कोविड डायरी...
एका अस्वस्थ मनाची....
जानेवारी 2020 ....
31 डिसेंबर 2019 ला निरोप आणि जानेवारी 2020 चं स्वागत रीतसर साजरं झालं. तशी व्यक्तिशः मी असल्या सेलिब्रेशनच्या फंदात फारशी पडत नाही पण राष्ट्रीय कुळाचार असल्याप्रमाणे या उत्सवात थोडं का होईना,नाईलाजास्तव ओढल्या जातेच. मग दरसाल दरवर्षी प्रमाणे नववर्षाचे थातूरमातूर संकल्पही करून झाले . .........अहो,शास्त्र असतं ते....
दरम्यान वुहानमध्ये कोरोना नामक नवीनच एका साथीच्या उद्रेकाच्या भीषण बातम्या बघितल्या......
चीनमधे ना??आपल्याला काय त्याचं ???
शेवटी परदुःख शीतलम्.......
आपल्या झोपेचं खोबरं कशाला?
फेब्रुवारी 2020...
इटलीमध्ये कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.. स्मशानभूमीत जागा कमी पडते आहे....
पोटात गोळा उठला जबरदस्त!
पण भारतातल्या 45 डिग्री सें. तापमानात हा विषाणू कसला तगतोय??
जीव शांतवला जरासा.
नेहमीसारखीच गाढ झोप लागली .
मार्च 2020 ....
पुण्यात पहिला कोरोना रुग्ण.. मुंबईत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू.......
जीव धास्तावला आहे....
बुद्धीला जरा बाजूला ठेवून थाळीनाद केला.
दिवे उजळले .
सामूहिक कर्फ्यू .....
थोडासा दिलासा मिळाला.
होईल सगळं व्यवस्थित.....
साथीचे रोग येतातच की आणि जातातही......
शांत झोप लागली.
एप्रिल 2020....
भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढली.
जिल्हाबंदी ,शाळा, कॉलेज, ऑफिस, कारखाने, दुकानं, बसेस, रेल्वे, सगळं बंद.
फक्त आमचे दवाखाने सुरू.. "ऑन ड्युटी डॉक्टर" हे लेबल गाडीवर शौर्य पदका सारखं लावताना ऊर नक्कीच भरुन आला.
आटोक्यात येणार ही साथ........
फ्लूचा मोठा भाऊ हो......
उत्साहानं शासनाचे कोविड१९चे ऑनलाईन ट्रेनिंग्ज घेतले.
सात लेव्हल्सचे सर्टिफिकेट्स जमा झाले.
कोविडची वैद्यकीय आणि वैज्ञानिक बाजू क्लियर झाल्यामुळे हिरीरीने समाजात ज्ञानवाटप आणि जनजागरण सुद्धा केलं.
काढे,वाफ,नस्य- दिनक्रमात जोडल्या गेले.
एसी, कुलर, थंड पाणी, आईस्क्रिम, सरबत, पन्हं,ई. नसतानाही रात्रीची झोप मात्र निवांत होती.
मे -जून-.जुलै 2020 ...
कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतोय....
मृत्युदर वाढत चाललाय...
बरे झालेल्या रुग्णांच्या मोठ्या संख्येपेक्षा मृतांचा आकडा कमालीचा छळतोय....
हा विषाणू आता मनात आलाय वस्तीला ....
कुठेतरी कुणाचा तरी -- श्वासासाठी संघर्ष ......
कुठेतरी भुकेल्यांचा- - अन्नासाठी संघर्ष........
कुठेतरी एकाकी असहाय व्यक्तिचा- - आधारासाठी संघर्ष....
सर्व स्तरातील कोविड योद्ध्यांचा - -- कामासाठी घरदार सोडतानाचा संघर्ष......
फॉरिन टूर रद्द झाल्यामुळे कुणाचा तरी- - पंचतारांकित,कोमट संघर्ष .....
आम्ही सुरक्षित आहोत. सगळं कुटुंब एकत्र आहे ..... हा स्वार्थी दिलासा खुपत होता कुठेतरी..
आज आश्वस्त वाटतंय पण उद्या?????
आता रात्री दचकून जाग येतेय.. भीषण सावट आलंय मनावर.. काही लक्षणं नसतानाही, घरातल्यांच्या नकळत पल्सऑक्सीमीटर उशीखाली लपवून झोपणाऱ्या डॉक्टरांची ही संख्या वाढते आहे.......
ऑगस्ट-सप्टेंबर 2020....
आता तर कोरोना विषाणू मनातून अंतर्मनात ही शिरलाय...
वृत्तपत्र वाचन बंद केलंय..
बातम्या बघणं बंद केलंय... तरीही येतेच ती दुष्ट, क्रूर बातमी- निकटवर्तीयाच्या मृत्यूची....
मृत्यूनं मन हेलावणं हे स्वाभाविकच .
पण या कोरोनानं मृत्यूची थरकाप उडवणारी निष्ठूर बाजू दाखवली.
प्लास्टिक मध्ये गुंडाळून, एकटेपणाला सोबत घेऊन येणारं मृत्यूचं विदारक रुप.....
दुःखाला बधीर करणारं....
कुठे आई वडिल दवाखान्यात ...
छोटी मुलं घरी एकाकी.......
वारंवार गळ्याशी आवंढा दाटून येणं वाढलंय आताशा.
मनातला कोरोना धुमाकूळ घालतोय......
ऑनलाइन गाणी, नाच, रेसिपीज,समुपदेशन, लेक्चर्स योग साधना..... यांनी कसाबसा थोपवलेला हा मनातला विषाणू उचल खातोय परत परत......
हाऊसिंग सोसायट्यांच्या गार्डन मधला शुकशुकाट, स्तब्ध झोपाळे आणि एकाकी घसरगुंड्या बघून पोटात गोळा उठतोय.....
मनातल्या विषाणू साठी कसा करावा लाॕकडाऊन???
मध्यरात्री झोप उघडली की परत डोळा लागतच नाहीय...
आॕक्टोबर - नोव्हेंबर २०२०
.... वरवर तसं सुरळित चाललंय..
मन मात्र धास्तावलेलंच आहे. दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येणार????
सण-उत्सव घरच्या घरी होताहेत साजरे.अवतीभोवती बरचसं सकारात्मक,रचनात्मक घडतंय.......
मनातल्या विषाणुचा जोर कमी झाल्यागत वाटतोय..
पण मनाच्या चिंधड्या व्हायच्या त्या झाल्याच.
पण नाही.
आता हतबल व्हायचं नाही.
डिसेंबर 2020 .....
भारतातील कोविडचं चित्र दिलासादायक... कोरोनाची लस ही येणार........ विषाणूच्या थैमाना पुढे माणसाची जगण्याची धडपड वरचढ ठरली हे निश्चित.
पण या दहा महिन्यातल्या मनाच्या पडझडीचं काय?? मनात वस्तीला आलेल्या विषाणूला कसं हद्दपार करायचं???
मानसिक कोविड मधून बरं होणाऱ्यांचं प्रमाण किती टक्के???
मनाच्या कोविडवर आहे का हो लस???
नाही....अशा विचारांच्या गुंत्यात अजिबात अडकायचं नाही.
शंभर क्षण सावरण्याचे आणि एकच क्षण कोसळण्याचा आहे..
झटकायचा तो क्षण .......
जानेवारी २०२१....
असो.....
प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी किनार असतेच.मनाच्या कोविडची लस आपली आपल्या जवळच आहे ,हे जाणवतंय... फक्त ती शोधण्याची दृष्टी आणि वृत्ती पाहिजे...
.कोविडनंच शिकवलंय ना हे???? पाय रोवून उभं राह्यला....
"दुःखेष्वनुद्विग्नमनाः
सुखेषु विगतस्पृहः/
वीतरागभयक्रोधः
स्थितधीर्मुनिरुच्यते//"
ही गीतेतली लस रोज समजून,उमजून स्वतःला टोचत राहणं......हा संकल्प करावा का
नवीन वर्षाचा???
जमेल???
कारण संकल्प अल्पजीवी असतात ...
असू दे.तो विचार आता नाहीच करायचा.
पंतप्रधान मोदींच्याच शब्दात सांगायचं तर,
"न अपना न पराया
न तेरा न मेरा,
सबका तेज बनकर
अभी तो सूरज उगा है".
"विकृतिने प्रकृतिको दबोचा
अपनोंसे ध्वस्त होती आज है,
कल बचाने और बनाने
अभी तो सूरज उगा है.