"आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी निघाली की माझं अंतःकरण दाटून येतं. वाटतं की, आमच्या नंतर आमची पुस्तकं शेकडो मैल मिरवायची गोष्ट सोडा, पण कुणी लायब्ररीतून घरापर्यंत तरी नेईल का ? कुणा अभाग्याच्या मनात मी चार सुखाचे क्षण निर्माण करीन का ? ते मी नाही केलं तर लेखक म्हणून मी पराभूत झालो हे माझं मला कळलं पाहिजे. उद्या का होईना, शंभर वर्षांनी का होईना, मला वाचक हवा आहे"..................
. हे पु.लं.चेच शब्द. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला अभिमानानं सांगावसं वाटतं की -
"पुलं., चार क्षण तर सोडाच पण तुम्ही आमचं अख्खं आयुष्य समृद्ध केलं आहे. आमच्या मनावर नेहमीच तुमचं राज्य असणार आहे आणि तुमची पुस्तकं आम्ही फक्त वाचत नाही तर त्यांची पारायण करीत असतो".
आज पु .लं .चा जन्मदिवस. म्हणून त्यांचं हे जाहीर स्मरण. अन्यथा त्यांना आठवायला कोणत्याही 'दिनाची' गरज नाही. त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आपल्या जगण्यात मुरलेलं आहे - नव्हे मुरुन उरलेलं आहे.
पु लं. माहित नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही . पण पु लं. म्हणजे विनोदी लेखक हे समीकरण अनेकांच्या डोक्यात आहे, ते योग्य नाही. लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, गायक, दिग्दर्शक, हार्मोनियम वादक, नट, वक्ता, विचारवंत ,दाता -- - या सगळ्या भूमिका त्यांच्या विनोदा इतक्याच उत्कृष्ट आणि श्रेष्ठतम आहेत. आणि यातला कोण कोणा पेक्षा वरचढ आहे हा यक्षप्रश्न आहे.
पु लं. चे विनोद जसे प्रसिद्ध आहेत तसेच त्यांचे विचारही प्रसिद्ध व्हावेत हे मला प्रकर्षाने वाटतं. अनेक व्याख्यानं आणि लेखांमधून त्यांनी व्यक्त केलेले विचार वाचताना त्यांना तत्त्वज्ञ म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. कुठेही तत्त्वज्ञानाचा आव न आणता, अत्यंत खेळकर आणि सहज शैलीतले त्यांचे विचार आपलं नेहमीच मार्गदर्शन करतात.
"ज्यांना जीवनात खूप काही मिळालं आहे, त्यांनी, ते ज्यांना मिळालं नाही, त्यांना ते कसं मिळेल याची खंत बाळगणे म्हणजे सामाजिक बांधिलकी"- -असं केवळ म्हणून ते थांबले नाहीत तर स्वतःच्या जगण्यातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पदयात्रेत ते सामील झाले होते. बाबा आमटे यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन दरवर्षी आनंदवनात ते कुष्ठरोग्यांच्या सहवासात काही दिवस घालवत असत.
"नमस्कारासाठी जुळलेल्या करांपेक्षा समाजहिताच्या कार्यासाठी एकमेकांच्या करात जुळलेले करच माणसांना अधिक समर्थ जीवनाकडे नेत असतात"-- असं म्हणणारे पुलं. अनिल अवचटांच्या मुक्तांगणात, मेधा पाटकर यांच्या बरोबर सक्रियतेने समरस होते.
" मी चे 'आम्ही' मध्ये खुबीने समर्पण करण्याची जीवन कला साधण्याला महत्त्व आहे. सुसंस्कृतपणाचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे".- - अशासारखे त्यांचे असंख्य विचार वाचकांना प्रेरणा देणारे आहेत. कलेची साधना करताना अगदी सहजपणे, कुठलीही वाच्यता न करता त्यांनी 'मी' ला मिळालेले धन हे 'आम्ही'ला दान केलं. आपल्या असाधारण दातृत्वा नं अनेकांच्या जीवनातला अंधार त्यांनी उजळला आहे
.
त्यांच्या आयुष्यातल्या श्रद्धा स्थानांची ओळख वाचकांनाही व्हावी ही त्यांची आंतरिक तळमळ होती. रवींद्रनाथ टागोर ,बालगंधर्व, कुमार गंधर्व, जयप्रकाश नारायण,महात्मा गांधी अशा कितीतरी महान व्यक्तींचे चित्रण पुलंनी केलेलं आहे.
त्यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वातून , विविध कलाकृतींमधून, व्याख्यानांमधून, साहित्यामधून, त्यांच्या सामाजिक कार्यातून,साध्या राहणीतून, दिलखुलासपणे कौतुक करण्याच्या वृत्तीमधून पुलं मधला समृद्ध, सुसंस्कृत, असामान्य माणूस समजत जातो, भावतो, चकित करतो आणि हृदयात विराजमान होतो आणि खऱ्या अर्थानं हा "पुरुषोत्तम "आहे हे पटतं.
त्यांच्या कलाकृतींवर मालिका निघाल्या, चित्रपट निघाले. प्रत्यक्ष त्यांचाही जीवनपट दोन भागात निघाला आहे. पण पुलंच्या शब्दांनी आणि एकपात्री प्रयोगांनी जी किमया केली आहे त्याची सर या मालिकांना,चित्रपटांना नाही. इथे दृक-श्राव्य माध्यमाचा दोष नाही तर विलक्षण उंची गाठलेल्या त्यांच्या शब्दसामर्थ्यापर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही हेच खरं.
आज व्हॉट्स ॲप वर कोणतेही सवंग विनोद, लेख जेव्हा पुलं च्या नावावर फिरतात तेव्हा खूप वेदना होतात.त्याहीपुढे या विनोदांनााा जेव्हा 'लाईक्स' मिळतात तेव्हा संतापाने तिडीक उठते.
आणि मग वाटतं , नवीन पिढीकडे 'पुलं' योग्य आणि अस्सल स्वरुपात पोचवण्याची जबाबदारी आमचीही असायला हवी.
माझी समस्त तरुण पिढीला विनंती आहे की त्यांनी सुरुवातीला पुलं चं साहित्य वाचावं.एकदा का या पिढीला त्या साहित्याची गोडी लागली की ही पिढी "पुलकित" व्हायला काहीच वेळ लागणार नाही.
#पुलं
#पुलंवाढदिवस .....................................


पु. ल. खरंच बहू आयामी व्यक्तीत्वाचे धनी होते. मॅडम छान उलगडून दाखवल तुम्ही त्यांना
ReplyDeleteखुप छान लिहिलं मॅडम.
ReplyDeleteपु ल यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलु आपण खूपच छान शब्दबद्ध केले असुन पु लं च्या आयुष्यात त्यांनी ज्या ज्या भूमिका त्यांच्या अष्टपैलू कलाविष्काराने साकारल्या त्यात सहजता, सुंदरता, सुबोधता, सकारात्मकता,समृद्धता व संपन्नता होती आणि म्हणूनच पु ल हे नाव कलेच्या क्षेत्रात लोकप्रिय व अजरामर आहे/राहील....
ReplyDeleteखूप छान मॅडम!! आपले लिखाण नेहमी प्रेरणा देते. आयुष्यभर रुग्णांच्या सानिध्यात राहणाऱ्या डॉ ची एवढी चांगली भाषाशैली क्वचित असते. पु ल म्हणजे महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीचे दैवत. वाचनाची आवड आहे आणि त्याने पु ल वाचले नाहीत असेल कधी घडत नाही. पु ल नेहमी एक विनोदी लेखक म्हणून ओळखले गेले. परंतू ते एक उत्तम विचारवंत आणि एक कट्टर communist होते. कुठल्याही पुरस्कारासाठी सत्तेला मुजरा करणे त्यांना कधी जमले नाही. सत्तेला प्रश्न विचारणे आवश्यक असते असे त्यांचे विचार होते.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete