त्यादिवशी ओपीडीत बसले असताना, समोर एक मध्यमवयीन स्त्री येऊन उभी राहिली. तिच्या संपूर्ण चेहर्यावरुन हास्य ओसंडत होतं. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात येणाऱ्या पेशंटच्या चेहऱ्यावर इतकं निर्मळ हास्य बघण्याची सवय नसल्यानं मी क्षणभर दचकलेच आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघू लागले.
' मला ओळखलं नाही मॅडम? मी शांताबाई भिसे -(नाव बदललंय) - बार्शीटाकळी. हा बघा माझा मुलगा. वीस वर्षाचा झालाय.'
'शांताबाई भिसे ,बार्शीटाकळी' म्हणताक्षणी मेंदूत पटापटा दिवे लागले आणि सगळं लख्ख आठवलं.
' अगं काय शिकतो तुझा मुलगा? किती छान दिसतोय.' मी विचारलं.
' मॅडम, काॕम्प्युटर चा डिप्लोमा घेतला आणि आता नोकरी करतोय. अरे पाया पड मॅडमच्या'. हे शेवटचं वाक्य मुलासाठी होतं .
'अगं,किती वर्षाने भेटते आहेस तू?'- मी.
थोडावेळ हालहवाल सांगून शांताबाई निघून गेली. ती निघून गेली पण मी वीस वर्षांपूर्वीच्या त्या प्रसंगात जाऊन पोचले.
वीस वर्षापूर्वी जेव्हा मी आरएमओ म्हणून काम करीत होते, तेव्हाचा हा एक विलक्षण अनुभव. काही काही अनुभव मनात पक्के रुतून बसतात, त्यापैकीच हा एक.
त्यावेळी मी हॉस्पिटलच्या क्वार्टरमधे राहत होते. आणि माझा विभाग म्हणजे प्रसुती विभाग . त्यामुळे रात्री ,बेरात्री, अवेळी वाॕर्डमधून कॉल येणं हे नेहमीचंच होतं. त्या दिवशीही असंच मध्यरात्री दोन वाजता दारावरच्या थापांनी आणि 'मॅडम- मॅडम' या हाकेने मी ताड्कन उठले. आताशा मला दारावरच्या थापांवरून पेशंटच्या परिस्थितीचा अंदाज येऊ लागला होता. कॉलबेल एकदाच सौम्यपणे वाजली, की नुकत्याच हलके हलके कळा सुरू झालेली पेशंट असणार.
कॉलबेल न थांबता वाजत राहिली, की पेशंट च्या प्रसूती कळा वाढलेल्या असणार.
कॉलबेल न वाजवता दारावर जोरजोरात थापा पडू लागल्या, की - 'मॅडम, चला. पेशंटला टेबलवर घेतलं आहे' हा निरोप असणार.
दारावर थापांबरोबरच हाका सुद्धा असल्या, की नक्कीच काहीतरी इमर्जन्सी असणार.
त्या रात्री तसंच झालं. मी ताड्कन उठून दार उघडलं. 'मॅडम, लवकर चला. पेशंटची रस्त्यात ऑटोतच डिलिव्हरी झाली. खूप ब्लीडिंग होतंय. पेशंट अर्धवट शुद्धीत आहे.' सिस्टर एका दमात बोलल्या.
'पेशंट रजिस्टर्ड आहे का?'- मी.
'हो.दोनवेळा येऊन गेलीय तपासायला'.- सिस्टर.
'आणि बाळ कसं आहे ग?'- मी चपला घालता घालता विचारलं. 'मॅडम, ते बाळ गेलेलंच होतं, असं त्या पेशंटची सासू आणि नवरा सांगताहेत.
'गेलेलंच बाळ?' माझ्या मनात शंका आली. काय कारण असू शकेल?
'बाळ बघितलं तुम्ही?'
'नाही मॕडम.ते गेलेलंच आहे म्हणून ......'
हे बोलणं होईपर्यत पर्यंत आम्ही वाॕर्ड मध्ये पोचलो.
पेशंटचे नातेवाईक डोक्याला हात लावून बसलेले दिसले.पेशंटला बघूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं . आत टेबलवर शांताबाईला झोपवलं होतं. सगळी साडी रक्ताने भिजली होती. माझ्या हाऊस ऑफिसरने बीपी,पल्स बघून सलाईनची तयारी करुन ठेवली होती.
'शांताबाई , कसं वाटतंय आता?काय त्रास होतोय?' - तिच्या डोक्यावर थोपटत,नाडीवर हात ठेवत,तिचे डोळे बघून तिच्या हिमोग्लोबिनचा अंदाज घेत, तिला विचारलं. अर्धवट डोळे उघडणं - एवढाच तिचा प्रतिसाद होता. रस्त्यात होणारी डिलिव्हरी आणि त्यानंतर होणारा रक्तस्त्राव घेऊन येणारा पेशंट आम्हाला नवीन नव्हता. एक तर, अशा वेळेला प्रसूती मार्ग वेडावाकडा फाटला जातो किंवा प्लॕसेंटा चा एखादा तुकडा गर्भाशयातच राहतो. ही दोन मुख्य कारणं रक्तस्रावाची असू शकतात. शांताबाईचं यापैकीच एक कारण असावं हा माझा अंदाज होता. पण त्याआधी तब्येत गंभीर असल्याची लेखी संमती ,आयव्ही सलाईन लावून तिचं पल्स, बीपी नॉर्मल च्या जवळपास आणणं - हे आणि बरेच काही सोपस्कार महत्त्वाचे असतात. सगळ्या स्टाफला ही कामं सरावाची असल्यानं,ती लगेचच हातावेगळी झाली. मला प्रामुख्याने रक्तस्त्रावाचं कारण शोधायचं होतं. सिस्टर ने पेशंट स्वच्छ केल्यावर मी तपासलं तेव्हा तिचा प्रसूती मार्ग वेडावाकडा फाटलेला आहे, हे लक्षात आलं. त्यासाठी आत पर्यंत व्यवस्थित टाके घालणं आणि ॲनस्थेशिया आवश्यक होता. स्टाफला सगळ्या सूचना देऊन तयारी करण्यास सांगितलं आणि ॲनस्थेटिस्ट ला फोन केला. परत एकदा पेशंटची अवस्था बघितली आणि ती आपल्या आटोक्यात येणारी आहे हे लक्षात आल्यामुळे जवळजवळ १०मिनीटांनी एक शांत आणि दीर्घ श्वास घेतला.
मी तिच्या नातेवाईकांशी बोलायला बाहेर आले.सासू आणि नवरा खूप घाबरले होते. तिच्या तब्येतीविषयी सगळी कल्पना तिच्या नवऱ्याला आणि सासूला दिल्यावर मी बाळाबद्दल चौकशी करु लागले.
' बाळ पूर्ण दिवसाचं होतं की अपुऱ्या दिवसाचं?आणि ते पोटातच गेलं होतं की जन्म झाल्यावर लगेच गेलं?आॕटोमधे डिलीव्हरी झाल्यावर कुठे लागलं होतं का बाळाला?'
' मॅडम डिलीव्हरी कधी झाली हे पण समजलं नाही. बार्शीटाकळीहून आॕटोत बसलो.रस्त्याने अंधार होता.शांताची शुद्ध हरपली म्हणून तिला आम्ही आडवं केलं तेव्हा लक्षात आलं. बाळाचा रडायचा आवाज पण आला नाही. बाळ निपचित होतं. श्वासही घेत नव्हतं. म्हणून आम्हाला वाटलं पोटातच गेलं असेल'.- सासू .
'बाई,तुम्ही बाळ दाखवा बरं'- असं म्हणताच तिचा नवरा ऑटो जवळ गेला आणि एक कापडी पिशवी घेऊन आला. त्या पिशवीत त्यांनी त्या बाळाचं मुटकुळं ठेवलं होतं. ती पिशवी बघून मला अक्षरशः ढवळून आलं. सिस्टरने ते बाळाचं गाठोडं बेबी ट्रे मधे ठेवलं.त्याला वरवर पुसून स्वच्छ केलं. पांढरंफट्ट पडलेलं, निपचित झालेलं पण गुटगुटीत असलेलं बाळ बघून मनातला शंकासुर जागा झाला. बाळाच्या मृत्यूचं नेमकं काय कारण असावं??
मी सहज त्याच्या छातीवर हात ठेवला. त्या थंडगार स्पर्शाने अंगावर काटा आला. पण क्षणभरातच त्याच्या हृदयाचा एक मंद ठोका मला जाणवला आणि माझ्या छातीचे ठोके वाढले.स्टेथोने आणखी दोन क्षीण ठोके मला ऐकू आले आणि .........'सिस्टर' - मी जोरात ओरडले . माझ्या ओरडण्याने सिस्टर आणि हाऊस ऑफिसर काय समजायचं ते समजल्या. बाळाला उलटं पकडणं, त्याचं सक्शन करणं,त्याच्या पोट/पाठीवर थंड/गरम पाण्याचे सपकारे मारणं, त्याला ऑक्सीजन लावणं, आणि आवश्यक ती इंजेक्शन देणं - - या सगळ्या स्टेप्स आम्ही भराभरा करायला सुरुवात केली आणि लगेच जवळ असणाऱ्या एनआयसीयु मधे फोन करुन कल्पना देऊन ठेवली. सातव्या मिनिटाला त्या बाळाचा रंग बदलायला लागला. बाळाचे पंजे गुलाबी दिसायला लागले. त्याची छातीची धडधड क्षीण का होईना पण सुरू झाली. आणि बाळाने डोळे अर्धवट उघडले. बाळाचा सकारात्मक प्रतिसाद बघून त्या बाळाला व्यवस्थित दुपट्यात गुंडाळून एनआयसीयुत भरती करण्यासाठी नातेवाईकांच्या सुपूर्द केलं. एनआयसीयु मध्ये लगेच त्याची ट्रीटमेंट ही सुरू झाली. तोपर्यंत अॕनस्थेटिस्ट आले. पेशंटला व्यवस्थित टाके घातले गेले ज्यामुळे रक्तस्त्राव नियंत्रित झाला. आणि सलाईन सुरु असल्यामुळे शांताबाई ची तब्येत व्यवस्थित होऊ लागली . हे सगळं आटोपेपर्यंत सकाळचे सहा वाजले . एनआयसीयु मधून निरोप आला की बाळाचा धोका अजून टळलेला नाही. पण आशा आहे की ट्रीटमेंटला चांगला प्रतिसाद मिळेल. आणि तेव्हा कुठे आम्ही सगळे आमच्या नॉर्मल स्थितीमध्ये आलो.
संध्याकाळपर्यंत बाळ आणि बाळंतीण व्यवस्थित झाले. बाळाला पाच दिवस एनआयसीयु मध्ये ठेवून मग त्याला सुट्टी दिली.आता मला भीती ही होती की जन्मानंतर बराच वेळ बाळ रडलं नाही. त्यामुळे त्याच्या मेंदूवर सूज येऊन सेरेब्रल पाल्सी होईल की काही व्यंग निर्माण होईल का? पण याचं उत्तर काळाच्याच हातात होतं. बाळ तर वाचलं होतं .त्यानंतर जवळ जवळ वर्षभर, शांताबाई दर महिन्याला बाळाला घेऊन तपासायला येत असे. त्या वर्षभरात बाळाची वाढ व्यवस्थित होती. नंतर मात्र शांताबाई कधीच आली नाही. आणि परवा तो वीस वर्षाचा धडधाकट मुलगा बघून मला अक्षरशः भरून आलं. त्यावेळी त्या नातेवाईकांवर विश्वास ठेवून मूल गेलेलंच आहे या समजूतीत मी बाळाला मी हातही लावला नसता तर???
पण "देव तारी त्याला कोण मारी" हेच खरं.त्या मुलाच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून देवानं मला त्याला हात लावून तपासण्याची बुद्धी दिली असंच म्हणावं लागेल.
मॅडम, सगळं चित्र च उभं राहिलं. आपल्या सगळ्याच्या आयुष्यात एखादी तरी शांताबाई येतेच. 👌👌
ReplyDeleteविलक्षण अनुभव..सुंदररित्या सादर केला.
ReplyDeleteमस्त मॅडम.... खूपच छान अनुभव... देव तारी त्याला कोण मारी.... तुम्ही त्या बाळासाठी देव झाला होता मॅडम....म्हणूनच म्हणतात ईश्र्वरानंतर पृथ्वी तलावावर देव कोण असेल तर डॉक्टर आहे... खूप छान काम मॅडम... तुमच्या कार्याला सलाम...
ReplyDeleteशतशः नमन
ReplyDeleteअसे अनुभवच आयुष्य सफल आणि समृद्ध करीत असतात. छानच लिहिलंय.
ReplyDeleteअसे अनुभवच आयुष्य सफल आणि समृद्ध करीत असतात. छानच लिहिलंय.
ReplyDeleteखरच पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर आला.प्रसंगावधानाचं कौतुक. आई मुलाला जीवदान मिळालं.हीच मोठी पावती.
ReplyDeleteVery well written Madam...hatsoff to you!!!
ReplyDeleteसातत्याने चांगलं लिहीते आहेस तुझं खूप खूप कौतूक
ReplyDeleteखूप छान वाचतांना अंगावर अक्षरशः काटा आला. देव तारी त्याला कोण मारी अगदी खरे
ReplyDeleteGot goosebumps while reading. Nicely written
ReplyDeleteशब्द नाहीत. तुम्ही तो प्रसंग तर जिवंत केलाच आहे पण त्या जीवालाही जिवंत ठेवलं आहे. अभिवादन मॅडम
ReplyDeleteGrt mam
ReplyDeleteNicely written 👌👌👍
ReplyDeleteखरं आहे. देव तारी त्याला कोण मारी? दंडवत तुम्हाला त्या देवाचे देवदूत झाल्याबद्दल!
ReplyDeleteKhup chan mandlet
ReplyDeleteचित्तवेधक लिहिलं आहेस !
ReplyDeleteखरंच अविस्मरणीय अनुभव
ReplyDeleteलय भारी
ReplyDeleteखूप छान
डॉक्टर म्हणजे देवच आहे हे यातून सिध्द होते.
लोक विनाकारण डॉक्टरला दोष देतात, मारतात हे योग्य नाही.
असेच अनुभव सांगत जा.
खुप छान लिहलय,
ReplyDeleteत्या मुलाला इतक्या वर्षांनी बघितल्यावर किती समाधान वाटलं असेल नाही.
असा आनंद स्वतः ला खुप काही देउन जातो.
Indeed a beautiful experience which gives immense satisfaction!!
ReplyDeleteअविस्मरणीय अनुभव. डॉक्टरांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडत असतात नाही? उगाच नाही डाॅक्टरांना देवाची उपमा देत.
ReplyDeleteखूप छान लिहिलंय.... नेहमी प्रमाणे.
माधवी सहजे.
डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर असली की क्रिटिकल केसेस मध्ये लॉजिकल थिंकिंग काम करतंच. आधी नवप्रसुता आईला वाचवलं आणि नंतर बाळाला. बाळाला तपासतांना तळहाताची संवेदनशीलता अवघे स्पर्शनेन्द्रीयाला कवेत घेणारी ठरली. CVS exam करताना Inspection, Palpation, Percussion आणि Auscultation ही चार परीक्षणं त्यांचं महत्व अधोरेखित करून जातात आणि नव्या उदयोन्मुख वैद्यक विद्यार्थ्यांना सहजच धडा देऊन जातात. म्हणूनच 'मनातला शंकासुर ' असं न म्हणता 'मनातला देवदूत 'जागा झाला असे म्हणणे जास्त उचित. हृदयस्पर्शी लिखाणासाठी मनापासून दाद आणि अभिनंदन 🌹👍🙏
ReplyDeleteरोमांचक आणि तितकाच या क्षेत्रात एकदा तरी प्रत्येकाला हमखास येणारा अनुभव!
ReplyDeleteअतिशय उत्कंठावर्धक लिखाण मॅडम!
हाऊसजाॅब करतानाच्या २ वर्षांचा काळ असाच जीवनाचे धडे देणारा होता.
अप्रतिम लेख
ReplyDeleteह्रुदयस्पर्शी!
ReplyDeleteखूपच विलक्षण अनुभव! अंगावर काटे आलेत वाचतांना !
ReplyDelete🙏🏻🙏🏻
वाचतांना अंगावर अक्षरशः काटा आला. खूपच विलक्षण अनुभव!
ReplyDeleteइथे देव तारी न म्हणता डॉक्टर तारी त्याला कोण मारी असंच म्हणायला पाहिजे इथे
ReplyDeleteKhrch khup vilakshan....
ReplyDeleteजबरदस्त अनुभव। तुमचा लेख क्षणाक्षणाने उत्कंठा वाढवत होता। असे किती अनुभव येत असतील तुम्हाला। खूप छान लेख
ReplyDeleteमनीषा कुळकर्णी
मॅडम नमस्कार
ReplyDeleteमी आपले जवळपास सर्वच लिखाण नेहमी वाचतोच.
आपले प्रत्येक लिखाण म्हणजे एक नवा अनुभव असतो.
विविध विषयावर लिखाण करण्याची आपली हातोटी जबरदस्त आहे.
सर्व लिखाण हे मनाला,हृदयाला डायरेक्ट जावून भिडते.या मध्ये आपण केंव्हा समरस होती हे समजतच नाही.
हा अनुभव खरोखर जबरदस्त आहे.
असेच लिहून या कोरोनाच्या निराशा जनक काळात
मन ताजे ठेवण्यास मदत करा.
डॉ भार्गव
शब्दच नाहीत👌👍🙏
ReplyDeleteKhup inspiring anubhav share kelat mam 😊....lekh vachatana amache lady Harding che internship che Kahi divas athavlet....khup mst mam
ReplyDeleteVaishnavi
Mam superb command over language and awesome skills to explain...
ReplyDeleteRekha Rathi
केवळ अद्भुत ! परमेश्वर त्या दिवशी तुझ्या रुपाने आला साधनाताई .
ReplyDeleteआणि लिहिलं पण फार फार सुंदर आहे . जणू चित्रपटाची पटकथा . अगदी डोळ्यापुढे उभा राहिले सगळे !
( शुभदा वेखंडे )
हृदयाचे ठोके आणि उत्कंठा वाढवणारे लिखाण...
ReplyDeleteखूपच छान !!
👌👌👌