Monday, September 5, 2022

लाभले आम्हास भाग्य..... शिक्षक असण्याचे


  


          मध्यंतरी एका व्यासंगी आणि सुप्रसिद्ध व्यक्तिचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. व्याख्यानाच्या आरंभी ते म्हणाले,  'आज मी तुमच्या समोर जो उभा आहे त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना जातं'.....आता या वाक्यात वेगळं असं काहीच नाही. सामान्यतः अनेक विद्वान कर्तृत्ववान व्यक्तींच्या जडणघडणीत त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतोच. पण खरी मेख पुढेच आहे. वरचं विधान करून दोन क्षण वक्‍त्यांनी विराम घेतला आणि म्हणाले, 'मी त्या शिक्षकांना माझ्या यशाचं श्रेय देतो... ज्यांनी मला कधीच शिकवलं नाही. ज्यामुळे मी स्वतः अध्ययन करण्यास प्रवृत्त झालो'.

          आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला हा प्रसंग आठवला. मी स्वतः एक शिक्षक असल्याने वरिल विधानाचा सगळ्या बाजूंनी सांगोपांग विचार केला. खरंतर प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण करावे असे हे विधान आहे. एक सुसंस्कारित, सुशिक्षित, संवेदनशील नागरिक घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता आपल्यात आहे का? हे आत्मपरीक्षण प्रत्येक शिक्षकाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने अवश्य करायला हवे.

           पण हल्लीच्या 'स्मार्ट' शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही 'स्मार्ट' असल्याने हे आत्मपरीक्षणही स्मार्ट नाही झालं तरच नवल. हे कसे काय??? प्रश्न पडला असेल ना? सोप्पंय. 'ओटीडी' द्वारे हो .आम्हा महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रत्येकाचा एक 'ऑनलाइन टीचर डाटाबेस' असतो. त्यात आपली इत्यंभूत कुंडली मांडलेली असते. वेळोवेळी आपण केलेले उपक्रम - उदा. लेखन, व्याख्यान, प्रकल्प इत्यादी त्यात 'अपलोडायचे'  असतात. जितके जास्त अपलोड तितका शिक्षक भारी. 'ओटीडी' हा शिक्षकाचा आत्माच की हो...'स्मार्ट' आत्मा बरं का.

           खरंच डिजिटल युगाने, वेगवान काळाने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. मग शैक्षणिक क्षेत्र त्याला अपवाद कसे राहणार? शिक्षक केंद्रित शिक्षण आता जुने झाले आहे. त्याऐवजी विद्यार्थी केंद्रित शिक्षण हे योग्य मानले जाते. त्याही पुढे जाऊन आजचे शिक्षण हे परीक्षा केंद्रित शिक्षण आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रचंड संख्येत वाढलेल्या खाजगी शाळा - महाविद्यालये, मोठ मोठ्या शिक्षणसंस्था, संस्था पूरक ध्येयधोरणे, बदललेली शिक्षण पद्धती, शाळांचे कॉर्पोरेट स्कूल आणि पब्लिक स्कूल मध्ये झालेले रूपांतर, सतत चालणाऱ्या परीक्षा, वारेमाप शिक्षणशुल्क, शिकवण्या  व्यतिरिक्त राबवले जाणारे असंख्य उपक्रम...... या सगळ्यांमुळे आजचा शिक्षक हा ओझे वाहणारा भारवाही झालेला आहे. त्याच्यातला खरा प्रामाणिक शिक्षक अर्धमेला होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. शिक्षक विद्यार्थी हे नाते कोरडे आणि रुक्ष होत चालले आहे. शालेय शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात तुलनेने आपुलकी आणि जिव्हाळा आजही टिकून आहे. पण  कोरोनाच्या धुमाकूळामुळे ऑनलाइन शिक्षणाचा शाळेत प्रवेश झाला आणि नात्यातली ही ओलही आता आटते की काय अशी भीती वाटतेय. 'गुगल' सरांनी शालेय शिक्षणातही चंचुप्रवेश केलाय.  महाविद्यालयीन विद्यार्थी तर 'गुगल विद्यापीठच' खिशात घेऊन फिरत असतात. त्यांना शिक्षकाची गरजच नसते. महाविद्यालयीन शिक्षक तर बरेचदा -'उरलो सह्या पुरता' अशा स्थितीत असतात.पूर्वीसारखे शिक्षक आणि पूर्वीसारखे विद्यार्थी आता राहिलेच नाही अशी ओरड हल्ली नेहमीच होत असते.    

            ही वस्तुस्थिती खरी असली तरी सगळेच चित्र नकारात्मक नक्कीच नाही. आजही असंख्य हाडाचे शिक्षक आपलं विद्यादानाचे कार्य तळमळीने करत आहेत. आणि असंख्य विद्यार्थी आयुष्यभर अशा शिक्षकांच्या ऋणात राहत आहेत. शिकवण्याच्या, शिकण्याच्या पद्धती बदलल्या, तंत्र बदलले तरीही शिक्षकाची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. शिक्षण ही एक चैतन्य पूर्ण अशी  सजीवां कडून सजीवांवर घडून येणारी विकासाची प्रक्रिया आहे. तत्व, पद्धती, तंत्र, साधन, साहित्य, पुस्तके या सगळ्या निर्जीवच  गोष्टी. शिक्षक आपल्या स्पर्शाने त्यात चैतन्य निर्माण करीत असतो. त्यामुळे शिक्षकाचे स्थान नेहमीच अनन्यसाधारण होते आणि राहील.

          "The art of giving shape to human powers and  adapting them to social service is the  supreme art of education "  असे प्रख्यात शिक्षण तज्ञ 'जॉन ड्युई' ने म्हटले आहे. मानवी शक्तींना वळण लावून त्यांना समाज कार्यासाठी सक्षम करणे हे शिक्षणाचे सर्वोच्च उद्दिष्ट लक्षात घेण्याची गरज आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने नव्याने समजून घ्यायला हवी.फक्त अभ्यासक्रमाला बांधून न घेता,चौकटीबाहेरच्या शिक्षणालाही अंतर्भूत केले पाहिजे. कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षकाने सकारात्मक राहून, "Successful teaching is a teaching that brings  about effective learning"  या 'मर्सेल' च्या व्याख्येवर विश्वास ठेवून शिक्षक असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे.

         शिक्षक हा राष्ट्रपती पेक्षाही मोठा असतो याचे भान दिले ते 'सर्वपल्ली राधाकृष्णन' यांनी .उत्कृष्ट अध्यापन, इंग्रजी वरील असाधारण प्रभुत्व, अलौकिक वक्तृत्व, तत्त्वज्ञानाचा प्रगाढ व्यासंग असणाऱ्या डॉ.

 राधाकृष्णन यांनी अध्यापनाचा आरंभ मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेज पासून केला. त्या नंतर म्हैसूर, कलकत्ता येथेही त्यांनी विद्यादानाचे कार्य केले. आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू ते १९३१ते १९३५  पर्यंत होते. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात 'स्पाॅडलिंग प्रोफेसर' या पदावर त्यांची नियुक्ती झाली. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होत. १९३८ ते १९४७ पर्यंत त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारून या विद्यापीठाला उंचीवर नेऊन ठेवले. डॉ. राधाकृष्णन हे नुसतेच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते तर श्रेष्ठ तत्त्वज्ञ होते. त्यांची मर्मदृष्टी व त्यांचे मूलग्राही चिंतन त्यांच्या विविध देशांमधल्या व्याख्यानांमधून आणि ग्रंथसंपदेमधून निर्विवाद सिद्ध झाले आहे.

 "मी परदेशात शिकायला जाणार नाही तर शिकवायला जाईन"... हे विद्यार्थी दशेतील त्यांचे उद्गार त्यांनी सिद्ध केले. १९४९ साली ते रशियात राजदूत म्हणून गेले. १९५२ सालापासून दहा वर्षे ते उपराष्ट्रपती होते. १९६२ साली ते राष्ट्रपती पदावर आरूढ झाले. राष्ट्रपती झाल्यावर आपला जन्मदिवस हा 'शिक्षक दिन' म्हणून मानला जावा अशी त्यांनी राष्ट्राला सूचना केली. अत्युच्च पदावर असतानाही स्वतःमधल्या शिक्षकाचे विस्मरण त्यांना झाले नाही. चाळीस वर्षे 'शिक्षक' म्हणून आपण केलेले कार्य सर्वात श्रेष्ठ व मौलिक आहे अशी त्यांची धारणा होती .'पाच सप्टेंबर रोजी माझे गुणगान न करता शिक्षकांचा सन्मान करा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा'..... असा संदेश देऊन त्यांनी शिक्षक व शिक्षण व्यवसाय यांना उदात्त ,श्रेष्ठ पातळीवर नेऊन बसविले.

            आज अनेकदा माझ्यातल्या शिक्षकाचे खच्चीकरण होईल असे बरेच प्रसंग येतात.शिकवणं निरर्थक वाटू लागतं.पण अशावेळेस मला माझ्या शाळेतल्या मराठे बाई आठवतात. कॉलेजमधले जोशी सर आठवतात. शिकवतानाची त्यांची तळमळ आताही तीव्रतेने जाणवते. मनातले वैफल्य, उदासीनता नष्ट करण्याची शक्ती त्यांनी केलेल्या संस्कारात आहे याची प्रचिती येते. अगदी पुलंचे चितळे मास्तर ही येतात मदतीला....

 "पहिली, दुसरीच्या वर्गा बाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणत आहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती,  'आय?'  'गो'.  'यू ?'  'गो'. 'वुई?' 'गो'.

 ' ही?'  'गोऽऽऽज' !!.... ची चाल आठवते. मास्तर इंग्रजी साभिनय शिकवायचे. तुरूतुरू चालत , 'आय अ‍ॅम??'..की

 पोरे 'वॉऽऽकिंग'.. म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून, डोळे मिटून पडत आणि म्हणत , 'आय अ‍ॅम??'... 'स्लीऽऽपिंग'... अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून,  'गाढवांनो, माझी झोप मोडलीत ?' म्हणत."

        आजही अनेक शाळांमध्ये असे अनेक चितळे मास्तर आहेत जे जीव तोडून शिकवत आहेत आणि आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या ह्रदयात जिवंत आहेत,आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याने कायम बांधले आहेत.  

      श्रेष्ठ   शिक्षणतज्ञ 'प्लेटो' म्हणतात, " If you ask me what is education,  the answer is easy, that which makes good  men and good men act nobly".

          या महान शिक्षणतज्ञांचा  शिक्षणाविषयीचा व्यापक दृष्टिकोन आज आपल्याला स्वतःमध्ये रुजवायचा आहे.   मी शिक्षक आहे. परीक्षेच्या पलीकडे, अभ्यासक्रमाच्या पलीकडे, पुस्तकांच्या, तंत्रांच्या 

पलीकडे माझ्याजवळ बरंच काही आहे, जे मी माझ्या विद्यार्थ्यांना, प्लेटोच्या व्याख्येनुसार देऊ शकते..... हा आत्मविश्वास आजच्या दिवशी आपण समस्त शिक्षकांनी मनात रुजवू या आणि हा पवित्र व्यवसाय करण्याची जी संधी मिळाली आहे,त्याचे सोने करु या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ.साधना आशुतोष कुळकर्णी

अकोला

९४२२९३९५१०

6 comments:

  1. लाभले आम्हास भाग्य..... आपलेच विद्यार्थी असण्याचे...खूप छान 👏👏🙏

    ReplyDelete
  2. Khup Chan lekh mam...shikshak dinachya hardik shubbheccha....

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Very nicely penned mam!!...Humorous use of technical words have made this article very effective...also the importance of teachers has been highlighted in a different way!!

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...