१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला दर वर्षी मला एकच प्रश्न पडतो की या दिवशी सार्वजनिक सुट्टी का असते ? याचे उत्तरही मला अनेकांनी दिले की हे राष्ट्रीय सण आहेत म्हणून. धार्मिक सणांना सुट्या असतात कारण प्रत्येकाच्या घरी सण साजरे केले जातात. काही धार्मिक विधी पार पाडले जातात, विशिष्ट पूजा असते, नैवेद्य असतो, अन्नदान असते. पण राष्ट्रीय सणाला आपण काय करतो? यावर्षी तर १५ ऑगस्टला मंगळवार आहे. १६ ऑगस्टला पारसी न्यू इयर ची सुटी.१२ ला दुसरा शनिवार तर १३ ला रविवार. म्हणजे सोमवारी १४ ला एक सुटी टाकली की आपोआपच पाच सुट्ट्या पदरात पडणार.हा अगदी मणीकांचन योगच. या योगाची पर्वणी साधून पावसाळी सहलींना या पाच दिवसात नक्की ऊत येणार. सगळी पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून जाणार.अशा क्वचितच लाभलेल्या संधीचा फायदा न घेणारा करंटाच.ही सगळी मज्जा फक्त एका १५ ऑगस्ट च्या सुट्टीमुळे. आणि आमच्यासारखे सहलीला न जाणारे - झेंडावंदन करणार. त्यासाठी आठवडाभरापासून कोणता ड्रेस, कोणती साडी, कोणती थीम, यावर गहन चर्चा घडणार. त्यासाठी वेळप्रसंगी नवीन खरेदी ही होणार. झेंडावंदना नंतर फोटो आणि रिल्स काढण्याचा अत्यावश्यक राष्ट्रीय कार्यक्रम होणार आणि मग आपापल्या घरी जाऊन आराम करणार नाही तर मज्जा करणार.
देशाच्या स्वातंत्र्यदिनी एक राष्ट्रगीत म्हणण्याशिवाय दुसरं काय करतो आम्ही? नाही म्हणायला काही उपक्रम राबवलेही जातात पण त्यात देशप्रेमाशिवाय प्रसिद्धीचाच हव्यास दिसून येतो. नवरात्रात अंगात देवी येते त्याचप्रमाणे अनेकांच्या अंगात या दिवशी देशभक्तीचा संचार होतो .अचानक स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांबद्दल उमाळा दाटून येतो. आणि संध्याकाळपर्यंत हे उसने अवसान जिरले की रीतसर श्रमपरिहाराचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडतो.
दीडशे वर्षाच्या गुलामगिरीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या तन मन धनाची आहुती देऊन लढा दिला त्यांच्यासाठी १५ ऑगस्ट ला आम्ही वाट्टेल तशी 'धमाल' करतो, 'धांगडधिंगा' करतो, 'एन्जॉय' करतो.......हे खटकतं. कशाला हवी ही सुटी? सकाळी झेंडावंदन करून नेहमीसारखं कामाला लागायचं.म्हणजे निदान राष्ट्रीय सणाचा धिंगाणा तरी होणार नाही. पण मग देशप्रेम दाखवण्याची अधिकृत संधीच हातची जाईल की हो. 'देशभक्ती म्हणजे काय रे भाऊ?'असा प्रश्न आज सहज पडू शकतो. समाजाची प्रासंगिक देशभक्ती उफाळून येण्याचे प्रसंग घडतातही अधूनमधून. नुकतेच झालेले चांद्रयानाचे अंतराळातील प्रक्षेपण ,भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पटकावलेली पदके, भारतीय चित्रपटाचे ऑस्कर मध्ये झालेले नामांकन, सर्जिकल स्ट्राईक.. या आणि यासारख्या अनेक प्रसंगात आपली देशभक्ती उफाळून येत असते. अर्थात ती यायलाच हवी पण ही देशभक्ती प्रासंगिक असते आणि केवळ भावनेच्या स्तरावर असते. देशभक्ती ही केवळ भावना नाही तर ती एक विचारधारा आहे आणि त्यानुसार केले जाणारे आचरण आहे. आणि या देशभक्तीच्या भावना, विचार, कृतीचे एकत्रित रसायन ज्यांच्या नसांमधून नेहमी वहात असते.. तो खरा देशभक्त.
आज अनेक मंडळी, अनेक संस्था देशासाठी निस्वार्थी वृत्तिने अथक कार्य करताहेत.त्यांच्यामुळे देशाची मान उंचावली आहे.पण लेखाचा हा विषय नाही. आज आपला देश ७६ वर्षाचा झाला आहे. आमच्या साठीच्या पिढीने एकोणिसाव्या शतकातली वर्षोनुवर्षे न बदलणारी आणि कष्टाळू जीवनशैली जगली आहे. त्याचवेळी विसाव्या शतकातली तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत बदलणारी, वेगवान आणि सुखसोयींनी युक्त अशी जीवनपद्धती आज आम्ही अनुभवत आहोत. वयाच्या या टप्प्यावर किंबहुना कोणत्याही वयात, मी देशासाठी काय केले आहे? किंवा काय करू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला निदान राष्ट्रीय सणाच्या दिवशी तरी विचारायला हवा.
'आम्ही नियमित मतदान करतो. नोकरी व्यवसाय करतो. सामाजिक कायदे पाळतो. नियमित कर भरतो. कुटुंब व्यवस्था अबाधित राखतो. आपल्या धर्म संस्कृतीचं पालन करतो .आणखी देशासाठी सामान्य नागरिक वेगळं काय करणार?' असेच उत्तर बहुतांशी दिले जाण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकाची जबाबदारी आम्ही पाळतो या भ्रमात आपण असतो आणि देशातील अराजकता,अव्यवस्था, हिंसाचारादि बाबींना सरकारला दोषी ठरवतो.डोळे उघडून बघितले तर सामान्य नागरिक ही खूप काही करु शकतो.
ताजे उदाहरण घ्यायचे तर समान नागरी कायदा . २०१६ साली हा कायदा लागू करावा का यासाठी आयोगाने जनमताची मागणी केली होती. त्यावेळी जनतेकडून ७५३७८ सूचना आल्या. त्या आधारे विधी आयोगाने १८५ पानांचा अहवाल सादर करून समान नागरी कायदा लागू करू नये
हा निकाल दिला होता. हे सामान्य नागरिकाच्या शक्तीचे उदाहरण आहे. आताही परत या कायद्यावर विचार मंथन सुरू झाले आहे .आणि आयोगाने १४ जून २०२३ पासून जनतेला आपल्या सूचना देण्याचे आवाहनही केले होते.आपल्या लोकसंख्येचा विचार करता अगदी अत्यल्प प्रमाणात जनतेने ही मत /सूचना देण्याची जबाबदारी पार पाडली आहे.
'गिव्ह इट अप' ही मोदी सरकारने आवाहन केलेली योजना. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर विकत घेतल्यावर ग्राहकाच्या खात्यात सरकारकडून सबसिडी जमा होत असते. आर्थिकदृष्ट्या संपन्न गटाने ही सबसिडी न स्वीकारता सरकारला परत केली तर समाजातील गरीब वर्गाला त्याचा फायदा होतो. ही संकल्पना 'गिव्ह इट अप' कॅम्पेनची आहे. २३ एप्रिल २०२३ पर्यंत सबसिडी नाकारणाऱ्यांची संख्या जवळजवळ १.१३ करोड झाली आहे. संपन्न गटाचा विचार करता, वरिल संख्या नगण्य आहे.
भारतीय संविधानात भारतीयांचे मूलभूत हक्क आणि अधिकारांची नोंद आहे हे आपल्याला माहित आहेच पण ३ जानेवारी १९७७ पासून 'कलम ५१-क' द्वारे 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये' विशद करणारा भाग संविधानात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे ३ जानेवारी हा नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळण्यात येतो. किती नागरिकांना याबद्दल माहिती आहे?
उदाहरणादाखल, 'ड'- हे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे - हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आणि नुकतीच मणिपुर मध्ये घटलेली घडलेली घटना काय सुचवते?
'ज' - हे कर्तव्य म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन,मानवतावाद ,शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे - हे आहे. या संदर्भात, मध्य प्रदेशातील सिहोर या गावी रुद्राक्ष मिळवण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली व काही भाविक मृत्युमुखी पडले. ही घटना काय दर्शविते?
'जनहित याचिका' दाखल करण्याचे धाडस किती नागरिकांमध्ये असते? राजस्थान मधील एका खेड्यात भंवरीदेवी या महिलेने एका वर्षाच्या मुलीच्या विवाहाला विरोध केला त्यामुळे स्थानिक लोकांकडून धमक्या व तिच्या घरावर बहिष्कार टाकण्यात आला. २२ सप्टेंबर १९९२ ला पाच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. भंवरीदेवीने न्यायालयात धाव घेऊनही ती न्यायापासून वंचितच राहिली. यासंदर्भात भंवरीदेवीच्या वतीने नयना कपूर या वकील महिलेने सुप्रीम कोर्टात राजस्थान सरकार विरुद्ध जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे भंवरीदेवीला न्याय तर मिळालाच पण या निकालामुळे स्त्रियांच्या हक्कांविषयी उच्च न्यायालयीन स्तरावर देखील सुधारणा झाली . स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल या जनहित याचिकेचा निकाल हा एक मैलाचा दगड ठरला आहे.
आज आपण सामान्य नागरिक हे, 'कळते पण वळत नाही' या परिस्थितीत आहोत. अवतीभवती ची परिस्थिती आणि सत्तेचे गलिच्छ राजकारण यामुळे अस्वस्थता सगळ्यांमध्येच आहे .पण संवेदनशील व बुद्धिमान वर्गाने आपल्या मनाच्या खिडक्या बंद करुन स्वतः च्या कोषात जगणे सुरु केले आहे हे फार गंभीर आहे .आणि या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी हा सामान्य नागरिक दृकश्राव्य माध्यमाच्या आहारी गेला आहे. अन्नावाचून तडफडणारे लोक, रस्त्यावर घडलेला अपघात, डोळ्यासमोर होणारी महिलेची विटंबना..... याकडे दुर्लक्ष करून तो आभासी आनंदात रमला आहे, कायम पार्टी मूडमध्ये राहू इच्छित आहे हे तर अत्यंत भयावह आहे.वाढत जाणारा हा कोडगेपणा पुढच्या पिढीवर काय परिणाम करेल याची कल्पनाही करवत नाही.
प्रसिद्ध पोर्तुगाल लेखक 'सारामागो' यांच्या प्रचंड गाजलेल्या ' द इयर ऑफ द डेथ ऑफ रिकार्डो रिस' या पुस्तकात सध्याच्या सामान्य माणसाच्या मनोवृत्तीवर अचूक भाष्य केले आहे. ते लिहितात,
'वी स्लीप व्हेन वी शुड बी ऑन अवर गार्ड'
'वी डिपार्ट व्हेन वी शुड बी अरायव्हिंग'
'वी क्लोज द विंडो व्हेन वी शुड लीव्ह इट ओपन'
आजच्या जगातल्या सामान्य समाजाचे हे यथार्थ वर्णन आहे .आज तांत्रिक प्रगती व आर्थिक सुबत्तेमुळे माणूस सुखी झाला आहे पण नागरिक म्हणून तो आत्मकेंद्रित आणि निष्क्रिय झाला आहे. चंगळवादी वृत्ती आणि निबर मनाचा जबरदस्त पगडा असल्यामुळे मानवी मेंदूच्या सारासार विवेकाची क्षमता कमी होत चालली आहे.
पारतंत्र्यात असताना अनेक महान नेतृत्वांनी जनतेमध्ये एक विचारधारा रुजवली,जागरुक केले. पण आज या स्वतंत्र भारतातल्या बेजबाबदार नागरिकांना योग्य मार्ग दाखविणारे एकही नेतृत्व नाही ही खरी शोकांतिका आहे. आज लोकमान्य टिळक असते तर,'जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?'असे त्यांनी खडसावून विचारले असते.आणि त्यांच्या या शब्दांनी नक्कीच जादूची कांडी फिरली असती.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
डॉ साधना आशुतोष कुलकर्णी,
अकोला, ९४२२९३९५१०
#स्वातंत्र्यदिन
#भारतीयनागरिक
#गिव्हइटअप


डोळ्यात अंजन घालणारा लेख
ReplyDeleteअप्रतिम लेख 👍
ReplyDeleteखरंच पुन्हा एकदा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteप्रत्येकच नागरिकाने अंतर्मुख होऊन चिंतन करण्याची गरज.....
ReplyDeleteखरोखरच देशाला ह्या कुंभकर्णी झोपेतून जागं करणं हे फारच कठीण आहे. जनतेला enjoyment हा आपला अधिकार वाटतो पण कर्तव्याची जाणीव बहुतांशी शून्य आहे. फार सुंदर आणि समर्पक लेख!
ReplyDeleteखूपच अभ्यासपूर्ण विवेचन. अभिनंदन. ह्या विषयावर पूर्वी देखील वाचनात आले आहे परंतु संविधानातील तरतुदी, त्या बाबतीत जनतेचे अधिकार व त्याचा सामान्य जनतेला पडलेला विसर ह्याचे विस्तृत विवेचन ह्या लेखात आढळले व एक नवीनच पैलू समोर आला. भारतीय जनता अधिकाधिक असंवेदनशील बनत चालली आहे, त्याचे एक कारण आपली राजकीय व्यवस्था आहे असे मला वाटते. ह्यात नोकरशाही देखील आली. ह्या सर्वांचा ह्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोण बघितला कि जनता देखील कोडगी, असंवेदनशील बनते. काय करणार! ते आपलंच नेतृत्व! रोज मरे त्याला कोण रडे ह्या उक्तीनुसार प्रत्येकजण स्वतःतच मश्गुल आहे. हे असेच चालायचे. राज्यकर्ते, नोकरशहा जोपर्यंत संवेदनाहीन आहेत, तोपर्यंत हे असेच चालायचे. असो, एक विचारांना चालना देणारा लेख लिहिल्याबद्दल एका संवेदशील नागरिकाचे अभिनंदन. मैं तुम्हारे अंदर एक ऐसा इन्सान देख रहा हूँ जिसका जमीर मरा नहीं हैं.
ReplyDelete