सामान्य माणूस आणि अभिजात मराठी
छोटू -'अभिजात' म्हणजे काय रे भाऊ?'
भाऊ - 'तू असे चुकीचे प्रश्न का विचारतोस मला? अरे, अभिजात नाही ते अभिजीत आहे आणि ते मुलाचे नाव आहे.'
छोटू - 'अरे, नव्हे . नव्हे. . - अभिजित नव्हे. आपल्या मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' मिळाला आहे. असे मी वाचले. म्हणजे काय रे भाऊ?'
-भाऊ - 'हो. मी पण ते वाचले आहे. छोटू तुला माहित आहे की फक्त घरात 'मराठी बोलणे ' येवढाच माझा मराठी भाषेशी संबंध आहे. आणि माझ्यासारखे असे असंख्य मराठी लोक आहेत .ज्यांचा मराठीशी अजिबात संबंध नाही. त्यामुळे तू सांगतो आहेस तो दर्जा का आणि कशासाठी दिला हे मला ठाऊक नाही.'
छोटू-'असं काय करतोस रे भाऊ? हं. हं. म्हणजे ते बहिणीला 'लाडकी बहीण' म्हणतात, सणासुदीला रेशनच्या धान्याला 'आनंदाचा शिधा' म्हणतात, तसंच आहे का रे भाऊ ?'
भाऊ - अरे, वेगळं आहे हे छोटू . हे बघ मला या मराठी भाषेत एक पर्सेंट ही इंटरेस्ट नाही. आय लव्ह इंग्लीश. त्यामुळे 'अभिजात दर्जा' असे कठीण शब्दांचे कोडे मला घालू नकोस. बाय द वे, दर्जा म्हणजे लेव्हल ना? मराठी भाषेला बेसिकली दर्जाच नाहीय.'
छोटू- 'तू तर मला बुचकळ्यातच टाकले आहे. मग 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' असे सुरेश भटांनी का म्हटले आहे?'
भाऊ - 'आता कसं सांगू तुला? अरे, असे म्हणण्याची पद्धतच असते. आता तू ते काय आजिबात - सॉरी अभिजात वगैरे म्हणतो आहेस ना, ते फक्त बोलण्यासाठी आणि क्रेडिट घेण्यासाठी असणार आहे.'
छोटू- 'तू मला गोंधळात का टाकतो आहेस भाऊ? मला मराठी विषय खूप आवडतो. मराठी धडे, कविता किती छान असतात. आता अभिजात दर्जा मिळाल्यावर नेमके काय होईल हेच मला कुणी सांगत नाही. हे म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण सारखे आहे का रे भाऊ?'
भाऊ - 'अरे छोटू , माझा आजपर्यंतचा कॉमन सेन्स सांगतो की तुझ्या या मराठी भाषेत काहीही फरक पडणार नाही. जसे औरंगाबाद चे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव ......... यामुळे काही बदलले का? नाही ना? तसेच हे.'
छोटू-’म्हणजे 'अभिजात' ही पदवी का रे भाऊ?
भाऊ - 'तुझ्याच मराठीत बोलतोय ना मी? इंग्लीश मध्ये समजावून सांगू का?
एखाद्या कागदावर भारतीय शासनाचा शिक्का असला तर ती माहिती ऑथेंटिक होते की नाही? तर आता ही मराठी शासन दरबारी ॲक्सेप्ट झाली आहे. येवढेच तू लक्षात ठेव. बाकी सगळे आहे तसेच राहणार आहे.'
छोटू-’'पण अभिजात म्हणजे ???????’
यातला विनोदाचा आणि अतिशयोक्ती चा भाग सोडला तर सध्या अशीच परिस्थिती आहे. जे मराठी भाषाप्रेमी आहेत , त्यांना आनंद तर झालाय पण तो नक्की कशाचा? हेच त्यांना समजत नाहीय. आणि जे मराठी असूनही तिचा तिरस्कार करतात,त्यांना याबद्दल काहीही सोयर सुतक नाही.
वास्तविक आज प्रश्न हा भाषेचा नसून ती भाषा वापरणाऱ्या जनतेचा आहे. मराठी भाषा 'अभिजात' आहे यावर शिक्कामोर्तब करायला शासनाने अनेक वर्षे घेतली पण भाषाप्रेमींना तिच्या अभिजाततेची प्रचिती येण्यासाठी शासन मान्यतेची गरजच नाही. मराठी भाषेचा हा समृध्द प्रवाह अखंड वाहत राहणे यासाठी मराठी माणसाच्या प्रयत्नांची गरज आहे. असो. पण मराठी च्या हालअपेष्टा निवारण्यासाठी शासनदरबाराने उचललेले - पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे, अभिनंदनीय आहे. उलटपक्षी आता मराठी माणसाची जबाबदारी वाढलेली आहे कारण शासनाच्या नावाने बोटे मोडून आता नामानिराळे राहता येणार नाही.
आमची पिढी मराठी शाळेतली, मराठी माध्यमातली. मराठी धडे, कविता, गाण्यांवर प्रेम करणारी. 'बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' किंवा ' हा शर गर धर सा पवि सा रवि सा स्मरारि सायक सा। पार्थ भुजांतरि पडला वल्मिका माजी नायक सा'॥ अशा तालबद्ध कविता म्हणतांना भान हरपणारी आमची पिढी. पाढ्यांची तर मजा वेगळीच. बेंबी च्या देठापासून ओरडून पाढे म्हणायचे. मग दाहोदरसे, पाचोदरसे या संख्या म्हणतांना हसू आवरत नसे.त्यावेळच्या शाळांमधून मराठीचे जे संस्कार झाले, मराठीची जी गोडी लागली ती आजही तितकीच जिवंत आणि टवटवीत आहे.
पण मराठी बोलणारी , मराठी माध्यमातली मुले ही गावठी, कनिष्ठ आणि बुजरी असतात हा एक सार्वत्रिक समजही त्यावेळी होत. त्यामुळे हा न्यूनगंड सावली सारखा आमची साथसंगत करायचा. इंग्रजी माध्यमातील मुले ही हुषार, चटपटीत स्मार्ट असतात हा नियमच होता . शालेय विद्यार्थी असतांना मानगुटी वर बसलेल्या या हीन भावनेने आमचा पिच्छा कधीच सोडला नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागला.
मी नागपूर विद्यापीठात 'बी. जे' या कोर्स ला प्रवेश घेतला होता. पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात मराठीत लिहिणारे दोघेच जण. त्यामुळे साहाजिकच आमच्याकडे लक्ष देण्याचे प्रयोजनच नव्हते. शिकविणारे सगळे शिक्षक मराठी होते पण ते इंग्रजीतूनच शिकवायचे. मराठी ऐकले की अंगावर पाल पडल्याप्रमाणे प्रतिक्रिया असायची. दर महिन्यात होणारे व्याख्यान मराठीत असले तर संपूर्ण वर्ग रिकामा होई येवढे आंग्रजाळलेले वातावरण होते. समाजात वावरतांना भाषेच्या संदर्भात असे घाव किंवा अपमान झेलावे लागतात - तेही आपल्या महाराष्ट्रात - ही भावना विलक्षण बोचरी आणि दुखावणारी होती. भाषेवरून व्यक्तिची गुणवत्ता जोखण्याचा हा प्रकार खच्चीकरण करणारा होता. इंटर्नल परिक्षेत मास कम्युनिकेशन शिकवणाऱ्या श्री. शरद पाटील सरांनी माझा पेपर वाचला आणि वर्गात तो दाखवून म्हणाले की मराठीत लिहिलेल्या या पेपरमधले विचार आणि स्पष्ट भूमिका मला फार आवडली. त्यादिवशी वर्गातल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी मान वळवून माझ्याकडे पहिल्यांदा बघितले - तेही अविश्वासाने. आपल्या मायबोलीत विचार करून ते स्पष्ट मांडणे ही खरी शहाणीव आहे याची मला त्यावेळी जाणीव झाली. आम्ही मराठीच आहोत पण मराठी माध्यमातून शिकणं??? नो वे. इंग्रजी मधून एक्स्प्रेस होतांना जे वजन येते त्याची सर मराठीला नाही असे वर्ग मित्रांचे ठाम मत होते.
दुर्दैवाने हा समज आजही तसाच आहे. आपले मराठी कलाकार पुरस्कार समारंभात ' आय मीन टू से की मला ही भूमिका जगायला मिळाली' किंवा 'इट वॉज अँन युनिक एक्स्पिरियन्स यू नो? अशी 'वजनदार' सुरुवात करून नंतर मराठीतच बोलतात तेव्हा त्यांच्या लांगूलचालनेची चीड येते. प्रतिष्ठित , प्रस्थापित व्यक्तींनी इंग्रजीतच बोलायला हवे किंवा इंग्रजीत बोलणारा व्यासंगी आणि बुद्धिमान असतो ही डोळ्यांवर आणि मनावर लावलेली झापडे मराठी माणूस कधी काढणार? त्यामुळेच मराठी शाळांचे महत्व कमी होऊन इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे . माझ्या दोन्ही मुलांना मी मराठी माध्यमातच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी मला वेड्यात काढले. सुरुवातीला मुलांनीही मला दोष दिला पण आज मराठी आणि इंग्रजी साहित्य तेवढ्याच आवडीने ते वाचतात .अचूक इंग्रजी लिहितात. बोलतात.इंग्रजी, मराठीतली प्रसिध्द पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत. इंग्रजी माध्यमातील मुलांना इंग्रजीही थातुरमातुर येते व मराठीला ते तुच्छ समजतात ही वस्तुस्थिती आहे.
मराठीची अशी दुर्दशा करण्यात महत्वाचा हात समाज माध्यमांवरिल संदेशांचा. J1 zale ka ? अशी मराठी आणि इंग्रजी भाषेची लक्तरे बघतांना जीव तुटतो. जाहिरातींमधले, बातम्यांमधले मराठी ऐकतांना अंगावर काटा येतो. भक्ती बर्वे मुलाखतीत म्हणाल्या होत्या , की दूरदर्शनवर बातम्या देण्यापूर्वी रोज अचूक शब्दोच्चारांचा कसून सराव होत असे. श आणि ष मधला फरक , 'र्हस्व दीर्घ -हे 'उच्चारांवरून ऐकणा-याला समजले पाहिजे हा कटाक्ष होता. आज तर सगळाच आनंदी - आनंद आहे. ' भावना पोचवणे - (याला सुद्धा भा. पो. म्हणायचं ) - हे महत्वाचे. भाषा नाही - हा आजचा परवलीचा मंत्र आहे.
मराठी माणूसच मराठी भाषेच्या अधोगतीला जबाबदार आहे. मराठी घरात पाळलेल्या कुत्र्याशी इंग्रजीतूनच का बोलले जाते? इंग्रजी माध्यमातील पाल्यांवर मराठी व इंग्रजीचे धेडगुजरी संस्कार करण्यात काय शहाणपण आहे? सही ही इंग्रजीतूनच केली पाहिजे का? घराचा पत्ता इंग्रजीत लिहिल्या शिवाय समजत नाही का? कोणताही अर्ज हा इंग्रजीतच लिहिला पाहिजे का? माध्यमांवर व्यक्त होतांना अधून मधून इंग्रजी शब्द (आपले साधेच हो - यू नो , ॲक्च्युअली , इव्हेन्च्युअली वगैरे वगैरे ) पेरल्या शिवाय कर्तृत्वाची उंची वाढत नाही का? चांगले मराठी शब्द वापरणाऱ्या व्यक्तिची चेष्टा का केली जाते? कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील अमिताभ बच्चनचे अस्खलित आणि समृद्ध हिंदी ऐकतांना त्याची चेष्टा केली जाते का? आशुतोष राणा, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी यांचे शुध्द हिंदी कानाला किती गोड वाटते. मग मराठीचीच मानहानी का? - ते ही मराठी माणसाकडूनच?
याचे एकच उत्तर मला दिसते, ते म्हणजे न्यूनगंड, इतर भाषांचे लांगूलचालन , स्वतंत्र विचार न करता इतर भाषांची नक्कल आणि गुलामी पत्करण्याची वृत्ती - ही वैशिष्ठ्ये मराठी मनाच्या रक्तात भिनली आहेत हे दुर्दैवाने मान्य करावे लागेल. त्याचवेळी दुसरे टोक म्हणजे मराठीचा आत्यंतिक अभिमान, मराठी हेच विश्व, मराठी हीच उत्कृष्ठ ,असे समजणाराही एक समुदाय आहे.हे आपल्या कूपमंडूक वृत्तीवरच खूष असतात.मग यांचे हसे होते आणि निष्कारण भाषेला दोष दिला जातो.
दैनंदिन जगण्यातून सामान्य मराठी माणसाला कसे अनुभव येतात हे मी मांडले आहे. अभिजात दर्जामुळे मराठी साहित्यविश्वात, शासन दरबारात, उद्योगधंद्यात, चित्रपटसृष्टीत , विद्यापीठांमध्ये , जागतिक स्तरावर काय बदल घडणे अपेक्षित आहे याचा उहापोह करण्याची माझी बुद्धी नाही. पण कागदपत्र, कायदे करूनही शेवटी सामान्य जनता प्रत्यक्ष कसे आचरण करते यावरच सारे अवलंबून असते. ज्यादिवशी मराठी माणसाला जाहीरपणे मराठी बोलायची लाज वाटू लागली त्या दिवसापासून मराठी माणसाचा कणा नष्ट झाला. आता ही अभिजातता खेचून आणण्याची व टिकवण्याची जबाबदारी जनतेची आहे. शासनाने कुलूप उघडून आपल्या हातात किल्ली दिली आहे. तिचा कसा उपयोग करायचा हे आपणच ठरवायचे आहे.
"पर भाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी.
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका.
भाषा मरता देशा ही मरतो संस्कृतीचा ही दिवा विझे.
गुलाम भाषिक होऊ नी अपुल्या प्रगतीचे शीर कापू नका."
कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील एक कडवे आहे. मराठी माणसाची नस ओळखून त्यांनी ह्या ओळी रचल्या असाव्यात. ही संपूर्ण कविता राज्याच्या मंत्रालयात दर्शनी भागी लावली होती.ती पूर्ण वाचणा-याचा ही सत्कार व्हावा अशी आज परिस्थिती आहे. पण घटस्थापनेच्या शुभदिवशी अभिजात दर्जाची पहिली माळ लागली आहे. यातून नक्कीच अभिजाततेचे सोने लुटले जाईल अशी आशा करू या.
#अभिजातमराठी
#मायमराठी

भाषेचा दर्जा कागदोपत्री राहू नये हा संदेश तुमच्या लिखाणातून पोटतिडकीने दिल्याचा जाणवतोय.
ReplyDeleteसंवेदनशील लिखाणासाठी अभिनंदन मॅडम !
वा!!! छान लेख. अगदी सत्य परिस्थिती. कुठलीच भाषा मुलं चांगली बोलत नाही, बोलू शकतंच नाही आजकाल!!! मराठी माणसाची पडेल वृत्ती , न्यूनगंड, तटस्थ भूमिका , भाषेबद्दलची अनास्था इ.इ. मुद्दे एकदमच सही. योग्य कारणमीमांसा 👌👌
ReplyDeleteमाधवी सहजे