करण्याचा निर्णय पारित केला. यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, रुग्णालये या ठिकाणी नोकरी करणाऱ्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झाल्यास ' महिला तक्रार निवारण समिती' म्हणजेच विशाखा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या सदस्यांची नावे लिहून तो फलक कार्यालयात प्रत्येकाला दिसेल अशा जागी लावणे बंधनकारक आहे.
छेडछाड किंवा इव्ह टीझिंग हे गुन्हे हाताळण्यासाठी अद्याप कायदा अस्तित्वात नाही. परंतु या बाबतीत न्यायालयाने महत्वाच्या सूचना राज्य व केन्द्र सरकारला दिल्या आहेत. बस, रेल्वे, मेट्रो स्टेशन, थिएटर,बाजार, मॉल, बगीचे, समुद्रकिनारे, मंदिर परिसर - या ठिकाणी सीसी टीव्ही बसवणे आवश्यक आहे. ‘छेडछाड करणे हा गुन्हा आहे’ ही समज देणारे फलक या स्थानी लावण्यात यावे, तसेच सिव्हील ड्रेस मधील महिला पोलीसांची नेमणूक करण्यात यावी. बस किंवा रेल्वे मध्ये अशी घटना घडल्यास, चालक वाहक यांच्याकडे तक्रार करून सदर वाहन हे पोलिस स्टेशनला नेण्यात यावे.चालक - वाहकाने विरोध केल्यास वाहनाचा परवाना रद्द होतो.छेडछाडीचा गुन्हा घडत असतांना' ‘बघ्यांनी' त्वरित महिला हेल्पलाईनला कळवावे व महिलांना वाचविण्याची भूमिका घ्यावी. यासाठी प्रत्येक गावात दामिनी पथक निर्माण केले आहे. महिला पोलीसांचे पथक बाईक वरून किंवा गाडीमधून त्वरित मदतीला येते. रेल्वे मधून एकट्या स्त्रीला प्रवास करताना अनेकदा लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. अशावेळी १३१नं डायल करावा. पुढच्याच स्टेशन वर पोलिस मदतीला येतात. रेल्वेमध्ये एकट्या स्त्रीला मदत करण्या साठी ‘मेरी सहेली' हे ॲप उपलब्ध आहे. नॅशनल कमिशन फॉर विमेन द्वारा २४ × ७ हेल्पलाईन साठी २४ जुलै २०११ पासून - ७८२७१७०१७० हा नंबर दिला असून www.ncw.nic.in ही वेबसाईट पण उपलब्ध करुन दिली आहे. १०९० हा राष्ट्रीय महिला हेल्पलाईन नंबर असून महाराष्ट्राचे १८१, १०३ हे नं. आहेत.
आज शासकीय स्तरावर अनेक सकारात्मक बदल होत आहेत.स्त्रियांविषयी अवमानकारक शब्द वापरणे,विनोद करणे,शरीर अवयवांवर टिप्पणी करणे……हा पुरुषांचा जन्मतःच हक्क असतो. पण न्यायदानाच्या प्रक्रियेत तरी स्त्रियांचा उल्लेख संवेदनशीलतेने केला जावा- यासाठी पुढाकार घेणाऱ्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आभार. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली, कोलकात्याच्या उच्च न्यायालयातील विदुषींनी दोन वर्षे काम करून ३० पानांची वर्ज्य शब्दावली तयार केली आहे. ही पुस्तिका विशेषत्वाने पुरुषांनी वाचायला हवी. अनेक विशेषणांमधून तिचे मानसिक खच्चीकरण करण्याचा मार्ग नाकारण्याच्या वाटेवर न्यायव्यवस्थेने हे स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. नुकताच कोणत्याही धर्माच्या मुलींच्या विवाहाचे वय २१ वर्षे असावे हा कायदा हिमाचल प्रदेशाने पारित केला आहे.
ही माहिती प्रत्येक स्त्रीला असणे अत्यावश्यक तर आहेच पण मुलामुलींना ही माहिती देणे हे तर आपले परमकर्तव्य आहे. आता स्त्रीनेच स्वतःच पुढाकार घ्यायचा आहे. स्वतः सक्षम होऊन दुसऱ्या पीडित स्त्रीची मदत करण्यास तत्पर असणे ही काळाची गरज आहे. स्त्रियांचा प्रतिकार वाढू लागला तर लैंगिक छळाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. लैगिक छळ हा प्रश्न वैयक्तिक जरी असला तरी तो संपूर्ण समाजावर परिणाम करणारा आहे. आज एक स्त्री स्वतःसाठी न्याय मागत असेल तर ती सगळ्याच स्त्रियांना मदत करित असते हे कृपया सगळ्यांनीच लक्षात ठेवावे.
रामायणात लक्ष्मणाने सीतेच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणरेषा आखली होती. आज ही लक्ष्मणरेषा सगळ्याच स्त्रियांनी आपल्या भोवती आखायची आहे जेणेकरून कोणत्याही वासनांध रावणाला ती अडवू शकेल. आज कायदे, पोलीस, सरकारी योजना आपल्या मदतीला तत्पर आहेत. फक्त आपण भीती, लाज, संकोच, बदनामी, मौन, शरणागती या स्वअडथळ्यांवर मात करायची आहे. आपल्या मुला मुलींना या बाबतीत प्रशिक्षित करायचे आहे. मुलांनाही अशावेळी मदतीला धावून जाण्याची शिकवण देणे गरजेचे आहे. आपल्या स्वभावात धैर्य, समयसूचकता, स्पष्टवक्तेपणा, अन्यायाचा प्रतिकार आणि स्वाभिमान या अस्त्रांचा समावेश करून पोलीस, कायद्याच्या मदतीने आपली लक्ष्मण रेषा आपल्यालाच आखायची आहे. देवीची उपासना करतांना महिषासुरमर्दिनीची कथा केवळ मनोरंजनासाठी किंवा डोके टेकवण्यासाठी वाचायची नाही .उलट प्रतिकारासाठी आपल्या वापरात नसलेली अस्त्रे परजून ठेवायची आहेत. केवळ नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, उपास, ओटी, गरबा - यात गुंतून न राहता आपण पुढाकार घेऊन कृती करून दाखविण्याची वेळ आली आहे. चला तर मग. समाजातील रावणांसाठी आपली लक्ष्मणरेषा आपणच आखू या.
#लैंगिकछळ
#विशाखासमिती
#पाॅशकायदा




