अगदीच रविवारी सकाळी निघून रात्री वापस येणं..ही कल्पना बऱ्याच जणींच्या पचनी पडत नव्हती.मग खूप चर्चा, वादविवाद करुन शेवटी शनिवारी पेंच ला जायचा कार्यक्रम आखला.सहलीची सूत्रं ज्योती,माया कराळे आणि मेघा ने हातात घेतली.(नेहमीप्रमाणेच). हो.या तिघी जणी आमच्या गृप मधल्या 'लीडर बायका' आहेत. मी, सुनिता,माया ठाकरे आणि मनीषा शांत, समंजस स्वभावाच्या.(गरीब बिचाऱ्या!) बाकी प्रिया,वर्षा बडगुजर,वर्षा राव आणि सीमा मात्र अगदी शाळकरी पोरी.....नाचणाऱ्या, उंडारणाऱ्या ,मस्ती करणाऱ्या, अति उत्साही.त्यात सीमा म्हणजे पुलं चा 'नारायणच'.
तर अशा आम्ही अकरा जणी दोन इनोव्हा करुन अकरा तारखेला सकाळी पाच ला अकोला सोडणार,वाटेत रामटेक च्या रामाचं दर्शन घेऊन पेंचच्या मृगनयनी रिसॉर्टला दु. एकच्या सुमारास पोचणार.तिथे जेवणार आणि दुपारी साडेतीनला जंगल सफारी करणार, आणि रविवारी नागपूरला शिबीराला हजर राहणार......इतका साधा, सोपा, निरुपद्रवी कार्यक्रम ठरवला होता.
पण पेंच सहलीने आम्हाला पेचात टाकायचा चंगच बांधला होता.पहाटे चार वाजता उठून,घरातल्या यच्चयावत मंडळींच्या रीतसर साखरझोपा उडवून आम्ही अकरा जणी ठरलेल्या ठिकाणी चक्क वेळेवर डेरेदाखल झालो. पण हाय रे दैवा! गाड्यांचा पत्ताच नव्हता.एक गाडी गोरक्षण रोड वरुन ज्योती,मेघा माया आणि वर्षाला घेऊन येणार होती आणि दुसरी रामदास पेठेत सुनिता कडे येणार होती. पण दोन्ही गाड्या 'प्रथम ग्रासे मक्षिकापातः' या नियमानुसार वेळेवर उगवल्याच नाहीत.कसाबसा अर्धा तास संयम टिकवण्याचं शिवधनुष्य आम्ही पेललं खरं पण नाईलाजानं रामप्रहरी ड्रायव्हर आणि उशीर यावर तावातावाने चर्चासत्र घडवून घरच्यांबरोबर शेजाऱ्यांच्या झोपा उडवण्याचं सत्कार्यही हातून घडलंच.
गाड्या ज्योतीने ठरवलेल्या होत्या त्यामुळे भल्या सकाळी तिच्या पत्रिकेत डोकं फिरण्याचा योग अटळ होताच.
'हो निघालो ', आणि 'पोचतोच'..... फक्त हीच दोन उत्तरं ऐकून प्रत्येकीची व्यक्तिगत आणि सामूहिक चिडचिड हास्याचे फवारे उडवत पद्धतशीर पार पडली. शेवटी दोन तास उशिरा आम्ही गाडीत स्थानापन्न झालो.
पण गाडीत बसताक्षणी सरड्यालाही लाजवणाऱ्या चपळाईने आम्ही रंग बदलले आणि ट्रिप चा माहौल,गाणी,गप्पा मौजमस्ती, खिदळणं,पांचट विनोद.. सगळं शिस्तीत सुरू झालं.
तिवसा गावाच्या जवळपास आमच्या गाडीत डिझेलचा वास येऊ लागला.आमच्या ड्रायव्हर शुभम ला हटकलं तर त्याला अजिबात वास येत नव्हता.(कोरोना?? छे छे.सर्दी असेल) पण आम्ही त्याचा पिच्छा सोडला नाही.शेवटी त्यानं दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला - प्रविणला आमची गाडी चालवायला दिली.शुभम जरा अबोल आणि साधा होता. पण प्रविण मात्र नंबरी होता.
'रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकच्या डिझेल चा हा वास आहे ' हे अत्यंत तर्कशुद्ध उत्तर देऊन त्यानं वेळ मारुन नेली. पण तिवसा ला नाश्ता करायला थांबलो तेव्हा गाडीच्या मागच्या बाजूने आॉईल गळताना दिसलं आणि गाडीतल्या वासाचा शोध लागला. आॉईल बरोबर आमचंही अवसान गळलं. ड्रायव्हरने गाडी वरून, खालून, उघडून तपासली.आॉईल लीकेज आहे,मायनर फॉल्ट आहे असं आम्हा अज्ञानी पामरांना समजावलं आणि आम्ही नाश्ता करून पुढे निघालो.
अवघ्या ५/६ किमी नंतर मागून येणाऱ्या गाड्या आम्हाला इशारा करताहेत हे लक्षात आलं.गाडी थांबवून बघितलं तर मागच्या बाजूने धूर येत होता.सगळ्यांच्याच छातीचे ठोके चुकले.आता पुढे काय??? या गाडीत आता क्षणभरही बसायचं नाही यावर एकमतानं शिक्कामोर्तब झालं.
हा पेच सोडवून पेंच ला कसं पोचता येईल याचे असंख्य पर्याय आमच्या अकरा डोक्यांमधून स्फोटासारखे बाहेर पडत होते.... डोक्यातूनही धूर येणं बाकी होतं.
आता ज्योतीने आपल्या भात्यातून तिचं खास 'सौजन्यास्त्र' काढलं आणि गाडीच्या मालकाला फोन करुन तिच्या पद्धतीने यथेच्छ 'सौजन्यास्त्राचा' वापर केला आणि ताबडतोब दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्यास सांगितली. आता चांगल्या गाडीने १४ किमी पुढे असलेल्या कारंजा घाडगे टोल वर ७ जणींना ड्रॉप करून प्रविण वापस आम्हा चौघींना घ्यायला येईल.त्याचवेळी शुभम मेकॅनिक शोधून आमची गाडी दुरुस्त करेल.दरम्यान गाडीचे मालक पर्यायी गाडी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतील. चर्चा करुन हा निर्णय आम्ही घेतला.
चांगल्या गाडीने सात जणी घेऊन प्रविण ने आगेकूच केले. मी,माया, ज्योती आणि मेघा आमचं गरम डोकं थंड करायला एका टपरीवर टेकलो.आमची दर्दभरी कहाणी मालकाला ऐकवली. डोकं थंड करायला तिथे चहा आणि प्राप्त परिस्थितीत हसणं हाच पर्याय होता. वेळ पुढे सरकत होता आणि घडत काहीच नव्हतं. एव्हाना प्रविण आम्हाला घेण्यासाठी यायला हवा होता.कारंजाला आमच्या सात सख्यांना सोडून तो मेकॅनिक आणि पर्यायी गाडीच्या शोधमोहिमेसाठी तो चक्क अंतर्धान पावला.
इकडे आमचा शुभम, बाजी प्रभू देशपांडेंच्या थाटात, 'हळूहळू नागपूरला पोचू.काहीही होणार नाही'....
असं म्हणत आमच्यातले विझलेले स्फुल्लिंग चेतवत होता.भरीस भर म्हणजे, आता गिऱ्हाईकी सुरू झाली म्हणून टपरीवाल्याने आम्हाला ,
'आता इथून उठा' असा आदेश दिला.(काय वेळ आली बघा.)
मग काय, परिवहन महामंडळाच्या 'यष्टीचा' स्टॉप आला मदतीला.फॉर अ चेंज, तिथेही बसून घेतलं.आम्ही सतत प्रविण ला फोन लावत होतो त्यामुळे की काय,तो फोन उचलेनासा झाला. तिकडे कारंजा टोल जवळ सातही जणी गाडीबाहेर विस्थापित अवस्थेत बसल्या होत्या आणि आली वेळ गाणी गाऊन साजरी करित होत्या .प्रविण अजूनही प्रगटला नव्हता.
मधेच मायाच्या डोक्यात काय आलं देव जाणे.आमच्या गळक्या गाडीतून ती तिचा कराओके बॉक्स घेऊन आली.आता ही गाणं म्हणते की काय, या भीतीनं माझ्या पोटात गोळा आला. गोष्टीतल्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो,तसा मायाचा जीव कराओके मधे होता याचा उलगडा मला अर्थातच नंतर झाला.
आता मात्र सहनशक्तीचा अंत होऊ लागला. आम्ही मिळेल त्या वाहनाने सरळ कारंजा टोल पर्यंत जायचं ठरवलं.शुभम मागून 'हळूहळू' येणार होता.
इतक्यात समोर एक निळी कार थांबली.गाडीतून एक तरुण उतरला आणि टपरीवर चहा घ्यायला गेला.गाडीत दुसरं कुणीच नव्हतं.मी आणि माया सगळे शिष्टाचार गुंडाळून त्या तरुणा जवळ धावतच गेलो आणि आमचं रडगाणं ऐकवलं.सुरुवातीला त्याचा चेहरा त्रासिक होता पण स्त्री दाक्षिण्य म्हणून कारंजा पर्यंत सोडायला त्याने होकार दिला.त्याने निवांत चहा नाश्ता केला आणि तो गाडीजवळ आला.
आम्ही चौघी एका पायावर उभ्या होतोच.
"तुम्ही चौघी आहात?"
त्याचा बदललेला आवाज आणि चेहेरा याकडे सपशेल दुर्लक्ष करून कोडगेपणाने आम्ही गाडीत घुसलो.गाडीत बसल्यावर अवघड ही वाटत होतं आणि हसायला ही येत होतं. कारंजा टोल १४ कि.मी.वर होता.आम्ही जवळ जवळ १० कि.मी.समोर गेलो आणि गाडीच्या मालकाला फोन आला.फोनवर बोलता बोलता त्याने गाडी थांबवली.
"मॅडम तुमचं काही सामान बस
स्टॅंडवर राहिलंय का? तो टपरीवाला माझा मित्र आहे, तो विचारतोय ."
"कराओके "- आम्ही एकदम ओरडलो आणि कपाळावर हात मारला.आता हसावं की रडावं हे ही कळेना.
"जायचंय वापस?"
गाडी मालक विचारु लागला. बहुतेक त्याला आमची फारच दया आली होती.पण एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सौजन्याचा इतकाही फायदा घेणं आम्हाला योग्य वाटलं नाही. टपरी मालकाला फोन करून कराओके व्यवस्थित ठेवायला सांगून आम्ही कारंजा टोल वर उतरलो.मागून शुभम आमची गाडी घेऊन 'हळूहळू' येत होता. आधी पोचलेल्या सात जणींचे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सुरु होते.आता त्यांना 'कराओके स्टोरी 'सांगितल्यावर तर त्या रस्त्यावरच बसकण मारतात की काय अशी शंका आली.या मायाचं आता काय करायचं....(हे अर्थातच मनात.... सगळ्यांच्याच)
दरम्यान प्रविण चा पत्ताच नव्हता. आता शुभम ही आमची गळकी गाडी घेऊन पोचला.मायाने स्वतः मधे असलं-नसलेलं सगळं आर्जव शब्दात ओतलं आणि
'चांगली गाडी घेऊन कराओके आणायला वापस जावं लागतं दादा तुला'........
असं सांगता क्षणी शुभम स्तब्ध झाला.याची वाचा गेली की काय?...अशी उगाच शंका डोकावली.पण नाही.भावनातिरेकाने (भावना नेमक्या कोणत्या हे कळलं नाही) तो निःशब्द झाला होता.शांतपणे तो गाडीत बसला आणि गाडी मागे वळवली.
तेवढ्यात प्रविण प्रगटला आणि गाडीची व्यवस्था झाली या गुड न्यूजची घोषणा केली.
चला,चला ...एकदम सगळ्यांमध्ये उत्साह संचारला...पण आता शुभम ची वाट होती.कराओके आणण्यासाठी इतका वेळ? आज काहीच तर्कसंगत का घडत नाहीय?
झिंगाट गाण्याने सुरू झालेली ट्रीप आता ' नको देवराया अंत आता पाहू '....या वळणावर येऊन ठेपली होती.घरी फोन करून आपबिती कळवण्याची जोखीम घेणं परवडणारं नव्हतं ... इतकं शहाणपण प्रत्येकीत उपजतच होतं हे सांगणे नलगे.
आला.शुभम कराओके घेऊन आला आणि सगळ्यांनी फिनिक्स पक्षाला लाजवेल अशी उभारी घेतली.आता नवीन गाडीत सामान टाकून गजानन महाराजांचा जयघोष करुन आम्ही मार्गस्थ झालो.
सकाळचा नाश्ता जिरला आहे याची प्रकर्षानं जाणीव झाली आणि वेफर्स,चिवडा , बिस्कीटं बाहेर निघू लागली.खरं तर या वेळी मृगनयनी रिसॉर्टला आम्ही जेवणं अपेक्षित होतं.त्यामुळे फारसं पोटपूजेचं साहित्य असणं अशक्यच होतं.तरीसुद्धा बॅगांमधून तळापर्यंत संशोधन करुन खरमुरे,आवळा कॅन्डी, गूळपट्टी सोप,ओवा, सुपारी,मुखवास,अनारदाना चॉकलेट्स सगळं खाऊन झालं.आता खाण्यासाठी फक्त औषधं शिल्लक होती.
एक वाजला होता. रामटेकच्या श्रीरामाने आमचा दर्शनाचा बेत यथासांग हाणून पाडला होता.आता लढाई पेंचची.आमच्या नवीन गाडीचा सारथी खूप समंजस होता.त्याने तीन वाजेपर्यंत पेंचला सोडण्याचं आश्वासन दिलं.
आता माया आणि मेघाने परिस्थिती हातात घेतली. मृगनयनी रिसॉर्ट मालकाला मायाचे तर अमोल या कोआॉर्डिनेटरला मेघाचे फोन सुरू झाले.साडेतीन ची सफारी कॅन्सल करुन रात्रीची, पहाटेची सफारी करण्याचा दोन्ही गाड्यांमधून फतवा निघाला.पण हाय रे दैवा! पेंच चे पेच संपायलाच तयार नव्हते.सफारी कॅन्सल केली तर पैसे वापस मिळणार नाहीत असा पेच समोर उभा ठाकला.मेघाने अमोलला आमची करुण कहाणी ऐकवली आणि अशा परिस्थितीत अडकलेल्या पीडितांना माणुसकीने मदत करणं कसं गरजेचं आहे हे ज्ञानामृत पाजायलाही ती विसरली नाही.त्या ज्ञानामृता पेक्षा तिच्या चढलेल्या आवाजासमोर आणि अती बोलण्यासमोर अमोलने शरणागती पत्करली.(हा माझा आपला अंदाज). रिसॉर्ट वरुन दोन जिप्सीत आम्ही बसणार होतो. आता वेळ नसल्याने खुर्सापार गेट जवळ दोन जिप्सी आमची वाट बघणार असं ठरलं.तिथे सुबोध नामक व्यक्तीला संपर्क करा असं सांगून अमोल ने तात्पुरती स्वतः ची सुटका करून घेतली.
आता लढाई ची सूत्रे मायाने हातात घेतली. रिसॉर्ट मालकाचा आणि तिचा परिचय होता. 'आमचं दुपारचं जेवण तुमच्याकडून होतं.आता आम्हाला भूक लागली आहे.आमची खाण्यापिण्याची व्यवस्था तुम्ही केलीच पाहिजे ". आता मायाने त्यांना पेचात टाकलं. आता रिसॉर्ट एका दिशेला,खुर्सापार गेट वेगळ्या दिशेला,वेळेची ओढाताण चाललेली आणि पोटात कोकलणारे कावळे.सगळीच अटीतटीची परिस्थिती.
पण माया मागे हटायला तयार नव्हती.(तशी ती कधीच हटत नाही)."काहीही करा पण आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था खुर्सापार गेट जवळ झालीच पाहिजे".मायाने अल्टिमेटम दिला.
.
आता तीन वाजले होते.पेंच आवाक्यात आलं होतं.आमच्या सारथ्याने गुगल मॅप लावला होता. त्यानुसार खुर्सापार साठी डावीकडे वळायचं होतं.पण कुणीतरी कुणालातरी फोनवर पत्ता विचारला.(काही गरज होती? पण बायकाच त्या.आगाऊनेस कणाकणात भरलेला- - - मी नाही हो त्यातली) डावीकडे न वळता खवासा पर्यंत सरळ जायचं आणि टोल आला की डावीकडे वळायचं.....असं त्या 'फोनवरच्या 'तज्ञाने' सांगितलं. आता 'पेचात पडणं' हेच अटळ प्रारब्ध असल्यानं आम्ही खवासाच्या दिशेने भरधाव निघालो. मागची गाडी शहाण्या सारखी आधीच डावीकडे वळली. टोल आल्यावर आम्ही डावीकडे वळून थांबलो.तिथे कसल्याच खाणाखुणा नव्हत्या. परत त्याच तज्ञाला फोन केला तेव्हा त्याने दुसऱ्याच गेट चा पत्ता सांगितल्याचं लक्षात आलं. 'खुर्सापार गेट साठी तुम्ही खूप समोर आलात.तुम्हाला परत वापस जावं लागेल'..असा मौल्यवान सल्ला त्याने दिला. आता 'खाऊ की गिळू ' असं तीव्रतेने वाटलं पण शेवटी मूग गिळून गप्प बसलो आणि गाडीने यू टर्न घेतला. दुसरी गाडी व्यवस्थित पोचली होती आणि आमच्या नावानं ठणाणा सुरू होता.यू टर्न घेतल्यामुळे आता आम्हाला खुर्सापार साठी उजवीकडे वळावं लागणार होतं. रोड डिव्हायडर लांबवर सलग असल्याने उजवीकडे वळताच येत नव्हतं. आमचं खुर्सापारचं वळण आम्हाला दिसत होतं पण वळता येत नव्हतं. खूप समोर जाऊन यू टर्न घेतला आणि डावीकडे एकदाचे वळलो.
थोड्या अंतरावरच खुर्सापार गेट होतं.तिथे दोन जिप्सी आमची वाट बघत होत्या.बरोबर साडेतीन वाजले होते. आमच्या गाडीतलं सामान प्रविणच्या गाडीत ठेवून तात्पुरती सोय केलेली गाडी नागपूरला रवाना झाली.शुभम नागपूरलाच थांबून गाडी दुरुस्त करणार होता.
सफारी साठी खास आटापिटा करुन ठरवलेल्या ड्रेसकोडचं नशीबच फुटकं.आहे त्या अवतारातच जिप्सीत बसलो कारण जिप्सी ड्रायव्हर घाई करत होते.आधार कार्ड तपासत असताना अलकाच्या नावावर सीमा ला दाखवायचा जुगाडही आम्ही घाईघाईत यशस्वी केला. आता त्या सुबोधची उलटतपासणी सुरू झाली.आमच्या नाश्ता जेवणाबद्दल त्याला काहीही कल्पना नव्हती.पुन्हा फोनाफोनी,चीडचीड ,वैताग आणि शेवटी खिदळणं..... यांचं आवर्तन झालं.आता ठरवलं, खाण्याचा नाद सोडायचा आणि सफारीला सुरूवात करायची.
आता जिप्सी जंगलात शिरु लागली
लागली. जंगलातील शांतता, मधूनच येणारे पक्षांचे आवाज, पळत जाणारा हरिणांचा कळप... यांचं मनावर हळूहळू गारुड होऊ लागलं.
सकाळपासून पाठीमागे लागलेला वैताग अलगद बाजूला सरु लागला. जंगलाचा रंग,गंध, शांतता शरीरात अलवारपणे झिरपू लागली आणि भूकेचाही विसर पडला. तेवढ्यात फोन आला.खुर्सापार गेटजवळ रिसॉर्ट कडून आमचं जेवण आलं होतं. ( जय हो मायादेवी) आता गेट पर्यंत वापस जाणं आणि जिप्सी तून जेवण घेऊन येणं भाग होतं. मागे असणारी जिप्सी वापस जाऊन जेवण घेऊन आली.
जंगल दाट होत चाललं होतं आणि एका पिसारा फुलवलेल्या मोरानं दर्शन दिलं.माकडं तर जशी आमच्या सोबतीलाच होती.मोठ्या शिंगाचं सांबर ऐटीत फिरताना दिसलं. आता सगळ्याच जणी निःशब्द आणि अंतर्मुख झाल्या होत्या. या जंगलाची मूक भाषा समजून घेताआली असती तर???? जंगल सफारी म्हणजे काय फक्त वाघ बघणं असतं? जंगलातील प्रत्येक जीवाकडे एक जबाबदारी असते...अगदी मुंगीची सुद्धा.आणि प्रत्येक जीव न चुकता आपलं नियत कार्य पार पाडत असतो.जंगलातली शिस्त,नियम आणि त्यातलं सातत्य हे अचंबित करणारं आहे - जे माणसाला आपल्या क्षुद्रतेची जाणिव करुन देतं. जंगलाच्या मौनाची आणि आवाजाची भाषा समजून घेणं म्हणजे स्वतःला आतून विकसित करणं ..नाही का?
जंगलातील कॅम्प चं ठिकाण आलं.आम्ही सगळे उतरलो. जिप्सीत ठेवलेल्या अन्नाच्या गंधानं जंगलात रमलेलं मन क्षणात पोटात शिरलं. पद्धतशीर पॅक केलेल्या रुचकर जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेऊन थोडावेळ फोटो सेशन केलं, पाळण्यावर झोके घेतले आणि परत जिप्सीत बसलो.आता सूर्य कलल्यामुळे संधीप्रकाशातलं जंगल गूढ वाटायला लागलं.
तेवढ्यात आमच्या गाईडला पक्षांचे सिग्नल कॉल्स ऐकू आले.आम्हाला सूचना देऊन त्यानं कमालीच्या वेगाने जिप्सी दामटली.पुढे बघतो तर काय,पाच सहा जिप्सीज उभ्या होत्या.त्यातील सगळे स्तब्ध आणि निःशब्द पणे उभे होते.समोरच ' तो' होता.होय.चित्ता. निवांत बसला होता. कितीतरी वेळ अनिमिष नेत्रांनी हे दृश्य आम्ही बघत होतो.तितक्यात एक चित्त्याचं लहानसं पिल्लू पण दिसलं.हा दुर्मिळ अनुभव डोळ्यात साठवत असताना गाईडनं भानावर आणलं आणि वापस निघायची सूचना दिली.
जंगल आणि प्राणी यामुळेच निसर्गाचा समतोल साधला जातो.असं असताना आपण कधीतरी येऊन फक्त ' एन्जॉय ' करायचं या विचारानं आपल्या कोतेपणाची जाणिव आणखी गडद झाली.
आता आम्ही जंगलाबाहेर पडलो.दोन्ही जिप्सी आम्हाला रिसॉर्टवर सोडणार हे ठरलं होतं - - -अर्थातच बुकींग करते वेळी.. अंधार पडायला लागला होता.खुर्सापार गेट जवळ ची वर्दळही रोडावली होती.आता आमच्या जिप्सी ड्रायव्हरने आम्हाला 'पेचात ' टाकलं. म्हणाला,'
मैं आपको छोड दूंगा.एक जिप्सी का एक हजार चार्ज.'- कारण उशीर झालाय.
म्हणजे आता परत दोन हजार द्यायचे?
परत फोनाफोनी आणि संतापाचं आवर्तन. त्या अवधीत दोन्ही जिप्सी निघून गेल्या.आता तिथे अंधार, आम्ही अकरा जणी आणि एखाद दुसरा फॉरेस्टचा कर्मचारी.
शेवटी आमची गाडी
होतीच .ती घेऊन प्रविण अर्ध्या जणींना सोडेल आणि परत दुसऱ्या ट्रिप ने उरलेल्यांना घेऊन येईल असा तोडगा काढला.
आम्ही पाच जणी गाडीत कशा बसलो असू??? ...ज्या गाडीत अकरा जणींचं सामान खच्चून भरलं होतं!!! या परिस्थितीत ही हास्याचे फवारे सतत उडत होते.
रिसॉर्टचा रस्ता स्थानिक लोकांना विचारत निघालो कारण नेटवर्क व्यवस्थित नव्हतं. तो रस्ता नसून पायवाट होती हे लगेच लक्षात आलं कारण अंधार,खड्डे,वळणं,चढाव... याशिवाय काहीच नव्हतं. निर्जन जागा असल्याने कुणाला विचारताही येत नव्हतं. आता मात्र प्रविणचीही सहनशक्ती संपली.तो चिडून म्हणाला,
' बाकीच्यांना मी आणायला जाणार नाही.तुम्ही तुमची सोय करा.मी परत या रस्त्याने येणार नाही.'
पेंच आणि पेच यांची जोडी काही तुटायला तयार नव्हती. कोणत्या मुहूर्तावर ही ट्रिप ठरवली, असं वाटायला लागलं. तिकडे आमच्या सहा मैत्रिणी अंधारात तिष्ठत उभ्या होत्या, त्यांची काळजी वाटत होती. मग ज्योती आणि मायाने भात्यातील अस्त्रं बाहेर काढली. ज्योतीने तिच्या खास 'सौजन्यपूर्ण भाषेत' प्रविण ला असं काही समजावलं की त्याची बोलतीच बंद झाली.
मायाच्या आर्जवास्त्राचा मारा फोनमधून रिसॉर्ट मालकावर अव्याहत सुरु होता.शेवटी आमच्या दुसऱ्या बॅचचा खुर्सापार ते रिसॉर्ट पर्यंत चा जिप्सीचा खर्च करण्याचं त्याने कबूल केलं.झालं.
मग लगेच तिकडे मेघाला कळवलं.गेट जवळ आता एकही जिप्सी नव्हती.परत पेच. तेवढ्यात रस्त्याने जाताना एक जिप्सी उभी असलेली दिसली.गाडी थांबवून प्रविणला चौकशी करायला पाठवलं .जिप्सीवाला आमच्या मैत्रिणींना आठशे रुपयांत आणायला तयार झाला. फोन नंबर देणे,घेणे,कळवणे पार पडल्यावर आम्ही रिसॉर्ट च्या दिशेने निघालो.खरंतर सकाळपासून घडणाऱ्या पेचप्रसंगांची साखळी पहाता अनोळखी जिप्सी ला मैत्रिणींना आणायला पाठवणं हे सुरक्षित वाटत नव्हतं.पण हा धोका पत्करण्याशिवाय पर्यायच नव्हता.
शेवटी आमची पहिली बॅच मृगनयनी रिसॉर्टला पोचली.सकाळपासून आमची चित्तरकथा ऐकल्यामुळे आणि मेघा- मायाच्या धाकामुळे मालकांनी आमचं अगत्याने स्वागत केलं. रिसॉर्ट आणि रुम्स अतिशय मोकळ्या आणि सुंदर असल्याने सगळा थकवा पळून गेला. तेवढ्यात आमची दुसरी बॅच आल्यामुळे जीव भांड्यात पडला.सगळ्यांनी आपापल्या खोल्या ताब्यात घेतल्या आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
आता फ्रेश होणं, कॅम्प फायर साठी आणलेले 'खास आऊटफीट' घालणं, कराओके वर उडती गाणी लावून शेकोटी भोवती नाच करणं.....अर्थात नाचण्यात प्रिया,वर्षा,सीमा, आणि वर्षा या आघाडीवर. रुचकर जेवण......हे सगळं यथासांग, बिना 'पेच ' पार पडलं.शुभम पण गाडी दुरुस्त करुन रिसॉर्ट वर पोचला.
रात्री जागून 'कॉफी विथ गप्पा' तर अविस्मरणीय होत्या.
रविवारी सकाळी जंगल सफारी चा ड्रेस कोड (वाया कशाला घालवायचा?) घालून आमच्यातल्या काही अति उत्साही बायका मॉर्निंग वॉक करुन आल्या. मग तयार होऊन, नाश्ता करून, फोटोसेशन चा राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडला आणि परतीच्या प्रवासाला निघालो.
जातांना रामटेक चा गड चढून गेलो पण रामराया आमच्यावर का रुसला ते कळलंच नाही.देवळाला पडदा लावल्यामुळे दर्शन झालंच नाही.
आता पुढचा पडाव- नागपूर - जामठा.ब्रम्हकुमारीच्या मेडिकल विंगची डॉक्टरांसाठी 'माईंड बॉडी मेडिसीन कॉन्फरन्स'. एकदम ट्रान्स्फर सीन.शांतता! गांभीर्य!! स्व चा शोध!!!
व्याख्यानं ऐकताना मी विचार करत होते की माझ्या या मैत्रिणींना खरंच गरज आहे या व्याख्यानांची? कालच्या प्रत्येक पेचप्रसंगाला तोंड देताना कधी धाडसी ,कधी निर्णयक्षम,कधी भांडखोर,कधी दादागिरी,कधी बिनधास्त तर नेहमीच आनंदी , खिदळणारी ,आणि कायम सकारात्मक......अशी त्यांची सगळीच रुपं मी बघितलेली.कोणत्याही प्रसंगातून न घाबरता मजेत राहून योग्य मार्ग काढण्याचं प्रात्यक्षिक तर कालच झालं होतं. माझ्यातला भित्रा ससा जरी मन लावून व्याख्यान ऐकत होता तरी खरं बळ मिळालं ते कालच्या प्रात्यक्षिकातूनच!!








मॅडम, काय बहारदार वर्णन. पेंच ट्रिप पुन्हा एकदा अनुभवली. आपण कुठल्याही पेच प्रसंगातून हसत खेळत बाहेर पडु शकतो हे या ट्रिप ने पुन्हा एकदा सिद्ध केलं. सगळ्या मैत्रिणींना धन्यवाद यशस्वी ट्रिप with पेच प्रसंग 😊😊
ReplyDeleteझकास वर्णन केलं आहे...विशेषत: शेवटचा पंच तर उत्तमच! खूप आवडलं.
ReplyDeleteसीमाताई, तुमच्या कडून पावती मिळाली.धन्यवाद
Deleteजबरदस्त अनुभव आणि तितकंच खिळवून ठेवणारं प्रवास वर्णन जणू काही बंगई आणि लांब दोरीचे झोके यांचं आंदोलन. मनाचा ठाव घेणारं.
ReplyDeleteत्यात ही प्रत्येकाची वैशिष्ट्ये वि -शिष्ट पद्धतीने नमूद करण्याची शैली खुमासदारच. अकरा जणी आपापल्या स्वभावाला धरून तर कधी मुरड घालून मनमुराद पणे आनंद लुटताहेत ही बाब जास्त सुखद. जंगलदर्शन थोडावेळ झालं तरी ते खोल खोल रुजणारं. सर्वांनीच तिथं आफुफ्फुस श्वास भरून घेतलेला असेल अशी खात्री आहे. दुसऱ्या दिवशीचा माईंडसेट ही तितकाच महत्वाचा. अभिनंदन तुम्हा सर्वांचं.
एक विनंती -डॉ साधना कुलकर्णी मॅडमना
यंदाच्या म्हणजे 2023 च्या भटकंती सारख्या किंवा अन्य दिवाळी अंकात, या ब्लॉगला सर्व फोटोसहित स्थान मिळेल असा प्रयत्न व्हावा. त्या साठी शुभेच्छा 🌹
व्हॉट्सअप च्या मुक्त व मूक विदयापीठात मुक्त संचार होणार असला तरी, लेख निसर्गप्रेमी पर्यंत जावा.
तुम्ही इतक्या छान शब्दात मांडलयं,की तुमचा अनुभव आमच्या डोळ्यासमोर घडत होता. मधल्या काही प्रसंगात जसे हसू येत होते तसेच परिस्थितीशी दोन हात करताना चे वर्णन वाचल्यावर कौतुक ही वाटतं होते. स्त्रिया कुठल्याही प्रकारची परिस्थिती हाताळू शकतात यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असंच मी म्हणेन. अभिनंदन आणि शुभेच्छा
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद प्राजक्ता
Deleteसाधना ताई, अतिशय मजेदार अनुभव व तितकेच खुमासदार वर्णन! वाचून मजा वाटली पण हेही वाटलं कि ह्या सर्व बिकट प्रसंगांमधून जाताना तुमची काय अवस्था झाली असेल ! तरी पण सर्व पेचांची उकल करत करत तुमची सहल सफल झाली व तुम्ही अनुभव समृद्ध झालात!
ReplyDeleteअकोल्या सारख्या छोट्या शहरात टॅक्सी ड्राइवर, त्यांचे मालक ह्यांची सेवा कशी असते हे देखील ह्या मधून अधोरेखित झाले. व्यवसायिकते पासून हि जमात अजूनही बरीच लांब आहे. ह्यांना सुधारणे साठी बराच दीर्घ पल्ला गाठायचा आहे. मोठ्या शहरांमध्ये ह्या सेवांमध्ये आता खूपच व्यावसायिकता आढळून येते. टॅक्सी ड्रायव्हर्स, त्यांचे मालक ह्यांना व्यायसाय करायचा म्हणजे उत्तम सेवा द्यावीच लागते, ह्याची त्यांना जाणीव आहे. असो.
आपल्या हातून लिखाण अजून घडत राहो हि शुभेच्छा !
अनिल सहजे
तळेगाव दाभाडे