आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने......
दरवर्षी दिवाळी आपल्याला तिमिराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देत असते. नेहमीप्रमाणे आपणही दिवे, आकाशकंदील, पणत्या लावून प्रकाशाचा उत्सव साजरा करतो .वास्तविक मनातील अज्ञानाचा अंधःकार ज्ञानाच्या प्रकाशानं उजळणं... ही खरी दिवाळी. एरवीचं ठीक आहे पण यंदाच्या दिवाळीला कोरोना ची पार्श्वभूमी आहे. 'आरोग्य' हे गृहीत धरून बेभानपणे वागणाऱ्या समाजाला कोरोनाने 'जोर का झटका' दिला आहे. त्यामुळे या दिवाळीत मौजमजे बरोबर चिंतनही करणं गरजेचं आहे.
धनत्रयोदशीला भगवान श्री धन्वंतरी जयंती असते. याच दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' साजरा केला जातो. यंदाचं हे सहावं वर्ष आहे. आणि या वर्षीची संकल्पना आहे- 'आयुर्वेद फॉर पोषण'. धन्वंतरी देवतेचं पूजन करतांना आयुर्वेदातील पोषण संकल्पना समजावून घेणं आणि ती आचरणात आणणं हा उद्देश प्रत्येकाच्या मनात असावा अशी अपेक्षा आहे.अत्यंत समर्पक आणि समयोचित अशी ही संकल्पना आहे.
शरीराचं पोषण उत्तम असेल तर आजार होणार नाहीत. आणि झालेच तर ते लवकर बरे होतील, हा आधीच माहीत असलेला धडा- कोरोनानं क्रूर पद्धतीनं आपल्याला शिकवलेला आहे. त्यामुळे योग्य पोषण ही काळाची गरज आहे. 'पोषण आणि आयुर्वेद'- या संकल्पनेला समजून घेताना, 'शरीर पोषण' म्हणजे देह, इंद्रिये ,मन आणि आत्मा यांचे पोषण हे स्पष्ट आहे. त्यामुळे फक्त देह पोषणाचा विचार हा आयुर्वेदानुसार मर्यादित विचार आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरांचा आणि आहाराचा पुरातन काळापासूनचा इतिहास बघितला तर त्यांचा पाया हा आयुर्वेदावर आधारित आहे हे लक्षात येतं. आजवर आपल्या देह, इंद्रिय, मन, आत्म्याचं पोषण हे संस्कृती, परंपरा, कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, सणवार, प्रचलित आहार द्रव्ये, आणि भोजन व्यवस्था यामुळे झालेलं आहे. आजही आपल्या दैनंदिन जगण्याची प्रक्रिया बरीचशी आयुर्वेद शास्त्रानुसार आहे. पण ती जाणीवपूर्वक नाही तर अंगवळणी पडल्यामुळे आहे. पण आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे , चंगळवाद, हॉटेल संस्कृती मुळे आयुर्वेद आधारित जीवनशैली मागे पडू लागली आहे. त्याचे परिणामही आपण भोगतो आहोतच. मधुमेह ,हृदयविकार, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, संधिवात,पीसीओएस.. इत्यादी आजार घरोघरी मुक्कामाला आले आहेत. त्यामुळे आयुर्वेदातील पोषण संकल्पना समजून घेणं अगत्याचं आहे.
खरं तर हा विषय फार व्यापक आहे . आहारासंबंधी विस्तृत विवेचन शास्त्रामध्ये केलेलं आहे .दोन प्रकारचं आपल्याला यात मार्गदर्शन मिळतं. आहार द्रव्यांचे गुणधर्म आणि आहार कशा पद्धतीने घ्यावा याचे नियम. आहार सेवनाचे नियम जरी आपण काटेकोरपणे पाळले तरी उत्तम पोषणाचा मार्ग सुकर होत असतो. त्यामुळे प्रथम नियमांचा विचार करू.
'यत् पिंडी तत् ब्रम्हांडी'- हा पहिला नियम. निसर्गाचं घड्याळ हे कायम अचूकपणे चालत असतं. त्यानुसार शरीरातलं जैविक घड्याळ ही फिरत असतं. या दोन्ही घड्याळांची लय सारखी ठेवली की आपोआप शरीरातील संप्रेरकं योग्य वेळी पाझरू लागतात. उत्सर्जन- विसर्जन क्रिया योग्य वेळी होतात. सूर्योदयाच्या वेळी उठणं आणि सूर्यास्तानंतर लगेच भोजन करून लवकर झोपणं - ही खरी आदर्श पद्धत. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य याचं पालन करावं हल्ली असं वागणाऱ्यांची- 'बुरसटलेले' म्हणून खिल्ली उडवली जाते.मात्र हेच अक्षय कुमारने सांगितलं की पटतं.
दुसरा अत्यंत साधा पण तेवढाच कठीण नियम म्हणजे भूक लागली असतानाच खाणं. पशु पक्षी आणि लहान बाळं हा नियम पाळतात पण आपलं काय?? केव्हाही आणि काहीही खाण्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही. पथ्य (हितकर) आणि अपथ्य (अहितकर) एकत्र करून खाणे म्हणजे - 'समशन'. भोजन झाल्यावरही खाणे म्हणजे -'अध्यशन'. भोजनाची वेळ नसतानाही भोजन करणे म्हणजे - 'विषमाशन'. विरुद्ध गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे-
'विरुद्धाशन'. समशन, अध्यशन, विषमाशन आणि विरुद्धाशन- ही अनेक व्याधींना निर्माण करणारी कारणं आहेत. या चुका अनेकदा कळत नकळत आपण करतोच. ही कारणं जर आपण विचारपूर्वक टाळली तर बऱ्याच आजारांना अटकाव होऊ शकतो.
तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे पोटभरून ,तडस लागेपर्यंत जेवू नये. जेवणानंतर जर सुस्ती, जडपणा, दम लागणे- ही लक्षणं निर्माण होत असतील तर आपलं जेवण प्रमाणापेक्षा जास्त झालं आहे हे समजावं. प्रत्येकाला आपल्या पोटाचा अंदाज असतो. आपल्या पोटाचे आपण चार भाग करावे. दोन भाग- घन आहार, एक भाग- द्रवपदार्थ आणि एक भाग वायूच्या संचारासाठी मोकळा ठेवावा असं शास्त्र सांगतं. 'सावकाश जेवा'- असं म्हणण्याची आपली परंपरा आहे. 'सावकाश' म्हणजे स+अधिक अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी .सावकाश याचा अर्थ -पोकळी सह. म्हणजे पाहुणचार करतानाही आयुर्वेदाचा नियम पाळण्याची परंपरा आहे. पण आपण 'सावकाश' चा अर्थ आपल्या सोयीने घेतला आहे.
चौथा अगदी साधा नियम म्हणजे- तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं. शरीराला गरज असेल त्यावेळी शरीर पाणी मागतं. हल्ली तासातासाला पाणी पिण्याचं प्रमाण फार वाढलं आहे, ज्यामुळे हे अतिरिक्त पाणी शरीराबाहेर काढताना अवयवांवर ताण वाढून ते कमकुवत होऊ लागतात.
आतापर्यंत सांगितलेले चार नियम हे सामान्य नियम आहेत जे सगळ्यांनीच आचरणात आणणं आवश्यक आहे. पाचवा नियम हा व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे आजच्या भाषेत तो 'पर्सनल डायट प्लॅन' आहे. याला आहारविधि विशेषायतन म्हणतात. हे आठ प्रकारचे आहेत. 'प्रकृती'- म्हणजे आहार द्रव्यांचे गुणधर्म . 'करण'- म्हणजे द्रव्यावर होणाऱ्या प्रक्रिया. 'संयोग'- म्हणजे पदार्थात योग्य द्रव्यांचं मिश्रण. 'राशी'- म्हणजे भोजनातील प्रत्येक पदार्थांची मात्रा. 'देश'- म्हणजे आहारद्रव्यांचं उत्पत्ती स्थान. 'काल'- म्हणजे भोजनाचा योग्य काळ.'उपयोग संस्था'- म्हणजे भोजनाचा अपेक्षित परिणाम बघणे. 'उपयुक्तता'-
म्हणजे भोजन घेणार्या व्यक्तीची प्रकृती. अत्यंत सूक्ष्म विचार करून हे अष्ट आहारविधी विशेषायतन ठरविले आहे. आहाराबद्दलचा पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तिचं आहार नियोजन केल्यास व्याधीप्रतिकारक क्षमतेचा स्तर निश्चितच उंचावेल.
आहार सेवनाचे महत्त्वाचे नियम बघितल्यावर, 'काय खायचं?' हा विषय ओघानेच येतो,जो शास्त्रात अत्यंत विस्तृतपणे मांडला आहे. आहार द्रव्यांचं 12 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. 'शुकधान्य', 'शिंबी धान्य', 'मांसवर्ग', 'शाकवर्ग', 'हरितवर्ग', 'मद्यवर्ग', 'अंबुवर्ग', 'फलवर्ग','दुग्धवर्ग, 'ईक्षुवर्ग', 'कृतान्नवर्ग आणि 'आहार योग्य वर्ग'- अशा स्वरूपात, प्रत्येक वर्गात असणाऱ्या समस्त द्रव्यांचे गुणधर्म शास्त्रात लिहून ठेवले आहेत. या प्रत्येक वर्गावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. उदाहरणादाखल शुकधान्य म्हणजे- गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राळ, निवार, वरई, शामाक....., इत्यादी. यापैकी बाजरी नंतरची शूकधान्ये ही अनेक व्याधीं मध्ये परिणामकारक आहेत.व्याधीनाशनासाठी त्यांचे अनेक उपयोग लिहून ठेवले आहेत. या अनेक धान्यांची नावं ही आपल्याला माहीत नाही. वापरणं तर दूरच. पण संशोधनाअंती हे स्पष्ट झालंय की, ही धान्ये 'मिलेट्स' या वर्गातली असून त्यात भरपूर चोथा आहे. ती वर्षानुवर्ष साठवता येतात. आणि गहू तांदळा प्रमाणेच त्यात पोषणमूल्ये आहेत पण ती वजन वाढवत नाही व पचायला हलकी आहेत.ही धान्ये मधुमेह,लठ्ठपणा यावर वापरावीत असं आयुर्वेदानं हजारो वर्षापूर्वीच लिहून ठेवलंय आणि आजचं संशोधनही तेच सांगतं आहे.विस्मृतीत गेलेल्या या शूकधान्यांची लागवड, उत्पादन करून ती बाजारात लोकप्रिय करणं - हा विचार करणं आज गरजेचं आहे.
आज जग जवळ आल्यामुळे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ खाणं हे 'प्रतिष्ठेचं'मानलं जातं.वास्तविक हे पदार्थ 'संयोगविरुद्ध,' आणि 'देशविरुद्ध' असतात. आयुर्वेदातील आहार द्रव्यांच्या संपत्तीला आणि पूर्वी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लाह्या, सातू ,हळीव,राजगिरा,मुरमुरे फुटाणे,शिंगाडे... इत्यादी स्वस्त पण उच्च पोषणमूल्ये असणाऱ्या पदार्थांना आपण अडगळीत टाकलं आहे. त्याऐवजी ओट्स,केलॉग्ज,आॕलिव्ह आॕईल अशी बरीचशी पाहुणेमंडळी स्वयंपाकघरात विराजमान झाली आहेत.
देहाच्या पोषणा बद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. मनाच्या पोषणासाठी योगसाधना अत्यंत परिणामकारक आहे. आयुर्वेदात देहाच्या रसायना बरोबर सुदृढ मनासाठी 'आचार रसायन'- (कोड ऑफ कण्डक्ट) ही सांगितलं आहे. 'सत्वावजय चिकित्सा'- हा मनाच्या पोषणाचा एक उपचार असून त्यामध्ये रोग्याला त्याच्या व्याधि नुसार काय योग्य अयोग्य आहे हे सांगितलं जातं.
इंद्रियांच्या पोषणाचा आज विचार केला तर सध्या त्यांचं 'अतिपोषण' होतंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. बाह्य जग आणि शरीर या मधला दुवा म्हणजे ज्ञानेन्द्रिये असतात .आपण ज्या काही चुका करतो, त्या चुका सर्वप्रथम आपल्या ज्ञानेंद्रियांना झेलाव्या लागतात. आज दहा महिन्याच्या बाळाला ही जेवू घालताना व्हिडिओ दाखविण्याची महाभयंकर चूक आम्ही सर्रास करतो आहे. इंद्रियांचं योग्य पोषण केलं पाहिजे- हा विचार ही आज पचणारा नाही इतके आम्ही भरकटलेले आहोत.
मन आणि इंद्रिये यांचं योग्य पोषण करण्यास जर आम्ही असमर्थ असू तर आत्म्याच्या पोषणा बद्दल काय बोलावं? आत्मपोषणासाठी सगळ्या बाह्य प्रवृत्ती आत खेचून घ्याव्या लागतात. निदान रोज दहा मिनिटे शांत बसून आपल्या आत डोकावून बघावं आणि आपलाच आतला आवाज ऐकावा. कुणी सांगावं, एखाद्या दिवशी आपल्या 'या' आवाजाची ओढ आपल्याला लागेल आणि आत्म्याच्या पोषणाची ही सुरुवात होईल.
धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने, आयुर्वेद दिनाच्या मुहूर्तावर आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर - आपण डोळसपणे आयुर्वेद आणि पोषणाचा विचार करूया आणि ते आचरणात आणू या.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
डॉ साधना कुळकर्णी,अकोला.
#आयुर्वेदफॉरपोषण
#आयुर्वेददिन
#आहारविधीविशेषायतन
खूपच उपयुक्त अशी शास्त्रीय माहिती सामान्यांच्या उपयोगाची तर आहेच पण वैद्य वर्गा साठी पण उजळणी करून आचरणात आणण्यासाठी प्रेरणा देणारी पोस्ट आहे खुप खुप अभिनंदन.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteआपला ?परिचय
अतिशय माहितीपूर्ण लेख,किती सुंदर शब्दात मांडलं आहे madam, खूप खूप अभिनंदन!!
ReplyDeleteशास्त्र इतकं सोपं करून सांगण्याची तुमची हातोटी जबरदस्त आहे. अतिशय उत्तम शिक्षिकाच हे करू शकते. प्रत्येकाच्या मनातलंच तू कागदावर उतरवतात. अतिशय उत्तम लेख. आचरणात आणण्यासारखेच.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद.
माधवी सहजे.
शास्त्र इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याची तुझी हातोटी जबरदस्त आहे. एक उत्तम शिक्षिकाच हे करू शकते.
ReplyDeleteखूपच आचरणात आणण्यासारखे. सुंदर विचार, सुंदर शब्दांकन. अत्यंत माहितीपूर्ण लेख.
माधवी सहजे.
सुखद,सुलभ आणी सुन्दर लेख.
ReplyDeleteआहार परम औषधं.
वंदे धन्वंतरीं🙏👏👏
धन्यवाद मॅडम
ReplyDeleteखरोखर आपले आभार मानायला हवेत,
एकतर आपले लिखाण हे कुठलाही प्रांत असो खूपच सुंदर, अप्रतिम, व हृदयाला भिडणारे असते.
त्यात काही नवीन संदेश असतो.
ह्या Corona काळात पोषण या संबंधी आपण केलेले मार्गदर्शन खूप छान आहे.
सध्या आयुर्वेद या संबंधी लेखन करण्याचे पेव फुटले आहे, बरे त्या मध्ये इतकी controversy की कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न पडतो.
पण आपल्या लिखाणा मुळे आम्हाला एक मार्ग, दिशा सापडली आहे.
परत एकदा धन्यवाद व अभिनंदन.
असेच लिहित राहा.
भैरवी पाटील देशपांडे, हुबळी.
Very nice and informative. Written in very easy way.
ReplyDeleteसोप्या शब्दात आहार नियम व आहारवर्ग याबद्दल माहिती दिली, सध्या आधुनिक शास्त्राला भेडसावणारे non-communicable diseases (NCD) चे उत्तरे आयुर्वेदिक आहार व जीवनशैलीत मिळते
ReplyDeleteVery nice and easy to understand.
ReplyDeleteअभिनंदन 🌹
ReplyDeleteइंद्रियांचे कुपोषण, शरीराचे कुपोषण हे काही लोकांमध्ये स्थूलता आणि त्यासह येणारे सह व्याधी तर काही लोकांमध्ये कार्श्य आणि कार्श्य जन्य व्याधींचे यजमानत्व स्वीकारणे अपरिहार्य करते , याचं मार्मिक विवेचन 👌👍🙏डाॕ मेंडकी
[31/10, 14:23] Suvinay Damle: छान लिहिलंय
ReplyDelete[31/10, 14:23] Suvinay Damle: अभिनंदन
सुंदर व शास्त्रशुद्ध लिखाण ...
ReplyDeleteखरोखरच उजळणी झाली !
हे झाले शारीरिक पोषणाबद्दल ...
आपण आत्मा व मनाच्या पोषणाबद्दल ही अवश्य लिहावे ही विनंती !!
Brilliant description for Nutrition according to Ayurvedic concept for Indian society where Immunity power changes as seasonal atmosphere.
ReplyDeleteSuch type of writing skills is improving our Immunity power n then viruses n Bacterial infections will going to fail down. Congratulations Sadhana Kulkarni mam as a great writer
ReplyDeleteJust read your article from Tarun Bharat 'Asmant'
ReplyDeleteFound useful.
We will be happy to have a youtube channel from you, of course if you wish to do so.
My parents are really fond of Ayurveda and nature based living.
Thank you again for a good guidance through articles.
Yours sincerely
Er.Akshay Deshmukh
Khup chan, उद्बोधक. असे लेख सारखे वाचनात असावेत म्हणजे आपण कुठे चुकतो याची जाणीव सतत होईल
ReplyDeleteवासंती पंडित
शास्त्रशुध्द व मुद्देसूद विषय मांडणी, आहार विषयक बाबी ची उजळणी झाली, धन्यवाद मॅडम
ReplyDeleteखूपच साध्या आणि सोप्या भाषेत पोषणाच महत्व आणि महती सुंदर रित्या शब्दबद्ध केली mam.... खुप छान लेख
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन....
आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा.....
साधना किती छान आणि अभ्यासपूर्ण लिहिलंस खूप उपयोगी आणि बरीच नवीन माहिती मिळाली खरोखरच तुझे खूप खूप आभार आणि अभिनंदन किती छान लिहितेस त्याबद्दल
ReplyDeleteश्रद्धा कुळकर्णी
फारच उद्बोधक शास्त्र,नेहेमी प्रमाणेच तुझ्या ओघवत्या आणि साध्या सरळ शैलीत छान सांगितली आहेस!👌👍अभिनंदन!💐💐
ReplyDeleteवीणा मालशे
खुप अभ्यास पूर्ण लेख.खरोखर आचरणात आणावेत असे उपाय सांगीतले आहेत.मस्त.शुभ दीपावली🪔🪔
ReplyDeleteजयश्री अग्निहोत्री