Sunday, July 10, 2022

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील......एकदम ओक्केमध्ये

 


          या वर्षीच्या आषाढी एकादशी ची बातच निराळी आहे. तब्बल  दोन वर्ष वारी शिवाय काढताना विठुराया सुद्धा कासावीस झाला असेल. वारकऱ्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. पुढे पडणाऱ्या एकेका पावलागणिक त्यांची ऊर्जा वृद्धिंगत होत असते. आपल्या लाडक्या दैवताचे दर्शन घेताना 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी त्यांची अवस्था घरात बसूनही आपल्याला समजू शकते. वारकऱ्यांची अपार श्रद्धा, निर्मळ आणि निरपेक्ष भक्ती, त्यांचं समर्पण, विठ्ठलाच्या भेटीचा ध्यास, त्यांचा विश्वास-हे सारं काही दरवर्षीच्या आषाढी वारीला तेवढ्याच तीव्रतेने  आपल्या ही हृदयाला भिडतं. हेवा वाटतो त्यांचा. त्यांच्या धमन्यांमधून  रक्ताबरोबर वाहणाऱ्या परमानंदाचा अनुभव आपल्याला घेता येईल कधी ? त्यांच्यातल्या चैतन्याचा, टिकून राहणाऱ्या ऊर्जेचा ओझरता तरी स्पर्श आपल्याला होईल? हे प्रश्न दरवर्षी वारी सुरू झाली की छळतातच. घरबसल्या वारीचे दृश्यं बघताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडणाऱ्या समाधानाचा, निर्लेप सात्विक आनंदाचा अनुभव आपल्यालाही श्रीमंत करतो. वारीच्या या आनंद सोहळ्याचे आपण दुरून का होईना पण साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो मग .आणि यावर्षी तर विचारूच नका. दोन वर्ष मनात दाबून ठेवलेली तळमळ ,असोशी, तो ध्यास.. सारं काही पावलांमध्ये एकवटून चालणारे वारकरी बघून आनंदाचा काटाच येतो अंगावर. गळ्यात टाळ घालून ,भान हरपून मृदंगाच्या तालावर थिरकणारी पावलं बघतांना घशात आवंढा दाटून येतो. डोळ्याच्या कडा पाणावतात. वारीतल्या परमानंदाची मग आपल्यालाही होते लागण.

       अशाच भक्तिमय आनंदात अख्खा महाराष्ट्र डुलत असताना अचानक एक नवीनच आनंदाचं सूत्र धाडकन अंगावर आदळलं......'काय झाडी, काय डोंगार ,काय  हाटील,.... एकदम ओक्के मध्ये'. 'ग्यानबा तुकाराम,ग्यानबा तुकाराम' म्हणता म्हणता महाराष्ट्रातली सामान्य जनता चक्क -'काय झाडी, काय डोंगार........' चा जप करू लागली .अरेच्चा!!!कसलं भारी सूत्र आहे राव. लईच 'क्लिक' झालं. बघा ना. महाराष्ट्राच्या राजकारणात 'भूकंप' होऊ घातला होता. सरकारचं आसन डळमळीत होऊ लागलं होतं .असंतुष्टांची 'वारी'  पार गुवाहाटी ला पोचली होती .इकडे भक्तमंडळी कासावीस. लांबलेला पाऊस, हिंसाचार, महागाई, आणि पुन्हा दार ठोठावणारा  कोरोना ...हे सारं कमी होतं की काय ,तर हा राजकारणातला 'भूकंप '...

अशा कठीण समयी गुवाहाटी च्या दिशेने डोळे लावून बसलेल्या भक्तांना काय मंत्र मिळाला? तर- -' काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...एकदम ओक्के मध्ये'. कुठल्याही जबाबदारीच्या, बांधिलकीच्या,अडचणीच्या गुंत्यात अडकून न पडता, अलगदपणे बाहेर पडून स्वतःची सोय आणि चैन कशी शाबूत ठेवायची, ही आनंदाची गुरुकिल्लीच मिळाली जणू आम्हाला. आणि आम्ही 'एकदम ओक्के' मध्येच गेलो. बघता बघता वारकऱ्यांचा आनंदाचा हेवा वाटेनासाच झाला की हो.

       वारकऱ्यांचं सोडा हो. त्यांची वर्षातून एकदाच वारी असते .पण आपले लोकप्रतिनिधी- - ते तर हाडाचे वारकरी. अध्यात्म धमन्यांमधून वाहतंय हो त्यांच्या. सत्तेच्या देवाची हाक आली की सगळं सोडून धावणार देवापाशी. निष्ठा, तत्त्व, मूल्य, सत्य, सेवा, विवेक या षडरिपूंना सहजतेनं झटकून टाकणारी ही जात. काहीही म्हणा,पण महाराष्ट्रातील जनता भाग्यवान खरीच. यावर्षी एकाच वेळी दोन दोन वार्‍यांचा अनुभव आला की हो. लोकप्रतिनिधींच्या वारीमुळे तर झोपच उडाली आमची .आज काय १५, उद्या काय २०, परवा काय ३५..... अशी आकडेमोड ऐकून ऐकून मेंदूचा पार भुगा झाला. त्यात पंढरपूरच्या वारीचा विसरच पडला हो .आणि मग एकाएकी आनंदाचा मंत्रच हाती आला, 'काय झाडी, काय डोंगार .....'

       देशात, राज्यात काहीही होवो लोकप्रतिनिधी मात्र कायम 'ओक्के' मध्ये .जनतेच्या समस्या, जनतेची दुःखं, जनतेची हतबलता, काहीही अंगाला लावून न घेणाऱ्या या 'ओक्के' मध्ये असणाऱ्या निर्लेप, निस्संग महारथींची वृत्ती तर हेवा करण्यासारखीच. यांच्या धमन्यांमधून कोणतं रसायन वाहतंय,हे त्यांच्या तथाकथित 'देवालाच' ठाऊक. पण काहीही असो, या वारीतल्या वारकऱ्यांनाही त्यांचा 'विठ्ठल' भेटलाच आणि तो सुद्धा पायी चालत जाऊन नाही तर ,'काय झाडी, काय डोंगार ,काय हाटील.... एकदम ओक्केमध्ये' असतानाच भेटला. शेवटी जिवाशिवाची भेट झाली आणि वारी एकदाची सुफळ संपूर्ण झाली.

         यातला विनोदाचा आणि उपहासाचा भाग सोडला, तर सर्वसामान्य जनता सुद्धा हल्ली 'ओक्के' मध्येच असते.सुजलेला चंगळवाद आणि समाज माध्यमांवरील वाढत जाणारं अवलंबित्व यामुळे भल्याभल्यांचा सारासार विवेक पार तळाशी जाऊ लागला आहे. परिणामी, आभासी आनंदालाच  खरं समजून या खोट्या विश्वात माणूस रममाण होत चाललाय आणि 'एकदम ओक्के' मध्ये असल्याचा समजतोय. हल्ली आनंद हा मनात नसतो तर तो दाखवून सिद्ध करावा लागतो. समाज माध्यमांवर ही आनंदाची दिवली सतत तेवत ठेवण्यासाठी मग आम्ही वाहवत जातो. व्हाॅट्सअप वर, फेसबुक वर, इंस्टाग्राम वर ,ट्विटर वर वाढदिवसाचे, सहलीचे ,लग्नाचे, मुंजीचे, केळवणाचे, मेंदीचे, हळदीचे, बारशाचे, पाल्याच्या गुणपत्रिकेचे ......आणि कशाकशाचे शेकडोंनी फोटो टाकून आम्ही आनंदात आहोत, 'एकदम ओक्केमध्ये' आहोत हे दाखवण्याची मग अहमहमिकाच सुरू होते.

              कोरोना च्या पहिल्या आणि दुसर्‍या जीवघेण्या लाटेचा नुकताच भीषण अनुभव असूनही आम्ही त्यातून काहीही धडा घेतलेला नाही. त्यावेळी पाळलेले नियम, त्यावेळी 'साधी राहणी, उच्च विचारसरणी'.. यांचा झालेला साक्षात्कार, त्यावेळी स्वतः मध्ये केलेले बदल..... हे सगळं स्मशानवैराग्य होतं असं आता लक्षात येतंय .आता कोरोना परत उंबरठ्यावर उभा आहे. त्याला पुरेपुर ठेचल्याच्या भ्रमात आणि उन्मादात आम्ही जीवाची चंगळ करायला ऊर फोडून धावतोय, उतावीळ झालोय. कोरोनानं  दिलेल्या भयंकर धक्कयाचा आम्हाला पार विसर पडला आहे.

          म्हणूनच 'काय झाडी, काय डोंगार .......'या वाक्याची जरी खूप खिल्ली उडवली गेली, तरी ते वाक्य आजच्या काळाचं प्रातिनिधीक वाक्य आहे -- लोकप्रतिनिधींसाठी ही आणि सामान्य जनतेसाठी ही-- हे  दुर्दैवानं अधोरेखित करावंसं वाटतं. मूळ समस्या, मूळ प्रश्नांना बगल देत केवळ चंगळवादाच्या भरवशावर आम्ही 'एकदम ओक्के' मध्ये आहोत, ही  स्वतःची फसवणूक नाही तर दुसरं काय?? खरे कर्मयोगी, सच्चे समाजसेवक, शास्त्रज्ञ, सीमेवरील सैनिक आणि प्रत्येकच क्षेत्रातील कितीतरी विद्वान, नामवंत मंडळी -आज प्रसिद्धीपासून दूर राहून, निष्ठेनं आपलं कार्य करित आहेत. ही मंडळी समाज माध्यमांवर कधीही झळकत नाहीत. त्यांचं कार्य हीच त्यांची ओळख असते. उलटपक्षी,

 'काय झाडी ,काय डोंगार .......' असं म्हणणारे लोकप्रतिनिधी मात्र २४ तास डोळ्यासमोर असतात 'कालाय तस्मै नमः' दुसरं काय??

         आज आषाढी एकादशी आहे .आम्ही एसीत बसून, मोबाईल मध्ये चॅटिंग करत,विठ्ठलाचे फोटो टाकत,उपवास 'साजरा' करतोय. खरंतर आमचं शिक्षण, आमची विद्वत्ता,आमचा दर्जा, आमची संपत्ती ,आमच्या सुखसोयी,आमची जीवनशैली... हे सगळं

 त्या वारकऱ्यांच्या पायपीटी समोर मातीमोल आहे. वारीत जाणारा, डोक्यावर गाठोडं 

 घेतलेला वारकरी हा 'माणूस' नाही तर ती एक 'वृत्ती' आहे - - भक्ती आणि श्रद्धेनं ओथंबलेली, भ्रामक सुखांची पुटं गळून पडलेली, विश्वास आणि जिद्दीच्या भरोशावर पुढे जाणारी. लाखो-करोडो वारकरी ही 'संख्या' नाही तर तो - 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस' या उन्नत भावनेचा सागर आहे.

जगण्याची उंची वाढवणार्‍या वारकरी पंथाची परंपरा अभिमानानं मिरवणारे आपण-  काय करायचं,हे आता ठरवायची वेळ आलीय - 'काय झाडी, काय डोंगार ......'म्हणून 'एकदम ओक्के' मध्ये राहायचं की 'तीर्थ विठ्ठल ,क्षेत्र विठ्ठल' म्हणून सच्च्या वारकर्‍याची वृत्ती अंगात रुजवायची?? हे ठरविण्याची बुद्धी आपण आज विठूरायाकडेच मागू या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


#कायझाडीकायडोंगार

#एकदमओक्केमधे


15 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. उत्तम प्रासंगिक,, एकदम ओक्के मंधी 😂🙏🌹

    ReplyDelete
  3. 24/7 न्यूज साठी आपण काय आणि कश्याला प्रसिद्धी देत आहोत याचे भान राहिले नाही , धन्यवाद मॅडम वास्तव लिहिल्या बद्दल

    ReplyDelete
  4. खुप छान प्रसंगोचीत लेख, आपल्या लेखातून वास्तवाचे भान आमच्या सारख्या तरुणांना होत असते, धन्यवाद मॅडम.

    ReplyDelete
  5. वस्तुस्थिती मांडणारे मार्मिक सत्य ....

    ReplyDelete
  6. Kya baat hai Mam, अस्खलित पणे अगदी सहजच मनातील नेमके भाव प्रकट केलेत.. वारकरी आणि त्यांचा भक्ती भाव....त्याची तुलना कैसी...तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.... अवर्णनीय..

    ReplyDelete
  7. उत्तमच 🙏👍 वारकरी मंडळींना वारीकरी असं नामाभिधान दिलं तर, अन्य खऱ्या अर्थाने 'वार ' करी होतील. मग सर्वसामान्यांपासून ते असामान्यापर्यंत, सगळेच त्यात समाविष्ट होतील. फिल्टर तरी किती आणि किती वेळा लावायचं, कशाकशाला लावायचं, काही गोष्टी तुमच्या इंद्रियांचा घात करण्यासाठी टपून बसलेल्या. नावात भजन असलेला भजन करीलच असं नाही.म्हणून तर भजनलाल संस्कृती की विकृती उदयाला आलीय. हे गेल्या काही शतकातल्या इतिहासात तटस्थपणे डोकावलं तरी जाणकार समजू शकतात. आदिलशहा, कुतुबशहा----- ई. च्या काळात सत्ता आणि दलबदलू यांचं समीकरण सतत
    बदलत असायचं. अमुक सरदार याला जाऊन मिळाला, अमुक फितूर झाला ----काय काय वाचलंय विव्हळत , विव्हळत, आवडीच्या इतिहासात. खुद्द
    श्री छत्रपती शिवरायांना देखील अशा
    स्वार्थी लोकांचा त्रास सहन करावा
    लागला. माझ्या गावी नावानं रावण असलेले रावण पाटील त्यांच्या निर्मळ स्वभावाकरिता प्रसिद्ध होते. त्यांनीच प्रथम आमच्या वस्तीत कीर्तन सप्ताह आयोजित केल्याचं मला चांगलं आठवतंय. आम्ही शाळकरी मुलं शाळेतून येतांना , दोन मिनिटं थांबून , त्यांच्याच हातातील वीणा वाजवून त्यांना नमस्कार करायचो. ते देखील राम कृष्ण हरी म्हणत हात जोडायचे. "मी तू पणाची झाली बोळवण "याचा अर्थ आताशा कळायला लागला असं वाटतंय. हे समजण्या इतकी पात्रता विठ्ठल कृपेने ज्याच्या त्याच्या मगदूरा प्रमाणे मिळणं, त्यासाठी आपला लेख कारणीभूत होतोय, यात अतिशयोक्ती नाही. अभिनंदन , शुभेच्छा आणि जय हरि विठ्ठल !🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. तुमचे लिखान नेहमीच वास्तवदर्शी आणि भावस्पर्शी असते .. खूप सुंदर

    ReplyDelete
  9. Simply superb.👏👏👏
    काय विचार, काय लेखनशैली, काय समर्पकता आणि प्रासंगिकता. एकदम ओक्केमधे आहे.
    माधवी सहजे

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...